मराठी कवितेची बदलती भाषा: नीलिमा गुंडी

नीलिमा गुंडी

भाषा हा घटक एकीकडे सांस्कृतिक पर्यावरणाचा भाग आहे आणि त्याच वेळी सांस्कृतिक पर्यावरणाविषयीची प्रतिक्रिया देण्याचा मार्गही आहे. व्यक्तीच्या आत आणि बाहेर भाषा असते. आतली भाषा आणि बाहेरची भाषा यांच्यात होणारा संघर्ष, हे आजच्या कवितेच्या अनुभवाचे एक केंद्र आहे. त्यामुळे आज कवितेची भाषा बदलणे अपरिहार्य होत असावे. आज पाश्चात्त्य आणि पौर्वात्य मूल्यांचा संकर आपल्या जीवनशैलीत समाविष्ट आहे. आज आपली भाषाही संकरित ('हिम्राठी', 'मिंग्लिश' इ०) आहे. प्रसारमाध्यमे व बाजारपेठीय आक्रमणामुळे शब्द ही बाब फारच स्वस्त पद्धतीने विक्रेय गोष्ट बनत आहे. विविध वाहिन्यांवरील सांस्कृतिक कार्यक्रमांच्या पाठीशी असणार्‍या जाहिराती आता कार्यक्रमांच्या डोक्यावरच बसल्या आहेत! सांस्कृतिक कार्यक्रमांमधील जाहिरातींचा मारा भारतीय काव्यशास्त्रातील कलाकृतीशी तादात्म्य, 'आस्वादव्यापार' या संकल्पना मोडीत काढत आहे. रसिक मनाची ही शतखंडित अवस्था संवेदनशील कलावंताला अस्वस्थ करणे स्वाभाविक ठरते. संवेदनशीलता बधिर करणारी, विचारांना उसंत न देणारी, व्यक्तीच्या आंतरिक विश्वावर व खासगीपणावर आक्रमण करणारी ही तंत्रज्ञानप्रणित संस्कृती अनेक गंभीर प्रश्न निर्माण करीत आहे. तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या 'मोबाईल', 'इंटरनेट' आदी संपर्क-माध्यमांमुळे बाह्यविश्वाचा पसारा एकीकडे वाढत आहे; मात्र दुसरीकडे व्यक्ती अधिकाधिक नगण्य बनत आहे. हे सारे सांस्कृतिक पर्यावरण कवितेबाबत - जिच्यात 'भाषेच्या पोटातील भाषा' कार्यरत असते - अधिकच गंभीर ठरते. त्यामुळे या वास्तवाविषयीची व्याकुळता व उपरोध व्यक्त करणारी भाषा गेल्या दहा वर्षांतील काही कवींनी योजलेली दिसते. भुजंग मेश्राम, अरुण काळे, सलील वाघ, मंगेश नारायण काळे, हेमंत दिवटे, संजीव खांडेकर, वर्जेश सोलंकी, श्रीधर तिळवे, वीरधवल परब, गणेश विसपुते, प्रफुल्ल शिलेदार, बालम केतकर आदींच्या कवितेची भाषा या संदर्भात विचारात घेण्याजोगी आहे.

काव्यभाषेतील बदल

इंग्रजी शब्द, तसेच मोबाईल व संगणक यांच्याशी निगडित परिभाषा यांचा अतिवापर हे अलीकडच्या कवितेच्या भाषेचे एक वैशिष्ट्य आहे. काही कवींनी हे वैशिष्ट्य हेतूपूर्वक अंगीकारले आहे. खासगीकरण-उदारीकरण यांतून बोकाळलेला चंगळवाद, तसेच सेझ आदी बाबींविषयीचा उपहास व्यक्त करण्यासाठी अशी भाषा जणू प्रभावी शस्त्र ठरत आहे. उदाहरणार्थ, सलील वाघ लिहितात – 'मी तुझ्या नावाने एकशे एक एसेमेस करीन' ('प्रार्थनेच्या कविता'). येथे ईश्वराला दिलेला हा शब्द अध्यात्मक्षेत्रातील बाजारू वृत्तीला उघडे पाडण्याचे काम करतो. सलील वाघ यांचीच दुसरी एक कविता बालकवींच्या कवितेतील श्रुतयोजनाच्या माध्यमातून उपरोध कसा प्रभावीपणे व्यक्त करते ते पाहण्याजोगे आहे :
'आनंदी आनंद गडे, बिर्याणी खाऊ खमंग' ('सध्याच्या कविता').

