परिषदेचा वर्धापन-दिन

रंजना फडके

१ मे हा महाराष्ट्रदिन आणि मराठी अभ्यास परिषदेचा वर्धापनदिन. ह्या दोन्हीचे औचित्य साधून मराठी अभ्यास परिषदेने 'मराठी कवितेची बदलती भाषा' ह्या विषयावर एक परिसंवाद आयोजित केला होता.

महाराष्ट्रातील ख्यातनाम कादंबरीकार, समीक्षक, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी प्रा० वसंत आबाजी डहाके ह्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ह्या परिसंवादामध्ये शास्त्रज्ञ व कवी श्री० हेमंत जोगळेकर, भाषा-अभ्यासक व कवी श्री० सलील वाघ, ज्येष्ठ कवयित्री व पुण्याच्या स०प० कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ० नीलिमा गुंडी, पुणे विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख, समीक्षक व कवी डॉ० मनोहर जाधव हे मान्यवर सहभागी झाले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी अभ्यास परिषदेच्या वतीने ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कविवर्य विंदा करंदीकर आणि भाषाविवेक शिकविणारे ज्येष्ठ समीक्षक डॉ० मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष ह्या अलीकडेच दिवंगत झालेल्या दोघा आदरणीय व्यक्तींना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर मराठी अभ्यास परिषदेचे अध्यक्ष प्रा० प्र०ना० परांजपे ह्यांनी परिसंवादात सहभागी होणार्‍या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्याचप्रमाणे आपल्या प्रास्ताविकात परिषदेच्या उपक्रमांची माहिती देऊन प्रस्तुत परिसंवादाचा हेतू विशद केला.

कार्यक्रमात सहभागी झालेल्या कविवर्य हेमंत जोगळेकर, सलील वाघ, डॉ० मनोहर जाधव व डॉ० नीलिमा गुंडी ह्यांनी कवितेच्या बदलत्या भाषेसंबंधी असलेल्या आपापल्या भूमिका मांडल्या. कवितेची एकच ठाम भाषा नसते. समाजात होणारे बदल त्यातून व्यक्त होतात, त्यामुळे समाजाच्या स्थितिगतीचा आलेख कवितेतून रेखाटला जातो. भाषा समजून घेताना त्यातील शब्दांमागील अर्थ लक्षात घ्यायला हवा. विद्यार्थीविश्व, कॉर्पोरेट विश्व, तसेच स्त्रीचे बदलते विश्व आणि त्या अनुषंगाने बदलणारी भाषा ह्याची अनेक उदाहरणे देऊन कवितेतील भाषा चाकोरीबाहेर पडते आहे असे प्रतिपादन प्रामुख्याने ह्या प्रसंगी व्यक्त करण्यात आले.

आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्रा० डहाके ह्यांनी, बदलत्या काळानुसार कवितेमध्येही भाषांचे वेगवेगळे स्वरूप दिसते आहे. ही कवितेतील भाषासमृद्धी म्हणायची की अतिरेक, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि कवींनी सारासार विवेक बाळगला पाहिजे असेही मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा० रंजना फडके ह्यांनी केले, तर परिसंवादात सहभागी झालेल्या मान्यवरांचा परिचय श्रीमती विजया चौधरी ह्यांनी करून दिला.

५ सायली अपार्टमेंट्स, श्रीरंग सोसायटी, बिबवेवाडी, पुणे 411 037
दूरभाष : (020)2421 0985
भ्रमणभाष : 093710 91442
ई-पत्ता : ranjanaphadke2010@gmail.com