भाषा आणि जीवन

बहुभाषिक भारत - वास्तव आणि स्वप्न

मी १२ जून १९६१ रोजी हैदराबादच्या बेगमपेठ विमानतळावर पोहोचले तेव्हा डॉ० शांताबाई सातवळेकर व डॉ० एस०डी० सातवळेकर म्हणजे आई आणि भाऊ मला घ्यायला आले होते. शांताबाईंनी ड्रायव्हरला तेलगूमध्ये काहीतरी सांगितले. मग शेरवानी घातलेल्या एका इसमाशी त्या उर्दूमध्ये बोलल्या व त्यानंतर भाऊंशी मराठीमध्ये बोलल्या. मग त्या माझ्याकडे वळून म्हणाल्या, "We'll teach you three languages."माझ्या बाबतीत त्यांचा वायदा काही अंशी अपुरा राहिला तरी त्या दिवशी हैदराबादमधील बहुभाषिकतेचा ठळक अनुभव आला होता, हे निश्चित आहे.

दुसरा अनुभव १५ दिवसांनंतर आला. मी मैत्रिणीबरोबर रायचूरच्या जवळ असलेल्या गुरुगुंटा नावाच्या खेड्याला गेले होते. तिकडच्या घरात एक १५-१६ वर्षांचा नोकर होता. त्याचे शालेय शिक्षण अजिबात झालेले नव्हते; पण त्याला ४-५ भाषा बोलायला येत होत्या. कन्नड, तेलगू, तामिळ, हिंदी, उर्दू. अवतीभवती घडत असलेल्या गोष्टी बघत मी थोडंफार आकलन करण्याचा प्रयत्न करीत होते, हे त्यांनी पाहिले. मग मला सांगण्यात आले की, त्याने माझ्याबद्दल कॉमेंट केली. "तिच्या शिक्षणाचा काय उपयोग आहे? तिला बोलताही येत नाही."

मी मूळ अमेरिकेची आहे हे तुम्हांला माहीत आहे. लहानपणापासून जी भाषेची स्थिती मी अनुभवली ती हैदराबादच्या किंवा एकूण भारताच्या स्थितीपेक्षा फारच निराळी होती. जन्मापासून निधनापर्यंत एकच भाषा - म्हणजे इंग्रजी पुरेशी होती. दुसरी भाषा शिकण्याची गरज नव्हती. कॉलेजमध्ये जाऊ इच्छिणार्‍या मुलांना माध्यमिक शाळेमध्ये एक परकीय भाषा शिकायची होती. बहुधा स्पॅनिश, फ्रेंच किंवा जर्मन; पण शाळेच्या बाहेर त्या भाषेची गरज नव्हती व मुलांनी त्या भाषेवर फारसे प्रभुत्व मिळवावे, अशीही अपेक्षा नव्हती.
ही एकभाषिक स्थिती पूर्वी अमेरिकेमध्ये नव्हती. आदिवासी सोडून बहुसंख्य अमेरिकेतील लोक एकेकाळी इतर देशांमधून आले होते. काही शतकांपासून लोक युरोपमधून व जगाच्या इतर भागांमधून येत राहिले. आपली भाषा घेऊनच. पुष्कळदा विशिष्ट भाषिक लोक एकाच ठिकाणी स्थायिक व्हायचे म्हणून ते आपली भाषा बोलत असत. चर्च व इतर भाईबंद संस्था स्थापन करून त्यांच्या मातृभाषेची निष्ठा राखून ठेवत असत. मात्र पहिल्या महायुद्धाच्या वेळेस परकीय भाषा बोलणार्‍या लोकांबद्दल बाकीच्यांना संशय वाटायला लागला होता. कदाचित ही माणसे जर्मनीचे छुपे पुरस्कर्ते आहेत, अशी भावना होती. आयोवा नावाच्या राज्यामध्ये रस्त्यावर परकीय भाषा बोलण्याची बंदी घालण्यात आली. इतर ठिकाणी इथपर्यंत मजल गेली नसली तरी आपण १०० टक्के अमेरिकन आहोत, असे दाखवण्याचा दबाव स्थलांतरित लोकांवर असायचा. हळूहळू त्या लोकांच्या संस्था, चर्च वगैरे मातृभाषेचा वापर सोडून इंग्रजीमध्ये सर्व व्यवहार करायला लागले.

तरीपण मला अजून आठवते की, १९४५च्या आसपास म्हणजे दुसरे महायुद्ध संपल्यानंतर आमचे शेजारी अजून Croatian भाषा वापरत असत व जवळपासच्या Croatian Hallमध्ये लग्नानंतरचा सोहळा आणि डान्स आयोजित करीत असत. आमची भाषा Croatian नसली तरी आम्हां मुलांना ते सर्व पाहायला मिळणे ही एक पर्वणीच होती.

स्थलांतरित लोकांमध्ये मातृभाषेचा लोप

असे अनुभव मात्र हळूहळू कमी होत गेले व एकूण स्थलांतरित लोकांच्या मातृभाषांचा लोप होत गेला. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे भिन्नभाषिक लोकांशी लग्न. आमच्या कुटुंबाचे उदाहरण पाहा. माझ्या वडिलांची मातृभाषा नॉर्विजन, आईची मातृभाषा फिनिश. एकमेकांची भाषा येत नसल्यामुळे ते इंग्रजीमध्येच बोलत असत व आमच्या कुटुंबात इंग्रजी ही एकमेव भाषा होती. आईकडून काही फिनिश गाणी आणि वडिलांकडून काही नॉर्विजन गाणी एवढीच भाषिक शिदोरी भूतकाळातून मिळाली. ही शिदोरी मला फार मोलाची वाटत होती. मात्र ती किती तुटपुंजी आहे, हे कालांतराने समजले. मी प्रथम नॉर्वेला गेले तेव्हा वडिलांकडून शिकलेले एक गाणे मी चुलत भावाला म्हणून दाखवले होते. तो फारसा प्रभावित झाला नव्हता. 'हे गाणे फार जुने आहे' एवढेच त्याने म्हटले.
त्याचप्रमाणे नुकतीच मुंबईमध्ये मला एक फिनिश बाई भेटली. मी तिला म्हटले की मी आईकडून एक फिनिश गाणे शिकले होते. "कोणते गाणे?"तिने विचारले, तर "मिनं वान टिस्कान - एक मोलकरणीचे गाणे,"असे मी सांगितले. "हो"तिने म्हटले. "तेच गाणे अमेरिकेत गेलेल्या सगळ्या फिनिश लोकांना येते". म्हणजे मी कौतुकाने जपून ठेवलेली सांस्कृतिक शिदोरी किती तुटपुंजी आहे हे पुन्हा कळून चुकले.

आमचे कुटुंब तर युरोपमधून आलेल्या पहिल्या किंवा दुसर्‍या पिढीचे आहे. मात्र तीन-चार पिढ्यांनंतर बहुधा इतक्या भिन्न भिन्न भाषिक लोकांची लग्ने झालेली असतात की आपल्या पूर्वजांच्या भाषा कोणत्या होत्या हा संशोधनाचा विषय ठरतो. यामुळे अमेरिका एकभाषिक राष्ट्र झाले आहे. (अलीकडे स्पॅनिश भाषिक लोकांचे प्रमाण बरेच वाढले म्हणून सध्या स्थिती बदललेली आहे; पण तो स्वतंत्र विषय असल्यामुळे त्याची चर्चा मी इथे करीत नाही.)

आतापर्यंत मी जे सांगितले ते एक प्रकारे आत्मकथन आहे. ते एवढ्या विस्ताराने सांगण्याची दोन कारणे आहेत. एकतर त्यातून बहुभाषिकतेबाबत भारतातील स्थिती व अमेरिकेतील स्थिती किती निराळी आहे हे दाखविण्यासाठी माझा स्वत:चा अनुभव सांगणे सोयीचे होते. शिवाय मला तुमच्यासमोर जो विचार मांडायचा आहे तो परिपूर्ण तयार झालेला नाही आहे. मला माहीत असलेल्या काही गोष्टी, वाचलेले काही विचार व स्वत:चे अनुभव एकत्रित करून मी एक अपूर्ण शोधाचे वर्णन तुमच्यासमोर मांडू पाहत आहे. हे ऐकत असताना कदाचित तुम्हांला जरा विस्कळीत वाटत असेल. शेवटी मी सगळे एकत्र बांधण्याचा प्रयत्न करीन.

तुम्ही सर्वजण हैदराबाद शहरातील बहुभाषिक परंपरेचे वारस आहात. म्हणजे या विषयाबाबत तुमचा अनुभव माझ्यापेक्षा कितीतरी जास्त समृद्ध आहे. माझी एवढी आशा आहे की माझ्या भाषणाच्या निमित्ताने तुमच्या अनुभवावर आणि तुम्हांला माहीत असलेल्या गोष्टीवर थोडाफार नवा प्रकाश पडेल.

अलीकडे या विषयाकडे जास्त लक्ष

अनेक वर्षांपासून बहुभाषिकता मला कुतूहलाचा विषय वाटत होता. पण गेल्या ५-६ वर्षांत या विषयाकडे माझे लक्ष जास्त प्रकर्षाने वेधण्यात आले आहे. त्याची मुख्यत: तीन कारणे आहेत.

पहिली गोष्ट म्हणजे NCERTचा राष्ट्रीय अभ्यासक्रम (NCF - National Curriculum Framework) करण्याची प्रक्रिया. त्या एका अपूर्व वैचारिक मंथन व प्रक्रियेमध्ये माझा लहानसा वाटा होता. तयार झालेल्या Documentमध्ये भाषेसंबंधीचा जो भाग आहे त्यात भारताच्या बहुभाषिकेबद्दल महत्त्वाचे विश्लेषण आहे. यात असे म्हटले आहे की, भारतातल्या बहुभाषिकतेमुळे अनेक आव्हाने आपल्यासमोर येतात; पण त्याबरोबर अनेक संधीही उपलब्ध झालेल्या आहेत.

या NCF Document कडे आपण नंतर परत वळू या. पण आधी Tata Institute of Social Sciencesमध्ये M.A. Educationच्या प्रोग्रॅममध्ये मला मिळालेल्या अनुभवाबद्दल बोलायचे आहे. हा प्रोग्रॅम दोन वर्षांचा असून dual modeमध्ये चालतो. त्याचा अर्थ असा आहे की प्रत्येक सत्रामध्ये तीन आठवडे विद्यार्थी आणि प्रोफेसर एकत्र येतात. मग बाकी पंधरा आठवडे Internetच्या साहाय्याने विद्यार्थी स्वयंअध्ययन करतात.
या प्रोग्रॅममध्ये माझी मैत्रीण जेन साही आणि मी मातृभाषेचे अध्यापन - हा Course शिकवतो. आमचे विद्यार्थी भारतातल्या वेगवेगळ्या भागांतून येतात आणि वेगवेगळ्या शाळा व संस्थांमध्ये काम करतात. त्यांच्या समृद्ध अनुभवामुळे आमचा दृष्टिकोनही जास्त व्यापक झाला.

पहिल्या वर्षी दोन विद्यार्थी नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते होते. त्यांच्याकडून नर्मदा खोर्‍यातील गुंतागुंतीच्या भाषिक परिस्थितीबद्दल बरीच माहिती मिळाली. त्या भागामध्ये अनेक लोक आदिवासी आहेत. मुख्यत: पावरा आणि भिल्ल जमातीचे. स्थानिक भाषा विशेषत: शेतकर्‍यांची व व्यापार्‍यांची म्हणजे अहिराणी. मध्य प्रदेश जवळ असल्यामुळे काही लोक हिंदी बोलतात. मात्र, महाराष्ट्राचा भाग असल्यामुळे शाळेमध्ये मराठी भाषा हे शिक्षणाचे माध्यम. शाळेत आलेल्या आदिवासी मुलांना मराठी अजिबात येत नाही आणि शाळेच्या बाहेर मराठी त्यांच्या कानावर पडत नाही. शिवाय शिक्षकांना आदिवासी भाषा येत नाही व काही वेळेस त्यांना प्रमाण-मराठीही येत नाही. थोडक्यात आमच्या विद्यार्थ्यांकडून प्रथमच आदिवासी मुलांची व एकूण आदिवासी समाजाच्या भाषिक प्रश्नांची ओळख झाली.
प्रत्यक्ष आमच्या विद्यार्थ्यांमध्ये आणखी एक समस्या दिसली. ती म्हणजे काही विद्यार्थ्यांचे इंग्रजीवर पुरेसे प्रभुत्व नसते. त्यांना इंग्रजीमध्ये संभाषण करता येते पण व्याख्यान समजणे, पुस्तकातले उतारे वाचून त्यावर विचार करून लिहिणे या गोष्टी त्यांना कठीण जातात. M.A. Programmeतर्फे अशा विद्यार्थ्यांना शक्य तितकी मदत दिली जाते. पण विशेषत: घरी गेल्यावर स्वयंअध्ययन करणे हे त्यांना अवघड जाते. दुर्दैवाने अशा विद्यार्थ्यांचा जीवनानुभव समृद्ध असतो. मात्र तो अनुभव इतरांपर्यंत ते अनेक वेळा पोचवू शकत नाहीत.

दुसर्‍या टोकाचेही काही विद्यार्थी असतात. त्यांना अस्खलित इंग्रजी येते, पण कोणतीही भारतीय भाषा चांगल्या तर्‍हेने येत नाही. त्यामुळे ते या देशाच्या आम जनतेपासून फार दूर असतात. या मातीची मुळे तुटलेली असतात व पाश्चात्त्य संस्कृतीही पूर्णपणे आत्मसात झालेली नसते. त्यामुळे ही मुले त्रिशंकूसारखी असतात. ही संदिग्ध परिस्थिती काही विद्यार्थ्यांना फार त्रासदायक वाटते.

आणखी एक समस्या पूर्णपणे अनपेक्षित होती. ती म्हणजे काही विद्यार्थ्यांनी सांगितले की, त्यांच्यावर मातृभाषा सोडण्याचा दबाव येतो. एक शीख विद्यार्थिनीचा अनुभव विशेष उद्बोधक आहे. तिची मातृभाषा पंजाबी, ती लहानपणी घरी पंजाबी बोलायची आणि काही वर्षे ती पंजाबी माध्यमाच्या शाळेत शिकली. नंतर ती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेली. ती १४-१५ वर्षांची असताना तिच्या भावाने तिला बजावून सांगितले की, "तू माझ्याशी पंजाबीत बोलू नकोस. हिंदीत बोल किंवा इंग्रजीत बोल. तू पंजाबीत बोललीस तर माझे मित्र मला हसतील. आपले कुटुंब गावंढळ आहे म्हणून!"

भाषांची उतरंड

आमच्या विद्यार्थ्यांच्या भाषाविषयक अनुभवांची जी झलक मी तुम्हाला दाखविली तीत काही गोष्टी प्रकर्षाने दिसून येतात. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे जशी सामाजिक उतरंड दिसते तशी भाषांच्या बाबतीतही दिसते. या उतरंडीमध्ये सगळ्यात खाली म्हणजे आदिवासी भाषा. त्यांच्यावर वेगवेगळ्या राज्यभाषा. उत्तरेकडे त्यावर हिंदी भाषा व सगळीकडे एकदम वर म्हणजे इंग्रजी. जसजसे आपण वर जातो तसतसे त्या भाषेला जास्त प्रतिष्ठा असते. आदिवासी भाषेला सगळ्यात कमी प्रतिष्ठा, मग राज्यभाषा, त्यावर हिंदी व सर्वांत वर इंग्रजी.

