मराठी कवितेची बदलती भाषा : उपबोधाख्यान

सलील वाघ

व्यासपीठावरचे माननीय, समोरचे माननीय आणि मित्रमैत्रिणींनो, कवितेची बदललेली भाषा असा जरी विषय आजच्या संयोजकांनी दिला असला तरी मी काही त्या विषयावरचा अधिकारी पुरुष नाही; त्यामुळे मी माझ्या सोयीप्रमाणे तो आल्टर करून घालणार आहे. त्यात तुमची थोडी गैरसोय झाली तर अगोदरच सॉरी.

तुमच्या सुदैवाने मी भाषाशास्त्रज्ञ नाही. तुमच्या आणि माझ्याही सुदैवाने मी प्राध्यापक नाही. मात्र सगळयांच्याच सुदैवाने मी एक कवी नक्की आहे! अर्थातच त्यामुळे कोणतेही विद्वत्तापूर्ण विवेचन करणे, मुद्देसूद बोलणे, मला बंधनकारक नाही. मला ते जमणारही नाही. त्यामुळे कवितेविषयीच्या काही उत्कट, स्वैर बडबडीला (आता चान्स मिळालाय तर) मोकळी वाट करून देणे इतकाच माफक उद्देश ठेऊन तुमच्यापुढे गप्पा मारायला म्हणून मी उभा आहे.

कवीने कवितेबद्दल बोलावं का नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो. कवीने कवितेच्याच रूपाने बोलावं. कवितेबाहेर बोलू नये, असा एक मतप्रवाह असतो. शमशेरजींची एक ओळ आहे 'बात बोलेगी - हम नहीं'. ते मत प्रमाण मानलं तर मी काहीच बोलायला नको. कारण एकोणीसशे चौऱ्यांशी-पंच्याऐंशी ते दोन हजार नऊ, या पंचवीसेक वर्षांच्या काळात लिहिलेल्या कवितांच्या चार संग्रहांच्या रूपाने मी ते बोलून बसलेलो आहे. ज्यांना समकालीन कवितेची बदललेली भाषा पाहायची आणि अभ्यासायची असेल त्यांनी या चार पुस्तकांपलीकडे जायचीही फारशी गरज नाही. तेवढी चार पुस्तकं जरी वाचलीत तरी आजच्या घडीला पुरेय.

तरीसुद्धा बोलण्यासारखं खूप उरतं. सांगण्यासारखं खूप उरतं. ऐकवण्यासारखं खूप उरतं. सगळं कवितेत मावतं. पण मावतसुद्धा नाही. कविता हा आशयप्रकार असतो. काही कादंबऱ्यांत काव्य असतं. काही कथा, नाटक, सिनेमे, प्रसंग जिथे जिथे संज्ञापन असतं, कम्युनिकेशन असतं, तिथल्या कोणत्याही ठिकाणी काव्य दडलेलं असतं. ते विषाणूसारखं असतं. म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. म्हटलं तर सजीव म्हटलं, तर निर्जीव. कधी पोषक वातावरण मिळून अॅक्टिव्हेट होईल काही नेम नाही. काव्य ही माणसाची मूलभूत प्रेरणा (इन्स्टिंक्ट्) असते. कवितेशिवाय माणूस असूच शकत नाही... हा मुद्दा आता इथेच सोडू... विषयांतरातला आनंद घेऊ...
स्वातंत्र्योत्तर काळात मर्ढेकर-रेगेंच्या कवितांनी कवितेची भाषा बदलली, त्यानंतर थोडासा प्रयत्न वसंत गुर्जर, मनोहर ओक, ढसाळांच्या पिढीने केला, पण कवितेची खरी भाषा बदलली ती माझ्या (म्हणजे नव्वदनंतर प्रकाशित झालेल्या, शीतयुद्धोत्तर) पिढीने. इंदिरा गांधींची हत्या हा भारताच्या राजकारणातलाच नव्हे तर भारतीय मानवसमूहाच्या मानवसंकल्पनेतलाच (महत्त्वाचा) टर्निंग पॉईंट होता. आमच्या पिढीतला प्रत्येक जण आदर, फॅसिनेशन, द्वेष, तिरस्कार यांपैकी कोणत्या ना कोणत्या भावनेने इंदिराजींशी जोडलेला होता. त्यानंतर ग्लासनोस्त-पेरस्त्रोयका आले आणि रशियाचे देशपणच उधळले गेले. शीतयुद्धही संपले. भारतीय मानसाच्या 'वसुंधरेच्या अर्ध्या अंगा तडा भयंकर' गेल्याची परिस्थिती निर्माण झाली. आमच्या पिढीचं सामाजिक मनोबल खच्ची व्हायला हा घटनाक्रम पुरेसा होता. त्याच काळात अनिर्बंध कल्पनास्वातंत्र्य आणि कमालीची प्रेक्षकसापेक्षता ही दोन तत्त्वे घेऊन माणसाचे जगणे पोखरून काढायला मीडिया पुढे सरसावत होता. त्या सगळ्या सामाजिक इतिहासात जायची गरज नाही; कारण आपल्या सगळयांनाच तो माहिती आहे. थोडक्यात, मूल्यांच्या आणि भावनांच्याही उपबोधाचं धरण फुटलं ते इंदिराजींच्या हत्येच्या घटनेपासून! हे जे बोलतोय हे कदाचित आत्मनिवेदनात्मक किंवा आत्मचरित्रात्मकही होत असेल पण खरं आहे.

