तिन्ही सांजा

सुशान्त शंकर देवळेकर

शंका

कविवर्य भा०रा० तांबे ह्यांच्या एका कवितेत 'तिन्ही सांजा’ असा शब्दप्रयोग आढळतो : "तिन्ही सांजा सखे मिळाल्या/देई वचन तुला..." ह्यात 'तिन्ही सांजा’ म्हणजे काय? एरवी आपण 'सांज झाली’ असे म्हणतो; 'सांजा झाल्या’ असे म्हणत नाही. 'तिन्हीसांजेची वेळ झाली’ असे म्हणतो; 'तिन्ही सांजांची वेळ झाली’ असे महणत नाही. तरी 'तिन्ही सांजा’ या प्रयोगाला काही संदर्भ आहे का?

...आणि समाधान

'तिन्ही सांजा(ज)’ हा शब्दप्रयोग 'त्रिसंध्या’ ह्या संस्कृत शब्दावरून आला असावा असे डॉ० अशोक केळकर ह्यांनी सुचविले. 'त्रिसंध्या’ हा शब्द आपटयांच्या तीन खंडांच्या संस्कृत-इंग्रजी कोशात (सुधारित आवृत्ती संपा० प्रा० गोडे, प्रसाद प्रकाशन, पुणे, १९७९) आढळतो. पहाट, सायंकाळ ह्या दिवस व रात्रीच्या सीमारेषेवरील दोन संध्या व माध्याह्न ही सकाळ व दुपार ह्यांच्या सीमारेषेवरील संध्या अशा ह्या तीन संध्या. पूर्वी ह्या तीन संध्यासमयी संध्या केली जाई. 'तिन्हीसांज’प्रमाणे 'त्रिकाल’ (तिन्ही त्रिकाळ) हाही शब्द रूढ आहे. 'किरकिरती रातकिडे, झाल्या तिन्हीसांजा’ ही यशवंतांच्या कवितेतील ओळही एका शब्दकोशात उध्दृत केलेली आढळते.

-- संपादक