या उतरंडीला आर्थिक बाजूही असते. जसजसे माणूस वर जातो तसतसे नोकरी मिळण्याची शक्यता वाढते. एकूण राहणीमान सुधारण्याची शक्यता असते. सत्तेमध्येही सहभाग मिळू शकतो. मात्र वर जाण्यासाठी काही वेळेस माणसाला जबरदस्त किंमत मोजावी लागते. ती म्हणजे आपल्या मातृभाषेचा कमी-अधिक प्रमाणात त्याग करणे.

आदिवासींची परिस्थिती परत बघू या. बहुसंख्य आदिवासी लोकांना वाटते की आपल्या मुलांनी शाळेत जावे. पण शाळेमध्ये मुलांनी कुठली भाषा शिकावी-आदिवासी भाषा की राज्यभाषा? माझ्यासारखे शिक्षणतज्ज्ञ ठामपणे म्हणतात की, "तुमच्या मुलांना अगोदर मातृभाषेतून शिकू द्या आणि नंतर त्याला प्रांतीय भाषेकडे जाऊ द्या."मात्र, पुष्कळदा आदिवासी पालकांना हे पटत नाही. त्यांना दिसते की प्रांतीय भाषा बोलणार्‍यांना नोकरी मिळते, प्रांतीय भाषिकांच्याकडे सत्ता असते व तीच भाषा मुलांनी शिकावी अशी त्यांची इच्छा असते.

दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की, आदिवासी मुले शाळेत गेल्यावर पहिली ३-४ वर्षे प्रांतीय भाषा शिकण्यात जातात आणि ती मुले कायमची अभ्यासात मागे राहतात. शिवाय अनेक वेळा त्यांची हेटाळणी होते. मागच्या वर्षी मी कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातल्या सोलिगा जमातीच्या मुलांच्या आश्रमशाळेबद्दल फिल्म पाहिली. ती फिल्म छोटी आहे; पण विदारक. तिचे नाव 'Which Language? Whose Language?' (कोणती भाषा? कोणाची भाषा?) पहिल्या sceneमध्ये शाळेची प्रार्थना चालू आहे. मुले म्हणतात, "कन्नड माता चिरायू असो। कन्नड माझ्या रक्तवाहिन्यांमध्ये वाहते"वगैरे वगैरे. दुसरा scene वर्गात आहे. शिक्षक मुलांना म्हणतात, "मी कन्नडिगा आहे. माझी भाषा कन्नड. तुम्ही सोलिगा, तुमची भाषा काय आहे? सोलिगा एक भाषा आहे का? ती फक्त कन्नड, तेलगू व तामिळचे मिश्रण आहे! तुमच्या भाषेला लिपी आहे का?"एक मुलगा पाटीवर काहीतरी लिहितो, शिक्षक बघतात व म्हणतात, "पण ते कन्नड आहे."असे ४-५ मिनिटांत ते त्या मुलाची भाषिक अस्मिता पूर्णपणे चिरडून टाकतात. फिल्म पाहत असताना आपल्याला आश्चर्य वाटते की कॅमेर्‍यासमोर हा माणूस एवढ्या उघडपणे बोलतोय. पण बहुतेक आपण काहीतरी गैर बोलतोय याचीही त्याला जाणीव नाही.

थोडक्यात, मुलांनी प्रांतीय भाषा शिकावी म्हणून पालक मुलांना शाळेत पाठवतात. मात्र मुले पुष्कळदा नीट शिकत नाहीत. कृष्णकुमार यांच्या शब्दांत ती फक्त मागास बनायला शिकतात. मुले मातृभाषेचा संपूर्णपणे त्याग करीत नसतील, पण मातृभाषेत भाषिक कौशल्याचा विकास नक्कीच होत नसेल. शिवाय आदिवासी संस्कृती अभिमानास्पद आहे व त्यातून बाकीच्या समाजाला काहीतरी शिकण्यासारखे आहे असे कोणालाही वाटत नाही.
इंग्रजीचे आकर्षण

जो माणूस प्रांतीय भाषा बोलतो तो आदिवासींपेक्षा कदाचित संरक्षित असेल. मात्र, त्याचीही ओढाताण होत असते. इंग्रजी आल्याशिवाय आपल्या मुलांचे भवितव्य चांगले नाही असे बहुसंख्य लोकांना वाटते. आपण नाही तर आपल्या मुलांनी इंग्रजी शिकावे, मग त्यांना नोकरी मिळेल. त्यांची राहणी सुधारेल. हे स्वप्न भारतभर सगळीकडे आढळते.
अर्थात या स्वप्नात बरेच तथ्य आहे. उच्च शिक्षण, उच्च नोकरी - राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय पातळीवर हवी असेल तर आजकाल इंग्रजी आवश्यक आहे. जसे एके काळी हैदराबादमध्ये उच्च नोकरीसाठी उर्दूची गरज होती.

ज्याला शक्य असेल तो माणूस आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये पाठवतो. शाळा चांगली असेल तर मुले इंग्रजी शिकतील, चांगली नसेल तर ती फारसे शिकणार नाहीत. पण दोन्ही प्रकारच्या शाळांमध्ये एक प्रकारची सांस्कृतिक आत्महत्या होते. मुले आपल्या मातृभाषेपासून दूर होतात व पाश्चात्त्य संस्कृतीही आत्मसात करू शकत नाहीत.
जी माणसे आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवू शकत नाहीत त्यांची अपेक्षा असते की प्रांतीय भाषेच्या शाळेमध्ये मुलांनी उत्तम इंग्रजी शिकावी. सध्या मात्र सरकारी शाळा असे करण्यास असमर्थ असतात. शिक्षणाधिकार्‍यांना व राज्यकर्त्यांना चांगली जाणीव असते की आपण त्यांच्या आकांक्षांची पूर्तता करू शकत नाही; पण ते तसे कबूल करत नाहीत. केले तर एखाद्या वेळेस सरकारी शाळा पूर्णपणे ओस पडतील. म्हणून ते 'पहिलीपासून इंग्रजी' सारखी धोरणे सुरू करतात. ते केवळ जनतेला खूष करण्यासाठी असते; हे यशस्वी होणार नाही, याची पूर्ण जाणीव असतेच.

या दृष्टिकोनातून मुलायमसिंग यादव यांनी परवा इंग्रजीबद्दल केलेली वक्तव्ये समजण्यासारखी आहेत. पूर्वीपासून उत्तर भारतात - ज्याला हिंदी बेल्ट म्हणतात - उत्तम इंग्रजी येणार्‍या माणसांचे प्रमाण दक्षिण किंवा पश्चिम भारतापेक्षा कमी आहे. म्हणून "आम्ही तुमच्या मुलांना उत्तम इंग्रजी शिकवू"असे म्हणण्याऐवजी, "नोकरी व इंग्रजी यांची सांगड आम्ही तोडू"असे आश्वासन मुलायमसिंग यांनी दिले होते. अर्थात या विधानावर जोरदार टीका झाली. शिवाय उत्तर प्रदेशच्या सरकारने काही केले तरी इंग्रजीचे महत्त्व, वर्चस्व म्हणा राहणारच.

भाषांच्या उतरंडीबद्दलचे जे चित्र मी आता तुमच्यासमोर मांडले ते अर्थात फार ओबडधोबडपणे रेखाटलेले आहे. वस्तुस्थिती यापेक्षा खूपच जास्त गुंतागुंतीची आहे. मात्र सद्य:स्थितीचे एक महत्त्वाचे सत्य दिसून येते ते म्हणजे आपल्याकडील समाज बहुभाषिक असला तरी आणि अनेक माणसे व्यवहारापुरतीच २-३ भाषा वापरू शकत असली, तरी माणसे भाषेकडे आपल्या आर्थिक व सामाजिक उन्नतीचे साधन म्हणून बघतात. अमकी भाषा शिकलो तर उच्च शिक्षण घेता येईल, चांगली नोकरी मिळेल व एकूण सामाजिक प्रतिष्ठा मिळेल, असे त्यांना वाटते.

आर्थिक आणि सामाजिक उन्नती मिळविण्याचे साधन म्हणून भाषेकडे बघणे यात काही गैर नाही, असे काहींचे म्हणणे आहे. पॉल ब्रास नावाच्या अमेरिकन प्रोफेसरांनी भारतातील भाषा-व्यवहाराचा अभ्यास केला असून त्यांच्या मते हाच दृष्टिकोन योग्य आहे. आपली राहणी सुधारण्यासाठी, सामाजिक प्रतिष्ठा मिळविण्यासाठी मातृभाषेचा त्याग करायला काही हरकत नाही, असे पॉल ब्रास प्रतिपादन करतात. ते आठवण करून देतात की खुद्द रवींद्रनाथ टागोर यांनी इशारा दिला होता की मातृभाषेचे पूजन करता कामा नये.
ब्रास यांचे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही. त्यांच्या म्हणण्यामध्ये बरेच तथ्य आहे. विशेषत: त्यांचा मातृभाषेला देवी न बनविण्याचा इशारा. तरीपण त्यांचा दृष्टिकोन फारच एकांगी वाटतो. मला स्वत:ला मर्ढेकरांच्या काव्याबद्दल यत्किंचितही माहिती नाही, पण काल डॉ० नागनाथ कोत्तापल्ले यांनी सांगितले की समाज मूल्यहीन झाला आहे, माणूस केवळ पैशाच्या मागे लागला असून, संस्कृतीचा र्‍हास झाला आहे, असे मर्ढेकरांचे म्हणणे होते.

शेवटी या प्रश्नाबाबत आपण काय भूमिका घ्यावी? माझ्या मते विचारवंतांसाठी मातृभाषा व प्रतिष्ठेची भाषा - सध्याच्या बाबतीत इंग्रजी म्हणा - या दोन्हींमध्ये एक रास्त tension आहे. मातृभाषेच्या द्वारे माणूस अनेक शतकांच्या इतिहासाला जोडलेला असतो. जीवनाला एक संस्कृतीची चौकट मिळालेली असते. अर्थात यातला धोकाही ओळखायला हवा. कुठल्याही समाजाच्या इतिहासामध्ये अन्याय भरपूर आहे. कुठल्याही संस्कृतीमध्ये अनेक गोष्टी त्याज्य असतात. भारताबद्दल बोलायचे झाले तर जातिव्यवस्था, स्त्री-पुरुष असमानता, सरंजामशाही मनोवृत्ती या गोष्टी त्याज्य आहेत, असे लगेच मनात येते.
मात्र, ज्या व्यक्तीचे नाते मातृभाषेशी शाबूत असते आणि जी व्यवहाराने व वाचनाने तळागाळातील माणसांपर्यंत पोचू शकते त्या व्यक्तीला समाजसुधारणेचे काम करता येते. या भाषणाच्या सुरुवातीला मी सांगितले होते की, टाटा इन्स्टिट्यूटच्या M.A. in Education प्रोग्रॅममध्ये कोणतीही भारतीय भाषा येत नसलेले काही विद्यार्थी असतात. यांतली एक मुंबईमध्ये राहणारी बाई आहे. ती बरीच हुशार, अत्यंत संवेदनशील. मात्र, भारताच्या समाजजीवनाबद्दल तिचे कमालीचे अज्ञान. "मी M.A. in Education प्रोग्रॅम जॉईन करेपर्यंत माझी समजूत होती की भारतामध्ये जातिव्यवस्था केव्हाच नष्ट झालेली आहे", असे ती म्हणाली. म्हणजे तिला या देशाचा ना भूतकाळ समजत, ना वर्तमानकाळ. भविष्याबद्दल तर प्रश्नच नाही.

एवढे असूनही हे मात्र आवर्जून सांगायला पाहिजे की, प्रामाणिक विचारवंत केवळ स्वत:च्या मातृभाषेच्या चौकटीत राहिला तर त्याला गुदमरल्यासारखे वाटेल. टागोरांनी म्हटल्याप्रमाणे त्याला इतर संस्कृतींचे वारे आवश्यक असतात.

सोळाव्या-सतराव्या शतकांमध्ये इस्लाम धर्म भारतात आल्यामुळे आध्यात्मिक विचाराला चालना मिळाली होती. संत एकनाथ यांच्या 'हिंदू-तुर्कवाद' या काव्यामध्ये हे दिसून येते. परवा डॉ० विद्या देवधर मला त्यांच्या दख्खन (डेक्कन)मधील सामाजिक इतिहासाबद्दलच्या संशोधनाच्या बाबतीत सांगत होत्या की, हिंदू-मुस्लिम धर्मीयांच्या संवादामुळे आध्यात्मिक दृष्टिकोन कसे विशाल आणि सहिष्णू बनले. हे ऐकून मी फार प्रभावित झाले. त्यातील एक वाक्य बाईंनी मला लिहून दिले ते असे – 'तुबदीखान व शहातुराब हे खरे बोलतात व देवावर श्रद्धा ठेवतात, त्यांना वैष्णव का म्हणू नये?' आजकाल हिंदू-मुस्लिमांमध्ये वैर मुद्दाम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असताना अशा इतिहासाचा अभ्यास करणे फार गरजेचे आहे.

त्या वेळी फारसी, अरबी भाषा आणि इस्लाम यांची ओळख झाल्यामुळे भारतामध्ये वैचारिक मंथन सुरू झाले होते. नंतर ब्रिटिश आले इंग्रजी भाषा आणि पाश्चात्त्य संस्कृती घेऊन. एका अत्यंत महत्त्वाच्या लेखामध्ये इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी सांगितले की, १९२०-१९८० या काळातील भारतात एक अभूतपूर्व वैचारिक मंथन सुरू झाले होते. सुरुवातीला गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये मुलभूत प्रश्नांचा जोरदार विचार करण्यात येत होता. स्वतंत्र भारताने विकासाचा कोणता मार्ग स्वीकारावा - सोविएट रशियाची हुकूमशाही अथवा पाश्चात्त्य देशांची लोकशाही? पाश्चात्त्य देशांप्रमाणे औद्योगिकीकरण करावे की ग्रामीण विकास करावा? धर्मनिरपेक्ष राष्ट्र असावे का? असमानता नष्ट करून स्त्री पददलित व आदिवासींना न्याय कसा देता येईल?
गुहा यांचे पुढील विधान अतिशय महत्त्वाचे आहे. '१९२० ते १९८० या दरम्यान बंगाली आणि मराठी या जगातील दोनच द्विभाषिक संस्कृती होत्या. फ्रेंच लोक फ्रेंचमध्येच लिहितात, विचार करतात व बोलतात; इंग्रज इंग्रजीमध्ये. मात्र पुणे आणि कलकत्त्याला वैचारिक वाङ्मयाचे लेखन आणि चर्चा इंग्रजीमध्ये व स्थानिक भाषेमध्ये असत. महाराष्ट्रातील इरावती कर्वे व बंगालमधील निर्मलकुमार बोस हे दोघे मानववंशशास्त्रज्ञ पूर्णपणे द्विभाषिक होते. गरजेप्रमाणे ते मातृभाषेत नाहीतर, इंग्रजीमध्ये लिहू शकत होते.'

