बहुभाषिक भारत - वास्तव आणि स्वप्न

मी १२ जून १९६१ रोजी हैदराबादच्या बेगमपेठ विमानतळावर पोहोचले तेव्हा डॉ० शांताबाई सातवळेकर व डॉ० एस०डी० सातवळेकर म्हणजे आई आणि भाऊ मला घ्यायला आले होते. शांताबाईंनी ड्रायव्हरला तेलगूमध्ये काहीतरी सांगितले. मग शेरवानी घातलेल्या एका इसमाशी त्या उर्दूमध्ये बोलल्या व त्यानंतर भाऊंशी मराठीमध्ये बोलल्या. मग त्या माझ्याकडे वळून म्हणाल्या, "We'll teach you three languages."माझ्या बाबतीत त्यांचा वायदा काही अंशी अपुरा राहिला तरी त्या दिवशी हैदराबादमधील बहुभाषिकतेचा ठळक अनुभव आला होता, हे निश्चित आहे.

दुसरा अनुभव १५ दिवसांनंतर आला. मी मैत्रिणीबरोबर रायचूरच्या जवळ असलेल्या गुरुगुंटा नावाच्या खेड्याला गेले होते. तिकडच्या घरात एक १५-१६ वर्षांचा नोकर होता. त्याचे शालेय शिक्षण अजिबात झालेले नव्हते; पण त्याला ४-५ भाषा बोलायला येत होत्या. कन्नड, तेलगू, तामिळ, हिंदी, उर्दू. अवतीभवती घडत असलेल्या गोष्टी बघत मी थोडंफार आकलन करण्याचा प्रयत्न करीत होते, हे त्यांनी पाहिले. मग मला सांगण्यात आले की, त्याने माझ्याबद्दल कॉमेंट केली. "तिच्या शिक्षणाचा काय उपयोग आहे? तिला बोलताही येत नाही."

मी मूळ अमेरिकेची आहे हे तुम्हांला माहीत आहे. लहानपणापासून जी भाषेची स्थिती मी अनुभवली ती हैदराबादच्या किंवा एकूण भारताच्या स्थितीपेक्षा फारच निराळी होती. जन्मापासून निधनापर्यंत एकच भाषा - म्हणजे इंग्रजी पुरेशी होती. दुसरी भाषा शिकण्याची गरज नव्हती. कॉलेजमध्ये जाऊ इच्छिणार्‍या मुलांना माध्यमिक शाळेमध्ये एक परकीय भाषा शिकायची होती. बहुधा स्पॅनिश, फ्रेंच किंवा जर्मन; पण शाळेच्या बाहेर त्या भाषेची गरज नव्हती व मुलांनी त्या भाषेवर फारसे प्रभुत्व मिळवावे, अशीही अपेक्षा नव्हती.
ही एकभाषिक स्थिती पूर्वी अमेरिकेमध्ये नव्हती. आदिवासी सोडून बहुसंख्य अमेरिकेतील लोक एकेकाळी इतर देशांमधून आले होते. काही शतकांपासून लोक युरोपमधून व जगाच्या इतर भागांमधून येत राहिले. आपली भाषा घेऊनच. पुष्कळदा विशिष्ट भाषिक लोक एकाच ठिकाणी स्थायिक व्हायचे म्हणून ते आपली भाषा बोलत असत. चर्च व इतर भाईबंद संस्था स्थापन करून त्यांच्या मातृभाषेची निष्ठा राखून ठेवत असत. मात्र पहिल्या महायुद्धाच्या वेळेस परकीय भाषा बोलणार्‍या लोकांबद्दल बाकीच्यांना संशय वाटायला लागला होता. कदाचित ही माणसे जर्मनीचे छुपे पुरस्कर्ते आहेत, अशी भावना होती. आयोवा नावाच्या राज्यामध्ये रस्त्यावर परकीय भाषा बोलण्याची बंदी घालण्यात आली. इतर ठिकाणी इथपर्यंत मजल गेली नसली तरी आपण १०० टक्के अमेरिकन आहोत, असे दाखवण्याचा दबाव स्थलांतरित लोकांवर असायचा. हळूहळू त्या लोकांच्या संस्था, चर्च वगैरे मातृभाषेचा वापर सोडून इंग्रजीमध्ये सर्व व्यवहार करायला लागले.

