अरविंद कोल्हटकर

चार अल्पपरिचित शब्द

अरविंद कोल्हटकर

ब्रिटिश आणि अन्य युरोपीय देशांशी घनिष्ट संबंध निर्माण झाल्यापासून भारतीय आणि युरोपीय भाषांमध्ये शब्दांची देवाणघेवाण चालू झाली आहे आणि तिची अनेक उदाहरणे आपण प्रत्यही पाहत असतो. अशाच देवाणघेवाणीतील त्यामानाने अल्पपरिचित अशा चार शब्दांच्या कथा पुढे मांडल्या आहेत.

मेकॉले विरुद्ध प्रिन्सेप, प्रिन्सेप विरुद्ध ट्रेवेल्यन

१८३४ सालचा हिंदुस्थान. दुसर्‍या बाजीरावाला बिठूरास पेन्शनवर पाठवल्यानंतर ब्रिटिश सत्ता हिंदुस्थानात सुस्थापित झाल्यासारखी दिसत होती. पुष्कळ भागात प्रत्यक्ष सत्ता आणि उर्वरित भागात ताटाखालची मांजरे बनलेले राजे-महाराजे आणि नवाब ह्यांमुळे एक उद्धट आत्मविश्वास सत्ताधारी वर्गामध्ये निर्माण झाला होता. युरोपीय (विशेषेकरून ब्रिटिश) संस्कृती, ज्ञान, समाज आणि वंश (तेव्हाचा शब्द, आजचा नव्हे) हे हिंदुस्थानी संस्कृती, ज्ञान, समाज आणि वंश ह्यांपेक्षा गुणत: श्रेष्ठ आहेत अशी भावना सत्ताधारी वर्गामध्ये दृढमूल होऊ लागली होती.