संगणकीय परिभाषेचा प्रतिमा या स्वरूपात उपयोग करून स्त्रीविषयी लिहिलेली नीरजा यांची कविता पाहा:

'झूमकडे सरकणारं मन
शर्थीनं मिनिमाईझवर आणते ती
....................
स्वत:च्या नावाची फाईल
उघडत नाही चुकूनही' ('स्त्रीगणेशा').
अरुण काळे यांच्या एका कवितेचे शीर्षकच आहे :
www.हे विश्वचि माझा कटोरा.कॉम' ('ग्लोबलचे गावकूस').
वसंत आबाजी डहाके यांनी आपल्या 'शुभवर्तमान' या कवितासंग्रहात नाटकातील स्वगते, संवाद, वर्तमानपत्रातील वाचकांचा पत्रव्यवहार, दूरदर्शनवरील बातम्यांचे निवेदन, व्यासपीठीय घोषणाबाजी, जाहिरातशैली अशा संज्ञापन व्यवहारातील नव्या प्रस्थापित शैलींचा मार्मिकपणे वापर केला आहे. त्यांनी एका मुलाखतीत ('खेळ', जानेवारी २००८) केलेले एक विधान मला महत्त्वाचे वाटते. ते म्हणतात, “मी पोएटिकनेस घालवीत नाही. लिरिकॅलिटी घालवतो.” मला वाटते, आजच्या अनेक कवींपुढे भाषा योजताना हाच पर्याय उपलब्ध आहे.

भाषेविषयीची नवी संवेदनशीलता मंगेश नारायण काळे यांच्या कवितांमधूनही व्यक्त होते. त्यांनी 'आत्महत्या' या कवितेत लिहिले आहे :

'आत्महत्या हा शब्द कुणीही लिहू शकतो.
म्हणजे ज्याला गिरवता येते पहिले अक्षर
किंवा निरक्षर साक्षात ठसा अंगठ्याचा
आत्महत्या हा शब्द'
आता शेतकरी असाही लिहिता येतो. ('नाळ तुटल्या प्रथमपुरुषाचे दृष्टान्त').

हे वाचताना लक्षात येते की कवीच्या लेखी भाषा ही जगण्याचे वर्णन करणारी गोष्ट नाही, तर जगण्याची साक्षात प्रतिमाच आहे. याच वृत्ति-गांभीर्याने लिहिलेल्या त्यांच्या दीर्घकविताही वेगळ्या ठरतात. गद्यासारख्या धाटणीने लिहिलेली, विरामचिन्हविरहित अशी त्यांची 'तालीमखाना' ही दीर्घकविता वाचताना हे जाणवते. एकेकाळी खंडकाव्य, कथाकाव्य या प्रकारात 'पद्य'रचना करुन दीर्घकाव्य आकाराला येत असे. तशी तडजोड यात करावी लागत नाही.

हाच अनुभव वर्जेश सोलंकी यांच्या 'ततपप' हा दीर्घकवितेबाबत येतो. येथेही कवितेचे शीर्षकच भाषिक कोंडीचा अनुभव देते आणि सामाजिक व्यवस्थेत 'मूकनायक' राहिलेल्या अनेकांची व्यथा प्रातिनिधिक रूपात व्यक्त करते. या कवितेत अनेक ओळींमध्ये शब्द न तोडता लिहिण्याची लकब अभिव्यक्तीतील आवेगपूर्णता वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरते. उदा०

'आता हळूहळू नकळत आपल्याला
एक रिंगण घातलं जातंय आपल्याभवताली
आंधळावकीलटंकलिपिकसाक्षीदारन्यायाधीश
कुणीही यावं टपली मारून जावंचा
सुरूए एक अव्याहत खेळ' ('ततपप').
भाषेच्या उपयोजनात नवप्रतीकनिर्मितीही महत्त्वाची ठरते. सचिन केतकर आपल्या 'दहा दिशा, दहा दशा' या दीर्घकवितेत लिहितात,
'मी पाहू शकतो एका डोळ्याने
किमान दहा चॅनेल्स एका वेळेस
...........
एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल
की ही आजची झगमगीत सुवर्णनगरी
म्हणजे माझं साम्राज्य' ('खेळ', जाफेमा २००९).

येथे 'रावण' ही पौराणिक व्यक्तिरेखा आजच्या चंगळवादी युगाचे प्रभावी प्रतीक बनते.
शहरी, महानगरी वास्तवाप्रमाणेच ग्रामीण वास्तवाचे चित्रण करणारे काही कवीही आपली काव्यभाषा जाणीवपूर्वक बदलत आहेत. संतोष पद्माकर पवार यांचा 'पिढीपेस्तर प्यादेमात' हा कवितासंग्रह हे त्याचे उदाहरण आहे. मुळात संग्रहाच्या शीर्षकस्थानी बखरीतील शब्दयोजना वापरून (जिचा अर्थ आहे – 'वंशपरंपरागत चालत आलेला भोगवटा') कवीने समग्र भाषिक व सांस्कृतिक परंपरेशी असलेला आपला अनुबंध दृढ केला आहे. ग्रामीण वास्तवातील अनेक-पदरी शोषणाचा अनुभव सांगताना कवीने झडती घेणार्‍या लोकगीत गायकाची भूमिका घेतली आहे. ही भाषिक प्रयोगशीलता लक्षणीय आहे.