आज काळाची गरज

आजकाल परत या देशापुढे काही मूलभूत समस्या आहेत. त्यांतला एक प्रश्न जुनाच आहे. स्त्री, पददलित, आदिवासींना न्याय कसा द्यायचा? आता काही प्रश्न पूर्वीपेक्षाही ज्वलंत आहेत. वेगवेगळ्या धर्माचे लोक या देशात शांततेने, मैत्रीने, एकोप्याने कसे राहू शकतील? काही नवीन प्रश्नही आहेत. जागतिकीकरणाला कसे तोंड देता येईल? जागतिक तापमानवाढीला (Global Warming) कसे तोंड देता येईल? निसर्गाशी जवळीक साधून शाश्वत अर्थव्यवस्था व जीवनपद्धती कशी विकसित करता येईल? शैक्षणिक प्रश्नांचा मूलभूत विचार करण्यासाठी विश्वव्यापी मानवी मानसशास्त्र व भारतीय समाजजीवनावर आधारित शिक्षणाचे समाजशास्त्र (Sociology of Education) विकसित करता येईल का?
या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्यासाठी भक्कम बहुभाषिक पाठबळ लागेल. केवळ विशिष्ट प्रांतामध्ये जन्म झाल्याने ३-४ भाषा बोलता येणे हे पुरेसे नाही. मुद्दाम विचारवंतांचा धर्म मानून, समाजाची गरज म्हणून बहुभाषिक चौफेर कौशल्ये-श्रवण, भाषण, वाचन, लेखन-संपादन करून वैचारिक देवाणघेवाणीसाठी वापरणे ही काळाची गरज आहे. केवळ मातृभाषा आणि इंग्रजीच नाही, तर इतर प्रांतीय भाषा आणि आदिवासी भाषा शिकणे गरजेचे आहे. व्यक्तीने तीन भाषांवर प्रभुत्व संपादन केले तर उत्तम, नाहीतर विचारवंतांचे बहुभाषिक जाळेही (Network) तयार करता येईल.

हे स्वप्न आहे - Vision - पण ते वस्तुनिष्ठ आहे. 'पंचधारा'हे त्रैमासिक पाच भाषांना वाहिलेले आहे. (मराठी, तेलगू, हिंदी-उर्दू, कन्नड, तमीळ). डॉ०देवधर आणि त्यांचे सहकारी भारतातल्या वेगवेगळ्या भाषांमधल्या स्त्री-लेखकांचा अभ्यास करीत आहेत. असे प्रयत्न जाणूनबुजून वाढवायला पाहिजेत.

या प्रयत्नांमध्ये केंद्रीय सरकार, राज्य सरकारे व विद्यापीठे यांनी हातभार लावला पाहिजे. कदाचित काही ठिकाणी वेगवेगळ्या भाषिक विभागांऐवजी भारतीय तुलनात्मक वाङ्मयाचे विभाग स्थापन करायला हवेत.

हे सर्व प्रयत्न करीत असताना आपण लक्षात ठेवायला पाहिजे की, भाषा-व्यवहार, भाषा-शिक्षण, इतिहास, समाजशास्त्र हे केवळ विद्वानांचे खेळ नव्हेत. ती समाजाच्या मूलभूत प्रश्नांचा शोध घेण्यासाठी साधने आहेत. भाषा एक साधन आहे. तिचा वापर सत्ता गाजविण्यासाठी करता येईल, नाहीतर माणसांना जोडण्यासाठीही करता येईल. बहुभाषिक भारताचे हे स्वप्न - ही Vision - मी आपल्यासमोर मांडली आहे. आपल्यासारख्या सुशिक्षित, सुसंस्कृत समाजघटकांच्या विचारांना याने चालना मिळेल अशी मी आशा करते.
(प्रा० रा०ब० माढेकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात हैदराबाद येथे केलेले भाषण. 'पंचधारा' एप्रिल-सप्टेंबर २००९ अंकावरून)

टपालपेटी क्र० 63, फलटण 415 523
दूरभाष : (02166)22 0586

आदिआछिपलेया

ब्रह्मानंद देशपांडे

मराठी भाषेच्या जडणघडणीच्या अभ्यासासाठी प्राचीन मराठी कोरीव लेखांचे महत्त्व इतिहासाचार्य वि०का० राजवाडे यांनी ओळखले होते. या लेखांतील अनेक शब्दांची सखोल चिकित्सा त्यांनी केली आहे. अशाच एका शब्दाचा विचार येथे करायचा आहे.

जैत्र सामंताचा जालगाव ताम्रपट (तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी) हा शके ११२४, दुंदुभि संवत्सर, चैत्र शुद्ध प्रतिपदा, आदित्यवार (मार्च १०, १२०२ इ०स०) या तिथीचा आहे. या ताम्रपटाचे संवादन आणि चर्चा खालील विद्वानांनी केली आहे.

अ. मो०गं० दीक्षित, दक्षिणच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने, खंड ३, पृ० ६३-६४ आणि काही उत्कीर्ण लेख : नवे पाठ, पृ० १५
आ. आल्फ्रेड मास्टर. सम मराठी इन्स्क्रिप्शन्स, बुलेटिन ऑफ द स्कूल ऑफ ओरिएंटल अ‍ॅण्ड आफ्रिकन स्टडीज, पृ० ४२८-३०
इ. शं०गो० तुळपुळे, प्राचीन मराठी कोरीव लेख. पृ० ९३-९७.

या लेखात 'आदिआछिपलेया'असा शब्द आला आहे. (वाचन ओळ ९-१०) मो०गं० दीक्षित यांनी आपल्या पहिल्या संपादनात या शब्दाची चर्चा केलेली नाही; पण 'काही उत्कीर्ण लेख : नवे पाठ'या पुस्तिकेत मात्र त्यांनी आदिआछिपलेया या वाचनाऐवजी 'आदिआ छिपले [लो] (णा)'असे वाचन दिले आहे. येथे गोल कंसातील अक्षर हे सुधारित वाचन आणि चौकटी कंसातील अक्षर हे कोरक्याच्या हातून सुटलेले अक्षर असे समजायचे असते. यावर त्यांनी छिपलोण (?) याचा अर्थ चिपळूणकडील असा घेण्यास हरकत नाही, अशी तळटीप दिली आहे (पृ० १५, तळटीप क्र० २). पण दीक्षित यांचे हे विवेचन ग्राह्य वाटत नाही, कारण आदिआछिपलेया हा पाठ स्पष्ट आहे.

आमच्या मते मूळ शब्द 'अक्षपटलिक'असा आहे. पटलावर रकाने (अक्ष) काढून हिशेब लिहिणारा तो अक्षपटलिक. त्याचा अपभ्रंश 'आछिपलेया'हे सहजच जुळते. फक्त प्रश्न राहतो तो आदि (प्रथम) या उपपदाचा. शिलाहारांच्या शासनयंत्रणेत प्रथम हिशेबनीस, द्वितीय हिशेबनीस अशी पदे असत. त्याचे अनेक उल्लेख शिलाहारांच्या शिलाताम्रशासनात येतात. उदाहरणार्थ पुढील उल्लेख पाहा.

अ. मुम्मुणीराजाचा दिवे आगर ताम्रपट (शक ९७५) : 'द्वितीय च्छेपाटी सेन श्री वावपैय'(वा०वि० मिराशी, शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख, शिराकोले; पृ० १३०)
आ. मुम्मुणिराजाचा अंबरनाथ देवालयातील शिलालेख (शक ९८२) : 'प्रथम स्थेपाटि सेनमहादेवैय.'(तत्रैव पृ० १३२)
इ. अपरादित्य (प्रथम) याचा वडवली ताम्रपट (शक १०४८) : 'द्वितीय च्छेपाटि प्रधान श्रीछितमैय प्रभू'(तत्रैव पृ० १४८)
ई. अपरादित्य (प्रथम) याचा चिंत्रा शिलालेख (शक १०५५) : 'प्रथम च्छेपाटी महाप्रधान श्रीलक्ष्मणैय प्रभू द्वितीय च्छेपाटी श्री (अमुक)'(तत्रैव पृ० १५४)
उ. अपरादित्य (प्रथम) याचा चांजे शिलालेख (शक १०६०) : 'प्रथम स्थेपाटि महाप्रधान श्रीलक्ष्मणप्रभो द्वितीय स्थेपाटी सेन श्री (अमुक)'(तत्रैव पृ० १५७)
ऊ. विक्रमादित्याचा पन्हाळे ताम्रपट (शक १०६१) : 'प्रथम च्छेपाटि महाप्रधान श्रीलक्ष्मणैय प्रभो द्वितीय च्छेपाटी + + + +'(तत्रैव पृ० १६६)
ए. अपरादित्य (द्वितीय) याचा परळ शिलालेख प्रथम स्थेपाटि महासांधि विग्रहिक अनंत प्रभू द्वितीय स्थेपाटि श्री अमुक (तत्रैव पृ० १९५)
ऐ. अपरादित्य (द्वितीय) याचा माणिकपुर वसई शिलालेख (शक १११९): 'प्रथमच्छेपाटी द्वितीय च्छेपाटी तृतीय च्छेपाटी चतुर्थ च्छेपाटी'(मो०गं० दीक्षित; महाराष्ट्रातील काही प्राचीन ताम्रपट व शिलालेख; पृ० ८४)

हे सर्व अधिकारी भांडागार आणि श्रीकरण (अकाउंट्स ऑफिस) यासी संबंधित आहेत. ते अक्षपटलिक आहेत. तेव्हा आदिअक्षपटलिक-आदिआ छिपलेया किंवा प्रथम च्छेपाटी (अक्षपटलिक-च्छपटलिक-च्छेपाटि) अशी शब्दरूपे दिसतात.

कुणाल रेग्युलस, सी-801, बालेवाडी, पुणे 411 045
भ्रमणभाष : 099233 90614

मराठी कवितेची बदलती भाषा: नीलिमा गुंडी

नीलिमा गुंडी

भाषा हा घटक एकीकडे सांस्कृतिक पर्यावरणाचा भाग आहे आणि त्याच वेळी सांस्कृतिक पर्यावरणाविषयीची प्रतिक्रिया देण्याचा मार्गही आहे. व्यक्तीच्या आत आणि बाहेर भाषा असते. आतली भाषा आणि बाहेरची भाषा यांच्यात होणारा संघर्ष, हे आजच्या कवितेच्या अनुभवाचे एक केंद्र आहे. त्यामुळे आज कवितेची भाषा बदलणे अपरिहार्य होत असावे. आज पाश्चात्त्य आणि पौर्वात्य मूल्यांचा संकर आपल्या जीवनशैलीत समाविष्ट आहे. आज आपली भाषाही संकरित ('हिम्राठी', 'मिंग्लिश' इ०) आहे. प्रसारमाध्यमे व बाजारपेठीय आक्रमणामुळे शब्द ही बाब फारच स्वस्त पद्धतीने विक्रेय गोष्ट बनत आहे. विविध वाहिन्यांवरील सांस्कृतिक कार्यक्रमांच्या पाठीशी असणार्‍या जाहिराती आता कार्यक्रमांच्या डोक्यावरच बसल्या आहेत! सांस्कृतिक कार्यक्रमांमधील जाहिरातींचा मारा भारतीय काव्यशास्त्रातील कलाकृतीशी तादात्म्य, 'आस्वादव्यापार' या संकल्पना मोडीत काढत आहे. रसिक मनाची ही शतखंडित अवस्था संवेदनशील कलावंताला अस्वस्थ करणे स्वाभाविक ठरते. संवेदनशीलता बधिर करणारी, विचारांना उसंत न देणारी, व्यक्तीच्या आंतरिक विश्वावर व खासगीपणावर आक्रमण करणारी ही तंत्रज्ञानप्रणित संस्कृती अनेक गंभीर प्रश्न निर्माण करीत आहे. तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या 'मोबाईल', 'इंटरनेट' आदी संपर्क-माध्यमांमुळे बाह्यविश्वाचा पसारा एकीकडे वाढत आहे; मात्र दुसरीकडे व्यक्ती अधिकाधिक नगण्य बनत आहे. हे सारे सांस्कृतिक पर्यावरण कवितेबाबत - जिच्यात 'भाषेच्या पोटातील भाषा' कार्यरत असते - अधिकच गंभीर ठरते. त्यामुळे या वास्तवाविषयीची व्याकुळता व उपरोध व्यक्त करणारी भाषा गेल्या दहा वर्षांतील काही कवींनी योजलेली दिसते. भुजंग मेश्राम, अरुण काळे, सलील वाघ, मंगेश नारायण काळे, हेमंत दिवटे, संजीव खांडेकर, वर्जेश सोलंकी, श्रीधर तिळवे, वीरधवल परब, गणेश विसपुते, प्रफुल्ल शिलेदार, बालम केतकर आदींच्या कवितेची भाषा या संदर्भात विचारात घेण्याजोगी आहे.

काव्यभाषेतील बदल

इंग्रजी शब्द, तसेच मोबाईल व संगणक यांच्याशी निगडित परिभाषा यांचा अतिवापर हे अलीकडच्या कवितेच्या भाषेचे एक वैशिष्ट्य आहे. काही कवींनी हे वैशिष्ट्य हेतूपूर्वक अंगीकारले आहे. खासगीकरण-उदारीकरण यांतून बोकाळलेला चंगळवाद, तसेच सेझ आदी बाबींविषयीचा उपहास व्यक्त करण्यासाठी अशी भाषा जणू प्रभावी शस्त्र ठरत आहे. उदाहरणार्थ, सलील वाघ लिहितात – 'मी तुझ्या नावाने एकशे एक एसेमेस करीन' ('प्रार्थनेच्या कविता'). येथे ईश्वराला दिलेला हा शब्द अध्यात्मक्षेत्रातील बाजारू वृत्तीला उघडे पाडण्याचे काम करतो. सलील वाघ यांचीच दुसरी एक कविता बालकवींच्या कवितेतील श्रुतयोजनाच्या माध्यमातून उपरोध कसा प्रभावीपणे व्यक्त करते ते पाहण्याजोगे आहे :
'आनंदी आनंद गडे, बिर्याणी खाऊ खमंग' ('सध्याच्या कविता').

