पानपूरके
इंग्रजीचे गुलाम!
काही वर्षांपूर्वी सोव्हियट यूनियनचे कॉन्सुलेट जनरल इगोर बोनी नागपूरला आले होते. तेव्हा येथील काही लोकांनी त्यांचे धनवटे रंगमंदिरात भव्य स्वागत केले. त्या सभेचे अध्यक्ष न्या० अभ्यंकर आणि स्वागताध्यक्ष होते कॉ० बर्धन! सत्कारमूर्तींच्या आधी ह्या दोघांची भाषणे इंग्रजीत झाली. पण त्यांचा अनुवाद करण्यात आला नाही. नंतर इगोर बोनी यांनी भाषणाला सुरुवात करताना म्हटले, ''मी इंग्रजी बोलू शकतो. पण ती विदेशी भाषा आहे. मी जर रशियन भाषेत बोललो, तर ते आपणांस समजणार नाही. आणि म्हणून मी हिंदीत बोलणार आहे.'' असे म्हणून त्यांनी हिंदुस्थानवासीयांच्या श्रीमुखात एक मखमली मारली. ते एक तास वीस मिनिटे धारावाहिक बोलले. त्यानंतर मी त्यांना माउंट हॉस्पिटलमध्ये भेटलो. तेव्हा ते मला म्हणाले, ''हिंदुस्थानी लोक तनाने स्वतंत्र झालेत, पण मनाने अजूनही इंग्रजीचे गुलाम आहेत. तुमच्या देशाला स्वत:ची राष्ट्रभाषा नाही.''
- वा०रा० गाणार
(दै० सामना, उत्सव पुरवणी, दि० २७ डिसेंबर २००९)
प्रेषक : मनोहर राईलकर
अरबी 'फी'
अरबीत 'फी' म्हणजे 'आहे'. हा फी शब्द घातला की त्या परीसस्पर्शाने बाकीच्या कसल्याही सावळ्या गोंधळाची व्याकरणशुद्ध अरबी होते अशी बहुतेक भारतीयांची समजूत असते.
सहा वर्षं उम्म खद्रामध्ये काम केल्यावर आमची लेबर वॉर्डातली नर्स, शकू, एखाद्या पहिलटकरणीला नीट कळा द्यायला सांगताना म्हणे,
'अना फी कलाम फी अन्ता फी अहसन.' (शब्दश: = मी आहे बोलते आहे तू आहेस अधिक चांगला) (अभिप्रेत = मी सांगते आहे ते तुझ्या भल्यासाठीच)
पहिलटकरीण ही अरबीची फे फे जाणतेपणाने समजून घेई!
डॉ० उज्ज्वला रेगे, 'सोन्याच्या धुराचे ठसके', पृ० ११०
काशी विश्व हिंदू विश्वविद्यालयात मराठी
काशी हिंदू विश्वविद्यालयात मराठीबरोबरच तमीळ, तेलगू, कन्नड, नेपाळी याही भाषा शिकविल्या जातात. या भाषांच्या विकासासाठी सुमारे दहा वर्षांपूर्वी तामिळनाडू, आंध्र व कर्नाटक सरकारांनी पाच-पाच लाख रुपयांची अनुदाने या विद्यापीठांना देऊन त्या रकमांच्या व्याजातून अध्यासन निर्माण करून प्रोफेसरचे पद व पीएच०डी० करण्यासाठी दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची सोय केली आहे. नेपाळी सरकार स्वखर्चाने एका लेक्चररची नियुक्ती करीत असते... साठ वर्षांपासून जेथे मराठीचे अध्यापन अव्याहतपणे होत आहे अशा काशी हिंदू विश्वविद्यालयामधील दृढमूल मराठी विभागाला आर्थिक आधार देण्याचे औचित्य व औदार्य महाराष्ट्र शासनाने का दाखवू नये?
डॉ० सुरेश भृगुवार, 'नवभारत', फेब्रुवारी २०१०. पृ० ३०-३१
लीळाचरित्राची भाषा
(लीळाचरित्र) ग्रंथाचे पुनर्लेखन, मुसलमान महाराष्ट्रात स्थिरावल्यावर तीस-बत्तीस वर्षांनी होऊनही त्यात अपवाद म्हणून एक देखील पर्शोअरेबिक वंशाचा शब्द येत नाही. हे या भाषेचे सर्वात महत्त्वाचे ऐतिहासिक सत्य आहे. कथन साहित्याला आवश्यक अशा या गद्यात समाजातून आलेली भाषा आहे. तिच्यात निरनिराळ्या व्यावसायिकांच्या व्यवसायांमधून पडलेली शब्दसंपत्तीची भर आहे, बोलींचा सढळ, पात्रानुरूप वापर आहे. समाजाच्या निरनिराळ्या स्तरांवर वावरणार्या व्यक्तींच्या औपचारिक, अनौपचारिक संभाषणांचे स्वाभाविक नमुने आहेत. केवळ संबोधनवाचक शब्द घेतले तरी या भाषेच्या सामाजिक अंगाचे वैशिष्टय लक्षात येते. कन्नडसारख्या शेजारी भाषेतून मिसळलेला शब्दसंग्रह, आज सामाजिक संदर्भ लुप्त झाल्यामुळे भाषेतून निघून गेलेले, काही पूर्णपणे दुर्बोध वाटणारे असे अनेक शब्द या ग्रंथात आढळतात. वाक्संप्रदाय, म्हणी, लोकोक्ती आणि चक्रधरांच्या वाणीतून सहज बाहेर पडलेली 'अनावर मर्हाठी' वचने यांनी समृद्ध (अशी ही भाषा आहे.)
- सुमन बेलवलकर, 'लीळाचरित्रातील समाजदर्शन' पॉप्युलर प्रकाशन, मुंबई. पृ० ३३-३४
साहित्यकला
अहो, जगात अशी एकच कला आहे की, जी इंद्रियाने आस्वादायची नसते, मनाने आस्वादायची असते. संगीत, नृत्य, शिल्प, चित्र या इंद्रियगोचर कला आहेत. साहित्यकला ही अशी एकुलती एक कला आहे की जी मानसगोचर कला आहे... साहित्याचा रसिक केवळ आस्वादक नसतो, तर कवीची कविता आपल्या मनात मुरवून तो तिची नवनिर्मिती करीत असतो .... आस्वादासाठी हवे असते आर्ष, म्हणजे अनघड मन.... नवनिर्मितीसाठी हवे असते सुघड मन.
- डॉ० द०भि० कुलकर्णी
अध्यक्षीय भाषण, ८३ वे अ०भा०म० साहित्यसंमेलन