धुळे जिल्ह्यातील दलित स्त्रियांच्या ओवीगीतांतील बहीण-भाऊ

प्रकाश भामरे

भारतीय संस्कृतीत प्रत्येक नात्याचे विशिष्ट असे स्थान ठरलेले आहे. प्रत्येक नात्यामागे विशिष्ट भूमिका, पावित्र्य, कर्तव्य दडलेले आहे. नात्याप्रमाणे प्रत्येकाचे वर्तन संस्कृतीसंवर्धन ठरते. नातेसंबंधातील वितुष्ट संस्कृतीला लागलेले ग्रहण मानले जाते. धुळे जिल्ह्यातील दलित समाज, म्हणजेच पूर्वाश्रमीचा महार समाज लोकसंस्कृतीचा पूजक राहिलेला आहे. आधुनिक काळातसुद्धा प्रत्येक नात्यामधील संकेत हा समाज पाळताना दिसतो.

दलित समाजातही इतर समाजांप्रमाणे बहीण-भावाच्या नात्याला अतिशय पवित्र मानले जाते. रक्षाबंधन, भाऊबीज, अक्षयतृतीया म्हणजेच ‘आखाजी’ अशा प्रकारच्या सणांच्या वेळी बहिणींचे भावांच्या घरी येणे लोकसंस्कृतीला धरून आहे. यातून नात्यांमधील ओलावा, जिव्हाळा टिकून राहतो अशी या समाजाची धारणा आहे. ‘दिवाई-आखाजी’ हे दोन सण ग्रामीण दलित समाजात अतिप्रिय आहेत. याप्रसंगी भावा-बहिणींच्या नात्यामध्ये भावजय धोंडा ठरते. हा आशय व्यक्त करताना एक दलित स्त्री म्हणते -

"भाऊ आनी बहीन एक वेलनं वाईक
भवजाई कुत्सीत, तिनी तोडी करा लोक"
"बंधो कसा म्हने, मन्ही बहीनले वाढ दही
भवजाई कशी म्हने, दूधमा मुरन टाकं नही"
"बंधो कसा म्हने, मन्ही बहीनले वाढ दूध
कसं वाढू दूध, तठे मूरन टाकी दिधं"
"बंधो कसा म्हने, मन्ही बहीनले रांध रोट्या
कशा रांधू रोट्या, तुम्हे लयेल गहू पोट्या"

पत्नीचा स्वभाव कुत्सित असल्यामुळे भाऊ आपल्या बहिणीला मनाप्रमाणे पाहुणचार करू शकत नाही, ही वेदना प्रस्तुत ओव्यांमधून मुखर होते. भाऊ चांगला आहे. परंतु भावजय कुस्वभावाची असल्याकारणाने ती बहीण-भावाच्या नात्यामध्ये वितुष्ट आणण्याचा वारंवार प्रयत्न करीत असते. नवर्‍याचे सांगणे काही ना काही खोटी कारणे देऊन टाळत असते.
सख्ख्या भावाला तोडून तिने परके केले अशी बहिणीची वेदना आहे. भाऊ बहिणीला दही, दूध, पोळ्या वगैरे खाऊ घालण्यासाठी आपल्या पत्नीला सांगतो. परंतु पत्नी वेगवेगळी उत्तरे देऊन आपल्या नणंदेला अवमानित करत राहते. प्रस्तुत ओव्या नणंद-भावजयच्या नात्यांतील ताण-ताणवांवर प्रकाश टाकतात.

