भाषा आणि जीवन

प्रादेशिक भाषांना न्यायालयीन भाषा म्हणून मान्यता द्या - सर्वोच्च न्यायालयात याचिका

(जे० वेंकटेशन. 'द हिंदू' २४ जून २०१०)

ज्याप्रमाणे लोकसभेत तात्काळ भाषांतर ऐकू येण्याच्या व्यवस्थेमुळे तमीळ व इतर प्रादेशिक भाषा वापरता येतात त्याप्रमाणे उच्च व सर्वोच्च न्यायालयांतही प्रादेशिक भाषांचा वापर करणे शक्य आहे का ह्याचा अभ्यास करण्याचा आदेश केंद्र सरकारला देण्यात यावा अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ऑल इंडिया ज्यूनियर ‍अ‍ॅडव्होकेटस असोशिएशनने ही याचिका केली असून न्यायालयीन भाषा म्हणून तमीळला मान्यता मिळावी अशी मागणी करणार्‍या तामिळनाडूतील वकिलांना न्याय देण्याचा आदेश केंद्र सरकारला द्यावा अशीही विनंती याचिकेत करण्यात आली आहे. ही सार्वजनिक हित याचिका दाखल करणारे असोशिएशनचे अध्यक्ष एन्० राजा म्हणाले की घटना-कलम ३४८अन्वये प्रादेशिक भाषेला उच्च न्यायालयीन भाषा म्हणून राष्ट्राध्यक्षांच्या संमतीने मान्यता देण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. आजही चार उच्च न्यायालयांमध्ये हिंदी ही (प्रादेशिक) भाषा न्यायालयीन भाषा म्हणून वापरली जात आहे. उच्च न्यायालयात तमीळमध्ये युक्तिवाद करण्याची मुभा नसल्याने असोशिएशनच्या सभासदांचा वकिली करण्याचा हक्क नाकारला जात आहे. तमीळला न्यायालयीन भाषा म्हणून मान्यता देण्याचा तामिळनाडू सरकारचा प्रस्ताव केंद्राच्या गृह मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. विधिशाखेच्या विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेत प्रादेशिक भाषेत उत्तरे लिहिण्याची मुभा बार कौन्सिलने दिली आहे. अशा परिस्थितीत उच्च न्यायालयातील युक्तिवाद प्रादेशिक भाषांत करू न देण्याने त्यांच्या मूलभूत हक्कावरच गदा येते.

लोकसभेत आणि विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होणार्‍यांना आणि ते कामकाज पाहाणार्‍यांना कामकाजाच्या माहितीचे तात्काळ इंग्रजीत भाषांतर ऐकायला मिळण्याची सुविधा अलीकडे सभागृहांत उपलब्ध असते हे सर्वज्ञात आहे, असे याचिका म्हणते. तशीच व्यवस्था उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांतही करता येईल, असे याचिकेत म्हटले असून तशा आदेशाची विनंती करण्यात आली आहे. प्रादेशिक भाषांचा न्यायालयीन भाषा म्हणून उपयोग करता येणार नसेल तर विधिपरीक्षासुद्धा केवळ इंग्रजीत किंवा हिंदीत घेण्यास बार कौन्सिलला सांगण्यात यावे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

मराठी अभ्यास परिषद: 

अरबी - मराठी

उज्ज्वला रेगे

सुरुवातीच्या दिवसांत एकदा मी बायकांच्या ओपीडीत एका पेशंटला तपासलं. त्यानंतर ती कपडे, अबाया चढवत होती. खुर्चीवर काढून ठेवलेल्या तिच्या काळ्या शेल्याकडे बोट दाखवून ती मला म्हणाली,

"आतोनी शेला. (दे मला शेला)"

मी दचकले. ही बेदू बाई मला समजावं म्हणून शेला शब्द वापरते आहे का? हिला कसा कळला मराठी शब्द? माझं गांगरणं तिच्या लक्षात आलं. पण तिला वाटलं की मला शेला या शब्दाचा अर्थ कळला नाही. समजावणीच्या सुरात तिने सांगितलं.

"त्या खुर्चीवर ते जे काळं कापड आहे ना माझं पांघरायचं, त्याला अरबीत शेला म्हणतात."

