खानदेशातील गुर्जर बोली : काही निरीक्षणे

फुला बागुल

महाराष्ट्रातल्या खानदेशात धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांत बोलल्या जाणार्‍या विविध बोलींपैकी ‘गुर्जर’ ही एक जातनिदर्शक बोली आहे. गुर्जर ही एक शेती करणारी अत्यंत कष्टकरी, अल्पसंख्य जमात (लोकसंख्या साधारण चाळीस हजार) असून सात्त्विक प्रवृत्तीचीही आहे. कृष्णभक्तीची परंपरा या जातीत असून काही बांधव महानुभाव पंथीय तर काही बांधव स्वाध्याय संप्रदायातील आहेत. रेवा (लेवा) गुजर, दोरे गुजर, डाले गुजर, कडवा गुजर, गरी गुजर, बडगुजर, खापरागुजर या त्यांच्यातील पोटजाती आहेत. पंजाब, राजस्थान, गुजरात येथून गुर्जर अकराव्या शतकात खानदेशात स्थलांतरित झाले. विविध अभ्यासकांनी या संदर्भात पुढील अभिप्राय नोंदविले आहेत.

१) ‘‘लेवा गुजर स्वत:ला लठू राजा व त्याचे पुत्र अमसिंगत, जमादीगंत, मेहरीगंत आणि सुरादिगंत यांचे वंशज मानतात. आपण रणथंबोर (राजस्थान) येथून आल्याचे ते सांगतात. रणथंबोर येथून त्यांना राजपूत टोळ्यांनी जुनागडला हाकलून लावले. जुनागडहून ते अहमदाबादला आल्यावर त्यांच्या पाच पिढ्या तेथे नांदल्या. तेथूनही त्यांना पावागड व चंपानेर भागात हुसकावून लावण्यात आले. तेथे त्यांनी छत्तीस उपनगरांचे शहर बसविले. या बालेकिल्ल्यातूनही छप्पी राजाने त्यांना स्थानभ्रष्ट केल्यामुळे ते नर्मदेच्या खोर्‍यातील निलगड भागात विखुरले. तेथून ते नेमाडच्या पूर्वेस आले आणि करगुंदच्या भोवताली ३२ ठिकाणी वस्ती करून राहू लागले. कालांतराने करगुंद येथून २००० बैलगाड्यांच्या तांड्याने निघून त्यांनी खानदेशात प्रवेश केला. त्यांतील काही थाळनेर डोंगराच्या अलीकडे व काही असीरगड जवळील तापीच्या खोर्‍यात आले. हे स्थलांतर अकराव्या शतकातील असावे. दोरे गुजर उत्तरेकडील दर्बगड (राजस्थान) येथून अबू येथे आले. तेथून भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वरला व तेथून मंडागड आणि बडोद्याच्या दाभोई किल्ल्याला आले. तेथून पावागडकडे व मुसलमानांनी पावागड जिंकून घेतल्यावर ते तोरणमाळ डोंगररांगेत आले. तोरणमाळहून सहा गट पडून एक सुलतानपूर, दुसरा कोथळी, तिसरा धानूर, चवथा शिरपूर, पाचवा शहादा व सहावा मुस्तफाबाद (चोपडा) येथे आला.’’ (देसाई, २००६, ४०-४१)

