मेकॉले विरुद्ध प्रिन्सेप, प्रिन्सेप विरुद्ध ट्रेवेल्यन

अरविंद कोल्हटकर

(हे लेखन इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या काही पुस्तकांवरून आणि अन्य सामग्रीचा वापर करून लिहिण्यात आलेले आहे. संकेतस्थळांचा उल्लेख तळाशी क्रमवारीने दिला आहे. पुस्तकांच्या पृष्ठांचे संदर्भ १:१२, २:२० अशा प्रकारे दिलेले आहेत.)

१८३४ सालचा हिंदुस्थान. दुसर्‍या बाजीरावाला बिठूरास पेन्शनवर पाठवल्यानंतर ब्रिटिश सत्ता हिंदुस्थानात सुस्थापित झाल्यासारखी दिसत होती. पुष्कळ भागात प्रत्यक्ष सत्ता आणि उर्वरित भागात ताटाखालची मांजरे बनलेले राजे-महाराजे आणि नवाब ह्यांमुळे एक उद्धट आत्मविश्वास सत्ताधारी वर्गामध्ये निर्माण झाला होता. युरोपीय (विशेषेकरून ब्रिटिश) संस्कृती, ज्ञान, समाज आणि वंश (तेव्हाचा शब्द, आजचा नव्हे) हे हिंदुस्थानी संस्कृती, ज्ञान, समाज आणि वंश ह्यांपेक्षा गुणत: श्रेष्ठ आहेत अशी भावना सत्ताधारी वर्गामध्ये दृढमूल होऊ लागली होती. ह्या पार्श्वभूमीवर त्या काळात ब्रिटिश राजकर्त्या वर्गामध्ये झालेल्या भाषा आणि लिपीसंबंधातल्या दोन वादांना सौकर्यासाठी शीर्षकातील सुटसुटीत नावे दिली आहेत.
ह्या दोन वादांपैकी पहिला आजही चांगलाच स्मरणात आहे. त्या वादाच्या नावातील मेकॉले म्हणजे थॉमस बॅबिंग्टन मेकॉले (१८००-५९). १८३२ ते १८३३ अखेर लंडनमधून ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्यावर देखरेख करणार्‍या बोर्ड ऑफ कंट्रोलचा सेक्रेटरी, तदनंतर १८३४ ते १८३७ अखेर ह्या काळात कलकत्त्यात गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलमध्ये लॉ-मेंबर अशी साधारण ६ वर्षे त्याचा हिंदुस्थानच्या कारभाराशी प्रत्यक्ष संबंध होता. इंडियन पीनल कोड तयार करणे हे महत्त्वाचे काम त्याने ह्या काळातच पार पाडले. ह्याखेरीज कमिटी ऑफ पब्लिक एज्युकेशनचा अध्यक्ष म्हणून त्याने जे विस्तृत टिपण लिहिले त्याचा परिणाम म्हणजे हिंदुस्थानातली शिक्षणाची पद्धत मुळापासून बदलली आणि शिक्षणाला एक नवी दिशा प्राप्त झाली. आज आपणांला दिसतो तो भारत देश तिच्यातून निर्माण झाला आहे. कमिटीच्या दहा सदस्यांमध्ये ५-५ अशी विभागणी झाली होती. पाच सदस्यांच्या मते सरकारने तोवर चालत आलेले शैक्षणिक धोरणच पुढे चालवावे, ज्यायोगे सरकार जुन्या पद्धतीच्या संस्कृत, अरेबिक आणि पर्शियनच्या अभ्यासावर भर देणारे धोरणच चालू ठेवील. उर्वरित पाच सदस्य इंग्रजी भाषा आणि आधुनिक ज्ञान देणार्‍या नव्या पद्धतीचा आग्रह धरत होते. (ह्या दोन विचारांना पुढील लेखनात अनुक्रमे पौर्वात्य आणि पाश्चात्य असे संक्षेपाने संबोधले आहे.) कमिटीचा अध्यक्ष म्हणून मेकॉलेने जे भारदस्त टिपण (minute) लिहिले त्यामुळे पारडे पाश्चात्य पक्षाच्या बाजूस झुकले आणि तेव्हापासून इंग्रजी भाषेची चलती हिंदुस्थानात सुरू झाली. मेकॉलेचे मूळ पूर्ण टिपण केव्हाच गहाळ झाले आहे असे दिसते. पण त्याचा पुष्कळसा भाग तळटीप ५ मध्ये उपलब्ध आहे. टिपण संक्षेपाने पाहायचे असेल तर ३:४०९ वाचा. टिपणातील काही विधाने आज भारतीयांना रुचणारी नाहीत पण ती तत्कालीन पूर्वग्रह आणि समजुतींची द्योतक असल्याने मेकॉलेला आज त्यावरून झोडपण्यात काहीच तथ्य नाही.

