भाषेची मुळं लोकजीवनात!

विजया देव

आपली भाषा ही काही आपल्यापेक्षा कुणी वेगळी वस्तू नसते किंवा ती व्यवहाराचं निर्जीव साधन नसते. आपणच आपल्या जीवनातून तिला घडवत असतो. अनुभवाच्या बारीकसारीक अर्थछटा सुचवायला आपल्याला वेगवेगळे शब्द लागतात, आपल्या भोवतालची सर्व वस्तुजात त्यातल्या बारकाव्यांनिशी टिपण्यासाठी आपण नेमके शब्द शोधत असतो. उदाहरणार्थ, 'रवाळ', 'कणीदार', 'भरड', 'जाडसर' असे शब्द काही नुसत्या शब्द घडवणार्‍या सोसातून निर्माण झालेले नसतात. त्या पदार्थांचा नेमका गुणधर्म, पोत, स्पर्श, दृश्यरूप असं सगळं विचारात घेऊन ते भाषेत येतात आणि तो अर्थ समजून ते वापरले तर कृतीचं सार्थक होतं. नाहीतर 'आणि अमुक मिक्सीवर बारीक करून घ्यावं.' या सूचनेतून काय बोध होणार?

पण काळाच्या रेट्याची आणि माहितीप्रपाताची सबब सांगून आपणच नेमकेपणाला, योग्य पर्याय शोधण्याला तिलांजली देऊन काम भागवत असतो. मग सुरू होतं भाषेचं सपाटीकरण. प्रसारमाध्यमांच्या भाषेत, वृत्तपत्रीय लेखनात तर असे सरधोपट, मोघमपणाने वापरलेले शब्द जागोजाग भेटत राहतात. शब्दांचा असा अनादर करणारा ढिसाळ वापर वाचकांच्या लक्षात येत नाही असं नाही, पण वाचकच समजूतदारपणाने 'म्हणजे लेखकाला असं म्हणायचं असावं' अशी सूट देऊन टाकतो. कारण वाचकालाही बरंच काही वाचायचा रेटा असतोच.

अलीकडेच एका वृत्तपत्रीय पुरवणीत असाच एक शब्द निरागसपणे चुकीच्या अर्थाने वापरलेला आढळला आणि भाषाअभ्यासक म्हणून या निमित्ताने मी लिहिती झाले.
लेख आहे पिस्त्यांची शिफारस करणारा (सेहत के वास्ते, खाओ पिस्ते, शुभदा रानडे, लोकसत्ता पुरवणी, गुरुवार १९ नोव्हेंबर २००९). लेख मराठीतला, त्याविषयीची माहिती इंग्रजीतून घेतलेली असावी आणि शीर्षक हिंदी! पण ते असो!

वजन घटवण्यासाठी आणि पोषक आहारमूल्यं मिळवण्यासाठी पिस्त्यांची बरीच शिफारस या लेखात केलेली आहे. त्यात पिस्त्यांची वर्गवारी 'सालं काढलेले' आणि 'सालीसकट' अशी केलेली आहे. डॉ० पेंटर यांनी सालं काढलेल्या आणि सालींसकट अशा दोन्ही प्रकारच्या पिस्त्यांचा अभ्यास केला. 'सालींसकट पिस्ते खायला दिले की पिस्ते ४५% कमी खाल्ले जातात कारण सालं काढण्यात वेळ जातो. तेच सालांशिवाय पिस्ते दिले तर जास्त प्रमाणात पिस्ते खाल्ले जातात.' वगैरे वगैरे.

हे वाचून लक्षात आलं की लेखिकेला इथे 'साल' नसून 'टरफल' अभिप्रेत आहे. साल आणि टरफल ही दोन्ही आवरणं असली तरी त्या दोन्हींमध्ये खूप फरक आहे. हा फरक समजून न घेता लेखिकेनं 'टरफल' हा शब्द गावीही नसल्यासारखा सर्रास 'साल' या शब्दाचा उपयोग केला आहे. टरफल हा शब्द आणि त्याचा अर्थ उपयोग माहीत नसेल असे नाही, पण इंग्रजीतून घेतलेल्या माहितीचं मराठीकरण करताना शब्दांच्या निवडीबद्दल आळस केला गेला असावा. वास्तविक या लेखासोबत टरफलासहित पिस्त्यांचं ठळक चित्र आहे. साल म्हटलं काय, टरफल म्हटलं काय, लक्षात येतंय ना, असा दृष्टिकोन असला तरी पिस्त्याला अंगची सालही असतेच, आणि वर कठीण टरफल असतं. आपण टरफल काढून पिस्ते खातो, साल काढून नव्हे. वेगळे शब्द हे पदार्थाच्या भिन्न गुणधर्मासाठीच योजलेले असतात. साल हे फळांचं अंगचं आवरण असतं. उदा० चिकूची साल, केळ्याची साल. ती फळाच्या गरालगत मऊ, नरम असते. ती सोलून किंवा साल काढण्याच्या यंत्रानं काढता येते. कच्च्या बटाट्याची साल आपण यंत्रानं सोलतो, उकडलेल्या बटाट्याची साल सहज सुटते, बदामाला अंगची साल असते, बदाम भिजवले की ती सोलता येते. तशीच पिस्त्यालाही असते, पण त्यावर जे कठीण आवरण असतं ते त्याचं टरफल; साल नव्हे. भुईमुगाच्या शेंगांच्या टरफलांबद्दलची लोकमान्य टिळकांच्या विद्यार्थिदशेतील गोष्ट प्रसिद्धच आहे. शेंगांमधले दाणे काढून मुलांनी टरफलं वर्गात टाकली होती, ती काही भाजलेल्या दाण्यांची सालं नव्हती.