२) ‘‘गुजर या जातीच्या नावाच्या उत्पत्तीबद्दल विद्वानात फार मतभेद आहेत. कनिंगहॅम, क्यांबेल, स्मिथ हे पाश्चात्त्य त्यांना परकीय बाह्य, युएची, शक, गूर्ग, खजर, जुजू किंवा गोरे हूण म्हणतात व आपल्या इकडील चिंतामणराव वैद्यादी विद्वान त्यांना मूळचे आर्यच म्हणतात. गुजर म्हणजे गाई राखणारा (गोचिर किंवा गौचारण) अगर गाई चोरणारा (गोचार) अशीही या नावाची व्युत्पत्ती राजकीय इतिहासकार देतात. हे परकीय बाह्य लोक ख्रि०श०च्या पहिल्या पाच शतकात इकडे आले असावेत असे वरील तर्कवाद्यांचे म्हणणे आहे.’’
खानदेशातही हे लोक आहेत. त्यांना तिकडे कुणबी अगर मराठी यांच्याप्रमाणे मानतात. तेथे हे लोक बागाईत करून भाजीपाला विकतात. त्यामुळे कदाचित भाजीबाजारास गुजरी हे नाव मिळाले असावे. हे व्यापारीही आहेत. गुजरातेत गुर्जर ब्राह्मणही आहेत. हे पूर्वी कोठले रहिवासी होते, याच्याबद्दलही वाद आहेत. पाश्चात्त्यांच्या मते बाह्य हूणांनी (गुजरांनी) हे आपले उपाध्याय आपल्याच बरोबर आणले. हल्ली हे श्रावक व इतर गुजरांचे उपाध्याय व देवळांतील पुजारी म्हणून आहेत. बुंदी, अलवारकडील रजपूत ब्राह्मण, मारवाडकडील गौड ब्राह्मण व मेर ब्राह्मण यांचा या गुर्जर ब्राह्मणांशी थोडाफार संबंध येतो. तसेच पुष्कर ब्राह्मण व गुजरातेतील नागर ब्राह्मण यांचाही या गुजर ब्राह्मणांशी संबंध आहे. नागर हे बुद्धिवान व देखणे असून, गुजरातच्या राज्यकारभारात ते गेल्या हजार वर्षांत प्रसिद्धीस आले आहेत. गुजर लोक फार धर्मभोळे असून त्यांना चारण किंवा भाट यांचा फार धाक असतो व त्यांच्याविषयी पूज्यबुद्धीही असते.’’ (केतकर, १९२५; १३१-१३२) अशा रीतीने गुर्जरांचे स्थलांतर झाले.

यांतील दोरे गुजर हे प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यात आढळतात. जवळजवळ सर्व पोटजाती या तापी किनार्‍यालगत काळ्या व सुपीक जमिनीवर वसती करीत आहेत.
नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील गुर्जरांची बोली ही गुजराती व अहिराणी यांच्याशी साधर्म्य असणारी आहे. काही प्रमाणात तिचे साम्य राजस्थानी भाषेशीही आहे. मध्ययुगात सत्ताकारणाने कराव्या लागलेल्या पंजाब-राजस्थान-गुजरात-खानदेश अशा स्थलांतरामुळे गुर्जरांच्या बोलीवर गुजराती व राजस्थानी या भाषांचा प्रभाव दिसून येतो. खानदेशातल्या प्रमुख बोलीचा म्हणजेच अहिराणीचा दाट संपर्क असल्याने अहिराणीचाही प्रभाव खानदेशातल्या गुर्जर बोलीवर पडला आहे.

प्रस्तुत निबंधात नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील गुर्जर बोलींच्या काही वैशिष्ट्यांची चर्चा करावयाची आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, नवापूर, तळोदा, नंदुरबार हे तालुके तर धुळे जिल्ह्यातील शिरपूर व शिंदखेडा या तालुका परिसरात बोलल्या जाणार्‍या गुर्जर बोलीची रूपे अभ्यासार्थ घेतली आहेत.

