हिवाळा २०११

संपादकीय: सार्वजनिक कार्यक्रमांतील भाषेचा वापर

नीलिमा गुंडी

अलीकडे महाराष्ट्रात तऱ्हेतऱ्‍हेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे पेव फुटले आहे. सन्माननीय अपवाद वगळता या कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या भाषेच्या वापराविषयी नाराजी व्यक्त करणे गरजेचे वाटते.

या कार्यक्रमांची सुरुवात बहुधा शारदास्तवनाने होते. सुरुवातीला जर 'या कुन्देन्दुतुषारहारधवला' या संस्कृत श्लोकाचे गायन असेल, तर त्यातील 'या शुभ्रवस्त्रावृता'चे अनेकदा 'या शुभ्रवस्त्रामृता' असे उच्चारण होते. आणि 'जय शारदे वागीश्वरी' हे शांता शेळके यांचे गीत असेल, तर त्याचे उच्चारण बऱ्याचदा 'जय शारदे वागेश्वरी' असे कानी पडते. अशा वेळी श्रोत्यांची सहनशीलता हीच त्यांच्या रसिकतेची कवचकुंडले ठरतात.

जाहीर कार्यक्रमात अनौपचारिक संवाद साधण्याची रीत हल्ली लोकप्रिय होत आहे. मात्र अनौपचारिक कशाला म्हणायचे, हा प्रश्नच आहे. अनौपचारिक संवादात खरे तर भाषाविवेक न गमावलेली सहजता अपेक्षित असते. तशा सहज प्रसन्न भाषेचा वावर हल्ली दुर्मिळ होऊ लागला आहे. भाषेचा नेटका, नेमका वापर करण्यातून सांस्कृतिक श्रीमंती व्यक्त होत असते. मात्र जाहीर कार्यक्रमात प्रत्यक्षात घडते ते असे : प्रत्येक वक्ता आपल्या भाषणापूर्वी व्यासपीठावरील सर्वांची लांबचलांब विशेषणे वापरून नामावली घेण्याची औपचारिक परंपरा अजिबात सोडत नाही. प्रत्येक निमंत्रितामागे श्री०/श्रीमती/प्रा०/डॉ० अशा उपाधी हव्यातच, अशी सर्वसाधारण समजूत दिसते. त्यामुळे कार्यक्रमात अनेकदा काहींना 'डॉक्टरेट' ही पदवी बहाल होत असते. 'पद्मश्री', 'पद्मभूषण' हे किताब उपाधीसारखे वापरायचे नसतात, या संकेताचेही सहज उल्लंघन होत असते.

अनौपचारिक शैलीत पाहुण्यांचा परिचय करून देणारा वक्ता पाहुण्यांशी आपले फोनवरून कधी नि कोणते संभाषण झाले, पाहुण्यांशी आपली पहिली गाठभेट कशी झाली, त्या वेळी त्यांनी आपले आदरातिथ्य कसे केले, अशी साग्रसंगीत ओळख जाहीरपणे करून देतो. मनात येणारा प्रत्येक विचार कसलाही आडपडदा न बाळगता श्रोत्यांना तत्काळ सांगून टाकणे म्हणजे अनौपचारिक बोलणे, अशी काहींची समजूत असते. यामध्ये काही वेळा पाहुण्यांचे महत्त्वाचे कार्यकर्तृत्व सांगायचेच राहून जाते! याउलट औपचारिकपणे ओळख करून देणाऱ्याचा मार्ग दुसऱ्या टोकाचा असतो. तो म्हणजे पाहुण्यांनी दिलेला 'बायोडेटा' यांत्रिकपणे वाचून दाखवण्याचा! त्यामुळे पाहुण्यांचा जन्म कोठे झाला, त्यांना प्राथमिक शाळेत कोणती बक्षिसे मिळाली... इथपासून आजपर्यंतचे त्यांचे सारेच कर्तृत्व जाहीर केले जाते. अशा वेळी शहाणा पाहुणा संकोचून जातो. या परिचयप्रसंगी पाहुण्यांचे नावच न आठवणे, ते चुकीचे उच्चारले जाणे इत्यादी विविध प्रसंगनिष्ठ विनोद कधी कधी घडत असतातच. व्यासपीठावर उभे राहून बोलताना पूर्वतयारीशिवाय बोलल्यावर ते भाषण आपोआप उत्स्फूर्त आणि सहज ठरते, अशी (गैर)समजूत त्यामागे असते.
या कार्यक्रमांमध्ये सर्वांत अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे त्यातील काही सूत्रसंचालकांनी भाषेचा मुक्तपणे केलेला वापर ही होय. सूत्रसंचालक हे जणू शब्दजीवी पात्र असते. या 'सुसूत्र' पात्राचा व्यासपीठावरील संचार गेली काही वर्षे अनिर्बंधपणे सुरू आहे. पूर्वी संगीताच्या कार्यक्रमांना निवेदक असत. गायकांना कार्यक्रमात मध्येमध्ये विश्रांती मिळावी आणि गीतकार, संगीतकार, इत्यादींची माहिती श्रोत्यांना व्हावी म्हणून निवेदकाने भाष्य करणे योग्य असते. पण आता कोठल्याही कार्यक्रमांना-चर्चासत्रांनाही-सूत्रसंचालक असतोच. एकेकाळी निवेदक व्यासपीठावरील जागा न अडवता कार्यक्रमाची सूत्रे सांभाळण्याचे काम अदबीने करीत असे. आता मात्र सूत्रसंचालक ही सर्वांत मोठी असामी असते. सूत्रसंचालकाचा भूतलावरचा वावर आता त्रिखंड हिंडणाऱ्या नारदाशीच तुलना करण्याजोगा ठरावा! (हल्ली लग्नसमारंभातही सूत्रसंचालक संचार करू लागला आहे!)

