भाषा आणि जीवन

भाषेतील म्हणींचे संचित

भाषेतील विविध अवस्थांतरांचे दर्शन प्रामुख्याने भाषेतील म्हणी, वाक्प्रचार आदी भाषिक रूपांतून घडते. एखाद्या समाजाचे जीवन, त्या समाजातील प्रचलित समजुती, त्या समाजाची संस्कृती या सार्यां्चे संदर्भ भाषेतील म्हणी, वाक्प्रचारांसारख्या भाषेच्या अवशेषांतून मिळतात. वास्तविक भाषेतील म्हणी, वाक्प्रचारांतून मिळणारे ज्ञान हे अनुमानाचे ज्ञान असते. पहिल्या पिढीच्या अनुभवाला आलेले प्रत्यक्ष ज्ञान दुसर्या पिढीकडे जाताना अनुमानाच्या पातळीवर येते आणि म्हणूनच भाषेतील म्हणी म्हणजे भाषेचे संचित अथवा भाषेतील लेणी असे मानले जाते. अर्थात वर्तमानकालीन समाजात भाषेतील या म्हणींकडे जरी फारसे लक्ष दिले जात नसले तरी समाजाच्या एकूण इतिहासात असलेले म्हणींचे महत्त्व नाकारता येत नाही. आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे ‘अनुभवाचे बोल ते न ठरती फोल' ही गोष्ट आजच्या समाजाला तितकीशी पटणारी नाही. प्रत्येक पिढीतच नव्हे; तर एकाच पिढीत सुद्धा समस्येचे स्वरूप बदलत गेलेले दिसते. त्यामुळे आजोबाचे शहाणपणाचे बोल नातवाच्या समस्या सोडविण्यास तर अपुरे ठरतातच; पण बर्या.चवेळा पुढच्याला ठेच लागून पाठच्याने शहाणे होण्यासारखीही परिस्थिती असतेच असे नाही. म्हणी म्हणजे अनुभवाचे सार सांगणार्या चटकदार, अर्थगर्भ अशा उक्ती होत. आपल्या बोलण्यात प्रसंगानुरूप चटकदार अशा तयार उक्तींचा वापर करणे ही एकेकाळी बोलीची लकब तर होतीच; पण त्याचबरोबर ते भाषेचे भारदस्तपणही मानले जाई. चटकदार अशा छोट्याशा उक्तीमधून एखादे जीवनविषयक तत्त्वज्ञान, जीवनदृष्टी अथवा जीवनाचे सार सांगून त्यातून बोलणारा समोरच्या माणसासमोर नकळतपणे अनुभवाचे दालन उघडे करीत असे. कारणे कोणतीही आणि कितीही असली तरी एकेकाळी भाषेचे चैतन्य असलेल्या म्हणी आज मात्र भाषिक अवशेषरूपात राहिल्या आहेत. बदलती सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती तसेच बदलत्या जीवनशैलीमुळे भाषेत व्यक्त झालेले हे अनुमानाचे ज्ञान नष्ट होईल की काय अशी भीती वाटू लागली आहे.

समाजाच्या संस्कृतीतील प्राकृतिकतेचे दर्शन तसे पाहता म्हणींतूनच घडते. समाज ही संकल्पनाच मुळी भाषेशी जोडली गेली आहे. कारण एक भाषा बोलतो तो एक समाज असे स्थूलपणे मानले जाते. अर्थात एक मातृभाषा असलेला वा एक प्रादेशिक भाषा बोलणारा समाज तसा एकसंध असला तरी एकसुरी नसतो. कोंकणी समाजाचा विचार करताना वरील विधानाची यथार्थता पटते. ‘कोंकणी समाज' ही संकल्पना स्थूलपणे कोंकणात राहणारा आणि संज्ञापनासाठी कोंकणी भाषेचा वापर करणारा समाज याच्यासाठी वापरली जाते. संज्ञापनासाठी कोंकणीचा उपयोग करणारा सर्व जातीजमातींचा, संपूर्ण कोंकणप्रदेशात विखुरलेला छोटा-मोठा प्रादेशिक समाजगट म्हणजे कोंकणी समाजगट होय. कोंकणी बोलणारा समाजगट मग तो प्रांतीयदृष्ट्या महाराष्ट्रीय (मालवणी) असो, गोमंतकीय असो वा मंगळुरी असो; शिवाय तो प्रत्यक्ष व्यवसाय वा शिक्षणाच्या निमित्ताने जगाच्या पाठीवर कुठेही वावरणारा असो त्याचे सहजोद्गार, त्याची मानसिकता, त्याची एकूण व्यक्तिगत अभिव्यक्ती ही पारंपरिक म्हणजे कोंकणीच असते. प्रमाणभाषा, व्यावसायिक भाषा म्हणून जरी व्यावहारिकदृष्ट्या त्याला कोणतीही भाषा स्वीकारावी लागली तरी त्याची आत्म्याची भाषा ही पारंपरिक आणि सांस्कृतिक वारसाच घेऊन येताना दिसते. म्हणूनच समाजाच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविण्यासाठी भाषेतील म्हणी उपयुक्त ठरतात. कोंकणी समाजाच्या अंतरंगाचे दर्शन घडविणार्याह कोंकणी म्हणींमधून कोंकणातील चालीरिती, नातेसंबंध, सण-उत्सव, प्रादेशिक संदर्भ अशा एक ना अनेक विस्तारित जीवनानुभवांचे दर्शन घडते. म्हणी म्हणजे भाषेतील गोठवलेले ज्ञान होय. अशा या गोठवलेल्या भाषिक रूपातून कोंकणी माणसाची प्राकृतिक जडण-घडण, कोंकणातील निसर्ग, पशु-पक्षी या सार्यांाचे प्राकृतिकतेशी नाते जोडणारे या म्हणींमधील संज्ञापन जितके नैसर्गिक आहे तितकेच ते रांगडेही आहे. श्लील-अश्लीलतेच्या पलीकडे जाणारे हे अनुभव- प्रकटीकरण असल्याने त्यांमध्ये कोंकणी समाजमनाचे अत्यंत उघडे-वाघडे दर्शन घडते आणि त्याचबरोबर बदलत्या परिस्थितीनुसार बदलत जाणारे रंगही दिसतात. मौखिक परंपरेने जपून ठेवलेल्या आणि आता केवळ लोकपरंपरेचे संकलन करावे म्हणून संकलित करून ठेवलेल्या म्हणींमध्ये स्थलकालानुसार झालेले बदल हा भाषिक परिवर्तनाचा एक प्रकार म्हणता येईल.
कोंकणप्रदेशात मौखिक परंपरेने सांभाळून ठेवलेल्या काही म्हणी मालवणी, कोंकणी (गोमंतकी) आणि काही प्रमाणात मराठी या तीनही भाषांमध्ये सारख्याच आढळतात. काही म्हणींमध्ये प्रादेशिक वैशिष्ट्यांनुसार शब्दभेद झालेला दिसतो, तर काही म्हणी पूर्णतया परिवर्तित रूपांत पुढे येताना दिसतात. एकूणच लघुता, व्यावहारिकता आणि लोकमान्यता हे तीन गुण घेऊन आलेले कोंकणीमधील हे भाषिक धन म्हणजे कोंकणी म्हणी होत. म्हणींचे रूप आटोपशीर असावे लागते आणि हे आटोपशीर रूप लवचीक असल्यामुळेच स्थलकालपरिस्थितीनुरूप अनुभव जिवंतपणे व्यक्त करण्याचे सामर्थ्य त्यात असते. पूर्वजांच्या संचित ज्ञानाचा कोश असलेल्या कोंकणी भाषेतील म्हणींमधून कोंकणी माणसाच्या मार्मिकपणाचे रोखठोक स्पष्टपणाचे तसेच त्याच्यातील रांगडेपणाचेही दर्शन घडते.

मालवण किंवा सिंधुदुर्ग प्रदेश हा भौगोलिक दृष्ट्या गोमंतकाला जवळ जाणारा असला तरी राजकीय दृष्ट्या गेली कित्येक दशके तो महाराष्ट्राशी जोडलेला आहे त्यामुळेच मराठी आणि गोमंतकी कोंकणीतील अनेक सामाजिक तसेच सांस्कृतिक संदर्भ मालवणी बोलीत सहज सापडतात. बोलताना म्हणींचा सहज वापर करणे ही मालवणी बोलीची खास लकब होय. मालवणीत वापरल्या जाणार्याआ या म्हणींचा तौलनिक अभ्यास केल्यास त्यांत गोमंतकी कोंकणी, तसेच मराठीतील अनेक संदर्भ सापडतात. काही ठिकाणी केवळ भाषिक परिवर्तन दिसत असले तरी काही ठिकाणी प्रदेशानुसार झालेले अर्थपरिवर्तनही दिसते. उदा० मालवणी कोंकणीत ‘आग खांव काय वाघ खांव' ही म्हण आलेला प्रचंड राग व्यक्त करते, तर मराठीत हाच अर्थ ‘दही खाऊं की मही खाऊं' या म्हणीतून व्यक्त होतो आहे. ‘आगासला ता मागासला पाठसून इल्ला गुरवार जाला' या म्हणीतून नंतर आलेल्याने अगोदर आलेल्यापेक्षा प्रगती करणे असा अर्थ व्यक्त होत असून ‘कानामागून आली आणि तिखट झाली' ही मराठीतील म्हण जवळजवळ याच अर्थाची छटा घेऊन येते. काही जाणकारांनी कानामागून हा पानामागून या शब्दाचा झालेला शब्दविपर्यास असून मिर्ची पानानंतर येते आणि पानापेक्षा तिखटपणा दाखवते असा अर्थ असल्याचीही शक्यता व्यक्त केली आहे ‘आवशीची भयण मावशी, जीवाक जीवशी, बापाशीची भयण आका, डोळ्यांमुखार नाका', या मालवणी कोंकणीतील म्हणीप्रमाणेच ‘आका दोळ्यामुखार नाका, मावशी ती मावशी खावपांक भरपूर दिवशी' अशी म्हण गोमंतकीय असून ‘आना भयनी आका तूं म्हाका नाका, अम्मा भयिनी मावशी म्हाका पावशी' अशी म्हण मंगळुरी कोंकणीत वापरली जाते. मराठीतील ‘माय मरो; पण मावशी उरो' या म्हणीतील थोडासा संदर्भ घेऊन येणार्या या सर्व म्हणींमधून आईच्या बेंबीशी संबंध असलेल्या मावशी या नात्यातील जैविक संबंध व्यक्त झालेला दिसतो. ‘आये आतकारीण, बाये पातकारीण, गिरजा धाकटेकारीण तुया तसला तर मियां असला' या मालवणी कोंकणीतील म्हणींच्या अर्थाला समांतर जाणारी गोमंतकी कोंकणीतील म्हण म्हणून ‘म्हगेले धस्स, तुगेले फस्स' या म्हणीकडे पाहता येते. मालवणी कोंकणीत ‘आमचो बाबगो काय करी, आसलाला नाय करी' अशी म्हण नालायक माणसाने काम न करता कामाचे बारा वाजवणे या अर्थाने वापरली जाते. याच अर्थासाठी गोमंतकी कोंकणीत ‘कुड्डी उदकांक गेली आनी बुडकुलो फोडून घरां आयली' अशी वापरली जाते. ‘गावात म्हाळ आणि कुत्र्याक बोवाळ' या मालवणी म्हणीचा अर्थ व्यक्त करणारी गोमंतकी कोंकणीमधील म्हण म्हणजे ‘कोणाच्या व्हराडां कोण मुरड' ही होय. कधी कधी केवळ भाषांतरातूनही म्हणीचे वेगळेपण राखलेले दिसते. उदा० ‘चेडक्या बांयत पडला आणि बोंद्राचो चिखल गेलो,' या मालवणी कोंकणीतील म्हणीचे गोमंतकी कोंकणीत ‘सोबले बायंत पडले आनी कापड नितळ जाले' असे भाषांतरित रूप दिसते. ‘बाळो माजो बाळो कोलत्यांनी खेळुं, घर जळल्यार जळूं पुण बाळो माजो खेळूं' या मालवणी कोंकणीतील म्हणीचे रूप गोमंतकी कोंकणीत ‘निळू म्हजों निळू खलतें खेळूं, निळू म्हजो खेळूं' या म्हणीत कोलती म्हणजेच जळते लाकूड या मालवणी म्हणीतील शब्दाचा विपर्यास होऊन खलते असा झाला असला तरी कोंकणीत आज प्रचलित असलेला अर्थ खलते म्हणने खलबत्त्यातील खल हा होय. खल ही अत्यंत जड लोखंडी वस्तू असून ती मुलाला खेळण्यासाठी देणे हा लाडाचा एक खास प्रकारच आहे. मराठीत हाच अर्थ घेऊन येणारी म्हण म्हणजे ‘लाडे लाडे केले वेडे' ही होय. ‘घोवाच्या भयान घेतला रान, थंय भेटेलो मुसलमान, तेणां कापला नाक कान' या मालवणी कोंकणीतील म्हणीप्रमाणेच गोमंतकी कोकणीत ‘मडक्यातल्यान कायलेन पडलो, कायलेतल्यान उज्यान पडलो, जळून गोबर जालो' असा अनुभव येतो. मराठीतील ‘आगीतून सुटला फोफाट्यात पडला' या अनुभवाशी जवळ जाणारा असा हा अनुभव आहे. ‘रिकामको सुतार बायलेचे कुले ताशी' या मालवणी म्हणीत पायलेचे या शब्दाचे परिवर्तित रूप दिसते. पायली हे धान्य मोजण्याचे लाकडी माप ज्याचा तळ फार जाड असतो, त्यामुळे ही म्हण प्रचलित झाली असावी; परंतु कालांतराने पायलेचे या शब्दाचे विकृत असे रूप प्रचलित झाले असावे. गोमंतकी कोंकणीत हीच म्हण ‘बेकार मेस्त गांड तासता' अशी वापरली जाते; तर मराठीत ‘रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी' अशा रूपात ती येताना दिसते. ‘वेताळाक नाय होती बायल आणि भावका देवीक नाय होतो घोव' या मालवणी म्हणीचा अर्थ व्यक्त करणारी गोमंतकी कोंकणीतील म्हण म्हणजे ‘आरेल्या न्हवर्याकक भुरेली व्हंकल' ही होय. ‘नगार्या ची घाय थंय तुणतुण्याचा काय?' या मालवणी म्हणीतील अनुभव ‘हागर्याकफुडे वागरे खंचे?' या गोमंतकी कोंकणीतील म्हणीत सापडतो. ‘उधार तेल खंवटा' या मालवणी कोंकणीतील म्हणीचा अर्थ ‘सवाय खाण पॉंट फुगयता' या म्हणीतून व्यक्त होतो.