संगणकीय परिभाषेचा प्रतिमा या स्वरूपात उपयोग करून स्त्रीविषयी लिहिलेली नीरजा यांची कविता पाहा:

'झूमकडे सरकणारं मन
शर्थीनं मिनिमाईझवर आणते ती
....................
स्वत:च्या नावाची फाईल
उघडत नाही चुकूनही' ('स्त्रीगणेशा').
अरुण काळे यांच्या एका कवितेचे शीर्षकच आहे :
www.हे विश्वचि माझा कटोरा.कॉम' ('ग्लोबलचे गावकूस').
वसंत आबाजी डहाके यांनी आपल्या 'शुभवर्तमान' या कवितासंग्रहात नाटकातील स्वगते, संवाद, वर्तमानपत्रातील वाचकांचा पत्रव्यवहार, दूरदर्शनवरील बातम्यांचे निवेदन, व्यासपीठीय घोषणाबाजी, जाहिरातशैली अशा संज्ञापन व्यवहारातील नव्या प्रस्थापित शैलींचा मार्मिकपणे वापर केला आहे. त्यांनी एका मुलाखतीत ('खेळ', जानेवारी २००८) केलेले एक विधान मला महत्त्वाचे वाटते. ते म्हणतात, “मी पोएटिकनेस घालवीत नाही. लिरिकॅलिटी घालवतो.” मला वाटते, आजच्या अनेक कवींपुढे भाषा योजताना हाच पर्याय उपलब्ध आहे.

भाषेविषयीची नवी संवेदनशीलता मंगेश नारायण काळे यांच्या कवितांमधूनही व्यक्त होते. त्यांनी 'आत्महत्या' या कवितेत लिहिले आहे :

'आत्महत्या हा शब्द कुणीही लिहू शकतो.
म्हणजे ज्याला गिरवता येते पहिले अक्षर
किंवा निरक्षर साक्षात ठसा अंगठ्याचा
आत्महत्या हा शब्द'
आता शेतकरी असाही लिहिता येतो. ('नाळ तुटल्या प्रथमपुरुषाचे दृष्टान्त').

हे वाचताना लक्षात येते की कवीच्या लेखी भाषा ही जगण्याचे वर्णन करणारी गोष्ट नाही, तर जगण्याची साक्षात प्रतिमाच आहे. याच वृत्ति-गांभीर्याने लिहिलेल्या त्यांच्या दीर्घकविताही वेगळ्या ठरतात. गद्यासारख्या धाटणीने लिहिलेली, विरामचिन्हविरहित अशी त्यांची 'तालीमखाना' ही दीर्घकविता वाचताना हे जाणवते. एकेकाळी खंडकाव्य, कथाकाव्य या प्रकारात 'पद्य'रचना करुन दीर्घकाव्य आकाराला येत असे. तशी तडजोड यात करावी लागत नाही.

हाच अनुभव वर्जेश सोलंकी यांच्या 'ततपप' हा दीर्घकवितेबाबत येतो. येथेही कवितेचे शीर्षकच भाषिक कोंडीचा अनुभव देते आणि सामाजिक व्यवस्थेत 'मूकनायक' राहिलेल्या अनेकांची व्यथा प्रातिनिधिक रूपात व्यक्त करते. या कवितेत अनेक ओळींमध्ये शब्द न तोडता लिहिण्याची लकब अभिव्यक्तीतील आवेगपूर्णता वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरते. उदा०

'आता हळूहळू नकळत आपल्याला
एक रिंगण घातलं जातंय आपल्याभवताली
आंधळावकीलटंकलिपिकसाक्षीदारन्यायाधीश
कुणीही यावं टपली मारून जावंचा
सुरूए एक अव्याहत खेळ' ('ततपप').
भाषेच्या उपयोजनात नवप्रतीकनिर्मितीही महत्त्वाची ठरते. सचिन केतकर आपल्या 'दहा दिशा, दहा दशा' या दीर्घकवितेत लिहितात,
'मी पाहू शकतो एका डोळ्याने
किमान दहा चॅनेल्स एका वेळेस
...........
एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल
की ही आजची झगमगीत सुवर्णनगरी
म्हणजे माझं साम्राज्य' ('खेळ', जाफेमा २००९).

येथे 'रावण' ही पौराणिक व्यक्तिरेखा आजच्या चंगळवादी युगाचे प्रभावी प्रतीक बनते.
शहरी, महानगरी वास्तवाप्रमाणेच ग्रामीण वास्तवाचे चित्रण करणारे काही कवीही आपली काव्यभाषा जाणीवपूर्वक बदलत आहेत. संतोष पद्माकर पवार यांचा 'पिढीपेस्तर प्यादेमात' हा कवितासंग्रह हे त्याचे उदाहरण आहे. मुळात संग्रहाच्या शीर्षकस्थानी बखरीतील शब्दयोजना वापरून (जिचा अर्थ आहे – 'वंशपरंपरागत चालत आलेला भोगवटा') कवीने समग्र भाषिक व सांस्कृतिक परंपरेशी असलेला आपला अनुबंध दृढ केला आहे. ग्रामीण वास्तवातील अनेक-पदरी शोषणाचा अनुभव सांगताना कवीने झडती घेणार्‍या लोकगीत गायकाची भूमिका घेतली आहे. ही भाषिक प्रयोगशीलता लक्षणीय आहे.

स्त्रियांच्या काव्यभाषेतील बदल

अलीकडे स्त्रियांच्या कविता वाचतानाही त्यांतील भाषिक वेगळेपण वाचकाच्या मनावर ठसते. १९८०नंतर स्त्रीवादी विचाराचा रेटा जसजसा वाढत गेला, तसतशी स्त्रियांची कविता पारंपरिक भावुक – 'रोमँटिक' - शैलीच्या पकडीतून मुक्त होऊ लागली. इतकी की स्त्रीवादी वैचारिक धारणा नसलेल्या कवयित्रींची भाषाशैली व प्रतिमासृष्टीही बदलताना दिसू लागली. उदाहरणादाखल अरुणा ढेरे यांच्या 'नामानिराळा'या कवितेतील ही प्रतिमा पाहा :
'बलात्काराला सज्ज झालेल्या पुरुषासारखा
शब्द उभा तिच्यासमोर एकएकट्या संध्याकाळी अचानक' ('मंत्राक्षर').
अलीकडच्या काळात स्त्रीच्या जगण्याची परिभाषा जशी बदलत गेली, तसतशी पारंपरिक भाषेला आणि धार्मिक-सांस्कृतिक परंपरेला आव्हान देण्याची धीट वृत्ती तिच्या कवितांमध्ये दिसू लागली. मलिका अमर शेख, रजनी परुळेकर, अश्विनी धोंगडे, प्रज्ञा पवार, नीरजा आदि कवयित्रींच्या कविता वाचताना हे लक्षात येते. या कवितांमधून भाषेतील उपरोध आणि युक्तिवाद कौशल्य जणू पणाला लागत आहे. मलिका अमरशेख एका कवितेत लिहितात :

'रोदानने बाईला विचारात
पडलेली दाखवली नाही कधी
न् व्हॅन गॉगनं तिला
गुडघ्यात मान टेकवून मरणासन्न बसलेली पाह्यली' ('महानगर').

कविता महाजन यांची 'तात्पुरते' ही कविता प्रस्थापित अभिरुचीला धक्का देणार्‍या एका प्रतिमेमुळे काही प्रकाशक प्रकाशित करायला तयार नव्हते. शेवटी त्यांनी ती आपल्या 'ग्राफिटी वॉल' या 'लोकप्रभा' साप्ताहिकातील सदरामध्ये एका लेखात प्रकाशित केली. (सदर लेखन आता 'ग्राफिटी वॉल' या पुस्तकात समाविष्ट आहे.)

कविता महाजन यांनी दुसर्‍या एका कवितेत म्हटले आहे,

'आणि माझे मौन हीच किंकाळी
तीक्ष्ण तरबेज शब्दांविरुद्ध' ('तत्पुरुष').

स्त्रीवर शतकानुशतके लादलेल्या मौनाकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोनच बदलून टाकणारा हा पवित्रा नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण आहे.

काव्यांतर्गत भाषिक प्रदेशाचा विस्तार

आजच्या काव्यविश्वात विविध बोलींमधून लिहिलेल्या कविता समोर येतात. भुजंग मेश्राम यांनी गोंडी, बंजारी, परधानी, गोरमाटी, वर्‍हाडी, वारली इत्यादी बोलींमधून काव्यलेखन केले आहे. विविध बोलींमधून लिहिलेल्या काही कवितासंग्रहांचा उल्लेख करावयास पाहिजे. उदा० १. महेश केळुसकर – 'मोर' (मालवणी), २. ना०जो० थुटे – 'सपनधून' (झाडी). ३. सुधीर देवरे – 'आदिम तालनं संगीत' (अहिराणी) विविध बोलींचा काव्यभाषा म्हणून स्वीकार होऊ लागल्यामुळे काव्यांतर्गत भाषिक प्रदेश विस्तारताना दिसत आहे. उषाकिरण आत्राम व कुसुम अलाम या आदिवासी कवयित्रींनी त्यांच्या सांस्कृतिक संदर्भातून नवी प्रतिमासृष्टी कवितेत आणली आहे. उषाकिरण आत्राम लिहितात:

'गोंदून निळी, होवू नगं काळी
रानफुलासारखी डवर
हो। सूर्यसळी
हो। नागकमळी' ('म्होरकी').

हे सर्वच चित्र मोठे आश्वासक आहे.

एकंदरीत आजच्या काही कवींचे भाषाविषयक संवेदन सूक्ष्म व तल्लख आहे, हे आवर्जून
लक्षात घ्यायला हवे.

3, अन्नपूर्णा, 1259, शुक्रवार पेठ, पुणे 411 002
भ्रमणभाष : 098810 91935

मराठी कवितेची बदलती भाषा : उपबोधाख्यान

सलील वाघ

व्यासपीठावरचे माननीय, समोरचे माननीय आणि मित्रमैत्रिणींनो, कवितेची बदललेली भाषा असा जरी विषय आजच्या संयोजकांनी दिला असला तरी मी काही त्या विषयावरचा अधिकारी पुरुष नाही; त्यामुळे मी माझ्या सोयीप्रमाणे तो आल्टर करून घालणार आहे. त्यात तुमची थोडी गैरसोय झाली तर अगोदरच सॉरी.

तुमच्या सुदैवाने मी भाषाशास्त्रज्ञ नाही. तुमच्या आणि माझ्याही सुदैवाने मी प्राध्यापक नाही. मात्र सगळयांच्याच सुदैवाने मी एक कवी नक्की आहे! अर्थातच त्यामुळे कोणतेही विद्वत्तापूर्ण विवेचन करणे, मुद्देसूद बोलणे, मला बंधनकारक नाही. मला ते जमणारही नाही. त्यामुळे कवितेविषयीच्या काही उत्कट, स्वैर बडबडीला (आता चान्स मिळालाय तर) मोकळी वाट करून देणे इतकाच माफक उद्देश ठेऊन तुमच्यापुढे गप्पा मारायला म्हणून मी उभा आहे.

कवीने कवितेबद्दल बोलावं का नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो. कवीने कवितेच्याच रूपाने बोलावं. कवितेबाहेर बोलू नये, असा एक मतप्रवाह असतो. शमशेरजींची एक ओळ आहे 'बात बोलेगी - हम नहीं'. ते मत प्रमाण मानलं तर मी काहीच बोलायला नको. कारण एकोणीसशे चौऱ्यांशी-पंच्याऐंशी ते दोन हजार नऊ, या पंचवीसेक वर्षांच्या काळात लिहिलेल्या कवितांच्या चार संग्रहांच्या रूपाने मी ते बोलून बसलेलो आहे. ज्यांना समकालीन कवितेची बदललेली भाषा पाहायची आणि अभ्यासायची असेल त्यांनी या चार पुस्तकांपलीकडे जायचीही फारशी गरज नाही. तेवढी चार पुस्तकं जरी वाचलीत तरी आजच्या घडीला पुरेय.

तरीसुद्धा बोलण्यासारखं खूप उरतं. सांगण्यासारखं खूप उरतं. ऐकवण्यासारखं खूप उरतं. सगळं कवितेत मावतं. पण मावतसुद्धा नाही. कविता हा आशयप्रकार असतो. काही कादंबऱ्यांत काव्य असतं. काही कथा, नाटक, सिनेमे, प्रसंग जिथे जिथे संज्ञापन असतं, कम्युनिकेशन असतं, तिथल्या कोणत्याही ठिकाणी काव्य दडलेलं असतं. ते विषाणूसारखं असतं. म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. म्हटलं तर सजीव म्हटलं, तर निर्जीव. कधी पोषक वातावरण मिळून अॅक्टिव्हेट होईल काही नेम नाही. काव्य ही माणसाची मूलभूत प्रेरणा (इन्स्टिंक्ट्) असते. कवितेशिवाय माणूस असूच शकत नाही... हा मुद्दा आता इथेच सोडू... विषयांतरातला आनंद घेऊ...
स्वातंत्र्योत्तर काळात मर्ढेकर-रेगेंच्या कवितांनी कवितेची भाषा बदलली, त्यानंतर थोडासा प्रयत्न वसंत गुर्जर, मनोहर ओक, ढसाळांच्या पिढीने केला, पण कवितेची खरी भाषा बदलली ती माझ्या (म्हणजे नव्वदनंतर प्रकाशित झालेल्या, शीतयुद्धोत्तर) पिढीने. इंदिरा गांधींची हत्या हा भारताच्या राजकारणातलाच नव्हे तर भारतीय मानवसमूहाच्या मानवसंकल्पनेतलाच (महत्त्वाचा) टर्निंग पॉईंट होता. आमच्या पिढीतला प्रत्येक जण आदर, फॅसिनेशन, द्वेष, तिरस्कार यांपैकी कोणत्या ना कोणत्या भावनेने इंदिराजींशी जोडलेला होता. त्यानंतर ग्लासनोस्त-पेरस्त्रोयका आले आणि रशियाचे देशपणच उधळले गेले. शीतयुद्धही संपले. भारतीय मानसाच्या 'वसुंधरेच्या अर्ध्या अंगा तडा भयंकर' गेल्याची परिस्थिती निर्माण झाली. आमच्या पिढीचं सामाजिक मनोबल खच्ची व्हायला हा घटनाक्रम पुरेसा होता. त्याच काळात अनिर्बंध कल्पनास्वातंत्र्य आणि कमालीची प्रेक्षकसापेक्षता ही दोन तत्त्वे घेऊन माणसाचे जगणे पोखरून काढायला मीडिया पुढे सरसावत होता. त्या सगळ्या सामाजिक इतिहासात जायची गरज नाही; कारण आपल्या सगळयांनाच तो माहिती आहे. थोडक्यात, मूल्यांच्या आणि भावनांच्याही उपबोधाचं धरण फुटलं ते इंदिराजींच्या हत्येच्या घटनेपासून! हे जे बोलतोय हे कदाचित आत्मनिवेदनात्मक किंवा आत्मचरित्रात्मकही होत असेल पण खरं आहे.