ह्या वादातील पराभूत पौर्वात्य पक्षाचा प्रमुख म्हणजे हेन्री थॉबी प्रिन्सेप (१७९२-१८७८) आणि जेम्स प्रिन्सेपचा थोरला भाऊ. हाही कलकत्त्यातील उच्चपदस्थांपैकी एक होता. गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंकचा अंतिम निर्णय त्याच्या पौर्वात्य पक्षाच्या विरोधात गेल्यामुळे कमिटीच्या सदस्यत्वाचा त्याने राजीनामा दिला. ह्यावरून पहिल्या वादाला मेकॉले विरुद्ध प्रिन्सेप असे नाव दिले आहे.
दुसर्‍या वादातील प्रिन्सेप म्हणजे जेम्स प्रिन्सेप (१७९९-१८४०). ब्राह्मी लिपीची उलगड करून भारताच्या प्राचीन इतिहासाचे दालन उघडणारा. वर उल्लेखिलेल्या हेन्री थॉबीचा धाकटा भाऊ. ह्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेले स्मारक आजही कलकत्त्यात प्रिन्सेप घाट ह्या स्थानावर उभे आहे. वादातल्या विरोधी पक्षाचा मुख्य प्रतिनिधी चार्ल्स एडवर्ड ट्रेवेल्यन (१८०७-१८८६). अगदी तरुण वयात हा हिंदुस्थानात कंपनी सरकारच्या नोकरीत आला आणि भराभर वर चढत १८३४ सालापर्यंत वयाच्या २७व्या वर्षी गव्हर्नर जनरलच्या निकटवर्तीय वर्तुळात त्याची गणना होऊ लागली होती (३:३९१). भारतीय भाषा लिहिण्यासाठी त्यांच्या चालू लिपीच योग्य आहेत की सर्व भारतीय भाषांना रोमन लिपी लागू करावी ह्या मुद्यांवर हा दुसरा वाद खेळला गेला. प्रिन्सेपसारख्या पौर्वात्यांच्या मते रोमन लिपी भारतीय भाषा लिहिण्यासाठी पुरेशी पडली नसती आणि चालू पद्धतीत बदल करण्याचे काहीच कारण नव्हते. ट्रेवेल्यनसारख्या पाश्चात्त्यांच्या मते रोमन लिपीच्या मार्गाने युरोपीय ज्ञानाचा हिंदुस्थानात प्रवेश आणखी सुकर झाला असता. अमेरिकन आणि अन्य मिशनरी प्रयत्नांमध्ये धर्मप्रसारासाठीची पुस्तके एतद्देशीय भाषांमध्ये पण रोमन लिपीत छापण्याची सुरुवात झालीच होती. मिशनरी वर्गाचा कल साहजिकच रोमन लिपीकडे होता. पहिल्या वादाचा निर्णय सरकारी पातळीवरून करण्यात आला. दुसर्‍या वादात मात्र सरकारी पातळीवर काहीच स्वारस्य दाखविण्यात आले नाही. परिणामत: त्याचे स्वरूप दोन खाजगी पक्षांमधले मतान्तर एवढेच मर्यादित राहिले. कमी-अधिक जोराने हा वाद पुढची साठ-एक वर्षे चालू राहिला, पण तेवढ्या काळात देशी भाषांचीच बरीच प्रगती झाल्याने आणि त्यांच्यामध्येच बरीच ग्रंथसंपदा निर्माण झाल्याने ह्या वादातली हवाच निघून गेल्यासारखे झाले. १८५७च्या उठावानंतर प्रजेला उगीचच डिवचणेही राज्यकर्त्यांना शहाणपणाचे वाटले नसावे.