एकूणच कोंकणीतील म्हणींचा खजिना अमर्याद असाच आहे. ‘माराक आयला काय दिवाड म्हारवाडातच जाता', ‘राजाचा न्हेसाण ता मडवळाचा पायपोसाण', ‘माझा माका थोडा व्यायान धाडला घोडा', ‘उपाजली कुळीया, दिली म्हादळीया दो हाती टाळिया वाजविली', ‘जायाचा गो मोती, मुराडशीत किती, लाथ मारतीत आणि धेवन जातीत', ‘म्हस घेवच्या आदि दाव्याचो गजाली कित्याक?', ‘अधिक ऊ तेका खाज नाय, अधिक ऋण तेका लाज नाय’, अशा किती तरी म्हणींचा अभ्यास समाजजीवनाच्या अभ्यासास उपयुक्त ठरू शकतो. ‘तोंणान मोग पोटांत फोग’ (=मूँह में राम बगलमें छूरी), ‘उदकान आसा मासो मोल करता पिसो’ (=बाजारात तुरी, भट भटणीला मारी), ‘वानात तकली घालतकीर मुसळाचो कसलो भय', ‘जळोव आसा म्हण मरणांक उबो रांव?' अशा किती तरी म्हणी या थोड्या प्रमाणात मनोवैज्ञानिक अभ्यासाला दिशा देऊ शकतील. थोड्या प्रमाणात का होईना, पण आजही कोंकणातील जनसमुदाय या अशा भाषिक संचिताचा वापर करताना दिसतो आणि म्हणूनच जागतिकीकरणाच्या रेट्यात अडकलेल्या या भाषिक खजिन्याचे रक्षण करण्याची वेळ आज येऊन ठेपली आहे.

विद्या वासुदेव प्रभुदेसाई
पी०ई०एस०एस०आर०एस०नाईक महाविद्यालय
फर्मागुडी - फोंडा (गोवा.)
दूरभाष : ०८३२-२३१२६३५/२३३५१७१

मराठीचे लेखनसंकेत

आपली सध्याची शुद्धलेखनाविषयीची जी चर्चा चालू आहे ती प्रामुख्याने शब्दलेखनचर्चा आहे. गेल्या शंभर वर्षांतली चर्चासुद्धा प्रामुख्याने शब्दलेखनाचीच चर्चा आहे. हल्ली शुद्धलेखनकोश तयार केले जात आहेत; पण ते नेहमी अपूर्णच राहणार आहेत. मराठीसारख्या समृद्ध भाषेची एकूण शब्दसंख्या आज सहज दोनअडीच लाखांच्या घरात जाईल. आणि या शुद्धलेखनकोशांत जास्तीत जास्त वीसएक हजार शब्द आतापर्यंत आले आहेत. त्या कोशांपेक्षा बृहत्कोशातच शब्दांचे शुद्ध रूप का पाहू नये? अलीकडे तर शब्दांच्या विकृतीसुद्धा शब्दकोशात दाखवल्या जात आहेत. त्यामुळे शुद्धशब्दलेखनकोशांची गरजच आता खरे तर राहिलेली नाही.

दुसरे असे की, शुद्धलेखनचर्चेत फक्त शब्दांच्याच लेखनाबद्दल चर्चा असते. त्यातही ती चर्चा र्हतस्व दीर्घ ‘उ' आणि ‘इ' आणि अनुच्चाशरित अनुस्वार एवढ्यापुरतीच मर्यादित असते. पण त्यापेक्षा शुद्धलेखनाची चर्चा अधिक व्यापक स्वरूपात झाली पाहिजे. त्यामध्ये अक्षरलेखन, शब्दलेखनाचे संकेत, विकृत शब्दांचे लेखन, व्याकरणाला मान्य असलेली वाक्यरचना, शब्दांचे अर्थ व त्यांचे अचूक प्रयोग, लेखनाच्या विविध शैली इ० सर्व मुद्द्यांचा विचार झाला पाहिजे.

‘शुद्धलेखना'साठी ‘लेखननियम' असाही एक पर्याय सुचवण्यात आला आहे. मला ‘नियम' शब्द वापरावासा वाटत नाही. त्याला आदेशात्मक अर्थ आहे. त्याऐवजी ‘लेखनसंकेत' असा पर्याय मी सुचवू इच्छितो. तसे केल्याने शुद्धलेखनाचे सामाजिक अंग स्पष्ट होते. संकेत हे सर्व समाजाने स्वीकारलेले असतात आणि एकदा स्वीकारल्यानंतर ते पाळण्याचे बंधन आपोआपच त्या त्या समाजघटकांवर येते.
हे संकेत समाजमान्य असावे लागतात. त्यात कोणी एखादी दुसरी व्यक्ती बदल करू शकत नाही. पीटर बिक्सेल या जर्मन लेखकाच्या ‘ein Tisch ist ein Tisch' (‘टेबल म्हणजे टेबल') या कथेचा श्रीमती वर्षा क्षीरसागर यांनी केलेला अनुवाद ‘भाषा आणि जीवन'च्या दुसर्या वर्षाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे. आपल्या मनाने सर्व भाषायंत्रणेत बदल करून तो वापरू पाहणार्या' एका म्हातार्या ची शोकांतिका त्या कथेत मोठ्या परिणामकारकतेने सांगितली आहे. सामाजिक संकेत सर्व समाजाने निर्माण केलेले असतात. ते समाजाच्या संमतीनेच बदलता येतात. शुद्धलेखनाच्या बाबतीत शब्दान्ती र्हास्व इकार, उकार दीर्घ करण्याचा संकेत आपण समाजाच्या मान्यतेनेच निर्माण केला. अनुच्चाारित अनुस्वार असेच काढून टाकले. समाजाच्या मागणीचा रेटा वाढताच समासान्तर्गत घटकातील र्हयस्वान्त इकार, उकार आपल्याला काढावेच लागतील. पण असे संकेत अजिबात नसावेत अशी मागणी अराजक निर्माण करणारी ठरेल.

आपण जसे बोलतो तसेच लिहिले पाहिजे अशी मागणी सध्या केली जात आहे. वस्तुत: बोली-स्वरूपात असलेल्या भाषेच्या लेखनात आपण तसेच लिहितो आहोत. बोलीसाठी लेखनसंकेतांचा आग्रह धरलाच जात नाही, पण प्रमाण भाषेच्या संदर्भात मात्र तसा आग्रह धरला पाहिजे. कारण बोली आणि प्रमाणभाषा यांत मूलत:च फरक आहे. प्रमाणभाषा वापरण्याची क्षेत्रं आणि बोली वापरण्याची क्षेत्रं यात खूप फरक आहे. आपण बोलीभाषेचा वापर अनौपचारिक संभाषणात करतो. आपलं कुटुंब अथवा परिवार यांच्यापुरताच हा अनौपचारिक भाषा व्यवहार मर्यादित असतो. पण प्रमाणभाषा ही प्रामुख्याने लिखित भाषा असते. आपण त्या भाषेत सहसा बोलत नाही. औपचारिक बोलण्यात ती येते. अध्यापन क्षेत्र, न्यायालयीन व्यवहार, कार्यालयीन व्यवहार, वैचारिक लेखन, वृत्तपत्रे, दूरदर्शन, आकाशवाणी यांवरील निवेदने, पाठ्यपुस्तके, सर्व विषयांवरील गंभीर लेखन या सर्व ठिकाणी आपल्याला औपचारिक भाषेतच लिहावे लागते. बोली- वापराच्या क्षेत्रापेक्षा या लिखित औपचारिक क्षेत्राची व्याप्ती कितीतरी अधिक आहे. म्हणून बोलींना मर्यादित संज्ञापनाची भाषा असे म्हणतात. तर प्रमाणभाषेला व्यापक अथवा विस्तारित संज्ञापनाची भाषा असे म्हणतात. भाषेच्या या दोन अंगांची सरमिसळ आपण करता कामा नये.

शुद्धलेखनाच्या चर्चांमध्ये अभिनिवेशाने बर्या च वेळा अशी गल्लत होत असते.
कोणत्याही एका भाषेच्या क्षेत्रात जेवढे म्हणून सामाजिक गट निर्माण होतात त्या प्रत्येक गटाची एकेक बोली निर्माण होत असते. जात, धर्म, लिंग, वय, शिक्षण, व्यवसाय, इ० अनेक कारणांनी हे गट निर्माण होतात. त्या गटांच्या बोलींना आपण सामाजिक बोली म्हणतो. त्या भाषेच्या विस्तारानुसार तिच्यात प्रादेशिक भेद निर्माण होतात. त्यांना आपण भौगोलिक अथवा प्रादेशिक म्हणून संबोधतो. या अनेक बोली परस्पर संपर्काच्या प्रमाणानुसार कमीअधिक आकलनक्षम असतात. संपर्क जेवढा अधिक तेवढे दोन बोलींतील अंतर कमी आणि संपर्क जसजसा कमी होत जातो तसतसे हे अंतर वाढत जाते. काही बोली तर दुर्बोध होत जातात. पण प्रमाणभाषेचे तसे नाही. ती या सर्व बोलींशी समान अंतर ठेवून असते. त्यामुळे तिच्यातील लेखन त्या समग्र भाषाक्षेत्राला आकलनक्षम असते. पाठ्यपुस्तके, प्रसारमाध्यमे, न्यायालये, अध्यापनकेंद्रे या सर्व ठिकाणची भाषा सर्वत्र सारखीच असते, असावी लागते. तिच्या बाबतीत सवता-सुभा निर्माण करता येत नाही.

प्रमाणभाषा ही लिखित स्वरूपात जास्त करून असते. बोली या प्रत्यक्षात अनौपचारिक क्षेत्रात बोलल्या जातात. लिखित भाषा आणि बोली यांच्या स्वरूपातच त्यामुळे फरक निर्माण होतो. बोलीतील शब्दसंग्रह आणि प्रमाण भाषेतील संग्रह यात फरक पडतो. व्याकरणाच्या बाबतीतही फरक पडतो. उदा० तो जातो. तो जात आहे. या दोन्हींचा नकार लिखित भाषेत ‘तो जात नाही' असाच करतात. पण बोलीत मात्र दुसर्यान वाक्याचा नकार ‘तो जात नाहीए' असा होतो. ‘मी जात असे' या रचनेची संपूर्ण रूपावली बोली भाषेत सांगता येत नाही. पण लिखित भाषेत ती सांगता येत असे. आणखी बरेच व्याकरणभेद सांगता येतील. अर्थक्षेत्रही भिन्न होते. आपण बोलीत पल्लेदार वाक्ये वापरू शकत नाही. लिखित भाषेत ती चालू शकतात. सामासिक शब्दांचे प्रमाणही बोलीत कमी असते. आलंकारिक बोलणे बोलीत जास्त प्रमाणात चालत नाही. कायद्याची भाषा तर अगदी काटेतोल असते. सामान्य व्यवहारातील ढिसाळ शब्द तेथे चालत नाहीत. नेमका अर्थ सांगणार्याभ पारिभाषिक शब्दांचीच तेथे आवश्यकता भासते. मराठीत ‘गहाण टाकणे' असे आपण म्हणतो. पण न्यायालयात तेवढ्याने भागत नाही. तेथे हॅपॉथिकेट (Hypothicate), प्लेज (pledge), मॉर्गेज (mortgage) इ० पर्यायांतून निवड करावी लागते. हेच शास्त्रीय लेखनातही अपेक्षित आहे. नेमका अर्थ सांगणारी परिभाषाच तेथे वापरली जाते. या कारणांमुळे प्रमाणभाषा बोलीपेक्षा मूलत:च वेगळी असते.

