१. सामाजिक भाषाविज्ञान (सा०भा०वि०) या ज्ञानशाखेची व्याप्ती; सा०भा०वि० या संज्ञेचा वापर
आपल्याला उपलब्ध असलेल्या सामाजिक भाषावैज्ञानिक संदर्भपुस्तकांमध्ये 'सामाजिक भाषाविज्ञान' हे शीर्षक कधी व्यापक अर्थाने तर कधी मर्यादित अर्थाने वापरलेले आपण पाहतो. समाज आणि भाषा यांच्या परस्परसंबंधाचे वेगवेगळे पैलू उलगडून दाखवणार्या क्षेत्रांचा स्थूलपणाने सा०भा०वि० मध्ये समावेश होतो. उदा० संस्कृतिनिष्ठ भाषाभेदांचा अभ्यास, समाजवर्गनिष्ठ भाषाभेदांचा अभ्यास, भाषा संपर्क ते संहिता (म्हणजेच संदेशप्रबंध) विश्लेषण यांसारखी क्षेत्रे (आकृती १ पाहा.)

आकृती १ : सा०भा०वि० या शीर्षकाखाली स्थूल अर्थाने समाविष्ट होणारी क्षेत्रे
वास्तविक या सर्व परस्परसंबंधित पण स्वतंत्र विद्याशाखा आहेत. यांपैकी प्रत्येक क्षेत्राची उद्दिष्टे वेगळी आहेत आणि परिणामत: यांतील प्रत्येक विद्याशाखेची अभ्यासपद्धती वेगळी आहे. यांतील काही पद्धती गुणात्मक आहेत तर काही संख्यात्मक. उदा० द्वैभाषिक किंवा बहुभाषिक समाजांमध्ये भाषांचा वापर कोण कोणाशी, कधी, कुठे, कशाबद्दल बोलत आहे यावरून कसा ठरतो - याच्या गुणात्मक अभ्यासासाठी एक आराखडा हाइम्स आणि गंपर्झ यांनी १९६४मध्ये सुचवला होता. तसेच संभाषणाचे विश्लेषण, संहिता-विश्लेषण, संस्कृतिनिष्ठ भाषाभेदांचा अभ्यास या विद्याशाखांमधील संशोधन-पद्धती ही प्रामुख्याने गुणात्मक तत्त्वांवर आधारलेली आहे. सूक्ष्म अर्थाने सा०भा०वि० ही संज्ञा समाजवर्गनिष्ठ भाषाभेदांच्या अभ्यासासाठीच वापरली जाते. सदर लेखात समाजवर्गनिष्ठ भाषाभेदांचा अभ्यास केंद्रस्थानी ठेवून या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या लबॉवप्रणीत संख्यात्मक संशोधनपद्धतीची आपण माहिती करून घेणार आहोत. (सा०भा० विज्ञानामधील या क्षेत्राला अर्बन डायलेक्टॉलॉजी किंवा व्हेरिएशनिझम या नावाने ओळखले जाते.)
या विषयाची संशोधनपद्धती प्रामुख्याने विलियम लबॉव या अमेरिकन संशोधकाने विकसित केलेल्या 'परिवर्तनीय घटक' (लिंग्विस्टिक व्हेरिएबल) या संकल्पनेवर आधारली आहे. परिवर्तनीय घटकातील भिन्न पर्यायांना 'परिवर्तित पर्याय' (व्हेरिअंट्स) असे म्हणतात. या पर्यायांचा निर्देशात्मक अर्थ (रेफरेन्शियल मीनिंग) बदलत नाही. उदा० 'पानी' असा उच्चार केला किंवा 'पाणी' असा, तरी एकाच पदार्थाचा बोध होतो. पण या विविध पर्यायांचा वापर समाजातील निरनिराळया स्तरांतील लोक औपचारिक/अनौपचारिक शैलीप्रमाणे कमी-जास्त प्रमाणात करत असतात. 'परिवर्तनीय घटक' या संकल्पनेचे महत्त्व असे की ती वापरून आपण परिवर्तित पर्यायांची वारंवारता (फ्रिक्वेन्सी ऑफ यूसेज) मोजून एकाच भौगोलिक क्षेत्रातील भाषावापराबद्दल संख्यात्मक विधाने करू शकतो (जे बोली भाषांच्या पारंपरिक अभ्यासात करणे शक्य नव्हते). अशा संख्यात्मक निरीक्षणांचा आधार घेऊन आपण त्या भाषेच्या बदलाची दिशा निश्चित करू शकतो.
आता आपण या संशोधनपद्धतीचा तपशील पाहू या. संशोधनातील महत्त्वाच्या टप्प्यांचे खाली वर्णन केले आहे. आठ-दहा वर्षांपूर्वी मी पुण्यातल्या १२ ते १४ या वयोगटातल्या मुला-मुलींच्या प्रमाण-मराठीच्या वापराचा अभ्यास केला होता. सदर लेखात संशोधनपद्धतीचे वर्णन करत असताना हा अभ्यास मार्गदर्शक म्हणून वापरला आहे. महत्त्वाचा पहिला टप्पा म्हणजे संशोधनाची उद्दिष्टे निश्चित करणे व त्या अनुषंगाने 'संशोधन-प्रश्न', गृहीतके तयार करणे.