आजची भाषा ही उपबोधनिर्देशित (सबकॉन्शस-ड्रिव्हन?) भाषा आहे. जी कविता लिहिली जातेय ती उपबोधनिर्देशित भाषेत लिहिली जाते आहे. माणसाच्या बोधविश्वात सोसाट्याने घुसलेल्या या उपबोधाचं पोझिशनिंग कसं आणि कुठे करायचं? याचा प्रश्न भाषेला पडला आहे. अंगावर कोसळणार्याउ मीडियाच्या धबधब्यातून हे उपबोध आपल्या नाकातोंडात गेलेलं आहे. भाषा जवळपास वाहून गेलेली आहे. भाषेचे फ्रॅगमेंट्स तरंगतायत, पण त्या काड्यांचा ना बुडत्याला आधार ना वाचणार्यावला. तुम्ही कुठेही जा. जिथं जाल तिथं भाषा ओसंडून टाकणारा उपबोध आहे. तुम्ही खरेदीला जा, तिथं तुमच्या अनेक सुप्त एषणांना चाळवत कुरवाळत उपबोध हजर आहे. तुम्ही खेड्यात जा तिथं रटरटता उपबोध आहे (तो शहराभिमुख आहे.) उपबोधाधिष्ठित चवचालपणाची लसलस शहरांपेक्षा तालुकाप्लेसला आणि अजून आतल्या खेड्यांतून जास्त आहे. तुम्ही मोबाईल ऑन करा तिथं उपबोध आहे. उपबोधाने प्रमाणव्यवस्थेवर मात कशी केलीय याचं अगदी सोप्पं उदाहरण जर पाह्यचं असेल तर ते मिस-कॉलच्या रूपात बघता येईल. कॉल हा बोध आहे. मिसकॉल हा उपबोध आहे. संज्ञापनासाठी कोणतेही टेक्स्ट न वापरता हा मिस-कॉलचा फंडा मानवी उपबोधातून आलेला आहे. (तो प्रॅग्मॅटिक्स-संदर्भक्षेत्रीय आहे.) मिसकॉल हा कोणत्याही भाषेतून कोणत्याही भाषेला देता येतो. इतकी मेटॅलँग्वेजीयता गाठण्यापर्यंत या उपबोधाची मजल गेलेली आहे. उपबोधाच्या घटोत्कचाखाली आपण चेंगरत चाललेलो आहोत.

अनेक अनाठायी, अवांच्छित भाषारूपांना, व्यक्तींना, विषयांना आपण नुसते सामोरेच जात नाही तर त्यात भाजले जातो आहोत. आपण सकाळी उठतो तेव्हा सानिया मिर्झा आपल्या आयुष्यात येते, तिचं टेन्शन येतं. मग दूध आणायला गेलो की जातो तिथं चितळे, फडके, खांडेकर, अमूल असे लोक त्यांच्यात्यांच्या ड्रेसकोडमध्ये त्यांचीत्यांची रंगसंगती, संस्कृती घेऊन मौजूद असतात, मग इस्त्रीवाल्याशी, कटिंगवाल्याशी आयपीलवर बोलावं लागतं, ऑफिसला निघालो की सुजलेल्या चेहेर्यांसचे मवाली फुटाफुटावरच्या फ्लेक्सवर दु:स्वप्नासारखे उभे असतात. हॉटेलं, दुकानं, एकावर एक फ्री बूट, डोसा, ब्रेसियर्स, लिपस्टिक, टायर, चहा, बासमती, बाईक, केरलाआयुर्वेद, मेन्युकार्ड, ड्रायव्हिंग लायसन, एटीएम कार्ड, चाटे क्लासेस अशा अनंत गोष्टी, अनंत माणसं, अनंत व्हॅल्यू सिस्टिम्स झेलत डोक्याचं पूर्ण भजं झाल्यावर आपण ऑफिसात पाय टाकतो. तिथे अनंत फोन, दुसर्यांअचं फोनवरचं संभाषण, मेल्स, एसेमेस, ब्राऊझिंग, सीडी, रिंगटोन्स अशा अनंत भाषारूपांनी पकून गेल्यावर आपण परत घरी येतो तेव्हा वेगळेच लोक घरात घुसलेले असतात, हे सिरियल-किलर्स-सेलेब्रिटी असतात, सारेगम केकाटणारे बालमजूर असतात, आणि त्या बालमजुरांचं रूपांतर बालगुन्हेगारीत करणारे उडाणटप्पू पालक-प्रेक्षक असतात, न्यूजवाले असतात, सरडे-पाली-डायनॉसॉरवाले असतात, असे अनंत अनैसर्गिक बलात्कार आपल्यावर अहोरात्र होत असतात.... सकाळपासून रात्रीपर्यंत आपण अशा अनेक अवांच्छित गोष्टींना उपबोधात अॅ बसॉर्ब करत राहतो आणि बोधात स्थान देत राहतो. ही अनाठायी अॅकक्सेसिबिलिटी, हा अवाच्छिंतांचा दिशाहीन मेळा आपली प्रायव्हसी उद्ध्वस्त करून टाकतो. ह्या अवांच्छित उकिरड्यावर आपण डुकरासारखे चरत राहतो. त्याच्याने भाषा बदलते.