आजची भाषा ही उपबोधनिर्देशित (सबकॉन्शस-ड्रिव्हन?) भाषा आहे. जी कविता लिहिली जातेय ती उपबोधनिर्देशित भाषेत लिहिली जाते आहे. माणसाच्या बोधविश्वात सोसाट्याने घुसलेल्या या उपबोधाचं पोझिशनिंग कसं आणि कुठे करायचं? याचा प्रश्न भाषेला पडला आहे. अंगावर कोसळणार्याउ मीडियाच्या धबधब्यातून हे उपबोध आपल्या नाकातोंडात गेलेलं आहे. भाषा जवळपास वाहून गेलेली आहे. भाषेचे फ्रॅगमेंट्स तरंगतायत, पण त्या काड्यांचा ना बुडत्याला आधार ना वाचणार्यावला. तुम्ही कुठेही जा. जिथं जाल तिथं भाषा ओसंडून टाकणारा उपबोध आहे. तुम्ही खरेदीला जा, तिथं तुमच्या अनेक सुप्त एषणांना चाळवत कुरवाळत उपबोध हजर आहे. तुम्ही खेड्यात जा तिथं रटरटता उपबोध आहे (तो शहराभिमुख आहे.) उपबोधाधिष्ठित चवचालपणाची लसलस शहरांपेक्षा तालुकाप्लेसला आणि अजून आतल्या खेड्यांतून जास्त आहे. तुम्ही मोबाईल ऑन करा तिथं उपबोध आहे. उपबोधाने प्रमाणव्यवस्थेवर मात कशी केलीय याचं अगदी सोप्पं उदाहरण जर पाह्यचं असेल तर ते मिस-कॉलच्या रूपात बघता येईल. कॉल हा बोध आहे. मिसकॉल हा उपबोध आहे. संज्ञापनासाठी कोणतेही टेक्स्ट न वापरता हा मिस-कॉलचा फंडा मानवी उपबोधातून आलेला आहे. (तो प्रॅग्मॅटिक्स-संदर्भक्षेत्रीय आहे.) मिसकॉल हा कोणत्याही भाषेतून कोणत्याही भाषेला देता येतो. इतकी मेटॅलँग्वेजीयता गाठण्यापर्यंत या उपबोधाची मजल गेलेली आहे. उपबोधाच्या घटोत्कचाखाली आपण चेंगरत चाललेलो आहोत.

अनेक अनाठायी, अवांच्छित भाषारूपांना, व्यक्तींना, विषयांना आपण नुसते सामोरेच जात नाही तर त्यात भाजले जातो आहोत. आपण सकाळी उठतो तेव्हा सानिया मिर्झा आपल्या आयुष्यात येते, तिचं टेन्शन येतं. मग दूध आणायला गेलो की जातो तिथं चितळे, फडके, खांडेकर, अमूल असे लोक त्यांच्यात्यांच्या ड्रेसकोडमध्ये त्यांचीत्यांची रंगसंगती, संस्कृती घेऊन मौजूद असतात, मग इस्त्रीवाल्याशी, कटिंगवाल्याशी आयपीलवर बोलावं लागतं, ऑफिसला निघालो की सुजलेल्या चेहेर्यांसचे मवाली फुटाफुटावरच्या फ्लेक्सवर दु:स्वप्नासारखे उभे असतात. हॉटेलं, दुकानं, एकावर एक फ्री बूट, डोसा, ब्रेसियर्स, लिपस्टिक, टायर, चहा, बासमती, बाईक, केरलाआयुर्वेद, मेन्युकार्ड, ड्रायव्हिंग लायसन, एटीएम कार्ड, चाटे क्लासेस अशा अनंत गोष्टी, अनंत माणसं, अनंत व्हॅल्यू सिस्टिम्स झेलत डोक्याचं पूर्ण भजं झाल्यावर आपण ऑफिसात पाय टाकतो. तिथे अनंत फोन, दुसर्यांअचं फोनवरचं संभाषण, मेल्स, एसेमेस, ब्राऊझिंग, सीडी, रिंगटोन्स अशा अनंत भाषारूपांनी पकून गेल्यावर आपण परत घरी येतो तेव्हा वेगळेच लोक घरात घुसलेले असतात, हे सिरियल-किलर्स-सेलेब्रिटी असतात, सारेगम केकाटणारे बालमजूर असतात, आणि त्या बालमजुरांचं रूपांतर बालगुन्हेगारीत करणारे उडाणटप्पू पालक-प्रेक्षक असतात, न्यूजवाले असतात, सरडे-पाली-डायनॉसॉरवाले असतात, असे अनंत अनैसर्गिक बलात्कार आपल्यावर अहोरात्र होत असतात.... सकाळपासून रात्रीपर्यंत आपण अशा अनेक अवांच्छित गोष्टींना उपबोधात अॅ बसॉर्ब करत राहतो आणि बोधात स्थान देत राहतो. ही अनाठायी अॅकक्सेसिबिलिटी, हा अवाच्छिंतांचा दिशाहीन मेळा आपली प्रायव्हसी उद्ध्वस्त करून टाकतो. ह्या अवांच्छित उकिरड्यावर आपण डुकरासारखे चरत राहतो. त्याच्याने भाषा बदलते.

उपबोधाच्या रेट्यामुळे शब्दांचं रिशफलिंग होतं. शब्दाचा वर्गसंकर होतो. एका वर्गात वापरले जाणारे शब्द दुसरा वर्ग सहजपणे स्वीकारतो. म्हणजे 'चढला, बूच बसलं, मारली गेली, च्यायला, फक् इट' वगैरे शब्द आता सभ्य लोकांमध्ये आत्मीयतेने, आदरपूर्वक वापरले जातात किंवा आमचा कुरिअरबॉय पटकन म्हणतो ''लै कन्व्हिनियंटेय''.. त्याला 'सोप्पे' हे सुलभ वाटत नाही, 'कन्व्हिनियंट' हे सुलभ वाटते... हे किंवा आमचा परदेशातला डायरेक्टर मला सांगतो ''.. इफ् इट्स ओके... इटस् ओक्के अदरवाईज, सलील, यू डू सम 'मांडोली' विथ दॅट क्लायंट...'' अशातून आपली भाषा उपबोधाधीन होते.

पूर्वी (शीतयुद्ध काळात) या उपबोधाचं दमन करण्याकडे कल होता, पण आता मार्केटिंग गुरूंपासून ते बापू, बुवा, अम्मांपर्यंत सगळयांनाच आपापली प्रॉडक्ट लाँच करायला उपबोधात्मक उन्मादाचा आधार घ्यावा लागतो.
आजच्या कोणत्याही बेबीप्रॉडक्टच्या जाहिरातीतली आई (म्हणजे ती मॉडेल) ही इरॉटिकच असावी लागते. ती चुकूनही ढिली पडून (म्हणजे वात्सल्ययुक्त असून) चालत नाही. किंवा फोनवरून बाळाशी बोलणारा कुठंतरी फॉरेनला तडमडलेला जावई किंवा मुलगा हा नेसेसरीली बर्म्युड्यातला संट्याच असावा लागतो. हा आचरटपणा जाहिरातमान्य, मीडियामान्य होतो, कारण तो आपल्या उपबोधात असतो आणि मीडियामान्यतेतून तो परत आपल्या उपबोधात विसावतो, फरमेंट झालेल्या, ओव्हरफ्लो झालेल्या उपबोधामुळे भाषेला फुटक्या ड्रेनेजचं स्वरूप येतं.

एखाद्या नाटकातलं किंवा सिनेमातलं पात्र प्रेक्षकात येऊन बसावं किंवा प्रेक्षकांनी उठून सिनेमात जावं तसा उपबोध आपल्या बोधविश्वावर स्वार झालेला आहे. तो भाषेच्या, विशेषत: कवितेच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेला आहे. आणि आता झक मारत आपल्याला तो नेईल तिथं, नेईल तसं जाणं भाग आहे.

हे चांगलं? का वाईट? हवंय? का नकोय? याची आत्ता इथे चर्चा करत नाही.
पण काही प्रश्न मला पडलेले आहेत त्यांची उत्तरं मला तुमच्याकडून हवीत. असं असतं जनरली की वक्त्याने बोलायचं, श्रोत्यांनी ऐकायचं आणि नंतर श्रोत्यांनी प्रश्न विचारायचे. तर आज आपण हे महाराष्ट्रदिनाच्या दिवशी थोडं बदलूयात. मी प्रश्न विचारीन, तुम्ही उत्तरं द्यायचीत. चार प्रश्न माझ्याकडे आहेत.

एक - या उपबोधनिर्देशित (सबकॉन्शन-ड्रिव्हन) भाषेने आपल्या मानवसंकल्पनेवर परिणाम केले आहेत का? (म्हणजे एकाच वेळी अनेक भूमिकांतून जगणार्या- आणि भूमिकाभ्रमाचे पेच झेलत वागणार्याक माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर ही उपबोधनिर्देशित भाषा काय परिणाम करते वगैरे... किंवा न-व्यक्तीची निर्मिती हेही उपबोधक्षेत्रीय भाषेचेच फलित आहे. न-व्यक्ती म्हणजे चॅटविंडो, ब्लॉग्स, पोर्टल्सवरच्या प्रोफाईल्स.. या, न-मानवी माणसांचा समाज, त्यात व्यक्तीचे होणारे न-व्यक्तीकरण हेही उपबोधीय भाषेचेच रूप आहे.) त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे?

दोन - या उपबोधाच्या प्रखर झोताने मूल्यसृष्टीवर काय परिणाम केले आहेत? (उदा० ज्या नवभांडवलशाही व्यवस्थेचं कॉस्टकटिंग, मॅनपॉवर रिडक्शन, एका माणसाकडून चार जणांनी कामं करून घेणं हे ध्येय असतं तिथं हरकामेपणाला आता ग्लोरिफाय करुन मल्टिफॅसेटिंग किंवा अष्टपैलूपणा असं म्हणलं जातं... असे अजून काय परिणाम आहेत?)

तीन - या उपबोधाधीन जीवनशैलीने आपल्या भाषासाधनेवर कोणते परिणाम केले आहेत? (भाषेची साधना करावी लागते, तिला व्यक्तिमत्त्व द्यावं लागतं, तिला अभ्यासावं लागतं, तिचे नखरे समजून घ्यावे लागतात. थोडक्यात भाषेशी प्रणय करण्याची कला सुसंस्कृत माणसाकडे असावी लागते... हे करण्याची उसंत आपल्यापासून कितपत हिरावली गेलेली आहे?)

चार - भाषातीत, भाषापूर्व आणि भाषावस्थीय आशयबोधांना उपबोधाच्या धरणफुटीमुळे आपण पारखे होत आहोत का? (कितीतरी अशा गोष्टी असतात की ज्या भाषेच्या आधी असतात, 'भाषेबगैर' कळतात. वारा सुटतो, फुलांचा, झाडांचा, आठवणींचा, मातीचा वास येतो - नंतर शब्द सुचतो, भाषा उमटते. किंवा शब्द सुचूनही नंतर जाणवणार्याभ गोष्टी उरतात, कथ्य उरतं... या गोष्टी भाषेत उमटोत न उमटोत पण भाषेमुळे या अमूर्त जाणिवांची स्थाननिश्चिती (पोझिशनिंग) होत जाते, त्या लोकेट होतात आणि आपल्या संचिताचा भाग बनतात... हे सगळे उपबोधाधिष्ठित भाषेने हरपेल का? असा प्रश्न आहे.)
या प्रश्नांची उत्तरे मला आज तुमच्याकडून हवीयेत. म्हंजे, मला पडलेले प्रश्न तरी कितपत व्हॅलिड आहेत? का आपला मी येड्यासारखा बोलतोय? हे तुमच्याकडून मला हवंय. माणसाला भाषेचा शोध लागला. त्याला काळाचा शोध लागला. त्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. पृथ्वी चौकोनी नसून गोल असल्याचा शोध लागला. मूर्खपणाचा आणि सद्गुणांचा शोध लागला, अणुशक्तीचा शोध लागला, वरकड मूल्याचा शोध लागला. अजून काय फुल्याफुल्याफुल्यांचा एक्सवायझेड शोध लागला... पण या सगळयांहून भारी, घेरी आणणारा शोध माणसाला लागलेला आहे तो म्हणजे जिज्ञासेचा. माणसाला लागलेल्या सगळ्या शोधांत श्रेष्ठ शोध कोणता लागला असेल तर तो जिज्ञासेचा.

मी जिज्ञासू आहे म्हणून मला हे प्रश्न पडलेत. तुम्ही जिज्ञासू आहात म्हणून तुम्ही याची उत्तरे शोधायची आणि द्यायची आहेत.

प्रश्नाचा शोध लागणे म्हणजेच जिज्ञासेचा शोध लागणे. तो मला लागला. तुमच्यासमोर मांडला. आता पुढचं तुमच्यावर...

ई-पत्ता : saleelwagh@gmail.com

मराठी कवितेची बदलती भाषा

आपण सगळे मराठी भाषा बोलतो-लिहितो. भाषा कालानुसार बदलत जाते. स्थळानुसारही बदलते. साहित्याची भाषाही अशी बदलत आलेली आहे. पण जेव्हा आपण कवितेच्या भाषेचा वेगळा विचार करतो, तेव्हा कवितेची भाषा वेगळी असते असे गृहित धरतो. कवितेची म्हणून काही वेगळी भाषा असते का? या संदर्भात मला पु०शि० रेगे यांची दोन विधाने आठवतात. एक : कवितेला ठाम अशी भाषा नसते. दोन : कविता हीच एक भाषा असते. वरवर पाहता ही दोन विधाने परस्परविरोधी वाटतील. पण ती तशी नाहीत. उपलब्ध भाषा कवी कवितेच्या गरजेप्रमाणे वाकवीत असतो.

हेमंत गोविंद जोगळेकर

आपण सगळे मराठी भाषा बोलतो-लिहितो. भाषा कालानुसार बदलत जाते. स्थळानुसारही बदलते. साहित्याची भाषाही अशी बदलत आलेली आहे. पण जेव्हा आपण कवितेच्या भाषेचा वेगळा विचार करतो, तेव्हा कवितेची भाषा वेगळी असते असे गृहित धरतो. कवितेची म्हणून काही वेगळी भाषा असते का? या संदर्भात मला पु०शि० रेगे यांची दोन विधाने आठवतात. एक : कवितेला ठाम अशी भाषा नसते. दोन : कविता हीच एक भाषा असते. वरवर पाहता ही दोन विधाने परस्परविरोधी वाटतील. पण ती तशी नाहीत. उपलब्ध भाषा कवी कवितेच्या गरजेप्रमाणे वाकवीत असतो. त्यामुळे कवितेला ठाम भाषा नसते. आपल्या कवितेत कवी नवी भाषा घडवीत असतो. त्यामुळे कविता हीच एक भाषा होऊन जाते. कवीला असे करायची गरज का भासते? कवीला आपल्या शब्दांतून अनुभव प्रतीत करायचा असतो, पण प्रचलित शब्द वापरून वापरून झिजलेले-गुळगुळीत झालेले असतात. म्हणून कवीला नवे शब्द घडवावे लागतात, असलेले शब्द नव्या तर्हेुने वापरावे लागतात. असे जर असेल तर प्रत्येक कवीची-प्रत्येक कवितेची भाषा वेगळी असेल. तिच्यात होणारे बदल कविसापेक्ष किंवा कवितासापेक्ष असतील. मग समग्र कवितेची अशी काही बदलत गेलेली भाषा असेल का? असेल आणि असते. कारण एका कवीने वापरलेली बदलती भाषा यशस्वी ठरली की अनेक कवी तिला अनुसरतात आणि तशा कवितांची लाटच येते. अशी भाषा एखादा विडंबनकार नेमकी पकडतो. तिचे अतिशयोक्त रूप आपल्या विडंबनकवितेतून सादर करतो आणि या भाषिक लकबी कशी हास्यास्पद होऊ शकतात ते दाखवतो. केशवकुमारांनी केलेले एक विडंबन आहे 'कषायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत.' चहाच्या पेल्यात पडलेल्या माशीचे हे काव्यमय वर्णन पाहा :

अयि नरांग-मल-शोणित-भक्षिके,
जनु-विनाशक-जंतु-सुरक्षिके,!
असु-परीक्षित-हारक-तक्षिके,
'क्या हुवा अफसोस!' मक्षिके

कवितेत भारदस्त संस्कृत शब्द असलेच पाहिजेत या संकेताची खिल्ली उडविण्यासाठी, केशवकुमार कपात पडलेल्या माशीसाठी जड जड संस्कृत शब्द वापरतात. माशीचा संबंध ओढूनताणून परीक्षित-तक्षकाच्या पुराणकथेशी जोडतात. आणि तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी उर्दू शब्द योजण्याची टिंगल करण्यासाठी अफसोसही जाहीर करतात!