तरीपण मला अजून आठवते की, १९४५च्या आसपास म्हणजे दुसरे महायुद्ध संपल्यानंतर आमचे शेजारी अजून Croatian भाषा वापरत असत व जवळपासच्या Croatian Hallमध्ये लग्नानंतरचा सोहळा आणि डान्स आयोजित करीत असत. आमची भाषा Croatian नसली तरी आम्हां मुलांना ते सर्व पाहायला मिळणे ही एक पर्वणीच होती.

स्थलांतरित लोकांमध्ये मातृभाषेचा लोप

असे अनुभव मात्र हळूहळू कमी होत गेले व एकूण स्थलांतरित लोकांच्या मातृभाषांचा लोप होत गेला. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे भिन्नभाषिक लोकांशी लग्न. आमच्या कुटुंबाचे उदाहरण पाहा. माझ्या वडिलांची मातृभाषा नॉर्विजन, आईची मातृभाषा फिनिश. एकमेकांची भाषा येत नसल्यामुळे ते इंग्रजीमध्येच बोलत असत व आमच्या कुटुंबात इंग्रजी ही एकमेव भाषा होती. आईकडून काही फिनिश गाणी आणि वडिलांकडून काही नॉर्विजन गाणी एवढीच भाषिक शिदोरी भूतकाळातून मिळाली. ही शिदोरी मला फार मोलाची वाटत होती. मात्र ती किती तुटपुंजी आहे, हे कालांतराने समजले. मी प्रथम नॉर्वेला गेले तेव्हा वडिलांकडून शिकलेले एक गाणे मी चुलत भावाला म्हणून दाखवले होते. तो फारसा प्रभावित झाला नव्हता. 'हे गाणे फार जुने आहे' एवढेच त्याने म्हटले.
त्याचप्रमाणे नुकतीच मुंबईमध्ये मला एक फिनिश बाई भेटली. मी तिला म्हटले की मी आईकडून एक फिनिश गाणे शिकले होते. "कोणते गाणे?"तिने विचारले, तर "मिनं वान टिस्कान - एक मोलकरणीचे गाणे,"असे मी सांगितले. "हो"तिने म्हटले. "तेच गाणे अमेरिकेत गेलेल्या सगळ्या फिनिश लोकांना येते". म्हणजे मी कौतुकाने जपून ठेवलेली सांस्कृतिक शिदोरी किती तुटपुंजी आहे हे पुन्हा कळून चुकले.

आमचे कुटुंब तर युरोपमधून आलेल्या पहिल्या किंवा दुसर्‍या पिढीचे आहे. मात्र तीन-चार पिढ्यांनंतर बहुधा इतक्या भिन्न भिन्न भाषिक लोकांची लग्ने झालेली असतात की आपल्या पूर्वजांच्या भाषा कोणत्या होत्या हा संशोधनाचा विषय ठरतो. यामुळे अमेरिका एकभाषिक राष्ट्र झाले आहे. (अलीकडे स्पॅनिश भाषिक लोकांचे प्रमाण बरेच वाढले म्हणून सध्या स्थिती बदललेली आहे; पण तो स्वतंत्र विषय असल्यामुळे त्याची चर्चा मी इथे करीत नाही.)

आतापर्यंत मी जे सांगितले ते एक प्रकारे आत्मकथन आहे. ते एवढ्या विस्ताराने सांगण्याची दोन कारणे आहेत. एकतर त्यातून बहुभाषिकतेबाबत भारतातील स्थिती व अमेरिकेतील स्थिती किती निराळी आहे हे दाखविण्यासाठी माझा स्वत:चा अनुभव सांगणे सोयीचे होते. शिवाय मला तुमच्यासमोर जो विचार मांडायचा आहे तो परिपूर्ण तयार झालेला नाही आहे. मला माहीत असलेल्या काही गोष्टी, वाचलेले काही विचार व स्वत:चे अनुभव एकत्रित करून मी एक अपूर्ण शोधाचे वर्णन तुमच्यासमोर मांडू पाहत आहे. हे ऐकत असताना कदाचित तुम्हांला जरा विस्कळीत वाटत असेल. शेवटी मी सगळे एकत्र बांधण्याचा प्रयत्न करीन.

तुम्ही सर्वजण हैदराबाद शहरातील बहुभाषिक परंपरेचे वारस आहात. म्हणजे या विषयाबाबत तुमचा अनुभव माझ्यापेक्षा कितीतरी जास्त समृद्ध आहे. माझी एवढी आशा आहे की माझ्या भाषणाच्या निमित्ताने तुमच्या अनुभवावर आणि तुम्हांला माहीत असलेल्या गोष्टीवर थोडाफार नवा प्रकाश पडेल.