उपबोधाच्या रेट्यामुळे शब्दांचं रिशफलिंग होतं. शब्दाचा वर्गसंकर होतो. एका वर्गात वापरले जाणारे शब्द दुसरा वर्ग सहजपणे स्वीकारतो. म्हणजे 'चढला, बूच बसलं, मारली गेली, च्यायला, फक् इट' वगैरे शब्द आता सभ्य लोकांमध्ये आत्मीयतेने, आदरपूर्वक वापरले जातात किंवा आमचा कुरिअरबॉय पटकन म्हणतो ''लै कन्व्हिनियंटेय''.. त्याला 'सोप्पे' हे सुलभ वाटत नाही, 'कन्व्हिनियंट' हे सुलभ वाटते... हे किंवा आमचा परदेशातला डायरेक्टर मला सांगतो ''.. इफ् इट्स ओके... इटस् ओक्के अदरवाईज, सलील, यू डू सम 'मांडोली' विथ दॅट क्लायंट...'' अशातून आपली भाषा उपबोधाधीन होते.

पूर्वी (शीतयुद्ध काळात) या उपबोधाचं दमन करण्याकडे कल होता, पण आता मार्केटिंग गुरूंपासून ते बापू, बुवा, अम्मांपर्यंत सगळयांनाच आपापली प्रॉडक्ट लाँच करायला उपबोधात्मक उन्मादाचा आधार घ्यावा लागतो.
आजच्या कोणत्याही बेबीप्रॉडक्टच्या जाहिरातीतली आई (म्हणजे ती मॉडेल) ही इरॉटिकच असावी लागते. ती चुकूनही ढिली पडून (म्हणजे वात्सल्ययुक्त असून) चालत नाही. किंवा फोनवरून बाळाशी बोलणारा कुठंतरी फॉरेनला तडमडलेला जावई किंवा मुलगा हा नेसेसरीली बर्म्युड्यातला संट्याच असावा लागतो. हा आचरटपणा जाहिरातमान्य, मीडियामान्य होतो, कारण तो आपल्या उपबोधात असतो आणि मीडियामान्यतेतून तो परत आपल्या उपबोधात विसावतो, फरमेंट झालेल्या, ओव्हरफ्लो झालेल्या उपबोधामुळे भाषेला फुटक्या ड्रेनेजचं स्वरूप येतं.

एखाद्या नाटकातलं किंवा सिनेमातलं पात्र प्रेक्षकात येऊन बसावं किंवा प्रेक्षकांनी उठून सिनेमात जावं तसा उपबोध आपल्या बोधविश्वावर स्वार झालेला आहे. तो भाषेच्या, विशेषत: कवितेच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेला आहे. आणि आता झक मारत आपल्याला तो नेईल तिथं, नेईल तसं जाणं भाग आहे.

हे चांगलं? का वाईट? हवंय? का नकोय? याची आत्ता इथे चर्चा करत नाही.
पण काही प्रश्न मला पडलेले आहेत त्यांची उत्तरं मला तुमच्याकडून हवीत. असं असतं जनरली की वक्त्याने बोलायचं, श्रोत्यांनी ऐकायचं आणि नंतर श्रोत्यांनी प्रश्न विचारायचे. तर आज आपण हे महाराष्ट्रदिनाच्या दिवशी थोडं बदलूयात. मी प्रश्न विचारीन, तुम्ही उत्तरं द्यायचीत. चार प्रश्न माझ्याकडे आहेत.