२. संशोधनाची उद्दिष्टे, 'संशोधन प्रश्न', गृहीतके निश्चित करणे
संशोधनात कशाचे नमुने गोळा करायचे, ते कसे आणि किती मोजायचे हे संशोधनाच्या उद्दिष्टांवर अवलंबून असते. संशोधन हाती घेण्यामागे अभ्यासकाचे स्वत:चे निरीक्षण, किंवा पूर्वीच्या संशोधकांनी मांडलेली निरीक्षणे असू शकतात. हीच निरीक्षणे शास्त्रीय पद्धतीने तपासून पाहण्यासाठी नवीन संशोधन हाती घेतले जाते. पुण्यातील शालेय मुला-मुलींचा अभ्यास करायचे ठरवले ते अशीच दोन निरीक्षणे तपासून पाहण्यासाठी :
१) प्रमाण भाषेतील मुलांची क्षमता आणि त्यांचे शालेय यश व एकूणच निरनिराळ्या सामाजिक घटकांमधल्या मुलांना येणारा शालेय अनुभव यांचा परस्परसंबंध आहे असे दिसून आले.
२) दुसरे निरीक्षण असे की भारतीय सा० भा० वैज्ञानिक अभ्यासांतून 'जात' आणि 'सामाजिक वर्ग' या दोन घटकांचा भाषिक बदलाशी नेमका संबंध काय आहे हे लक्षात येत नाही. यातील दुसर्या निरीक्षणाबद्दल थोडी पार्श्वभूमी खाली देत आहे.
१९५८मध्ये विलियम ब्राइट आणि इतर काही अमेरिकन अभ्यासकांनी भारतीय भाषांतील भेदांचा संबंध भारतातील जातीय उतरंडीशी जोडला व यातूनच 'जाती-बोली' ही संकल्पना जन्माला आली (पाहा ब्राइट, १९६०). साधारण १९६९पर्यंत भारतीय भाषांच्या संशोधनात जात या एकाच घटकावर लक्ष केंद्रित राहिले. तथाकथित 'जाती बोली'चे अस्तित्व गृहीत धरून या बोलींचे वर्णनात्मक अभ्यास झाले. १९६९च्या पुढे मात्र अचानक हा ओघ बदललेला दिसतो. त्या काळातील काही प्रमुख समाजवैज्ञानिक व सा० भा० वैज्ञानिक जातीचा उल्लेखही न करता शिक्षण, वय यांचा भाषावापरावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करू लागले. १९७०च्या दशकातले सामाजिक-राजकीय वातावरण लक्षात घेतले तर असे दिसून येते की या काळात जात आणि सामाजिक वर्ग यांवर वाद सुरू झाले. त्या काळात जातीचे अस्तित्वच नाकारून वर्गरहित, जातिविरहित समाजनिर्मितीकडे विचारवंतांचा कल होता. याचा परिणाम असा झाला की भारतातील शहरांमध्ये औद्योगिकीकरणामुळे निर्माण झालेल्या सामाजिक गतिक्षमतेचा (सोशल मोबिलिटी) भाषेवर कसा परिणाम झाला आहे, व्यक्तीच्या स्थिर/कायम असलेल्या जातीय स्तराचा आणि परिवर्तनशील असलेल्या आर्थिक - शैक्षणिक स्तराचा एकमेकांशी संबंध काय आणि त्यांचा भाषावापरावर एकत्रित परिणाम कसा होतो याचा क्वचितच विचार केला गेला आहे. हे मराठीच्या संदर्भात तपासणे आवश्यक वाटले.
संशोधनाची उद्दिष्टे निश्चित झाल्यानंतर विशिष्ट प्रश्न तयार करावेत. उदा० (१) मुलाच्या वडिलांच्या आर्थिक स्थितीचा मुलाच्या प्रमाण भाषावापराशी काय संबंध आहे?(२) मुलाच्या आईच्या शिक्षणाचा मुलाच्या प्रमाण भाषावापराशी काय संबंध आहे?(३) मुलाच्या वडिलांच्या शिक्षणाचा मुलाच्या प्रमाण भाषावापराशी काय संबंध आहे? (४) मुलाच्या जातीचा त्याच्या प्रमाण भाषावापराशी काय संबंध आहे? इ०. यानंतर या प्रश्नांवर आधारलेली गृहीतके तयार केली. उदा० मुलाच्या जातीपेक्षा त्याच्या आई-वडिलांच्या आर्थिक स्तराचा प्रमाण भाषावापरावर जास्त परिणाम असेल, इ०. प्रत्यक्ष संशोधनाद्वारे ही गृहीतके चुकीची किंवा बरोबर सिद्ध होतील.
यापुढचा टप्पा म्हणजे भाषकांचे आणि भाषितांचे प्रातिनिधिक नमुने गोळा करणे.
३. समाजवर्गनिष्ठ भाषाभेदांच्या अभ्यासासाठी लागणारी सामग्री कशी गोळा करावी?
इथे आपण आधी भाषकांच्या आणि नंतर भाषा-सामग्रीच्या नमुना निवडीबद्दल माहिती घेऊ या.
३.१ नमुना-भाषकांची निवड कशी करावी?