टरफलापेक्षा कठीण असेल ते कवच. बदामाचं कवच, ते फोडून निघते ती बदाम बी. पूजेत लागतात ते अख्खे बदाम, म्हणजे कवचासहित बदाम. नारळ, कवठ ही आणखी कठीण कवचांची फळं. साल आपण सोलतो, टरफल आपण काढतो आणि कवच फोडावंच लागतं. नारळाला बिचार्‍याला साल नसते. करवंटीपासून सुटलेली वाटी (ओल्या नारळाची किंवा सुक्या खोबर्‍याची) किसणीवर धरून किसली तर खाली पांढराशुभ्र कीस पडतो, आणि किसणीवर हातात राहते ती 'पाठ', साल नव्हे. या नारळाच्या नावांची गंमतही बघा. मानानं द्यायचं ते श्रीफल, पूजेसाठी असोला नारळ, पाणीवालं शहाळं, ओल्या खोबर्‍याचा तो नारळ आणि करवंटीपासून सुटून गोटा झाला की सुकं खोबरं (आणि 'सुकं'च, 'वाळलेलं' नव्हे.)
आपल्या प्रदेशातलं हवामान, निसर्ग जे आपल्याला देतो, ज्या वनस्पती तिथे वाढतात त्या आपल्या आहाराचा भाग बनतात. ऋतुमान आणि पदार्थांचा गुणधर्म पाहून आपण त्यांचा आहारात वापर करतो, मग त्या गोष्टींना स्वतंत्र नाव देणं आलंच. नारळ हा एक प्रमुख घटक, म्हणून त्याच्या वेगवेगळ्या अवस्थांना वेगवेगळी नावं. पण ज्या हवामानात वाढणारं हे झाड नव्हे, तिथे त्या प्रदेशात तो आहाराचा भागही नव्हे. म्हणून त्या प्रदेशातल्या भाषेत नारळाला एवढी नावंही नाहीत. उदाहरणार्थ, उत्तरेत, हिंदीत ओल्या नारळाला, शहाळ्याला, सुक्या खोबर्‍याला वेगवेगळे शब्द नाहीतच. 'नारियल' या शब्दातच सगळं सामावतं. यापेक्षा वेगळी गंमत मल्याळी भाषेत दिसते. मल्याळममध्ये नारळाला 'नालिगेरम्' आणि शहाळ्याला 'एळनीर' म्हणतात. पण सुके खोबरे हा आहाराचा भाग नसल्यामुळे त्याला शब्द नाही. गरजच पडली तर 'कोपरा' म्हणून काम भागवलं जातं. पण तो मल्याळममधला शब्द नव्हे. या एकाच वस्तूची कालमानानुसार पक्व झालेली तीन वेगवेगळी रूपं आणि त्यासाठी वेगवेगळे शब्द, मला वाटतं, फक्त मराठीतच दिसतात.
फळ म्हटलं की त्यात बी आलीच. (बिनबियांची द्राक्षं आणि बिनबियांची पपई सोडून देऊ.) त्यांना सरसकट बिया म्हटलं जात असलं तरी काही फळं मात्र आपलं स्वत्व आणि सत्त्व वेगळं राखतात. चिकू, जांभूळ, पेरू यांच्या त्या बिया, पण आंब्याची मात्र बाठ किंवा कोय; फणसाची आठळी आणि चिंचेचा चिंचोका.

उसाला बिचार्‍याला बीच नाही, त्याच्या पेराशी असतात 'डोळे'. तिथूनच तो रुजतो आणि उसाला खालीवर असतात शेंडे-बुडखे. एखाद्या गोष्टीला शेंडा बुडखा नसणं हा वाक्प्रचार त्या उसावरूनच आलेला आहे. उसाच्या तळाचा भाग तो बुडखा आणि वरचा तो शेंडा. हा आगापिछा ज्या गोष्टीला नाही तिच्यावर विश्वास कसा ठेवणार?

भाषेचा बुडखा, भाषेची मुळं तर परंपरेत, लोकजीवनात, संस्कृतीत खोलवर रुजलेली असतात. त्यांच्यातून सत्त्व घेऊनच मोकळ्या वातावरणात तिला नव्या आविष्काराचे नवे शेंडे, धुमारे, फुटत असतात, विस्तारत असतात. एवढ्यासाठीच भाषेकडे 'डोळस' दृष्टीनं पाहायला हवं. तरच भाषेची गोडी चाखता येईल.

सुप्रिया, 61/14 एरंडवणे, प्रभात रोड, 14वी गल्ली
इन्कमटॅक्स ऑफिसजवळ, पुणे 411 004
भ्रमणभाष : 094230 09522