अक्कलकुवा तालुक्यातील पावरी बोलीतील उखाणे
प्रकाश श्रीराम साळुंके
म्हणी-वाक्प्रचारांप्रमाणेच उखाण्यांनाही प्राचीन मौखिक परंपरा लाभलेली आहे, महत्त्वाचे स्थान लाभलेले आहे. ‘उखाणा’ या शब्दाला प्रश्न, कूट, ब्रह्मोद्य, प्रवल्हिका किंवा प्रहेलिका असे संस्कृत प्रतिशब्द आहेत. ग्रामीण भागात उखाण्यांना ‘कोडी’ किंवा ‘आहणा’ असेही शब्द वापरले जातात. श्रीमती दुर्गा भागवत म्हणतात, ‘‘आह’’ ह्या धातूपासून उखाण्यांची निर्मिती झालेली आहे. ‘आह’ हा धातू अत्यंत प्राचीन अशा वेदकाळातील वेदवाङ्मयात व तद्नंतरच्या संस्कृत वाङ्मयात आढळतो. आज मराठीत ‘आह’ हा धातू वापरात नसला, तरी ‘आहणा’ या शब्दात तो बोलीभाषेत वापरलाच जातो.’’ आजही खानदेशातील मुख्य बोलीभाषेत म्हणजे अहिराणी बोलीत उखाण्याला ‘आहणा’ हाच शब्द प्रचलित आहे.
उखाण्यांना वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळी नावे प्रचलित आहेत. जसे गुजरातीत उखाणो, सिंधीत उखाणी, हिंदीत व बंगालीत पहेली, कानडीत ओगणू किंवा प्रहलिके, तेलुगुत विडीकथ, तामिळीत विडीकदाई इ० वरीलप्रमाणे उखाण्यांना वेगवेगळ्या भाषेत जशी वेगवेगळी नावे आहेत तशीच वेगवेगळ्या आदिवासी जमातीतही वेगवेगळी नावे रूढ आहेत. जसे छोटा नागपूरच्या मुंडा लोकात नुतम कहाणी, गोंड लोकात करसाळ, आदिवासी भिल्ल लोकात जिखण्यो, तसे अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासी पावरी बोलीत ‘सुडवेणन् काण्या’ हा शब्द रूढ आहे.
उखाण्याचे स्वरूप प्रश्नोत्तरासारखे असते. उखाण्यातील प्रश्नात गूढार्थ असतो. तर उत्तरातून गोपनीयतेचा स्फोट करून मूलार्थ व्यक्त केला जातो. उखाण्यांची रचना अगदी ठसकेबाज असते. गोपनीयता, कल्पनाचातुर्य आणि उत्कंठावर्धकता ही उखाण्यांची वैशिष्टये असतात. उखाण्यात खटकेबाज व मार्मिक विनोदही असतात. ऐकणार्याला संमोहात टाकून त्याचा गोंधळ उडवणे आणि त्याच्या मनात संभ्रम निर्माण करणे हे उखाण्याचे कौशल्य असते. डॉ० सुधीर कोठवदे म्हणतात,
‘‘उखाणे त्या समाजमानसाची उच्च आकलनक्षमता, सांस्कृतिक परिप्रेक्ष्य आणि जीवनार्थाचे आकलन करण्याचा शहाणपणा व्यक्त करतात.’’
उखाण्यात म्हणींप्रमाणे व्यापकता आहे. मनोरंजनाचे व ज्ञानवर्धनाचे ते महत्त्वाचे साधन आहे. मानवी कल्पनांची आणि अनुभवांची अभिव्यक्तीही उखाण्यांमधून होते. म्हणजेच उखाणे मानवाला विचार करण्यासही प्रवृत्त करतात. सामाजिक व्यवहारात, माणसांच्या दैनंदिन वापरात-खाण्यापिण्यात ज्या वस्तू येतात, माणूस नेहमी ज्या पशुपक्ष्यांमध्ये वावरतो त्या सगळ्यांमध्ये उखाण्यांचे स्वरूप पाहायला मिळते. आजही लग्नप्रसंगात किंवा करमणुकीत उखाणे सांगण्याच्या पद्धती आढळतात. म्हणींप्रमाणे व्यापक असलेले, बुद्धीला चालना देणारे व मनोरंजन करणारे उखाणे प्रत्येक जाती-जमातीच्या बोलीभाषेत प्राचीन काळापासून मौखिक परंपरेने पिढ्यानपिढ्या संक्रमित होत आलेले आहेत.
अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासी पावरा जमातीच्या पावरी बोलीतही पारंपरिक पद्धतीचे उखाणे प्रचलित आहेत. दिवसभर अंगमेहनतीचे काम करून रात्री एकत्र जमल्यावर मद्यपानासोबत उखाण्यांच्या साहाय्याने ते शारीरिक व मानसिक थकवा घालवतात व आपल्या ज्ञानाचे आदान-प्रदान करतात.
आदिवासी पावरांच्या बोलीतील काही उखाण्यांचे मराठी भाषेत रूपांतर करून त्याचे उत्तर सांगण्याचा प्रयत्न येथे मी केलेला आहे.
(पावरा बोलीतील उखाणा पहिल्या ओळीत, त्याचे प्रमाण मराठी भाषांतर दुसर्या ओळीत व त्याचे उत्तर तिसर्या ओळीत)
१) ची आवी ची गोयी?
ही आली आणि ही गेली?
नजर
२) मुठ भोरीन तोह नी गोनाय, मेह नी गोनाय?
मूठभर मोजणे देखील कठीण?
केस
३) आयतली सुरी राजाहा बोठ कोयतली?
लहानशी मुलगी राजालाही खाली बस म्हणते?
पायात रुतलेला काटा
४) आयतली सुरी राजाह खिजवतली?
लहानशी मुलगी राजाला चिडवते?
माशी
५) आयतली सुरी राजाहा रडावतली?
लहानशी मुलगी राजालाही रडवते?
कांदा
६) आयतली सुरीन दह पाय?
लहान मुलीला दहा पाय?
खेकडा
७) आथभर डेमणी तोहनी उमकाय मेहनी उमकाय?
हातभर तुकडा तुमच्या हातातही येणार नाही व आमच्या हातातही येणार नाही?
माणसाची सावली
८) देव-देवन पेल्लू टिलू कुणीही लागतलू?
देव-देवतांच्या आधी कुणाला टिळा लावत जातो?
बोटाला
९) काम कोन्ने ओगे ने खानेवेले फोसी?
आधी काम करणारी आणि नंतर खाणारी?
कोंबडी
१०) एक रंगाम खूप रंग?
एका रंगात अनेक रंग?
अंडे व अंड्यातील पिलू.
११) राती राती भल्ल दिहू दिहू टाल्ल?
रात्री-रात्री भरलेले, दिवसा दिवसा रिकामे?
गुरांचा गोठा
१२) राती राती टाल्ल दिहू दिहू भल्ल?
रात्री-रात्री रिकामे, दिवसा-दिवसा भरलेले?
अंथरूण ठेवण्याची घडवंची
१३) एक दादून डीलम खूप दात?
एका दादाच्या पोटात अनेक दात?
भोपळा
१४) उपर सुत्र, माय आड, माह अने पाईं?
वरती साल, मध्ये हाड, मास आणि पाणी?
नारळ
१५) एक दरम दुय आथे हुदवे?
एकाच खड्डयात दोन हाताने कुदते?
मुसळ
१६) पानहारखं पान बिनडेट्या पान?
पानासारखं पान बिनदेठाचे पान?
पापड
१७) एक पग हौ आथ?
एकच पाय आणि शंभर हात
साबर (काटेरी वनस्पती)
१८) एक बायरं गरमाय घुमती घुमती बारथे आवे?
एक बाई घरातून घुमत-घुमत बाहेर येते?
झाडू
१९) बांडय गदळं दुवाख मुतं?
बांडे गधडं दोन्ही बाजूला मुतते?
घरावरचे छप्पर
२०) दर्यू आट जाय वेवाणी मर जाय?
रॉकेल आटून जाते आणि वात जळून जाते?
चिमणी
२१) ताबान डेगडीम राय राय बिजा?
तांब्याच्या डेगडीत (हंड्यात) खूप खूप बिया?
उंबर
उखाण्यांची प्राप्ती
१) भरत पावरा, देवमोगरा पुनर्वसन
२) वसंत पावरा, देवमोगरा पुनर्वसन
३) उग्रावण्या पावरा, देवमोगरा पुनर्वसन
४) जांभा पावरा, देवमोगरा पुनर्वसन
संदर्भ :
१) भागवत, दुर्गा, ‘लोकसाहित्याची रूपरेखा’, वरदा बुक्स, पुणे. १९७७ (आवृत्ती २).
२) कोठावदे, सुधीर, ‘मावची बोली : समाज आणि संस्कृती’, आशापुरी प्रकाशन, साक्री. २०००.