म्हणून प्रमाणभाषेच्या लेखनपद्धतीत फार मोठी ढवळाढवळ करून चालत नाही. समजा, बोलीत श, ष असा भेद आढळत नाही या कारणाने आपण ‘ष' हे अक्षर काढून टाकले तर नवीन पिढीला प्राचीन वाङ्मय वाचताना अडचण येईल. आजच ङ् आणि ञ ही अक्षरे शिक्षणातून वगळली गेली असल्यामुळे ‘ङ्' या अक्षराचे ‘ड' असं वाचन करणारी अनेक मुलं भेटतात. ‘वाङ्मय'चा उच्चावर ‘वाडमय' असा करणारे अनेक विद्यार्थी मला भेटलेले आहेत. दीर्घ ‘रू' आणि र्हरस्व ‘रु' यातील भेद अनेक मुलांना माहीत नसतो. टंकयंत्रात पूर्वी तो नव्हता, त्याचा हा परिणाम असावा.

अलीकडे तर अक्षरे लिहिण्याची पद्धतही शुद्धलेखनात समाविष्ट करावी अशी गरज मला वाटते आहे. विशिष्ट अक्षरे विशिष्ट क्रमानेच लिहिली पाहिजेत. त्या अक्षराच्या लेखनातील टप्पेच विद्यार्थ्यांना माहीत नसतात. अक्षरांची उंची, त्यांचे टप्पे यासगळ्यांचे शिक्षण देणारे कित्ते आज बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या लेखनात आणि त्या अनुषंगाने वाचनातही दोष निर्माण झाले आहेत. ‘स्त्री' हा शब्द ‘स्री' असा लिहिला जातो. ‘स्रीमुक्ती' असा उच्चाेर अनेक वेळा ऐकायला मिळतो. ‘सहस्त्र', ‘स्त्रोत', असे चुकीचे उच्चा र व लेखन मोठमोठे विद्वानही करताना आढळतात. ‘बुद्धी, युक्ती, द्वार, आप्त' यांच्याही लेखनात चुकीचा क्रम वापरला जात आहे. जोडाक्षरे लिहिण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार वापरण्यात येणारी आगगाडी-पद्धतही चुकीची वाटते. त्यामुळे जुने ग्रंथ वाचणे तर कठीण होऊन जाते आणि लेखनसौष्ठवही नाहीसे होते.
संस्कृताचे शिक्षणातून उच्चाथटन झाल्यामुळे शुद्धलेखनात चुका होतात अशा तक्रारीत थोडेफार तथ्य असेलही. पण ५०-६० वर्षांपूर्वी चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसणारे विद्यार्थी, ‘व्हर्नाक्युलर फायनल' परीक्षा देणारे विद्यार्थी कुठे संस्कृत शिकले होते? पण त्यांचे शुद्धलेखन निर्दोष असे. कारण प्राथमिक शाळांतून शुद्धलेखन हा शिक्षकांच्या आस्थेचा विषय होता. तसा तो आता राहिलेला नाही. शुद्धलेखनाच्या दुरवस्थेचे तेच एक मुख्य कारण आहे.

आणखी एक मुद्दा इथे स्पष्ट करावासा वाटतो. आपण बोलतो तसे लिहिता आले पाहिजे, अशी काही लोकांची मागणी असते. पण ती अवास्तव आहे. जगात अनेक भाषांना लेखनपद्धती आहेत. पण बोलतो तसे लिहिण्याची व्यवस्था असलेली एकही नैसर्गिक भाषा अस्तित्वात नाही. याचे कारण बोली स्वरूपातील भाषेच्या परिवर्तनाचा वेग आणि लिखित स्वरूपाच्या भाषेतील परिवर्तनाचा वेग यात मूलत:च फरक आहे. लिखित भाषा कमी वेगाने बदलते. त्यामुळे बोली प्रमाणे लेखन असे सूत्र कितीही अंमलात आणायचे ठरवले तरी हे अंतर पडणारच. याच कारणामुळे भाषेत ‘स्पेलिंग' निर्माण होते. स्पेलिंग म्हणजेच लेखनसंकेत होय. आपण ‘तुमचा' असे लिहितो. प्रत्यक्ष उच्चातर मात्र ‘तुम्चा' असा करतो. ‘अ'कारान्त शब्द लिहिण्यासाठी अनुस्वाराचा वापर, च, च यांच्यासाठी एकाच अक्षराचा वापर आपण सर्रास करतो. याचाच अर्थ मराठीतही स्पेलिंग असते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची असते. ‘ऋषी' शब्दाचा उच्चा र कसाही करा पण लेखन मात्र तसेच केले पाहिजे.

कल्याण काळे
ए-५, प्रज्ञानगड, नवश्या मारुती गल्ली, वीटभट्टी, सिंहगड रस्ता, पुणे ४११ ०३०.
दूरभाष ०२० २४२५३१३६

मराठी प्रमाणभाषेचे लेखननियम

मराठी प्रमाणभाषेची लेखनपद्धती काय असावी, यासंबंधी इ०स० १८३६ पासून अनेक विद्वानांनी आपले विचार मांडले आहेत. याचा अर्थ असा, की लेखनपद्धतीसंबंधी मराठी विचारवंतांत जागरूकता आली ती जवळजवळ १७०-७२ वर्षांपासून. इतकी वर्षे या विषयावर विद्वानांची मतमतान्तरे प्रचलित आहेत. त्या सर्व मतांचा परामर्ष घेण्याचा प्रस्तुत लेखाचा हेतू नाही. एका विद्वानाचा मात्र आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांनी त्यांच्या १८६९ साली प्रसिद्ध झालेल्या 'मराठी भाषेची लेखनशुद्धी' या पुस्तकात मराठी लेखनातील अनुच्चारित अनुस्वार वगळावेत, हा त्या वेळच्या रूढ नियमांना धक्का देणारा क्रांतिकारक विचार मांडला होता, हे मला विशेष वाटते.

महाराष्ट्र राज्याची स्थापना १९६० मध्ये झाल्यावर 'मराठी साहित्य महामंडळा'ने आपली लेखनविषयक १४ नियमांची यादी महाराष्ट्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठवली, ती १९६२ मध्ये. १९७२ मध्ये त्यात आणखी चार नियमांची भर घालण्यात आली. महाराष्ट्र शासनाने ते नियम मान्य करून मराठी प्रमाणभाषेचे लेखन या नियमांनुसार करावे आणि शिक्षणक्षेत्रात आणि इतरत्रही ते त्वरित अंमलात आणावेत, असा आदेश काढला. काही अपवाद वगळता, आपण मराठी माणसे त्या नियमांनुसार मराठीचे लेखन करतो आहोत.
प्रमाणभाषा ही एक संकल्पना (कॉन्सेप्ट) आहे. आपण व्यवहारात मराठीची कोणतीतरी बोली बोलत असतो. लेखन करताना आपण प्रमाणभाषा वापरतो. ही प्रमाणभाषा कोठे वापरली जाते? शास्त्रीय साहित्यात, नियतकालिकांत, वैचारिक, तात्त्विक लेखनात, औपचारिक पत्रव्यवहारात, पाठ्यपुस्तकांतील ललितेतर पाठांत, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, इत्यादी पुस्तकांत, दूरचित्रवाणीवरील बातम्यांच्या किंवा इतर लेखनात, जाहीरनाम्यांत, रस्त्यावरील व इतरत्र लावलेल्या सूचना-फलकांत प्रामुख्याने प्रमाणभाषेचा वापर होतो; निदान तशी अपेक्षा असते. या प्रमाणभाषेच्या लेखनासंबंधी काही नियम करावे लागतात. लेखनात एकवाक्यता असावी, हा त्यामागचा हेतू असतो.
आपण उच्चारानुसारी लिहितो, असा अनेकांचा गैरसमज असतो. आपण बोलतो, विशेषत: आपली मातृभाषा बोलतो, तेव्हा त्या भाषेचे नियम वेगळे समजून घेण्याची आवश्यकता नसते. कोणतीही भाषा ही नियमबद्धच असते. प्रत्येक भाषेला तिचे नियम असतात, ते त्या भाषेतच अनुस्यूत असतात. आपण अनुकरणाने भाषा बोलायला शिकतो. भाषेचे व्याकरण म्हणजेच भाषेचे नियम आपल्याला कोणी शिकवत नाही, तरी आपण नियमांनुसार बिनचूक बोलतो. बोलताना एखाद्याने चूक केली, तर ती आपण दुरुस्तही करतो. फार तर त्यामागील व्याकरणाचा नियम आपल्याला सांगता येणार नाही, इतकेच. ते नियम शोधून काढावयाचे काम व्याकरणकाराचे असते. हे भाषेचे नियम म्हणजे भाषेचे व्याकरण. व्याकरण हा भाषेचा प्राण आहे. त्यामुळे 'भाषेला व्याकरणातून मुक्त करा' हा विचारच चुकीचा आहे.

मग प्रश्न असा उपस्थित होतो, त्याच भाषेचे लेखन करताना चुका का होतात? लेखनासाठी नियम कशाला हवेत? याचे उत्तर असे आहे, की बोलणे आणि लिहिणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. भाषा म्हणजे बोलणे. (भाष् - भाषते = बोलणे), आणि त्याच भाषेचे लेखन ही दोन वेगळी माध्यमे आहेत. भाषा (बोलणे) ही ध्वनींची बनलेली - ध्वनिरूप - आहे, ती श्राव्य आहे; पण तिचे लेखन हे दृश्य, चिन्हांकित, सामाजिक संकेतांनी मान्य केलेले, दुय्यम रूप आहे. बोलणे क्षणभंगुर तर लेखन हे स्थिर स्वरूपाचे असते. भाषा प्रवाही असते. ती सतत, नकळत पण निश्चितपणे हळूहळू बदलत असते. त्या बदलाचे प्रतिबिंब कालान्तराने लेखनात पडत असते. पण लेखनातील स्थिरता आवश्यक असते. भाषा व्यक्तीगणिक थोडी थोडी वेगळी असतेच. 'मी जसं बोलतो, तसंच लिहीन', असा आग्रह प्रत्येकाने धरला, तर लेखन व्यवहारात इतका गोंधळ होईल, की एकाचे लिखाण दुसर्‍याला कळणार नाही. बोलताना आपण ’तल्वार' म्हणतो, पण लिहितो 'तलवार'. 'उपसली' ह्या शब्दाचा उच्चार 'उपस्ली' असा होतो. आपण 'महत्व' म्हणतो, लिहितो 'महत्त्व', आपण 'अक्षरशहा' उच्चारतो, लिहितो 'अक्षरश:' अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. त्यामुळे उच्चारानुसारी लेखन हा विचार मान्य होणार नाही, आणि म्हणूनच कोणत्याही भाषेला लेखनविषयक नियमांची आवश्यकता असते.

या लेखनविषयक नियमांत बदल करावा किंवा नियमांचे सुलभीकरण करावे, अशी हाकाटी सध्या मोठ्या प्रमाणात पिटण्यात येत आहे. (माझी या संदर्भातील भूमिका स्पष्ट करते : प्रचलित नियमांत कोणताही महत्त्वाचा बदल करू नये.) हे नियम सामान्य मराठी माणसाला, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यातील संस्कृतप्रचुर शब्दयोजनेमुळे चटकन आकलन होत नाहीत; त्या नियमांची अंमलबजावणी करणे त्यामुळे अवघड होते अशी तक्रार केली जाते. मला एक सूचना करावीशी वाटते, ती अशी - या नियमांची सोप्या, सहजपणे आकलन होईल अशा भाषेत मांडणी करता येईल का याचा विचार व्हावा. तसेच, काही नियमांत थोडी भर घालून व अधिक उदाहरणे देऊन जर त्यांची पुनर्मांडणी केली, तर लेखन करणार्‍याला त्या नियमांचे पालन करणे सुकर होईल. शिवाय, प्रस्तुत नियम मराठीतील सर्व शब्दांना, विशेषत: ज्यांच्या लेखनाबद्दल सामान्य माणसाला निर्णय करता येत नाही अशा शब्दांना, समाविष्ट करून घेत नाहीत, म्हणजेच ते नियम सर्वसमावेशक नाहीत. अशा शब्दांच्या लेखनासाठी या नियमावलीत आणखी काही नियमांची भर घालावी.