अलीकडे या विषयाकडे जास्त लक्ष

अनेक वर्षांपासून बहुभाषिकता मला कुतूहलाचा विषय वाटत होता. पण गेल्या ५-६ वर्षांत या विषयाकडे माझे लक्ष जास्त प्रकर्षाने वेधण्यात आले आहे. त्याची मुख्यत: तीन कारणे आहेत.

पहिली गोष्ट म्हणजे NCERTचा राष्ट्रीय अभ्यासक्रम (NCF - National Curriculum Framework) करण्याची प्रक्रिया. त्या एका अपूर्व वैचारिक मंथन व प्रक्रियेमध्ये माझा लहानसा वाटा होता. तयार झालेल्या Documentमध्ये भाषेसंबंधीचा जो भाग आहे त्यात भारताच्या बहुभाषिकेबद्दल महत्त्वाचे विश्लेषण आहे. यात असे म्हटले आहे की, भारतातल्या बहुभाषिकतेमुळे अनेक आव्हाने आपल्यासमोर येतात; पण त्याबरोबर अनेक संधीही उपलब्ध झालेल्या आहेत.

या NCF Document कडे आपण नंतर परत वळू या. पण आधी Tata Institute of Social Sciencesमध्ये M.A. Educationच्या प्रोग्रॅममध्ये मला मिळालेल्या अनुभवाबद्दल बोलायचे आहे. हा प्रोग्रॅम दोन वर्षांचा असून dual modeमध्ये चालतो. त्याचा अर्थ असा आहे की प्रत्येक सत्रामध्ये तीन आठवडे विद्यार्थी आणि प्रोफेसर एकत्र येतात. मग बाकी पंधरा आठवडे Internetच्या साहाय्याने विद्यार्थी स्वयंअध्ययन करतात.
या प्रोग्रॅममध्ये माझी मैत्रीण जेन साही आणि मी मातृभाषेचे अध्यापन - हा Course शिकवतो. आमचे विद्यार्थी भारतातल्या वेगवेगळ्या भागांतून येतात आणि वेगवेगळ्या शाळा व संस्थांमध्ये काम करतात. त्यांच्या समृद्ध अनुभवामुळे आमचा दृष्टिकोनही जास्त व्यापक झाला.

पहिल्या वर्षी दोन विद्यार्थी नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते होते. त्यांच्याकडून नर्मदा खोर्‍यातील गुंतागुंतीच्या भाषिक परिस्थितीबद्दल बरीच माहिती मिळाली. त्या भागामध्ये अनेक लोक आदिवासी आहेत. मुख्यत: पावरा आणि भिल्ल जमातीचे. स्थानिक भाषा विशेषत: शेतकर्‍यांची व व्यापार्‍यांची म्हणजे अहिराणी. मध्य प्रदेश जवळ असल्यामुळे काही लोक हिंदी बोलतात. मात्र, महाराष्ट्राचा भाग असल्यामुळे शाळेमध्ये मराठी भाषा हे शिक्षणाचे माध्यम. शाळेत आलेल्या आदिवासी मुलांना मराठी अजिबात येत नाही आणि शाळेच्या बाहेर मराठी त्यांच्या कानावर पडत नाही. शिवाय शिक्षकांना आदिवासी भाषा येत नाही व काही वेळेस त्यांना प्रमाण-मराठीही येत नाही. थोडक्यात आमच्या विद्यार्थ्यांकडून प्रथमच आदिवासी मुलांची व एकूण आदिवासी समाजाच्या भाषिक प्रश्नांची ओळख झाली.
प्रत्यक्ष आमच्या विद्यार्थ्यांमध्ये आणखी एक समस्या दिसली. ती म्हणजे काही विद्यार्थ्यांचे इंग्रजीवर पुरेसे प्रभुत्व नसते. त्यांना इंग्रजीमध्ये संभाषण करता येते पण व्याख्यान समजणे, पुस्तकातले उतारे वाचून त्यावर विचार करून लिहिणे या गोष्टी त्यांना कठीण जातात. M.A. Programmeतर्फे अशा विद्यार्थ्यांना शक्य तितकी मदत दिली जाते. पण विशेषत: घरी गेल्यावर स्वयंअध्ययन करणे हे त्यांना अवघड जाते. दुर्दैवाने अशा विद्यार्थ्यांचा जीवनानुभव समृद्ध असतो. मात्र तो अनुभव इतरांपर्यंत ते अनेक वेळा पोचवू शकत नाहीत.

