हिवाळा २०११

आवाहन, लेखकांसाठी सूचन, परीक्षणासाठी आलेली पुस्तके


आवाहन

टपालाने पाठविलेल्या अंकांतील काही अंक गहाळ होतात, हा नेहमीचा अनुभव आहे. शक्यतो अंक पुन्हा पाठविला जातो. पण जेव्हा या तक्रारींची संख्या जास्त असते तेव्हा अंक पुन्हा पाठवणेही कठीण होते. पुण्याच्या काही भागांतून - विशेषत: बिबवेवाडी, सिंहगड मार्ग - या भागांतून तक्रारी खूप येतात. यामुळे अंकाची प्रत व टपालखर्च असे दुहेरी नुकसान होते. म्हणून जे सभासद/वर्गणीदार/कुरियर-सेवेचे वर्षाला ` ४०/- पाठवतील त्यांना अंक कूरियर-सेवेने पाठविला जाईल. ही व्यवस्था हिवाळा २०११ (जानेवारी २०११) अंकापासून करण्यात येईल. कृपया याची नोंद घ्यावी.

लेखकांसाठी सूचना
१. पुढील विषयांसंबंधीचे लेखन ‘भाषा आणि जीवन’ ला हवे आहे : मराठी, अन्य देशीविदेशी भाषा, भाषांची तुलना (शब्दघटना, रचनावैशिष्टये इ०) भाषाविज्ञान, भाषांतर, शैली (व्यवहारातील व साहित्यातील), भाषिक व भाषाशिक्षणविषयक संशोधन, परिभाषा, भाषिक वर्तन, भाषाविषयक शैक्षणिक, शासकीय धोरणे, पुस्तक-परीक्षणे, पानपूरके, पत्रिकेतील प्रकाशित मजकुराबद्दल प्रतिक्रिया, आपली भाषिक प्रचीती, मराठीच्या प्रादेशिक, व्यवसायविशिष्ट, वयोगटविशिष्ट, लिंगविशिष्ट बोलींची वैशिष्टये, मराठी भाषेवरील इतर भाषांचा परिणाम, कवितांचे शैलीवैज्ञानिक विश्लेषण, कवितेची भाषा, साहित्याची भाषा, परिभाषाकोशांचा परिचय / परीक्षणे.
२. लेखकांनी पुढील पथ्ये पाळावीत :
(अ) कागदाच्या एकाच बाजूस, सुवाच्य लिहावे.
(आ) लेखनाच्या पाकिटावर पुरेशी टपाल-तिकिटे लावावीत.
(इ) लेखाच्या अखेरीस स्वत:ची ओळख (शिक्षण, व्यवसाय इ०) एकदोन वाक्यांत लिहावी. त्याचप्रमाणे स्वत:चा पत्ता व स्थिरभाषा क्रमांक, चलभाषा क्रमांक व ई-पत्ता द्यावा. (संपादकांच्या सोयीसाठी क्रमांक जरूर कळवावा.)
(ई) लेखात इंग्रजी अवतरणांचे मराठी भाषांतर द्यावे. व्यक्तिनामे, ग्रंथांची व लेखांची शीर्षके इ० देवनागरीत लिहावीत. (अतिशय अपरिहार्य अशाच ठिकाणी रोमन लिपीचा वापर करावा.)
३. लेखनासंबंधीचा निर्णय एक ते तीन महिन्यांत कळवला जातो. टपाल तिकिटे जोडलेली असतील तर (आणि तरच) नापसंत लिखाण परत पाठवले जाते.
४. लेखनाला अल्प मानधन दिले जाते.

संदर्भ कसे द्यावेत?
संदर्भ देण्याची नवी, सोयीस्कर व जागेचा अपव्यय टाळणारी पद्धत पुढे दिली आहे. या पद्धतीचाच आपल्या लेखात उपयोग करावा : लेखात ज्या ठिकाणी संदर्भ द्यावयाचा असेल तेथे कंसामध्ये संबंधित पुस्तक-लेखकाचे नाव द्यावे आणि त्यापुढे संदर्भित पुस्तक / लेखाचे प्रकाशनवर्ष द्यावे. त्यानंतर, आवश्यक असल्यास, स्वल्पविराम देऊन पृष्ठक्रमांक लिहावा व कंस पुरा करावा. लिखाणाच्या अखेरीस ‘संदर्भसूची’ मध्ये संदर्भातील सर्व तपशील द्यावेत. सूचीतील प्रत्येक नोंदीतील तपशीलांचा क्रम साधारणपणे असा ठेवावा : लेखकाचे आडनाव, स्वल्पविराम, नावांची आद्याक्षरे, प्रकाशनवर्ष, ग्रंथाचे शीर्षक, पूर्णविराम, प्रकाशनसंस्था, स्वल्पविराम, प्रकाशनस्थळ, पूर्णविराम. संदर्भसूची मराठीच्या वर्णक्रमानुसार असावी.

परीक्षणासाठी आलेली पुस्तके
 गोविंदाग्रज शैली - स्वरूप आणि समीक्षा : डॉ० सुरेश भृगुवार. विजय प्रकाशन, नागपूर. प्रकाशनवर्ष २०१०. पृष्ठे २२९ किंमत ` २५०/-
 ओळख पक्षिशास्त्राची : डॉ० उमेश करंबेळकर. राजहंस प्रकाशन, पुणे. जून २००९. पृष्ठे १६२ किंमत ` १५०/-

पानपूरके

भाषा प्रयोगातील दोन प्रवृत्ती
भाषाशक्तीचा आविष्कार भाषा प्रयोगात होतो तेव्हा त्यात दोन प्रवृत्ती दिसून येतात. एक प्रवृत्ती असते ती समाजजीवनातील निरनिराळी रूपे आणि अनेक विभाजने यांच्यामुळे भाषाव्यवस्थेत येणार्‍या विविधतेची, विकेंद्रीकरण होण्याची, भाषाप्रयोगात जीविकागत, प्रदेशगत आणि पिढीगत भेद निर्माण होण्याची आणि भाषांची विविधता कायम राहण्याची. याउलट दुसरी प्रवृत्ती आहे ती परिष्करणाची, प्रमाणीकरणाची, स्थिरीकरणाची, एकरूपतेची. विविध प्रकारच्या जीविका, प्रदेश, पिढ्या जोडण्याची प्रेरणा, प्रबळ केंद्र निर्माण करण्याची प्रेरणा येथे सक्रिय होताना दिसते.

शैली आणि तंत्र
‘शैली आणि तंत्र’ या पारंपारिक भारतीय साहित्यविचारातल्या संज्ञा नाहीत. त्या अनुक्रमे ‘स्टाईल’ आणि ‘टेक्नीक’ या इंग्लिश संज्ञांना पर्याय म्हणून मराठीत स्थिर झाल्या आहेत..... संस्कृतमध्ये ‘शील’ म्हणजे अनुशासनयुक्त संस्कारित अवस्था. माझ्या समजुतीप्रमाणे जनार्दन सखाराम गाडगीळ यांनी ‘शैली’ हा शब्द मराठीत प्रथम (कदाचित भारतीय भाषांत प्रथम) ‘स्टाईल’ या शब्दाला पर्याय म्हणून वापरला. (‘‘लिहिण्याची शैली’’ मराठी ज्ञानप्रसारक, एप्रिल,मे १८६३) ज्यामुळे कर्त्याचे शील प्रकट होते ती ‘शैली’ असा काही विचार ‘शैली’ शब्दाची निवड करण्यामागे असावा. साहित्यचर्चेत ‘टेक्नीक’ शब्द (आणि त्यामुळे ‘तंत्र’ शब्दही) बर्‍याच उशिरा शिरला. त्यापूर्वी ‘क्राफ्ट’ ह्या शब्दावर भागत असे. (मराठीतही ‘कुसर’ किंवा ‘कारागिरी’ हे शब्द वापरतात.) मराठी साहित्य चर्चेत ‘तंत्र’ शब्द प्रथम कुणी वापरला आणि ‘मंत्र’ शब्दाशी त्याची सांगड कुणी घातली याचाही शोध घ्यायला पाहिजे. (संस्कृतमध्ये तांत्रिक विद्येच्या संबंधात मंत्र, तंत्र, यंत्र असे एक त्रिक आहे; सुदैवाने मराठी साहित्य चर्चेत कुणी ‘यंत्र’ शब्द आणलेला नाही!) ‘टेक्नीक’ या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ ‘विशिष्ट काम साधण्याची विशिष्ट पद्धत’ ... ‘स्टाईल’ आणि ‘टेक्नीक’ हे शब्द इंग्लिशमध्ये साहित्याखेरीज इतर ललित कलांच्या संबंधातही वापरतात. (‘शैली’ आणि ‘तंत्र’ शब्दांच्या बाबतीत मराठीतही आता थोड्या उशिरा तेच घडते आहे.)
- डॉ० अशोक रा० केळकर, ‘रुजुवात’ पृ० ५0

काव्य, नाटय आणि नृत्य
‘नट’ ही संज्ञा सर्वच रंगकर्मींना लागू करण्यात येत असे- नाट्यातील आणि नृत्यातील रंगकर्मींना, नटेश्वर म्हणजे शंकर हे जसे नाटय-रंगकर्मींचे दैवत तसेच नृत्य-रंगकर्मींचे दैवत.
‘नृत्य’ ही संज्ञा भरताने व्यापक अर्थाने सर्वच नर्तनाला लावली आहे. केवळ नर्तन म्हणजे ‘नृत्त’ आणि सभिनय नर्तन म्हणजे ‘नृत्य’ हा फरक नंतरचा. मात्र आजही आपण ‘नृत्य’ ही संज्ञा मूळच्या व्यापक अर्थाने पुष्कळदा वापरतो. हा घोटाळा टाळण्यासाठी साभिनय नर्तनासाठी आपण काव्यनृत्य ही संज्ञा वापरू.
काव्याचे आपण भावकाव्य, कथनकाव्य, आणि नाटयकाव्य असे उपप्रकार मानले आहोत. ते उपप्रकार काव्यनृत्यालाही लागू पडतात असे दिसते.
भावनृत्य हाही वर्तमानकेंद्री स्वसंवाद असतो. कथक किंवा भरतनाटयम् शैलीमधील एकल काव्यनृत्य पुष्कळदा भावनृत्य स्वरूपाचे असते, एक भावस्थिती पकडून तिचा निरनिराळ्या अंगांनी विस्तार करणे हे अशा नृत्याचे कार्य राहते. सोबत भावकवित्व असेल वा नसेलही.
कथकनृत्य हा भूतकेंद्री अन्यसंवाद असतो. यक्षगान किंवा ‘कथा कहे सो कथक’ या मूळ प्रकृतीच्या जवळ राहणारे कथक या स्वरूपाचे असते. नृत्याला जोडून येणारे कथनगीत हे त्याला अंगभूत असते.
नाटयनृत्य हा भविष्यकेंद्री अन्योन्यसंवाद असतो. वगावर आधारलेले लावणीनृत्य किंव अभिजात भारतीय नृत्यावर आधारित अर्वाचीन काळातील ‘बॅले’ - सदृश् नृत्य या स्वरूपाचे असते. नृत्याला जोडून येणारी नाटयगीते किंवा नाटयसंवाद ही त्याला अंगभूत असतात.
- डॉ० अशोक रा० केळकर, ‘रुजुवात’ पृ० ८५

मोहरमच्या सणात शोक व्यक्त करण्यासाठी मुस्लीम मंडळी या ‘हसन, या हुसेन’ असा आक्रोश करतात. ‘हाय दोस्त दूलाह बेधूला’ असे म्हणत छाती पिटतात. भराभर उच्चारताना (‘जा पोरी जा’चं जसं ‘झपूर्झा’ झालं) पहिल्या तीन शब्दाचं ‘हैदोसधुल्ला’ झालं. इंग्रजांच्या कानांना ‘या हसन या हुसेन’ हे शब्द अनाकलनीय भासत. रमजानची वर्णने विलायतेस कळवणार्‍यांनी या शोकघोषाचा कधी ‘जॅक्सम बॉक्सम’, तर कधी ‘हॉब्सन-जॉब्सन’ असा उल्लेख केला. भारतातील कंपनीच्या गोर्‍या नोकरवर्गांत अगदी ओळखीचा असणारा हा वाक्प्रचार कोशाच्या वेगळ्या वाटेकडे लक्ष वेधणारा ठरला. शिवाय रचनाकर्त्यांच्या जोडगोळीचाही अप्रत्यक्ष निर्देश त्यात सूचित झाला (अ व्हेल्ड इंटिमेशन ऑफ डयुअल ऑथरशिप).
- श्री०बा० जोशी (‘उत्तम मध्यम’मधील ‘हॉब्सन-जॉब्सन’मधून)
(प्रेषक : विजय पाध्ये)