याशिवाय, आणखी एक सूचना करते. मराठी वर्णमालेचा या नियमावलीत समावेश करावा व ती सुरुवातीलाच द्यावी. मराठीची जी प्रचलित वर्णमाला आहे, तिच्यात काही बदल सुचवता येतील. १८३६ साली दादोबा - पांडुरंगांनी मराठी व्याकरणाचे पहिले पुस्तक लिहिले, तेव्हा त्यांच्यापुढे आदर्श होता तो संस्कृत व्याकरणाचा. संस्कृत वर्णमाला त्यांनी मराठीसाठी जशीच्या तशी स्वीकारली. तिच्यात आपण आजपर्यंत अगदी थोडेच बदल केले आहेत. तिच्यात आणखी बदल करावेत, असे मला वाटते.
(१) स्वरमालेतून 'लृ' या स्वराचे उच्चा टन करावे. मराठीत एकमेव शब्द आहे, ज्यात लृ ह्या स्वराची योजना आढळते. तो शब्द आहे - 'क्लृप्ती'. पण या शब्दाचा उच्चार 'क्लुप्ती' असाच केला जातो. तेव्हा एका शब्दासाठी (आणि तेही उच्चारात नसलेल्या त्यातील स्वरासाठी) ’लृ' हा स्वर वर्णमालेत ठेवणे योग्य नाही.
(२) मराठी वर्णमालेत 'ऍ' आणि 'ऑ' या दोन स्वरांचा समावेश करावा. या स्वरांचे स्थान 'अ' नंतर 'ऍ' आणि 'आ' नंतर 'ऑ' की 'ए' नंतर 'ऍ' व 'ओ' नंतर 'ऑ' हे भाषाशास्त्रज्ञांनी ठरवावे.
(३) 'अं' आणि 'अ:' हे स्वर नव्हेत; कारण प्रवाहित्व हे स्वरांचे लक्षण त्यांना लागू पडत नाही. त्यांना स्वरमालेतून वगळावे. त्यांचा उल्लेख अनुस्वार किंवा शीर्षबिंदूचे चिन्ह(ं) आणि विसर्गाचे चिन्ह (:) असा करावा. आणि या चिन्हांचे उच्चार स्थानपरत्वे बदलतात हे उदाहरणे देऊन स्पष्ट करावे. जसे,- आंबा - आम्बा, उंट - उण्ट, अक्षरश: (शहा), मन:पूर्वक (न्ह).
(४) मराठीत च्, छ्, ज्, झ् ही व्यंजने तालव्य आहेत. उदा० चार, छत्री, जेवण, झीज. त्याचप्रमाणे च्, ज्, झ् ही व्यंजने दंतमूलीयही आहेत. उदा० चारा, जहाज, झरा. मात्र तालव्य व दंतमूलीय वर्णांना मराठीत वेगळी चिन्हे नाहीत. (संस्कृतातील वर्णमाला जशीच्या तशी स्वीकारल्यामुळे हे घडले आहे.) अगदी सुरुवातीला छापलेल्या मराठी पुस्तकात दंतमूलीय 'च', 'ज', 'झ' या पद्धतीने त्या व्यंजनावर उभी रेष दिलेली आढळते; पण त्या चिन्हाचे साम्य मात्रेशी असल्यामुळे पुढे ते चिन्ह काढून टाकण्यात आले. दंतमूलीय वर्णाखाली हिंदीप्रमाणे नुक्ता (वर्णाखाली टिंब) द्यावा, असे वाटते. पण त्यात अडचण काय आहे, पाहा -
मराठी मातृभाषा असलेले पुष्कळ सुशिक्षित लोक चादर ऐवजी चादर (चारमधील 'चा'चा तालव्य उच्चार), तसेच चाबूक ऐवजी चाबूक (तालव्य उच्चार), समाज ऐवजी समाज (दंतमूलीय उच्चार) करताना आढळतात. त्या उच्चारांपैकी कोणता उच्चार स्वीकारायचा असा प्रश्न पडतो. दुसरी अडचण, माझा (दंतमूलीय) पण माझी (तालव्य), त्याचा (दंतमूलीय) पण त्याची (तालव्य), माज (दंतमूलीय) पण माजी (तालव्य). मराठीत ’इ' हा स्वर तालव्य असल्यामुळे ’माझा' यातील 'झा' खाली नुक्ता दिल्यास 'माझी' मधील 'झी' खाली नुक्ता देऊ नये, हे चटकन लक्षात येणे कठीण. ज, झ यांच्या बाबतीतही हीच अडचण येईल. इंग्लिशमध्ये 'S' या अक्षराचा उच्चार वेगवेगळा होतो तो सवयीने आपण बरोबरच करतो. उदा० Some, Sure, Season, thieves. ते उच्चार वेगळे आहेत तेव्हा त्यांचे स्पेलिंग वेगळे हवे, असा अट्टहास कोणी करीत नाही. त्याच पद्धतीने मराठीत एका वर्णाचे दोन उच्चार (किंवा दोन उच्चारांसाठी एक वर्ण) मान्य करायला प्रत्यवाय नसावा.
(५) 'श' आणि 'ष्' या दोन वर्णांचे उच्चार मराठी भाषेत वेगळे होत नाहीत. संस्कृतात श् हा तालव्य आणि ष् हा मूर्धन्य आहे. मराठी बोलण्यात मूर्धन्य उच्चार जवळजवळ लुप्त झाला आहे. पण अनेक तत्सम शब्दांत 'ष्' हे व्यंजन असल्यामुळे तो लेखनात राहू द्यावा. ('ष्' असलेले तत्सम शब्द - विशेष, विषय, विष, षष्ठी इ०) मराठीत अपवादात्मक एखादाच 'ष्' असलेला शब्द दाखवता येईल शोक पण षौक (अर्थ भिन्न आहे.)
(६) अनुस्वारविषयक नियमांत (नियम १ ते ४) काहीही बदल करू नयेत, असे माझे मत आहे. फार तर सामान्य मराठी माणसाला सुलभ वाटावेत यासाठी ते अधिक सोप्या भाषेत लिहावेत. संसार, सिंह, हंस इ० शब्दांतील अनुस्वाराचा उच्चार सानुनासिकापेक्षा वेगळा होतो, हे कंसात नमूद करावे. (उदा० - संव्सार, हंव्स, इ०)
(७) र्‍हस्व-दीर्घासंबंधीचे नियम (नियम ५ ते ८). यांत एकच बदल सुचवावासा वाटतो. तत्सम इ-कारान्त व उ-कारान्त शब्द दीर्घ लिहावेत, विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागल्यास ते दीर्घच राहतात; फक्त सामासिक शब्दांत हे शब्द पूर्वपदी आल्यास, ते संस्कृताप्रमाणे र्‍हस्व लिहावेत, असा नियम आहे. ते शब्द सामासिक शब्दांत पूर्वपदीही दीर्घ लिहिल्यास या नियमाचे सुलभीकरण होऊ शकेल. संस्कृतची पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीला, हा बदल केल्यामुळे, सामासिक शब्दलेखन करणे अधिक सोयीस्कर होईल. हाच नियम तत्सम इन्-प्रत्ययान्त (विद्यार्थिन्, पक्षिन्) शब्दाच्या बाबतीतही स्वीकारता येईल. जसे : विद्यार्थी - विद्यार्थीगृह, पक्षी - पक्षीमित्र.
(८) नियम ११ मध्ये भर घालावी. हळूहळू, मुळूमुळू इ० शब्दांतील दुसरा व चवथा स्वर दीर्घ लिहावा, असा नियम आहे. याला अपवाद ध्वन्यानुसारी शब्दांचा द्यावा. जसे : रुणुझुणु, झुळुझुळु, कुहुकुहु. तसेच, चिवचिव, रिमझिम (उपान्त्य स्वर र्‍हस्व लिहावा.)
(९) नियम ९ : ग्रामनामास पूर लावताना पू दीर्घ लिहावा, असा नियम आहे. उदा० नागपूर, पंढरपूर, सोलापूर. हा नियम वेगळा देण्याचे कारण नव्हते. (र्‍हस्व-दीर्घविषयक नियमांत याचा अंतर्भाव करता आला असता.) पण जर हा नियम वेगळा द्यायचा असेल, तर या नियमाला पुस्ती जोडावी. या शब्दाचे सामान्यरूप होताना उपान्त्य 'पू' नियमाप्रमाणे र्‍हस्व होईल; पण विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावताना शेवटचा अक्षराचे सामान्यरूप होत नसेल, तेव्हा उपान्त्य 'पू' दीर्घच राहील. जसे - नागपूरची (संत्री), पंढरपूरचा (विठोबा), सोलापूरकडे (जाणारा रस्ता), तारापूरमध्ये इ०
नियम १२ : ए-कारान्त नामाचे सामान्यरूप या-कारान्त करावे' हा नियम आहे. उदा० करणे-करण्यासाठी, फडके-फडक्यांना. या नियमात भर घालणे आवश्यक आहे. एकारान्त आडनावाचे सामान्यरूप केले नाही, तरी ते चूक मानू नये. जसे - दामले - दामलेंना, फडकेंचा, इ०
नियम १३ : 'लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते. त्या वेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे असावे. अन्य प्रसंगी तसे लिहू नये.' हा नियम संदिग्ध आहे. पुरेशी स्पष्टता नसल्यामुळे 'बोलण्यातील उच्चाराप्रमाणे असावे' म्हणजे नेमके कसे हे लक्षात येत नाही. खरे पाहता हा नियम, 'शब्दातील शेवटच्या किंवा उपान्त्य एकाराऐवजी बोलण्यात त्या अक्षरावर जो आघात येतो, (घरे - घरं) म्हणजे शेवटच्या अक्षरातील एकाराऐवजी बोलण्यात जो पूर्ण उच्चारित अ येतो, त्यावर शीर्षबिंदू द्यावा', असा हवा. त्या अक्षरावर शीर्षबिंदू दिला नाही, तर त्या शब्दाचा उच्चार 'घर्' (अनेकवचनी) असा होईल. बोलण्यातील अन्त्य वा उपान्त्य (एवढंसं आभाळ) अक्षरातील एकाराऐवजी येणारा 'अ'वरील आघात दाखवण्यासाठी लेखनात त्या अक्षरावर शीर्षबिंदू द्यावा. मात्र शास्त्रीय, वैचारिक, गंभीर लेखनात एकार असू द्यावेत. पण समजा एखाद्या लेखकाने अशा लेखनात 'ए'ऐवजी आघातयुक्त 'अ'(शीर्षबिंदू देऊन) लिहिण्याचे स्वातंत्र्य घेतले तर, ते चूक मानू नये. त्याचप्रमाणे शीर्षबिंदूचा अनुनासिकाशिवाय हा एक वेगळा उपयोग लेखनात होतो, हेही स्पष्ट करावे.
सारांश, मी एकाच नियमात (सामासिक शब्दाच्या लेखनात) बदल सुचवीत आहे. इतर नियमांत भर घालावी, असे सुचवते आहे. शिक्षकांनी हे नियम समजावून घेतले, तर विद्यार्थ्यांना नियम न सांगता नियमांनुसार लिहिण्याची सवय लावता येईल.
शासनाने महामंडळाच्या सहकार्याने तज्ज्ञांची समिती नेमून त्या समितीने घेतलेले निर्णय मान्य करावेत आणि ते सर्वांनी स्वीकारावेत, कारण ती समिती सर्व महत्त्वाची मते विचारात घेऊन योग्य तोच निर्णय घेईल, असा विश्वास वाटतो.

