[परीक्षित पुस्तक : 'माझा प्रवास : १८५७च्या बंडाची हकिगत' - विष्णुभट गोडसे वरसईकर. संपादक : मृणालिनी शहा. राजहंस प्रकाशन, पुणे. २००८. पृष्ठे : २३९. किंमत रु. १७५/-]
गोडसे भटजींचे 'माझा प्रवास : १८५७ च्या बंडाची हकिगत' हे पुस्तक प्रथम प्रसिद्ध झाले (१ डिसेंबर १९०७) या घटनेला २००७ मध्ये शंभर वर्षे झाली. तसेच १८५७च्या स्वातंत्र्यलढ्यालाही दीडशे वर्षे पूर्ण झाली. हे निमित्त साधून या पुस्तकाची नव्याने संपादित केलेली आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. हे पुस्तक मराठी साहित्यात आजतागायत गाजते आहे, त्याला अनेक कारणे आहेत. पेण तालुक्यातल्या वरसई गावचे विष्णुशास्त्री गोडसे उत्तर हिंदुस्थानात द्रव्य मिळवण्यासाठी जातात आणि १८५७च्या शिपायांच्या बंडात सापडतात; पुढे त्या अनुभवांवर आधारित प्रवासवृत्त लिहितात, ही घटना इतिहासाचे अभ्यासक, साहित्याचे विमर्शक, सुज्ञ वाचक या सर्वांनाच नवलाईची आणि अभ्यसनीय वाटत आलेली आहे.
भारताचार्य चिं०वि० वैद्य यांच्या आग्रहाने गोडसे भटजींनी हे लेखन केले, ते मुळात मोडी लिपीमध्ये. त्याचे बालबोध नागरीमध्ये लिप्यंतर करून पुस्तक म्हणून ते प्रसिद्ध झाले १९०७ मध्ये. पुढे न०र० फाटक यांनी १९४९मध्ये स्वत:च्या प्रस्तावनेसह त्याची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध केली (चित्रशाळा प्रकाशन). त्यानंतर दत्तो वामन पोतदारांनी 'माझा प्रवास'ची चौथी आवृत्ती प्रसिद्ध केली (व्हीनस प्रकाशन, पुणे, १९६६, आवृत्ती ८वी २००७). तरीही पुन्हा संपादिका मृणालिनी शहा यांना नव्याने या पुस्तकाचे संपादन करावे असे वाटले; कारण 'शंभर वर्षे एखादे पुस्तक मराठी वाचकांना का आवडावे?' हा प्रश्न त्यांना पडला आणि त्याची उत्तरे शोधताना हे पुस्तक, त्याचे लेखक, त्यांचा गाव यांची चरित्रे लिहिण्याची प्रेरणा त्यांना मिळाली, मूळ संहिता पुन्हा सादर करावी असे वाटले; त्याचप्रमाणे या पुस्तकाच्या लेखनशैलीचा अभ्यास करणेही त्यांना महत्त्वाचे वाटले.
आपल्या प्रस्तावनेची विभागणी मृणालिनी शहा यांनी विविध उपप्रकरणांमध्ये केली आहे. त्यात त्यांनी सुरुवातच केली आहे ती या पुस्तकाच्या चरित्राने. मूळ मोडीतील हस्तलिखित व नंतर त्याच्या पुस्तकरूपाने सिद्ध झालेल्या आवृत्त्या यांचा कालक्रमानुसार विवेचक आढावा त्यांनी घेतला आहे. त्यात, प्रत्येक आवृत्तीचे वेगळेपण, त्याबाबतची मतमतांतरे, त्यांची परस्परतुलना यांना स्थान दिले आहे. त्यामुळे या पुस्तकाचा आजतागायत झालेला प्रवास वाचकाच्या नजरेसमोर येतो. याच भागात मोडी लिपीची द०वा० पोतदारांनी दिलेली माहितीही संपादिकेने दिली आहे.
'माझा प्रवास' हे लेखन आत्मवृत्त मानावे की प्रवासलेखन मानावे, की इतिहासकथन हा प्रश्न यापूर्वी अनेकांना पडला होता. त्यामुळे या पुस्तकावर जी परीक्षणे वेळोवेळी लिहिली गेली त्यांचा मागोवा संपादिकेने घेतला आहे. हे पुस्तक १९०७ मध्ये प्रसिद्ध झाले असले तरी त्याचे पहिले परीक्षण मे १९४४ मध्ये 'सह्याद्री'च्या अंकात आलेले आहे ही बाब संपादिकेने येथे लक्षात आणून दिलेली आहे. तसेच 'माझा प्रवास' हे प्रवासवर्णनपर लेखनच असल्याचे स्वत:चे मत वाङ्मयीन संकल्पनांच्या आधारे नि:संदिग्धपणे मांडले आहे.