संस्कृत ही पूर्वी ज्ञानभाषा होती आणि सामान्य जनांपेक्षा वरच्या पातळीवरून उद्बोधन करण्यासाठी कवी संस्कृत शब्द वापरायचे. आजही वापरतात. पण आज इंग्रजी ही ज्ञानभाषा आणि संपर्कभाषा झाली आहे. त्यामुळे आता इंग्रजी शब्द येतात. शहराची कॉस्मोपॉलिटन संस्कृती दाखवण्यासाठी कधी अख्खी मराठी कविता बंबैया हिंदीतूनही अवतरते!

एकाच मुंबई शहराविषयी लिहिणाऱ्या वेगवेवगळ्या कवींच्या कवितांतील भाषा रूढ काव्यभाषेपेक्षा कशी बदलत गेली ते पाहिले तरी या बदलांच्या दिशा दिसू शकतील. सुरुवात मर्ढेकरांनीच केली.

जिथें मारते कांदेवाडी
टांग जराशी ठाकुरद्वारा,
खडखडते अन् ट्रॅम वाकडी
कंबर मोडुनि, चाटित तारा;

आपल्याला जाणवणारे वेगळे काही वाचकांना प्रतीत करताना शहराचे रूक्ष तपशील आणि यंत्रांच्या प्रतिमा मर्ढेकरांनी नव्याने कवितेत आणल्या. या अचेतन गोष्टींना त्यांनी त्यांच्या कवितेत सचेतन केले. टांग मारणारी कांदेवाडी तेव्हाच्या वाचकांना दचकवून गेली. (मर्ढेकरांनंतरच्या अनेक कवींच्या कवितांतून प्रतिमा अधिकाधिक भडक होत गेल्या, पण संवेदनशीलता कमी होत गेली.) वसंत आबाजी डहाके यांच्या महानगरी कवितेतील हा समुद्र पाहा :

समुद्र खिन्न हसतो आणि शिणलेल्या पापण्या मिटून घेतो.
त्याला काळजी वाटते सार्यांयच्याच बालपणाची
वयस्कांच्या शहरांतील.

हीदेखील चेतनगुणोक्तीच पण किती वेगळ्या भाषेतील!

मर्ढेकरांनी कितीही भडक तपशील दिले असले - भले त्यांच्या कवितेवर अश्लीतेच्या आरोपाखाली खटला भरला गेला होता तरी - त्यांच्या कवितेतील भाषा बव्हंशी सभ्य होती. आजच्या अनेक कवींनी ही तथाकथित सभ्यता गुंडाळून ठेवलेली आहे. नामदेव ढसाळ आपल्या मुंबईवरच्या कवितेची सुरुवातच

मुंबई, मुंबई, माझ्या प्रिये रांडे
अशी करतात.
विवेक मोहन राजापुरे त्यांच्या 'प्रचंड दगडी शहराची ठसठसती नस' या कवितेत
यार चित्कारतो.
शादी क्या भोसडा करो?
दारिद्र्याच्या पेट्रोलनं
आतवर जळत जाणारी आतडी
कुणाला विकायची?....
यार मागतो उसने पैसे.
अन् वेडसर हसत
घुसतो सपकन् -
ग्रँट रोड स्टेशनालगतच्या मुतारीत,
मी त्याला या प्रचंड दगडी शहराची
पहातो ठसठसती नस होताना.

या प्रचंड दगडी शहराची ठसठसती नस कवितेत पकडण्यासाठी या शहराचीच भाषा वापरणे येथे अपरिहार्य होऊन जाते.

मर्ढेकरांनी या शहराचा बकालपणा ठळक करण्यासाठी आपल्या कवितांत जुन्या गाण्यांचे, संस्कृत सुभाषितांचे विडंबन केले होते.

सर्वे जन्तु रुटिना: । सर्वे जन्तु निराशया: ।
सर्वे छिद्राणि पंचन्तु । मा कश्चित् दु:ख-लॉग् भरेत् ॥

'सर्वेऽपि सुखिन: सन्तु' या मूळ संस्कृत प्रार्थनेतील उदात्त आशयाच्या पार्श्वभूमीवर शहरातल्या जीवनाची क्षुद्रता उठून दिसते. त्यासाठी त्यांनी संस्कृत आणि इंग्रजी दोन्हींची सरमिसळ केली. या शहराची ओंगळ बाजू दाखवणाऱ्या कवितेची सुरुवात सलील वाघ 'आषाढस्य प्रथम दिवसे' अशी करतात.

आषाढस्य प्रथम दिवसे कुर्ल्यापाशी
सकाळच्या प्रसन्न गारव्यात
इतकी माणसं हगायला बसतात निर्विकल्प
सकाळच्या प्रसन्न गारव्यात
त्यातलंच एक गाडीखाली येतं.
सकाळच्या प्रसन्न गारव्यात
आरधा तुक्डा इकडं आरधा तिक्डं
आषाढस्य प्रथम दिवसे कुर्ल्यापाशी

आपली तथाकथित महान संस्कृती आणि शहराचे भीषण वास्तव यांतील विरोध वाघ या भाषिक संकराने अधोरेखित करतात. माणसाचे एखाद्या वस्तूसारखे काड्कन तुकडे होणे प्रत्ययाला आणण्यासाठी ते 'तुक्डा' असा शब्द घडवतात. आजचे अनेक कवी प्रमाण-भाषेऐवजी उच्चारानुसारी भाषा वापरतात. आपल्यादेखत माणसाचे असे 'तुक्डे' झाले तरी न ढळणारी आपली स्थितप्रज्ञता जाणवून देण्यासाठी वाघ पुन्हा आषाढस्य प्रथम दिवसे कडे वळतात.

महानगरांत रुजू घेतलेली मॉल संस्कृती, फोफावणारा चंगळवाद आपली स्वत:ची भाषा घेऊन आजच्या कवितांतून येतो. हेमंत दिवट्यांना थांबताच येत नाही.

थांबताच येत नाही अशा जिन्याच्या
कुठल्यातरी पायरीवरून मी सरकतोय
ब्रॅण्डेड खोके सरकताहेत
लेबलं सरकताहेत
कॅटवॉक पाय सटकताहेत
अॅटलनसॉली कुल्ली सरकताहेत
फ्रेश टवटवीत परफ्युम्ड मुली सरकताहेत
संगणक हा आजच्या जीवनाचा भाग झाला आहे. आजच्या अनेक कविता या संगणकीण परिभाषेतून जगणे व्यक्त करतात. जगणे आणि मरणेही.
कुठल्यातरी क्षणी जगण्याचा विमा संपतो
कुठल्यातरी क्षणी आपली नेट होते डाऊन किंवा
आपण आपल्यातून डिस्कनेक्ट करून घेतो जगाला
महाकाय आत्महत्येचा प्रोग्राम हँग होत राहतो
आपल्या मेंदूत
कितीही विचार केला विचार करण्याचा डिलीट
तरीही आपला मेंदू गुंतून पडलेला
एकाच विचारावर डोकं आपटत
आपण बुचकाळून काढतो स्वत:ला
माऊसमेल्या मनात
झपाझप झपाझप बंद करू पाहतो
३६ वर्षं ओपनलेली फाईल

मराठी कवितेच्या बदलत्या भाषेचा हा 'ओपनलेला' लेख येथे तात्पुरता बंद करतो. पण बंद करण्यापूर्वी या लेखातून हाती लागलेले आजच्या मराठी कवितेतले प्रमुख नवे भाषाप्रवाह सेव्ह करून ठेवतो. एक आहे संगणकीय परिभाषेचा, एसेमेस आणि मॉल संस्कृतीचा, इंग्लिश आणि हिंग्लिश शब्दांनी भरलेला. दुसरा आहे स्लँग किंवा असभ्य भाषेचा आणि तिसरा आहे बोलीभाषेचा वापर करणारा - ग्रामीण, प्रादेशिक भाषांतल्या कविताही त्यात आल्या. हे नवे भाषाप्रवाह काहीसे स्थिरावलेले आहेत. त्यांचेही साचे बनू पहात आहेत. हे साचे डिलीट करून त्यांच्या जागी नव्या काव्यभाषेची स्थापना करणारे नवे कवी मराठीत लवकरच उगवतील याबद्दल माझ्या मनात तिळमात्र संदेह नाही!
लेखातील उद्धृत कवितांश

१) अयि-नरांग-मल... कषायपेयपात्रपतित मक्षिकेप्रत - केशवकुमार, 'झेंडूचीं फुलें'
२) जिथें मारते कांदेवाडी... - बा०सी० मर्ढेकर, 'मर्ढेकरांची कविता'
३) उशीरापर्यंत रात्री... समुद्र कोंडून पडलाय - वसंत आबाजी डहाके, 'शुभवर्तमान'
४) मुंबई, मुंबई... मुंबई, मुंबई, माझ्या प्रिय रांडे - नामदेव ढसाळ, 'खेळ'
५) यार चित्कारतो... प्रचंड दगडी शहराची ठसठसती नस - विवेक मोहन राजापुरे, 'सामोरा'
६) सर्वे जन्तु रुटिना:... मी एक मुंगी - बा०सी० मर्ढेकर, 'मर्ढेकरांची कविता'
७) आषाढस्य... आषाढस्य प्रथम दिवसे - सलील वाघ, 'सध्याच्या कविता'
८) थांबताच येत नाही अशा... एक प्रचंड लांबीची बेचैन भिंत आहे. हेमंत दिवटे, 'थांबताच येत नाही'
९) कुठल्यातरी क्षणी... कुणी दिला पासवर्ड रिस्टार्ट व्हायला - हेमंत दिवटे, 'थांबताच येत नाही'

हेमलता, 917/19 सी, फर्गसन कॉलेज रस्ता, पुणे 411 004
दूरभाष : (020)2565 5329 /भ्रमणभाष : 094235 82565
ई-पत्ता : hemantjoglekar@yahoo.co.in

कवितेची भाषा

प्र०ना० परांजपे

'रत्नाकर' मासिकाच्या जुलै १९२९ अंकामध्ये पृष्ठ ५०२वर (म्हणजे पृ०२वर, कारण पानांना जानेवारी ते डिसेंबरपर्यंत सलग क्रमांक देण्याची 'रत्नाकर'ची पद्धत होती.) अनंत काणेकरांची 'आला खुशीत् समिंदर' ही कविता प्रसिद्ध झाली आहे. कवितेच्या तळटीपेत काणेकरांनी म्हटले आहे की, 'समिंदर...सारख्या एखाद्या रांगड्या शब्दाचा मधून मधून उपयोग फक्त गाणे कोळ्याचे आहे हा भास कायम ठेवण्यापुरताच केलेला आहे.' याचा अर्थ असा की कवितेत 'रांगडे' शब्द वापरू नयेत असा संकेत रूढ होता. आज शब्दच काय संपूर्ण कविता आणि कवितासंग्रह 'रांगड्या' भाषेत लिहिले जात आहेत.

काणेकरांच्या कवितेचे विश्लेषण बा०सी० मर्ढेकरांनी आपल्या 'वाङ्मयीन महात्मता' (१९४१) या निबंधात केले आणि त्या कवितेत 'लेखनगर्भ आत्मनिष्ठे'चा अभाव असल्याचे दाखवून दिले. कवितेची भाषा, कवितेत व्यक्त होणाऱ्या अनुभवातून उमलायला हवी, ती वरून लादता येत नाही असे मर्ढेकरांचा सिद्धांत सांगतो. कवितेची भाषा बदलते तेव्हा कवितेच्या अंतरंगात - म्हणजे कवीच्या अनुभवात व त्या अनुभवाकडे पाहाण्याच्या कवीच्या दृष्टिकोनात - बदल झालेला असतो. किंवा असे म्हणता येईल की कवितेच्या अंतरंगात बदल झाला असेल तरच कवितेच्या भाषेतील बदल समर्थनीय ठरतो; अन्यथा तो उपरा, कृत्रिम व अल्पजीवी ठरतो.

कवितेच्या भाषेत झालेल्या बदलांची काही उदाहरणे पाहिली तर हा मुद्दा स्पष्ट होईल. १७९८मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'लिरिकल बॅलड्स' या वर्डस्वर्थच्या कवितासंग्रहाने इंग्रजी कवितेत क्रांती घडवली. त्या संग्रहाच्या १८०० साली प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या आवृत्तीला जोडलेल्या प्रस्तावनेत ('प्रिफेस') वर्डस्वर्थने आपल्या दृष्टिकोनाचे विवेचन केले. तेव्हापासून इंग्रजी कवितेत रोमँटिसिझमचे युग सुरू झाले.

मराठी कवितेत अशी क्रांती केशवसुतांनी घडवली. 'काठोकाठ भरू द्या पेला', 'आम्ही कोण म्हणूनी काय पुसता', 'सतारीचे बोल' इ० कवितांनी कवितेच्या आशयाबद्दलच्या तोपर्यंत रूढ असलेल्या संकल्पनांचा धक्का दिला. आशयाप्रमाणे कवितेच्या रूपातही बदल घडून आले. सुनीतासारखा नवा पद्यबंध आला. झपूर्झासारखे नवे शब्द आले. आणि मराठीतही रोमँटिसिझमचा उदय झाला. या सर्वांच्या मुळाशी तत्कालीन सामाजिक व राजकीय परिस्थिती होती. न्यायमूर्ती रानडे, गोखले, टिळक, आगरकर यांनी घडवून आणलेली राजकीय जागृती, दुष्काळ, प्लेग सारखी संकटे, महात्मा फुले, आगरकर, महर्षी कर्वे यांच्या प्रयत्नांतून सुरू झालेला शैक्षणिक व सामाजिक सुधारणांचा रेटा यांमुळे 'जुने जाऊ द्या'चे वारे वाहात होते. त्यामुळे सामाजिक जीवनातील बदल कवींच्याही मनोवृत्तीवर आघात करत होते.