दुसर्‍या टोकाचेही काही विद्यार्थी असतात. त्यांना अस्खलित इंग्रजी येते, पण कोणतीही भारतीय भाषा चांगल्या तर्‍हेने येत नाही. त्यामुळे ते या देशाच्या आम जनतेपासून फार दूर असतात. या मातीची मुळे तुटलेली असतात व पाश्चात्त्य संस्कृतीही पूर्णपणे आत्मसात झालेली नसते. त्यामुळे ही मुले त्रिशंकूसारखी असतात. ही संदिग्ध परिस्थिती काही विद्यार्थ्यांना फार त्रासदायक वाटते.

आणखी एक समस्या पूर्णपणे अनपेक्षित होती. ती म्हणजे काही विद्यार्थ्यांनी सांगितले की, त्यांच्यावर मातृभाषा सोडण्याचा दबाव येतो. एक शीख विद्यार्थिनीचा अनुभव विशेष उद्बोधक आहे. तिची मातृभाषा पंजाबी, ती लहानपणी घरी पंजाबी बोलायची आणि काही वर्षे ती पंजाबी माध्यमाच्या शाळेत शिकली. नंतर ती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेली. ती १४-१५ वर्षांची असताना तिच्या भावाने तिला बजावून सांगितले की, "तू माझ्याशी पंजाबीत बोलू नकोस. हिंदीत बोल किंवा इंग्रजीत बोल. तू पंजाबीत बोललीस तर माझे मित्र मला हसतील. आपले कुटुंब गावंढळ आहे म्हणून!"

भाषांची उतरंड

आमच्या विद्यार्थ्यांच्या भाषाविषयक अनुभवांची जी झलक मी तुम्हाला दाखविली तीत काही गोष्टी प्रकर्षाने दिसून येतात. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे जशी सामाजिक उतरंड दिसते तशी भाषांच्या बाबतीतही दिसते. या उतरंडीमध्ये सगळ्यात खाली म्हणजे आदिवासी भाषा. त्यांच्यावर वेगवेगळ्या राज्यभाषा. उत्तरेकडे त्यावर हिंदी भाषा व सगळीकडे एकदम वर म्हणजे इंग्रजी. जसजसे आपण वर जातो तसतसे त्या भाषेला जास्त प्रतिष्ठा असते. आदिवासी भाषेला सगळ्यात कमी प्रतिष्ठा, मग राज्यभाषा, त्यावर हिंदी व सर्वांत वर इंग्रजी.

या उतरंडीला आर्थिक बाजूही असते. जसजसे माणूस वर जातो तसतसे नोकरी मिळण्याची शक्यता वाढते. एकूण राहणीमान सुधारण्याची शक्यता असते. सत्तेमध्येही सहभाग मिळू शकतो. मात्र वर जाण्यासाठी काही वेळेस माणसाला जबरदस्त किंमत मोजावी लागते. ती म्हणजे आपल्या मातृभाषेचा कमी-अधिक प्रमाणात त्याग करणे.

आदिवासींची परिस्थिती परत बघू या. बहुसंख्य आदिवासी लोकांना वाटते की आपल्या मुलांनी शाळेत जावे. पण शाळेमध्ये मुलांनी कुठली भाषा शिकावी-आदिवासी भाषा की राज्यभाषा? माझ्यासारखे शिक्षणतज्ज्ञ ठामपणे म्हणतात की, "तुमच्या मुलांना अगोदर मातृभाषेतून शिकू द्या आणि नंतर त्याला प्रांतीय भाषेकडे जाऊ द्या."मात्र, पुष्कळदा आदिवासी पालकांना हे पटत नाही. त्यांना दिसते की प्रांतीय भाषा बोलणार्‍यांना नोकरी मिळते, प्रांतीय भाषिकांच्याकडे सत्ता असते व तीच भाषा मुलांनी शिकावी अशी त्यांची इच्छा असते.

दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की, आदिवासी मुले शाळेत गेल्यावर पहिली ३-४ वर्षे प्रांतीय भाषा शिकण्यात जातात आणि ती मुले कायमची अभ्यासात मागे राहतात. शिवाय अनेक वेळा त्यांची हेटाळणी होते. मागच्या वर्षी मी कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातल्या सोलिगा जमातीच्या मुलांच्या आश्रमशाळेबद्दल फिल्म पाहिली. ती फिल्म छोटी आहे; पण विदारक. तिचे नाव 'Which Language? Whose Language?' (कोणती भाषा? कोणाची भाषा?) पहिल्या sceneमध्ये शाळेची प्रार्थना चालू आहे. मुले म्हणतात, "कन्नड माता चिरायू असो। कन्नड माझ्या रक्तवाहिन्यांमध्ये वाहते"वगैरे वगैरे. दुसरा scene वर्गात आहे. शिक्षक मुलांना म्हणतात, "मी कन्नडिगा आहे. माझी भाषा कन्नड. तुम्ही सोलिगा, तुमची भाषा काय आहे? सोलिगा एक भाषा आहे का? ती फक्त कन्नड, तेलगू व तामिळचे मिश्रण आहे! तुमच्या भाषेला लिपी आहे का?"एक मुलगा पाटीवर काहीतरी लिहितो, शिक्षक बघतात व म्हणतात, "पण ते कन्नड आहे."असे ४-५ मिनिटांत ते त्या मुलाची भाषिक अस्मिता पूर्णपणे चिरडून टाकतात. फिल्म पाहत असताना आपल्याला आश्चर्य वाटते की कॅमेर्‍यासमोर हा माणूस एवढ्या उघडपणे बोलतोय. पण बहुतेक आपण काहीतरी गैर बोलतोय याचीही त्याला जाणीव नाही.

थोडक्यात, मुलांनी प्रांतीय भाषा शिकावी म्हणून पालक मुलांना शाळेत पाठवतात. मात्र मुले पुष्कळदा नीट शिकत नाहीत. कृष्णकुमार यांच्या शब्दांत ती फक्त मागास बनायला शिकतात. मुले मातृभाषेचा संपूर्णपणे त्याग करीत नसतील, पण मातृभाषेत भाषिक कौशल्याचा विकास नक्कीच होत नसेल. शिवाय आदिवासी संस्कृती अभिमानास्पद आहे व त्यातून बाकीच्या समाजाला काहीतरी शिकण्यासारखे आहे असे कोणालाही वाटत नाही.
इंग्रजीचे आकर्षण

जो माणूस प्रांतीय भाषा बोलतो तो आदिवासींपेक्षा कदाचित संरक्षित असेल. मात्र, त्याचीही ओढाताण होत असते. इंग्रजी आल्याशिवाय आपल्या मुलांचे भवितव्य चांगले नाही असे बहुसंख्य लोकांना वाटते. आपण नाही तर आपल्या मुलांनी इंग्रजी शिकावे, मग त्यांना नोकरी मिळेल. त्यांची राहणी सुधारेल. हे स्वप्न भारतभर सगळीकडे आढळते.
अर्थात या स्वप्नात बरेच तथ्य आहे. उच्च शिक्षण, उच्च नोकरी - राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय पातळीवर हवी असेल तर आजकाल इंग्रजी आवश्यक आहे. जसे एके काळी हैदराबादमध्ये उच्च नोकरीसाठी उर्दूची गरज होती.

ज्याला शक्य असेल तो माणूस आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये पाठवतो. शाळा चांगली असेल तर मुले इंग्रजी शिकतील, चांगली नसेल तर ती फारसे शिकणार नाहीत. पण दोन्ही प्रकारच्या शाळांमध्ये एक प्रकारची सांस्कृतिक आत्महत्या होते. मुले आपल्या मातृभाषेपासून दूर होतात व पाश्चात्त्य संस्कृतीही आत्मसात करू शकत नाहीत.
जी माणसे आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवू शकत नाहीत त्यांची अपेक्षा असते की प्रांतीय भाषेच्या शाळेमध्ये मुलांनी उत्तम इंग्रजी शिकावी. सध्या मात्र सरकारी शाळा असे करण्यास असमर्थ असतात. शिक्षणाधिकार्‍यांना व राज्यकर्त्यांना चांगली जाणीव असते की आपण त्यांच्या आकांक्षांची पूर्तता करू शकत नाही; पण ते तसे कबूल करत नाहीत. केले तर एखाद्या वेळेस सरकारी शाळा पूर्णपणे ओस पडतील. म्हणून ते 'पहिलीपासून इंग्रजी' सारखी धोरणे सुरू करतात. ते केवळ जनतेला खूष करण्यासाठी असते; हे यशस्वी होणार नाही, याची पूर्ण जाणीव असतेच.