पण तेव्हापासून मी कान टवकारले. तेव्हा "दुकान, सैल, कंदील, मंदील" हे शब्द रोजच्या संभाषणात सर्रास ऐकू आले. खद्रातली लहान मुलं आपल्या वडलांना आमच्या मुलांसारखीच, "बाबाऽऽ" अशीच हाक मारत हे लक्षात आलं. 'मरवा, ऊद, अत्तर' हे सुगंधी शब्द सापडले. 'व' या उभयान्वयी अव्ययाने तर अगदी 'हे' व 'ते' अशा थाटात खुद्रा व मुंबई जोडून टाकली.
राशीद अश्शम्मरीने रागारागाने मला 'तंबी' दिली. मी त्या तंबी शब्दावर खूश झाले म्हणून तो आणखीच रागावला. पण मग 'खुलासा' केल्यावर तो 'खजील' झाला. याखेरीज मला 'मुद्दत, फुरसत, हरकत' या मराठी शब्दांच्या त्याच अर्थाच्या 'मुद्दा, फुरसा, हरका' या चुलतबहिणी तोंडवळ्यावरून ओळखता आल्या. 'वार'भर कापडाचा 'हिसाब' आणि रोज 'रतलाचा रतीब' हे ऐकून तर मन आजोळी, बाळपणात जाऊन पोचलं. 'मनुका' खात खात मी 'कंसा'तला 'मजकूर' वाचला. मग 'इभ्रत, इलाखा, कपार, कनात, कयास, कसब, कायदा, कुवत, पुण्याच्या कसबा पेठेतला कसबा (= शहराचा जुना भाग), खंदक,' असे माहेरचे पाठीराखे जिथेतिथे भेटायला लागले.

उर्दू-हिंदीच्या मध्यस्थीशिवाय मराठीशी थेट ऋणानुबंध साधणार्‍या अशा कित्येक फारसी शब्दांनी माझं स्वागत केलं. मग अरबी बोलायच्या प्रयत्नात जेव्हा जेव्हा एखादा शब्द अडला तेव्हा तेव्हा मी मराठी शब्द दडपून दिला. आणि कित्येक ठिकाणी तो खपूनही गेला. अरबी ही माझ्या मायमराठीशी नातं जोडणारी, माझी मामी*च, मला त्या दूरच्या देशात नव्याने लाभली.

(*मावशी म्हटलं असतं. पण मराठी IndoEuropean आणि अरबी AfroAsiatic. त्यामुळे या दोन भाषा एका वंशातल्या नाहीत.)

'सोन्याच्या धुराचे ठसके', पृ० १११-११२

हिंदीचे अतिक्रमण आता मराठीच्या पाठयपुस्तकातही!

अनिल शेळके

आज इंग्रजीपेक्षा हिंदीचे मराठी भाषेवरील आक्रमण हा खरा कळीचा मुद्दा आहे. प्रसार माध्यमातून मराठी मुलांवर हिंदी शब्दांचा अव्याहत मारा चालू असतो. त्यामुळे हिंदी शब्दांचा चुकीचा अर्थ लावून मराठी मुले मराठी भाषा बोलत आहेत.

हा प्रभाव इतका आहे की, मूळ सार्थ मराठी शब्दच मुलांना ठाऊक नाहीत असे दिसून येते. आजच्या पिढीवर ओठावर डास, कासव, अतिरेकी या मराठी शब्दांऐवजी मच्छर, कछुआ, आतंकवादी हे शब्दच येतात. आता तर हे हिंदीचे भयावह अतिक्रमण मराठी विषयाच्या पाठयपुस्तकातही दिसू लागले आहे.

महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने ३१ जानेवारी २००९ रोजी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील आठव्या इयत्तेसाठी प्रसिद्ध केलेल्या सुलभ भारती या मराठी विषयाच्या पाठयपुस्तकामध्ये ‘विलक्षण पैज’ ही केशव फडणीस यांची कथा समाविष्ट केली आहे.

या कथेत "मी तुमच्या त्या लालजीकडून खाली हात परत फिरणार" (पृष्ठ ५९). "तुम्ही खाली हात परत आला तर मी तुम्हांला ५० सुवर्णमुद्रा देईन" (पृष्ठ ६०), आणि "मला जर खाली हात परत जावे लागले तर..." असा तीन वेळा रिकाम्या हातांनी परत येणे या अर्थाने ‘खाली हात’चा उल्लेख झालेला आहे.