एक - या उपबोधनिर्देशित (सबकॉन्शन-ड्रिव्हन) भाषेने आपल्या मानवसंकल्पनेवर परिणाम केले आहेत का? (म्हणजे एकाच वेळी अनेक भूमिकांतून जगणार्या- आणि भूमिकाभ्रमाचे पेच झेलत वागणार्याक माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर ही उपबोधनिर्देशित भाषा काय परिणाम करते वगैरे... किंवा न-व्यक्तीची निर्मिती हेही उपबोधक्षेत्रीय भाषेचेच फलित आहे. न-व्यक्ती म्हणजे चॅटविंडो, ब्लॉग्स, पोर्टल्सवरच्या प्रोफाईल्स.. या, न-मानवी माणसांचा समाज, त्यात व्यक्तीचे होणारे न-व्यक्तीकरण हेही उपबोधीय भाषेचेच रूप आहे.) त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे?

दोन - या उपबोधाच्या प्रखर झोताने मूल्यसृष्टीवर काय परिणाम केले आहेत? (उदा० ज्या नवभांडवलशाही व्यवस्थेचं कॉस्टकटिंग, मॅनपॉवर रिडक्शन, एका माणसाकडून चार जणांनी कामं करून घेणं हे ध्येय असतं तिथं हरकामेपणाला आता ग्लोरिफाय करुन मल्टिफॅसेटिंग किंवा अष्टपैलूपणा असं म्हणलं जातं... असे अजून काय परिणाम आहेत?)

तीन - या उपबोधाधीन जीवनशैलीने आपल्या भाषासाधनेवर कोणते परिणाम केले आहेत? (भाषेची साधना करावी लागते, तिला व्यक्तिमत्त्व द्यावं लागतं, तिला अभ्यासावं लागतं, तिचे नखरे समजून घ्यावे लागतात. थोडक्यात भाषेशी प्रणय करण्याची कला सुसंस्कृत माणसाकडे असावी लागते... हे करण्याची उसंत आपल्यापासून कितपत हिरावली गेलेली आहे?)

चार - भाषातीत, भाषापूर्व आणि भाषावस्थीय आशयबोधांना उपबोधाच्या धरणफुटीमुळे आपण पारखे होत आहोत का? (कितीतरी अशा गोष्टी असतात की ज्या भाषेच्या आधी असतात, 'भाषेबगैर' कळतात. वारा सुटतो, फुलांचा, झाडांचा, आठवणींचा, मातीचा वास येतो - नंतर शब्द सुचतो, भाषा उमटते. किंवा शब्द सुचूनही नंतर जाणवणार्याभ गोष्टी उरतात, कथ्य उरतं... या गोष्टी भाषेत उमटोत न उमटोत पण भाषेमुळे या अमूर्त जाणिवांची स्थाननिश्चिती (पोझिशनिंग) होत जाते, त्या लोकेट होतात आणि आपल्या संचिताचा भाग बनतात... हे सगळे उपबोधाधिष्ठित भाषेने हरपेल का? असा प्रश्न आहे.)
या प्रश्नांची उत्तरे मला आज तुमच्याकडून हवीयेत. म्हंजे, मला पडलेले प्रश्न तरी कितपत व्हॅलिड आहेत? का आपला मी येड्यासारखा बोलतोय? हे तुमच्याकडून मला हवंय. माणसाला भाषेचा शोध लागला. त्याला काळाचा शोध लागला. त्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. पृथ्वी चौकोनी नसून गोल असल्याचा शोध लागला. मूर्खपणाचा आणि सद्गुणांचा शोध लागला, अणुशक्तीचा शोध लागला, वरकड मूल्याचा शोध लागला. अजून काय फुल्याफुल्याफुल्यांचा एक्सवायझेड शोध लागला... पण या सगळयांहून भारी, घेरी आणणारा शोध माणसाला लागलेला आहे तो म्हणजे जिज्ञासेचा. माणसाला लागलेल्या सगळ्या शोधांत श्रेष्ठ शोध कोणता लागला असेल तर तो जिज्ञासेचा.

मी जिज्ञासू आहे म्हणून मला हे प्रश्न पडलेत. तुम्ही जिज्ञासू आहात म्हणून तुम्ही याची उत्तरे शोधायची आणि द्यायची आहेत.

प्रश्नाचा शोध लागणे म्हणजेच जिज्ञासेचा शोध लागणे. तो मला लागला. तुमच्यासमोर मांडला. आता पुढचं तुमच्यावर...

ई-पत्ता : saleelwagh@gmail.com