भाषावार्ता

अरुणाचलमध्ये सापडली दुर्मिळ भाषा

अरुणाचल प्रदेशातील एका दुर्गम भागात बोलली जाणारी अज्ञात भाषा शोधून काढली आहे. जेमतेम ८०० जण बोलत असलेली ही भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

‘कोरी’ असे या भाषेचे नाव आहे. तिबेट व ब्रह्मदेश विभागातील ही भाषा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या विभागातील ४००पैकी १५० भाषा भारतात बोलल्या जातात. मात्र त्यांपैकी कोणत्याही भाषेशी ‘कोरो’चे साम्य नाही. ऑरेगॉनमधील ‘लिव्हिंग टंग्ज इन्स्टिटयूट’मधील ग्रेगरी अँडरसन, पेनसिल्वेनियातील स्वार्थमोअर महाविद्यालयातील डेव्हिड हॅरिसन आणि रांची विद्यापीठातील गणेश मुर्मू यांच्या पथकाने हा शोध लावला आहे. त्यांना ‘नॅशनल जिओग्राफिक’ने साहाय्य केले होते. अरुणाचल प्रदेशात जाण्यासाठी या संशोधकांना भारत सरकारची परवानगी घ्यावी लागली. ‘‘कोरो भाषा बोलणार्‍यांमध्ये ज्येष्ठ लोकांचाच समावेश आहे. २० वर्षांखालील फारच कमी लोक ही भाषा बोलतात,’’ असे अँडरसन यांनी सांगितले.
‘नॅशनल जिओग्राफिकच्या एंडयुरिंग व्हॉईसेस प्रोजेक्ट’अंतर्गत हे पथक ‘आका’ आणि ‘मिजी’ या अत्यंत कमी बोलल्या जाणार्‍या भाषांच्या शोधात फिरत असताना अचानक त्यांना ‘कोरो’ भाषेचा शोध लागला. अरुणाचल प्रदेशात डोंगराळ भागात भात-बार्ली पिकविणार्‍या गावांत जाऊन भाषा ऐकत व त्याचे रेकॉर्डिंग करत असताना त्यांना या भाषेचा शोध लागला. या पथकाने मोहिमेपूर्वीच भाषांचे वैविध्य असलेले अरुणाचल हे जागतिक नकाशावरील केंद्र म्हणून निश्चित केले होते. दहा वर्षांनी जर आम्ही अरुणाचलला आलो असतो, तर या भाषेची माहितीही मिळाली नसती, असे ऍंडरसन यांनी सांगितले.
अरुणाचलमध्ये सुमारे ५० भाषा बोलल्या जातात. यांपैकी बहुसंख्य भाषांना लिपी नाही. अरुणाचल प्रदेशात गेलेल्या तज्ज्ञांच्या पथकातील एक सदस्य डेव्हिड हॅरिसन यांच्या मते ‘कोरो’, ‘आका’ आणि ‘मिजी’ या प्रत्येक भाषेचे स्वरूप वेगळे आहे. जसा इंग्रजी आणि जपानी भाषेतील उच्चारांत फरक आहे, तशाच प्रकारचा फरक ‘आका’ आणि ‘कोरो’ भाषांतील उच्चारात आहे. ‘आका’ भाषेत पर्वताला ‘फू’ असे म्हटले जाते, तर ‘कोरो’ मध्ये ‘नाग्गो’. हा फरक फक्त उच्चाराचा नाही, तर व्याकरणाचाही आहे. कोरो भाषेचा उगम तिबेटमध्ये झाला असण्याची शक्यता आहे.