राम, 3657 स्टेशन रोड, बार्शी, जि० सोलापूर 413 401
दूरभाष : (02184) 226301
भ्रमणभाष : 094201 33013

‘ण’ की ‘प’?

मेघना सामंत

आमच्या मालवणी प्रकारच्या माशांच्या आमटीची कृती एका मित्राला सांगत असताना एक गंमत लक्षात आली. मी सांगत होते, "वाटपात अमुक अमुक घालायचं... मग वाटप उकळायचं..."तर तो अडवून म्हणाला, "वाटप काय वाटप? वाटण म्हणायचंय ना तुला?" एक क्षण मला गोंधळायला झालं. कारण आई-आजी सगळयांच्या तोंडी वाटप, वाटपाची तयारी, वाटपाची आमटी हेच शब्द ऐकलेले, मग वाटप हा शब्द चुकीचा कसा? तितक्यात हा मित्र म्हणतो कसा, "वाटप म्हणजे बक्षीस वाटप किंवा वह्यावाटप, धान्यवाटप, खातेवाटप वगैरे आणि तुला म्हणायचंय ते वाटण."आमच्यात वाटपच म्हणतात असं मी ठासून सांगितलं खरं, पण मग थोडं विचारचक्र सुरू झालं. आमच्या भागात दळणाला सर्रास दळण म्हणतात. ‘आमच्या येथे सर्व प्रकारच्या धान्याचे दळप व कांडप करून मिळेल’ अशी पाटी मी कोल्हापुरात कुठेतरी बघितलेली आठवली. त्यावरून कांडपीण हा शब्द आठवला. कांडपिणींवरून रांधपिणी आठवल्या. म्हणजे रांधप हा शब्द असणारच. तसाच वाढप (आणि वाढपी) हे शब्द तर चांगलेच प्रचारात असलेले. उसाचा ‘गाळप’ हंगामही वाचलेला आहे. अशाच प्रकारचा आणखी एक शब्द म्हणजे वाजप. हा फक्त सिंधुदुर्ग भागात ऐकायला मिळेल. याला प्रमाण-भाषेत बहुधा प्रतिशब्द नसावा. लग्नात वगैरे - ‘बहु गल्बला न करणे’ अशी सूचना देऊनही वाजंत्री जो गल्बला करतच राहतात तो म्हणजे वाजप.

यावरून एक गोष्ट लक्षात आली की काही ठरावीक क्रियापदांची ‘ण’ ऐवजी ‘प’ लावून केलेली नामंच आमच्या बोलीत रुजली असावीत. क्रियापद (वाटणे) एकच असून, ‘वाटप’ म्हटलं की वितरण आणि ‘वाटण’ म्हटलं की ओल्या चटणीसारखी, अनेक पदार्थांची एकत्र वाटून केलेली गोळी असं पुण्यामुंबईकडच्या भाषेने ठरवलं असलं तरी आम्ही बुवा वाटप हा शब्द वापरणारच.

ता० क० नुकताच आणखी एक ‘प’कारान्त शब्द सापडला - पाडप. हाही कोकणातलाच. माडांवरून नारळ उतरवायच्या कामाला पाडप म्हणतात.

सी-202, सॅटलाईट पार्क, गुंफा रोड, जोगेश्वरी पूर्व, मुंबई 400 060
ई-पत्ता : askwhy.meghana@gmail.com

संगणकव्यवहाराचे मराठीकरण

सुशान्त शंकर देवळेकर

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेबरोबरच उत्पादनांच्या स्थानिकीकरणाची संकल्पनाही महत्त्वाची ठरते. किंबहुना ह्या दोन्ही प्रक्रिया एकमेकींशी नाते राखणार्‍या आहेत. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत जगातील एका टोकाला असलेली वस्तू जगाच्या दुसर्‍या टोकाला सहज उपलब्ध होऊ लागली आहे. पण त्याबरोबरच जगाच्या त्या टोकाला ती वस्तू पुरवताना तिथल्या स्थानिक आवश्यकता काय आहेत हेही ध्यानात घेण्याची आवश्यकता आहे ह्याचे भान आता येऊ लागले आहे. संगणकक्षेत्रातही ह्या स्थानिकीकरणाला विशेष महत्त्व लाभले आहे.

