पावसाळा २०१०

भाषेची मुळं लोकजीवनात!

आपली भाषा ही काही आपल्यापेक्षा कुणी वेगळी वस्तू नसते किंवा ती व्यवहाराचं निर्जीव साधन नसते. आपणच आपल्या जीवनातून तिला घडवत असतो. अनुभवाच्या बारीकसारीक अर्थछटा सुचवायला आपल्याला वेगवेगळे शब्द लागतात, आपल्या भोवतालची सर्व वस्तुजात त्यातल्या बारकाव्यांनिशी टिपण्यासाठी आपण नेमके शब्द शोधत असतो. उदाहरणार्थ, 'रवाळ', 'कणीदार', 'भरड', 'जाडसर' असे शब्द काही नुसत्या शब्द घडवणार्‍या सोसातून निर्माण झालेले नसतात. त्या पदार्थांचा नेमका गुणधर्म, पोत, स्पर्श, दृश्यरूप असं सगळं विचारात घेऊन ते भाषेत येतात आणि तो अर्थ समजून ते वापरले तर कृतीचं सार्थक होतं. नाहीतर 'आणि अमुक मिक्सीवर बारीक करून घ्यावं.' या सूचनेतून काय बोध होणार?

बहुभाषिक भारत - वास्तव आणि स्वप्न

मी १२ जून १९६१ रोजी हैदराबादच्या बेगमपेठ विमानतळावर पोहोचले तेव्हा डॉ० शांताबाई सातवळेकर व डॉ० एस०डी० सातवळेकर म्हणजे आई आणि भाऊ मला घ्यायला आले होते. शांताबाईंनी ड्रायव्हरला तेलगूमध्ये काहीतरी सांगितले. मग शेरवानी घातलेल्या एका इसमाशी त्या उर्दूमध्ये बोलल्या व त्यानंतर भाऊंशी मराठीमध्ये बोलल्या. मग त्या माझ्याकडे वळून म्हणाल्या, "We'll teach you three languages."माझ्या बाबतीत त्यांचा वायदा काही अंशी अपुरा राहिला तरी त्या दिवशी हैदराबादमधील बहुभाषिकतेचा ठळक अनुभव आला होता, हे निश्चित आहे.

आदिआछिपलेया

मराठी भाषेच्या जडणघडणीच्या अभ्यासासाठी प्राचीन मराठी कोरीव लेखांचे महत्त्व इतिहासाचार्य वि०का० राजवाडे यांनी ओळखले होते. या लेखांतील अनेक शब्दांची सखोल चिकित्सा त्यांनी केली आहे. अशाच एका शब्दाचा विचार येथे करायचा आहे.

मराठी कवितेची बदलती भाषा: नीलिमा गुंडी

भाषा हा घटक एकीकडे सांस्कृतिक पर्यावरणाचा भाग आहे आणि त्याच वेळी सांस्कृतिक पर्यावरणाविषयीची प्रतिक्रिया देण्याचा मार्गही आहे. व्यक्तीच्या आत आणि बाहेर भाषा असते. आतली भाषा आणि बाहेरची भाषा यांच्यात होणारा संघर्ष, हे आजच्या कवितेच्या अनुभवाचे एक केंद्र आहे. त्यामुळे आज कवितेची भाषा बदलणे अपरिहार्य होत असावे. आज पाश्चात्त्य आणि पौर्वात्य मूल्यांचा संकर आपल्या जीवनशैलीत समाविष्ट आहे. आज आपली भाषाही संकरित ('हिम्राठी', 'मिंग्लिश' इ०) आहे.

मराठी कवितेची बदलती भाषा : उपबोधाख्यान

स्वातंत्र्योत्तर काळात मर्ढेकर-रेगेंच्या कवितांनी कवितेची भाषा बदलली, त्यानंतर थोडासा प्रयत्न वसंत गुर्जर, मनोहर ओक, ढसाळांच्या पिढीने केला, पण कवितेची खरी भाषा बदलली ती माझ्या (म्हणजे नव्वदनंतर प्रकाशित झालेल्या, शीतयुद्धोत्तर) पिढीने. इंदिरा गांधींची हत्या हा भारताच्या राजकारणातलाच नव्हे तर भारतीय मानवसमूहाच्या मानवसंकल्पनेतलाच (महत्त्वाचा) टर्निंग पॉईंट होता. आमच्या पिढीतला प्रत्येक जण आदर, फॅसिनेशन, द्वेष, तिरस्कार यांपैकी कोणत्या ना कोणत्या भावनेने इंदिराजींशी जोडलेला होता.

मराठी कवितेची बदलती भाषा

आपण सगळे मराठी भाषा बोलतो-लिहितो. भाषा कालानुसार बदलत जाते. स्थळानुसारही बदलते. साहित्याची भाषाही अशी बदलत आलेली आहे. पण जेव्हा आपण कवितेच्या भाषेचा वेगळा विचार करतो, तेव्हा कवितेची भाषा वेगळी असते असे गृहित धरतो. कवितेची म्हणून काही वेगळी भाषा असते का? या संदर्भात मला पु०शि० रेगे यांची दोन विधाने आठवतात. एक : कवितेला ठाम अशी भाषा नसते. दोन : कविता हीच एक भाषा असते. वरवर पाहता ही दोन विधाने परस्परविरोधी वाटतील. पण ती तशी नाहीत. उपलब्ध भाषा कवी कवितेच्या गरजेप्रमाणे वाकवीत असतो.

हेमंत गोविंद जोगळेकर

कवितेची भाषा

'रत्नाकर' मासिकाच्या जुलै १९२९ अंकामध्ये पृष्ठ ५०२वर (म्हणजे पृ०२वर, कारण पानांना जानेवारी ते डिसेंबरपर्यंत सलग क्रमांक देण्याची 'रत्नाकर'ची पद्धत होती.) अनंत काणेकरांची 'आला खुशीत् समिंदर' ही कविता प्रसिद्ध झाली आहे. कवितेच्या तळटीपेत काणेकरांनी म्हटले आहे की, 'समिंदर...सारख्या एखाद्या रांगड्या शब्दाचा मधून मधून उपयोग फक्त गाणे कोळ्याचे आहे हा भास कायम ठेवण्यापुरताच केलेला आहे.' याचा अर्थ असा की कवितेत 'रांगडे' शब्द वापरू नयेत असा संकेत रूढ होता. आज शब्दच काय संपूर्ण कविता आणि कवितासंग्रह 'रांगड्या' भाषेत लिहिले जात आहेत

Pages