शब्दार्थाची सांस्कृतिकता
भाषेतील शब्द, अर्थ आणि त्यांची जोडणी (शब्दार्थसंबंध) ही सगळीच एक सांस्कृतिक निर्मिती आहे हे साहित्याचा अनुवाद करताना, विशेषत: परकी भाषेत करताना, तेव्हाच ध्यानात येते. जो मजकूर मराठी भाषकांच्या कानाला गोड वाटेल तो बांगला भाषकाच्या कानाला खरखरीत वाटू शकेल, जो मजकूर मराठीत रोखठोक/आर्जवी वाटेल तो हिंदीत अनुक्रम उद्धट/रोखठोक वाटेल. जर एखाद्या भाषेमध्ये रोखठोक/आर्जवी, औपचारिक/अनौपचारिक अशा वाक्सरणी उपलब्ध असल्या तर त्यांना एक मानसिक परिमाणही असते. उदाहरणार्थ, मजकुरात स्वर, लकार, नासिक्य व्यंजने यांची रेलचेल असली तर तो कोणत्याही भाषेत कानाला गोड लागण्याचा संभव अधिक किंवा कुणाच्या भाषाप्रयोगात छोटी छोटी वाक्ये नेहमीच अधिक असली तर त्या व्यक्तीची विचार धारण करण्याची क्षमता तोकडी असावी किंवा तिला संबोधित व्यक्तीच्या ग्रहणशक्तीचा भरवसा वाटत नसावा असे लक्षात येते.
- डॉ० अशोक रा० केळकर, ‘रुजुवात’ पृ० २१९

सहेतुक भाषासरणी
भाषा आणि साहित्य ह्यांना जोडणारी संकल्पना म्हणजे ‘शैली’ (style). शैलीचा आपण प्रथम भाषेच्या अंगाने विचार करू, नंतर साहित्याच्या अंगाने.
‘शैली’ची व्याख्या भाषेच्या अंगाने द्यायची तर ती ‘सहेतुक भाषासरणी’ अशी देता येईल.
समजा, आपल्याला एक खुर्ची बनवायची आहे. ती बनवताना कच्चा माल, पैसा, हत्यारे, वेळ, बळ, कौशल्य इत्यादिकांची आपल्याजवळ जी काय उपलब्धी आहे तिच्या काही मर्यादा आपल्यावर पडतील. तसेच आपल्याला काय उपलब्ध करायचे आहे, काय साधायचे आहे ह्याचीही बंधने आपल्यावर आहेत. इतके वजन पेलायचे आहे, गुरुत्वमध्य इतका खाली आणायचा आहे, खर्ुच्या वाहून न्यायला आणि एकावर एक डाळून ठेवायला सोप्या असाव्यात ह्या किंवा अशा अटी आपल्याला पाळायच्या आहेत. प्रत्यक्ष खुर्ची तयार झाल्यावर, तिचे रंगरूप निश्चित झाल्यावर तिच्याकडे पाहिले तर ह्या दोन्ही प्रकारच्या मर्यादा कमीअधिक यशस्वी रीतीने संभाळल्याचे आपल्या ध्यानात येते. मात्र हा मर्यादापालनाचा हिशोब आपण वजा घातला तर खुर्चीच्या निर्मात्याने निवडीचे स्वातंत्र्य उपभोगल्याचे दिसून येते. ही श्रीशिल्लक म्हणजे शैली. (शैलीहीनता आणि कुशैली ह्यांमध्ये रेषा ओढायला हवी.)
उपलब्धी आणि उपयुक्तता ह्यांमधून वेगळी वाट काढून साध्य गाठणे म्हणजे शैली. मग ती शैली त्या व्यक्तीने स्वतंत्र शिल्पिलेली असो किंवा संस्कृतीने उपलब्ध करून दिलेल्या तयार वळणांपैकी एकाचे थोड्याफार फरकाने केलेले अनुकरण असो किंवा विशिष्ट कालखंडात विशिष्ट संस्कृतीने उपलब्ध केलेल्या एकच एक पर्यायाची पृथगात्मता असो.
- डॉ० अशोक रा० केळकर, ‘रुजुवात’ पृ० २६

कवितेचे करतेपण
कवितेच्या करतेपणाबद्दल आपल्याला तीन प्रश्न उपस्थित करता येतील. एक म्हणजे : कविता आपल्या श्रोत्यावर-वाचकावर आणि श्रोत्यासाठी-वाचकासाठी काय कार्य करते? दुसरा प्रश्न : कविता आपल्या निर्मात्यावर आणि निर्मात्यासाठी काय कार्य करते? तिसरा प्रश्न : काव्य आपल्या श्रोते-वाचक आणि निर्माते-कवी मिळून बनलेल्या समाजावर आणि समाजासाठी काय कार्य करते? हे तीनही प्रश्न (अर्थातच!) वादग्रस्त आहेत. त्या सर्वांच्या संभाव्य उत्तरांचा शोध आपण घेतला तर कवितेच्या कर्तृत्वाच्या, करामतीचा म्हणा पाहिजे तर थोडा अंदाज आपल्याला यावा.
- डॉ० अशोक रा० केळकर, ‘रुजुवात’ पृ० ४३-४४

शैलीचे दुहेरी स्वरूप
शैलीचा प्रादुर्भाव होण्याचे व्यक्तिनिर्मित, व्यक्तिनिर्वाचित, आणि समाजनिर्वाचित असे जे तीन प्रकार सांगितले, त्यांपैकी दुसरा प्रकारच भाषेच्या बाबतीत सामान्यत: दिसून येतो. एकापेक्षा अधिक सरणी भाषा उपलब्ध करते. उदाहरणार्थ ‘माझा भाऊ हल्ली नाशकालाच असतो’ आणि ‘आमच्या बंधूंचे वास्तव्य सांप्रत नाशिक येथेच असते’ अशा अनुक्रमे साहजिक आणि प्रौढ सरणी मराठीच्या प्रमाणबोलीत उपलब्ध आहेत. वधूपित्याशी बोलायला किंवा कुणाची थट्टा करायला ही प्रौढ सरणी उपयोगी पडते. क्वचित एखाद्या व्यक्तीची ती स्थायी सरणी ठरेल आणि इतरांना ते अती औपचारिक वागणुकीचा किंवा अहंमन्य व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार वाटेल... भाषागत शैलीचा हा सोपा प्रकार. त्याहून सोपा प्रकार म्हणजे भाषाच बदलणे, निदान बोली बदलणे. मनची गोष्ट बोलायला गावाकडच्या बोलीचा आश्रय घेणे किंवा ठासून सांगण्यासाठी इंग्लिशचा आश्रय घेणे हा प्रकार मराठी भाषिकांमध्ये आढळतो. परंतु भाषा जे पर्याय उपलब्ध करते ते नेहमीच अशा जवळजवळ रेडीमेड शैलींच्या स्वरूपाचे नसतात. त्याऐवजी पर्यायांच्या फुटकळ जोड्या किंवा लहान पुंज भाषेत नेहमी हजर असतात. त्यांपैकी काही निर्हेतुक असतात. उदा०, ‘चावी’ आणि ‘किल्ली’, ‘कर्मणूक’ आणि ‘करम्णूक’, ‘बस’ आणि ‘बैस’, ‘तू आंबा खाल्ला’ आणि ‘तू आंबा खाल्लास’, ‘जात असे’ आणि ‘जाई’, ‘ऐशी’ आणि ‘एेंशी’ (सानुनासिक ऐ). बोलणारा किंवा लिहिणारा कोणता पर्याय निवडतो ह्यावरून ग्रहणकर्ता काही अनुमाने कदाचित् काढीलही - उदाहरणार्थ, बोलणारा परगावचा दिसतो, वयस्क असावा, इत्यादी... पण ही अनुमाने शैलीची प्रतीती ह्या स्वरूपाची नाहीत...मात्र त्यांच्यापैकी काही पर्याय-पुंज सहेतुक निवडीला अवसर देतात - उदा०, ‘मला ताप आला’ आणि ‘ताप मला आला’ (आणि लाड मात्र तुझे झाले); ‘जाणार आहे’ आणि ‘जाईल’; ‘साडेतीनशे’ आणि ‘तीनशे पन्नास’; ‘तू’, ‘तुम्ही’, आणि ‘आपण’; ‘लहान’, ‘बारका’ आणि ‘छोटा’; ‘जायला हवे’, ‘गेले पाहिजे’, ‘जाणे जरूर आहे’, आणि ‘जाणे आवश्यक आहे’, ‘आई’, ‘माता’, आणि ‘जननी’. अशा पुंजांतून जी निवड होईल तिच्यावरून ग्रहणकर्त्याला प्रेषकाचा हेतू स्पष्ट होतो. हा हेतू त्या मजकुराच्या आशयाच्या बाजूला जमा होतो हे खरे, पण त्याचबरोबर एका सलग वाक्यबंधनातून असे जे सहेतुक निवडीचे कण येतील त्यांच्यामधून एक शैलीही आकार घेते हेही तितकेच खरे. अभिव्यक्ती ही नुसता आशयाचा आविष्कार करीत नाही, तर आशयात भर घालते. भाषागत शैलींचे स्वरूप असे दुहेरी आहे.
- डॉ० अशोक रा० केळकर, ‘रुजुवात’ पृ० २७, २८

लेखक-परिचय


आचार्य, (प्रा०) माधव नारायण :
एम०ए०, मराठीचे निवृत्त प्राध्यापक. ‘अनुषंग’ (१९८१), ‘मराठी व्याकरण विवेक’ (१९९०, २००१), (महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक), ‘ज्ञानमयूरांची कविता’ (१९९३), ‘आर्याभारत : नवदर्शन’ (१९९७), ‘पञ्चपदवी ज्ञानदेवी’ (२००३), ‘ध्वनितांचे केणें’ (२००८) ही पुस्तके प्रकाशित. ‘मोरोपंतांची सतीगीते’ (१९८५, १९९४), ‘मोरोपंत विरचित संशयरत्नावली (१९८५), ‘मोरोपंतकृत श्लोककेकावली’ (१९९४) या पुस्तकांचे संपादक. पैकी शेवटच्या पुस्तकास महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेचे पारितोषिक. ‘पञ्चपदवी ज्ञानदेवी’ या ग्रंथाला महाराष्ट्र शासन पुरस्कार व संत साहित्य पुरस्कार. ‘ध्वनितांचे केणें’ या ग्रंथाला मराठी अभ्यास परिषदेचा पुरस्कार.

कोल्हटकर, अरविंद : पुणे विद्यापीठातून गणित या विषयात एम्०ए० पदवी (१९६४). रशियन भाषेचे प्रमाणपत्र व पदविका प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण (१९६५). केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण (१९६५). आयकर विभागातून आयुक्त-पदावरून स्वेच्छानिवृत्ती. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे चिटणीस म्हणून काही काळ काम. आता टोरांटो (कॅनडा)मध्ये स्थायिक. भारतीय भाषा व संस्कृती या विषयांवर विविध संकेतस्थळांवर प्रसंगोपात्त लेखन. kolhatkar.org हे स्वत:चे संकेतस्थळ.

गुंडी, (डॉ०) नीलिमा - स०प० कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदावरून निवृत्त. कविता, ललित व वैचारिक लेख, समीक्षा, संपादन या प्रकारांतील बारा पुस्तके प्रकाशित. लेखनाबद्दल दोन राज्यपुरस्कार व सहा इतर पुरस्कार ‘लाटांचे मनोगत’ हे स्त्रीकाव्याचा चिकित्सक अभ्यास करणारे पुस्तक. ‘कविता विसाव्या शतकाची’ व ‘भारतीय भाषांतील स्त्रीसाहित्याचा मागोवा (खंड १ व २)’ यांच्या संपादनात सहभाग. राज्यस्तरीय, राष्ट्रीय चर्चासत्रांमधून निबंध सादर. सुमारे पाचशे पुस्तकांचे परीक्षण-लेखन.

जोगळेकर, हेमंत गोविंद : मुंबई आयआयटीमधून रासायनिक अभियांत्रिकीमध्ये पदवी. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथून वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून निवृत्त. ‘होड्या’ (१९८५), ‘माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा’ (विडंबन कविता), ‘मनातले घर’ (१९९५), ‘उघडे पुस्तक’ (२००७), हे कवितासंग्रह प्रकाशित. केशवसुत व बालकवी पुरस्कार. इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, पंजाबी व असमिया इ० भाषांत कवितांची भाषांतरे. ‘कविता दशकाची’, कविता विसाव्या शतकाची’, ‘स्वातंत्र्योत्तर मराठी कविता - १९६० ते ८०’ व ‘अक्षर दिवाळी - १९८०, ८१, ८२, ८३, ८४, ८५’ या प्रातिनिधिक संग्रहांत कवितांचा समावेश.