१) गुजराती भाषेशी गुर्जर बोलीचे निकटत्व आहे. डॉ० दिलीप पटेल यांनी आपल्या ‘गुर्जरी लोकसाहित्य’ या ग्रंथात विविध उदाहरणे देऊन या प्रभावाची चर्चा केली आहे.
‘हामना’, (आता) ‘आजे’, (आज) ‘काले’, (उद्या) ‘गई काले’, (काल) ‘आवती काले’, (परवा) ‘नाड्या’, (दोरा) ‘चाडु’, (तोंड) ‘मोशालु’, (वधूच्या मामाकडचा आहेर) ‘भंडामणु’, (नाव ठेवण्याजोगे) ‘मेंगरा’ (भाकरी) ‘ओबा’ (अरे, बापरे!) हे गुजराती शब्द जसेच्या तसे गुर्जर बोलीत प्रचलित आहेत. (पटेल १९९९; ४०)
शब्दांखेरीज वाक्यविन्यासातही हे साम्य आढळते. गुर्जर बोलीचे पुन्हा प्रांतपरत्वे पोटभेद आहेत. त्यातील पेलाडी प्रांतात बोलले जाणारे - ‘‘तूने शहादा जवुं पडशे’’ हे वाक्य गुजरातीत - ‘‘तमने शहादा जवु पडशे’’ (तुला शहादाला जावे लागले) असे होते. द्वितीयपुरुषी नामात होणार्‍या बदलाखेरीज अन्य बदल येथे दिसत नाही.
‘‘का हो भाई तमे केवा गामना?’’ हे पेलाडी प्रांतातील गुर्जर बोलीतील वाक्य गुजरातीत - ‘‘भाई तमे क्या गामना?’’ (भाऊ, तुम्ही कोणत्या गावचे?) असे उच्चारले जाते. संबोधन आणि प्रश्नार्थक सर्वनाम वगळता इतर शब्द जसेच्या तसे उच्चारले गेले आहेत.
‘‘एक राणी व्हती.’’ हे गुर्जर बोलीचे वाक्य गुजरातीत - ‘‘एक राणी हती’’ (एक राणी होती) असे होते. क्रियापदरूपातील बदल वगळता इतर शब्द समान आहेत.
गुर्जर-गुजराती भाषा निकटत्व अशा प्रकारच्या अनेक वाक्यांच्या उदाहरणांवरून दाखवता येईल.

२) हिंदी भाषिक प्रांतातील राजपुताना, मालवा, उज्जैन इ० ठिकाणी गुर्जर राजांनी आपली सत्ता स्थापन केली होती. यामुळे हिंदी भाषेचाही प्रभाव या बोलीवर पडला आहे.
धुळे, नंदुरबार प्रांतात बोलल्या जाणार्‍या गुर्जर बोलीवरील हा प्रभाव पुढीलप्रमाणे दर्शविता येतो :

गुर्जरी हिंदी गुर्जरी हिंदी

रुशी (ऋषी) रिशी बिगडु (बिघडणे) बिगडना
शहेर (शहर) शहर बठयो (बसला) बैठा
तमे (तुम्ही) तुम वऊ (सून) बहू
वात (गोष्ट) बात घबराववुं (घाबरवणे) घबराना

(पटेल, १९९९ : ३६, ३७)

हिंदीत ‘ऋ’ चा उच्चार ‘री’ असा तर गुर्जर बोलीत ‘रु’ असा होतो. अंत्य अवयव उकारांत उच्चारायची सवय गुर्जर बोलीत दिसते.
उदा० बिगडु, (बिघडणे) रखडु, (रखडणे) लिखनु (लिहिणे)
हिंदीतील ‘शहर’ गुर्जर बोलीत ‘शहरे’ असे उच्चारले जाते. येथे उपान्त्य अवयव एकारान्त होतो. ‘ब’ या वर्णाऐवजी ‘व’ हा वर्ण (उदा० बात - वात) योजण्याची गुर्जरांची भाषिक सवय येथे दिसते.

३) खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार या तीनही जिल्ह्यांत अहिराणी ही प्रमुख बोली बोलली जाते. खानदेशातल्या गुर्जरांचा विविध कारणांनी दैनंदिन संपर्क अहिराणी बोलीभाषकांशी येतो. यातून अहिराणीचा प्रभाव गुर्जर बोलीवर पडला आहे.
टोमं (वेताची मोठी टोपली), वांगा (वांगे), मक्की (मकई), पयकाठ्या (कापसाची काडी), सरा (पीक काढल्याची नंतरची वेचणी), खेत (शेत), मिरच्या (मिरची), माडी (आई), माटी (माती), वराडी (वर्‍हाड), देर (दीर), जेठ (नवर्‍याचा मोठा भाऊ), चीडी (चिमणी), डांगर (टरबूज), हजामत (डोई करणे), परतन (शेती मोजण्याचे एकक), खंगाळ (धुणे), नयडं (गळा), रंगत (रक्त), हाड्या (कावळा), हेला (रेडा), शिंगडा (शिंग), धांड्या (तरुण बैल), वऊ (सून), धयडा (म्हातारा), यांसारखे कितीतरी शब्द अहिराणीकडून गुर्जरांनी स्वीकारले आहेत. विशेषत: कृषिजीवनाशी संबंधित नांगर, वख्खर, दुसेर यांसारखे अहिराणीतील शब्द गुर्जरांनी स्वीकारले आहेत. तसेच गुर्जर बोलीतील डिकरा (पुतण्या), उपादी (ब्याद) यांसारखे शब्द अहिराणीने स्वीकारले आहेत.