स्त्रियांच्या काव्यभाषेतील बदल

अलीकडे स्त्रियांच्या कविता वाचतानाही त्यांतील भाषिक वेगळेपण वाचकाच्या मनावर ठसते. १९८०नंतर स्त्रीवादी विचाराचा रेटा जसजसा वाढत गेला, तसतशी स्त्रियांची कविता पारंपरिक भावुक – 'रोमँटिक' - शैलीच्या पकडीतून मुक्त होऊ लागली. इतकी की स्त्रीवादी वैचारिक धारणा नसलेल्या कवयित्रींची भाषाशैली व प्रतिमासृष्टीही बदलताना दिसू लागली. उदाहरणादाखल अरुणा ढेरे यांच्या 'नामानिराळा'या कवितेतील ही प्रतिमा पाहा :
'बलात्काराला सज्ज झालेल्या पुरुषासारखा
शब्द उभा तिच्यासमोर एकएकट्या संध्याकाळी अचानक' ('मंत्राक्षर').
अलीकडच्या काळात स्त्रीच्या जगण्याची परिभाषा जशी बदलत गेली, तसतशी पारंपरिक भाषेला आणि धार्मिक-सांस्कृतिक परंपरेला आव्हान देण्याची धीट वृत्ती तिच्या कवितांमध्ये दिसू लागली. मलिका अमर शेख, रजनी परुळेकर, अश्विनी धोंगडे, प्रज्ञा पवार, नीरजा आदि कवयित्रींच्या कविता वाचताना हे लक्षात येते. या कवितांमधून भाषेतील उपरोध आणि युक्तिवाद कौशल्य जणू पणाला लागत आहे. मलिका अमरशेख एका कवितेत लिहितात :

'रोदानने बाईला विचारात
पडलेली दाखवली नाही कधी
न् व्हॅन गॉगनं तिला
गुडघ्यात मान टेकवून मरणासन्न बसलेली पाह्यली' ('महानगर').

कविता महाजन यांची 'तात्पुरते' ही कविता प्रस्थापित अभिरुचीला धक्का देणार्‍या एका प्रतिमेमुळे काही प्रकाशक प्रकाशित करायला तयार नव्हते. शेवटी त्यांनी ती आपल्या 'ग्राफिटी वॉल' या 'लोकप्रभा' साप्ताहिकातील सदरामध्ये एका लेखात प्रकाशित केली. (सदर लेखन आता 'ग्राफिटी वॉल' या पुस्तकात समाविष्ट आहे.)

कविता महाजन यांनी दुसर्‍या एका कवितेत म्हटले आहे,

'आणि माझे मौन हीच किंकाळी
तीक्ष्ण तरबेज शब्दांविरुद्ध' ('तत्पुरुष').

स्त्रीवर शतकानुशतके लादलेल्या मौनाकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोनच बदलून टाकणारा हा पवित्रा नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण आहे.

काव्यांतर्गत भाषिक प्रदेशाचा विस्तार

आजच्या काव्यविश्वात विविध बोलींमधून लिहिलेल्या कविता समोर येतात. भुजंग मेश्राम यांनी गोंडी, बंजारी, परधानी, गोरमाटी, वर्‍हाडी, वारली इत्यादी बोलींमधून काव्यलेखन केले आहे. विविध बोलींमधून लिहिलेल्या काही कवितासंग्रहांचा उल्लेख करावयास पाहिजे. उदा० १. महेश केळुसकर – 'मोर' (मालवणी), २. ना०जो० थुटे – 'सपनधून' (झाडी). ३. सुधीर देवरे – 'आदिम तालनं संगीत' (अहिराणी) विविध बोलींचा काव्यभाषा म्हणून स्वीकार होऊ लागल्यामुळे काव्यांतर्गत भाषिक प्रदेश विस्तारताना दिसत आहे. उषाकिरण आत्राम व कुसुम अलाम या आदिवासी कवयित्रींनी त्यांच्या सांस्कृतिक संदर्भातून नवी प्रतिमासृष्टी कवितेत आणली आहे. उषाकिरण आत्राम लिहितात:

'गोंदून निळी, होवू नगं काळी
रानफुलासारखी डवर
हो। सूर्यसळी
हो। नागकमळी' ('म्होरकी').

हे सर्वच चित्र मोठे आश्वासक आहे.

एकंदरीत आजच्या काही कवींचे भाषाविषयक संवेदन सूक्ष्म व तल्लख आहे, हे आवर्जून
लक्षात घ्यायला हवे.

3, अन्नपूर्णा, 1259, शुक्रवार पेठ, पुणे 411 002
भ्रमणभाष : 098810 91935