यास्मिन शेख
विसावा हाइट्स, इमारत क्र० ४, फ्लॅट क्र० २, डी०पी० रोड, औंध, पुणे ४११००७.
दूरभाष ०२० - २५८८४४७२-

मराठी भाषेच्या विकासाच्या वाटा - ६ : राजाश्रय व लोकाश्रय

कुठल्याही भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी राजाश्रय व लोकाश्रय या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. यातल्या कोणत्याही एका आश्रयाच्या अभावी भाषेच्या विकासाचा प्रवाह अवरुद्ध होतो, कुंठित होतो. निदान हव्या त्या वेगाने तो वाहू शकत नाही. या दोन आश्रयांपैकी कोणता अधिक महत्त्वाचा हे ठरविणे अवघड आहे. सोव्हिएट रशियामध्ये रशियन भाषेला भक्कम आश्रय होता. पण त्या संघराज्यातील उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान अशा अनेक राज्यांमध्ये रशियन भाषा फारशी प्रभावी ठरू शकली नाही; भारताच्याही विविध भागांत वेगवेगळ्या काळात पर्शियन, इंग्रजी, फ्रेंच, पोर्तुगीज या राजभाषा होत्या. पण त्या अल्पसंख्य सुशिक्षितांपर्यंतच मर्यादित राहिल्या. इंग्लंडमध्ये मात्र १६व्या शतकापासून इंग्रजीला राजाश्रय व लोकाश्रय यांचा लाभ झाला आणि त्यामुळे इंग्रजीचा विस्तार व विकास झपाट्याने झाला.
१९६० पूर्वी मराठीला राजाश्रय कधीच नव्हता. मराठीच्या गळचेपीविरुद्ध, तिला मिळणार्याश दुय्यम वागणुकीविरुद्ध ज्ञानेश्वरांना बंड करावे लागले. शहाजी राजांच्या पदरी असलेल्या कवींच्या यादीत मराठी कवींची संख्या संस्कृत कवींच्या तुलनेने अत्यल्प होती. शिवाजी महाराजांचा आश्रय होता तो भूषण या हिंदी कवीला. त्यांनी राज्यव्यवहारकोश तयार करवून घेतला तो संस्कृतच्या धर्तीवर. रामदास, तुकाराम यांचा राज्यकर्त्यांनी गौरव केला तो ते साधू, संत होते म्हणून; कवी होते म्हणून नव्हे! पेशवाईतही प्रतिष्ठा होती ती संस्कृतला. १८१८नंतर राज्यकारभाराच्या सोयीसाठी मराठीची गरज भासू लागली. त्यामुळे इंग्रज राज्यकर्त्यांनी मराठी-इंग्रजी (मोल्सवर्थ) व इंग्रजी-मराठी (कॅंडी) हे दोन कोश तयार केले. दक्षिणा प्राइझच्या रूपाने मराठीतील ग्रंथरचनेला, भाषांतरांना उत्तेजन दिले. शालेय व पुढे महाविद्यालयीन पातळीवरील शिक्षणात मराठीचा समावेश केला. पण प्रशासन, न्यायालय इत्यादी ठिकाणी मराठीला स्थान नव्हते; प्रतिष्ठेच्या जागेवर संस्कृतच्याऐवजी इंग्रजी आली होती.
पण या काळात मराठीला लोकाश्रय मात्र होता. संत-पंत-तंत यांच्या काव्याला लाभलेली प्रतिष्ठा व लोकप्रियता यामुळे मराठीचा, मंद गतीने का होईना, विकास होत राहिला. तिच्या भाषकांना तिच्याबद्दल अभिमान वाटत राहिला. तिचे पांग फेडण्याची ओढ त्यांना वाटत राहिली. त्यामुळे व्याकरण, पत्रकारिता, साहित्य, कोशरचना अशा तिला सशक्त करण्याच्या अनेक प्रयत्नांदची परंपरा निर्माण झाली. दुर्दैवाने असे प्रयत्न् राजाश्रयाच्या अभावामुळे एकांड्या शिलेदारीने होत राहिले. त्यांना संघटित, संस्थात्मक स्वरूप न लाभल्यामुळे त्यांच्यात सातत्य राहिले नाही. नवीन प्रयत्नांेना पूर्वप्रयत्नांाच्या अनुभवांचा व फलनिष्पत्तीचा आधार मिळत न राहिल्यामुळे प्रत्येकाला परत परत श्रीगणेशाय नम:पासून प्रारंभ करावा लागला.

१९६०नंतर हे चित्र काहीसे बदलले. पूर्वी कधी नव्हता तो राजाश्रय मराठीला लाभला. या वस्तुस्थितीला सुमारे पन्नास वर्षे झाली.

मराठीला राजभाषेचा दर्जा मिळून पन्नास वर्षे होत आली, पण पूर्वीच्या संस्कृत व नंतरच्या इंग्रजीची प्रतिष्ठा मराठीला लाभली आहे, असे म्हणता येत नाही. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या दरवर्षी वाढते आहे आणि मोठ्या शहरातील मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या घटते आहे. मराठीचा प्राध्यापक असलेल्या एका मंत्र्याने इयत्ता पहिलीपासून इंग्रजी शिकवण्याचा निर्णय अंमलात आणून इंग्रजीच्या प्रतिष्ठेत भर घालण्याचे पुण्यकर्म केले. शब्दकोश, विश्वकोश अजून पूर्ण झालेले नाहीत. भाषा-आयोग नेमणे, मराठीच्या बोलींची पाहणी, नोंद, दस्तावेजीकरण याची निकड शासनाला अद्याप जाणवलेली नाही. मंत्र्यांपासून महापौरांपर्यंत सर्व पुढारी चित्रवाणीला मुलाखती, मतप्रदर्शन, माहिती देताना मराठीचा आग्रह धरत नाहीत. शासनाने भाषाभिवृद्धीसाठी किती पैसे खर्च केले एवढा एकमेव निकष मराठीचा राजाश्रय सिद्ध करायला पुरेसा आहे का? मराठीकडे पाहण्याची दृष्टी, मराठीला वागविण्याची तर्हाआ, मराठीसाठी करावयाच्या कामांची तड लावण्याची आच - अशा गोष्टींकडे पाहिले तर मराठीला राजाश्रय आहे यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.

मग लोकाश्रयाचे काय? मराठीला पूर्वी असणारा लोकाश्रय आज त्या प्रमाणावर आणि त्या पातळीवरचा आहे का? खरं पाहाता, राजाश्रयामुळे लोकाश्रयात वाढ व्हायला हवी. त्याची व्याप्ती व खोली वाढायला हवी. भाषेच्या विकासाला वेग यायला हवा. पण मराठीच्या बाबतीत तसे चित्र आज दिसत नाही. मराठीबद्दलचा अतिरिक्त (आणि बर्या च वेळा असमंजस) अभिमान वेळोवेळी दिसून आला तरी त्याचे परिवर्तन भक्काम व भरीव कृतीत होत नाही. मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या व गुणवत्ता वाढण्याऐवजी त्या बंद पडत आहेत आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांत आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा म्हणून पालक धडपडत आहेत; त्यासाठी देणगी व अव्वाच्या सव्वा शुल्क मोजायची त्यांची तयारी आहे. नऊ-दहा कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात मराठी पुस्तकाची पहिली आवृत्ती ५०० प्रतींची असते! इंग्रजी बोलायला शिकवणार्यां खासगी वर्गांच्या जाहिरातींनी वर्तमानपत्रांचे रकाने भरलेले असतात; पण मराठी शिकवणार्याल वर्गाची जाहिरात औषधालाही आढळत नाही. मराठी वृत्तपत्रांना इंग्रजी शीर्षकांच्या पुरवण्याच नव्हे तर इंग्रजी वृत्तपत्र सुरू करण्याची आवश्यकता वाटते. ही सगळी लक्षणे मराठीच्या लोकाश्रयाची आहेत असे म्हणता येईल का?

आज मराठीचा राजाश्रय तोंडदेखला आहे, औपचारिक आहे आणि लोकाश्रय तकलादू आहे. लोकांना हे जाणवते; व्यवहारात त्याचा त्यांना अनुभव येतो. दुकानांवर देवनागरीतील पाट्या लागल्या तरी दुकानांत मराठी बोलले जाईलच असे नाही. मराठीचा विकास व्हायचा असेल राज्यकर्त्यांच्या वृत्तीत व आचरणात मूलभूत फरक व्हायला पाहिजे; मराठीला खर्याय अर्थाने राजाश्रय मिळायला पाहिजे. तो मिळाला की लोकांच्या दृष्टिकोनात फरक पडायला वेळ लागणार नाही. आणि तसे झाले की लोकाश्रय भक्केम होईल.
मग मराठीच्या विकासाला कुणीही, कसल्याही सीमा घालू शकणार नाही.

प्र० ना० परांजपे

आवाहन

(१) मराठीबद्दल आस्था असणार्‍या, मराठीचे अध्ययन-अध्यापन करणार्‍या, मराठीच्या विकासासाठी प्रयत्‍न करू इच्छिणार्‍या सर्वांपर्यंत 'भाषा आणि जीवन' हे नियतकालिक आणि ते प्रकाशित करणार्‍या 'मराठी अभ्यास परिषदे'चे कार्य पोचणे आवश्यक आहे, हे आपल्यालाही पटेल. त्यासाठी आपणही काही करू शकता. आपण रु० १०००/- (किंवा त्या पटीने) देणगी दिलीत तर 'भाषा आणि जीवन'चे अंक दहा (किंवा त्या पटीत) संस्थांना (महाविद्यालये, विद्यापीठे यांचे मराठी विभाग इ०) किंवा व्यक्तींना एक वर्षभर पाठविले जातील. त्यांना पाठविल्या जाणार्‍या पत्रात आपल्या देणगीचा उल्लेख केला जाईल आणि 'भाषा आणि जीवन'चे वर्गणीदार होण्याचे आणि (व्यक्तींना) 'मराठी अभ्यास परिषदे'चे आजीव सभासद होण्याचे आवाहन केले जाईल. अंक ज्यांना पाठवायचे त्यांची नावे व पत्ते आपण देऊ शकता किंवा ते काम आपण आमच्यावर सोपवू शकता.

या योजनेचा प्रारंभ श्री० विजय पाध्ये यांच्या रु० १०००/-च्या देणगीतून होत आहे. डॉ० वसंत जोशी (पुणे) यांनीही या आवाहनाला प्रतिसाद देऊन रु०१०००/देणगी पाठवली आहे. त्यांची संस्था आभारी आहे. आपल्या सहभागाची आम्ही वाट पाहात आहोत.

(२) परिषदेचे संकेतस्थळ : दि० १ मे २००८ रोजी परिषदेचे संकेतस्थळ सुरू
झाले आहे. त्याचा पत्ता (www.marathiabhyasparishad.com). या संकेतस्थळावर परिषदेची घटना, पदाधिकारी, कार्यक्रमांची छायाचित्रे, 'भाषा आणि जीवन'चे अंक, सभासदवर्गणी इत्यादी माहिती उपलब्ध आहे. सभासदांनी या संकेतस्थळावरील मजकुराचे परिशीलन करावे, आपला अभिप्राय कळवावा आणि सूचनाही कराव्यात.

(३) मराठी अभ्यास परिषदेच्या आजीव सदस्यांनी तसेच वर्गणीदारांनी आपला e mailचा पत्ता कृपया कळवावा. त्यामुळे आपल्याशी संपर्क साधणे सुलभ होईल.

दिवाळी २००८: अनुक्रमणिका

आवाहन /२
संपादकीय/मराठी भाषेच्या विकासाच्या वाटा-६: राजाश्रय वलोकाश्रय/प्र०ना० परांजपे/३
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने प्रसृत केलेली शुद्धलेखन-प्रश्नावली/६
तीन कविता /राजेश जोशी/भाषांतर : बलवंत जेऊरकर
(१) दोन ओळींच्या दरम्यान /७
(२) अपूर्ण कविता /८
(३) आपली भाषा /९
मराठीचे लेखननियम :
मराठी प्रमाणभाषेचे लेखननियम /यास्मिन शेख/११
मराठीचे लेखनसंकेत /कल्याण काळे/१७
आगर बोली /शंकर सखाराम/२१
धनगरी ओव्यांचा लोकतत्त्वीय अभ्यास /माधुरी वि० दाणी/२६
धुळे जिल्ह्यातील दलितांच्या लोकोक्ती आणि त्यांचे सामाजिक संदर्भ /प्रकाश भामरे/३१
भाषेतील म्हणींचे संचित /विद्या वासुदेव प्रभुदेसाई/३८
ज्याची त्याची प्रचीती :
(१) हद्दपार शब्द /लीला दीक्षित/४३
(२) स्वयंपाकघरातील हरवलेले शब्द /शुभांगी रायकर/४६
'गाथा सप्तशती'तील मराठीचे दर्शन /शरदिनी मोहिते/४७
'छंदोरचने'च्या भाषांतराची निकड /शुभांगी पातुरकर/५१
पुस्तक परीक्षणे :
(१) आधुनिक समीक्षा सिद्धान्त /अविनाश सप्रे/५४
(२) एक पुस्तक-प्रवासाची कथा /विजया देव/६०
(३) भाषाभान /सुमन बेलवलकर/६७
(४) अक्षरस्पंदन /सुमन बेलवलकर/७२
(५) स्त्रीकवितेच्या अभ्यासकांस उपयुक्त ठरणारे पुस्तक /विद्यागौरी टिळक/७७
परीक्षणासाठी आलेली पुस्तके/८१
प्रतिसाद :
(१) शब्दसंक्षेप, वाक्यसंक्षेप /द०भि० कुलकर्णी/८०
(२) मराठी भाषेतील सौजन्य /डॉ० प्र०चिं० शेजवलकर/८२
(३) वर्‍हाडी बोलीची उच्‍चारप्रवृत्ती /रावसाहेब काळे/८३
श्रद्धांजली/५०
लेखकांसाठी सूचना/४२,४५,५९
पानपूरके /५,१६,२०,२५,३०,३७, ७१, ७६, ७९
मुखपृष्ठावरील रेखाचित्र : अनिल अवचट. मांडणी : विनय सायनेकर, सुप्रिया खारकर

शंका आणि समाधान

...समाधान

(संदर्भ: भाषा आणि जीवन : अंक २५.४ दिवाळी २००७)

१. स्वल्पविराम - 'की'च्या आधी की 'की'नंतर ?