"धाकला मुराई, नको धाडीस वं मायबाई
आंबांनी आमराई, राघो-मयनाना जीव भ्याई"
"बहीन भाऊना झगडा, व्हयना आंबाना बनमा
बहीनना डोये पानी, भाऊ पस्ताये मनमा"
"मन्हा माहेरना वाटे, बाभूय बन बहू दाटे
बंधो येईन लेवाले, माले भ्याव मोठा वाटे"

सासुरवाशी मुलीला घेण्यासाठी जाणार्‍या भावाला ‘मुराई’ असे म्हणतात. ‘मूय’ घ्यायला जातो तो मुराई होय. हा मुराई शक्यतोवर सासुरवाशी मुलीचा लहान भाऊच असतो. ‘धाकला मुराई’ म्हणजे लहान भाऊ. मला घ्यायला माझ्या लहान भावाला पाठवू नकोस अशी विनंती ही सासुरवाशी मुलगी आपल्या मायबाईला म्हणजेच आईला करते. कारण रस्त्यात आंब्याच्या घनदाट आमराया आहेत. पायी प्रवास करायचा असल्याने, पुन्हा मुराई लहान असल्याने व मी बाई माणूस असल्याने आम्हां दोघां भावा-बहिणीला भीती वाटते. परतीच्या प्रवासात बहीणभावाची शाब्दिक बोलाचाल होते. तेव्हा बहीण ही मातृहृदयी असल्यामुळे तिच्या डोळयांत अश्रू येतात. हे डोळयांतले अश्रू बघून भाऊ मनात पश्चात्ताप करतो. उगीच आपण आपल्या बहिणीला बोललो असे त्याचे मन त्याला खाते.
बहीण-भावामध्ये वेळप्रसंगी छोटे-मोठे भांडण जरी झाले, तरी ते क्षणिक असते. रक्ताची नाती चिवट असतात. ती तुटता-तुटत नाहीत हेच खरे.

"घोडावर जिन बांध, बंधो निंघना रागे रागे
कशी येऊ तुना संगे, घर-जोजार मन्हा मांगे"

‘आखाजी-दिवाई’च्या निमित्ताने भाऊ-बहिणीला माहेरी नेण्यासाठी तिच्या गावी येतो. तिने माहेरी येण्याचे नाकारल्यामुळे त्याला राग येतो. तेव्हा ती आपल्या ‘बंधो’ला म्हणते, मला तुझ्यासोबत येण्यात आनंदच वाटला असता; परंतु माझ्यामागे ‘घर-जोजार’ म्हणजे कौटुंबिक जबाबदार्‍या इतक्या आहेत की, ते सर्व सोडून मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही. ही खंत ती आपल्या भावाजवळ बोलून दाखविते.

"गरीब दुब्या भाऊ, परतेक बहीनले राहो,
हलका-भारी खन, एक रातना उत्सव"

बहिणीच्या आयुष्यातील भावाचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे प्रस्तुत ओवीमधून अप्रतिमपणे व्यक्त झाले आहे. प्रत्येक बहिणीला भाऊ असलाच पाहिजे. भाऊ नसलेली बहीण किंवा बहिणी ‘आखाजी-दिवाई’च्या सणांना उपरेपणाचा अनुभव घेताना आढळतात. म्हणून भाऊ असलाच पाहिजे. तो गरीब असो, श्रीमंत असो, बहिणीला एक रात्रीसाठी उतरायला माहेरी एक हक्काची जागा मिळते. एका रात्रीच्या भावाच्या घरचा मुक्काम म्हणजे बहिणीच्या दृष्टीने मोठा उत्सवच ठरतो. आई-वडिलांच्या नंतर तिला माहेरपण अनुभवण्यासाठी हक्काचे घर भावाचेच असते. म्हणून प्रस्तुत ओवीगीतातील बहीण आपल्या आयुष्यातील भावाच्या अस्तित्वाची अपरिहार्यता बोलून दाखविते. सासरकडचे लोक कितीही श्रीमंत असले तरी गरीब दुबळ्या भावाचे घर किंवा त्याने केलेला
खण-चोळीचा पाहुणचार तिला स्वर्गसुखापेक्षा कमी वाटत नाही.