दुसर्याआ महायुद्धामुळे १९४०नंतर सामाजिक जीवनात मूलभूत बदल घडून आले. शहरांकडे लोटणारे लोंढे, गिरण्यांमुळे वाढलेला कामगारवर्ग, महागाई, अर्थार्जनासाठी बाहेर पडलेल्या मध्यमवर्गीय स्त्रिया, 'चले जाव'ची चळवळ, गांधींजींचे नेतृत्व, डॉ० आंबेडकरांच्यामुळे मागासवर्गीयांत झालेली जाणीवजागृती, आणि सामान्य माणसांचे सुरू झालेले अमानुषीकरण यांमुळे कवींच्या, निर्मितीशील कलाकार व साहित्यिकांच्या जगाकडे, जीवनाकडे व कलेकडे पाहाण्याच्या दृष्टिकोनात बदल झाला. शब्दांच्या 'रांगडे'पणाकडे पाहाण्याची दृष्टी बदलली. हे बदल मर्ढेकरांच्या 'नव'कवितेतून (आणि गाडगीळ-माडगूळकर-गोखले इत्यादींच्या 'नव'कथेतून) व्यक्त झाले. 'टांग', 'टिर्र्यात', 'फलाट', 'कांदेवाडी', 'बेकलाइटी' असे शब्द कवितेत आले. मर्ढेकरांच्या कवितेने रोमँटिसिझम नाकारला आणि आधुनिकतावाद, वास्तवतावाद आणि मानवतावाद स्वीकारला. पादाकुलकसारखे साधे, ओघवते मात्रावृत्त स्वीकारले.
मर्ढेकरांनंतरची कविता अतिशय प्रयोगशील झाली. ती मुक्तछंदातून, संवादलयीतून प्रकट होऊ लागली. अरुण कोलटकर, दिलीप चित्रे, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ इत्यादींनी कवितेच्या आशयात अस्तित्ववाद, अतिवास्तववाद, साम्यवाद यांच्या जीवनधारणेतून होणारे दर्शन मांडले. कवितेच्या सर्व घटकांमध्ये प्रयोग केले आणि कवितेची भाषा आणि लोकभाषा, व्यवहारभाषा यांमधील अंतर पुसून टाकले.
१९९०नंतरच्या कवितेने कवितेच्या भाषेबद्दलच्या वाचकाच्या अपेक्षा नाकारल्या, सभ्यतेची बंधने झुगारून दिली, आणि दुर्बोधतेच्या कक्षा विस्तारल्या असे म्हणता येईल. हेमंत दिवटे, संजीव खांडेकर, सचिन केतकर, सलील वाघ इत्यादींच्या कविता वाचकांना धक्के देत आहेत.

मराठी अभ्यास परिषदेच्या या वर्षाच्या वर्धापनदिनाच्या (एक मे) कार्यक्रमात 'कवितेची बदलती भाषा' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. परिसंवादात वाचल्या गेलेल्या निबंधांतील तीन निबंध या अंकात समाविष्ट करण्यात आले आहेत. उरलेले दोन निबंध हातात आले की तेही पुढील अंकांत प्रसिद्ध होतील.

पुढादीगणातील शब्द

पुढे, मागे, वर, खाली, इकडे, तिकडे इ० शब्दांना मराठीच्या बहुतेक व्याकरणकारांनी आणि कोशकारांनी क्रियाविशेषण ह्या गटात घातलेले आढळते. पुढील, पुढचा, पुढला इ० शब्दरूपे ही अर्थातच विशेषण ह्या गटात जातात. अशीच आणखीही काही शब्दरूपे आहेत. ह्या शब्दरूपांचे बारकाईने निरीक्षण केले तर असे आढळते की ह्या शब्दांचा एक सबंध गट आहे आणि ह्या शब्दरूपांची आणखी फोड करायला वाव आहे.
मराठी नामिकांची१ म्हणजेच सलिंगसवचन शब्दांची घराचा, बागेभोवती अशी रूपे पाहिली (सलिंग शब्दांनाच वचनाचा विकार होतो) तर त्यांची रचना [(सलिंग शब्द + (विकरण) + उत्तरयोगी (प्रत्यय/शब्दयोगी)] अशी आढळते. ह्यांपैकी काही प्रत्यय आणि शब्दयोगी हे सलिंग नसणार्यान पुढ्सारख्या शब्दांनाही लागलेले आढळतात. उदा० पुढपर्यंत, पुढवर, पुढे, पुढून इ० उदाहरणांत पर्यंत, वर, ए, ऊन हे प्रत्यय / उत्तरयोगी पुढ्सारख्या शब्दांना लागलेले आहेत. घरापासून, शाळेपाशी ह्यांतील पासून, पाशी असे काही शब्दयोगी हे मुळात ह्याच गटातल्या शब्दांपासून बनलेले दिसतात. उदा० पास् = > पासून, पाशी, पासचा इ०

पुढादीगणातील शब्दांची वैशिष्ट्ये

ह्या शब्दांचा एक गट करून ह्या शब्दांना 'पुढादीगणातले शब्द' असे नाव देता येईल. ह्या गणातील शब्दांची काही वैशिष्टये पुढीलप्रमाणे सांगता येतील.
१. हे शब्द अलिंग असतात. आपल्याला असे विधान करता येणे शक्य आहे कारण एरवी एखाद्या शब्दाचे लिंग कळण्यासाठी तो शब्द आणि क्रियापदाशी आणि अन्य पदांशी त्याच्या रूपाची जुळणी ह्यावरून आपल्याला लिंगाची जाणीव होते. उदा० काळा घोडा, पांढरी गाय, घोडा पळाला, गाय चरते. अशा रूपाला प्रथमेचे रूप किंवा सरळ रूप असे म्हणतात. पण ह्या पुढादीगणातल्या शब्दांची रूपे अशी थेट प्रथमेतील नसतात. त्यांची प्रथमेतली रूपे अन्य घटक (शब्दसिध्दीचा सलिंग प्रत्यय उदा० आ > पुढ् + आ = पुढा) मध्ये येऊन तयार होतात.
२. हे शब्द स्थान वा दिशा ह्यांचे वाचक असतात. पुढे इ० शब्दांची पुढ् + ए अशी फोड होते. ह्यातील ए हा प्रत्यय अधिकरणार्थी आहे आणि त्याचा अर्थ विशिष्ट ठिकाणी असा होतो. हा प्रत्यय ज्या शब्दाला लागतो तो प्रत्ययाआधीचा पुढ् हा शब्द ते विशिष्ट स्थान वा दिशा कोणती आहे ते सांगतो.
३. ह्यांना वेगवेगळे प्रत्यय लागून नामिके आणि अव्यये तयार होतात. उदा० खाली, खालचा, वरले, मागची.
४. ह्यांपैकी काही रूपे नामिक शब्दांच्या पुढे (सामान्य रूपांपुढे) येतात. त्यांना अशा वेळी शब्दयोगी ह्या गटात घालता येते. उदा० दारासमोरून, वाडयापुढे इ०

पुढादीगणातील सिद्ध आणि साधित शब्द

पुढगणातील शब्दांचे सिद्ध आणि साधित असे दोन वर्ग करता येतात.
१. सिद्ध शब्द : ह्या शब्दांची आणखी अवयवांत फोड होत नाही. ह्या गणात पुढील शब्द आढळतात.
अ) पुढ्, माग्, कड् : पुढे, मागे, कडे
आ) खाल्, पाठ् : खाली, पाठी
इ) वर्, बाहेर्, समोर्, लांब्, जवळ, आत्, आड् :
२. साधित शब्द : ह्या शब्दांची, अवयव वेगळे करीत, अजून फोड करता येते.
अ) जतकहची रूपे : एरवी सर्वनामांची आणि सार्वनामिक विशेषणे म्हणवणार्याआ शब्दरूपांपैकी काही रूपेही ह्या गटात घालता येतात. ह्या शब्दरूपांतही एक आकृतिबंध आढळतो. ह्या शब्दरूपांच्या आरंभी ज्, त्, क्, ह् हे विशिष्ट दिशावाचक / निर्देशी अवयव आढळतात. म्हणून ह्या रूपांना जतकहची२ रूपे म्हटले आहे.
क) ज् : पूर्वनिर्देशी वा उद्देशवाचक : उदा० जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
ख) त् : उत्तरनिर्देशी वा दूरत्वनिर्देशी : तिथून पाणी आणावे लागेल.
ग) क् : प्रश्ननिर्देशी : ही बस कुठपर्यंत जाणार आहे?
घ) ह : समस्थानकालनिर्देशी : इथला माल जगभर विकला जातो.
जिथ्, जेथ्, तिथ्, तेथ्, इथ्, येथ्, (एथ्), कुठ्, कोठ् ह्या शब्दरूपांना पुढ् इ० प्रमाणेच प्रत्यय लागून रूपे बनतात.
ज् + एथ् = जेथ् : जेथे, जेथून, जेथील
त् + एथ् = तेथ् : तेथे, तेथून, तेथील
क् + ओठ् = कोठ् : कोठे, कोठून, कोठील
ह२ + एथ् = येथ् : येथे, येथून, येथील
आ) कड्ची रूपे : कड् ह्या पुढगणातील शब्दाच्या आधी काही घटक येऊन ही रूपे तयार होतात. उदा० इकड्, तिकड्, सगळीकड् इ० ह्यांना मग अधिकरणाचे इ० प्रत्यय / उत्तरयोगी लागून इकडे, तिकडे, सगळीकडून अशी रूपे तयार होतात. ह्यात कडच्या आधी काहीएक घटक आलेलाच असतो. निव्वळ कडे, कडून असा प्रयोग आढळत नाही. जतकह हे वर उल्लेखलेले अवयवही कड्च्या आधी येतात आणि ज + इ + कड् > जिकड्, तिकड्, इकड्, कुणीकड् अशी रूपे घडतात.
काही सलिंग विशेषणांच्या (शेवटी स्वर असल्यास) शेवटच्या स्वराला ईचा आदेश होऊन आणि ती व्यंजनान्त असल्यास त्यांना ई लागून त्यापुढे कड् येऊन काही रूपे बनतात. ही रूपे क्रियेचे स्थान दाखवतात. उदा०
सगळा > सगळी + कड् = सगळीकड् तिसरा > तिसरी + कड् = तिसरीकड्
वेगळा > वेगळी + कड् = वेगळीकड् सारा > सारी + कड् = सारीकड्
डावा > डावी + कड् = डावीकड् (ऐल्) > अली + कड् = अलीकड्
उजवा > उजवी + कड् = उजवीकड् (पैल्) > पली + कड् = पलीकड्
भलता > भलती + कड् = भलतीकड् एक > एकी + कड् = एकीकड्
दुसरा > दुसरी + कड् = दुसरीकड्
इ) पास्ची रूपे : पास् ह्या शब्दाला ई लागताना शेवटच्या सकाराचा शकार होतो आणि पाशी असे रूप तयार होते. तसेच ह्या शब्दाला ऊन लागून पासून असा शब्द तयार होतो. हे शब्द पहिल्या गटातल्या शब्दाच्या पुढे येतात. आणि पुढपासून, जिथपासून अशी रूपे तयार होतात.

लागणारे प्रत्यय

पुढगणातील वर सांगितलेल्या शब्दरूपांपासून काही अधिकरण हा कारक संबंध असलेली रूपे बनतात तर काही विशेषणे वा कर्तृपदेही तयार होतात.
ए/ई : हे दोन्ही अधिकरणार्थी प्रत्यय आहेत. ह्या प्रत्ययांचा अर्थ ही क्रिया अमुक स्थानी घडली असे दाखवतो. 'मी घरी आलो' ह्यात येण्याची क्रिया 'घर' ह्या स्थानावर झाली असा अर्थ व्यक्त होतो.
खाल्, पाठ् ह्या शब्दांना ई हा प्रत्यय वरील अर्थानेच लागतो आणि खाली्, पाठ् अशी शब्दरूपे घडतात.
वर, समोर, बाहेर्, आत् ह्या शब्दांत ई ह्या प्रत्ययाचा लोप होतो (आत् ह्या शब्दाचा अपवाद वगळता वरी, समोरी, बाहेरी अशी रूपे जुन्या ग्रंथांत आढळतात.)
ऊन : हा प्रत्यय अपादानार्थी आहे. तो पुढगणातल्या शब्दांना थेट लागतो. उदा० पुढून, मागून, वरून, खालून, आतून, बाहेरून, आडून, इकडून, तिकडून, जिकडून, कुठून, कोठून, डावीकडून, उजवीकडून, सगळीकडून, वेगळीकडून, भलतीकडून, एकीकडून, दुसरीकडून, तिसरीकडून, सारीकडून, पलीकडून, अलीकडून.
पास् ह्या शब्दाला ऊन लागून 'पासून' असे रूप बनते. ते केवळ उत्तरयोगी म्हणूनच वापरतात आणि ते काही पुढगणांतल्या शब्दांनाही लागते. पुढपासून, मागपासून, वरपासून, खालपासून, इथपासून, तिथपासून, जिथपासून, कुठपासून, आतपासून, बाहेरपासून, घरापासून इ०
नाम, धातू इ० शब्दांची निर्मिती
पुढादीगणातील शब्दांपासून काही धातू तसेच काही सलिंग शब्दही तयार होताना दिसतात. पण ही प्रक्रिया घडताना ती आधी उल्लेखिलेल्या रूपांइतकी सार्वत्रिक नाही असे दिसते.
सलिंग प्रत्ययाचा लोप होऊन तयार होणारे सलिंग शब्द
माग (पू) : ह्या शब्दाचा अर्थ मागे राहून हुडकून काढण्याची क्रिया असा होतो.
पाठ (स्त्री) : शरीराच्या मागचा अवयव

साधित धातू

१. पुढार् (पुढ् + आर्) : पुढे होण्याची क्रिया. ह्यापासून पुढारतो इ० धातुरूपे तसेच पुढारलेला, पुढारणे, पुढारी, पुढारपण इ० धातुसाधित नामिके घडतात. तसेच पुढे असण्याची क्रिया म्हणजे पुढाकार (पु), पुढली बाजू म्हणजे पुढा (पु) हे शब्दही घडलेले आढळतात.
२. मागास् (माग् + आस्) : मागे पडणे, मागासले, मागासलेला, मागासणे इ०
३. खालाव् (खाल् + आव्) : खाली येणे (लक्षणेने : गुणवत्ता घसरणे). खालावते, खालावलेले.