आगळा वेगळा सन्मान...

मुंबईजवळ एका गावात संगणक-चलित कापडमाग जुळवण्याचे काम चालू होते. इटालियन यंत्रतंत्रज्ञानाच्या सूचना मी आपल्या गिरणीकामगारांना हिंदी भाषेतून सांगत होतो. अवघ्या दोन दिवसांत १० कापडमाग जुळवून झाले व कापड-उत्पादन सुरू करण्याची वेळ येऊन ठेपली. इटालियन तंत्रज्ञ स्वतःवर व एका विशेष तरबेज कामगारावर इतका खूष झाला, की त्याला मागे एक लाथच मारली. परिणाम उलटा झाला. काम थांबले. हमरीतुमरीवर येऊन तो कामगार इटालियन तंत्रज्ञाशी भांडू लागला. बाकीचे त्याला सामील झाले. 'माध्यम' आणि 'मध्यस्थ' या दोन्ही भूमिका करून मी ते भांडण सोडवले. उत्पादन सुरू झाले, तशी तो इटालियन गाऊ, नाचू लागला, टाळ्या पिटू लागला. मी त्याच्यापासून दहा पावले दूर सरकलो व टाळ्या पिटू लागलो. काही इटालियन लाथ मारून कौतुक करतात, हे नवीन ज्ञान मला झाले होते.

— य०चिं० देवधर (डॉ० कल्याण काळे व डॉ० अंजली सोमण संपादित 'भाषांतरमीमांसा' ह्या पुस्तकातून)

नव्या शतकाची नांदी

'भाषा आणि जीवन'चा एकशेएकावा अंक वाचकांच्या हाती देताना आम्हांला समाधान वाटत आहे. यानिमित्ताने थोडे सिंहावलोकन करणे योग्य ठरेल. १ जानेवारी १९८२ रोजी पुणे येथे स्थापन झालेल्या 'मराठी अभ्यास परिषदे'ने जून (पावसाळा) १९८३ पासून 'मराठी अभ्यास परिषद पत्रिका : भाषा आणि जीवन' हे त्रैमासिक सुरू केले. तेव्हापासून आजपर्यंत हे प्रकाशन सातत्याने चालू आहे.

सुरुवातीचे प्रमुख संपादक होते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषावैज्ञानिक डॉ० अशोक रा० केळकर. (कार्यकाल वर्ष १ अंक १ ते वर्ष ८ अंक १) त्यानंतर प्रमुख संपादक व त्यांचा कार्यकाल पुढीलप्रमाणे आहे. डॉ० कल्याण काळे (वर्ष ८ अंक २ ते वर्ष १५ अंक ४), डॉ० विजया देव (वर्ष १६ अंक १ ते वर्ष १८ अंक ४) डॉ० मृणालिनी शहा (वर्ष १९ अंक १ ते वर्ष २२ अंक ४). वर्ष २३ अंक १ पासून प्रा० प्र०ना० परांजपे प्रमुख संपादक आहेत. प्रमुख संपादकांना संपादकमंडळातील इतरांचेही सहकार्य मिळते.

पहिल्या अंकाची पृष्ठसंख्या ३६ आणि किंमत १० रुपये होती. या दोहोंमध्ये वाढ होत होत आज अंकाची पृष्ठसंख्या आहे ७२ ते ८० आणि अंकाची किंमत २५ रुपये झाली आहे. सुरुवातीला अडीचशेच्या आसपास असलेली वर्गणीदारांची संख्या आता हजाराच्या जवळ पोहोचली आहे. या नियतकालिकाला १९९५ मध्ये महाराष्ट्र फाउंडेशनकडून मिळालेला वैचारिक नियतकालिकाचा पुरस्कार म्हणजे समाजमानसात त्याला मिळालेली प्रतिष्ठेची पावतीच आहे. मात्र अजूनही महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण अध्यापकवर्ग, आणि नागरी आणि ग्रामीण वाचनप्रेमी यांच्यापर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आम्हांला गाठायचे आहे आहे आणि त्यासाठी आमचे प्रयत्‍नही चालू आहेत. संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षापासून महाविद्यालयीन वार्षिक नियतकालिकांची स्पर्धा आयोजित केली जात आहे. वाचकांचे वर्तुळ भाषाभ्यासकांपुरते मर्यादित न राहता त्यात सर्वसामान्य वाचकही सहभागी व्हावेत म्हणून आम्ही प्रयत्‍नशील आहोत. भाषाभ्यासकांना उपयुक्त जशी साधनसामग्री (उदाहरणार्थ भाषाशास्त्रीय लेखन, संशोधन अहवाल, भाषाविषयक लेखनसूची इत्यादी) अशी अंकात असते, तशीच सर्वसामान्य वाचकांना स्वारस्य वाटावे अशी लेखनसामग्री (उदाहरणार्थ रंजक पानपूरके, हलक्याफुलक्‍या शैलीतील भाषाविषयक निरीक्षणे, भाषेचे विभ्रम टिपणारे लेखन, पुस्तक-परीक्षणे इत्यादी) देखील त्यात समाविष्ट असते.

भाषा ही सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. भाषेचे जीवनानुभवाशी साक्षात नाते असते. 'भाषा आणि जीवन' च्या पहिल्या अंकाच्या संपादकीयात म्हटल्याप्रमाणे जीवनाचा अनुभव घेण्याची ज्याची त्याची लकबच अखेर एक भाषिक लकब असते! भाषा आणि जीवन यांच्यातील अनेकपदरी नात्याचा सर्वसामान्य वाचकांना प्रत्यय येत असतो तर त्याच्यातील गुंतागुंत अभ्यासकांना जाणून घ्यावीशी वाटते. भाषा ही लोकव्यवहाराचे साधन असते, ज्ञानव्यवहाराचे माध्यम असते, ती संस्कृतीची वाहक असते आणि कलात्मक निर्मितिव्यवहारात ती जणू अनुभवाचे द्रव्य असते. व्यक्‍तीच्या भावजीवनात ती भावना, विचार व संवेदना यांचे केंद्रच असते, भाषेच्या अशा जीवनव्यापी अस्तित्वाचे काही पैलू 'भाषा आणि जीवन' च्या अंकांमधून उलगडले जातात; असे वाचकांना आढळेल.

भाषा ही सांस्कृतिक परंपरा असते. कोणतीही सांस्कृतिक परंपरा टिकविण्याचे काम मुख्यतः शिक्षणक्षेत्राकडे येते. कारण पुढच्या पिढ्यांशी संवाद साधण्याचे काम पाठ्यपुस्तके करीत असतात. त्यामुळे प्रमाणभाषेचे अध्यापन, पाठ्यपुस्तकांचे मूल्यमापन, अभ्यासक्रमात मराठीचे स्थान या विषयांवरील लेखनही 'भाषा आणि जीवन'मध्ये देण्यात येते. मराठीतून शिकवणारा शिक्षक हा मराठीचाही शिक्षक असतो, हे लक्षात घेऊन विविध सामाजिक शास्त्रांचे मराठीतून अध्यापन करताना येणार्‍या अडचणींची चर्चा अंकात होत असते. त्याचबरोबर त्या त्या शास्त्रांमधील परिभाषानिर्मितीच्या प्रक्रियेला गती देणारे लेखनही अंकात समाविष्ट असते. विविध ज्ञानक्षेत्रांशी संबंधित पारिभाषिक संज्ञांच्या सूचीचा अंतर्भावही अंकात आवर्जून केला जातो. शिक्षणविषयक समकालीन प्रश्नांना भिडण्याचे आव्हान 'भाषा आणि जीवन'ने वेळोवेळी स्वीकारले आहे. 'पहिलीपासून इंग्रजी', 'शालान्त परीक्षेतील मराठी विषयाचा चिंताजनक निकाल' अशा बाबींचा साधकबाधक विचार तज्ज्ञांनी केला आहे.

राजभाषा मराठी ही सक्षम 'ज्ञानभाषा' व्हावी, यासाठी असे प्रयत्‍न करीत असतानाच ती सर्वांच्या तोंडी सहज रुळेल, अशी 'लोकभाषा' व्हावी, या दिशेनेही 'भाषा आणि जीवन'ने पावले उचलली आहेत. लोकशिक्षण विशेषांकात (वर्ष १० अंक ४, संपादनसंयोजन : आशा मुंडले) याचे प्रत्यंतर येईल. न्यायालये, कार्यालये अशा क्षेत्रांमधील प्रशासकीय मराठी; वैद्यकक्षेत्र, प्रसारमाध्यमे, मुलाखती इत्यादी क्षेत्रांमधील व्यावहारिक मराठी यांविषयीचे भाषिक अनुभव आणि मार्गदर्शन यांना अंकात स्थान मिळाले आहे. मराठीला विकासाचा मोठाच पल्ला अजून गाठायचा आहे, याचे भान त्या लेखांमधून येते. प्र०ना० परांजपे यांची 'मराठीच्या विकासाच्या वाटा' ही पाच भागांतील संपादकीय लेखमाला यादृष्टीने उद्‍बोधक ठरेल.

अंकामध्ये भाषेचा सामाजिक अंगाने विचार करणारे लेख तुलनेने अधिक प्रमाणात आढळतात. प्रमाणभाषेचे मध्यवर्ती स्थान मान्य असतानाच इतर बोलींविषयीही 'भाषा आणि जीवन'ला आस्था आहे. अहिराणी, झाडी, वर्‍हाडी, सौराष्ट्री अशा प्रादेशिक बोलींबरोबरच वैदू, कोकणी, कैकाडी, भाट, आदिवासी अशा समाजविशिष्ट बोलींची आम्ही दखल घेतली आहे. इतकेच काय मूकबधिरांच्या भाषेचाही विचार अंकात झाला आहे. 'शालेय मराठी आणि झोपडपट्टी' (विजया चिटणीस, वर्ष २ अंक १), 'सर्वनामांचे समाजशास्त्र' (राजीव साने, वर्ष २ अंक २), 'सूनबाईंचे भाषाशिक्षण' (द०दि० पुंडे, वर्ष २० अंक ४), 'म्हणी, सुभाषितं, अवतरणं' (कल्याण काळे, वर्ष २ अंक ३), 'जातीची चिवट भाषा' (मृणालिनी शहा, वर्ष १५ अंक २), 'एका संकेतव्यवस्थेचा अनुभव' (विजया देव, वर्ष २१, अंक ३) आणि बालभाषेविषयीची निरीक्षणपर लेखमाला (नीलिमा गुंडी) अशा काहींचा यासंदर्भात उल्लेख करता येईल.

मराठी वाचकांच्या भाषाविषयक गरजा पूर्ण करणे हे मराठी अभ्यास परिषदेचे उद्दिष्ट असले तरी 'कुठलीही भाषा ही एखाद्या राज्याची राजभाषा असली तरी ती त्या राज्यापुरतीच मर्यादित नसते' हे तत्त्व संस्थेने स्वीकारले आहे; तसेच 'स्वतःच्या भाषेचे सामर्थ्य व मर्यादा इतर भाषांशी तुलना केल्याने अधिक प्रमाणात लक्षात येतात' ही वस्तुस्थिती सतत समोर ठेवली आहे. त्यामुळे भाषिक अस्मितेच्या संकुचितपणाच्या कक्षा ओलांडायला प्रवृत्त करणारे लेखन 'भाषा आणि जीवन'मध्ये येते. गोवा, मध्यप्रदेश, मदुरै इत्यादी ठिकाणच्या मराठीच्या स्थितिगतीविषयी यात विचारविनिमय आढळतो. तसेच तेलुगु, हिंदी, संस्कृत, इंग्लिश इत्यादी भारतीय भाषांमधील उच्‍चारणसंकेत, त्यांचे व्याकरण, त्यांतील चुकांचे विश्‍लेषण याविषयीचा अभ्यासही आढळतो. साहित्याबरोबरच व्याकरण, भाषाविज्ञान, मुद्रणकला, ग्रंथपालनशास्त्र, संख्यालेखन, नाटक-चित्रपट इत्यादींशी संबंधित भाषाव्यवहाराच्या विस्तारणार्‍या जगाचे भान 'भाषा आणि जीवन'ने बाळगलेले आहे.