पहिल्या वादामध्ये निर्णय सरकारी पातळीवरून केला जाण्याचे कारण म्हणजे तो वाद १८१३ सालच्या चार्टर कायद्यामध्ये वापरण्यात आलेल्या 'लर्नेड नेटिव्ह्ज ऑफ इंडिया' (सुशिक्षित एतद्देशीय) ह्या शब्दांचा अर्थ कसा लावायचा ह्या कायद्याच्या मुद्याभोवती केन्द्रित होता. मेकॉलेच्या टिपणामधून हे स्पष्ट दिसून येते. तो म्हणतो : (५)
''... सार्वजनिक शिक्षण-कमिटीच्या काही सदस्यांच्या मते आजतागायत चालत आलेली पद्धती हीच काय ती ब्रिटिश संसदेने १८१३ मध्ये पुरस्कृत केलेली पद्धती आहे... मला नाही असे वाटत की संसदेने केलेल्या कायद्याचा कशाही मार्गाने अर्थ लावला तरी त्यामधून सध्या लावलेला अर्थ काढता येईल. अमुकच भाषा किंवा अमुकच शास्त्र असे काहीही कायद्यात उल्लेखिलेले नाही. वाङ्मयाचे पुनरुज्जीवन आणि विकास आणि सुशिक्षित एतद्देशीयांना उत्तेजन अशा हेतूने आणि ब्रिटिश सत्तेखालच्या भागातील रहिवाशांमध्ये शास्त्रीय ज्ञानाचा प्रवेश आणि विकास व्हावा अशा हेतूने काहीएक रक्कम बाजूस काढून ठेवण्यात आली आहे. ह्यावरून असे मांडण्यात येत आहे किंवा असे गृहित धरून चालण्यात येत आहे की संसदेच्या मते वाङ्मय म्हणजे केवळ अरेबिक वा संस्कृत वाङ्मय. मिल्टनची कविता, लॉकचे तत्त्वज्ञान वा न्यूटनचे पदार्थविज्ञान ह्यांच्याशी परिचय असणार्‍या एतद्देशीयाला जणू सुशिक्षित एतद्देशीय ही उपाधी संसदेने लावलीच नसती. कुश दर्भाचे उपयोग आणि परमेश्वरात विलीन होण्याचे रहस्य हिंदूंच्या पवित्र ग्रंथांतून शिकलेल्यांनाच जणू ही उपाधी लागावी, हा अर्थ समाधानकारक आहे असे मला वाटत नाही."

अशा रीतीने चार्टर कायद्याचा अर्थ लावण्याचा प्रसंग पडल्याने आणि 'सुशिक्षित एतद्देशीय' ह्या शब्दांचा अर्थ 'युरोपीय ज्ञान घेतलेले' असा प्रस्थापित झाल्याने जुन्या पद्धतीचे शिक्षण थांबवून त्याच्या जागी नव्या पद्धतीचे शिक्षण देण्यात यावे हा निर्णय सरकारी पातळीवरून करण्यात आला. हा निर्णय जरी हिंदुस्थानी प्रजेच्या भविष्यावर कायमचा परिणाम करणारा होता तरी तो घेतला गेला कलकत्तेकर इंग्रजांच्या छोट्या उच्च वर्तुळात. आपल्या आणि आपल्या देशाच्या भवितव्यावर मूलभूत परिणाम करणारा असा काही निर्णय घेतला जात आहे ह्याची हिंदुस्थानी प्रजेला ना जाणीव होती ना काळजी. लिपिबदलाबाबत कोणताच कायदा वाटेत येत नसल्याने काहीच निर्णय झाला नाही आणि जैसे थे परिस्थितीच चालू राहिली. माझ्या मते हिंदुस्थानी प्रजेचे हे मोठेच सुदैव म्हणायचे. नपेक्षा राज्यकर्त्यांच्या ह्याच उच्च वर्तुळाने एका फटक्यात देवनागरीसहित सगळ्या लिपी निकालात काढल्या असत्या आणि त्या जागी रोमन लिपीची स्थापना केली असती. ह्या 'सुधारणेचे' परिणाम हिंदुस्थानी प्रजेने कायमचे भोगले असते. ह्या विषयीचे माझे वैयक्तिक मत ह्या लेखनाच्या अखेरीस विस्ताराने लिहिले आहे. येथे एवढेच लिहितो की सर्वविनाशाच्या गर्तेपासून आपण थोडक्यात वाचलो आणि त्यामुळे आज भारत एक सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून जगात मानाने उभा आहे.