लबॉवची संशोधनपद्धती मूलत: संख्यात्मक असल्यामुळे नमुना-भाषकांची निवड प्रातिनिधिक असणे महत्त्वाचे असते. या दृष्टीने रँडम सँपलिंग (पूर्वग्रहरहित नमुने गोळा करणे) ही पद्धत सर्वांत योग्य समजली जाते. इथे रँडम ही कल्पना भाषावैज्ञानिक नसून संख्याशास्त्रीय आहे. या पद्धतीत नमुना-भाषकांच्या निवडीमागे कुठलेही पूर्वग्रह नसतात - जसे की स्त्री अभ्यासकाने सोयीचे म्हणून स्त्री-भाषकांचीच निवड करणे किंवा आपल्याला परिचित अशा एकाच परिसरातील भाषक निवडणे इ० रँडम सँपलमध्ये दूरभाष-सूची, मतदार-यादी यांचा उपयोग होतो. पण ही पद्धत पूर्णपणे भरवशाची असेलच असे नाही. कारण भारतात तरी स्वत:चा टेलिफोन असणारे लोक मध्यम किंवा उच्च वर्गांमध्येच आढळून येतील व मतदार-यादीत केवळ १८ वर्षांवरील मतदारांचा समावेश असतो. समाजातील सर्व वर्गांचे, वयोगटांचे प्रतिनिधित्व या पद्धतीत होत नाही.
यावर उपाय म्हणून जजमेंट सँपल निवडण्याची पद्धत रूढ आहे. म्हणजे विशिष्ट समाजातील भाषावापराचे वर्णन करण्याच्या दृष्टीने त्या समाजातील ठळक आर्थिक स्तर, जाती, लिंग, वयोगट इ०चा काळजीपूर्वक विचार करून त्या सर्वांचे प्रतिनिधित्व करतील असेच माहीतगार निवडणे. उदा० पुण्यातील शहरी मराठीचा सा०भा० वैज्ञानिक अभ्यास करायचा झाल्यास पुणे शहरातील ब्राह्मण-ब्राह्मणेतर, मध्यमवर्गीय व कामगारवर्गीय, स्त्री-पुरुष, लहान-तरुण-वयस्क, याप्रमाणे जात, वर्ग, लिंग, वयोगटांचे वेगवेगळे स्तर विचारात घ्यावे लागतील. त्यांची तालिका-पद्धतीने मांडणी करून प्रत्येक रकान्यात किमान ८ माहीतगार निवडावे लागतील (पाहा : मिलरॉय १९८७, पृ०२२).
जजमेंट सँपलचे एक उदाहरण आपण इथे विचारात घेऊ या : जात, लिंग, वय, आर्थिक स्तर हे सामाजिक वर्गीकरणाचे निकष मानल्यास आपल्याला खालीलप्रमाणे तालिका तयार करता येईल :
दोन जाती, दोन लिंगे (स्त्री, पुरुष), तीन वयोगट, (१८-३०, ३१-४५, ४६-६०) आर्थिक वर्ग (मध्यम, कामगार) (एकूण २४ रकाने किंवा cells) × (प्रत्येकी आठ माहीतगार) = एकूण १९२ माहीतगार. हीच माहिती खाली तालिकेच्या स्वरूपात मांडली आहे :

ही पद्धत नेहमीच यशस्वी ठरते असे मात्र नाही. पुण्यातील शालेय मुलांच्या अभ्यासासाठी वेगवेगळ्या सामाजिक स्तरांतील मुलं-मुली मी माहीतगार म्हणून गोळा करत होते. हे करीत असताना अनुसूचित जातीतील उच्चशिक्षित आई-वडिलांची मुलं सापडणे मला अवघड गेले. नंतर लक्षात आले की या वर्गातील सामाजिक स्तरांतील आई-वडिलांचा कल आपल्या पाल्यांना मराठी माध्यमिक शाळांपेक्षा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये किंवा कॉन्व्हेंट्समध्ये पाठवण्याकडे आहे. पण माझा अभ्यास तर मराठी शाळांपुरताच मर्यादित होता!
आपण रँडम आणि जजमेंट सँपलिंग या नमुना-भाषकांच्या निवडीच्या पद्धती पाहिल्या. याशिवाय सा०भा० वैज्ञानिक अभ्यासात 'भाषकाच्या संपर्कजाळयाचा' वापर करूनदेखील सामग्री गोळा केली जाते. या पद्धतीत 'सामाजिक वर्ग'सारखी अमूर्त संकल्पना न वापरता व्यक्तीच्या रोज संपर्कात येणार्या लोकांमध्ये तिच्या नैसर्गिक भाषावापराचे नमुने आपण गोळा करू शकतो.
तर हे झाले माहीतगारांच्या निवडीबद्दल. आता भाषेचे नमुने गोळा करण्यासाठी ज्या पद्धतीचा अवलंब केला जातो त्यांच्याबद्दल थोडी माहिती घेऊ या.
३.२ भाषेचे नमुने कसे गोळा करावेत?
या ठिकाणी आपण आधी भाषिक सामग्री गोळा करण्यासाठी कोणत्या पर्यायी पद्धती उपलब्ध आहेत ते पाहू या. त्यानंतर लबॉवने विकसित केलेल्या 'मुलाखत पद्धती'चा तपशील पाहू या.