मराठीकरणाची उद्दिष्टे

ज्या विशिष्ट सामाजिक-राजकीय परिस्थितीत आपण वावरत आहोत तिचे भान न ठेवता जर आपण संगणकव्यवहाराचे मराठीकरण करू गेलो तर ते निव्वळ उपचार म्हणून केलेले काम ठरेल. आपले मराठीकरण हे असे असू नये. ह्यासाठी मराठीकरणाच्या उद्दिष्टांतले विविध घटक लक्षात घेणे आवश्यक आणि हितकारक आहे. आपल्याला केवळ शब्दान्तर करायचे नाही. उपचारापुरते शब्दाला शब्द उभे करायचे नाहीत. संगणकाविषयी मराठीतून नेमकेपणे बोलता येईल ह्यासाठी पूर्वसिद्धता करायची आहे. मराठीकरणामागचे हेतू कोणते हे पाहू गेल्यास पुढील उद्दिष्टे ध्यानात येतात.

(अ) अस्मितेचा आविष्कार : मराठी ही माझी स्वभाषा आहे आणि मला माझा ज्ञानाविष्कार मराठीतूनच करायचा आहे अशी भूमिका घेणारे काही लोक असतात. भाषा हा त्यांच्या अस्मितेचा भाग असतो. मला माझ्या भाषेतून हे करता येते हे त्यांना जगाला दाखवून द्यायचे असते. (अशा तर्‍हेची) भाषिक अस्मिता हा फार महत्त्वाचा मुद्दा ठरतो. जपान, चीन, स्पेन, फ्रान्स अशा देशांत आपल्या स्वभाषेतच आपला ज्ञानव्यवहार आणि इतर सर्व व्यवहार करू इच्छिणारा फार मोठा वर्ग अस्तित्वात आहे. खरे तर जगात विविध ठिकाणी असलेल्या अशा वर्गाच्या अस्तित्वामुळेही जागतिक संगणकव्यवहाराच्या स्थानिकीकरणात भाषा ह्या घटकाला महत्त्व लाभते आहे.

(आ) भाषासमृद्धी : जीवनव्यवहाराच्या विविध क्षेत्रांत वापरी जाणारी भाषा त्या त्या व्यवहारासोबत आपोआप समृद्ध होत असते. आपली भाषा ही ह्या संगणकीय व्यवहारक्षेत्राची (आणि अशाच इतर अनेक व्यवहारक्षेत्रांची) स्वाभाविक भाषा असती तर आपल्याला हा सगळा स्थानिकीकरणाचा खटाटोप करावाच लागला नसता. पण दुर्दैवाने तशी परिस्थिती नाही. अशा वेळी आपल्याला एक तर हा व्यवहार आपल्या भाषेत करताच येणार नाही असे म्हणून गप्प बसावे किंवा आपल्या भाषेची क्षमता ओळखून ती भाषा अशा व्यवहाराला तयार होईल असे प्रयत्न करावेत. असे प्रयत्न नेटाने झाल्यास भारतीय भाषांना लाभलेली वाङ्मयाची परंपरा अधिक समृद्ध होऊ लागेल. आपल्या भाषेचा लवचीकपणा, शब्दसिद्धीची प्रक्रिया ह्या सर्वांची जाण ह्या उद्दिष्टात महत्त्वाची ठरते.

(इ) आकलनसुलभता : अजूनही आपल्याकडचा फार मोठा समाज आपला ज्ञानव्यवहार आणि सामाजिक व्यवहार मराठीत करत असतो. (हे संख्याबळ किती काळ टिकेल हा प्रश्न आता सहज दुर्लक्षिता येणार नाही.) अशा समाजाला संगणकीय व्यवहार सहज कळावा हे आपले एक उद्दिष्ट असणार आहे. अनेकांना आकलनसुलभता हा मुद्दा ह्या उद्दिष्टांच्या क्रमात शेवटी घातलेला पाहून आश्चर्य वाटले असेल. पण आपण ज्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत जगत आहोत तिच्यात हा मुद्दा पहिला मुद्दा होऊ शकत नाही. इंग्रजीत चाललेला ज्ञानव्यवहार कळत नाही ह्यावर आपण इंग्रजीतूनच शिकणे आणि आपण इंग्रजीतच ज्ञानव्यवहार करत राहणे हा एक मार्ग आहे. बहुसंख्य अभिजनांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच हा मार्ग अवलंबलेला आहे आणि आपल्याकडचा बहुजनसमाजही आता त्या मार्गाकडे वेगाने वाटचाल करतो आहे. शासनाचा आणि लोकप्रतिनिधींचा ह्या मार्गालाच पाठिंबा आहे. तेव्हा निव्वळ आकलनाचा मुद्दा हा मर्यादित ठरतो. केवळ ह्या मुद्याला महत्त्व द्यायचे असेल तर मराठीत हा व्यवहार आणण्याच्या खटाटोपापेक्षा मराठीला सोडून देऊन इंग्रजीशरण होण्याचा मार्ग हा कमी कष्टाचा आहे असेही अनेकांना वाटतं.