या अनुषंगाने वाङ्मयेतिहासकारांनी या पुस्तकाची घेतलेली अपुरी दखल, त्याचा अभ्यासक्रमात झालेला समावेश यांची चर्चा मृणालिनी शहा करतात. 'माझा प्रवास'- मधील असाधारण जीवनानुभवामुळे थेट १८८४ पासून अगदी अलीकडच्या काळापर्यंत ('झाशीची राणी लक्ष्मीबाई' या प्रतिभा रानडे यांच्या २००२ मध्ये आलेल्या पुस्तकापर्यंत) अनेक लेखकांवर या पुस्तकाने प्रभाव गाजवला आहे. तसेच याचे हिंदी भाषांतर अमृतलाल नागर यांनी केले आहे, याचा सविस्तर परामर्श त्यांनी नेटकेपणाने घेतलेला आहे.
गोडसे भटजी यांचे गाव वरसई. संपादिकेने या गावाचे भौगोलिक स्थान व ऐतिहासिक महत्त्व सविस्तर विशद करून गावाचे चरित्रच रेखाटले आहे. त्या पाठोपाठ येते गोडसे कुटुंबाचे चरित्र : घराण्याची ही माहिती त्यांनी गोडसे कुलवृत्तांत, न०र० फाटक यांची प्रस्तावना आणि 'माझा प्रवास' यांच्या आधारे लिहिली आहे.
एकूणच 'माझा प्रवास'चा सर्वांगीण परिचय करून द्यायचा या हेतूने मृणालिनी शहा यांनी या सर्व माहितीचा धांडोळा घेतला आहे. मूळ पुस्तकातच इतिहास, ऐकीव माहिती, प्रवासवर्णन, कौटुंबिक तपशील, समाजदर्शन असे विविध पैलू एकवटलेले असल्यामुळे त्यांचा वेगवेगळा परामर्श घेणे संपादिकेने आपले कर्तव्य मानलेले आहे. या दृष्टीने पाहिले असता या उपप्रकरणांची सांधेजोड करत 'माझा प्रवास'चे एक सलग चित्र वाचकाच्या डोळ्यापुढे उभे राहते. 'सांधेजोड' म्हणण्याचे कारण असे की, वरसई गावाचे चरित्र आणि गोडसे कुटुंबीयांचे चरित्र ही दोन उपप्रकरणे वाङ्मयीन परामर्श घेणार्या भागांच्या शेवटी आली असती तरी चालली असती. पण या निमित्ताने सर्व माहिती एकत्र संकलित झाली हे या पुस्तकाचे फलित आहे.
गोडसे भटजीलिखित संहिता मोडी लिपीत असून ती १९२२ पासून भारत इतिहास संशोधन मंडळाकडे आहे. मंडळासाठी त्याचे लिप्यंतर शंकरराव जोशी यांनी केले. तेच मूळ हस्तलिखित म०म० द०वा० पोतदार यांनी जिज्ञासूंना सादर केले, त्यात कोणतीही काटछाट किंवा गाळसाळ न करता. मृणालिनी शहा यांनी ही पोतदार प्रत स्वीकारलेली नाही, तर भारत इतिहास संशोधन मंडळाकडील मूळ मोडी संहिताप्रत मिळवून नव्याने तिचे लिप्यंतर सुलभा हरके यांच्याकडून करवून घेतले आहे (पृ० ६७ - २०२). मग प्रश्न असा येतो की पोतदार प्रत आणि शहा यांनी करून घेतलेले लिप्यंतर या संहितांमध्ये काही फरक आहे का? वैद्य प्रत, फाटक प्रत आणि राजवाडे प्रत यांची परस्पर तुलना जशी शहा यांनी प्रस्तावनेमध्ये केली आहे तशी, प्रस्तुत प्रतीची तुलना राजवाडे प्रतीशी त्यांनी करणे अपेक्षित होते. त्या दोन्हींमध्ये काही तफावत आहे का, की त्या समरूप आहेत याविषयी त्यांनी मौन बाळगले आहे. मोडीची लेखनपद्धती पाहता - म्हणजे शब्द न तोडता सलग लिहीत जाणे, र्हास्वदीर्घत्व, अनुस्वार क्वचितच देणे, काही शब्दांची संक्षिप्त रूपे करणे, इ० - एकाच संहितेच्या दोन लिप्यंतरांत फरक पडू शकतो. मोडी लिपीमुळे काही शब्द इकडचे तिकडे होतात. (पृ० ६१); "काही शब्द जोडून लिहिल्यामुळे कळत नाही. उदा० पुर्तपणे पूर्णपणे असे शब्दांचे लेखन बरोबर करून घ्यावे लागते... सर्वंानी > सर्वांनी असे वाचावे लागते. वैद्य किंवा पोतदार प्रतीमध्ये सर्वांनी असेच लिहिले आहे." (पृ० ६५) असे शहा म्हणतातच. त्यामुळे नव्या लिप्यंतरात शहा यांनी कोणती दृष्टी, कोणते निकष बाळगले आहेत?