४) गुर्जर बोलीवर गुजरातीचा प्रभाव असल्याने त्यांच्या बोलीत ‘ऑ’, ‘अ‍ॅ’ हे (इंग्रजीकडून घेतलेले) स्वर आढळत नाहीत. ‘ऑ’ ऐवजी ‘ओ’ आणि ‘अ‍ॅ’ ऐवजी ‘ए’ अशी स्वरांची उच्चारण रूपे ते योजतात.
उदा० ऑफिस - ओफिस
मॅडम - मेडम
बँक - बेंक
बॉलर - बोलर
गुजराथी भाषेतही ‘ऑ’, ‘अ‍ॅ’ हे स्वर नाहीत.

५) गुर्जर बोली भाषक ‘च’, ‘ज’ या तालव्य आणि दंतमूलीय अशा दोन्ही प्रकारे उच्चारल्या जाणार्‍या ध्वनींचे केवळ तालव्य उच्चारण करतात. दंतमूलीय ‘ज’ व ‘च’ चे उच्चारण त्यांच्यात आढळत नाहीत.
उदा० मराठी गुर्जर
जात (ज - दंतमूलीय) जात (ज-तालव्य)
चुगली (च-दंतमूलीय) चुगली (च-तालव्य)

६) गुर्जर बोलीत अंत्य अवयव ओकारान्त उच्चारले जातात.
उदा० नवरो (नवरा), धयडो (म्हातारा), दादरो (जिना), खराटो (खराटा), खाटलो (बाज).
७) धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील गुर्जर बोलीचे प्रांतनिहाय पुन्हा पोटप्रकार पडतात. डॉ० दिलीप पटेल यांनी ‘तापी थडी’, ‘गोमती थडी’, ‘भरवाडी’, ‘पेलाडी’ अशा चार प्रकारांत या बोलीचे वर्गीकरण केले आहे. या वर्गीकरणाचा आधार स्पष्ट करताना ते लिहितात - ‘‘इस प्रकार गुर्जरी बोली के तापी थडी, गोमती थडी, भरवाडी तथा पेलाडी चार भाषायी भेद स्पष्ट है। गुर्जरी बोली के भाषायी भेद स्पष्टत: देखने के लिए शब्दावली की विभाजक रेखा मानी गयी है। स्थूलरूप से वाक्यविन्यास तथा बोलने के लहजों को आधार मानकर हम विभाजन कर रहे हैं।’’

तापी थडी गोमती थडी भरवाडी पेलाडी

वांदरु (माकड) व्हांदरु वानरु वांधरु
भिवानु (घाबरणे) डरवानु डरवानु डरवानु
खाटलो (बाज) खट्यारु खाटलो खाटलु
हादणी (खराटा) खट्टो खराटो खट्टो
बुढ्ढो (म्हातारा) धयडो धयडो डोसो

(पटेल, १९९९ : ४२, ४३)