आपल्या अभ्यासाचे स्वरूप, त्याच्या गरजा/मर्यादा लक्षात घेऊन अभ्यासक खालील पद्धतींपैकी एकीचा किंवा एकापेक्षा जास्त पद्धतींचा संयुक्तपणे वापर करतो.
१) प्रश्नावली
भाषकांच्या सामाजिक स्तराबद्दल माहिती मिळविण्यासाठी, भाषेसंबंधी माहीतगारांची मानसिकता जाणून घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष भाषावापराबद्दल माहिती घेण्यासाठी प्रश्नावलींचा उपयोग केला जातो. या पद्धतीमध्ये प्रश्नावलीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे भाषक स्वत: लिहितात किंवा ती ध्वनिमुद्रित करतात. या पद्धतीत माहीतगारांनी स्वत:च्या भाषावापराबद्दल केलेल्या अंदाजांवर अभ्यासक अवलंबून राहतो. हे अंदाज चुकीचेही असू शकतात. त्यामुळे सा०भा० वैज्ञानिक बर्याचदा प्रश्नावलीतील उत्तरे तपासून पाहण्यासाठी भाषकाच्या घरच्यांमध्ये किंवा मित्रपरिवारात सामील होऊन/मिसळून निरीक्षण करतो.
२) औपचारिक मुलाखत
आधी फारशी ओळख नसलेल्या भाषकाची पूर्वनिर्धारित प्रश्नसूचीच्या आधारे मुलाखत घेतली जाते. या पद्धतीत नैसर्गिक भाषावापराचे नमुने मिळणे अवघड असते. मुलाखत-पद्धतीतील ही उणीव भरून काढण्याच्या दृष्टीने भाषकाच्या 'लहानपणीच्या एखाद्या आठवणीचे वर्णन', 'स्वत:च्या एका अनुभवाचे कथन' किंवा 'अलीकडे बघितलेल्या एका चित्रपटाचे कथानक' अशा प्रश्नांचा प्रश्नावलीत समावेश केला जातो. यामुळे भाषक मुलाखतीचा तात्कालिक संदर्भ विसरून आपल्या नैसर्गिक शैलीत बोलू लागतो.
३) सहभागी निरीक्षण (पार्टिसिपंट ऑब्जर्व्हेशन)
औपचारिक मुलाखतीद्वारा नैसर्गिक भाषावापराचे नमुने मिळणे अवघड असते. पर्यायी पद्धत म्हणून भाषकांच्या संपर्कजाळयात आधी प्रवेश मिळवून, त्यातील सभासदांत मिसळून, एकरूप होऊन नंतर त्यांच्या भाषावापराचे निरीक्षण केले जाते. असा संपर्क साधण्यासाठी संशोधक 'मित्राचा मित्र' किंवा 'मैत्रिणीची मैत्रीण' म्हणून ओळखल्या जाणार्या पद्धतीचा उपयोग करतात. याच संपर्कतंत्राचा उपयोग करून व्यक्तीच्या रोजच्या वापरातल्या भाषेचे नमुने मिळू शकतात.
४) ध्वनिमुद्रण
भाषकांच्या पूर्वसंमतीने त्यांचे घरच्यांशी, सहयोग्यांशी, मित्रांशी रोजच्या संपर्कात होणारे संभाषण ध्वनिमुद्रित करणे ही एक पर्यायी पद्धत आहे. असे करत असताना टेपरेकॉर्डर सहज दृष्टीस येणार नाही अशा ठिकाणी ठेवला जातो. या पद्धतीचा फायदा असा की या पद्धतीत नैसर्गिक भाषावापराचे नमुने मिळण्याची शक्यता सर्वाधिक असते. मात्र आपली वैयक्तिक संभाषणे ध्वनिमुद्रित करण्याची परवानगी सगळे देतीलच असे नाही. भाषकाचे बोलणे त्याच्या अजाणतेपणे ध्वनिमुद्रित करणे अनैतिक समजले जाते.
५) दैनंदिनीचा वापर
अभ्यासकाने दिलेला आराखडा वापरून अभ्यासासाठी निवडलेले भाषक आपल्या रोजच्या भाषावापरासंबंधी टीपा/नोंदी एका वहीत लिहून ठेवतात. अभ्यासाचा विषय द्वै-किंवा बहुभाषिकता असला तर अभ्यासक या पद्धतीचा वरील एखाद्या पद्धतीला पूरक म्हणून अवलंब करू शकतो. बहुभाषक किंवा घरच्यांशी, नातलगांशी, शेजाऱ्यांशी, सहकाऱ्यांशी बोलत असताना कोणत्या भाषेचा कसा वापर करत आहे हे अभ्यासक दैनंदिनीद्वारे जाणून घेऊ शकतो.
भाषावापराचे वर्णन करत असताना आपले भाषिक नमुने जितके नैसर्गिक तितके चांगले. हे मिळविण्यासाठी लबॉवने जी पद्धत विकसित केली तिला 'मुलाखत-पद्धत' असे म्हणतात. या पद्धतीत प्रत्येक माहीतगाराला पाच प्रकारच्या शैलींमध्ये भाषेचा विचार होईल असे प्रश्न विचारले जातात व उत्तरे ध्वनिमुद्रित केली जातात. (१९६०मध्ये टेपरेकॉर्डरच्या शोधाने भाषेच्या अभ्यासात क्रांती आणली-त्याशिवाय इतके सूक्ष्म विश्लेषण करणे शक्य झाले नसते.) सर्वप्रथम मोकळया गप्पा मारून त्या व्यक्तीच्या नैसर्गिक भाषावापराचा नमुना मिळवण्यावर भर असतो. अशा अनौपचारिक गप्पांकडून मुलाखत हळूहळू व्यक्तीचे लक्ष भाषेवर जास्त केंद्रित होईल अशा प्रश्नांकडे वळते.