ढवळीकर, (डॉ०) म०के० : पुरातत्त्वशास्त्राचे प्राध्यापक व डेक्कन कॉलेज (पुणे) चे संचालक (निवृत्त), कला व पुरातत्त्वशास्त्र या विषयांवरील सुमारे २५ पुस्तके प्रकाशित.

देवळेकर, सुशान्त : एम०ए० (मराठी), सध्या राज्य मराठी विकास संस्था (मुंबई) येथे कनिष्ठ संशोधन-साहाय्यक ह्या पदावर कार्यरत. २००२-०८ ह्या काळात भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) (मुंबई) येथील भारतीय भाषा केंद्रात भाषातज्ज्ञ म्हणून सेवेत. मराठी शाब्दबंध हा शब्दार्थसंबंध दाखवणारा कोश, मराठी शब्दरूपांचे विश्लेषण करणारी रूपविश्लेषक ही संगणक प्रणाली विकसित करण्यात सहभाग. संगणकावर युनिकोड वापरून मराठीत काम कसे करता येईल हे समजावून देणार्‍या कार्यशाळांत मार्गदर्शन.

देशपांडे, (डॉ०) ब्रह्मानंद : महामहोपाध्याय, विद्याभूषण, प्राचीन मराठी वाङ्मयाचे व्यासंगी संशोधक. ‘देवगिरीचे यादव’, ‘शोधमुद्रा’ इ० पुस्तके प्रकाशित

परांजपे, (प्रा०) प्र०ना० : एम०ए०,पी०जी०डी०टी०इ०,एम०लिट० रामनारायण रुइया महाविद्यालय, मुंबई येथे इंग्रजीचे १५ वर्षे आणि पुणे विद्यापीठात वृत्तपत्र-विद्येचे २० वर्षे अध्यापन. एक कथासंग्रह, तीन भाषांतरे, पाच संपादने, पाच सहसंपादने व एक सहलेखन अशी १५ पुस्तके प्रकाशित. याव्यतिरिक्त दहा पुस्तकांत लेख समाविष्ट. संगीत नाटक स्पर्धेत लेखनाबद्दल महाराष्ट्र शासनाचे प्रथम पारितोषिक.
पाटकर, रमेशचंद्र : विल्सन महाविद्यालय, मुंबई येथून मराठी-विभाग प्रमुख म्हणून निवृत्त. ‘आत्मचरित्र : एक साहित्य प्रकार’ या विषयावर पीएच०डी०. ‘कलेचा इतिहास : भारतीय पाश्चात्य’, हे पुस्तक महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाने प्रकाशित केले. माधव सातवळेकरांच्या चित्रसंग्रहात सातवळेकरांची दीर्घ मुलाखत समाविष्ट. प्रा० बाबुराव सडवलेकरांच्या लेखसंग्रहाचे (‘महाराष्ट्रातील कलावंत : आदरणीय व संस्मरणीय’) संपादन. ‘शहीद भगतसिंग : आठवणी, विवेचन आणि विचार’, ‘मराठी नियतकालिकांतील दृश्य विचार’ ही अन्य पुस्तके. कथा, कविता, साहित्यसमीक्षा यांचे लेखन.

बागुल, (डॉ०) फुला मोतीराम :
बी०एस्सी०, बी०ए०, एम०ए०, बी०एड०, सेट उत्तीर्ण, पीएच०डी० (विषय - मराठी, विज्ञान साहित्यात सुबोध जावडेकरांचे वाङ्मयीन योगदान.) तीन कवितासंग्रह, एक वैचारिक ग्रंथ, दोन इतर व एक संपादित अशी एकूण सात पुस्तके प्रकाशित. ‘गुर्जर बोली’ या विषयावरील संशोधनासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून प्रकल्प अनुदान. एस०पी०डी०एम० महाविद्यालय, शिरपूर (जि० धुळे) येथे मराठीचे साहाय्यक प्राध्यापक.

मेहता, (डॉ०) कलिका : एम०ए० (भाषाविज्ञान), एम०ए० (मराठी) मुंबई विद्यापीठ, पीएच०डी० (भाषाविज्ञान), डेक्कन कॉलेज, पुणे. भारतीय भाषा संस्थान (सेंट्रल इन्स्टिटयूट ऑॅफ इंडियन लँग्वेजिज), म्हैसूर ह्यांच्या पुणे येथील पश्चिम विभागीय भाषा केंद्रात १९८२पासून अमराठी विद्यार्थ्यांसाठी मराठीचे अध्यापन. सध्या त्याच केंद्राच्या प्राचार्य. अनेक प्रकारच्या शैक्षणिक साहित्याची निर्मिती.

मोहनी, दिवाकर : मुद्रणतज्ज्ञ, लिपीतज्ज्ञ. विवेकवादाला वाहिलेल्या ‘आजचा सुधारक’ ह्या नियतकालिकाच्या संपादक-मंडळाचे सदस्य.

राईलकर, (प्रा०) मनोहर : एम०एससी० (सांख्यिकी), मुंबई, एम०एससी० (गणित), पुणे, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे येथे गणिताचे प्राध्यापक व गणित विभागप्रमुख असे एकूण ३४ वर्षांचे अध्यापनकार्य, नंतर निवृत्त. गणित विषयावरील २३ पुस्तके, तीन कादंबर्‍या, सात विज्ञानकथा व ‘भाषा व जीवन’मध्ये अनेक वेळा लेखन प्रसिद्ध.

साळुंके, (डॉ०) प्रकाश श्रीराम : एम०ए०, पीएच०डी०, मराठी विभाग प्रमुख, कला आणि वाणिज्य महाविद्यालय, अक्कलकुवा (जि० नंदुरबार)

भाषावार्ता

अरुणाचलमध्ये सापडली दुर्मिळ भाषा

अरुणाचल प्रदेशातील एका दुर्गम भागात बोलली जाणारी अज्ञात भाषा शोधून काढली आहे. जेमतेम ८०० जण बोलत असलेली ही भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

‘कोरी’ असे या भाषेचे नाव आहे. तिबेट व ब्रह्मदेश विभागातील ही भाषा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या विभागातील ४००पैकी १५० भाषा भारतात बोलल्या जातात. मात्र त्यांपैकी कोणत्याही भाषेशी ‘कोरो’चे साम्य नाही. ऑरेगॉनमधील ‘लिव्हिंग टंग्ज इन्स्टिटयूट’मधील ग्रेगरी अँडरसन, पेनसिल्वेनियातील स्वार्थमोअर महाविद्यालयातील डेव्हिड हॅरिसन आणि रांची विद्यापीठातील गणेश मुर्मू यांच्या पथकाने हा शोध लावला आहे. त्यांना ‘नॅशनल जिओग्राफिक’ने साहाय्य केले होते. अरुणाचल प्रदेशात जाण्यासाठी या संशोधकांना भारत सरकारची परवानगी घ्यावी लागली. ‘‘कोरो भाषा बोलणार्‍यांमध्ये ज्येष्ठ लोकांचाच समावेश आहे. २० वर्षांखालील फारच कमी लोक ही भाषा बोलतात,’’ असे अँडरसन यांनी सांगितले.
‘नॅशनल जिओग्राफिकच्या एंडयुरिंग व्हॉईसेस प्रोजेक्ट’अंतर्गत हे पथक ‘आका’ आणि ‘मिजी’ या अत्यंत कमी बोलल्या जाणार्‍या भाषांच्या शोधात फिरत असताना अचानक त्यांना ‘कोरो’ भाषेचा शोध लागला. अरुणाचल प्रदेशात डोंगराळ भागात भात-बार्ली पिकविणार्‍या गावांत जाऊन भाषा ऐकत व त्याचे रेकॉर्डिंग करत असताना त्यांना या भाषेचा शोध लागला. या पथकाने मोहिमेपूर्वीच भाषांचे वैविध्य असलेले अरुणाचल हे जागतिक नकाशावरील केंद्र म्हणून निश्चित केले होते. दहा वर्षांनी जर आम्ही अरुणाचलला आलो असतो, तर या भाषेची माहितीही मिळाली नसती, असे ऍंडरसन यांनी सांगितले.
अरुणाचलमध्ये सुमारे ५० भाषा बोलल्या जातात. यांपैकी बहुसंख्य भाषांना लिपी नाही. अरुणाचल प्रदेशात गेलेल्या तज्ज्ञांच्या पथकातील एक सदस्य डेव्हिड हॅरिसन यांच्या मते ‘कोरो’, ‘आका’ आणि ‘मिजी’ या प्रत्येक भाषेचे स्वरूप वेगळे आहे. जसा इंग्रजी आणि जपानी भाषेतील उच्चारांत फरक आहे, तशाच प्रकारचा फरक ‘आका’ आणि ‘कोरो’ भाषांतील उच्चारात आहे. ‘आका’ भाषेत पर्वताला ‘फू’ असे म्हटले जाते, तर ‘कोरो’ मध्ये ‘नाग्गो’. हा फरक फक्त उच्चाराचा नाही, तर व्याकरणाचाही आहे. कोरो भाषेचा उगम तिबेटमध्ये झाला असण्याची शक्यता आहे.

दै० सकाळ, दि० ७ ऑक्टोबर २०१०

मध्य प्रदेशात ‘मराठी साहित्य अकादमी’

मराठी भाषेच्या जतन-संवर्धन-विकासासाठी राज्यात ‘मराठी साहित्य अकादमी’ स्थापन करण्यात यावी, ही मागणी खुद्द महाराष्ट्रात अद्याप दुर्लक्षिली गेली असली, तरी शेजारच्या मध्य प्रदेश सरकारने मराठी भाषेला अधिकृत दर्जा देण्याबरोबरच नुकतीच ‘मराठी साहित्य अकादमी’ची स्थापनाही केली आहे. मध्य प्रदेश सरकारच्या सांस्कृतिक विभागाचे सचिव श्रीराम तिवारी यांनी गुरुवारी (९ डिसेंबर) भोपाळ येथे यासंबंधीची अधिकृत घोषणा केली. मध्य प्रदेशमध्ये मराठी भाषा, साहित्य, संस्कृती या क्षेत्रात गेली तीस वर्षे कार्यरत असणारे डॉ० गणेश बागदरे यांची मराठी साहित्य अकादमीचे पहिले संचालक म्हणून नेमणूकही करण्यात आल्याचे तिवारी यांनी घोषित केले.

महाराष्ट्राच्या बाहेर अशा प्रकारची ‘मराठी साहित्य अकादमी’ सुरू करणारे आणि मराठी भाषेला राज्यात हिंदीनंतरची दुसरी अधिकृत भाषा असा दर्जा देणारे मध्य प्रदेश हे पहिले राज्य ठरले आहे. मध्य प्रदेशमध्ये मराठी भाषकांची संख्या सध्या एक कोटी पंचवीस लाखांच्या आसपास आहे. छत्तीसगडच्या निर्मितीपूर्वी ही संख्या दोन कोटीच्या आसपास होती.

मध्य प्रदेशात भोपाळ, ग्वाल्हेर, जबलपूर आणि इंदूर येथे मराठी भाषकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पेशव्यांच्या काळात आणि त्याही आधीपासून अनेक मराठी कुटुंबे या ठिकाणी वास्तव्यास आहेत आणि त्यांनी मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्याचे जतन करण्यात पुढाकार घेतला आहे. ‘मराठी साहित्य अकादमी’च्या निर्मितीमुळे येथील मराठी भाषक सुखावले आहेत.
या अकादमीचे पहिले संचालक म्हणून सूत्रे स्वीकारणारे गणेश बागदरे मूळचे पुण्याचे असले, तरी गेली अनेक वर्षे मध्य प्रदेशात विविध ठिकाणी मराठी भाषेशी निगडित उपक्रमांच्या आयोजनात आघाडीवर आहेत. मध्य प्रदेश सरकारच्या सांस्कृतिक विभागात ते मराठी विभागप्रमुख म्हणून काम करत होते.

