डॉ० वि०बा० प्रभुदेसाई ह्यांच्याबरोबर अनौपचारिक गप्पा

विजय पाध्ये

ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व नागपूर विद्यापीठाचे भूतपूर्व मराठी विभाग प्रमुख डॉ० वि०बा० प्रभुदेसाई हे मूळचे गोव्याचे व सेवानिवृत्तीनंतर मडगाव येथे स्थायिक झालेले. त्यांच्या पुण्याच्या भेटीदरम्यान मराठी अभ्यास परिषदेने दि० २ जून २०१० रोजी अनौपचारिक गप्पांचा एक कार्यक्रम आयोजित केला. आपल्या प्रास्ताविकात परिषदेचे सहकार्यवाह श्री० विजय पाध्ये ह्यांनी, प्रस्तुत कार्यक्रम जरी अनौपचारिक गप्पा ह्या स्वरूपाचा असला तरी महाराष्ट्र शासनाने अलीकडेच जाहीर केलेल्या सांस्कृतिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर गोवा शासनातर्फे राबविले जाणारे सांस्कृतिक धोरण कशा स्वरूपाचे आहे हे जाणून घेण्याची उपस्थितांची इच्छा आहे आणि त्या अनुषंगाने माहिती मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

डॉ० प्रभुदेसाई ह्यांनी उपस्थितांसाठी प्रथम आपल्या आजवरच्या एकूण कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेतला. त्यानंतर, गोवा शासन सांस्कृतिक उपक्रमांबाबत अतिशय उदार धोरण ठेवून असल्याचे सांगितले व शासनातर्फे तसेच शासनेतर संस्थांद्वारेही दिल्या जाणार्‍या विविध पुरस्कारांची माहिती दिली. कला अकादमीतर्फे गोव्याच्या कीर्तीत बहुमोल भर घालणार्‍या गोमंतक साहित्यिकांना गोमंत शारदा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते; मराठीतील एक व कोंकणीतील एक (देवनागरी किंवा रोमन लिपीतील) उत्कृष्ट साहित्यकृतीबद्दल लेखकांना प्रत्येकी २५,००० रुपयांचा रोख पुरस्कार दिला जातो. गोमंतक मराठी अकादमीतर्फे मराठी भाषा, साहित्य, नाटक, संगीत, चित्रकला, समीक्षा, संशोधन, प्रकाशन इत्यादी क्षेत्रांतील विविधांगी उपक्रम राबविले जातात. गोवा कोंकणी अकादमीतर्फे कोंकणी साहित्य पुरस्कार, कोंकणी भाषा सेवा पुरस्कार अशा दोन प्रकारचे पुरस्कार दिले जातात. कोंकणी भाषा सेवा पुरस्कार विभागात कोंकणी साहित्यातील लक्षणीय कार्य केलेल्या ४० वर्षे वयापर्यंतच्या दोन व्यक्तींना प्रत्येकी १५,००० रुपयांचे, तर शणे गोंयबाब कोंकणी भाषा सेवा पुरस्कार व माधव मंजुनाथ शानभाग कोंकणी भाषा सेवा पुरस्कार हे कोंकणी भाषेच्या विविध क्षेत्रांतील बहुमोल योगदानासाठी ५० वर्षे वयापुढील व्यक्तींना प्रत्येकी २५,००० रुपयांचे रोख पुरस्कार दिले जातात. शिवाय, कोंकणी भाषेसाठी लक्षणीय काम करणार्‍या संस्थेस २५,००० रुपयांचा कोंकणी भाषा सेवा संस्था पुरस्कार दिला जातो. एकंदरीत, साहित्यसंशोधनाच्या कार्यास प्रोत्साहन देणे हाही गोवा शासनाच्या सांस्कृतिक धोरणाचा महत्त्वाचा भाग असल्याचे दिसून येते असे त्यांनी सांगितले.

गोवा शासनाच्या कला व संस्कृती संचालनालयाची कामगिरीही लक्षणीय असल्याचे सांगून डॉ० प्रभुदेसाई ह्यांनी काही तपशील पुरवले. भारतीय अभिजात संगीत, गायन, वादन, नृत्य, नाटयक्षेत्र, ‘तियात्र’ (ख्रिस्ती कलाकारांची रंगभूमी), चित्रकला, लोककला, छायाचित्रण, कोंकणी व मराठी साहित्य, कीर्तन, भजन, हस्तकला वगैरे क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी करणार्‍या गोमंतकीय नागरिकांना उत्तेजन देण्याच्या उद्देशाने संचालनालयातर्फे दरवर्षी १६ राज्य सांस्कृतिक पुरस्कार, ८ युवा सृजन पुरस्कार (नवसर्जन चेतना पुरस्कार), एक उत्कृष्ट सांस्कृतिक संस्था पुरस्कार, ६० कला गौरव पुरस्कार असे विविध पुरस्कार देण्यात येतात. शिवाय, राज्य पातळीवरील एक उत्कृष्ट वाचनालय पुरस्कार व एक उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. शासनातर्फे गोमंतकीय थोर सुपुत्र व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अणुशास्त्रज्ञ डॉ० अनिल काकोडकर ह्यांना गोमंत-विभूषण २०१० असा किताब देऊन अलीकडेच गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ० मृणालिनी शहा ह्यांनी सदर कार्यक्रमाद्वारे अतिशय उद्बोधक माहिती दिल्याबद्दल डॉ० प्रभुदेसाईंचे आभार मानले व डॉ० कल्याण काळे ह्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला.

4 चित्रा 'बी', विद्यासागर सोसायटी, बिबवेवाडी, पुणे 411 037
दूरभाष : (020)2441 1951
भ्रमणभाष : 098220 31963
ई-पत्ता : v.wordsmith@gmail.com