या दृष्टिकोनातून मुलायमसिंग यादव यांनी परवा इंग्रजीबद्दल केलेली वक्तव्ये समजण्यासारखी आहेत. पूर्वीपासून उत्तर भारतात - ज्याला हिंदी बेल्ट म्हणतात - उत्तम इंग्रजी येणार्‍या माणसांचे प्रमाण दक्षिण किंवा पश्चिम भारतापेक्षा कमी आहे. म्हणून "आम्ही तुमच्या मुलांना उत्तम इंग्रजी शिकवू"असे म्हणण्याऐवजी, "नोकरी व इंग्रजी यांची सांगड आम्ही तोडू"असे आश्वासन मुलायमसिंग यांनी दिले होते. अर्थात या विधानावर जोरदार टीका झाली. शिवाय उत्तर प्रदेशच्या सरकारने काही केले तरी इंग्रजीचे महत्त्व, वर्चस्व म्हणा राहणारच.

भाषांच्या उतरंडीबद्दलचे जे चित्र मी आता तुमच्यासमोर मांडले ते अर्थात फार ओबडधोबडपणे रेखाटलेले आहे. वस्तुस्थिती यापेक्षा खूपच जास्त गुंतागुंतीची आहे. मात्र सद्य:स्थितीचे एक महत्त्वाचे सत्य दिसून येते ते म्हणजे आपल्याकडील समाज बहुभाषिक असला तरी आणि अनेक माणसे व्यवहारापुरतीच २-३ भाषा वापरू शकत असली, तरी माणसे भाषेकडे आपल्या आर्थिक व सामाजिक उन्नतीचे साधन म्हणून बघतात. अमकी भाषा शिकलो तर उच्च शिक्षण घेता येईल, चांगली नोकरी मिळेल व एकूण सामाजिक प्रतिष्ठा मिळेल, असे त्यांना वाटते.

आर्थिक आणि सामाजिक उन्नती मिळविण्याचे साधन म्हणून भाषेकडे बघणे यात काही गैर नाही, असे काहींचे म्हणणे आहे. पॉल ब्रास नावाच्या अमेरिकन प्रोफेसरांनी भारतातील भाषा-व्यवहाराचा अभ्यास केला असून त्यांच्या मते हाच दृष्टिकोन योग्य आहे. आपली राहणी सुधारण्यासाठी, सामाजिक प्रतिष्ठा मिळविण्यासाठी मातृभाषेचा त्याग करायला काही हरकत नाही, असे पॉल ब्रास प्रतिपादन करतात. ते आठवण करून देतात की खुद्द रवींद्रनाथ टागोर यांनी इशारा दिला होता की मातृभाषेचे पूजन करता कामा नये.
ब्रास यांचे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही. त्यांच्या म्हणण्यामध्ये बरेच तथ्य आहे. विशेषत: त्यांचा मातृभाषेला देवी न बनविण्याचा इशारा. तरीपण त्यांचा दृष्टिकोन फारच एकांगी वाटतो. मला स्वत:ला मर्ढेकरांच्या काव्याबद्दल यत्किंचितही माहिती नाही, पण काल डॉ० नागनाथ कोत्तापल्ले यांनी सांगितले की समाज मूल्यहीन झाला आहे, माणूस केवळ पैशाच्या मागे लागला असून, संस्कृतीचा र्‍हास झाला आहे, असे मर्ढेकरांचे म्हणणे होते.