अशा रीतीने अगदी ६० मैलांच्या परिसरातही असे पोटभेद नजरेस पडतात. या पोटभेदांचे कारण प्रस्तुत अभ्यासकाच्या मते असे आहे की, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात बोलल्या जाणार्‍या गुर्जर बोलीचे शहादा (जि० नंदुरबार) हे केंद्र आहे. या केंद्राच्या आजूबाजूचा ६० मैलांचा परिसर हा या बोलीचे क्षेत्र मानता येते. या बोलीक्षेत्राला लागून दोन सीमाप्रदेश येतात. शहादा या केंद्रापासून खेतिया हे मध्यप्रदेशातील मोठे गाव अवघे १२ कि०मी०वर आहे तर नवापूर या गुर्जर बोली क्षेत्रापासून उच्छल हे गुजरातचे तालुक्याचे शहर अवघ्या ४ कि०मी०वर आहे. यामुळे ‘गोमती थडी’ या प्रांतातील गुर्जरी बोलीचे साम्य हिंदीशी तर ‘पेलाडी’ या प्रांतातील गुर्जरी बोलीचे साम्य गुजरातीची आहे.

‘भरवाडी’ या प्रांतातील गुर्जरी बोलीत ‘बारु’, ‘ज्युनो’, ‘बेनझु’, ‘इनभी’ ही उद्गारके योजिली जातात. (या उद्गारकांना तसा विशिष्ट अर्थ नाही.) ‘तापीथडी’ या प्रांतातील गुर्जर बोलीत ‘लेवा’ (घेणे), ‘देवा’ (देणे), ‘करवा’ (करणे), ‘जवा’ (जाणे), ‘खावा’ (खाणे), ‘फुलकाई’ (फुलवणे), ‘डामराई’ (दाखवेगिरी करणे) या विशेष शब्दांचा बहुलतेने वापर होतो. ‘गोमती थडी’ या प्रांतात ‘कुचालु’ (कुचाळक्या), ‘दांगडो’ (गोंधळ), ‘गाडची’ (गाडी), ‘टिपरा’ (गरबा नृत्यातील दांडिया) या विशेष शब्दांचा वापर होतो. तर पेलाडी प्रांतात - ‘राते’ (रात्री), ‘डायो’ (म्हातारा), ‘चोमासो’ (चतुर्मास), ‘डाचु’ (तोंड) या विशेष शब्दांचा वापर होतो, असे डॉ० पटेल यांनी म्हटले आहे.