दुसरा मुद्दा इतिहासाचा. गोडसे भटजी द्रव्यार्जनासाठी निघाले ते १८५७ च्या बंडात सापडले. तिथून परत आल्यावर जवळजवळ पंचवीस वर्षांनी त्यांनी त्या आठवणी लिहून काढल्या. त्यामुळे, त्यांत काही ऐतिहासिक तथ्य आहे, काही ऐकीव माहिती आहे आणि प्रवासाच्या मनोरंजक गोष्टीही आहेत. 'जवळजवळ निम्मे पुस्तक इतिहासाने व्यापलेले’ (पृ० ७) असल्यामुळे इतिहासाचे साधन म्हणूनही त्याची चिकित्सा होते. पण संपादिकेने 'आपला इतिहास या विषयाशी प्रत्यक्ष संबंध नाही. त्यामुळे इतिहासाच्या दृष्टीने कसलाही अभ्यास या संपादनात नाही’ (पृ० ७) अशी कबुली दिली आहे. वास्तविक १८५७च्या बंडाला १५० वर्षे पुरी झाली हे जमेस धरता या पुस्तकातील ऐतिहासिक वास्तवाची शहानिशा संपादिकेने करायला हवी होती असे वाटते. कारण विविध गॅझेटियर्सही तिने वाचली असावीत असे सूची दर्शविते. संपादिकेने स्वत:ला घालून घेतलेलीही मर्यादा आपण मान्य करू; पण, इतिहासाची दृष्टी बाळगली नाही असे म्हणत असतानाच शहा यांनी वरसई गावाचे, 'माझा प्रवास' या संहितेचे, गोडसे घराण्याचे अशी चरित्रे सादर केली आहेत, तिथे इतिहासाची दृष्टीच बाळगली आहे. हे इतिहास जर इथे येतात तर, प्रत्यक्ष संहितेचा प्राण असलेला इतिहास का दुर्लक्षिला जावा?
या पुस्तकाचा अभ्यास इतिहासकाराच्या दृष्टीतून केलेला नसून भाषाशैलीच्या दृष्टीने केला आहे असे शहा आवर्जून पुन्हापुन्हा सांगतात. "गोडसे भटजींनी वापरलेल्या सहज साध्या शैलीचा अभ्यास या प्रस्तावनेमध्ये आहे." (पृ० ४); "...आणि मुख्य म्हणजे पुस्तकाच्या लेखनशैलीचा अभ्यास केला आहे." (पृ० ७); "भाषाशैलीचा अभ्यास अटळ!" (उपप्रकरण मथळा, पृ० ५८) असे त्या वारंवार म्हणतात. पण प्रत्यक्षात मात्र हे विवेचन भाषाशैली-अभ्यासाच्या दृष्टीने खूपच उणे आणि भाबडे वाटते. गोडसे भटजींच्या भाषेबद्दल बोलताना, 'साध्या वाक्यरचनेचे सौंदर्य’, 'साधीसुधी वाक्ये’, 'मोठी वाक्ये नाहीत किंवा जोड वाक्येही फारशी येत नाहीत’ (पृ० ६२) अशी अत्यंत मोघम विधाने त्या करतात. काही ठिकाणी तर त्यांच्या शैलीविषयक विचारांचा, समजुतींचा गोंधळ त्यांच्या लिहिण्यात प्रतिबिंबित होतो, उदाहरणार्थ,
"'बोली' आहे असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा ती भाषा पूर्णपणे बोलीसारखी नसते; पण बोली भाषेची कितीतरी वैशिष्ट्ये तिच्यात आलेली असतात. या लिखित बोलीमध्ये भावनांची अभिव्यक्ती पूर्णपणे होऊ शकते. त्यामुळे या शैलीला कसलेही नाव देता येत नाही, हे खरे." (पृ० ५९)
यातून काय समजायचे? मग यातून सोडवणूक करण्यासाठी संपादिका म्हणते,
"... तरी हे पुस्तक वाचताना जी एक वाचनीयता वाचकांना जाणवते, त्यालाच शैली असे म्हणता येते. नाहीतरी आपले मनोगत व्यक्त व्हावे, यासाठी जी भाषा वापरली जाते तिलाच आपण भाषाशैली म्हणत असतो." (पृ० ५९)
या संदर्भात त्यांनी वापरलेल्या संज्ञाही अचूक नाहीत. "भाषापद्धती किंवा शैली यांचा विचार करताना त्या लेखनाचा शब्दकोश महत्त्वाचा ठरतो." (पृ० ५९) या वाक्यात भाषेचा 'शब्दसाठा' असे शहा यांना म्हणायचे असावे.