दै० सकाळ, दि० १२ डिसेंबर २०१०

जगभरातील बोलींच्या संरक्षणासाठी केंब्रिज विद्यापीठाचा प्रकल्प

भारतात तसेच जगात विविध ठिकाणी अस्तंगत होत चाललेल्या बोलीभाषांचे रक्षण व्हावे यासाठी केंब्रिज विद्यापीठाने एक महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतला आहे. लोकांना या बोलीभाषा कळाव्यात, म्हणून विद्यापीठातील संशोधकांनी खास वेबसाइटवर आता लोकांना त्या भाषासंबंधात मुक्त प्रवेश दिला आहे.
www.oralliterature.org अशी ही वेबाइट असून यात केरळमधील पल्लकड जिल्ह्यात कुरुंबर समाजाची बोली तसेच स्वतंत्र अशी मुदुगार संस्कृतीची माहिती, कागदपत्रे आदी बाबींचा समावेश या वेबसाइटवर करण्यात आला आहे. याशिवाय ध्वनिमुद्रणाचाही समावेश करण्यात आला आहे. बुंदी जिल्ह्यामधील थिकराडा गावातील माळी समाजातील लोकांची जीवनशैली, संस्कृती कळावी असाही एक प्रकल्प यात समाविष्ट आहे. तसेच राजस्थानातील हडोतीमधील तेजाजी परंपरा, रितीरिवाज याची माहितीही असलेले ध्वनिमुद्रण यात आहे. हे सारे ध्वनिमुद्रण हिंदी व इंग्रजीत भाषांतरित करण्यात आले आहे. जगातील ३,५२४ बोलींच्या ध्वनिमुद्रण असलेल्या फाइल्स या प्रकल्पाद्वारे साइटवर उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

दै० लोकसत्ता, दि० १३ डिसेंबर २०१०

भाषाभिमान आणि भाषाविवेक

अ०रा० यार्दी

संदर्भ : ‘भाषा आणि जीवन’चा वर्ष २८, अंक ३ पावसाळा २०१०

१) इंग्रजी शब्दांना मराठीत प्रतिशब्द देताना खूपच सूक्ष्म विचार करायला हवा. उदा० टेलिफोनला आपण दूरध्वनी / दूरभाष म्हणतो आणि मोबाईलला भ्रमणभाष / भ्रमणध्वनी म्हणतो. खरे तर टेलिफोनला ‘स्थिरभाष’ म्हणायला काय हरकत आहे? लँडलाइनचा अर्थ तो घरात. एका ठिकाणी, जागा निश्चित केलेल्या ठिकाणी ठेवलेला असतो. ‘भ्रमणभाष’ हा शब्द भ्रमण करता करता, बोलता येण्याची सोय असलेला या अर्थाने ठीक आहे. पण तो शब्द ध्वनीपेक्षा वस्तूला अधिक लागू होतो. काही लोक मोबाईलला ‘चलभाष’ असाही शब्द वापरतात. म्हणजे याच आधाराने टेलिफोनला ‘अचलभाष’ म्हणायचे काय?

२) ‘‘बहुभाषिक भारत- वास्तव आणि स्वप्न’’ हा मॅक्सीन बर्नसन यांचा लेख अतिशय उद्बोधक आहे. मुद्दा आहे, ‘मुलांना मातृभाषेतून शिक्षण घेऊ द्या’ या शिक्षणतज्ज्ञांच्या अभिप्रायाबद्दलचा. वास्तव हे नेहमीच वेगळे राहिले आहे. शिक्षणतज्ज्ञांनी कितीही कंठरवाने सांगितले, तरी मुलांना आपल्या मातृभाषेमध्ये शिक्षण मिळविणे दुरापास्त होत चालले आहे, विशेषत: भाषावार प्रांतरचनेनंतर.
‘मातृभाषा’ या मागची संकल्पनाच मोडीत काढण्याचे राजकारण आज राज्या-राज्यांमध्ये खेळले जात आहे. मातृभाषा म्हणजे आईची-आईकडून आलेली भाषा. इतर आनुवंशिक गुण (आणि दोष) सुद्धा घेऊनच जसे मूल जन्माला येते, तसेच भाषेचे अंगही ते आईकडून घेऊन येत असावे आणि त्यानंतर ते अधिकाधिक, घडणीच्या बालपणी आईच्या सहवासातच राहत असते. त्यामुळे आईची भाषा ती मातृभाषा असे झाले असावे. पण आजकाल मातृभूमी, मातृभाषा या संकल्पना इतक्या संकुचित मनाच्या लोकांच्या ताब्यात गेल्या आहेत की या सगळ्यांचा पुनर्विचार करावा असे त्यांना वाटू लागले आहे. मातृभूमी म्हणजे भारत देश नसून ज्या प्रांतात तो / ती, जन्मला / जन्मली, ती भूमी होय. मातृभाषा म्हणजे आईकडून आलेली भाषा असे नसून त्या राज्याची भाषा होय, असा समज जरबेने बसवू पाहिला जात आहे. अशा संदर्भात शिक्षणतज्ज्ञांच्या विधानाचा नेमका अर्थ काय घ्यायचा? आणि तो नेमका घेतला, तर त्याला वास्तवात कितपत आधार मिळतो? भाषांचा हा गोंधळच नको म्हणून इंग्रजी किंवा हिंदी भाषांच्या माध्यमांच्या शाळांत आपल्या पाल्यांना पाठविणारे पालक आज संख्येने वाढत आहेत आणि विशेष म्हणजे अशी आपली मातृभाषा सोडून इतर भाषांतून शिक्षण घेतलेली मंडळी मातृभाषांत शिक्षण घेतलेल्या मुलांच्या तुलनेत खूपच उजवी ठरत आहेत. ‘तडफदार’ ठरत आहेत. मातृभाषांत शिक्षण घेतलेली मुलं मात्र न्यूनगंडानं त्रस्त झालेली दिसत आहेत. असे सगळे असताना मातृभाषेतल्या शिक्षणाचा आग्रह कशासाठी? इतर भाषांत शिक्षण घेतलेल्या मुलांनी परदेशवार्‍या करायच्या, ऐषारामी जीवन जगायचं आणि मातृभाषेत शिक्षण घेतलेल्यांनी फक्त आपल्याच राज्यापुरतं मर्यादित जगायचं? या सगळ्या गोष्टींचा गंभीरपणे विचार करून त्यावर योग्य ती उपाययोजना होत नाही, तोपर्यंत ‘मातृभाषेतून शिक्षण’ या वैज्ञानिक विचाराला वास्तव जगात आधार मिळणं कठीण आहे.

एक गोष्ट मात्र खरी की, स्व-भाषेच्या अतिरिक्त हव्यासापायी आणि स्वभाषेबद्दलच्या निष्काळजीपणापायी आपण अनेक वेळा सांस्कृतिक हत्या करीत असतो, हे राज्यकर्त्यांच्या गावीही नसते. महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमाभागातले उदाहरणच पाहा. सीमावर्ती भाग म्हटलं की द्विभाषिकांची वस्ती असणारच. असे असताना त्या त्या सीमावर्ती भागातल्या संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठी त्या त्या भाषकांना स्वातंत्र्य दिले पाहिजे. कर्नाटकातल्या मराठी भाषकांना आणि महाराष्ट्रातल्या कन्नड भाषकांना (सीमावर्ती भागातल्या) आपली भाषिक संस्कृती जपून ठेवण्यासाठी, खरे तर स्थानिक शासनांनी मदत केली पाहिजे. अशा सीमावर्ती भागांची तर त्या त्या शासनाने विशेष दखल घेऊन द्वैभाषिक संस्कृती टिकवली पाहिजे. त्यासाठी तीव्र संघर्ष करावा लागूनही पदरी काहीच न पडल्याची निराशाही धोकादायक आहे.

राज्यांच्या सीमावर्ती भागातली संमिश्र संस्कृती, ही केव्हाही त्या त्या राज्याचे भूषण ठरायला हवी. पण चित्र उलटेच आहे. राज्यकर्त्यांच्या अशा असंस्कृत धोरणामुळे भाषिक आणि सांस्कृतिक हत्या होत आहेत.

अमेरिकन प्रोफेसर पॉल ब्रास यांनी भारतातील भाषा-व्यवहाराचा अभ्यास केला आहे. पण ‘‘आपली राहणी सुधारण्यासाठी, सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्यासाठी मातृभाषेचा त्याग करायला काही हरकत नाही.’’ हे त्यांचे मत भावनाशून्य आणि केवळ बुद्धिजीवी लोकांचे प्रतिनिधित्व करणारे आहे. आपल्या मातृभाषेचा त्याग करण्याचा सल्ला जो देतो, त्याला मातृभाषेबद्दलच्या भावना काय कळणार? उपयुक्ततावादापलीकडेही जीवनदृष्टी असू शकते, हे केवळ बुद्धिवाद्यांना कळणारच नाही.

आपण बर्‍याच वेळा परराज्यातल्या विद्वानांना विशेष व्याख्यानांसाठी बोलावीत असतो. शेजारच्या राज्यातील विद्वानांना तरी एकमेकांची भाषा अवगत असायला हवी. पण दुर्दैव असे, की आपल्याच देशबांधवांशी थेट संवाद साधायचा असेल तर, या विद्वानांना इंग्रजीचा आधार द्यावा लागतो. आणि हल्ली ‘नॅशनल सेमिनार’ या नावाखाली जे देखावे केले जातात त्यात भाग घेणार्‍या स्थानिक प्राध्यापकांनासुद्धा इंग्रजीत केलेली भाषणे कळत नाहीत. सगळ्यात गंमत म्हणजे, अशा वेळी भाषाभिमान्यांनी इंग्रजीतून बोलण्याचा आग्रह करावा, हे तर न सुटणारे कोडे आहे.

आजचा तरुण-वर्ग परकी भाषा, विशेषत: जपानी, चिनी, जर्मन, फ्रेंच, पोर्तुगीज या भाषा अत्यंत आवडीनं आणि अभिमानानं, त्या त्या देशात मिळू शकणार्‍या नोकर्‍यांच्या आशेपोटी शिकत आहे. याउलट आपण आपल्याच देशातल्या किती राज्यांच्या भाषा एवढ्या अभिमानानं आणि आवडीनं शिकतो?

संयुक्त क्रियापदांचा पेच

चिन्मय धारूरकर

‘भाषा आणि जीवन’च्या वर्ष २८, अंक १ हिवाळा २०१० या अंकात रेणुका ओझरकर यांचा ‘‘मराठीतील ‘विवाद्य’ संयुक्त क्रियापदे’’ या शीर्षकाचा लेख आला आहे. या लेखात त्यांनी उमाकांत कामतांच्या एका लेखाचा उत्तम समाचार घेतला आहे आणि मुद्देसूदपणे कामतांच्या म्हणण्याचे खंडन केले आहे.

संयुक्त क्रियापदांची विवाद्यता ही भाषागत नसून सैद्धान्तिक अव्यवस्थेतून निपजते हे रेणुका ओझरकरांचे म्हणणे त्यांच्या संशोधनातील सैद्धान्तिक चौकटीबद्दलची जाण दाखवणारेच आहे.

अर्जुनवाडकरांनी (१९८७:१७८-१८४) केलेल्या संयुक्त क्रियापदांच्या ऊहापोहाचा संदर्भ लेखात नसावा हे मात्र खटकते. लेखाच्या अखेरीस (पृ० ३७, परिच्छेद दुसरा) एका ठिकाणी ‘उडी मारणे’ व ‘गाडी चालवणे’ याबद्दल जे लिहिले आहे त्या संबंधातील अडचणीबद्दल पुढे ऊहापोह केला आहे आणि संयुक्त क्रियापदांची व्याकरणातील व्यवस्था यावर चर्चा केली आहे.