(हा संपूर्ण वाद क्र०१ येथे दर्शविलेल्या जागी वाचावयास उपलब्ध आहे. तेथील पल्लेदार इंग्रजीतील लांबलचक टिपणे वाचायची नसतील तर त्यांचा उत्तम सारांश क्र०२मध्ये प्रोफेसर आणि शब्दकोशकार मोनियर विल्यम्स ह्यांनी लिहिला आहे. ह्या वेळेपर्यंत त्यांचे आडनाव विल्यम्स एवढेच होते. पुढे १८८६ साली त्यांना KCIE ही पदवी मिळाली तेव्हा त्यांनी आपल्या आडनावात 'मोनियर' हा शब्द जोडला आणि ते मोनियर मोनियर-विल्यम्स अशा double-barelled आडनावाने ओळखले जाऊ लागले. (७)
लिपीसंबंधीच्या वादाची सुरुवात एका छोट्या बाबीवरून झाली. थॉमसन नावाच्या दिल्लीस्थित इंग्रजाने ट्रेवेल्यनच्या सूचनेवरून रोमन लिपीत एक इंग्रजी-उर्दू शब्दकोश तयार केला. त्याच्या प्रती कलकत्त्यातील स्कूल बुक सोसायटीने विकत घ्याव्या काय असा प्रस्ताव सोसायटीपुढे आला. तिचे दोन सदस्य जेन्स प्रिन्सेप आणि टायटलर ह्यांनी हिंदुस्तानी भाषांसाठी रोमन लिपी वापरण्याचे काहीच कारण नाही असे त्रोटक शेरे मारून आपला विरोध नोंदवला. उत्तर म्हणून ट्रेवेल्यनने विस्तृण टिपण लिहिले. तद्नंतर मूळ मुद्दा दूर राहून रोमन लिपी हिंदुस्थानातील भाषांना लागू करणे योग्य की अयोग्य हा वाद सुरू झाला. मिशनरी लोकांना ह्या प्रश्नात रस असल्याने त्यांच्या सेरामपूर प्रेसने १८३४ सालीच ह्या संपूर्ण वादातील मतमतान्तरे एकत्र करणारे पुस्तक छापले. (ते पुस्तक क्र०१ येथे उपलब्ध आहे.) ह्या वादावर सरकारच्या बाजूने काहीच अधिकृत प्रतिक्रिया आलेली दिसत नाही. हे एक मोठेच आश्चर्य आहे. परिणामत: वादाचा काहीच निर्णय न होऊन परिस्थिती पूर्ववत चालू राहिली. मोठेच आश्चर्य असे मी म्हणतो ह्यामागे एक मनोरंजक कारण आहे आणि ते पाहण्यासाठी थोडे विषयांतर करावे लागेल.

मेकॉले हिंदुस्थानात आला तेव्हा तो अविवाहित होता. आपल्या दोन बहिणींवर त्याची फार माया होती आणि त्या दोघींपैकी धाकटी हॅना हीही अविवाहित असून भावाबरोबरच हिंदुस्थानात आली. (लग्नाच्या हेतूने, दुसरे काय? तेव्हाची ती पद्धत होती.) कलकत्त्यात आल्यावर चार्ल्स ट्रेवेल्यन हा उपवधू आणि उज्ज्वल भवितव्य असलेला तरुण तिच्या प्रेमात पडला आणि डिसेंबर १८३४मध्ये त्यांचा विवाह झाला. मेकॉलेला हा विवाह पूर्णपणे पसंत होता, कारण ट्रेवेल्यनबद्दल त्याचे फार चांगले मत होते. दोघांना जरी उत्तम पगार असले तरी दोघेही मूळचे मध्यमवर्गीय होते आणि बचत करून ती मायदेशी पाठवण्याची दोघांनाही आवश्यकता होती. ह्या कारणाने विवाहानंतर नवविवाहित दांपत्य आणि मेकॉले एकाच घरात राहिले (३:३९४). (ह्याच घराच्या जागेवर सध्याचा प्रतिष्ठित बेंगाल क्लब उभा आहे (३:३८९). पाश्चात्य विरुद्ध पौर्वात्य शिक्षण हा पहिला वाद ह्याच सुमारास चालू होता, कारण मेकॉलेचे टिपण २ फेब्रुवारी १८३५ ह्या दिवशी लिहिले गेले (क्र० ५). मेव्हणे मेव्हणे आणि एकाच घरात राहणारे असूनही ट्रेवेल्यनने लिपीच्या प्रकरणातही रस घ्यायला मेकॉलेला उद्युक्त केल्याचे दिसत नाही. रोजच्या रोज डिनर टेबलवर ते काय बोलत होते ह्याबाबत काहीच नोंद उपलब्ध नाही. जर मेकॉलेने भाषेबरोबर लिपीच्या कामातही लक्ष घातले असते तर अजून एक भारदस्त टिपण लिहून ह्याही प्रश्नाचा कायमचा निकाल त्याने लावला असता. (जाता जाता असाही उल्लेख करावासा वाटतो की क्र० ३चे मेकॉलेचे चरित्र त्याचा भाचा आणि हॅनाचा मुलगा जॉर्ज ओटो ट्रेवेल्यन ह्याने लिहिलेले आहे.)