वास्तविक शैलीविज्ञानाच्या अंगाने भाषाभ्यास करणार्या(ला 'माझा प्रवास' ही संहिता हा मोठा खजिना आहे. शैलीविज्ञानाशी जुजबी परिचय करून घेतला असता तरी शहा यांना या लेखनाच्या भाषेचे सौंदर्य उलगडून दाखवता आले असते; व वाचकांना त्याचा प्रत्यय देता आला असता. किमान, या गद्यलेखनातील नामपदबंध, क्रियापदे, विशेषण विस्तार, संवादाची लय ओतप्रोत भरलेले गद्य, निवेदकाचा प्रांजळपणा दर्शवणारी त्याची स्वगतवजा वाक्ये इत्यादींच्या आधारे या गद्याचा अभ्यास करायला भरपूर वाव होता. या विश्र्लेषणातून त्यांना अर्थ-व्यापारापर्यंत पोचता आले असते.
या पुस्तकातील काही कठीण शब्दांच्या अर्थाविषयी संपादिकेने काही अंदाज केले आहेत. त्यातील एका शब्दार्थाच्या बाबतीत हा अंदाज धडधडीत चुकलेला दिसतो. तो म्हणजे गोडसे भटजींच्या लेखनात येणारा 'मेखजीन' हा शब्द. या शब्दाच्या अर्थनिर्णयनाविषयी संपादिका शहा म्हणतात,
"'मेखजीन' हा शब्द पाहण्यासारखा आहे. ...काडतुसे शिपायांना धर्मबाह्य वाटत असतात. त्यामुळे शिपाई गुप्त पत्रे रवाना करतात की, 'काडतुसांबाबत प्रत्येकाने आपल्या अधिकार्यांसना सांगावे... त्या त्या छावणीत गोरे असतील ते कापून काढून दारूगोळा, मेखजीन व खजिना गुदात सु ।। आपले ताब्यात घेऊन छावणीस आग लावावी." या वाक्यातील मेखजीन हा सामासिक शब्द आहे. त्या सामासिक शब्दाचा अर्थ लागत नाही. म्हणून मग मेख मोठी खुंटी आणि जीन म्हणजे लक्षणेने घोडा असा अर्थ निघतो (ऐतिहासिक शब्दाकोश - य०न० केळकर) म्हणून मग मेखजीन म्हणजे खुंट्याला बांधलेले घोडे असा अर्थ काढता येतो आणि तो सयुक्तिक वाटतो.’ (पृ० ६१)
'मेखजीन'चा य०न० केळकरांनी लावलेला हा अर्थ संपादिकेने स्वीकारणे निखालस चुकीचे आणि अज्ञानमूलक आहे. कारण मेखजीन हा 'मॅगझीन' (magazine) या इंग्रजी शब्दाचा मराठी अपभ्रंश आहे. त्याचा अर्थ दारूगोळा ठेवण्याचे ठिकाण, दारूखाना असा आहे. १८५७च्या बंडाच्या आणि सशस्त्र प्रतिकाराच्या संदर्भात सहज येणारा हा शब्द आहे. त्यामुळे तो सामासिक शब्द समजून त्याच्या अर्थाची अशी ओढाताण करण्याची गरज नव्हती. त्यातून अर्थाचा अनर्थ झाला, ते वेगळेच. एखादी भाषा परभाषेतले शब्द घेते तेव्हा या आदत्त शब्दांचा उच्चातर, घेणार्याझ भाषेच्या उच्चासरण-प्रक्रियेनुसार होतो. इंग्रजीतून मराठीत आलेली तिकिट, मास्तर, माचीस, ठेसन अशी असंख्य उदाहरणे आपल्या परिचयाची आहेत. 'मॅगझीन'चे 'मेखजीन' हे रूप असेच आहे. गोडसे भटजींच्या वृत्तांतील संदर्भातच खरे तर हा अर्थ दडलेला आहे. केळकरांनी लावलेला अर्थ न स्वीकारता संपादिकेने संहितेचेच बारकाईने वाचन केले असते तर तिला हा अर्थ गवसला असता.