८) या बोलीक्षेत्रात गुर्जर खर्दे ता० शिरपूर येथे तसेच तालुक्यातील भरवाडे, टेकवाडे, चांदपुरी, वरुळ, अर्थे या गावातील बहुसंख्य गुर्जर बांधव महानुभाव संप्रदायाशी निगडित आहेत. हा भरवाडी प्रांत होय. या प्रांतातील गुर्जर खुर्दे या गावात महानुभावियांचे मठ आजही आहेत. या प्रांतातील बोलीत येणारा ‘चाटे’ (मुले) हा शब्द लीळाचरित्रात विशेषत: स्वामींच्या ‘केलिक्रीडा’ या प्रकारच्या लीळांत पुन:पुन्हा येतो. या अंगाने महानुभाव संप्रदाय आणि गुर्जर बोलीचे क्षेत्र यांचा अनुबंध तपासता येऊ शकतो.
गुर्जरीचे व्याकरण
१) गुर्जरीत ‘ने’, ‘नो’, ‘नी’, ‘नु’ ही षष्ठी विभक्तीची प्रत्ययरूपे येतात.
उदा० रमेशने, पाणीनो, पटेलनी, मातानु
२) गुर्जरीत उकारान्त शब्दांचे प्राबल्य आढळते.
उदा० दऊ (देणे), जाडु (जाड), दळु (दळणे), आधु (अर्धे), सुन्नु (सोने), जमाडु (जेवण देणे).
३) क्रियापदांना ‘जो’ हा आदेशात्मक प्रत्यय लावण्याची रीत दिसते.
उदा० पाडजो, (पाड) वगाडजो, (वाजव) आवजो, (ये) जजो (जा)
४) जेवी-तेवी, जेवु-तेवु (जशी-तशी जसे-तसे) ही संकेतवाचक उभयान्वयी अव्यये योजली जातात.
५) प्रमाणमराठीतील ‘ला’, ‘त’ या द्वितीया व सप्तमीच्या प्रत्ययांऐवजी अंत्य प्रत्यय एकारान्त उच्चारले जातात. प्रत्यय लावण्याकडे गुर्जरीचा कल दिसत नाही.
उदा० हाते (हाताला), मळे (मळ्यात), आखे (डोळ्यात), गळे (गळ्यात), घेरे (घरात)
६) ‘स’ हा प्रत्यय लावून भविष्यकाळी क्रियापदे बनवली जातात.
उदा० लाईस (आणणार), खाईस (खाणार), देईस (देणार).
७) गुर्जरीत क्यारे (केव्हा), केवा (कसा), केम (का), क्या (कुठे), सु (काय) ही प्रश्नार्थक सर्वनामे येतात.
गुर्जरांचा राजकीय इतिहास हा पराक्रमाचा, राजसत्तेचा इतिहास आहे. स्थलांतर कराव्या लागलेल्या जमातीच्या अडचणी, व्यथा, सोसणारा हा समूह आहे. भाषिक अंगाने पाहू जाता या बोलीला स्थलकालपरत्वे भाषिक आक्रमणेही पचवावी लागली आहेत. या बोलीचा सविस्तर अभ्यास होण्याची गरज ही सांस्कृतिक गरज म्हटली पाहिजे. दुर्दैवाने अजूनही ही बोली उपेक्षित आहे. समूहाच्या विकासात भाषिकसत्ता निर्णायक ठरते. तशी ती न लाभल्याने या समूहाचा म्हणावा तसा विकास झाला नाही. डॉ० वरखेडे यांनी भाषिक सत्तेचे महत्त्व विशद करताना म्हटले आहे की, ‘‘अर्थात ज्या समाजात परिश्रमी कार्यकर्ते, साहित्यिक, विचारवंत, व्यापारी साहसी व्यक्ती, आणि संशोधक असतात त्याच समाजाची भाषा विस्तार पावते. एकूण विकासात भाषिक सत्तेचा वाटा फार मोठा असतो, हे निर्णायक सत्य समाजभाषाविज्ञानातून पुढे आले आहे. आपल्या राज्यघटनेनुसार भाषिक अल्पसंख्याकांची भाषा वाचवणे, तिच्या अभिव्यक्तीला वाव देणे आणि भाषिक अडथळ्यांमुळे भाषागटाच्या विकासाच्या संधी हिरावल्या जाऊ नयेत, याची दक्षता घेणे; हे लोकशाही राज्याचे वैधानिक कर्तव्य आहे. याचे कारण भाषा हे केवळ संपर्क-माध्यम नसून ते एक सांस्कृतिक मूल्य आहे, हा विचार.’’ (वरखेडे २००६; ३२९)
गुर्जरी बोलीची उपेक्षा थांबावी, अभ्यासकांचे समतोल व न्याय्य दृष्टिक्षेप या बोलीच्या सामर्थ्यावर पडावेत; ही अपेक्षा उचित ठरू शकेल.

संदर्भ :
केतकर, डॉ० श्री०व्यं० महाराष्ट्रीय ज्ञानकोश विभाग १२. महाराष्ट्रीय ज्ञानकोश मंडळ, नागपूर, १९२५.
देसाई, डॉ० बापूराव (संपा०), महाराष्ट्रातील समग्र बोलींचे लोकसाहित्य-शास्त्रीय अध्ययन. अनघा प्रकाशन, ठाणे, २००६.
देसाई, डॉ० बापूराव, ‘गुर्जरी बोली’ समाविष्ट - देसाई, डॉ० बापूराव (संपा०) २००६.
पटेल, डॉ० दिलीप, गुर्जरी लोकसाहित्य. गुर्जरी समाज साहित्य विद्यामंदिर, जयपूर, १९९९.
वरखेडे, डॉ० र०ना०, ‘भाषा आणि बोली’ परिसरलक्ष्यी व समाजलक्ष्यी दृष्टिकोन समाविष्ट - देसाई, डॉ० बापूराव (संपा०) २००६.