कालान्तराने मेकॉले आणि ट्रेवेल्यन दोघेही इंग्लंडला परतले. चार्ल्स ट्रेवेल्यन १८५९मध्ये हिंदुस्थानात परत आला. मद्रासचा गव्हर्नर आणि व्हाइसरॉयच्या कौन्सिलात अर्थविभागाचा सदस्य म्हणून १८६५ पर्यंत तो पुन: हिंदुस्थानात होता. लिपीचा विषय तो विसरला नव्हता. इंग्लंड सोडण्यापूर्वी ह्या विषयाचा तेथे पाठपुरावा करण्याचे काम त्याने मोनियर विल्यम्सकडे सोपवले होते. १८३४मध्ये झालेला वाद आणि नंतर इंग्लंडातील वृत्तपत्रात छापलेले लिखाण एकत्रित करून मोनियर विल्यम्सने जे पुस्तक प्रसिद्ध केले ते क्र०२ येथे उपलब्ध आहे. ह्याही प्रयत्नातून काही निष्पन्न झाल्याचे दिसत नाही.

मिशनरी लोकांनाही ह्या लिपीच्या प्रकरणात रस होता असे वर म्हटलेले आहेच. आपल्यापरीने धर्मप्रचाराची भाषान्तरित पुस्तके रोमन लिपीत छापून प्रसिद्ध करण्याचे त्यांचे कार्य चालूच होते. ह्या विषयाला खास वाहिलेले एक मासिक लाहोरमध्ये चार-पाच वर्षे तरी प्रकाशित होत होते. ह्या मासिकाच्या पहिल्या आणि पाचव्या वर्षांचे अंक क्र०४ येथे उपलब्ध आहेत. मासिकाच्या पृष्ठभागावरच त्याचा हेतू रोमन-उर्दू जर्नल - पौर्वात्य भाषांसाठी रोमन लिपीच्या पुरस्कारार्थ (Roman-Urdu Journal. To advocate the use of Roman Alphabet in Oriental Languages) असा नोंदवलेला आहे. हे अंक चाळले तर रोमन लिपीच्या चळवळीतली हवा निघून जायला लागल्याचे लक्षात येते. पंजाब विद्यापीठाशी संबंधित असलेल्या आणि अन्यही बर्‍याच प्रतिष्ठित हिंदू आणि मुस्लिम व्यक्तींची मते अंकात वेळोवेळी छापलेली आहेत आणि त्या सर्वांनी रोमन लिपीला विरोध केल्याचे दिसते. खुद्द सरकारलाही ह्या विषयात काहीच रस नसल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ खंड ५, अंक ४६, पृष्ठ २५ पाहा. डॉ० डब्ल्यू० सेंटर नावाच्या लेखकाने सरकारी पातळीवर हा प्रस्ताव उचलून धरायला विरोध केला आहे. लोकांना हा प्रस्ताव मान्य आहे का नाही ह्या चाचणीवरच त्याचे यशापयश ठरविले पाहिजे, सरकारी हस्तक्षेपाची आवश्यकता नाही असे त्याने नमूद केले आहे. पंडिता रमाबाई ह्यांचेही नाव विरोधक म्हणून एका ठिकाणी आलेले आढळते. खंड ५, अंक ५० पृष्ठ १७ येथे Lady-Pandit “Ramabai” and Roman character असा एक लेख आहे. त्यावरून कळते की रमाबाईंनी जणू संस्कृत भाषाच विलाप करत आहे अशी कल्पना करून एक काव्य करून ते काव्य पूर्वीच्या वर्षी म्हणजे १८८१ साली बर्लिनमधल्या प्राच्यविद्या तज्ज्ञांच्या काँग्रेसकडे पाठवले होते आणि मोनियर विल्यम्स ह्यांनी त्या काव्याचे भाषान्तर करून दिले होते. प्रस्तुत काव्यातील दोन भाग येथे वाचावयास मिळतात. एव्हांना देशी भाषांमध्ये त्या त्या लिपी वापरून बरीच ग्रंथनिर्मिती झालेली असल्याने आणि १८५७च्या घटनांच्या नंतर ही खाजवून खरूज काढण्यात सरकारला काही स्वारस्य वाटत नसावे.