‘उडी मारणे’ यात ‘उडी’ आणि ‘मारणे’ यात घनिष्ठ संबंध आहे म्हणजे काय? आणि गाडी चालवणे यात नाही म्हणजे काय? याचे एक स्पष्टीकरण असू शकते की, उडी आणि मारणे यांच्या विभिन्न / वेगवेगळ्या स्वत:च्या अर्थापासून जो बोध होतो तो त्यांच्या संयोगाने होत नाही तर तिसराच अर्थ व्यक्त होतो. हा तिसरा अर्थ निर्माण करण्याची जी शक्ती उडी मारणे, गप्पा मारणे, मांडी घालणे इ० क्रियापदांत असते त्या असण्याला आपण घनिष्ठ संबंध म्हणत आहोत. गाडी चालवणे यातील गाडीचा अर्थ आणि चालवणे याचा अर्थ बघता मिळून काही अगदी वेगळाच अर्थ निघत नाही तर ‘‘गाडी चालवणे’’ हाच निघतो. अर्थाच्या पातळीवरील हे तथ्य नजरेसमोर ठेवून आपण घनिष्ठ संबंध असे म्हणणार असलो तर यातून काही व्यवस्था हाती लागत नाही, कारण मुळात वेगळा अर्थ निघतो म्हणून ही संयुक्त क्रियापदं असं म्हणण्यात काही फार तथ्य नाही, कारण भाषेत वेगळा अर्थ संदर्भाने कथित संयुक्त नसणार्‍या क्रियापदाचाही निघू शकतो.
अर्जुनवाडकरांनी केलेली चर्चा पाहा : अर्जुनवाडकर (१९८७:१८०)

संयुक्त मानल्या गेलेल्या क्रियापदांना आपण जर गोठलेल्या रचना (फ्रोजन एक्स्प्रेशन्ज!) किंवा रूढीभूत रचना म्हणणार असलो तर अर्थविचार आणि व्याकरण यांना एकत्र आणत आहोत. तसे करताना बरीच सावधगिरी बाळगावी लागेल. मुळात संस्कृत आणि इंग्रजीच्या प्रभावात विकसित झालेली आपली मराठीची ‘अमराठी व्याकरणं’ इथे फसली आहेत. व्याकरण म्हणजे रूपांच्या निर्मितीचे नियमन करणारे शास्त्र अशी ढोबळ धारणा दिसून येते. ती काही अंशी पाणिनीय प्रभावातून आहे. पाणिनी बर्‍याचदा रूपलक्ष्यी भूमिका घेतो आणि महत्त्वाच्या घटकांना पदगती देण्यात धन्यता मानतो. पाणिनीला अर्थलक्ष्यी विचार (म्हणजेच सिद्ध पदांचे वा त्यांतील घटकीभूत अवयवांचे आर्थिक विश्लेषण) नको होता असं मुळीच नाही तर पद (पद म्हणजे १. तिङन्त म्हणजेच तिङ् इ० प्रत्यय ज्यांच्या अंती आहेत अशी धातुरूपे किंवा २. सुबन्त म्हणजे सूप् इ० प्रत्यय ज्यांच्या अंती लागलेले आहेत अशी नामरूपे व म्हणून भाषेत व्यवहारयोग्य असा शब्द) या संकल्पनेने रूपनिर्मिती, पदसिद्धीला होणारे फायदे (जसे की अव्ययांना सुबन्तत्व दिले की त्यांनाही पदसंज्ञा मिळते व पाणिनीय व्यवस्थेत त्यांसाठी वेगळी शब्दजाती लागत नाही इ०) पाहता, एक औपचारिक बांधिलकी म्हणून रूपलक्ष्यित्व प्राबल्याने दिसते. पाणिनीचा आणि संस्कृताचा उल्लेख झालाच आहे तर कथित ‘संयुक्त क्रियापदां’संबंधी पाणिनी काय म्हणतो या साहजिक प्रश्नाचा ऊहापोह करू. पाणिनीच्या व्याकरणातील रूपनिर्मितीच्या आणि पदसिद्धीच्या व्यापारात ‘संयुक्त क्रियापद’ अशी संकल्पना नाही. तिची मुळात पाणिनीय व्यवस्थेत गरजही नाही. ओझरकरांनी दिलेली ‘नमस्करोति’ आणि ‘प्रकटीकरोति’ ही संयुक्त क्रियापदे नाहीत असे म्हणता येणार नाही; परंतु, पाणिनीसाठी ती संयुक्त क्रियापदे नक्कीच नाहीत. ‘नम:’ व ‘प्रकटी’ दोहोंनाही रीतसर पदसंज्ञा प्राप्त होते आणि एक अव्ययपद म्हणून त्यांचे स्थान निश्चित होते. संस्कृत भाषा ही अर्थात पाणिनीच्या मालकीची नाही. पाणिनीने केवळ एक व्याकरणिक प्रारूप उभे केले आहे. ओझरकरांना किंवा आधुनिक भाषाविज्ञानाच्या चष्म्यातून बघणार्‍या कोणालाही जर संस्कृतातील अशा क्रियापदांची संगती ‘कॉम्प्लेक्स प्रेडिकेट’ म्हणजेच ‘संयुक्त क्रियापदे’ म्हणून लावायची असेल तर तो मार्ग खुला आहेच. भाषाविज्ञानात कॉम्प्लेक्स प्रेडिकेट्स आणि कम्पाउंड व्हर्ब्झ अशा दोन संज्ञा रूढ आहेत आणि त्या आलटून पालटून वापरल्या जातात. केवळ धातुरूपांचा संयोग असेल तर तिथे कम्पाउंड व्हर्ब (उदा० करत बसणे, उकरून काढणे इ०) ही संज्ञा वापरावी व नाम+धातुरूप (उदा० गप्पा मारणे, उडी मारणे इ०) अशा संयोगांसाठी कॉम्प्लेक्स प्रेडिकेट म्हणावे असा कल आहे, तसेच कॉम्प्लेक्स प्रेडिकेट्स हा मोठा संच मानून कम्पाउंड व्हर्ब्झ हा पोटप्रकार मानावा असाही प्रवाह आहे. या लेखात मात्र नाम +धातुरूप अशा रचनांचीच चर्चा आहे.
पाणिनीय प्रभावातून बाहेर पडून तसेच इंग्रजी व्याकरणाच्या अंधानुकरणातूनही बाहेर पडून आता जायचे कुठे असा प्रश्न आहे. एक उत्तर हे की आधुनिक भाषाविज्ञानात कॉम्प्लेक्स प्रेडिकेट्सची व्यवस्था वेगवेगळ्या सिद्धांतांमध्ये लावण्यात येते ती मराठीला लागू करून बघणे.

आपण काही एक भूमिका घेणार असू तरच हे सुरू करणे योग्य. मुळात संयुक्त क्रियापदे का मानू नयेत याची भरपूर समाधानकारक चर्चा अर्जुनवाडकर करतात. तिची पुनरुक्ती नको. संयुक्त क्रियापदे मानू नयेत यापक्षी भाषावैज्ञानिक विश्लेषणात्मक पुरावा व कारणमीमांसा अर्जुनवाडकर पुरवतात. हे जरा टोकाचे किंवा फारच रूपलक्ष्यी आहे. पण अर्जुनवाडकरांचे म्हणणे पटण्यासारखेच आहे. त्यामुळे एक भाषाविशेष आपण दुर्लक्षून टाकत आहोत असे वाटू शकते, पण त्याला इलाज नाही. कारण जर अर्थाचा असा विचार आपण व्याकरणात करत बसलो तर आलंकारिकांचे कामही आपण करून ठेवू, मग त्यांनी करायचे काय! असो. गमतीचा भाग बाजूला, पण आपणच उलटी भूमिका भक्कम करता येते का बघू आणि तसे करताना काय अडचणी येतात ते बघू.

संयुक्त क्रियापदे असतात असे मानू. ती लाक्षणिक अर्थाने कळून येतात यावर आपण जरा विचार करू. लाक्षणिक अर्थाने कळून येणे म्हणजे काय हा मूळ प्रश्न आहे तो आपण अर्जुनवाडकरांना विचारू शकतो. त्यावर ते आपले मम्मटाचे पुस्तकच आपल्या समोर ठेवतील. अर्थात ते योग्यच आहे. लक्षणार्थाने कळून येत नाहीत या दिशेने चर्चा पुढे जाऊ शकत नाही.
आधुनिक मनोलक्ष्यी भाषाविज्ञानाच्या अभ्यासपद्धती वापरल्यावर असे दिसून आल्यास नवल नाही की एखादा लाक्षणिक अर्थ मराठीत कळून येण्यास जेवढा (मिलीसेकंदाचा) वेळ लागतो तेवढाच वेळ या ‘लक्षणाभिव्यंजक’ संयुक्त क्रियापदांचा अर्थबोध होण्यास लागत नसून त्यापेक्षा बराच कमी लागतो. यालाच मुळी भाषाविज्ञानात गोठलेली रूढ (फ्रोझन), अभ्यासाने, सवयीने बांधलेली (फर्ॉम्युलैक) अशी विशेषणे वापरली जातात. शिवाय, मराठी भाषक ‘गप्पा मारणे’ याचा वापर करताना ‘चला जरा लक्षणा वापरू या’ किंवा ‘काय नवलाईनं प्रयोग करतो आपण’ असा दरवेळेस विचारही करत नाहीत, हे प्रयोग सवयीने सहज मुखावाटे बाहेर पडतात. म्हणजेच इथे लक्षणा गोठलेली आहे. इथे लक्षणा आहे याचे भानही वापरकर्त्यांना राहिलेले नसते.
असे असले म्हणून, उलटपक्षी कोणी असेही म्हणेल की ‘उडी मारणे, गप्पा मारणे’ यांत लक्षणा गोठलेली आहे आणि त्यांचा समग्रपणे एकत्रितच अर्थबोध होतो, त्यांतील नामांचा (उडी, गप्पा), क्रियापदांचा यांचा भिन्नत्वाने बोध होत नाही, तर त्यांना संयुक्त मानायचेच कशासाठी. म्हणजे संयुक्त क्रियापदे (नाम+क्रियापद प्रकारातले कॉम्प्लेक्स प्रेडिकेट्स) ही संज्ञाच टाळता येतील. पण असे म्हणणे सयुक्तिक नाही. कारण समग्रपणे जरी बोध होत असला तरी ती, ती नामे आणि क्रियापदे अस्तित्वात असतातच. आणि त्यांचा संयोग इथे होत आहे, म्हणून त्यांना संयुक्त म्हणण्यात वावगे काहीच नाही! पण हा युक्तिवादही फार तग धरू शकत नाही, कारण मूळ प्रश्न हा की गोठलेल्या लक्षणा आपले व्याकरण स्पष्टीकरणाच्या पातळीवर हाताळू शकते का? याचे सरळ उत्तर नाही, असे आहे. कारण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे गोठलेल्या लक्षणातील पदांच्या संयोगातून निर्माण होणार्‍या अर्थाविषयी काही निश्चयपूर्वक भाकीत करता येत नाही. याची जबाबदारी शेवटी कोशावर टाकावी लागते आणि वाक्प्रचार या कोटीतच त्यांची यादी द्यावी लागते.

सोस्यूरच्या चिन्हाच्या यादृच्छिकतेचा विशेष वाक्प्रचारांच्या संदर्भातही लागू ठरतो. गोठलेल्या लक्षणांची वासलात कोशात वाक्प्रचार या खाक्यात करणे म्हणजे एक प्रकारे त्यांची कोणतीही तार्किक मीमांसा न देता त्यांची यादृच्छिकता मान्य करण्यासारखेच आहे. दुसर्‍या एका दिशेने या गोष्टीचा विचार करता येईल. ती दिशा म्हणजे स्टिव्हन पिंकर यांनी दाखवलेली किंवा एस्पेरांतोच्या विकासातून स्पष्ट झालेली. त्यानुसार असे वाक्प्रचारात्मक प्रयोग निर्माण होणे हे भाषेचे भाषापणच आहे. मग त्या चिन्हभाषा असोत व एस्पेरान्तो सारख्या रचलेल्या भाषा असोत, त्यांना सुरुवातीला कितीही तर्काधिष्ठित अथवा दामटून नियमबद्ध करण्याचा प्रयत्न केला तरी (प्राय: चिन्हाच्या यादृच्छिकतेच्या तत्त्वामुळे) भाषेचा कल अधिकाधिक वाक्प्रचारात्मक होण्याकडेच असतो.

इथे एक तात्त्विक विसंगती जाणवू शकते. ती अशी की आपण गोठलेल्या लक्षणा म्हणण्यासाठी ज्ञानात्मक भाषाविज्ञानाची कास धरत आहोत. आणि संयुक्त क्रियापदे आहेत / असतात असे म्हणताना पारंपरिक व्याकरणात मानल्या जाणार्‍या पदजातींना ग्राह्य धरत आहोत. त्याचे कारण असे की ज्ञानात्मक व्याकरणे कशी लिहावीत [पाहा लँगॅकर (२००८), राडन आणि दिर्वें (२००७)] मानवी बुद्धिगत भाषिक प्रक्रियांचा व्याकरणगत अनुबंध कसा असावा याची थोडीफार स्पष्टता भाषाविज्ञानात असली तरी संयुक्त क्रियापदांची संगती लावण्यासाठी अखेरीस ‘लेक्सिकन’ वरच सगळी जबाबदारी टाकली जाते. तसेच, ज्ञानात्मक पातळीवर समग्रपणे बोध होणे वेगळे आणि मनोबाह्य (ज्ञानात्मक नसलेल्या) व्याकरणामध्ये नाम, क्रियापद या भिन्न पदजाती मानणे वेगळे. मूळ तिढा असा की या लक्षणेने कळून येणार्‍या त्यांची व्यवस्था आपण कोणत्याही प्रकारच्या व्याकरणात लावणार का आणि कशी? सत्तरच्या दशकात चॉम्स्कीच्या ‘रिमार्क्स ऑन नॉमिनलायझेशन’ या निबंधानंतर लेक्सिकलिझमची लाट आली आणि अशा प्रकारे व्यवस्था न लागणार्‍या घटकांची व्यवस्था (त्यांचे वाक्यातील वर्तन, त्यांच्यासोबत येऊ शकणारे शक्यतम कारकार्थ इ० तपशील) सरसकट लेक्सिकन (शब्दकोश)मध्ये असते असे सांगितले जाऊ लागले. हे प्रकार वाक्यविचाराने अर्थविचारातून आपले अंग काढून घेण्यातलेच होते.