सतत बोलत राहणे (तेही लाडिकपणे!) आणि ऊठसूट श्रोत्यांकडून टाळ्यांची मागणी करणे, हे आपले काम असल्याची सूत्रसंचालकाची प्रामाणिक समजूत असते. अशा वेळी वाटते, एखाद्या उत्तम कलाविष्कारानंतर सभागृह क्षणभर अवाक् होते, हीदेखील कार्यक्रमाविषयी अनुकूल प्रतिक्रिया देण्याची प्रगल्भ रीत असू शकते, यावर आता आपला विश्वासच उरला नाही का? सूत्रसंचालकामुळे काव्यवाचनाच्या कार्यक्रमात काही वेळा एकाच वेळी दुहेरी मैफल चालू राहते. एक मैफल असते प्रत्यक्ष उपस्थित असणार्या कवींच्या कवितांची आणि दुसरी असते प्रत्येक कवीनंतर सूत्रसंचालक वाचून दाखवत असलेल्या कवितांची! पूर्वी रविकिरण मंडळाच्या काळी जेव्हा काव्यगायनाच्या जाहीर कार्यक्रमांना मागणी होती, तेव्हा आवाज नसलेल्या गायक कवींची श्रोत्यांनी व्यासपीठावरून सदेह उचलबांगडी केल्याच्या वार्ता वाचायला मिळत. त्यामानाने सूत्रसंचालकांच्या लीलांविषयी आजचा रसिकवर्ग फारच सोशिक व उदार दिसतो आहे!

कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानण्याचा उपचार असतो. आपण कार्यक्रमपत्रिकेत 'आभारप्रदर्शन' असे म्हणून मुळातच 'प्रदर्शना'ला वाव ठेवलेला असतो. त्यामुळे निरर्थक शब्दांचे बुडबुडे कानी पडतातच! हल्ली बोली भाषेतील एकारान्त शब्दाऐवजी अनुस्वारान्त शब्द वापरण्याची लकब आभारप्रदर्शनातही दिसू लागली आहे. त्यामुळे कधी कधी 'यांचे आभार' याऐवजी 'यांचं आभार' असा शब्दप्रयोग कानी पडतो. [आणि कार्यक्रमाच्या अखेरीस पसायदान असले तर त्यामध्ये 'दुरिताचे तिमिर जावो' (पापकृत्याचा, पापाचा अंधार दूर होवो) याऐवजी हटकून 'दुरितांचे तिमिर जावो' असे ऐकू येते!] अशा वेळी वाटते, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कसे बोलावे (खरे तर कसे बोलू नये!) हे शिकविणारे अल्प मुदतीचे अभ्यासक्रम चालू करण्याची नितांत गरज आहे. शब्दांचे अवमूल्यन ही सांस्कृतिकदृष्ट्या चिंताजनक बाब असते. त्या बाबीकडे वेळीच गंभीरपणे पाहायला हवे. नाहीतर 'औचित्याची ऐशीतैशी' अशी परिस्थिती सार्वजनिक भाषावापराबाबत सार्वत्रिकच होईल.