पण मराठीकरणाच्या दृष्टीने आपण हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. त्यामुळे केवळ उपचार म्हणून भाषान्तर करण्याच्या प्रवृत्तीला काही आळा बसण्याची शक्यता निर्माण होते. आपण केलेले मराठीकरण हे लोकांना हा विषय कळावा ह्यासाठी आहे ह्याची जाण असणे आवश्यक आहे.

संगणकव्यवहार आणि मानवी भाषा

संगणकव्यवहारात एखाद्या मानवी भाषेचा वापर आपण दोन प्रकारे करतो. एक म्हणजे वापरकर्‍यांच्या सोयीसाठी संगणकीय यंत्रणेचा भाग म्हणून संवादपटलावर आपण मानवी भाषा वापरतो. ह्यात व्यक्ती जेव्हा संगणक वापरते तेव्हा संगणकाच्या पडद्यावर तिला विविध सूचना दिसतात. त्यातून कोणत्या क्रियेनंतर त्या वापरकरी व्यक्तीने काय करणे अभिप्रेत आहे ह्याचे मार्गदर्शन मिळते. दुसर्‍या प्रकारात वापरकरी व्यक्ती आपल्या भाषेतील माहिती संगणकावर नोंदवते, साठवते, हवी तेव्हा त्यातील माहिती हुडकून वापरू इच्छिते, तिची देवाणघेवाण करू इच्छिते. आपण ह्यांपैकी पहिल्या प्रकारच्या भाषिक व्यवहाराचा विचार करत आहोत.

घडवलेल्या संज्ञा आणि स्वीकारलेल्या संज्ञा

जो ज्ञानव्यवहार आपल्याकडचा नाही, जो आपण कुणा इतरांकडून शिकलो आहोत, त्या व्यवहारासाठी संज्ञाही त्याच भाषेतून घ्यायला काय हरकत आहे असे एक मत आहे. नाहीतरी विविध भाषा बोलणारे लोक एकमेकांच्या संपर्कात आले म्हणजे त्यांच्या भाषांमध्ये परस्परांत देवघेव होतच असते. संगणकविज्ञान आणि संगणकतंत्रज्ञान आपण युरोप-अमेरिकेकडून घेतले तेव्हा त्यांनी वापरलेल्या संज्ञाच आपण का स्वीकारू नयेत? उगाच मराठी संज्ञा शोधत बसण्याची कटकट कशाला हवी! ही भूमिका काही नवी नाही. पण भाषाभाषांतील देवघेव ही जितकी स्वाभाविक आहे असे भासते वा भासवण्यात येते तशी ती खरोखर असतेच असे नाही हेही आपण ध्यानात घ्यायला हवे. त्यातली स्वाभाविकता आणि अगतिकता ह्या दोन्ही गोष्टी चिकित्सक बुद्धीने तपासायला हव्यात. ज्या दोन भाषांच्या संबंधांबाबत आपण बोलतो आहोत त्या भाषांचे राजकीय-सामाजिक बलाबल काय ह्याचे भान ठेवले नाही तर ह्या तथाकथित स्वाभाविक देवघेवीची परिणती ही एका भाषेने स्वाभाविकपणे दुसरा भाषा मटकावण्यात होते. हा विचार केल्यास सध्याच्या परिस्थितीत इंग्रजीतले शब्द मराठीत सरसकट घेणे टाळावे. अगदी निरुपाय असेल तरच घ्यावे. शक्यतो मराठी धाटणीचे नवे शब्द घडवावे असे प्रस्तुत लेखकाला वाटते. फाइल, फोल्डर, ड्राइव्ह ह्यांना धारिका, संचिका, खण हे किंवा अधिक चांगले इतर मराठी पर्याय वापरणे चांगले.