विशेष म्हणजे 'धन परक्याचे', 'वसा आंतरभारतीचा' या सदरांच्या माध्यमातून इतर भारतीय व परकीय भाषांमधील अनुवादित कथा, कविता, लेख इत्यादी साहित्य देण्यात येते. मराठीचे अध्ययन व अध्यापन करणार्‍या परभाषक मंडळींच्या अनुभवांनाही यात स्थान दिले जाते. या मंडळींना मराठीच्या ज्या वेगळ्या कंगोर्‍यांचे दर्शन घडते, ते आपल्याला चकित करते. डॉ० मॅक्सिन बर्नसन यांचा 'जीव घाबरा करणारी भाषा' (वर्ष २ अंक १) आण इरीना ग्लुश्कोवा (रशियन अभ्यासक) यांचा 'मराठी भाषेतील आंबटगोड धक्के' (वर्ष ७ अंक १) हे लेख यादृष्टीने वाचनीय आहेत. भाषेचे सांस्कृतिक मूल्य ठसवणार्‍या 'भाषा आणि जीवन'च्या अनुवादविशेषांकाचा (संपादन : अंजली सोमण) येथे खास उल्लेख करायला हवा.

अंकातील इतर काही सदरांचा उल्लेखही अनाठायी ठरणार नाही. 'पुनर्भेट' सदरातून भाषिक परंपरेचे सत्त्व वाचकांपर्यंत पोहोचवले आहे. 'भाषाविचार'मधून विष्णुशास्त्री चिपळूणकर, हरिभाऊ आपटे, डॉ० श्री०व्यं० केतकर, वि०वा० शिरवाडकर वगैरेंच्या भाषेचा अभ्यास सादर केला आहे. 'दखलयोग्य'मधून भाषाक्षेत्रातील ताज्या घडामोडींकडे वाचकांचे लक्ष वेधले आहे. 'शब्दायन'मधून शब्दाच्या अनेक अर्थछटा सांगून भाषेचे भान तल्लख राहील, याची खबरदारी घेतली आहे. अंकांतील गुणग्राहक तर कधी परखड पुस्तकपरीक्षणांचाही विशेष उल्लेख केला पाहिजे. अशी परीक्षणे आता अन्यत्र सहसा वाचायला मिळत नाहीत.

'भाषा आणि जीवन'मध्ये सुरुवातीपासून सातत्याने लेखन केलेल्या काहीजणांचा नामनिर्देश करायला पाहिजे. उदाहरणार्थ :– माधव ना० आचार्य, कृ०श्री० अर्जुनवाडकर, मिलिंद मालशे, ब्रह्मानंद देशपांडे, द०भि० कुलकर्णी, द०न० गोखले, गौरी देशपांडे, वा०के० लेले, हे०वि० इनामदार, विद्युल्लेखा अकलूजकर, सुमन बेलवलकर, शरदिनी मोहिते, मनोहर राईलकर, दिलीप धोंडगे. अलीकडच्या काळात माणिक धनपलवार, विश्‍वनाथ खैरे, शुभांगी पातुरकर, शिवाजी पाटील, उमाकांत कामत, कैलास सार्वेकर, केशव देशमुख, प्रशांत बागड, वासुदेव वले, जया परांजपे, विजय पाध्ये प्रभृतींची भर पडली आहे. भाषाभ्यासाच्या विविध अंगांकडे लक्ष वेधणार्‍या विषयांची यादी अंकात देऊन आम्ही लेखकांना लिहिण्यासाठी आवाहन करतो. त्याला जुन्यानव्या लेखकांकडून अधिक मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद अपेक्षित आहे.

'भाषा आणि जीवन'ला जिज्ञासू वाचकांकडून वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य मिळते. वाचकांशी असलेले आत्मीयतेचे नाते ही अंकांची जमेची बाजू आहे. सुरुवातीला 'ठरावीक लेखकमंडळी'मुळे अंकाची 'गटपत्रिका' होईल, हा जागरूक वाचकांनी वेळीच दिलेला धोक्याचा इशारा असो किंवा अंकातील चुका संपादकांच्या लक्षात आणून देण्यातील काटेकोरपणा असो– त्यातील वाचकांची आस्थाबुद्धी महत्त्वाची ठरते. अंकामध्ये 'शंकासमाधान', 'ज्याची त्याची प्रचीती', 'सादप्रतिसाद' अशा सदरांमधून वाचकांचा सहभाग आढळतो. एखादा 'बहुश्रुत' वाचक सादाला प्रतिसाद देत 'परार्ध'चा अर्थ कळवतो; तर एखादा 'ओ०के०' (O.K) ची कुळकथा सादर करून इतरांच्या माहितीत भर घालतो. वाचकांच्या कुतूहलाचे भरणपोषण अंकातून सातत्याने चालू असते. शब्दांच्या व्युत्पत्तीचा शोध घेणारे यातील लेखन वाचकांचे कुतूहल तेवत ठेवते. 'सडासंमार्जन', 'कानडा विठ्ठलु', 'रीरी म्हणजे पितळ' अशा शब्दांविषयीची अंकातील रंगलेली मतमतांतरे वाचनीय आहेत. 'कापावे की चिरावे?' हा प्रश्न (वर्ष ८ अंक ४) आमच्या अंकाच्या पानावर कधी नाट्यपूर्ण बनतो, तर कधी 'प्राण्यांना कसे हाकलतात' याविषयीच्या जुन्या पाठ्यपुस्तकांतील कवितेचा बालबोध सूर भाषेच्या बारकाव्यांमुळे नव्याने लक्ष वेधून घेतो. (वर्ष ७, अंक ४)

'भाषा आणि जीवन'ची मुखपृष्ठेही वैशिष्ट्यपूर्ण असतात. काव्यातील अवतरणे, र०कृ० जोशी यांची सुलेखने, अनिल अवचट, शाम देशपांडे, बालम केतकर, वसंत आबाजी डहाके यांची रेखाचित्रे, शि०द० फडणीस यांची व्यंग्यचित्रे, विनय सायनेकर व सुप्रिया खारकर यांची संगणकीय अक्षरचित्रे यांतून भाषेतील दृश्यात्मकता प्रभावीपणे व्यक्‍त झाली आहे. रौप्यमहोत्सवी वर्षातील अंकांच्या मुखपृष्ठांवर ज्येष्ठ भाषावैज्ञानिकांना स्थान मिळाले आहे.

प्रस्तुत संपादकीयासाठी 'नव्या शतकाची नांदी' या शीर्षकाची योजना करण्यामागे विशेष प्रयोजन आहे. अंकांचे एक शतक संपवून या अंकाबरोबर आम्ही नव्या शतकाला प्रारंभ करीत आहोत एवढाच मर्यादित आम्हाला अभिप्रेत नाही. नव्या – म्हणजे एकविसाव्या – शतकातील आव्हानांचीही जाणीव आम्हाला आहे. ही बाबही या शीर्षकातून आम्हाला अधोरेखित करावयाची आहे. जागतिकीकरणामुळे मराठी भाषेपुढे (आणि मराठी भाषकापुढे) अनेक आव्हाने उभी राहात आहेत. जगभर पांगणार्‍या मराठी भाषकांची अस्मिता मराठी भाषेमध्ये (आणि तिच्यातून व्यक्‍त होणार्‍या संस्कृतीमध्ये) सामावली आहे; पारंपरिक तंत्राच्या लेखन व मुद्रणामुळे तिच्यावर मर्यादा येण्याची शक्यता आहे याचे भान मराठी अभ्यास परिषदेला व 'भाषा आणि जीवन'ला आहे. म्हणूनच आम्ही नुकतेच (म्हणजे १ मे रोजी) www.marathiabhyasparishad.com हे संकेतस्थळ सुरू केले आहे. सभासदांशी, वर्गणीदारांशी संपर्क साधणे, अंक व अन्य उपयुक्‍त माहिती व मजकूर उपलब्ध करून देणे व दूरदूरच्या (अगदी दूरदेशीच्या सुद्धा) मराठी माणसांच्या भाषिक गरजांचे भरणपोषण करणे या संकेतस्थळामुळे आवाक्यात येईल असा आम्हाला विश्वास आहे. अर्थात त्यासाठी मनुष्यबळ, आर्थिक बळ व जागा पुरेशा प्रमाणावर उपलब्ध होणे आवश्यक आहे. पण आव्हाने अवघड आहेत म्हणून हातपाय गाळून निष्क्रिय बसण्यापेक्षा आपल्या परीने प्रयत्‍न सुरू करणे हेच मराठीपणाचे लक्षण आहे. त्याच जिद्दीने १९८२मध्ये मराठी अभ्यास परिषदेची स्थापना झाली, १९८३मध्ये 'भाषा आणि जीवन'चा प्रारंभ झाला, आणि आता या अंकाबरोबर आम्ही नव्या शतकाची नांदी करीत आहोत.

डॉ० नीलिमा गुंडी

ऊंझा-जोडणी

    ऊंझा-जोडणी म्हणजे गुजराती भाषा परिषदेने (मूलतः भाषाशुद्धी अभियान) ऊंझा येथे भरविलेल्या अधिवेशनात घेतलेल्या निर्णयानुसार (ठरावाप्रमाणे) र्‍हस्व-दीर्घ अशा दोन-दोन इ-ई, उ-ऊ, ऐवजी फक्त एकच ई व ऊ चा वापर करावा, अर्थात फक्त दीर्घ ई ( ‍ी ) व र्‍हस्व उ ( ‍ु ) चीच चिन्हे वापरली जावीत असा निर्णय घेण्यात आला. (उदा०   वीद्या, शीक्षक, वीनंती, रुप, वधु, धुर इ० )

    गुजराती भाषेच्या लेखनात विसाव्या शतकाच्या तिसर्‍या दशकापर्यंत शुद्धलेखनाच्या बाबींत एकसूत्रता नव्हती. सर्वमान्य अशा निश्चित नियमांची व्यवस्थाच मुळी नव्हती. या संदर्भात नर्मद, नवलराम इत्यादी सुप्रसिद्ध साहित्यकारांच्या काळात काही ऊहापोहास सुरुवात झाली, परंतु एकवाक्यता निर्माण होऊ शकत नव्हती. महात्मा गांधींनी १९२९मध्ये शुद्धलेखनाचे नियम निश्चित करवून घेऊन गुजरात विद्यापीठाद्वारे एक 'जोडणीकोश' (शब्दकोश) प्रकाशित करविला. 'गुजरात सार्थ जोडणीकोश' या कोशास १९३९मध्ये गुजराती साहित्य परिषदेने मान्यता दिली. इ०स० १९४०मध्ये सरकारी मान्यताही मिळाली. गुजरात विद्यापीठाच्या या शब्दकोशास सर्वमान्यता मिळवून देण्याच्या कार्यात म० गांधींचा मोठा प्रभाव दिसून येतो.

    वास्तविकरीत्या शुद्धलेखनाचे नियम घडविण्याने भाषकास शुद्ध शुद्धलेखनाची किल्ली मिळावयास हवी. शुद्ध म्हणजे मान्यताप्राप्त, चूक केल्याशिवाय लिहिण्याची क्षमता लेखकात निर्माण व्हावयास हवी. परंतु तसे काही घडू शकले नाही. त्याचे मुख्य कारण नियमांची जटिलता, गुंतागुंत हे होय. विशेषतः  ई-ऊ संबंधात घडलेले नियम (नियमांमधील विसंगती  किंवा नियमांचीच अनियमितता). या संदर्भात काही विद्वानांचे अभिप्राय विचारात घेण्याजोगे आहेत.   ते असे :
तद्भव शब्दांमध्ये र्‍हस्व दीर्घ ई-उ संबंधित नियम पाहा. लगेच लक्षात येईल की हे तंत्र नव्हे; पण अतंत्रच म्हणावे लागेल. ई-उ युक्त शब्दांची अक्षरसंख्या, त्या 'ई-उ'चे स्थान, जोडाक्षरांचे सान्निध्य, अनुस्वार, निरनुस्वार शब्दांची स्थिती, अनुस्वाराची मंदता-तीव्रता (उच्‍चारित-अनुच्‍चारित, स्वल्पउच्‍चारित, पूर्णउच्‍चारित), शब्दांचे मूळ रूप, नामिक रूप, आख्यातिक रूप — या सर्वांमध्ये 'ई-उ'चा अगदी गोंधळच माजलेला दिसतो. त्याव्यतिरिक्त व्युत्पत्ती, प्रचलितता व स्वरभाराप्रमाणे लेखनाचे धोरणही पाळावे लागते, ते वेगळेच.

    गुजराती शब्दकोशात 'ई-उ' युक्त शब्दलेखनासाठी आठ नियम दिलेले आहेत व त्यांस सात अपवाद देण्यात आले आहेत. त्यासाठी सात स्पष्टीकरण-नोंदी आहेत. हे सर्व विशेषतः 'ई-उ' साठीच. परंतु ही स्पष्टीकरणे मुळीच तर्कसंगत नसून चालू न शकणारी आहेत. साक्षात बृहस्पती पण त्यांचा बिनचूक वापर करू शकणार नाही.

    समग्रपणे पाहता स्थिती अशी दिसते की, नियम आपल्याला अमुक एक सीमेपर्यंत घेऊन जाऊ शकतात.   शेवटी तर शब्दकोशालाच शरण जावे लागते. त्यावरही कडी करणारी स्थिती अशी की शब्दकोश (मान्य) स्वतःच ठरविलेल्या नियमांचे पालन करू शकलेला नाही असे आढळते.