संदर्भ :
अर्जुनवाडकर, कृ० श्री० १९८७. ‘मराठी व्याकरण : वाद आणि प्रवाद’. सुलेखा प्रकाशन, पुणे.
ओझरकर, रेणुका. २०१०. ‘मराठीतील विवाद्य संयुक्त क्रियापदे’. भाषा आणि जीवन : हिवाळा, अंक १, पृ० ३३-३८
चॉम्स्की, नोम. १९७०. ‘रिमार्क्स ऑन नॉमिनलायझेशन’ (संपा० आर याकोब्झ आणि पी रोझनबाउम) ‘रिडिंग्झ इन इंग्लिश ट्रान्सफॉर्मेशनल ग्रामर’ वॉल्टहॅम, मॅसॅचुसेट्स. गिन आणि कं०. पृ० १८४-२२१
राडन, ग्युंटर आणि दिर्वें, रेने. २००७. ‘कॉग्निटिव्ह इंग्लिश ग्रामर’, जॉन बेंंजामिन्झ पब्लिशिंग कंपनी, ऍमस्टर्डॅम.
लँगॅकर. २००८. ‘कॉग्निटिव्हर ग्रामर : अ बेसिक इंट्रडक्शन’ ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, न्यु यॉर्क.

मराठी कोशवाङ्मयातील मौलिक भर

कलिका मेहता

(परीक्षित पुस्तक : भूगोल कोश, लेखक : एल०के० कुलकर्णी. प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे. पहिली आवृत्ती २००९, पृष्ठे २३ + ३४८ किंमत ` ४००)

ज्ञानभाषा म्हणवून घेण्यासाठी केवळ इंग्रजी हीच योग्य भाषा आहे अशी ओरड करणार्‍यांना एल०के० कुलकर्णी यांचा भूगोलकोश हे सणसणीत उत्तर आहे. वर्षभरात निघालेल्या दोन आवृत्त्या ही भूगोलकोशाच्या यशाची वाचकांनी दिलेली पावतीच आहे.

लेखक स्वत: पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक असून त्यांनी जवळजवळ २५ वर्षे भूगोलाचे अध्यापन केले आहे. त्यामुळेच शालेय स्तरापासूनच उपेक्षित राहिलेल्या या विषयाच्या अध्ययन-अध्यापनातील नेमक्या अडचणी त्यांच्या लक्षात आल्या. त्यांच्या लेखी भूगोल हा सामाजिक शास्त्रांमधील केवळ ४० गुणांइतकेच महत्त्व असणारा विषय नसून जीवनाच्या प्रत्येक अंगाला व्यापून टाकणारी संकल्पना आहे.

भूशास्त्र, हवामानशास्त्र, खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र इ० विज्ञानशाखांमधील माहिती व संकल्पनांना भूगोलात अनन्यसाधारण महत्त्व आहे पण त्याबद्दलची जास्तीत जास्त अचूक व परिपूर्ण शास्त्रीय माहिती एकत्रितपणे देणारा असा एकही संदर्भग्रंथ मराठीत तर नाहीच पण इंग्रजीतही नाही. वरील विषयांच्या संदर्भग्रंथातूनच त्याविषयी माहिती मिळवावी लागते.

या समस्येवर उत्तर शोधण्याच्या तळमळीतून आणि आपल्या व्यवसायाबद्दलच्या व विषयाबद्दलच्या निष्ठेतून अध्यापक, विद्यार्थी आणि आजूबाजूच्या घडामोडींकडे कुतूहलपूर्ण नजरेने पाहणारा सामान्य माणूस अशा विस्तृत वाचकवर्गाच्या गरजा एकाच वेळी पुरवणार्‍या दर्जेदार कोशाची निर्मिती झाली. मराठी भाषेच्या कोशदालनात अत्यंत मौलिक अशी भर पडली व भूगोल हा एक विषय न राहता विज्ञान बनले. या कोशनिर्मितीचे वेगळेपण म्हणजे हे वेळखाऊ, खर्चिक काम लेखकाने ११ वर्षांच्या दीर्घ कालावधीत एकट्याने, एकाहाती पूर्ण केले आहे.
या कोशात ३५० भौगोलिक नोंदींचे (त्यांचा उल्लेख लेखकाने ‘संबोध’ असा केला आहे.) स्पष्टीकरण व माहिती दिली आहे. हे संबोध खगोलशास्त्र, भूशास्त्र, भौतिकशास्त्र, हवामानशास्त्र, पाषाणशास्त्र, सागरशास्त्र, भूकंपशास्त्र, जग व भारतातील विविध स्थळे, पर्वत, नद्या, सरोवरे इ०विषयी आहेत. मनोगत, भूमिका, ऋणनिर्देश व कोशवापरासाठीच्या उपयुक्त सूचनानंतर येणार्‍या अनुक्रमणिकेत सर्व संबोधांची यादी वर्णानुक्रमे दिली आहे. संबोधांची ही यादी पाहिली तरीही कोशातील विषयांचा आवाका लक्षात येतो. यात पाऊस, वारे, ढग अशा रोजच्या विषयांपासून भूकंप, त्सुनामी, चक्रीवादळ अशा अस्मानी आणि ओझोनचा थर, जल व मृदा संधारण, भूतापवृद्धी, प्रदूषण अशा मानवनिर्मित संकटांचा ऊहापोह केला आहे. पण त्यात फक्त भौगोलिक बाबी नसून अमेरिका खंडाच्या अंतर्भागाचा शोध घेणारा अमेरिगो व्हेस्पुसी, नकाशातज्ज्ञ गेरहार्ट मर्केटर, मार्को पोलो, शेर्पा तेनसिंग अशा संशोधकांच्या विक्रमवीरांच्या नोंदी आहेत. एखाद्या विशिष्ट नदीची माहिती देताना सोबतच्या चौकटीत तिचा उगम, लांबी, खोर्‍याचं क्षेत्रफळ, मुख, तिच्या उपनद्या इतकेच नव्हे तर तिच्या काठावरची महत्त्वाची तीर्थक्षेत्रे व शहरे ही माहितीही दिली आहे. अगदी गंगा नदीच्या शुद्धीकरण योजनेबद्दलही एक स्वतंत्र नोंद केली आहे. ग्रहांच्या माहितीबरोबर त्यांची सूर्यापासूनची सरासरी, कमाल व किमान अशी तीनही अंतरे दिली आहेत.

हा कोश परिणामकारक तर आहेच परंतु त्यातील चित्रांमुळे तो रंजकही झाला आहे. गंगोत्री, कैलास पर्वत, सर्वांत उंच शिखर के-टू, एव्हरेस्ट, गिरसप्पा धबधबा या भारतातल्या प्रसिद्ध स्थळांबरोबरच चीनची भिंत, ग्रँड कॅनियन अशा सर्वसामान्यांचे आकर्षण ठरलेल्या ठिकाणांचीही चित्रे यात आहेत. माहिती सर्वप्रकारे कळावी म्हणून ज्वालामुखी, धुमकेतू तारकाविश्व, ग्रहांचे मोठे उपग्रह इ० चित्रेही आहेत. काही संकल्पना उदा० गटपर्वत, खारे-मतलई वारे, गारांची निर्मितिप्रक्रिया आकृत्यांमधून स्पष्ट केल्या आहेत. कोशाचा विषयच भूगोल असल्यामुळे नकाशे हा अविभाज्य भाग तर आहेच.

लेखकाने आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितल्याप्रमाणे सर्वसामान्य वाचक डोळ्यांसमोर असल्याकारणाने सुबोध, साध्या-सोप्या, सुटसुटीत पण नेमका अर्थ व्यक्त करणार्‍या भाषेचा निकष परिभाषा बनवतानाही लावला आहे. फक्त परिभाषाच नव्हे तर माहिती देतानाही केवळ बुद्धिमत्तेचे व व्यासंगाचे प्रदर्शन न करता कोशाचा उपयोग करणार्‍याची आकलनक्षमता लक्षात घेतली आहे. त्यामुळे कोशाची वाचनीयता वाढली आहे. हे या कोशाचे बलस्थान आहे. संबोधानंतर शब्दार्थ व टिपा हा विभाग असून त्यामध्ये कोशातील विवेचनात आलेले असे अनेक शब्द आहेत की ज्यांचा अर्थ वाचकाला समजणे आवश्यक आहे. उदा० अल्पाईन वनस्पती, बर्फ, पिग्मी, सुंद्री, सूचिपर्णी इ० ह्या शब्दांच्या बरोबरीने एडमंड हिलरी, शीतल महाजन अशा धाडसी वीरांचीही माहिती दिली आहे.
या माहितीनंतर एकूण ८ परिशिष्टे असून त्यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रमाण एकके व व्यावहारिक एकके, मोजमापे, रूपांतरणे, उपग्रहांची खगोलशास्त्रीय माहिती, धूमकेतू व उल्कावर्षाव, तेजस्वी तारे, जगातील समुद्र, जगातील देश, त्यांच्या राजधान्या, जागतिक आश्चर्ये इ० अत्यंत उपयुक्त व म्हटले तर वाचकाच्या सामान्यज्ञानाची चाचणी घेणारी पण सहसा कुठेही उपलब्ध नसणारी अशी माहिती देण्यात आली आहे. सहाव्या व सातव्या परिशिष्टात प्रत्येक सामान्य नागरिकाला माहीत असायलाच हवी अशी भारताची माहिती एकत्रितपणे दिली आहे. त्यात नद्यांच्या खोर्‍यांतील प्रकल्पांबरोबरच राज्ये, संघराज्ये त्यांचे क्षेत्रफळ, लोकसंख्या, राजधान्या, जिल्हे, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने यांचाही समावेश आहे. शेवटच्या परिशिष्टात भूगोल व खगोलशास्त्राच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण घटनांचा कालपट वाचकांसमोर उलगडला आहे.

त्यानंतर इंग्रजी शब्दांना मराठीत रूढ असलेले द्वीपकल्प, भूशिर यांसारखे वा नव्याने घडवलेले तारकाविश्वासारखे (गॅलक्सी) पारिभाषिक शब्द दिले आहेत. सर्वांत शेवटी इंग्रजी व मराठी संदर्भग्रंथांची यादी आहे.

एकूणच या प्रचंड माहितीसंकलनाला लेखकाने जरी भूगोलकोश म्हटले असले तरी त्याचे स्वरूप ज्ञानकोशाच्या धर्तीचे आहे. ज्ञानकोशाचा आकार महत्त्वाचा नसून त्यामध्ये समाविष्ट ज्ञानाची व्याप्ती पाहिली जाते. ज्ञानकोशाच्या व्याख्येनुसार ज्ञानकोश हा जगाचे यथार्थ, आहे तसे दर्शन घडवणारा जणू आरसाच असतो. चित्रे, नकाशे, आकृत्या, तक्ते, संख्याशास्त्रीय कोष्टके यांची मदत घेऊन त्या त्या बाबीबद्दलची उपलब्ध असलेली सर्व गाभाभूत माहिती सुव्यवस्थितपणे मांडून वाचकांसमोर ठेवणे व त्यायोगे मानवजातीच्या विकासाच्या दिशेने पाऊले उचलणे; हे त्याचे व्यवच्छेदक लक्षण असते.

हा कोश विद्यार्थ्यांना व जिज्ञासूंना भूगोलाच्या अभ्यासाची गोडी लावेल. भूगोलाच्या अभ्यासासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने उचललेले हे पहिले पाऊलच आहे असे समजायला हरकत नाही. विद्यार्थी, भूगोल अभ्यासक यांच्या बरोबरीन सवर्ससामान्य रसिक वाचकाने संग्रही ठेवावा असा हा भूगोल कोश आहे.

अभ्यासकांसाठी मोलाचे भाषांतर

म०के० ढवळीकर

(परीक्षित पुस्तक : भारतीय लेखविद्या, दिनेशचंद्र सरकार. मराठी भाषांतर : डॉ० शोभना गोखले. काँटिनेंटल प्रकाशन, पुणे. पृ० ४७८ + चित्रे. किंमत दिलेली नाही.)