पारिभाषिक संज्ञा

संज्ञांना भाषाव्यवहारात एक उद्दिष्ट असते ते म्हणजे वस्तुबोधाचे. संज्ञा आपण वापरतो त्या एखाद्या गोष्टीचा निर्देश व्हावा म्हणून. पारिभाषिक संज्ञा हा संज्ञांचा विभाग होतो तो विशिष्ट संदर्भाच्या सापेक्षतेने. इथे संज्ञांचा अर्थ हा मूलत: एका मर्यादित क्षेत्रातल्या व्यवहारानुसार ठरतो. पारिभाषिक संज्ञांचा वापर हा मुख्यत्वे त्या क्षेत्रातील जाणकार करत असतात. डॉ० अशोक केळकर ह्यांनी दिलेले उदाहरण वापरायचे तर पाणी ही संज्ञा व्यवहारात आपण वापरतो ती पिण्याजोगा, धुण्यासाठी वापरायचा द्रवरूप पदार्थ अशा अर्थाने. पण रसायनविज्ञानात त्याच्या ह्या संदर्भापेक्षा त्याची घडण महत्त्वाची ठरते. पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्यांच्या अणूंचे संयुग आहे ह्याला तिथे प्राधान्य असते. मराठीकरणाचा विचार करताना संज्ञाव्यवहाराचे हे वैविध्य ध्यानात घ्यायला हवे.

मराठीकरणाच्या प्रक्रियेविषयी

सर्वसाधारणपणे संगणकप्रणाल्यांच्या देशीकरणात जी पद्धत वापरतात ती म्हणजे इंग्रजीतली संज्ञांची यादी देऊन त्यांना देशी भाषांत कोणते पर्याय आहेत ते लोकांना नोंदवायला सांगणे. पण ह्या पद्धतीत काही तोटे आहेत. ह्या पद्धतीत संज्ञाव्यवहार तुकड्यातुकड्यांत विखुरलेला असतो. त्याचे भान राहतेच असे नाही. संज्ञांचे एकमेकांशी असलेले संबंध, वापराचे संकेत ह्या सगळयांचे एकत्रित भान येतेच असे नाही.
संज्ञांचे पर्याय निवडण्यासाठी देताना स्रोतभाषेतील संज्ञा आणि तिच्यापुढे पारिभाषिक अर्थ अशी सामग्री आपल्यापुढे आपण ठेवली तर संदर्भांचा घोटाळा होणार नाही आणि मराठीकरणही चपखल होईल. त्यामुळे स्रोतभाषेतील संज्ञांचे व्यवहारातले अर्थ आपोआपच गळतील.

दुसरे म्हणजे सुट्या संज्ञा देण्यापेक्षा वाक्येच जर समोर असली तर अर्थाचे संदर्भ स्पष्ट होतात. ह्या दृष्टीने 'साहाय्य' ह्या विभागातील नोंदींचे मराठीकरण प्रथम करण्याचा प्रयत्न झाल्यास अधिक रेखीव संज्ञा उपलब्ध होऊ शकतील. आणि वापरकर्‍यांच्या दृष्टीने पाहता त्यांना फार निकडीची असणारी सोय ह्यातून आपोआप लाभले.

नेमके अर्थसंदर्भ

सर्वसामान्यपणे भाषेतील शब्दाशी विविध संदर्भ निगडित असू शकतात. अशा वेळी शब्दाचा नेमका संदर्भ नीट कळणे आणि तो नीट व्यक्त होणे हे आवश्यक आहे. अनेकदा शब्दाच्या पारिभाषिक अर्थापेक्षा व्यवहारातल्या सामान्य अर्थाच्याच आधारे संज्ञांचा विचार होतो. त्यातून उगीचच बोजडपणा येऊ शकतो. उदा० 'ऑथेंटिफिकेशन'ला 'अधिप्रमाणन' म्हणण्याची आवश्यकता नाही. ह्या संज्ञेच्या वापराचा संदर्भ पाहिला तर 'खातरजमा' हा शब्द अधिक योग्य वाटतो.