दै० सकाळ, दि० ७ ऑक्टोबर २०१०

मध्य प्रदेशात ‘मराठी साहित्य अकादमी’

मराठी भाषेच्या जतन-संवर्धन-विकासासाठी राज्यात ‘मराठी साहित्य अकादमी’ स्थापन करण्यात यावी, ही मागणी खुद्द महाराष्ट्रात अद्याप दुर्लक्षिली गेली असली, तरी शेजारच्या मध्य प्रदेश सरकारने मराठी भाषेला अधिकृत दर्जा देण्याबरोबरच नुकतीच ‘मराठी साहित्य अकादमी’ची स्थापनाही केली आहे. मध्य प्रदेश सरकारच्या सांस्कृतिक विभागाचे सचिव श्रीराम तिवारी यांनी गुरुवारी (९ डिसेंबर) भोपाळ येथे यासंबंधीची अधिकृत घोषणा केली. मध्य प्रदेशमध्ये मराठी भाषा, साहित्य, संस्कृती या क्षेत्रात गेली तीस वर्षे कार्यरत असणारे डॉ० गणेश बागदरे यांची मराठी साहित्य अकादमीचे पहिले संचालक म्हणून नेमणूकही करण्यात आल्याचे तिवारी यांनी घोषित केले.

महाराष्ट्राच्या बाहेर अशा प्रकारची ‘मराठी साहित्य अकादमी’ सुरू करणारे आणि मराठी भाषेला राज्यात हिंदीनंतरची दुसरी अधिकृत भाषा असा दर्जा देणारे मध्य प्रदेश हे पहिले राज्य ठरले आहे. मध्य प्रदेशमध्ये मराठी भाषकांची संख्या सध्या एक कोटी पंचवीस लाखांच्या आसपास आहे. छत्तीसगडच्या निर्मितीपूर्वी ही संख्या दोन कोटीच्या आसपास होती.

मध्य प्रदेशात भोपाळ, ग्वाल्हेर, जबलपूर आणि इंदूर येथे मराठी भाषकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पेशव्यांच्या काळात आणि त्याही आधीपासून अनेक मराठी कुटुंबे या ठिकाणी वास्तव्यास आहेत आणि त्यांनी मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्याचे जतन करण्यात पुढाकार घेतला आहे. ‘मराठी साहित्य अकादमी’च्या निर्मितीमुळे येथील मराठी भाषक सुखावले आहेत.
या अकादमीचे पहिले संचालक म्हणून सूत्रे स्वीकारणारे गणेश बागदरे मूळचे पुण्याचे असले, तरी गेली अनेक वर्षे मध्य प्रदेशात विविध ठिकाणी मराठी भाषेशी निगडित उपक्रमांच्या आयोजनात आघाडीवर आहेत. मध्य प्रदेश सरकारच्या सांस्कृतिक विभागात ते मराठी विभागप्रमुख म्हणून काम करत होते.

दै० सकाळ, दि० १२ डिसेंबर २०१०

जगभरातील बोलींच्या संरक्षणासाठी केंब्रिज विद्यापीठाचा प्रकल्प

भारतात तसेच जगात विविध ठिकाणी अस्तंगत होत चाललेल्या बोलीभाषांचे रक्षण व्हावे यासाठी केंब्रिज विद्यापीठाने एक महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतला आहे. लोकांना या बोलीभाषा कळाव्यात, म्हणून विद्यापीठातील संशोधकांनी खास वेबसाइटवर आता लोकांना त्या भाषासंबंधात मुक्त प्रवेश दिला आहे.
www.oralliterature.org अशी ही वेबाइट असून यात केरळमधील पल्लकड जिल्ह्यात कुरुंबर समाजाची बोली तसेच स्वतंत्र अशी मुदुगार संस्कृतीची माहिती, कागदपत्रे आदी बाबींचा समावेश या वेबसाइटवर करण्यात आला आहे. याशिवाय ध्वनिमुद्रणाचाही समावेश करण्यात आला आहे. बुंदी जिल्ह्यामधील थिकराडा गावातील माळी समाजातील लोकांची जीवनशैली, संस्कृती कळावी असाही एक प्रकल्प यात समाविष्ट आहे. तसेच राजस्थानातील हडोतीमधील तेजाजी परंपरा, रितीरिवाज याची माहितीही असलेले ध्वनिमुद्रण यात आहे. हे सारे ध्वनिमुद्रण हिंदी व इंग्रजीत भाषांतरित करण्यात आले आहे. जगातील ३,५२४ बोलींच्या ध्वनिमुद्रण असलेल्या फाइल्स या प्रकल्पाद्वारे साइटवर उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

दै० लोकसत्ता, दि० १३ डिसेंबर २०१०