संहितेतील जी उदाहरणे आपल्या संपादकीय प्रस्तावनेत शहा देतात, त्यांच्यापुढे त्यांचे पृष्ठक्रमांक त्या देत नाहीत. त्यामुळे ते संदर्भ मुळातून शोधणे व ताडून पाहणे जिकिरीचे होते. शिवाय 'मेखजीन' या संदर्भातली संपादिकेने प्रस्तावनेत उद्धृत केलेली वाक्ये व पुढच्या संहितेतील वाक्ये यांत तफावत आहे. गोडसेभटजींची वाक्ये पुस्तकात अशी आहेत :
'...काळे लोक बेदील होऊन कडामिनीचे बार काढून तोफही सुरू करून दंगा करावयास लागले. ती छावणी लहान. गोरे लोक थोडे होते, ते सर्व त्या पलटणी लोकांनी ठार मारून दारूगोळा, मेखजीन, खजिना, तंबू वगैरे सर्व सामान आपल्या ताबीत घेऊन छावणीस आग लावून बेदिल होऊन सर्व काळे पलटणी निघोन... बाईसाहेबास हाका मारू लागले.’ (पृ० ११२)
(प्रस्तावनेतील अवतरण आणि संहितेतील मजकूर यांच्यात एकवाक्यता नसल्याची आणखीही उदाहरणे आहेत, उदा० पृ० ४९ व पृ० २०१-०२)
या भाषिक अभ्यासात आणखीही बर्या च चुका जाणवल्या. त्यातील आणखी एक उदाहरण पृ० ६० वर मृणालिनी शहा 'बिकीट’ या इंग्रजी पिकेट शब्दाच्या अपभ्रंशाबद्दल म्हणतात,
'पिकेट’ असा उच्चा’र जरी य०न० केळकरांनी लिहिला असला. तरी इंग्रजीमध्ये (Picket) (पिकिट) असा उच्चाटर आहे. ... शिवाय इंग्रजी शब्दारंभी 'प' चा उच्चा.र "ब' किंवा "फ' असा होतो, हे ही येथे आठवले.'' (पृ० ६०)
इंग्रजीत शब्दाच्या आद्यस्थानी येणार्या 'प'चा उच्चाचर "ब' असा कधीच होत नाही. आद्यस्थानी येणार्या [p], [t], [k] या व्यंजनांचा उच्चार महाप्राणयुक्त (ऍस्पिरेटेड) होतो म्हणजे pin, tin, car या शब्दांमधील आद्यस्थानी असलेले व्यंजन महाप्राणयुक्त उच्चाररले जाते. पण याचा 'पिकेट’ > 'बिकट’शी काहीही संबंध नाही.
मोडी लिखिताच्या वैशिष्ट्यांविषयी वाचकांना माहिती देताना मृणालिनी शहा म्हणतात, "...सध्याचे लेखननियम पाळून हे लेखन छापले आहे... मोडी लेखनात अनुस्वार लहरीप्रमाणे देतात किंवा देत नाहीत. काही ठिकाणी उगाच टाक झाडून वाटेल तिथे टिंबे टाकतात... मी या आवृत्तीमध्ये अनुस्वार पदरचे दिले आहेत." (पृ० ६५) पूर्वीच्या लेखनात अनुस्वारांचा अतिरेक होता ही गोष्ट खरी आहे. पण संपादिकेने पूर्ण माहितीच्या अभावी केलेले 'उगाच टाक झाडून’ हे सर्वसाधारण विधान मोडी लेखकांवर अन्याय करणारे आहे. शिवाय, 'सध्याचे लेखननियम पाळून हे लेखन छापले आहे’ असे म्हटल्यावर 'अनुस्वार पदरचे दिले आहेत’ हे विधान चांगलेच खटकते.
