लेखक-परिचय
आचार्य, (प्रा०) माधव नारायण : एम०ए०, मराठीचे निवृत्त प्राध्यापक. ‘अनुषंग’ (१९८१), ‘मराठी व्याकरण विवेक’ (१९९०, २००१), (महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक), ‘ज्ञानमयूरांची कविता’ (१९९३), ‘आर्याभारत : नवदर्शन’ (१९९७), ‘पञ्चपदवी ज्ञानदेवी’ (२००३), ‘ध्वनितांचे केणें’ (२००८) ही पुस्तके प्रकाशित. ‘मोरोपंतांची सतीगीते’ (१९८५, १९९४), ‘मोरोपंत विरचित संशयरत्नावली (१९८५), ‘मोरोपंतकृत श्लोककेकावली’ (१९९४) या पुस्तकांचे संपादक. पैकी शेवटच्या पुस्तकास महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेचे पारितोषिक. ‘पञ्चपदवी ज्ञानदेवी’ या ग्रंथाला महाराष्ट्र शासन पुरस्कार व संत साहित्य पुरस्कार. ‘ध्वनितांचे केणें’ या ग्रंथाला मराठी अभ्यास परिषदेचा पुरस्कार.
कोल्हटकर, अरविंद : पुणे विद्यापीठातून गणित या विषयात एम्०ए० पदवी (१९६४). रशियन भाषेचे प्रमाणपत्र व पदविका प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण (१९६५). केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण (१९६५). आयकर विभागातून आयुक्त-पदावरून स्वेच्छानिवृत्ती. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे चिटणीस म्हणून काही काळ काम. आता टोरांटो (कॅनडा)मध्ये स्थायिक. भारतीय भाषा व संस्कृती या विषयांवर विविध संकेतस्थळांवर प्रसंगोपात्त लेखन. kolhatkar.org हे स्वत:चे संकेतस्थळ.
गुंडी, (डॉ०) नीलिमा - स०प० कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदावरून निवृत्त. कविता, ललित व वैचारिक लेख, समीक्षा, संपादन या प्रकारांतील बारा पुस्तके प्रकाशित. लेखनाबद्दल दोन राज्यपुरस्कार व सहा इतर पुरस्कार ‘लाटांचे मनोगत’ हे स्त्रीकाव्याचा चिकित्सक अभ्यास करणारे पुस्तक. ‘कविता विसाव्या शतकाची’ व ‘भारतीय भाषांतील स्त्रीसाहित्याचा मागोवा (खंड १ व २)’ यांच्या संपादनात सहभाग. राज्यस्तरीय, राष्ट्रीय चर्चासत्रांमधून निबंध सादर. सुमारे पाचशे पुस्तकांचे परीक्षण-लेखन.
जोगळेकर, हेमंत गोविंद : मुंबई आयआयटीमधून रासायनिक अभियांत्रिकीमध्ये पदवी. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथून वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून निवृत्त. ‘होड्या’ (१९८५), ‘माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा’ (विडंबन कविता), ‘मनातले घर’ (१९९५), ‘उघडे पुस्तक’ (२००७), हे कवितासंग्रह प्रकाशित. केशवसुत व बालकवी पुरस्कार. इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, पंजाबी व असमिया इ० भाषांत कवितांची भाषांतरे. ‘कविता दशकाची’, कविता विसाव्या शतकाची’, ‘स्वातंत्र्योत्तर मराठी कविता - १९६० ते ८०’ व ‘अक्षर दिवाळी - १९८०, ८१, ८२, ८३, ८४, ८५’ या प्रातिनिधिक संग्रहांत कवितांचा समावेश.
ढवळीकर, (डॉ०) म०के० : पुरातत्त्वशास्त्राचे प्राध्यापक व डेक्कन कॉलेज (पुणे) चे संचालक (निवृत्त), कला व पुरातत्त्वशास्त्र या विषयांवरील सुमारे २५ पुस्तके प्रकाशित.
देवळेकर, सुशान्त : एम०ए० (मराठी), सध्या राज्य मराठी विकास संस्था (मुंबई) येथे कनिष्ठ संशोधन-साहाय्यक ह्या पदावर कार्यरत. २००२-०८ ह्या काळात भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) (मुंबई) येथील भारतीय भाषा केंद्रात भाषातज्ज्ञ म्हणून सेवेत. मराठी शाब्दबंध हा शब्दार्थसंबंध दाखवणारा कोश, मराठी शब्दरूपांचे विश्लेषण करणारी रूपविश्लेषक ही संगणक प्रणाली विकसित करण्यात सहभाग. संगणकावर युनिकोड वापरून मराठीत काम कसे करता येईल हे समजावून देणार्या कार्यशाळांत मार्गदर्शन.