"मन्हा बंधोना घरले, सजे चुनगजी वट्टा,
बंधोनी कया न्याव, पाटील व्हयना खट्टा"

प्रस्तुत ओवीतील बहीण आपल्या भावाच्या न्यायप्रिय स्वभावाची स्तुती करताना दिसते. ‘चुनगजी वट्टा’ हे पूर्वीच्या काळी महार वस्तीत वैभवाचे लक्षण मानले जायचे. या ‘चुनगजी वट्टया’वर बसून माझा भाऊ न्यायनिवाड्याचे काम करतो. त्याच्या न्यायातील निरपेक्षता ऐकून गाव पाटलालाही शरमेने मान खाली घालावी लागते. ‘खट्टा’ होणे म्हणजे अपराधीपणाची जाणीव होणे. महार जातीत न्यायनिवाड्याचे काम ‘नाईक’ महार करायचा. हा नाईक इतरांपेक्षा बौद्धिक दृष्ट्या श्रेष्ठ समजला जायचा. ‘नाईक’ असणे त्याच्या कुटुंबियांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट मानली जायची. या ‘नाईक’ भावाची बहीण त्याची स्तुती करत आहे.

"बंधो मन्हा राजबिंदा, भवजाई चंदरकोर,
बंधोनी काढी गाडी, गावले पडना घोर"

एका प्रेमळ बहिणीचे हृद्गत प्रस्तुत ओवीतून व्यक्त होते. माझा भाऊ व भावजय इतके देखणे आहेत की, त्यांच्याकडे पाहून संपूर्ण गाव चकित होते. सगळयांना त्यांच्या सुरूपतेचा हेवा वाटतो. भाऊ-भावजयविषयीच्या आत्यंतिक अभिमानातून अशा अतिशयोक्तिपूर्ण ओव्यांची निर्मिती झालेली आहे.

"हाई जग-संसारमा, कितलं से गनगोत,
बहीण-भाऊनं नातं, मानिक-मोत्यानी पोत"

जगात अनेक प्रकारचे नातेसंबंध आहेत. परंतु त्या नातेसंबंधांना बहीण-भावाच्या नात्याची सर येणार नाही. बहीण-भाऊ एका माळेतील माणिक व मोती आहेत. अशी हृद्य भावना प्रस्तुत ओवीतून व्यक्त होते.

"भाऊ-बहिननं नातं, जग बये दखीसन
तुन्हा जीवना करता, ऊनू कंदील लायीसन"

प्रेमळ बहिणीचा तिच्या भावाविषयीचा आत्यंतिक जिव्हाळा प्रस्तुत ओवीतून व्यक्त झाला आहे. भाऊ आजारी पडल्यावर रात्र-पहाट न पाहता त्याला पाहण्यासाठी रात्रीचा कंदील लावून येते. पूर्वीचा काळ पायी प्रवासाचा व कंदील-दिव्यांचा काळ होता. अशा काळातही लोकांनी त्या-त्या नात्यातील प्रेम-जिव्हाळा जोपासलेला आढळतो. बहिणीला निसर्गत:च भावाविषयी भावनिक ओढ असते. सर्व नातेसंबंधात बहीण-भावाचे नाते पवित्र मानले जाते. विवाहानंतर या नात्यातला दुरावा वाढत असला तरी हे रक्ताचे नाते असल्यामुळे ते मरेपर्यंत तुटत नाही. बहिणीच्या अंत:करणातील भावाविषयीच्या ममतेला अंत नाही. वाहतुकीची साधने, मोबाईलचे युग आल्यामुळे प्रत्येक नात्यातले भावनिक अंतर वाढत चालल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर उपरोक्त ओवीचा आशय आपल्याला अंतर्मुख करतो. प्रचंड अभावग्रस्तेच्या काळातही तत्कालीन लोकांनी त्या त्या नात्यातले पावित्र्य, जिव्हाळा, प्रेम, माणुसकी जोपासलेली आढळते. हे लोकसंस्कृतीचे मौलिक संचित आहे हे आपल्याला मान्य करावे लागेल.