एकंदर पुस्तकाच्या निर्मितीत मुद्रणदोषही खूप राहून गेले आहेत. 'प्रायश्चित्त' हा शब्द 'प्रायश्चित्त', 'प्रायश्चित', 'प्रायश्चित्' अशा तीन प्रकारे मुद्रित झाला आहे. 'धु्रव', 'धृ्रव'; 'फलश्रृती', 'फलश्रुती' असे दोन्ही प्रकारे छापलेले आढळते. खेरीज, 'पारंपारिक', 'पुनमुर्दण', 'डोबिंवली', 'व्युप्तन्नता', 'उप्तत्ती', 'अलंकारिकता' ही आणखी काही उदाहरणे. काही ठिकाणी संपादिकेचे वाक्यरचनेकडे दुर्लक्ष झाले आहे, उदाहरणार्थ, "...इत्यादी पुस्तके लिहिले आहे.'' (पृ० ३३); "..आपला नातू मृत्यूने मेल्याचा प्रसंग भोगावा लागतो की काय या शंकेने..." (पृ० ४१). काही शब्दांचे लेखन संहितेत एकप्रकारे तर शब्दार्थसूचीत वेगळ्याप्रकारे आहे. उदा० 'कंटाळी' (१४२), 'कंठाळी' (२१८); 'सलिदा’ (१४२), 'सलीदा’ (२२४), संपादिकेने केलेली काही विधानेही खटकतात. उदाहरणार्थ, 'रामदास हे प्रख्यात पर्यटनपटू आहेत.’ (पृ० ४६) 'या स्थळांना त्यांनी दिलेल्या भेटी या एकजीव होऊन दिलेल्या नाहीत.’ (पृ० ४६)
याच परिच्छेदात पुढे संतसाहित्याबद्दल संपादिकेने केलेले विधान धाडसाचे वाटते, ते असे : 'अशा पद्धतीने प्राचीन साहित्याच्या प्रेरणा धर्मपंथीय असल्यामुळे त्यांनी केलेली प्रवासवर्णनेही धर्मपंथीयच झाली आहेत. शिवाय हे साहित्य पद्यमय आहे आणि मुख्य म्हणजे मुद्रणकलेचा अभाव, या गोष्टींमुळे ते मर्यादित श्रोत्यांपुरते आणि अत्यंत थोडक्या वाचकांपुरते मर्यादित राहिले.’
उलट, भाविक सश्रद्धतेमुळे संतसाहित्याला महाराष्ट्रातच नव्हे; तर भारतभर पूज्य स्थान होते. पारायणे, सप्ताह इत्यादींद्वारे ते फार मोठ्या समाजात पोचले व शेकडो वर्षे टिकून राहिले हे वादातीत सत्य आहे.
भाषेच्या अंगाने लेखनाचा अभ्यास करायचा हा संपादिकेचा संकल्प या पुस्तकातून सिद्धीस गेला नसला तरी अन्य बाबतीत त्यांनी मेहनत घेतलेली जाणवते. 'माझा प्रवास'च्या आत्तापर्यंतच्या सर्व प्रतींचा अभ्यास व मूल्यमापन, लेखकाचे चरित्र, त्याच्या प्रवासाचा नकाशा (हा नकाशा वैद्यप्रतीत आहेच!), वाङ्मयीन इतिहासात या पुस्तकाचे स्थान यांचा आढावा घेण्यात त्यांनी कुचराई केलेली नाही. भौगोलिक स्थळे, काही विशेष शब्दांचे अर्थ, संस्कृत ग्रंथ, शब्द, विधी इत्यादींची माहिती, संदर्भसूची इत्यादी परिशिष्टे अभ्यासकाला उपयुक्त ठरतील. ऐतिहासिक सामग्रीचा उपयोग या दृष्टीने करून घेण्यात मृणालिनी शहा यांना यश आले आहे. (मुद्रणदोष वगळता) 'राजहंस'ने पुस्तकनिर्मितीही देखणी केली आहे. आपले उद्दिष्ट या पुस्तकाने एका मर्यादेपर्यंत साध्य केले आहे.
(कंसातील आकडे परीक्षित पुस्तकातील पृष्ठांक आहेत.)
सुप्रिया ६१/१४ एरंडवणे, प्रभात रोड, १४ वी गल्ली
इन्कमटॅक्स ऑफिसजवळ, पुणे ४११ ००४. दूरभाष क्र. ०२० – २५४६ ८६९३