प्रा० (कै०) दिनेशचंद्र सरकार हे जगविख्यात भारतीय पुरालिपी तज्ज्ञ होते. ते निष्णात संस्कृत पंडितही होते. काही काळ ते कोलकाता विद्यापीठात प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती या विषयाचे प्राध्यापक होते. नंतर त्यांनी अनेक वर्षे भारत सरकारच्या पुरातत्त्व खात्यात प्रमुख लिपितज्ज्ञ म्हणून काम केले. ‘पिग्राफिया इंद्रिकाए’ हे त्या खात्याचे मुखपत्र, त्याचे ते संपादक होते. त्याच्या प्रत्येक अंकात बहुसंख्य लेख डॉ० सरकारांचे असत. त्यामुळे काही विद्वान त्याला ‘एपिग्राफिया सरकारीका’ म्हणत असत.) डॉ० सरकार यांनी आपल्या हयातीत शेकडो कोरीव लेख प्रसिद्ध केले; त्यातील पुराव्यांच्या आधारे प्राचीन भारतीय इतिहासावर प्रकाश टाकणारे लेख लिहिले आणि अनेक ग्रंथही प्रसिद्ध केले. केंद्रसरकारच्या सेवेतून निवृत्त झाल्यावर त्यांना कोलकाता विद्यापीठाने पुन्हा प्राध्यापक नेमले. प्राचीन लेखांच्या अभ्यासकांत ते अग्रगण्य होते. त्यांनी लिहिलेले ग्रंथ जगातील अनेक विद्यापीठांत अभ्यासासाठी नेमले आहेत. त्यांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा म्हणजे ‘इंडियन एपिग्राफी’ त्याचे मराठी भाषांतर डॉ० शोभना गोखले यांनी केले आहे. प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृतीच्या मराठी भाषिक अभ्यासकांसाठी हे भाषांतर अत्यंत मोलाचे ठरेल यात शंका नाही.

डॉ० सरकार हे स्वत: शिक्षक असल्यामुळे ग्रंथाची रचना त्यांनी विद्यार्थ्यांच्या सोयीची केली आहे. एकूण आठ प्रकरणांपैकी पहिल्यात भारतीय पुराभिलेखांचे स्वरूप, इतिहासाची जुळणी करण्याकरता त्यांचा होणारा उपयोग, याची चर्चा केली आहे. या प्रकरणाच्या परिशिष्टात हिंदु-मुस्लिम पुराभिलेखांचीही माहिती आहे. दुसर्‍या प्रकरणात लेखांच्या आर्य आणि द्राविडी भाषांचे वर्णन आहे. प्रथम प्राकृत, नंतर संस्कृत आणि पुढे सहाव्या शतकापासून प्रादेशिक भाषांत लेख लिहिण्यास सुरुवात झाली. लेखनासाठी भूर्जपत्रापासून ताम्रपटापर्यंत लेखनसाहित्य कसे वापरले जात असे हे तिसर्‍या प्रकरणात विशद केले आहे. चौथ्या प्रकरणात लेखनाची चर्चा आहे. यापुढील प्रकरण (पाचवे) अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यात ताम्रशासनांसंबंधी माहिती आहे. ताम्रशासनाचे प्रकार, त्यांचे स्वरूप, त्यांतील मजकूर-विशेषत: सुरुवातीचा आणि शेवटचा - त्यावरील राजमुद्रा यांचे तपशीलवार वर्णन आहे.

या ग्रंथाचे एक महत्त्वाचे वैशिष्टय हे की, त्यात परदेशातील भारतीय अभिलेखांचीही माहिती दिली आहे. प्राचीन काळी धर्मप्रसारासाठी आणि व्यापारासाठी भारतीय मोठ्या संख्येने भारताबाहेर अनेक ठिकाणी गेले. आग्नेय आशियात तर त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या. तेथील लोकांना त्यांनी धर्म, भाषा, लिपी, कला दिल्या. त्यांना संस्कृती दिली. त्याचे अवशेष आजही शिल्लक आहेत. भारतीयांनी तेथे राज्य स्थापन केले. शेकडो संस्कृत लेख आजही तेथे उपलब्ध आहेत. त्यांची माहिती सहाव्या प्रकरणात आहे.

प्राचीन लेखांची कालनिश्चिती हे अत्यंत जिकिरीचे काम असते. त्यात निरनिराळ्या कालगणनांचा उल्लेख असतो. आजही आपण शक आणि संवत यांची गल्लत करतो. अनेक राजांनी शककर्ता बनून आपल्या राज्यरोहणापासून आपल्या नावाने शक सुरू केले. त्या सर्वांची माहिती सातव्या प्रकरणात मिळते. शेवटच्या (आठव्या) प्रकरणात पारिभाषिक शब्दप्रयोग दिले आहेत. ग्रंथाच्या शेवटी महत्त्वाच्या कोरीव लेखांची व राजमुद्रांची चित्रे आहेत. त्यामुळे ग्रंथ परिपूर्ण झाला आहे.

भारतात प्राचीन कोरीव लेख हजारोंनी उपलब्ध आहेत आणि दरवर्षी नव्याने शेकडो सापडतात. त्या सर्वांचे परिशीलन करून त्यावर ग्रंथ लिहिणे हे केवळ प्रा० सरकारच करू शकले. या विषयावरचे इतरांचे काही थोडे ग्रंथ उपलब्ध आहेत; परंतु प्रस्तुत ग्रंथाच्या तुलनेत ते तोकडे वाटतात. तेव्हा हा उत्कृष्ट आणि अत्यंत उपयोगी ग्रंथ लिहिल्याबद्दल या विषयाचे अभ्यासक प्रा० सरकारांचे ऋणी आहेत.
डॉ० सरकार यांच्यासारख्या प्रकाण्डपण्डिताच्या ग्रंथातील उणिवा काढणे धाडसाचे ठरेल. परंतु काही शंका निर्माण होतात. उदाहरणार्थ, सातवाहन आणि क्षहरात यांचे लेख - जे महाराष्ट्रातील लेण्यांत आढळतात- ‘‘मूळ ताम्रपटांवर असलेल्या राज्यशासनाच्या प्रतिकृती आहेत.’’ हे विधान पटण्यासारखे नाही (पृ० १०४). एकतर यांपैकी काही लेख खूप मोठे आहेत, ते लिहिण्यासाठी अगणित पत्रे लागले असते; आणि तसे असते तर एखादा तरी पत्रा आजवर सापडला असता. तेव्हा ते प्रथम कापडावर लिहून नंतर कोरक्याला दिले असावेत.

या पाचशे पानांच्या ग्रंथाच्या भाषांतराचे कामही सोपे नव्हते. डॉ० शोभना गोखले हा विषय अनेक वर्षे स्नातकोत्तर विद्यार्थ्यांना शिकवत होत्या. त्यांनी भाषांतर सुबोध केले आहे. परंतु एकदोन सूचना कराव्याशा वाटतात. ‘डेटिंग’ला ‘दिनांक’ ऐवजी ‘कालोल्लेख’ हा शब्द अधिक योग्य वाटतो. ‘फलक’ (पृ० १३२) म्हणजे तांब्याचा पत्रा नसून लाकडी फळी असावी. तसेच काही ठिकाणी ‘नीट सांगितले नाही’ अशा शब्दप्रयोगाऐवजी ‘स्पष्ट दिलेले नाही’ असे भाषांतर अधिक योग्य वाटते. परंतु एकूण भाषांतर उत्कृष्ट व वाचनीय झाले आहे, यात शंका नाही.

राज्य मराठीचे... इंग्रजी शाळांचे

प्रकाश परब

नवीन मराठी शाळांना परवानगी नाकारून आणि शासनमान्य नसलेल्या प्रयोगशील मराठी शाळांना टाळे लावण्याची धमकी देऊन महाराष्ट्र शासनाने सुवर्णमहोत्सवी वर्षांत मराठी भाषिक राज्याच्या स्थापनेसाठी प्राणांची आहुती देणार्‍या हुतात्म्यांना अभूतपूर्व अशी आदरांजली वाहिली आहे. मराठी शाळांबाबत पारतंत्र्याच्या काळातील ब्रिटिश सरकारलाही लाजवणारे धोरण स्वीकारून राज्य सरकारने साडेदहा कोटी महाराष्ट्रीय जनतेचा अपमान केला आहे.
मराठी शाळांवरील बंदी तात्पुरती असून बृहत् आराखडा तयार झाल्यानंतर मराठी शाळांना परवानगी देण्याचा विचार करू असा खुलासा राज्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री करीत असले तरी मुळात मागेल त्याला इंग्रजी शाळा व मराठी शाळांच्या परवानगीला स्थगिती हा आगाऊपणा झालाच कसा; हा प्रश्न उरतोच. मागे खुद्द शिक्षणमंत्र्यांनीच मराठी शाळा हे एक ओझे असल्याचे जाहीरपणे म्हटले होते. आता लोकांनाच मराठी शाळा नको आहेत तर शासन दुसरे काय करणार; असा बचावही शासनामार्फत केला जातो. लोकांची मागणी लक्षात घेऊन काही महापालिकांनी मराठी शाळांचे इंग्रजी शाळांत रूपांतर केलेलेही आपण पाहातो. हे काय चालले आहे? आणि याची परिणती कशात होणार आहे? यासाठीच महाराष्ट्र या भाषिक राज्याची स्थापना झाली का? इंग्रजी शाळांची मागणी करणारे कोण लोक आहेत? लोकांना मराठी शाळा खरेच नको असतील तर त्या का नको आहेत, याचा शासनाने कधी विचार केला आहे काय?
मराठी शाळा दोन कारणांसाठी आवश्यक आहेत. एक - मातृभाषेतून शिकण्याचा आपला अधिकार अबाधित ठेवण्यासाठी, आणि दोन - मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी.

मातृभाषेतून शिक्षण या संकल्पनेला व्यक्तिगत व सामाजिक परिमाणे आहेत. व्यक्तीच्या सर्जनशीलतेचा, तर्कबुद्धीचा जलद व स्वाभाविक विकास तिची जन्मापासून सोबत करणार्‍या मातृभाषेत जितका होईल तितका तो परभाषेतून होणार नाही. शिक्षण हे जर माणसातील पूर्णत्वाचे प्रकटीकरण असेल तर ते सिद्ध होण्यासाठी मातृभाषेसारखे दुसरे माध्यम नाही. शिक्षणातील आणि एकूणच मानवी जीवनातील मातृभाषेचे हे महत्त्व ओळखून तिला मातृभूमीप्रमाणे व्यक्तिगत, तात्कालिक उपयुक्ततेपलीकडचे मूल्य प्राप्त झालेले आहे. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण हा व्यक्तीचा केवळ विशेषाधिकार न राहता ते एक सामाजिक, सांस्कृतिक दायित्वही बनते. मातृभाषेतून न शिकल्यामुळे व्यक्तिविकासाला मर्यादा तर पडतातच; पण एका अलिखित सामाजिक कराराचा भंगही होतो. महाराष्ट्रात मराठी शाळांतून शिकणे हा एक सामाजिक करार आहे आणि त्याचे पालन सर्वांनीच केले पाहिजे.