"वावर आडे वावर, कोनता वावरमा जाऊ,
भाऊना वावरमा, नाग डोले जसा गहू"
"आम्हे सात वं बहिनी, सात गावन्या चिड्या
एकुलता एक भाऊ, त्याना पिरीममा येड्या"

प्रस्तुत ओव्याही भावा-बहिणीचे प्रेम अधोरेखित करतात. त्यांच्या शेतातील समृद्धी, त्याच्याविषयीचे सातही बहिणींचे आत्यंतिक प्रेम या ओव्यांतून व्यक्त होते.

बहिणीच्या घरी मुलगी सून म्हणून पाठविणे ही प्रथा दलित म्हणजे पूर्वाश्रमीच्या महार जातीत आजही प्रचलित आहे. या सोयरीक संबंधामुळे काही कुटुंबामध्ये जवळीकता जर निर्माण झालेली असली तरी दुरावाही निर्माण झालेला आढळतो. भावाला व्याही म्हणून स्वीकारणे ही गोष्ट नातेसंबंध तुटण्यास कारणीभूत ठरते. बहीण आपल्या मुलीची सासू झाल्यानंतर तिला सासुरवास होणे परंपरेला धरून मानले जाते. त्यातून भावा-बहिणीच्या पूर्वीच्या नात्यामध्ये वितुष्ट निर्माण होताना आढळते. असा आशय खालील ओवीगीतांतून व्यक्त होतो:

"भाऊ कया याही, भासी कयी वहू,
र्‍हायनात काया खडा, उडी ग्यात गहू"
"भाऊ कया याही, माय चाव्व्याले बोलाले,
भासी कयी वहू, माय आत्याबाई म्हनाले"
"भाऊले कया याही, भवजाई याहीन व्हयेना,
लगीन लागाना येये, मांडोमझार येयेना"
"आंबानी कयरी, आंबाले व्हयनी जड
भाऊना करता, भवजाई लागे गोड"
"भाऊ भाऊ करू, भाऊले नही मया,
वाकडी वाट करी, पोरना गावले गया"

भावाची मुलगी सून म्हणून स्वीकारल्याने सासू-सुनांमधला संघर्ष कमी होतो, अशा अपेक्षेने असे विवाहसंबंध जोडले जातात. परंतु रक्तसंबंधातले विवाह असले तरी भावा-बहिणीच्या नात्यामध्ये वितुष्ट हे निर्माण होतेच. उपरोक्त ओव्यांमधून भाऊ-भावजय-नणंद यांच्या नातेसंबंधावर प्रकाश पडतो. भाऊ-बहीण अविवाहित असताना त्यांच्या नात्यातले पावित्र्य त्यांच्या विवाहानंतर मात्र टिकत नाही, असेच म्हणावे लागेल. बहिणीच्या घरी मुलगी सून म्हणून पाठविल्यानंतर ‘र्‍हायनात काया खडा, उडी ग्यात गहू’ असा अनुभव बहिणीला व भावालाही येतो. एकंदरीत दलित समाजातील स्त्रियांच्या ओवीगीतांतील भावा-बहिणीचे संबंध जवळीकतेचे असले तरी नात्यात परिवर्तन झाल्यानंतर दुरावा निर्माण होतो, हेही तेवढेच खरे! हे सत्य उपरोक्त ओव्यांमधून अगदी सहज प्रकट होते.

साधन व्यक्ती/ओव्यांची प्राप्ती
१) श्रीमती लक्ष्मीबाई अर्जुन भामरे, रा० कापडणे, ता० जि० धुळे
२) श्रीमती येसाबाई हिरचंद भामरे, रा० कापडणे, ता० जि० धुळे

28 अजिंठा, रघुवीरनगर, खोकाई माता रोड, नंदुरबार 425 412
भ्रमणभाष : 098222 94255