देशपांडे, (डॉ०) ब्रह्मानंद : महामहोपाध्याय, विद्याभूषण, प्राचीन मराठी वाङ्मयाचे व्यासंगी संशोधक. ‘देवगिरीचे यादव’, ‘शोधमुद्रा’ इ० पुस्तके प्रकाशित
परांजपे, (प्रा०) प्र०ना० : एम०ए०,पी०जी०डी०टी०इ०,एम०लिट० रामनारायण रुइया महाविद्यालय, मुंबई येथे इंग्रजीचे १५ वर्षे आणि पुणे विद्यापीठात वृत्तपत्र-विद्येचे २० वर्षे अध्यापन. एक कथासंग्रह, तीन भाषांतरे, पाच संपादने, पाच सहसंपादने व एक सहलेखन अशी १५ पुस्तके प्रकाशित. याव्यतिरिक्त दहा पुस्तकांत लेख समाविष्ट. संगीत नाटक स्पर्धेत लेखनाबद्दल महाराष्ट्र शासनाचे प्रथम पारितोषिक.
पाटकर, रमेशचंद्र : विल्सन महाविद्यालय, मुंबई येथून मराठी-विभाग प्रमुख म्हणून निवृत्त. ‘आत्मचरित्र : एक साहित्य प्रकार’ या विषयावर पीएच०डी०. ‘कलेचा इतिहास : भारतीय पाश्चात्य’, हे पुस्तक महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाने प्रकाशित केले. माधव सातवळेकरांच्या चित्रसंग्रहात सातवळेकरांची दीर्घ मुलाखत समाविष्ट. प्रा० बाबुराव सडवलेकरांच्या लेखसंग्रहाचे (‘महाराष्ट्रातील कलावंत : आदरणीय व संस्मरणीय’) संपादन. ‘शहीद भगतसिंग : आठवणी, विवेचन आणि विचार’, ‘मराठी नियतकालिकांतील दृश्य विचार’ ही अन्य पुस्तके. कथा, कविता, साहित्यसमीक्षा यांचे लेखन.
बागुल, (डॉ०) फुला मोतीराम : बी०एस्सी०, बी०ए०, एम०ए०, बी०एड०, सेट उत्तीर्ण, पीएच०डी० (विषय - मराठी, विज्ञान साहित्यात सुबोध जावडेकरांचे वाङ्मयीन योगदान.) तीन कवितासंग्रह, एक वैचारिक ग्रंथ, दोन इतर व एक संपादित अशी एकूण सात पुस्तके प्रकाशित. ‘गुर्जर बोली’ या विषयावरील संशोधनासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून प्रकल्प अनुदान. एस०पी०डी०एम० महाविद्यालय, शिरपूर (जि० धुळे) येथे मराठीचे साहाय्यक प्राध्यापक.
मेहता, (डॉ०) कलिका : एम०ए० (भाषाविज्ञान), एम०ए० (मराठी) मुंबई विद्यापीठ, पीएच०डी० (भाषाविज्ञान), डेक्कन कॉलेज, पुणे. भारतीय भाषा संस्थान (सेंट्रल इन्स्टिटयूट ऑॅफ इंडियन लँग्वेजिज), म्हैसूर ह्यांच्या पुणे येथील पश्चिम विभागीय भाषा केंद्रात १९८२पासून अमराठी विद्यार्थ्यांसाठी मराठीचे अध्यापन. सध्या त्याच केंद्राच्या प्राचार्य. अनेक प्रकारच्या शैक्षणिक साहित्याची निर्मिती.
मोहनी, दिवाकर : मुद्रणतज्ज्ञ, लिपीतज्ज्ञ. विवेकवादाला वाहिलेल्या ‘आजचा सुधारक’ ह्या नियतकालिकाच्या संपादक-मंडळाचे सदस्य.
राईलकर, (प्रा०) मनोहर : एम०एससी० (सांख्यिकी), मुंबई, एम०एससी० (गणित), पुणे, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे येथे गणिताचे प्राध्यापक व गणित विभागप्रमुख असे एकूण ३४ वर्षांचे अध्यापनकार्य, नंतर निवृत्त. गणित विषयावरील २३ पुस्तके, तीन कादंबर्या, सात विज्ञानकथा व ‘भाषा व जीवन’मध्ये अनेक वेळा लेखन प्रसिद्ध.
साळुंके, (डॉ०) प्रकाश श्रीराम : एम०ए०, पीएच०डी०, मराठी विभाग प्रमुख, कला आणि वाणिज्य महाविद्यालय, अक्कलकुवा (जि० नंदुरबार)