१८३४ साली लिपीबदलाला सर्वांत अधिक अनुकूल वातावरण होते तरीही तो बदल होऊ शकला नाही. ह्यामुळे हिंदुस्थान आणि नंतरचा भारत देश मोठयाच आपत्तीतून वाचला असे पूर्वी म्हटले आहे ते का ह्यावर दोन शब्द लिहितो.

राजकीय पातळीवर सत्ता केंद्रित असलेला एकसंध देश इंग्रजांनी निर्माण केला. तरीही तत्पूर्वी दोन-अडीच हजार वर्षे हा देश सांस्कृतिक पातळीवर एकत्रच होता. मुस्लिम, शीख, पारसी, ज्यू असे अन्य प्रवाह आले तरी तेही ह्या सांस्कृतिक एकसंधतेचा भाग होऊन गेले. संस्कृत भाषा, त्यात निर्माण झालेले तत्त्वज्ञान आणि विचार, त्यातील वाङ्मय आणि त्याच गोष्टींचा पुढे देशी भाषांमध्ये झालेला विकास हे ह्या एकसंधतेला प्रामुख्याने पायाभूत आहेत असे मला वाटते. केरळमधल्या भारतीयाला बंगालमधला किंवा पंजाबमधला भारतीय फार दूरचा वाटत नाही ह्यामागे हे समान धागे आहेत. ह्याउलट १८३४मधला हिंदुस्थान अगदीच स्वत्व गमावलेला आणि पराभूत अवस्थेतला समाज होता. इंग्रज जे म्हणतील ते करायला तो तयार होता. इंग्रजांनी तेव्हा इथल्या लिपींना राजाश्रय काढून घेतला असता आणि रोमन लिपी राजकीय पातळीवरून प्रसारित केली असती तर केवळ रोमन लिपी शिकलेली हिंदी प्रजा दहा-पंधरा वर्षांतच इथल्या लिप्या विसरायला लागली असती. वापर नसला तर एखादी लिपी संपूर्ण विस्मरणात जायला फार वेळ लागत नाही. ब्राह्मी आणि खरोष्ठी ह्या प्राचीन लिप्यांचे हेच झाले. अगदी अलीकडचे आपल्या मोडीचेच उदाहरण घ्या. १९४०-५० पर्यंत बर्‍याच जणांना जुजबी का होईना, मोडी वाचता येत असे. शाळांमधून मोडी बंद झाल्यावर ३०-४० वर्षांतच अशी स्थिती निर्माण झाली की आत्मविश्वासपूर्वक मोडी वाचणार्‍यांची संख्या वीसपंचविसावर येऊन पोहोचली. महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करू इच्छिणारे काहीजण प्रयत्नपूर्वक मोडी वाचायला शिकतात कारण आजच्या काळात हेही कोणीतरी केले पाहिजे ही जाणीव आपल्यामध्ये आहे. १८३४ साली कोणीही असा प्रगल्भ विचार केला असता असे वाटत नाही. लवकरच सर्व भारतीय लिप्या पूर्ण विस्मरणात गेल्या असत्या आणि त्या त्या लिप्यांमध्ये लिहिलेली असंख्य पुस्तके आणि कागदपत्रे दुर्लक्षित अवस्थेत कोणाकोणाच्या माळ्यावर पडून राहिली असती. नशिबाने एखाददुसरे पुस्तक रोमन लिपीतून छापले गेलेही असते, पण बहुतेकांची वाटचाल वाळवी, ओलावा, धूळ ह्या परिचित मार्गाने होऊन ती नष्ट तरी झाली असती किंवा पूर्ण विस्मरणात गेली असती. आपल्या भूतकाळाचे ज्ञान आणि त्याच्या अस्तित्वाची जाण ह्या अनमोल ठेव्याला आपण पूर्णपणे मुकलो असतो. उरले असते ते केवळ जातीजमातीतील, भाषांभाषांतील आणि अन्य अनेक प्रकारचे भेद. त्यांची आपल्याकडे मुळीच टंचाई नाही. भूतकाळ विसरलेल्या समाजांचे भविष्य कसे असते हे आपण आफ्रिका किंवा दक्षिण अमेरिकेच्या उदाहरणांवरून पाहू शकतो. भारतीय समाजाला एकत्र बांधून ठेवणारे घट्ट सिमेंट नाहीसे झाल्यावर इथे पुढेमागे कायमचे अराजक माजले असते आणि आजचा सामर्थ्यवान भारत कदाचित निर्माणच झाला नसता. १८३४च्या काळातला दीनदलित हिंदुस्थान कदाचित पुन्हा डोके वर काढूच शकला नसता असे मला वाटते.