आकृती २ : लबॉवची 'मुलाखत-पद्धत'
नमुना-भाषकांना वाचायला दिलेल्या याद्यांमध्ये/पाठांमध्ये आपल्याला ज्या भाषिक घटकांचा अभ्यास करायचा आहे ते हुशारीने पेरावे लागतात.
पण प्रश्नोत्तरांचे स्वरूप आणि ही मुलाखत ध्वनिमुद्रित होत असल्यामुळे कितीही म्हटले तरी आपल्याला मुलाखत-पद्धत वापरून नैसर्गिक भाषा-नमुने मिळणे अवघड असते. यावर उपाय म्हणून सहभागी निरीक्षण ही पद्धत जास्त उपयोगी ठरते. दहा वर्षांपूर्वी पुण्यातील शाळांमधून विद्यार्थी-मित्र मिळवण्यासाठी मी या पद्धतीचा प्रयोग केला. सुरुवातीला वर्गशिक्षिकेने मुलांना माझा परिचय कॉलेजमध्ये शिकणारी एक 'ताई' असा करून दिला. हिला शाळेतील मुलांवर एक प्रकल्प पूर्ण करायचा आहे, त्यावर तिचे परीक्षेतले मार्क ठरणार आहेत, म्हणून मुलांनी या ताईला जितकी देता येईल तितकी माहिती द्यावी. त्यांच्यासारखीच पण त्यांच्यापेक्षा वयाने मोठी अशी विद्यार्थिनी म्हणून करून दिलेली ओळख मुलांशी अत्यंत अनौपचारिक असे नाते जोडण्यासाठी बरीच कामी आली. वर्गशिक्षिकेने माझ्याशी गप्पा मारायला म्हणून पहिल्यांदा चार विद्यार्थी पाठवले. या मुलांनी त्यांच्या इतर वर्गमित्रांबद्दल 'खोडकर', 'हुशार, 'सगळयांत भाग घेणारा' अशा वर्गीकरणातून बरीच माहिती दिली. आपल्या जवळच्या मित्राबरोबर माझ्याशी गप्पा मारायला येण्याचे आमंत्रण कोणीच नाकारले नाही. समान वयोगटातील या विद्यार्थ्यांशी त्यांच्या आवडीच्या विषयांवर गप्पा मारता-मारताच मग माझ्या नमुना-चौकटीतील सर्व रकाने भरत गेले आणि जवळच्या मित्रांमध्ये ते वापरत असलेल्या भाषेचे नमुनेसुद्धा मिळाले.
४. सा०भा० वैज्ञानिक सामग्रीचे विश्लेषण
४.१ भाषेतील परिवर्तनीय घटक (व्हेरिएबल्ज)
ध्वनिमुद्रित केलेल्या संभाषणांचे, याद्यांचे प्रतिलेखन (transcription) केल्यानंतर त्यांतले परिवर्तनीय भाषिक घटक ओळखणे ही सा०भा० वैज्ञानिक विश्लेषणातील पहिली पायरी.
तत्त्वत: परिवर्तनीय घटक हे ध्वनिस्तरावर, पद आणि वाक्यस्तरावरही आढळतात. पण ते ध्वनि- आणि पदस्तरांवर जास्त प्रमाणात सापडतात. मराठीतील न/ण हा परिवर्तनीय घटक तर आपल्याला माहीत आहेच. त्याचप्रमाणे चहा-चा, दहा-दा, लहान-ल्हान-लान किंवा अर्थ-अर्त, काठी-काटी, आठ-आट, काढ-काड आणि पैसे-पैश्ये, मासे-माश्ये, विक्री-इक्री, ओटा-वटा असे बरेच पर्याय मराठीत सापडतात.
पदस्तरावर आला होता- आल्ता, (मी)करेन-(मी)करल,असे पर्याय दिसतात. पुण्यातील शालेय मुलांचा अभ्यास करत असताना आणखी एक लक्षणीय उदाहरण दिसून आले. एखादी कथा सांगत असताना किंवा दैनंदिन घटनांचे वर्णन करत असताना काही मुले साधा वर्तमानकाळ न वापरता भविष्यकाळाचा वापर करत -'तो हीरो एकदम शूर असणार. तो येणार आणि विलनला मारणार',.... किंवा 'तू दररोज संध्याकाळी काय करतोस' या प्रश्नाचे उत्तर देत असताना - 'घरी येणार, अभ्यास संपवणार आणि मग खेळायला जाणार' असे काही मुले बोलत. एकाच भाषेच्या बोलींचा अभ्यास करत असताना वाक्यस्तरावर त्यामानाने कमी पर्याय सापडतात. द्वैभाषकांमध्ये मात्र वाक्यस्तरावरही पर्याय सापडतात. उदा० मराठी-कन्नड द्वैभाषकांमध्ये मराठी बोलताना 'दादा म्हणाला (की) दहावी तरी पास हो' आणि 'दहावी तरी पास हो म्हणून दादा म्हणाला' या दोन्ही वाक्यरचना आढळतात. याचप्रमाणे भाषासंपर्कामुळे 'तेनं काम केलं', 'तो काम केला', आणि 'आमच्या मावशीनी काय केली' अशा पर्यायी वाक्यरचना सापडतात (पाहा कुलकर्णी-जोशी, २००७). निवडलेल्या प्रत्येक परिवर्तनीय घटकाचे एकूण किती नमुने गोळा करणे आवश्यक आहे, हा प्रश्न सा०भा० विज्ञानात वादाचा विषय आहे. साधारणपणे प्रत्येकी किमान तीस नमुने असावेत असे मत आहे. ध्वनिस्तरावर याहीपेक्षा जास्त नमुने सहज मिळतात, पण पद- आणि वाक्यस्तरावरील परिवर्तनीय घटकांचे नमुने तुलनेने कमी सापडतात.