संदर्भसूची

अर्जुनवाडकर, कृष्ण श्रीनिवास. १९८७. मराठी व्याकरण : वाद आणि प्रवाद; सुलेखा प्रकाशन, पुणे.
दामले, मोरो केशव. १९७०. शास्त्रीय मराठी व्याकरण; (संपा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर), देशमुख आणि कंपनी; पुणे
धोंगडे, रमेश वामन. १९८३. अर्वाचीन मराठी : काँटिनेंटल प्रकाशन, पुणे

ई-पत्ता : sushant.devlekar@gmail.com
भ्रमणभाष : 097698 35310
------------
टिपा :
१) 'नामिक' ही संज्ञा कृ०श्री० अर्जुनवाडकर ह्यांनी वापरली आहे. लिंग आणि वचनाचा विकार होणार्या), तसेच धातू आणि अव्यये ह्यांपासून वेगळया अशा शब्दांसाठी त्यांनी ही संज्ञा वापरली आहे.
२) जतकहची इतर रूपे : जो, जेव्हा, जिथला, जिथे, जेथे, जितका, जेवढा, जितपत, जोवर, जसा, जितवा, तो, तेव्हा, तिथला, तिथे, तेथे, तितका, तेवढा, तितपत, तोवर, तसा, हा, एव्हा, इथला, इथे, येथे, इतका, एवढा, इतपत, असा, कोण, केव्हा, कुठला, कुठे, कोठे, कितका, केवढा, कितपत, कसा, कितवा.
३) इथे आकाराव्यतिरिक्तचा स्वर पुढे आल्यास हकाराचा लोप होतो. तसेच ए ह्या स्वराआधी य् हा वर्ण येऊन ये असे अक्षर येते. लेखनात ही यकारयुक्त रूपेच वापरतात. उदा० येथे, येथला, येथचा इ०

विल्यम सफायर

'वॉटरबोर्डिंग्ज' (Waterboardings) हा शब्द ऐकला आहे? दहशतवाद्यांच्या छावण्यांमध्ये त्यांना बोलते करण्यासाठी छळण्याचा हा एक मार्ग आहे. सफायर यांनी या शब्दाचा अर्थ स्पष्ट केला होता. वॉटरबोर्डिंग म्हणजे एका सी-सॉसारख्या फळीवर कैद्याला जखडायचे आणि मग त्याचे डोळे पाण्याखाली असे दाबायचे, की त्याला आपण बुडतोय असे वाटायला लागेल. (सुप्रसिद्ध राजकीय व भाषाविषयक स्तंभलेखक, पुलित्झर पारितोषिक विजेते, आणि रिचर्ड निक्सन यांचे काही काळ सल्लागार असलेले विल्यम सफायर यांचे २५ सप्टेंबर २००९ रोजी निधन झाले.)

एका लेखात त्यांनी रिट्रोनिम (Retronym) या शब्दाचा विचार केला आहे. रिट्रोनिम म्हणजे एखाद्या नव्या आधुनिक प्रकारच्या वस्तूच्या आगमनामुळे, त्या वस्तूच्या आधी वापरल्या जाणार्‍या जुन्या वस्तूला दिलेले नाव उदा० ई-मेल आल्यानंतर पोस्टाच्या माध्यमातून पाठवायच्या टपालाला आता स्नेल मेल (snail mail) (स्नेल म्हणजे गोगलगाय) म्हटले जाते. जुन्या वस्तूला हे जे नवे नाव मिळाले, त्यालाच रिट्रोनिम असे म्हणतात. डिजिटल प्रकारची रिस्टवॉचेस आल्यावर जुन्या प्रकारच्या मनगटी घड्याळांना आता अ‍ॅनालॉग वॉचेस हे नाव मिळाले. आजकाल सर्वजण इलेक्ट्रिक गिटारच वापरतात. म्हणून त्यांना नुसते गिटार असे म्हणायचे आणि त्यांच्या आधीच्या गिटारना आता 'अकूस्टिक गिटार' असे म्हटले जाते. 'वॉटरबोर्डिंग्ज' (Waterboardings) हा शब्द ऐकला आहे? दहशतवाद्यांच्या छावण्यांमध्ये त्यांना बोलते करण्यासाठी छळण्याचा हा एक मार्ग आहे. सफायर यांनी या शब्दाचा अर्थ स्पष्ट केला होता. वॉटरबोर्डिंग म्हणजे एका सी-सॉसारख्या फळीवर कैद्याला जखडायचे आणि मग त्याचे डोळे पाण्याखाली असे दाबायचे, की त्याला आपण बुडतोय असे वाटायला लागेल. सफायर यांना एका चित्रपटाच्या पहिल्या खेळासाठी आलेल्या आमंत्रणपत्रिकेत म्हटले होते, 'कॉकटेल अटायर'. याचा अर्थ छान कपडे असा होतो. नेहमीचेच कपडे नव्हेत, की भडकही नव्हेत!

एन०डी० आपटे
दै० सकाळ, दि० 5 ऑक्टोबर २००९

वि०भि० कोलते आणि मराठी विद्यापीठ

मराठी विद्यापीठाची संकल्पना हिरिरीने प्रथम मांडली ती डॉ० वि०भि० भाऊसाहेब कोलते यांनीच. तीही सहा दशकांपूर्वी. डॉ० कोलते १९६४मध्ये विदर्भ महाविद्यालय, अमरावती येथे प्राचार्य म्हणून आले, त्या वेळी मी त्या महाविद्यालयात त्यांचा प्रशासनिक सहायक (प्रबंधक) होतो. डॉ० कोलते यांचे महाविद्यालय प्रशासन मराठी अभिमुख करण्याचे सर्व प्रयत्न मी जवळून पाहिलेत आणि या त्यांच्या मोहिमेत मी शिलेदाराची भूमिका बजावली, याचा मला अभिमान वाटतो. स्वतंत्र 'मराठी विद्यापीठ' या आपल्या संपादकीयावरील डॉ० वि०बा० प्रभुदेसाई यांचा प्रतिसाद वाचला. (भाषा आणि जीवन, हिवाळा २०१०)

मराठी विद्यापीठाची संकल्पना हिरिरीने प्रथम मांडली ती डॉ० वि०भि० भाऊसाहेब कोलते यांनीच. तीही सहा दशकांपूर्वी. डॉ० कोलते १९६४मध्ये विदर्भ महाविद्यालय, अमरावती येथे प्राचार्य म्हणून आले, त्या वेळी मी त्या महाविद्यालयात त्यांचा प्रशासनिक सहायक (प्रबंधक) होतो. डॉ० कोलते यांचे महाविद्यालय प्रशासन मराठी अभिमुख करण्याचे सर्व प्रयत्न मी जवळून पाहिलेत आणि या त्यांच्या मोहिमेत मी शिलेदाराची भूमिका बजावली, याचा मला अभिमान वाटतो. १९६६मध्ये नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी हिरिरीने विद्यापीठाच्या प्रशासनात मराठीचा वापर सुरू केला. नागपूर विद्यापीठाचा नवा परिसर विकसित झाला, तोही त्यांच्याच कारकिर्दीत. महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळाचे कामही याच काळात त्यांनी प्रा० वामनराव चोरघडे यांच्याकडे सापवले. शास्त्रीय व तांत्रिक विषयांवरील अनेक ग्रंथ त्या कालखंडात या ग्रंथनिर्मिती मंडळाने तज्ज्ञ प्राध्यापकांकडून लिहून घेतले व प्रकाशित केले. डॉ० भाऊसाहेब कोलते यांच्या संपर्कात आलेले प्राध्यापक मराठी माध्यमाचा आग्रह धरीत. परंतु अन्य प्राध्यापकांनी मात्र मराठी माध्यमाचा आग्रह धरला नाही. आम्हांला आमचे विषय मराठी माध्यमातून शिकवणे जड जाते. आम्हांला निवृत्त होऊ द्या आणि मग मराठी माध्यम सुरू करा. ह्या अशा प्राध्यापकांच्या कदुष्म (ल्युकवॉर्म) वृत्तीमुळे विद्यापीठ स्तरावरील शास्त्रीय विषयांच्या बाबतीत मराठी माध्यमाचा प्रश्न पुढे बारगळला आणि महाविद्यालयांत मराठी माध्यम स्थिरावू शकले नाही. नंतरच्या कुलगुरूंनीही (महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांच्या) हा प्रश्न तडीस नेला नाही. मराठी सिद्ध झालेल्या सर्वच ग्रंथांकडे प्राध्यापक व विद्यार्थी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे सारे ग्रंथ महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळाच्या कपाटांमध्ये व शासकीय मुद्रणालयाच्या गोदामांमध्ये राहिले. प्राध्यापकांपर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेच नाहीत.

डॉ० कोलते हे भाषा सल्लागार मंडळाचे १९६१पासून अगोदर सदस्य व नंतर अध्यक्ष होते. या मंडळाच्या मार्गदर्शनाखाली विविध शास्त्रीय व तांत्रिक विषयांचे कोश तज्ज्ञ प्राध्यापकांच्या सहभागाने भाषा संचालनालयाने गेल्या चाळीस वर्षांत प्रकाशित केले आहेत. या शैक्षणिक उपक्रमात मराठी विज्ञान परिषदेचाही बराच मोठा वाटा आहे. शास्त्रीय व तांत्रिक शब्दावली निर्मितीच्या आणि प्रसाराच्या कामात सुरुवातीपासूनच मराठी विज्ञान परिषद सहभागी होती.

तिसांहून अधिक अशा शास्त्रीय परिभाषा कोषांचा उठाव महाविद्यालयांतून कमीच झाला, असे म्हणावे लागेल. कारण फारच थोडया परिभाषा कोषांच्या दुसर्‍या आवृत्त्या निघाल्या. पारिभाषिक शब्द हे वापरामुळे भाषेला समृद्धी आणतात. शक्य तेथे मानक पारिभाषिक शब्दांचा वापर विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी आणि जनतेने करणे हे भाषेच्या अभिवृद्धीसाठी नितांत आवश्यक आहे. तसा जाणीवपूर्वक प्रयत्न सर्वांनीच केला पाहिजे.

मराठी विद्यापीठ संस्थापित झाल्यास सध्या मराठीसाठी काम करणारी जी शासकीय व निमशासकीय मंडळे आहेत ती, एका छत्राखाली येतील. त्यांच्या कार्यामध्ये समन्वय ठेवण्याचे काम सोपे होईल. स्वायत्तेमुळे मराठीचा विकास काळानुरूप वेगाने होईल. महाराष्ट्र वैभवाचे शिखर गाठू शकेल.

न०ब० पाटील
A-37, कमलपुष्प,
जन० अरुणकुमार वैद्य मार्ग, वांद्रे रेक्लमेशन (प०) मुंबई 400 050
दूरभाष : (022) 2642 9309

मुरुडची भाषा

नावाचा उच्चार विशेषणाने करणे हा आणखी एक इथला विशेष आहे. हे विशेषण त्या माणसाच्या विशिष्ट कृतीवरून किंवा त्यांच्या घराण्यात घडलेल्या एखाद्या गोष्टीवरून दिले जाते. उदाहरणार्थ, एखाद्या नाटकाची अति हौस असलेल्या एखाद्या दत्तात्रय नावाच्या माणासला 'नाटकी दत्तू' म्हणून ओळखले जाते. नारळांचा मोठा व्यापारी असलेल्या कुणा मधू नावाच्या माणसाला 'नारळी मधू' म्हटले जाते. विवाहित स्त्रीचा उल्लेख तर तिच्या नवर्‍याच्याच नावाने होतो. म्हणजे नवर्‍याचे नाव 'शिवराम' असेल, तर पत्नीला 'शिवरामी' म्हणतात.

विनायक नारायण बाळ

माझ्या गावकर्‍यांची भाषा अगदी रोखठोक. ते बोलताना तोंडाऐवजी नाकाचा वापर करतात की काय, असे ऐकणार्‍याला वाटेल.

बरेचसे शब्द त्यांनी मोडून घेऊन मुखात बसविलेले आहेत! म्हणजे घ्यायचं, द्यायचं, करायचं असे म्हणायचं असेल, तर घैचं, दैचं, कराचं असे बोलतात.

सरळ नावाने कुणी हाक मारत नाही. मारली, तर ऐकणाराही 'ओ' देत नाही! सीतारामला 'शित्या', परशुरामला 'पर्शा' पुकारले, तरच त्यांच्या कानात शिरते!

नावाचा उच्चार विशेषणाने करणे हा आणखी एक इथला विशेष आहे. हे विशेषण त्या माणसाच्या विशिष्ट कृतीवरून किंवा त्यांच्या घराण्यात घडलेल्या एखाद्या गोष्टीवरून दिले जाते. उदाहरणार्थ, एखाद्या नाटकाची अति हौस असलेल्या एखाद्या दत्तात्रय नावाच्या माणासला 'नाटकी दत्तू' म्हणून ओळखले जाते. नारळांचा मोठा व्यापारी असलेल्या कुणा मधू नावाच्या माणसाला 'नारळी मधू' म्हटले जाते. विवाहित स्त्रीचा उल्लेख तर तिच्या नवर्‍याच्याच नावाने होतो. म्हणजे नवर्‍याचे नाव 'शिवराम' असेल, तर पत्नीला 'शिवरामी' म्हणतात.

एखाद्या घरी स्वत: पैसे देऊन राहिलेल्या म्हणजे 'पेईंग गेस्ट' माणसाला चक्क 'पोषण्या' म्हणून ओळखतात.

देवळामधील देवाचा उल्लेख त्याच्या नावाने न करता फक्त 'श्री' म्हटले जाते. 'श्रीच्या देवळात', 'श्रीला अर्पण', 'श्रीच्या आशीर्वादाने' असे उल्लेख येतात.

असे जवळपास प्रत्येक व्यक्तीला मूळ नावापेक्षा इतर नावानेच गावात अधिक ओळखले जाते.

दिवसभरात तोंडातून एकही शिवी गेली नाही, तर तो निश्चितच या गावचा नव्हे!

शिव्यांच्या वापराने सांगायची गोष्ट व्यवस्थित ठसविली जाते, असा दृढ समज असावा! अगदी प्रेमाने सांगितलेल्या गोष्टीतही शिवी येणारच! लोकांच्या तोंडून येणार्‍या म्हणी खास लक्ष द्याव्या अशा आहेत. त्यांतल्या काही वानगीदाखल अर्थासह पाहू या-

'बोडकीला न्हाव्याची लाज कशाला?' - पतिनिधनानंतर केशवपन केलेली स्त्री म्हणजे बोडकी. थोडक्यात ताकाला जाऊन गाडगे लपविणे अशा अर्थी.

बेत बाजीरावाचे प्रकाश सनकडयांचे - हाती काहीच नाही पण स्वप्नं मात्र भली मोठी रंगवायची.

सनकड्या म्हणजे काटक्या-कुटक्या. पूर्वी अगदी गरीब कुटुंबांच्या घरात त्या पेटवून उजेडाची गरज कशीतरी भागली जायची.

'भट सांगेल, ती आमुश्या (अमावस्या) न्हावी ठेवील त्या मिशा, राजा दाखवील ती दिशा' - एखादी गोष्ट अगदी अपरिहार्यपणे स्वीकारावी लागणे अशा अर्थी.

'चौघात मरण लग्नासमान' - सगळ्यांच्या बरोबरीने दु:ख आले, तरी आनंदासारखे मानणे.

या म्हणीला जोडून दुसरी एक म्हण प्रचलित आहे, ती अशी

'मेहुणीच्या लग्नात जावई कस्पटासमान' - मेहुणीच्या लग्नाच्या वेळी दुसर्‍या जावयाचे स्वागत करायला सासुरवाडी उत्सुक असते. त्या गडबडीत मोठ्या जावयाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. थोडक्यात, जुलुमाचा रामराम.

'मांडीखाली आरी, चांभार पोरांना मारी' - म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा.

आरी हे चर्मकामातले हत्यार आहे.

(प्रेषक : राम पटवर्धन)

Pages