अठरा विश्वे

(१)

शं० दे० पसारकर

'अठरा विश्वे' या शब्दप्रयोगाविषयी डॉ० ब्रह्मानंद देशपांडे यांचा लेख (भाषा आणि जीवन, पावसाळा २००९), आणि त्यावरील श्री०न० गुत्तीकर (हिवाळा २०१०) व विजय पाध्ये (उन्हाळा २०१०) यांच्या प्रतिक्रिया वाचल्या. याविषयीची जुनीच माहिती या ठिकाणी जिज्ञासू वाचकांसाठी नव्याने देत आहे.

'इसा' म्हणजे वीस वीस या संख्येचे गट (जोशी प्र०न० १९८२ : आदर्श मराठी शब्दकोश. विदर्भ मराठवाडा बुक कंपनी, पुणे ६७). या शब्दाचे कृत्रिम संस्कृतीकरण म्हणजे 'विश्व'. 'गुंडम राउळ' यांना 'गोविंदप्रभू' किंवा 'अक्कलकोट' या गावाला 'प्रज्ञापूर' संबोधणे, अशापैकीच हा प्रकार. 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)

डॉ० नरेंद्र जाधव आपल्या आईविषयी सांगतात,"मातोसरींचा पैशांचा हिशोब हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. खरे म्हणजे तिला विसाच्या पुढे मोजता येत नाही. शंभर म्हणजे पाच 'इसा' असे तिचे गणित असते" (जाधव नरेंद्र २००७ : आमचा बाप आन् आम्ही, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई ४६).

मी माझ्या बालपणी विदर्भातील माझ्या खेडेगावात 'एक इसा, दोन इसा, तीन इसा' अशा पद्धतीने नाण्यांचे ढीग करून पैसे मोजणारी माणसे पाहिली आहेत.

'उषास्वप्न'
126 ब, मार्कंडेय नगर, सोलापूर 413 003
दूरभाष : (0217)260 2301
भ्रमणभाष : 094207 80570

(२)

शकुन्तला फडणीस

अठरा विश्वे याबद्दल श्री० विजय पाध्ये यांचे टिपण वाचले. ('भाषा आणि जीवन' - उन्हाळा, पृ० ७४) मी भाषाशास्त्राची अभ्यासक नाही. तरीही अठरा विश्वेचा आणखी एक अर्थ सांगावासा वाटतो.

श्री० शं०ना० नवरे यांना 'गदिमा पुरस्कार' मिळाला त्यावेळच्या भाषणात शं०ना० म्हणाले होते -"शब्द वापरताना नेमका अर्थ माहीत असला पाहिजे. 'अठरा विश्वे दारिद्रय' हे शब्द वापरताना अठरा विश्वे कोणती याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून अठरा विसावे म्हणजे १८ गुणिले २० म्हणजे वर्षातील ३६० दिवस असलेले दारिद्रय हा अर्थ सापडला. प्रत्येक शब्दाची ओळख व्हावी असे मला वाटते. शब्दकोश पाहतो."

शं०नां०चे वरील विवरण 'मेहता मराठी ग्रंथजगत', जाने० २००९ या अंकात पृ०८९ वर प्रकाशित झाले आहे. अठरा विश्वे हे दोन शब्द नेहमी दारिद्रय या शब्दाला चिकटून येतात इतकेच मला माहीत आहे.

1233, शुक्रवार पेठ, सुभाषनगर, रस्ता क्र० 4, पुणे 411 002
दूरभाष : (020)2447 2232