४.२ परिवर्तित पर्याय निश्चित केल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे त्यांची सामग्रीतील वारंवारता मोजणे
मराठीमधल्या 'मी करेन' आणि 'मी करल' (प्रथमपुरुष भविष्यकाळ) या एका परिवर्तनीय घटकाचे उदाहरण घेऊ या. एका नमुना-भाषकाकडून मिळालेल्या भाषा-सामग्रीमध्ये या घटकाचे एकूण ५० नमुने आढळले. त्यांपैकी-
/-एन/या पर्यायाचा वापर - ३५ वेळा
/-अल/ या पर्यायाचा वापर - १५ वेळा
तर /-एन/ या प्रमाण मराठीतील पर्यायाची वारंवारता (३५/५०)×१०० म्हणजे ७० टक्के इतकी आहे. याला लिंग्विस्टिक स्कोअर असे म्हणतात. अशा प्रकारे प्रत्येक नमुना-भाषकाचा प्रत्येक परिवर्तनीय घटकासाठी linguistic score काढला जातो. ठरावीक सामाजिक वर्गातील सर्व नमुना-भाषकांचे scores एकत्र केले जातात. कारण लबॉवच्या विचारसरणीनुसार सामाजिक वर्ग म्हणजे समान शिक्षण, आर्थिक परिस्थिती, राहणीमान व जीवनमूल्ये असणार्या लोकांचा एक एकसंध समूह असतो. सा०भा० विज्ञानातील सुरुवातीच्या काळात ही पद्धत प्रचलित होती. अलीकडे पर्यायाने प्रत्येक भाषकाचा स्वतंत्र लिंग्विस्टिक स्कोअर मोजला जातो.
४.३ सामाजिक घटक
भाषकाची सामाजिक स्थिती (म्हणजेच त्याचे वय, लिंग, मूळ गाव, शिक्षण, शिक्षणाचे माध्यम, व्यवसाय, राहण्याचे ठिकाण इ०) आणि तसेच त्याच्या संपर्कजाळयाबद्दल माहिती (जवळचे मित्र, कामाच्या ठिकाणचे सहकारी इ०) यांची माहिती एका वेगळया प्रश्नावलीद्वारे किंवा संभाषणाच्या ओघात मिळू शकते. अभ्यासक कधी आपल्या स्वत:च्या निरीक्षणाच्या आधारे तर कधी इतर संशोधनांच्या आधारे सामाजिक घटकांची निश्चिती करतो. या सामाजिक घटकांचेसुद्धा संख्यामापन केले जाते. उदा० 'वय' या घटकाचे 'अल्पवयीन', 'मध्यवयीन' आणि 'वृद्ध' असे गट करून त्यांचे अनुक्रमे १, २ व ३ असे संख्यामापन करता येते. तसेच 'शिक्षण' या घटकाचे 'अशिक्षित', 'दहावीपर्यंत', 'पदवीधारक', 'उच्चशिक्षित' असे गट करता येतील. (अधिक तपशिलांसाठी पाहा:चेंबर्स, १९९७, पृष्ठे ४१-४७). ज्या समाजांमध्ये आर्थिक परिस्थितीवर आधारलेले वर्गीकरण सापडत नाही. (उदा० ग्रामीण भागात), तिथे व्यक्तीचे संपर्कजाळे किती दृढ आहे, त्या समाजातल्या किती लोकांशी तिचा किती प्रकारे संबंध आहे याचे संख्यामापन केले जाते. (अधिक तपशिलांसाठी पाहा : मिलरॉय, १९८०, पृष्ठ १४१)
अशा प्रकारे भाषेतील परिवर्तनीय घटकांचे आणि सामाजिक घटकांचे संख्यामापन केल्यानंतर त्यांचा एकमेकांशी संबंध संख्याशास्त्रीय पद्धतीने प्रस्थापित करता येतो. प्राथमिक विश्लेषणात समाजातील कोणता घटक भाषेतील कोणत्या पर्यायाचा किती वापर करतो, बोलण्याच्या विषयाचा, शैलीचा यावर कसा परिणाम होतो यांचे वर्णन करता येते. अलीकडे भाषेच्या वर्णनात्मक अभ्यासाचे ध्वनी, पद, वाक्य या स्तरांबरोबरच अशा प्रकारचे सा०भा० वैज्ञानिक वर्णन हे एक महत्त्वाचे अंग समजले जाते.