शेवटी या प्रश्नाबाबत आपण काय भूमिका घ्यावी? माझ्या मते विचारवंतांसाठी मातृभाषा व प्रतिष्ठेची भाषा - सध्याच्या बाबतीत इंग्रजी म्हणा - या दोन्हींमध्ये एक रास्त tension आहे. मातृभाषेच्या द्वारे माणूस अनेक शतकांच्या इतिहासाला जोडलेला असतो. जीवनाला एक संस्कृतीची चौकट मिळालेली असते. अर्थात यातला धोकाही ओळखायला हवा. कुठल्याही समाजाच्या इतिहासामध्ये अन्याय भरपूर आहे. कुठल्याही संस्कृतीमध्ये अनेक गोष्टी त्याज्य असतात. भारताबद्दल बोलायचे झाले तर जातिव्यवस्था, स्त्री-पुरुष असमानता, सरंजामशाही मनोवृत्ती या गोष्टी त्याज्य आहेत, असे लगेच मनात येते.
मात्र, ज्या व्यक्तीचे नाते मातृभाषेशी शाबूत असते आणि जी व्यवहाराने व वाचनाने तळागाळातील माणसांपर्यंत पोचू शकते त्या व्यक्तीला समाजसुधारणेचे काम करता येते. या भाषणाच्या सुरुवातीला मी सांगितले होते की, टाटा इन्स्टिट्यूटच्या M.A. in Education प्रोग्रॅममध्ये कोणतीही भारतीय भाषा येत नसलेले काही विद्यार्थी असतात. यांतली एक मुंबईमध्ये राहणारी बाई आहे. ती बरीच हुशार, अत्यंत संवेदनशील. मात्र, भारताच्या समाजजीवनाबद्दल तिचे कमालीचे अज्ञान. "मी M.A. in Education प्रोग्रॅम जॉईन करेपर्यंत माझी समजूत होती की भारतामध्ये जातिव्यवस्था केव्हाच नष्ट झालेली आहे", असे ती म्हणाली. म्हणजे तिला या देशाचा ना भूतकाळ समजत, ना वर्तमानकाळ. भविष्याबद्दल तर प्रश्नच नाही.

एवढे असूनही हे मात्र आवर्जून सांगायला पाहिजे की, प्रामाणिक विचारवंत केवळ स्वत:च्या मातृभाषेच्या चौकटीत राहिला तर त्याला गुदमरल्यासारखे वाटेल. टागोरांनी म्हटल्याप्रमाणे त्याला इतर संस्कृतींचे वारे आवश्यक असतात.

सोळाव्या-सतराव्या शतकांमध्ये इस्लाम धर्म भारतात आल्यामुळे आध्यात्मिक विचाराला चालना मिळाली होती. संत एकनाथ यांच्या 'हिंदू-तुर्कवाद' या काव्यामध्ये हे दिसून येते. परवा डॉ० विद्या देवधर मला त्यांच्या दख्खन (डेक्कन)मधील सामाजिक इतिहासाबद्दलच्या संशोधनाच्या बाबतीत सांगत होत्या की, हिंदू-मुस्लिम धर्मीयांच्या संवादामुळे आध्यात्मिक दृष्टिकोन कसे विशाल आणि सहिष्णू बनले. हे ऐकून मी फार प्रभावित झाले. त्यातील एक वाक्य बाईंनी मला लिहून दिले ते असे – 'तुबदीखान व शहातुराब हे खरे बोलतात व देवावर श्रद्धा ठेवतात, त्यांना वैष्णव का म्हणू नये?' आजकाल हिंदू-मुस्लिमांमध्ये वैर मुद्दाम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असताना अशा इतिहासाचा अभ्यास करणे फार गरजेचे आहे.

त्या वेळी फारसी, अरबी भाषा आणि इस्लाम यांची ओळख झाल्यामुळे भारतामध्ये वैचारिक मंथन सुरू झाले होते. नंतर ब्रिटिश आले इंग्रजी भाषा आणि पाश्चात्त्य संस्कृती घेऊन. एका अत्यंत महत्त्वाच्या लेखामध्ये इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी सांगितले की, १९२०-१९८० या काळातील भारतात एक अभूतपूर्व वैचारिक मंथन सुरू झाले होते. सुरुवातीला गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये मुलभूत प्रश्नांचा जोरदार विचार करण्यात येत होता. स्वतंत्र भारताने विकासाचा कोणता मार्ग स्वीकारावा - सोविएट रशियाची हुकूमशाही अथवा पाश्चात्त्य देशांची लोकशाही? पाश्चात्त्य देशांप्रमाणे औद्योगिकीकरण करावे की ग्रामीण विकास करावा? धर्मनिरपेक्ष राष्ट्र असावे का? असमानता नष्ट करून स्त्री पददलित व आदिवासींना न्याय कसा देता येईल?
गुहा यांचे पुढील विधान अतिशय महत्त्वाचे आहे. '१९२० ते १९८० या दरम्यान बंगाली आणि मराठी या जगातील दोनच द्विभाषिक संस्कृती होत्या. फ्रेंच लोक फ्रेंचमध्येच लिहितात, विचार करतात व बोलतात; इंग्रज इंग्रजीमध्ये. मात्र पुणे आणि कलकत्त्याला वैचारिक वाङ्मयाचे लेखन आणि चर्चा इंग्रजीमध्ये व स्थानिक भाषेमध्ये असत. महाराष्ट्रातील इरावती कर्वे व बंगालमधील निर्मलकुमार बोस हे दोघे मानववंशशास्त्रज्ञ पूर्णपणे द्विभाषिक होते. गरजेप्रमाणे ते मातृभाषेत नाहीतर, इंग्रजीमध्ये लिहू शकत होते.'

