कवितेची भाषा

प्र०ना० परांजपे

'रत्नाकर' मासिकाच्या जुलै १९२९ अंकामध्ये पृष्ठ ५०२वर (म्हणजे पृ०२वर, कारण पानांना जानेवारी ते डिसेंबरपर्यंत सलग क्रमांक देण्याची 'रत्नाकर'ची पद्धत होती.) अनंत काणेकरांची 'आला खुशीत् समिंदर' ही कविता प्रसिद्ध झाली आहे. कवितेच्या तळटीपेत काणेकरांनी म्हटले आहे की, 'समिंदर...सारख्या एखाद्या रांगड्या शब्दाचा मधून मधून उपयोग फक्त गाणे कोळ्याचे आहे हा भास कायम ठेवण्यापुरताच केलेला आहे.' याचा अर्थ असा की कवितेत 'रांगडे' शब्द वापरू नयेत असा संकेत रूढ होता. आज शब्दच काय संपूर्ण कविता आणि कवितासंग्रह 'रांगड्या' भाषेत लिहिले जात आहेत.

काणेकरांच्या कवितेचे विश्लेषण बा०सी० मर्ढेकरांनी आपल्या 'वाङ्मयीन महात्मता' (१९४१) या निबंधात केले आणि त्या कवितेत 'लेखनगर्भ आत्मनिष्ठे'चा अभाव असल्याचे दाखवून दिले. कवितेची भाषा, कवितेत व्यक्त होणाऱ्या अनुभवातून उमलायला हवी, ती वरून लादता येत नाही असे मर्ढेकरांचा सिद्धांत सांगतो. कवितेची भाषा बदलते तेव्हा कवितेच्या अंतरंगात - म्हणजे कवीच्या अनुभवात व त्या अनुभवाकडे पाहाण्याच्या कवीच्या दृष्टिकोनात - बदल झालेला असतो. किंवा असे म्हणता येईल की कवितेच्या अंतरंगात बदल झाला असेल तरच कवितेच्या भाषेतील बदल समर्थनीय ठरतो; अन्यथा तो उपरा, कृत्रिम व अल्पजीवी ठरतो.

कवितेच्या भाषेत झालेल्या बदलांची काही उदाहरणे पाहिली तर हा मुद्दा स्पष्ट होईल. १७९८मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'लिरिकल बॅलड्स' या वर्डस्वर्थच्या कवितासंग्रहाने इंग्रजी कवितेत क्रांती घडवली. त्या संग्रहाच्या १८०० साली प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या आवृत्तीला जोडलेल्या प्रस्तावनेत ('प्रिफेस') वर्डस्वर्थने आपल्या दृष्टिकोनाचे विवेचन केले. तेव्हापासून इंग्रजी कवितेत रोमँटिसिझमचे युग सुरू झाले.

मराठी कवितेत अशी क्रांती केशवसुतांनी घडवली. 'काठोकाठ भरू द्या पेला', 'आम्ही कोण म्हणूनी काय पुसता', 'सतारीचे बोल' इ० कवितांनी कवितेच्या आशयाबद्दलच्या तोपर्यंत रूढ असलेल्या संकल्पनांचा धक्का दिला. आशयाप्रमाणे कवितेच्या रूपातही बदल घडून आले. सुनीतासारखा नवा पद्यबंध आला. झपूर्झासारखे नवे शब्द आले. आणि मराठीतही रोमँटिसिझमचा उदय झाला. या सर्वांच्या मुळाशी तत्कालीन सामाजिक व राजकीय परिस्थिती होती. न्यायमूर्ती रानडे, गोखले, टिळक, आगरकर यांनी घडवून आणलेली राजकीय जागृती, दुष्काळ, प्लेग सारखी संकटे, महात्मा फुले, आगरकर, महर्षी कर्वे यांच्या प्रयत्नांतून सुरू झालेला शैक्षणिक व सामाजिक सुधारणांचा रेटा यांमुळे 'जुने जाऊ द्या'चे वारे वाहात होते. त्यामुळे सामाजिक जीवनातील बदल कवींच्याही मनोवृत्तीवर आघात करत होते.

दुसर्याआ महायुद्धामुळे १९४०नंतर सामाजिक जीवनात मूलभूत बदल घडून आले. शहरांकडे लोटणारे लोंढे, गिरण्यांमुळे वाढलेला कामगारवर्ग, महागाई, अर्थार्जनासाठी बाहेर पडलेल्या मध्यमवर्गीय स्त्रिया, 'चले जाव'ची चळवळ, गांधींजींचे नेतृत्व, डॉ० आंबेडकरांच्यामुळे मागासवर्गीयांत झालेली जाणीवजागृती, आणि सामान्य माणसांचे सुरू झालेले अमानुषीकरण यांमुळे कवींच्या, निर्मितीशील कलाकार व साहित्यिकांच्या जगाकडे, जीवनाकडे व कलेकडे पाहाण्याच्या दृष्टिकोनात बदल झाला. शब्दांच्या 'रांगडे'पणाकडे पाहाण्याची दृष्टी बदलली. हे बदल मर्ढेकरांच्या 'नव'कवितेतून (आणि गाडगीळ-माडगूळकर-गोखले इत्यादींच्या 'नव'कथेतून) व्यक्त झाले. 'टांग', 'टिर्र्यात', 'फलाट', 'कांदेवाडी', 'बेकलाइटी' असे शब्द कवितेत आले. मर्ढेकरांच्या कवितेने रोमँटिसिझम नाकारला आणि आधुनिकतावाद, वास्तवतावाद आणि मानवतावाद स्वीकारला. पादाकुलकसारखे साधे, ओघवते मात्रावृत्त स्वीकारले.
मर्ढेकरांनंतरची कविता अतिशय प्रयोगशील झाली. ती मुक्तछंदातून, संवादलयीतून प्रकट होऊ लागली. अरुण कोलटकर, दिलीप चित्रे, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ इत्यादींनी कवितेच्या आशयात अस्तित्ववाद, अतिवास्तववाद, साम्यवाद यांच्या जीवनधारणेतून होणारे दर्शन मांडले. कवितेच्या सर्व घटकांमध्ये प्रयोग केले आणि कवितेची भाषा आणि लोकभाषा, व्यवहारभाषा यांमधील अंतर पुसून टाकले.
१९९०नंतरच्या कवितेने कवितेच्या भाषेबद्दलच्या वाचकाच्या अपेक्षा नाकारल्या, सभ्यतेची बंधने झुगारून दिली, आणि दुर्बोधतेच्या कक्षा विस्तारल्या असे म्हणता येईल. हेमंत दिवटे, संजीव खांडेकर, सचिन केतकर, सलील वाघ इत्यादींच्या कविता वाचकांना धक्के देत आहेत.

मराठी अभ्यास परिषदेच्या या वर्षाच्या वर्धापनदिनाच्या (एक मे) कार्यक्रमात 'कवितेची बदलती भाषा' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. परिसंवादात वाचल्या गेलेल्या निबंधांतील तीन निबंध या अंकात समाविष्ट करण्यात आले आहेत. उरलेले दोन निबंध हातात आले की तेही पुढील अंकांत प्रसिद्ध होतील.