मराठी शाळांचा प्रश्न हा केवळ शैक्षणिक प्रश्न नाही. तो सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक प्रश्नही आहे. १९६० साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली ती केवळ प्रशासकीय सोय नव्हती तर जगातील प्रमुख २५ भाषांपैकी एक आणि थोर ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठी भाषेच्या स्वतंत्र राज्याची स्थापना होती. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आणि लोकभाषा आहे. तिचे जतन आणि संवर्धन करणे हे आपणा सर्वांचेच कर्तव्य आहे आणि तो पार पाडायचे म्हणजे मराठी भाषेचा शक्य तितक्या सर्व व्यवहारांत गुणवत्तापूर्ण वापर करणे. असा वापर करायचा म्हणजे मराठी शिकणे व शिकवणे आलेच. भाषेचा अध्ययन-अध्यापन व्यवहार कोणत्याही भाषेच्या संवर्धनासाठी आवश्यक असतो. भाषेचे पिढ्यांतर्गत संक्रमण कोणत्याही भाषेच्या अस्तित्वाच्या व विकासाच्या केंद्रस्थानी असते असे भाषेचे अभ्यासक सांगतात. एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे भाषेचे संक्रमण करण्यासाठी ती भाषा शिक्षणाचे माध्यम असावी लागते. केवळ एक विषय म्हणून तिचा अभ्यास पुरेसा नाही. भाषेचा अध्ययन-अध्यापन व्यवहार नसेल तर तिच्या अन्य व्यवहारांना उत्तरोत्तर गळती लागते व ते कालान्तराने नष्ट होतात. मराठी नाटक, चित्रपट, साहित्य, पत्रकारिता व अन्य सार्वजनिक व्यवहार हे मराठी शिक्षणावर आणि अधिक नेमकेपणाने बोलायचे तर मराठी शाळांवर अवलंबून आहेत. जणू मराठी शाळा या मराठी भाषेची मुळे आहेत, तीच नष्ट झाली तर मराठी भाषावृक्षाचा वरचा विस्तार हळूहळू मातीला मिळेल. मराठी शाळा वाचवल्या पाहिजेत, वाढवल्या पाहिजेत. कारण त्यांच्यावरच मराठी भाषेचे भवितव्य अवलंबून आहे. म्हणूनच शिक्षणाच्या माध्यमाबाबत तटस्थ राहून मागणी तसा पुरवठा असे धोरण स्वीकारता येणार नाही. मराठी ही महाराष्ट्राची भाषिक, सामाजिक व सांस्कृतिक ओळख आहे. ती अबाधित व वर्धिष्णू ठेवायची असेल तर मराठी शाळांचा प्रश्न युद्धपातळीवर सोडवला गेला पाहिजे. जागतिकीकरणामुळे वाढलेले इंग्रजी भाषेचे प्रस्थ, शिक्षणाचे खासगीकरण, मराठीशी सोयरसुतक नसलेल्या अन्य भाषकांचे राज्यातील वाढते स्थलांतर आणि राजकीय इच्छाशक्तीचा संपूर्ण अभाव यामुळे मराठी भाषेपुढे ‘न भूतो’ असे आव्हान उभे राहिले आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ मराठी भाषिक राज्याच्या स्थापनेसाठी होती. आता तेवढीच मोठी चळवळ उभारण्याची गरज आहे ती मराठी राज्य टिकविण्यासाठी. भाषेकडे तटस्थपणे पाहणार्‍यांना आणि स्वभाषेविषयी कसलाच मूल्यभाव नसणार्‍यांना ही कदाचित अतिशयोक्ती वाटेल. पण मराठी शाळांची ही लढाई आपण हरलो तर मराठीची अख्खी लढाई आपण हरल्यासारखे आहे. मराठी शाळा हा मराठीचा आत्मा आहे. तो जपला पाहिजे.

मात्र राज्यशासनाने मराठी शाळांना परवानगी न देण्याचे आपले धोरण बदलले तरी मराठी शाळा टिकतील असे समजणे भाबडेपणाचे ठरेल. मराठी शाळांचा लोकाश्रय वाढून त्यांना इंग्रजीप्रमाणे सामाजिक स्वीकृती व प्रतिष्ठा मिळायची असेल तर पन्नास टक्के सक्ती आणि पन्नास टक्के संधी हे धोरण स्वीकारावे लागेल. लोकांना इंग्रजी शाळा का हव्यात? त्यांना इंग्रजीविषयी प्रेम आहे म्हणून? मुळीच नाही. भाषा अस्मितेवर जगत नाहीत. त्या लोकांच्या पोटावर जगतात. इंग्रजी ही पोटापाण्याची, अर्थार्जनाची, सुखसमृद्धीची भाषा आहे. मराठी भाषेने याबाबतीत उपयुक्ततेचा नीचांक गाठलेला आहे आणि म्हणून लोक असहायतेपोटी इंग्रजीकडे वळत आहेत. मराठीचा अभिमान बाळगणार्‍यांची मुलेही इंग्रजी माध्यमात शिकतात हा विरोधाभास त्यातूनच निर्माण झालेला आहे. पण मराठी शाळांवर ही पाळी कोणी आणली? साठ-सत्तरच्या दशकात प्रगतिपथावर असलेल्या मराठी शाळांना आताच का घरघर लागावी? गेल्या दोन दशकांत असे काय घडले म्हणून लोकांचा मराठी शाळांवरचा विश्वास उडाला? या काळात मराठी भाषेचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी राज्य शासनाने कोणती सकारात्मक पावले उचलली? मराठीचे व्यावहारिक कुपोषण करून जगण्यासाठी एक निरुपयोगी भाषा अशी तिची प्रतिमा कोणी निर्माण केली?

मराठी माणूस मराठी शाळांपासून खुशीने दूर गेलेला नाही, तर राज्यशासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठीचे काही खरे नाही अशी हाय खाऊन त्याने इंग्रजी शाळांचा रस्ता धरलेला आहे. केवळ उच्चभ्रूच नव्हे तर तळागाळातील लोकांनीही आपल्या सामाजिक आणि आर्थिक अभ्युदयाची भाषा म्हणून इंग्रजीचा स्वीकार केला आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये हे प्रमाण इतके वाढले की मराठीवरील प्रेमापोटी मुलांना मराठी शाळांत पाठवणारे पालक मागासलेले व वेडे ठरू लागले! अशी परिस्थिती केवळ आपल्याकडेच आहे असे नसून भारतातील इतर प्रांतांत विशेषत: मागासलेल्या राज्यांतही आढळते. मध्यंतरी राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या दौर्‍यावर असताना एका खेड्यात उतरले. एका पददलित लेकुरवाळ्या महिलेची विचारपूस करताना मुले कोणत्या माध्यमात शिकतात म्हणून सहज विचारले. ती म्हणाली, ‘‘इंग्रजीत’’. राहुल गांधींनी आश्चर्याने विचारले, ‘‘इंग्रजीतच का हिंदीतून का नाही?’’ त्यावर या महिलेने जे उत्तर दिले ते भारतातील प्रादेशिक भाषांच्या अवनतीचे व इंग्रजीच्या वाढत्या प्रभावाचे मर्म सांगणारे आहे. ती महिला म्हणाली ‘‘तुम्ही लोक चॉकलेटच्या वेष्टनावरही इंग्रजीतून लिहिणार मग आमच्या मुलांनी हिंदीत शिकून करायचे काय?’’ पोटा-पाण्याचे व्यवहार ज्या भाषेत होत नाहीत ती भाषा कोण आणि कशासाठी शिकणार?

मराठी शाळा वाचवायच्या असतील तर शाळांवर इलाज करून चालणार नाही; त्यासाठी व्यवहारातील मराठीवर इलाज करावा लागेल. मराठी भाषेचे व्यावहारिक, आर्थिक सक्षमीकरण करावे लागेल. म्हणजे प्रशासनाप्रमाणेच राज्यांतर्गत उद्योग, वाणिज्य, विज्ञान, तंत्रज्ञान, उच्च व व्यावसायिक शिक्षण, न्यायालयीन व्यवहार यात मराठीचा जास्तीत जास्त वापर करावा लागेल. त्यासाठी सक्तीचा मार्ग अवलंबिण्यात काहीही गैर नाही. पण आपल्याकडे मराठीच्या बाजूने कायदे असूनही त्यांची अंमलबजावणी होत नाही. राज्यातील विद्यापीठांनी मराठीतूनही उच्च शिक्षण उपलब्ध करून द्यावे, असे विद्यापीठ कायदा सांगतो; पण प्रत्यक्षात विद्यापीठांनी इंग्रजीच्या वर्चस्ववादाला खतपाणी घातले. राज्यातील सर्व कनिष्ठ न्यायालयातील न्यायनिवाड्यांसह संपूर्ण कामकाज इंग्रजीऐवजी मराठीतून करावे असा राज्य शासनाचा व उच्च न्यायालयाचा आदेश आहे. पण तो संबंधितांनी धाब्यावर बसवला. राज्यातील केंद्रीय आस्थापनांनी आपल्या कामकाजात त्रिभाषा सूत्रानुसार मराठीचा वापर करावा अशी तरतूद असताना लिपिसाधर्म्याचा फायदा घेऊन केवळ इंग्रजी-हिंदीचा वापर करून मराठीची फसवणूक केली. मराठीच्या या व इतर व्यावहारिक अवमूल्यनामुळे लोकांची अशी समजूत झाली की, यापुढे इंग्रजी हीच व्यवहारभाषा असणार आहे. आपल्या राज्याला कसले भाषाधोरण नसल्याचा हा पुरावा आहे आणि आता तर लोकांनाच मराठीऐवजी इंग्रजी शाळा हव्या आहेत; असे सांगून राज्यकर्ते स्वत:च्या पापाचे खापर लोकांच्याच डोक्यावर फोडत आहेत.

दै० लोकसत्ता, दि० २२ नोव्हेंबर २०१०

हिपटुल्ला

सआदत हसन मंटो

“श्यामनं या पत्रात ‘हिपटुल्ला’ असा एक शब्दप्रयोग वापरला आहे. त्याचा अर्थ स्पष्ट करणं मनोरंजक आहे.”
मी बॉम्बे टॉकीजमध्ये नोकरीला होतो. त्या दिवसांत कमाल अमरोहीच्या ‘हवेली’ या चित्रपटकथेविषयी बोलणं सुरू होतं. (या कथेवरील चित्रपट ‘महल’ या नावानं नंतर प्रदर्शित झाला...)
सर्वसाधारण गप्पागोष्टीत वाङ्मयीन शब्दप्रयोग करण्याची कमाल अमरोहीला सवय आहे. माझ्यासाठी ते एक संकट असायचं...
एक दिवस सकाळी घरून बॉम्बे टॉकीजला निघालो तेव्हा ट्रेनमध्ये वर्तमानपत्रातील खेळाची बातमी देणारं पान उघडलं. ब्रेबॉर्न स्टेडियमवर क्रिकेटचा सामना सुरू होता. एका खेळाडूचं नाव फार विचित्र होतं : हिपटुल्ला - एचइपीटीयुएलएलएएचए हे नाव विचित्र का? याचा विचार करू लागलो. पण माझ्या डोक्यात प्रकाश पडेना. कदाचित हबेतुल्लाह या नावाचा अपभ्रंश असणार ते नाव असावं.

स्टुडिओत पोहोचलो. कमाल अमरोहीच्या कथेवर बोलणं सुरू झालं. कमालनं आपल्या खास साहित्यिक व प्रभाव पाडणार्‍या शैलीत एक प्रसंग ऐकवला. अशोकनं (अशोक कुमारनं) माझं मत विचारलं, ‘‘काय मंटो?’’
का कोण जाणे, माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले,
‘‘ठीक आहे. पण हिपटुल्ला नाही!’’
शेवटी जे काही सांगायचं होतं ते सांगून झालं. ‘हिपटुल्ला’ या शब्दप्रयोगातून ते व्यक्त झालं होतं. कथेतील प्रसंगाचा अनुक्रम लक्षात घेतला तर या प्रसंगात फार दम नाही, हे मला सांगायचं होतं.
‘‘काही वर्षांनंतर हसरत (गीतकार हसरत जयपुरी)च्या बाबतीत, त्याचा वेगळ्या प्रकारे उपयोग केला. त्यानं माझं मत विचारलं तेव्हा सांगितलं, ‘‘भाई हसरत काही जमलं नाही... काहीतरी हिपटुल्ला सारखं सादर कर. हिपटुल्ला...’’
दुसर्‍यांदा हिपटुल्ला म्हणून सर्वांची प्रतिक्रिया काय झाली ते पाहू लागलो. हा शब्दप्रयोग आता सर्वसामान्य झाला होता. त्यामुळे फारसा विचार न करता मी त्याचा उपयोग करू लागलो. ‘हिपटिलेटी’ नव्हे तर ‘हिपटोलाईज’ करायला हवं. इत्यादी इत्यादी. एक दिवस मला अशोकनं विचारलं,
‘‘हिपटुल्लाचा मूळ अर्थ काय आहे? कोणत्या भाषेत हा शब्दप्रयोग आहे?’’
अशोकनं मला अर्थ विचारला तेव्हा श्यामदेखील हजर होता. तो जोरजोरात हसू लागला. त्याचं डोकं आकुंचित झालं. त्या क्रिकेटपटूच्या विचित्र नावाकडे मी त्याचं लक्ष वेधलं, तेव्हा तो माझ्याबरोबर ट्रेनमध्ये होता. हसत हसत त्यानं सर्वांना सांगितलं,
‘‘ही मंटोची नवी मंटोगिरी आहे... त्याला काही ना काही नवं करायचं असतं... काही सुचलं नाही म्हणून त्यानं हिपटुल्लाला पकडून चित्रपटसृष्टीत आणलं आहे.’’
सांगायचं म्हणजे फारशी ताणातणी न होता हा शब्दप्रयोग मुंबईच्या चित्रपटसृष्टीतील शब्दप्रयोगात रूढ झाला.

(सआदत हसन मंटो - दस्तावेज खंड ५मधील ‘मुरली की धुन’ या प्रसिद्ध अभिनेता श्यामवरील लेखातून. मंटोच्या सर्व लेखनाचे एकूण ५ खंड ‘राजकमल प्रकाशन’नं प्रसिद्ध केले आहेत.)

Pages