५. भाषेतील परिवर्तनीय घटक आणि सामाजिक भेद यांच्या परस्पर-संबंधातून कसे निष्कर्ष काढता येतात - संख्याशास्त्राची मदत
भाषेतील परिवर्तित पर्याय आणि सामाजिक घटक यांच्यातील परस्पर संबंध हा केवळ योगायोग नाही हे दाखवण्यासाठी संख्याशास्त्राची मदत घ्यावी लागते. मराठीच्या बोलींच्या अभ्यासासाठी या पद्धतीचा उपयोग सर्वप्रथम १९६२मध्ये महादेव आपटे यांनी मुंबईतील ब्राह्मणेतर मराठी भाषकांच्या अभ्यासासाठी केला. नंतर मॅक्सीन बर्न्सन यांनीही फलटणमध्ये ही पद्धत वापरली. ही पद्धत वापरून जगातील अनेक भाषांचा अभ्यास झाला आहे. त्यातून काही ठोस असे निष्कर्षही आपल्यासमोर आले आहेत. उदा०
1. शहरी समाजातल्या कोणत्याही एका सामाजिक गटातील पुरुषांपेक्षा त्यांतील स्त्रियांचा कल प्रमाण-भाषा जास्त प्रमाणात वापरण्याकडे असतो. ग्रामीण भागातल्या स्त्रियांमध्ये मात्र भाषाबदलाचे प्रमाण तुलनेने कमी असते.
2. कामगारवर्ग आणि उच्चवर्गीयांपेक्षा मध्यमवर्गीय लोक प्रमाण भाषा जास्त प्रमाणात वापरतात.
3. शहरी समाजातील संपर्कजाळी खुली म्हणजे कमी दृढ असल्यामुळे इथे भाषाबदलाचे प्रमाण आणि वेग जास्त असतात. त्यामानाने ग्रामीण भागात संपर्क-जाळी जास्त दृढ असतात; इथे भाषा बदलाचा वेग कमी असतो. म्हणजेच इथले सामाजिक वातावरण बोली भाषा टिकवून ठेवण्यासाठी पोषक असते.
सा०भा० वैज्ञानिक निरीक्षणांचा सगळयात मोठा उपयोग म्हणजे त्यांच्या आधारे भाषाबदलाची दिशा निश्चित करता येते. हे करत असतानादेखील संख्याशास्त्राची मदत होते. पुण्यातील शालेय मुलांच्या अभ्यासातून असे दिसून आले की या वयोगटातील भाषाभेदांचा सर्वाधिक संबंध त्यांच्या जातीशी आणि आईच्या शैक्षणिक पातळीशी आहे. (परिशिष्टामधील तालिका पाहा). जात आणि वडिलांचा व्यवसाय (म्हणजेच कुटुंबाचा आर्थिक स्तर) यांचा एकत्रितपणेसुद्धा प्रमाण-भाषावापरावर परिणाम दिसून आला : ब्राह्मणेतर मुलांपैकी कामगार आणि मध्यम या दोन्ही वर्गांतील 'इतर मागासवर्गीय जाती' (खालील आलेखात 'बॅकवर्ड') या गटातल्या मुला-मुलींमध्ये प्रमाण मराठीचा सर्वाधिक वापर होत असल्याचे दिसून आले.
समारोप
भाषिक भेद आणि सामाजिक स्तरीकरण यांच्या परस्परसंबंधाच्या अभ्यासासाठी उपलब्ध असलेल्या संख्यात्मक साधनांची ओळख आपण सदर लेखात करून घेतली. लबॉवच्या १९६०च्या दशकातील संशोधनापासून या पद्धतीची सुरुवात झाली असली तरी त्यानंतरच्या पन्नास वर्षांमध्ये इतर संशोधकांच्या योगदानामुळे ही पद्धती विकसित होत-होत अधिक समृद्ध झाली आहे. संशोधनाच्या प्रत्येक टप्प्यावर अभ्यासकासमोर काही पर्याय असतात. संशोधनाची उद्दिष्टे लक्षात ठेवून यांतील योग्य पर्याय निवडायचा असतो. ही संख्यात्मक पद्धती वापरून भाषाबदलाची सुरुवात समाजातील कोणत्या वर्गात होत आहे हे लक्षात येऊ शकते. तसेच भाषाबदलाची दिशा आणि वेग यांची निश्चिती करता येते.
संदर्भ
आपटे, महादेव. १९६२. 'लिंग्विस्टिक अकल्चरेशन अँड इट्स रिलेशन टु अर्बनायजेशन अँड सोशिओ-इकनॉमिक फॅक्टर्ज.' इंडियन लिंग्विस्टिक्स, २३ : ५-२५
कुलकर्णी, सोनल. २००१. सोशिओलिंग्विस्टिक वेरिएशन इन अर्बन इंडिया : अ स्टडी ऑफ मराठी स्पीकिंग अॅडलसंट्स इन पुणे. अप्रकाशित शोधप्रबंध, युनिव्हर्सिटी ऑफ रेडिंग, इंग्लंड.