    श्री० भृगुराय अंजारिया यांनी म्हटले आहे की, 'शुद्धलेखन करण्यासाठी शिकू इच्छिणार्‍यांना किंवा शिकवू इच्छिणार्‍या शिक्षकांना सुद्धा हा शब्दकोश कानाचे मार्गदर्शन, तर्काचे मार्गदर्शन किंवा स्वतः कोशाने ठरविलेल्या नियमांचे मार्गदर्शन करण्यात तोकडा पडतो, मार्गदर्शनासाठी वावच राहू देत नाही. 'हे नियम अपूर्ण असून विसंवादी आहेत.

    शुद्धलेखनाची जटिलता मुख्यत्वे र्‍हस्व-दीर्घ इ-ई व उ-ऊच्या संदर्भात विशेष रूपाने जाणवते. भाषाविद व विद्वत्वर्यांच्या मते अर्वाचीन गुजराती उच्‍चारांमध्ये ई-उ वगैरे स्वरांची र्‍हस्वता-दीर्घता यांमध्ये भेदच उरलेला नाही. भाषकास त्याचे भेदभानच राहिलेले दिसत नाही. शब्दांच्या अर्थबोधासाठी स्वरांची मात्रा कुठल्याही प्रकारे साधक ठरू शकत नाही. म्हणूनच आमचे म्हणणे असे आहे की, र्‍हस्वता-दीर्घता सुचविणारी दोन-दोन लिपिचिन्हे ठेवण्याची आवश्यकताच नाही. पंडित बेचरदास दोशी, प्रबोध पंडित, के०के० शास्त्री, डॉ० दयाशंकर जोशी, डॉ० योगेन्द्र व्यास, पुरुषोत्तम मिस्त्री, के० जयंत कोठारी आणि इतर अनेक भाषाशास्त्रज्ञ सुद्धा एकच ई-उ असावेत या विचाराचे समर्थन करतात. के०के० शास्त्रींच्या नेतृत्वाखाली भरविलेल्या गुजराती साहित्य परिषदेत 'जोडणी सुधारणा समिती'ची स्थापना झाली होती. त्या समितीने १९८७मध्ये एकच ई-उ ठेवण्याचे सुचविले होते. परंतु हा निर्णय काही अगम्य कारणांस्तव उंच खुंटीवर सुरक्षित ठेवण्यात आला.

    जे शिक्षक-प्राध्यापक अनेक वर्षांपासून गुजराती भाषा शिकवीत आहेत त्यांना प्रचीती आली आहे की संपूर्ण निष्ठेने  गुजरात विद्यापीठाच्या कोशाने मान्य केलेले नियम कसोशीने पाळूनसुद्धा विद्यार्थ्यांवर त्याचा अपेक्षित प्रभाव-संस्कार झालेला दिसत नाही. नियमांची जटिलता लक्षात घेता अपेक्षित प्रभाव होईलच असा संभवही वाटत नाही. त्यांना सतत वाटते की, निश्चित केलेल्या नियमांचा पुनर्विचार  करून त्यांत सुधारणा केलीच पाहिजे, त्याशिवाय गत्यंतर नाही. या संदर्भात विद्यापीठास अनेकानेक विनंत्या करून झाल्या; परंतु त्या सर्व बधिर कानांवर आदळून अदृश्य झाल्या. पालथ्या घागरीवरी पाणी ओतल्यास सर्व व्यर्थ.

    अशी विनंती करण्यात वडनगर (उत्तर गुजरात)चे प्राध्यापक रामजीभाई पटेल (सध्या अहमदाबाद) यांनी पुढाकार घेतला होता. अगदी तपस्वी मनुष्याप्रमाणे या कार्यास वाहून घेऊन, या कामास जीवनध्येय बनवून त्यांनी आजतागायत त्यांचे प्रयत्‍न चालू ठेवले आहेत. परंतु विद्यापीठाने अशी जिद्द व जडता दाखवून संपूर्णपणे कानाडोळा केला व स्पष्ट सांगितले की, 'कोशाच्या नियमांमध्ये कुठलाही बदल करता येणार नाही.' कारण या नियमांवर गांधीजींनी शिक्‍कामोर्तब केलेले आहे. (शब्दकोशाच्या प्रथम पानावर गांधीजींचे कथन असे नमूद केलेले आहे, 'आता यापुढे कोणासही मनस्वीपणे जोडणी करण्याचा अधिकार नाही. ')

    वास्तविकात अशी आहे की, गुजराती साहित्य परिषदेने विद्यापीठाच्या शब्दकोशास मान्यता दिली त्या वेळी गांधीजींनी स्वतः के०के० शास्त्री यांना सांगितले होते की, 'ह्या कोशामुळे (माझ्या कथनामुळे) जोडणी सुधारणेचा मार्ग बंद होत नाही.' विशेषतः हा कोश तयार करणार्‍यांत प्रमुख असलेल्या काकासाहेब कालेलकरांनी पण कोशाच्या प्रथम आवृत्तीच्या प्रस्तावनेत स्पष्टपणे नमूद केलेले आहे की, 'एकदाची अव्यवस्था दूर होऊन व्यवस्था झाली की मग सुधारणेचे कार्य अधिक सुरळीत व सुगमपणे होऊ शकेल. ' परंतु हा 'परंतु' सर्वत्र नडतो. विद्यापीठाच्या कोशकार्यालयाने वरील सर्व विचार फेटाळून लावून  नियम-सुधारणा-पुनर्विचारासाठी आपली सर्व दारे घट्ट लावून घेतली आहेत. (औरंगजेबाचे संगीताच्या वाद्यांचे दफन सहज आठवते. )

    विद्यापीठ किंवा साहित्य-निर्मिती-संस्था याबाबतीत मौन धारण करून आहेत, काही करण्यास तयार नाहीत, ह्या सत्याची खात्री झाल्यानंतर श्री० रामजीभाईंनी जोडणी सुधारणा-परिषद भरविण्यासाठी आंदोलनाचा शंखनाद केला. या कार्यात सुरतेत स्थायी झालेले श्री० उत्तमभाई गज्जर यांनी पांचजन्याच्या पाचारणास देवदत्त शंखाचा जोरदार प्रतिसाद दिला. पाचारण झाले आणि एका पाठीमागे एक याप्रमाणे डॉ० जयंत कोठारी, दयाशंकर जोशी यांच्यासारख्या मोठ्या दर्जाच्या भाषाविदांनीही आपापले शंख फुंकून उत्तम पाठिंबा दिला. ('शङ्खान् दध्मुः पृथक् पृथक्') काही उत्तम शिक्षकही यात सामील झाले. या सर्वांच्या जोरदार प्रतिसादाचा सरळ भावनात्मक परिणाम म्हणून जानेवारी १९९९मध्ये ऊंझा गावी ही परिषद भरविली गेली. ऊंझा येथील अनेक संस्थांनी यात आर्थिक सहकार्य केले; एवढेच नव्हे, तर परिषदेची उत्तम व्यवस्थाही स्वशिरी घेतली.

    या परिषदेत २५०च्या वर विद्वान, भाषाविद, शिक्षक, संपादक, साहित्यकार उपस्थित होते. या सर्वांमध्ये एक प्रखर अभ्यासू, मूलतः उत्तम मेडिकल डॉक्टर व भाषाविषयक नितांत प्रेम व  अध्यापन असलेले डॉ० निशीथ ध्रुव व लंडनस्थित विपुल कल्याणीसारखे वर्तमानपत्राचे संपादक, तसेच साहित्य-सर्जनात कर्मरत असे अनिवासी भारतीय पण सक्रियपणे सहभागी झाले होते. दोन दिवसांच्या या सघन विचार-चर्चा-चिंतनाच्या अखेरीस परिषदेने सर्वानुमते पुढील ठराव केला :

अखिल गुजरात जोडणी परिषदेचा ठराव
    गुजराती भाषेचे प्रचलित ई-उ संबंधित नियम अतार्किक व परस्पर विसंगत आहेत. गुजराती भाषेत 'ई-उ'चे र्‍हस्वत्व-दीर्घत्व अर्थभेदक-अर्थबाधकही नाही व वास्तविकही नाही. म्हणून आता ह्यानंतर हे नियम रद्द करावेत आणि लेखनात सर्वत्र एकच ई व उ ची योजना व्हावी. ई साठी फक्त दीर्घ ई व चिन्ह ( ‍ी ) व उ साठी फक्त एकच र्‍हस्व उ व चिन्ह ( ‍ु ) वापरावे. ( ऊंझा ता० ९/१० जानेवारी १९९९)

ऊंझा परिषदेच्या ह्या निर्णयानुसार गुजराती लेखनात दीर्घ ई व र्‍हस्व उ युक्त शब्द राहतील. या ठरावास 'ऊंझा जोडणी' म्हणून ओळखले जाते.

विशेष लक्षात घेण्याची गोष्ट ही की जोडणीमध्ये एकच 'ई-उ'चा हा विचार नवीन नाही. 'सरस्वतीचंद्र' (भाग १ ते ४)चे लेखक व कर्मधर्मसंयोगाने गुजराती साहित्य परिषदेचे प्रथम अध्यक्ष कै० गोवर्धनरान त्रिपाठींनी पण त्यांच्याच काळात हा विचार मांडला होता. त्यापूर्वीही भाषासाहित्याचे सघन अध्ययन करणार्‍या दोन परदेशी भाषाविदांनीही नमूद केलेले आहे की, 'गुजराती भाषेत र्‍हस्व-दीर्घ स्वरभेद प्रत्यक्षात दिसत नाही.' हे प्रसिद्ध विद्वान म्हणजे आर०आर० टर्नर व लुडविग आल्सडॉर्फ हे होत. या परदेशी विद्वानांची गोष्ट सोडून दिली तरी फक्त 'सरस्वतीचंद्र'चे लेखक महाविद्वान गोवर्धनराम त्रिपाठी यांच्यासारखे धुरंधर 'ऊंझा जोडणी'च्या विचारास समर्थन देत होते, एवढी एकच गोष्ट पुरेशी आहे.

नोंद : परिषदेने वरील एकच सुधारणा तूर्त केली आहे. इतर कुठलाही फरक केलेला नाही. गुजराती लेखनात वरील एक फरक सोडा. गुजरात विद्यापीठाच्या 'सार्थ जोडणीकोश'मध्ये दिलेले इतर सर्वच्या सर्व नियम यथावत राहू दिले आहेत. वरील ठराव झाला त्याच दिवसापासून आणंद येथे प्रकाशित होणारे 'मध्यान्तर' दैनिक व जवळजवळ वीस नियतकालिकांचे मुद्रण वरील ठरावानुसार होऊ लागले. अंदाजे पन्नास लेखकांची साठाहून अधिक पुस्तके अशा 'ई-उ'च्या फरकाप्रमाणे प्रकाशित झालेली आहेत. अजूनही होत आहेत. गुजराती भाषेतील वरिष्ठ प्रकाशन संस्था 'इमेज पब्लिकेशन्स' व सुरतेची 'साहित्य संकुल' वगैरे कित्येक प्रकाशन संस्था पण ऊंझा जोडणीच्या धोरणानुसार प्रकाशने करीत आहेत.

'ऊंझा जोडणी परिषद' : एक दस्तावेज
वरील नावाचा २०० पृष्ठसंख्या व रु० १२५/- किंमत असलेला एक ऐतिहासिक ग्रंथ 'गुजराती भाषा परिषदे'तर्फे नुकताच प्रकाशित झाला आहे. ९/१० जानेवारी १९९९मध्ये ऊंझा येथे झालेल्या जोडणी परिषदेच्या ऑडियो रेकॉर्डिंगवरून तो ग्रंथस्थ झालेला आहे. भाषाप्रेमी श्री० रतिलाल चंद्रय्या यांची प्रेरणा व आर्थिक साहाय्य यांमुळे सहा वर्षांनंतर याचे प्रकाशन होऊ शकले आहे. परिषदेच्या सर्व बैठकांमध्ये उपस्थित सर्व वक्त्यांची वक्तव्ये, अभिप्राय, चर्चा, प्रश्नोत्तरे, प्रत्येक बैठकीच्या अध्यक्षांची वक्तव्ये व विद्वतापूर्ण भाषणे, सहभागी विद्वानांची नामावली इत्यादी सर्व बारीकसारीक बाबींची लिखित नोंद यात आहे.

    [ ग्रंथप्राप्तीसाठी लिहा : श्री० इंद्रकुमार जानी, सचिव : गुजराती भाषा परिषद, खेत भवन आश्रमाजवळ, अहमदाबाद ३८० ०२७ (भारत) ]

बळवंत पटेल
प्लॉट ६६७, सेक्टर -२१, 'पंचशील', गांधीनगर, ३८२ ०२१, भारत

Pages