बदलणारी मराठी भाषा

अ०पां० देशपांडे

भाषा दर १० कोसांवर बदलते असे मानतात; तशी ती दर दहा वर्षांनीही बदलते हे का बरे मांडले जात नाही? काळ जसा प्रवाही आहे तशी भाषाही प्रवाही आहे. त्यामुळे जुने रीतीरिवाज, संस्कृती, शिक्षणपद्धती, परिमाणे इ० बदलतात तसतशी जुनी भाषा कालबाह्य होते आणि त्यात आता बदलत्या तंत्रज्ञानाचा झपाटा आला आहे. त्यामुळे ही भाषा बदलते आहे.

दर दहा कोसांवर भाषा बदलते हे वाक्य आजच्या तरुणांना समजतेच असे नाही. कारण कोस म्हणजे काय? दोन मैलांचा एक कोस होतो. पण आता अमेरिका सोडता इतरत्र मैलांचे किलोमीटर झाले. त्यामुळे कोस फारच दूर राहिला. मग आता १० कोसांचे रूपांतर करून भाषा दर ३२ कि०मी० वर बदलते असे म्हणायचे का? शिवाय मैल या एका संज्ञेवरून आपण त्याचा विविध प्रकारे वापर करत आलो त्याचे काय करणार? त्यास अजून तरी पर्याय आले नाहीत. उदा० मोटारगाडीत, आगगाडीत, विमानात वेग मोजण्यासाठी जे मीटर वापरतात त्याला मायलोमीटर म्हणतात. दर ताशी किती मैलांचे काहीही होवो हा मीटर मायलोमीटरच राहील? उदा० एकेकाळी मुंबई-पुणे डाक घोड्यावरून जाई. मुंबईहून सुटलेला घोडा बदलून दुसरा घोडा वापरला जाई. अशा जागेला त्या वेळी बदलापूर (कल्याण-कर्जत दरम्यान असलेले गाव, रेल्वेस्थानक इ०) म्हणत. आज डाक पाठवण्याचे मार्ग बदलले तरी गावाचे नाव बदलापूरच राहिले. तसे मैल गेले तरी मायलोमीटर हे नाव तसेच चालू ठेवावे का? मैलावरून वापरला जाणारा वाक्प्रचार म्हणजे माईलस्टोन हा आहे. अंतर दर्शविण्यासाठी रस्त्यावर मैलांचे दगड उर्फ माईलस्टोन असतात. आता मैल गेल्यावर ते मैलाचेच दगड राहणार का? शिवाय संस्थेच्या आयुष्यात, माणसाच्या आयुष्यात, विज्ञानाच्या इतिहासात काही महत्त्वाच्या घटना घडतात त्याला आपण मैलांचे दगड म्हणतो. उदा० चाकाचा शोध हा वैज्ञानिक क्रांतीतील मैलाचा दगड आहे असे मानतात. मी मैलो न मैल चालत गेलो (म्हणजे खूप लांबवर चालत गेलो) किंवा इंग्रजीत माइलेज असा शब्द व त्यावरून रुळलेला शब्दप्रयोगही आहे. उदा० एखाद्याला एसएससीच्या यशामुळे खूप माइलेज मिळाले असे आपण म्हणतो.

फूट, इंच, यार्ड ही परिमाणे आपण मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटरमध्ये बदलल्याने यांवरून पडलेली भाषा गेली. अगदी वसंत बापटांची इंच इंच लढवू छातीही गेली. इंग्रजीतील एक छान उध्दृत आठवले, 'दोज हू स्पीक इन यार्ड्स अँड मूव्ह इन इंचेस, बी टिन्टेड विथ फूट', 'ए, तू आता इथून फूट' हेही गेले.