एखाद्या गोष्टीशी अनेक संदर्भ निगडित असताना संज्ञा ही त्यातील एखाद्याच संदर्भाला महत्त्व देऊन रचलेली असू शकते. उदा० मराठीत सध्या अनेक लोक ज्यासाठी न्याहाळक अशी संज्ञा वापरतात त्याला इंग्रजीत ब्राव्जर अशी संज्ञा आहे (त्याला अनुसरून काही लोक चाळकही म्हणतात.) ह्या दोन्ही संज्ञा ह्या ह्या गोष्टीच्या एका एका धर्माचा निर्देश करतात. मुळात संगणकावर महाजालावरील संकेतस्थळ पाहण्याची सोय करणारी संगणकप्रणाली हा अर्थ इथे मुख्य आहे आणि तो इंग्रजी आणि मराठी दोन्ही संज्ञांच्या सामान्य व्यवहारातील अर्थांत तंतोतंत गवसत नाही. त्यांचा पारिभाषिक वापर लक्षात घेतला तरच ह्या संज्ञा योग्य वाटतात.

ह्या व्यवहाराचा पारिभाषिकपणा लक्षात घेणे ही एक पायरी झाली. ती लक्षात घेऊनही नव्याने एखाद्या भाषेत चपखल संज्ञा सुचवणे हे काम सोपे नाही. मराठीत नव्या संज्ञा आणताना जाणवलेल्या मर्माच्या जागा खाली मांडत आहे.

तंतोतंत जुळणारी संज्ञा

एका भाषेत एखादा शब्द जितक्या विविध संदर्भांशी निगडित असतो तितक्याच संदर्भांशी निगडित असलेली पर्यायी संज्ञा शोधण्यात अनेकदा भाषान्तरकारांची शक्ती खर्च होते. निदान शास्त्रीय भाषाव्यवहारात तरी बहुतेक वेळां ह्याची आवश्यकता नसते. उदा० 'यूजर इण्टरफेस'साठी मराठीत संवादपटल ही संज्ञा सुचवली तर इण्टरफेसचे इतर संदर्भ उदा० दोन संगणकीय यंत्रणांना जोडणारी मध्यस्थ यंत्रणा ही संवादपटल ह्या संज्ञेत समाविष्ट होत नाही. पण अशा विविध अर्थांसाठी वेगवेगळ्या संज्ञा वापरात येतात (संवादपटल आणि मध्यस्था) हे ध्यानात घेतले तर सगळे संदर्भ तंतोतंत जुळतील अशाच संज्ञा हव्यात हा हट्ट उरणार नाही.

आपला सांस्कृतिक शब्दकोश

अनेकदा असे वाटते की मराठीचा आपला सामूहिक शब्दकोश हरवत चालला आहे. आपल्याला नवा शब्द घडवायचा झाला तर आपण संस्कृतातल्या शब्दसिद्धीची प्रक्रिया अधिक वापरू जातो. (तीही बर्‍याचदा अज्ञानमूलक असते, ते असो.) संगणकाची आज्ञावली रचताना त्यात एक विशिष्ट रचनाबंध वापरतात. त्यात एखादी क्रिया विशिष्ट टप्प्यानंतर परत परत करण्यात येते. पुढची आज्ञा मिळेपर्यंत हे परत परत करणे चालूच असते. इंग्रजीत ह्या रचनाबंधाला 'लूप' असे म्हणतात. मराठीत काय म्हणाल असे विचारले तर बहुतेक लोक पुनरावर्तन वगैरे म्हणू लागतात. निष्कारण संस्कृतात शिरतात. त्याला फेरा म्हणता येईल हे आपल्याला पटकन सुचत नाही. फेरा हा शब्द एकदा सुचला की जन्ममरणाचा फेरा, फेर्‍यातून सुटणे इ० शब्दप्रयोग आठवून ही संज्ञा अधिक चपखल आहे हे सहज लक्षात येते. पण हे जरा सुचायला हवे. मराठीकरण करताना ह्या गोष्टीचे भान असल्यास मराठीकरण अधिक स्वाभाविक होईल असे वाटते.

संस्कृतचा अनावश्यक वापर

संस्कृतचा वापर अनेकदा नको तितका झाल्यानेही असा पारिभाषिक भाषाव्यवहार क्लिष्ट होतो. संस्कृततज्ज्ञांच्या दृष्टीने एखादा संस्कृत शब्द चपखल असला तरी मराठीत सोपा शब्द देणे शक्य असताना तो संस्कृत शब्द वापरणे टाळावे. 'नेव्हिगेटर'ला मार्गनिर्देशक म्हणण्यापेक्षा वाटाड्या म्हणणे केव्हाही चांगलेच.