कुलकर्णी-जोशी, सोनल. २००७-०८ 'रीव्हिजिटिंग कुपवाड : दि अर्गेटिव कंस्ट्रक्शन इन मराठी - द्रविडियन कॉन्टॅक्ट अँड कन्व्हर्जन्स.' बुलेटिन ऑफ द डेक्कन कॉलेज.
चेंबर्स, जॅक. १९९७. सोशिओलिंग्विस्टिक थिअरी. ब्लॅकवेल : ऑक्स्फोर्ड.
चेंबर्स, जॅक; पीटर ट्रडगिल; नॅटली शिलिंग-एस्टेस. (संपादक) २००४. अ हँडबुक ऑफ लँग्वेज व्हेअरिएशन अँड चेंज. ब्लॅकवेल : ऑक्सफोर्ड.
धोंगडे, रमेश. २००६. सामाजिक भाषाविज्ञान. दिलीपराज प्रकाशन, पुणे.
बर्न्सन, मॅक्सीन. १९७८. 'सोशल स्ट्रॅटिफिकेशन इन द मराठी स्पीच ऑफ फलटण'. इंडियन लिंग्विस्टिक्स : ३९:२३३-५१.
ब्राइट, विलियम. १९६०. 'अ केस स्टडी ऑफ कास्ट अँड डायलेक्ट इन मैसूर.' इंडियन लिंग्विस्टिक्स. २१:४५-५०
ब्राइट, विलियम; ए०के० रामानुजन १९६४. 'सोशिओलिंग्विस्टिक व्हेअरिएशन अँड लँग्वेज चेंज'. समाविष्ट जे०बी०प्राईड आणि जे०होम्ज् (संपादक). सोशिओलिंग्विस्टिक्स. पेंग्विन, मिडलसेक्स : इंग्लंड. पृ०१५७-१६६.
मालशे, मिलिंद. २००५.'सामाजिक भाषाविज्ञानातील काही नव्या दिशा.....' समाविष्ट डॉ० जयश्री पाटणकर (संपादक) सामाजिक भाषाविज्ञान : कक्षा आणि अभ्यास ससंदर्भ प्रकाशन, नाशिक.
मिलरॉय, लेज्ली. १९८०. लँग्वेज अँड सोशल नेटवर्क्स. ब्लॅकवेल : ऑक्स्फोर्ड.
मिलरॉय, लेज्ली. १९८७. ऑब्झव्र्ंहिग अँड अॅनलायझिंग नॅचरल लँग्वेज. ब्लॅकवेल : ऑक्स्फोर्ड.
लबॉव, विलियम. १९६६. द सोशल स्ट्रॅटिफिकेशन ऑफ इंग्लिश इन न्यू यॉर्क सिटी. सेंटर फॉर अप्लाईड लिंग्विस्टिक्स वॉशिंग्टन डी० सी०.
हाइम्स, डेल; जॉन गंपर्झ १९६४. (संपादक). 'दि एथ्नॉग्राफी ऑफ कम्युनिकेशन,' अमेरिकन अॅन्थ्रोपॉलॉजिस्ट. ६६, भाग २.
परिशिष्ट
पुण्यातील मराठीतील (न/ण) या परिवर्तनीय घटकांचे संख्याशास्त्रीय प्रतिदर्श (मॉडेल)
Terms in model Deviance d.f. F-ratio p-value
constant ६४५२.४९७५ ११३
+ जात ५१६८.४९८६ ११० १२.०९
+ लिंग ४९१७.६१३१ १०९ ०७.०९ ०.००९
+ आईचे शिक्षण ४४७८.८३९३ १०७ ०६.२ ०.००३
+ वडिलांचे शिक्षण ४३७२.८५३९ १०५ ०१.५ ०.२७७४
+ वडिलांचा व्यवसाय ४२७९.८२२७ १०४ ०२.६३ ०.५८५२
+ जात × लिंग ४१००.४०२ १०१ ०१.६९ ०.२१९७
+ जात × आईचे शिक्षण ३७४०.२२५१ ९५ ०१.७० ०.२२२९
+ लिंग × आईचे शिक्षण ३६६०.११९० ९३ ०१.१३ ०.३०५८
+ जात × वडिलांचा व्यवसाय ३२६७.००७ ९० ०३.७ ०.०१५
+ लिंग × वडिलांचा व्यवसाय ३२६६.०८९३ ८९ ०.०३ ०.८७४७
+ आईचे शिक्षण×वडिलांचा व्यवसाय ३०८२.८७५९ ८७ २.५९ ०.०८१०
या तक्त्यात p-value म्हणजे सापडलेले परस्परसंबंध (correlation) किती दृढ आहेत याचे संख्याशास्त्रीय मोजमाप. परस्परसंबंध दाखवणारी ही संख्या ०.०५पेक्षा जितकी कमी तितका हा संबंध दृढ असतो. गोळा केलेल्या भाषा-सामग्रीतील न/ण या भेदांचा ज्या सामाजिक घटकांशी दृढ संबंध आहे ते अधोरेखित केले आहेत. या अभ्यासातून दिसून आले की जात आणि आर्थिक वर्ग यांचा एकत्रितपणे भाषावापरावर परिणाम होत आहे.
सोनल कुलकर्णी - जोशी
प्रपाठक, डेक्कन कॉलेज, पुणे.
भ्रमणभाष : ०९८९०४४४६०६
ई-मेल : sonalkulk@rediffmail.com