आज काळाची गरज

आजकाल परत या देशापुढे काही मूलभूत समस्या आहेत. त्यांतला एक प्रश्न जुनाच आहे. स्त्री, पददलित, आदिवासींना न्याय कसा द्यायचा? आता काही प्रश्न पूर्वीपेक्षाही ज्वलंत आहेत. वेगवेगळ्या धर्माचे लोक या देशात शांततेने, मैत्रीने, एकोप्याने कसे राहू शकतील? काही नवीन प्रश्नही आहेत. जागतिकीकरणाला कसे तोंड देता येईल? जागतिक तापमानवाढीला (Global Warming) कसे तोंड देता येईल? निसर्गाशी जवळीक साधून शाश्वत अर्थव्यवस्था व जीवनपद्धती कशी विकसित करता येईल? शैक्षणिक प्रश्नांचा मूलभूत विचार करण्यासाठी विश्वव्यापी मानवी मानसशास्त्र व भारतीय समाजजीवनावर आधारित शिक्षणाचे समाजशास्त्र (Sociology of Education) विकसित करता येईल का?
या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्यासाठी भक्कम बहुभाषिक पाठबळ लागेल. केवळ विशिष्ट प्रांतामध्ये जन्म झाल्याने ३-४ भाषा बोलता येणे हे पुरेसे नाही. मुद्दाम विचारवंतांचा धर्म मानून, समाजाची गरज म्हणून बहुभाषिक चौफेर कौशल्ये-श्रवण, भाषण, वाचन, लेखन-संपादन करून वैचारिक देवाणघेवाणीसाठी वापरणे ही काळाची गरज आहे. केवळ मातृभाषा आणि इंग्रजीच नाही, तर इतर प्रांतीय भाषा आणि आदिवासी भाषा शिकणे गरजेचे आहे. व्यक्तीने तीन भाषांवर प्रभुत्व संपादन केले तर उत्तम, नाहीतर विचारवंतांचे बहुभाषिक जाळेही (Network) तयार करता येईल.

हे स्वप्न आहे - Vision - पण ते वस्तुनिष्ठ आहे. 'पंचधारा'हे त्रैमासिक पाच भाषांना वाहिलेले आहे. (मराठी, तेलगू, हिंदी-उर्दू, कन्नड, तमीळ). डॉ०देवधर आणि त्यांचे सहकारी भारतातल्या वेगवेगळ्या भाषांमधल्या स्त्री-लेखकांचा अभ्यास करीत आहेत. असे प्रयत्न जाणूनबुजून वाढवायला पाहिजेत.

या प्रयत्नांमध्ये केंद्रीय सरकार, राज्य सरकारे व विद्यापीठे यांनी हातभार लावला पाहिजे. कदाचित काही ठिकाणी वेगवेगळ्या भाषिक विभागांऐवजी भारतीय तुलनात्मक वाङ्मयाचे विभाग स्थापन करायला हवेत.

हे सर्व प्रयत्न करीत असताना आपण लक्षात ठेवायला पाहिजे की, भाषा-व्यवहार, भाषा-शिक्षण, इतिहास, समाजशास्त्र हे केवळ विद्वानांचे खेळ नव्हेत. ती समाजाच्या मूलभूत प्रश्नांचा शोध घेण्यासाठी साधने आहेत. भाषा एक साधन आहे. तिचा वापर सत्ता गाजविण्यासाठी करता येईल, नाहीतर माणसांना जोडण्यासाठीही करता येईल. बहुभाषिक भारताचे हे स्वप्न - ही Vision - मी आपल्यासमोर मांडली आहे. आपल्यासारख्या सुशिक्षित, सुसंस्कृत समाजघटकांच्या विचारांना याने चालना मिळेल अशी मी आशा करते.
(प्रा० रा०ब० माढेकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात हैदराबाद येथे केलेले भाषण. 'पंचधारा' एप्रिल-सप्टेंबर २००९ अंकावरून)

टपालपेटी क्र० 63, फलटण 415 523
दूरभाष : (02166)22 0586