दुसरी गोष्ट - फार पूर्वी छोट्या वजनांसाठी गुंजा, मासा वापरीत आणि तोळाही. (१६ गुंज = १ तोळा, ९६ तोळे = १ शेर (अंदाजे १ किलो). वैद्यलोक पूर्वी ही मापे औषधे देताना वापरत. त्यामुळे ती भाषा त्यांच्या तोंडात होती. त्यावरून एखाद्या रुग्णाची तब्येत खूप नाजूक झाली असेल तर त्याचे वर्णन अमूक एखाद्या रुग्णाची तब्येत तोळा-मासा झाली आहे, असे म्हणत. आता गुंज फक्त पाहायला मिळत असल्याने दारू प्यायलेल्या माणसाचे डोळे गुंजेसारखे लाल झाले असे म्हटले तर म्हणणार्‍यालाच दारूबाज म्हणेल, तू काय म्हणतोस ते मला समजत नाही. तू काही गांजा-भांग घेतली आहेस का? पावशेर किंवा पाव किलो वा पाव लिटर, पाव म्हणजे एक चतुर्थांश राहिले पण पावावरून अदपाव (अर्धा पाव) आणि छटाक (पावचा पाव अथवा पावाचा एक चतुर्थांश) ही मापे गेली. पण पूर्वी दारू पिऊन आलेल्याला काय रे पावशेर मारून आला का म्हणत, तेही गेले.

१६ आणे = एक रुपया होता. त्यावरून डॉक्टर, वैद्य एखाद्याची तब्येत ५० टक्के बरी झाली म्हणायच्या ऐवजी आठ आणे सुधारली म्हणत. एखाद्याचे काम १०० टक्के झाले की १६ आणे काम फत्ते म्हणत. दुष्काळामुळे ७५ टक्के पीक गेले तर ४ आणे पीक वाचले म्हणत.
तंत्रज्ञानामुळे जुन्या गोष्टी संपून नव्या आल्या. जसे कार्बन पेपर जाऊन आता झेरॉक्स आले तेव्हा अमूक एक माणूस दुसर्‍यासारखाच आहे असे म्हणताना तो त्याची कार्बन कॉपी आहे असे आपण म्हणत असू. कॉपिंग पेन्सिल गेली. सायक्लोस्टाइलिंग गेले. टाइपरायटर कॉम्प्युटरवर चढला पण टाइपरायटरची ओळ संपत येताना घंटा वाजे ती घंटाही गेली.

न०चिं० केळकरांची एकसष्टी साजरी झाली तेव्हा 'मी आता म्हातारा झालो' म्हणायच्याऐवजी 'मला आता टाईपरायटरची घंटा ऐकू येऊ लागली', असे ते म्हणाले होते.

तसेच ५०-१०० वर्षांपूर्वीचे साहित्य आणि त्यांचे लेखकही कालबाह्य झाले. एका मुलाच्या घरी त्याला पाहायला माणसे आली. मुलाचे वडील बाहेर गेले होते. दरम्यान काकांनी कारभार सांभाळला. मुलाचे वडील आल्यावर ते पाहुण्यांना म्हणाले, 'हाच मुलाचा बाप!' सर्व हसले. पण छोटयांना मामा वरेरकरांचे या नावाचे नाटक होते हे काय माहीत?

अशी जुनी भाषा कालबाह्य होताना पोकळी राहत नाही. नवी भाषा, नवे तंत्रज्ञान, नवे रीतिरिवाज त्यात डोकावतात. उदा० आजची मुले तुझा फंडा क्लिअर नाही म्हणतात. उशिरा लक्षात येणार्‍याला, त्याची टयुबलाईट आता फकफकली म्हणतात.

प्रसिद्ध विचारवंत आणि लेखक डॉ० स०ह० देशपांडे यांच्या लिखाणात काही जुने शब्द आवर्जून येतात. एकदा मी त्यांना विचारलेसुद्धा की हे सध्या लोकांना न समजणारे शब्द तुम्ही का वापरता? तर ते म्हणाले, असे शब्द कुणीच वापरले नाहीत तर ते चलनातून निघून जातील.

याचा अर्थ भाषेसारखा मोठा विषय पण तो अगदी त्या-त्या भागापुरता, त्या-त्या काळापुरता, त्या-त्या जातीपुरता, त्या-त्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक पातळीपुरता राहतो की शेवटी तो सांकेतिक ठरतो अशी शंका यावी.