अरबी - मराठी

उज्ज्वला रेगे

सुरुवातीच्या दिवसांत एकदा मी बायकांच्या ओपीडीत एका पेशंटला तपासलं. त्यानंतर ती कपडे, अबाया चढवत होती. खुर्चीवर काढून ठेवलेल्या तिच्या काळ्या शेल्याकडे बोट दाखवून ती मला म्हणाली,

"आतोनी शेला. (दे मला शेला)"

मी दचकले. ही बेदू बाई मला समजावं म्हणून शेला शब्द वापरते आहे का? हिला कसा कळला मराठी शब्द? माझं गांगरणं तिच्या लक्षात आलं. पण तिला वाटलं की मला शेला या शब्दाचा अर्थ कळला नाही. समजावणीच्या सुरात तिने सांगितलं.

"त्या खुर्चीवर ते जे काळं कापड आहे ना माझं पांघरायचं, त्याला अरबीत शेला म्हणतात."

पण तेव्हापासून मी कान टवकारले. तेव्हा "दुकान, सैल, कंदील, मंदील" हे शब्द रोजच्या संभाषणात सर्रास ऐकू आले. खद्रातली लहान मुलं आपल्या वडलांना आमच्या मुलांसारखीच, "बाबाऽऽ" अशीच हाक मारत हे लक्षात आलं. 'मरवा, ऊद, अत्तर' हे सुगंधी शब्द सापडले. 'व' या उभयान्वयी अव्ययाने तर अगदी 'हे' व 'ते' अशा थाटात खुद्रा व मुंबई जोडून टाकली.
राशीद अश्शम्मरीने रागारागाने मला 'तंबी' दिली. मी त्या तंबी शब्दावर खूश झाले म्हणून तो आणखीच रागावला. पण मग 'खुलासा' केल्यावर तो 'खजील' झाला. याखेरीज मला 'मुद्दत, फुरसत, हरकत' या मराठी शब्दांच्या त्याच अर्थाच्या 'मुद्दा, फुरसा, हरका' या चुलतबहिणी तोंडवळ्यावरून ओळखता आल्या. 'वार'भर कापडाचा 'हिसाब' आणि रोज 'रतलाचा रतीब' हे ऐकून तर मन आजोळी, बाळपणात जाऊन पोचलं. 'मनुका' खात खात मी 'कंसा'तला 'मजकूर' वाचला. मग 'इभ्रत, इलाखा, कपार, कनात, कयास, कसब, कायदा, कुवत, पुण्याच्या कसबा पेठेतला कसबा (= शहराचा जुना भाग), खंदक,' असे माहेरचे पाठीराखे जिथेतिथे भेटायला लागले.

उर्दू-हिंदीच्या मध्यस्थीशिवाय मराठीशी थेट ऋणानुबंध साधणार्‍या अशा कित्येक फारसी शब्दांनी माझं स्वागत केलं. मग अरबी बोलायच्या प्रयत्नात जेव्हा जेव्हा एखादा शब्द अडला तेव्हा तेव्हा मी मराठी शब्द दडपून दिला. आणि कित्येक ठिकाणी तो खपूनही गेला. अरबी ही माझ्या मायमराठीशी नातं जोडणारी, माझी मामी*च, मला त्या दूरच्या देशात नव्याने लाभली.

(*मावशी म्हटलं असतं. पण मराठी IndoEuropean आणि अरबी AfroAsiatic. त्यामुळे या दोन भाषा एका वंशातल्या नाहीत.)

'सोन्याच्या धुराचे ठसके', पृ० १११-११२