अभिनंदन, भाषावार्ता, आदरांजली

अभिनंदन
या वर्षीचा मराठी ग्रंथासाठी असलेला साहित्य अकादमी पुरस्कार डॉ० अशोक रा० केळकर यांच्या 'रुजुवात' (लोकवाङ्मय गृह प्रकाशन, मुंबई) या ग्रंथास मिळाला आहे. पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये व प्रमाणपत्र असे आहे. पुरस्कारवितरणाचा कार्यक्रम फेब्रुवारी २०११ मध्ये होईल. डॉ० केळकरांचे मन:पूर्वक अभिनंदन! [या ग्रंथाचे डॉ० सीताराम रायकर यांनी लिहिलेले परीक्षण 'भाषा आणि जीवन'च्या दिवाळी २००९ (वर्ष २७, अंक ४) या अंकात प्रसिद्ध झाले आहे.]

महाबँक भाषाविषयक लेखन पुरस्कार
मराठी अभ्यास परिषदेच्या वतीने व महाराष्ट्र बँकेच्या सहयोगाने मराठीतील सर्वोत्कृष्ट भाषाविषयक लेखनासाठी दिल्या जाणार्यात महाबँक पुरस्कारासाठी (२०१० या वर्षासाठी) एल०के० कुलकर्णी यांनी तयार केलेल्या 'भूगोल कोश' या पुस्तकाची (राजहंस प्रकाशन, पुणे) निवड करण्यात आली आहे. (पुरस्कार-वितरणाचा कार्यक्रम जानेवारी २०११ मध्ये होईल.) श्री० एल०के० कुलकर्णी व राजहंस प्रकाशन यांचे अभिनंदन!
या पुरस्कारासाठी डॉ० सोनाली कुलकर्णी, डॉ० कलिका मेहता आणि डॉ० मृणालिनी शहा (निमंत्रक) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

आदरांजली
 डॉ० सुभाष भेंडे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, कादंबरीकार, विनोदकार, कीर्ती महाविद्यालयातील निवृत्त अर्थशास्त्र-विभाग प्रमुख आणि विश्वकोशाचे अतिथी संपादक होते. मराठी अभ्यास परिषदेचे ते सभासद होते आणि 'भाषा आणि जीवन'साठीही त्यांनी लेखन केले होते.
 ज्ञानेश्वर नाडकर्णी नाटयसमीक्षक, कलासमीक्षक, इंग्रजी व मराठी ह्या दोन्ही भाषांत लेखन करणारे पत्रकार होते. त्यांचा 'चिद्धोष' हा कथासंग्रह त्यांच्या संवेदनाक्षम लेखनाचा प्रत्यय देतो.
'भाषा आणि जीवन'च्या परिवारातर्फे या दोन्ही मान्यवरांना आदरांजली.

अनुक्रमणिका

मुखपृष्ठ

अनुक्रमणिका
अभिनंदन
आदरांजली
संपादकीय / नीलिमा गुंडी
कोळीण घरवाते खडाइली / ब्रह्मानंद देशपांडे
यमलार्जुन / मा०ना० आचार्य
मराठी कविता : प्रमाणभाषेतून बोलीभाषेकडे / हेमंत गोविंद जोगळेकर
खानदेशातील गुर्जर बोली : काही निरीक्षणे / फुला बागुल
अक्कलकुवा तालुक्यातील पावरी बोलीतील उखाणे / प्रकाश श्रीराम साळुंके
मराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना / दिवाकर मोहनी
मराठीकरण, भाषिक देवघेव, समृद्धी इ० / सुशान्त शंकर देवळेकर
हिंदुस्थानची इंग्रजी भाषेला देणगी - चार अल्पपरिचित शब्द / अरविंद कोल्हटकर
ज्याची त्याची प्रचीती / भाषेवर वर्चस्व कुणाचे? / मनोहर राईलकर
टीकेविना / प्र०ना० परांजपे

दखलयोग्य
१) हिपटुल्ला / सआदत हसन मंटो
२) राज्य मराठीचे... इंग्रजी शाळांचे / प्रकाश परब

पुस्तक परीक्षण
१) अभ्यासकांसाठी मोलाचे भाषांतर / म०के० ढवळीकर
२) मराठी कोशवाङ्मयातील मौलिक भर / कलिका मेहता

प्रतिसाद
१) संयुक्त क्रियापदांचा पेच / चिन्मय धारुरकर
२) भाषाभिमान आणि भाषाविवेक / अ०रा० यार्दी
लेखकांसाठी सूचना
संदर्भ कसे द्यावेत?