सर्व भारतीय भाषा रोमन लिपीमध्ये लिहिल्या जाव्यात अशी मागणी करणारे काही गट आजही आसपास आहेत. ह्या आजच्या चळवळींचे मूलस्रोत अगदी वेगळे आहेत आणि १८३४च्या मागणीशी त्यांचे काहीच साधर्म्य नाही. ते केवळ नावापुरतेच एकासारखे एक दिसतात. प्रस्तुत लेखनात ह्या आजच्या मागणीबद्दल काहीही मतप्रदर्शन केलेले नाही असे मुद्दाम नमूद करावेसे वाटते.

संदर्भ
१) The application of the roman alphabet to all the Oriental Languages ... सेरामपूर प्रेस. १८३४. http://tinyurl.com/yyt2x4q
२) Original papers illustrating the history of the application of the Roman Alphabet to the Languages of India. संपादक मोनियर विल्यम्स. १८५९. http://tinyurl.com/y2s5a6b
३) The Life and Letters of Lord Macaulay. Vol. १ जॉर्ज ओटो ट्रेवेल्यन १८८० http://tinyurl.com/y2zbqbq
४) Roman-Urdu Journal Vol. 1, Civil and Military Gazette Press लाहोर १८७८
http://tinyurl.com/2852g8n Roman-Urdu Journal Vol. 5, Civil and Military Gazette Press. लाहोर. १८८४.
http://tinyurl.com/y6cz3ov
५) http://www.languageinindia.com/april2003/macaulay.html
६) '... the opinion of some of the gentlemen who compose the Committee of Public Instruction, that the course which they have hitherto pursued was strictly prescribed by British Parliament in 1813,...
It does not appear to me that the Act of Parliament can, by any art of construction, be made to bear the meaning which has been assigned to it. It contains nothing about the particular languages or sciences which are to be studied. A sum is set apart 'for the revival and promotion of literature and the encouragement of the learned natives of India, and for the introduction and promotion of a knowledge of the sciences among the inhabitants of the British territories.' It is argued, or rather taken for granted, that by literature, the Parliament can have meant only Arabic and Sanscrit literature, that they never would have given the honorable appellation of 'a learned native' to a native who was familiar with the poetry of Milton, the Metaphysics of Locke, and the Physics of Newton; but that they meant to designate by that name only such persons as might have studied in the sacred books of the Hindoos all the uses of cusa-grass, and all the mysteries of absorption into the Deity. This does not appear to be a very satisfactory interpretation.'
७) http://www.shikshapatri.org.uk/~imagedb/content.php/monier
संदर्भ बघण्यासाठी tinyurl.com ने काम न केल्यास books.google.com येथील शोधपेटी (search-box) मध्ये पुस्तकाचे नाव घालूनही पुस्तक सापडेल.

313-38 एल्म स्ट्रीट
टोरांटो, ओन्टारिओ M5G 2K5, कॅनडा
दूरभाष : (+1) (416) 340 0881
ई-पत्ता : kolhatkar@hotmail.com