भाषावार्ता
भाषा आणि जीवन (त्रै०) २०१० : लेखनसूची / नीलिमा गुंडी
परीक्षणासाठी आलेली पुस्तके
पानपूरके
लेखक-परिचय

मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी

हिवाळा २०११ अंकाबाबत

संपादक :
प्र०ना० परांजपे

संपादन-सल्लागार :
अशोक रा० केळकर, कृष्ण श्री० अर्जुनवाडकर, आशा मुंडले, द०भि० कुलकर्णी, मॅक्सीन बर्नसन

संपादन-समिती :
प्र०ना० परांजपे (प्रमुख),नीलिमा गुंडी, मृणालिनी शहा, विजय पाध्ये, आनंद काटीकर

लेखन व परीक्षणार्थ पुस्तके पाठविण्याचा पत्ता :
प्र०ना० परांजपे, सी-१, सुरजबन सहनिवास, गणेशखिंड मार्ग, पुणे ४११ ००७. स्थिरभाष : (०२०) २५६९ ४६१७ चलभाष : ९४२२५ ०९६३८

प्रकाशक, मुद्रक, व्यवस्थापकीय पत्रव्यवहार व वर्गणी पाठविण्यासाठी पत्ता : आनंद काटीकर, द्वारा, मृणालिनी शहा, १, शीतल अपार्टमेंट्स, ४६ / ४, एरंडवणे, पुणे ४११ ००४. चलभाष : ९४२१६ १०७०४

मुद्रण-स्थळ : एम०आर० अॅाण्ड कं०, सदाशिव पेठ, पुणे ४११ ०३०. दूरभाष : (०२०) २४४७ ५९३९

मराठी अभ्यास परिषदेच्या www.marathiabhyasparishad.com या संकेतस्थळाचे व्यवस्थापक: चित्तरंजन भट - ९३७३१ ०४९०३ विजय पाध्ये - ९८२२० ३१९६३. marathiabhyasparishad@gmail.com या ई-पत्त्यावर पत्रव्यवहाराचे स्वागत आहे.

(१) वार्षिक वर्गणी भरण्यासाठी पत्रिकेचे वर्ष जानेवारी ते डिसेंबर असे आहे. जानेवारी २०१०पासून वार्षिक वर्गणी - विद्यार्थ्यांसाठी ७५ / -, व्यक्तींसाठी एका वर्षास ` १०० / -; पंचवार्षिक वर्गणी ` ४५० / -, संस्थांसाठी एका वर्षास ` १५० / -; पंचवार्षिक वर्गणी ` ६५० / -.

(२) मराठी अभ्यास परिषदेचे आजीव सदस्यत्व (फक्त व्यक्तींसाठी) वर्गणीशुल्क १ जानेवारी २०११पासून ` २००० / -. आजीव सदस्यांना 'पत्रिकेचा'चा अंक पाठवला जातो.

(३) पैसे भरण्याबद्दल सूचना : वर्गणी प्रत्यक्ष, रोखीने, किंवा धनादेशाने देता येईल. वर्गणी भरण्याचा सोपा मार्ग म्हणजे महाराष्ट्र बँकेच्या कुठल्याही शाखेत मराठी अभ्यास परिषदेच्या (टिळक मार्ग शाखा, पुणे) बचत खाते क्र० २००५७१६४२६० या खात्यात वर्गणी भरणे व आमच्याकडे पैसे भरल्याचे चलन पाठवणे. चलनावर स्वत:चे नाव, पत्ता लिहिण्यास व चलनाची छायाप्रत स्वत:कडे ठेवण्यास विसरू नये. कृपया मनिऑर्डर पाठवू नये. धनादेश 'मराठी अभ्यास परिषद' या नावाने काढावा. धनादेश पुण्याबाहेरच्या शाखेचा असल्यास आणि 'अॅ२ट पार' नसल्यास रकमेत ` ५० / - वटणावळ अधिक घालावी. धनादेशासोबत आपले नाव, पत्ता, रक्कम, कोणत्या वर्षासाठी वर्गणी ते अवश्य लिहावे.

(४) जानेवारी २०१०पासून जाहिरातीसाठी दर : पूर्ण पान ` ३,००० / -, अर्धे पान ` २,००० / -, आवरण-पृष्ठ (क्र० ४ = मलपृष्ठ) ` ५,००० / -, विशेष रंगीत पृष्ठ ` १०,००० / -

प्रकाशन:
त्रैमासिक: जानेवारी (हिवाळा), एप्रिल (उन्हाळा), जुलै (पावसाळा), ऑक्टोबर (दिवाळी)

सूचना :
(१) पत्रिकेत प्रसिद्ध होणार्यार लेखांच्या / लेखकांच्या मतांशी संपादक किंवा परिषद सहमत असतीलच, असे नाही.
(२) या अंकाच्या प्रकाशनासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अनुदान मिळालेले आहे. तथापि या नियतकालिकातील लेखकांच्या विचारांशी साहित्य संस्कृती मंडळ व राज्यशासन सहमत असतीलच असे नाही.
या अंकाची किंमत ` २५ / -

Pages