सामासिक पदांची घटकपदे

अनेकदा स्रोतभाषेतली संज्ञा ही सामासिक स्वरूपाची असते. अशा संज्ञांना पर्यायी संज्ञा सुचवताना काळजी घ्यायला हवी. उदा० इंग्रजी संज्ञा जर सामासिक असेल तर तिच्या घटकपदांचे कोशातले अर्थ सुटे सुटे लक्षात घेऊन पर्यायी संज्ञा घडवली तर ती बर्‍याचदा अभिप्रेत संदर्भात चपखल वाटत नाही. उदा० 'बुकमार्क'चा पर्याय म्हणून पुस्तकखूण ही संज्ञा वापरली तर अर्थ कळेलच. पण स्मरणखूण अधिक बरी वाटते. मूळ अर्थ काय अभिप्रेत आहे? तर आपण नेहमी वापरतो ते संकेतस्थळांचे पत्ते पुन्हा पुन्हा लिहावे लागू नयेत म्हणून संगणकाने ते नोंदवून घेणे. हे झाले म्हणजे एकदा टिकटिकवल्याने (क्लिक केल्याने) काम भागते. ह्याला मराठीत स्मरणखूण असे म्हणणे अधिक बरे. पुस्तकखूण म्हणजे पुस्तकात ठेवायची खूण तिचा अर्थ आपण कुठवर वाचले त्याची आठवण करून देणे, त्यावरून संकेतस्थळाचा पत्ता लक्षात ठेवण्याची संगणकातली सोय एवढा लांबलचक प्रवास करण्याची आवश्यकता नाही.

व्याकरणिक रचनाविशेष

भाषांचे व्याकरणिक रचनाविशेष अनेकदा काही बंधने आणत असतात ती ध्यानात घ्यायला हवीत. उदाहरणच घ्यायचे तर शब्दसिद्धीच्या दृष्टीने पाहता मराठी भाषेत धातूंना आख्याताचे (म्हणजे काळ आणि आज्ञार्थ इ० अर्थ ह्यांचे वाचक असे) प्रत्यय लागताना त्यांना उपसर्ग लागत नाहीत. संस्कृत वा इंग्रजीत ते लागतात. उदा० हृ ह्या धातूपासून हरति असे क्रियापद बनते तसेच संहरति, विहरति, आहरति, प्रहरति इ० रूपे होतात. इंग्रजीत संस्कृताइतके नसतील पण री, अन् असे काही उपसर्ग लागून काही रूपे होतात. उदा० री-डू, अन्-कव्हर, ऑटो-चेक इ० मराठीत धातूला थेट उपसर्ग लागून होणारी अशी रूपे घडताना दिसत नाहीत. मराठीत पुनर् इ० शब्द नामांच्याच अगोदर येतात. उदा० पुनर्मिलन, पुनर्विचार, फेरनिवड इ० एखादा मनुष्य फेरनिवडला असं मराठीत म्हणत नाहीत त्याला पुन्हा निवडले किंवा त्याची फेरनिवड झाली असे म्हणतात. इंग्रजीतून मराठीत अशा रूपांचे भाषांतर करताना क्रियाविशेषण आणि धातू अशा रचना वापरणे भाग आहे.

अशा प्रकल्पांत संगणकतज्ज्ञ आणि भाषेचे जाणकार अशा दोहोंचा सहभाग असायला हवा आणि त्यांची चर्चा होईल असे एखादे व्यासपीठ उपलब्ध व्हावे. असे झाल्यास ह्या प्रयत्नांचा पाया अधिक भक्कम होईल, अशी आशा वाटते. ह्या विवेचनात संज्ञांचा प्रत्यक्ष विचार केलेला नाही, पण काही गोष्टी ध्यानात घेतल्या तर मराठीकरण अधिक नेटके, अधिक स्वाभाविक होऊ शकेल असे वाटले म्हणून काही निरीक्षणे नोंदवली आहेत.

भ्रमणभाष : 097698 35310
ई-पत्ता : sushant.devlekar@gmail.com

मेकॉले विरुद्ध प्रिन्सेप, प्रिन्सेप विरुद्ध ट्रेवेल्यन

अरविंद कोल्हटकर

(हे लेखन इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या काही पुस्तकांवरून आणि अन्य सामग्रीचा वापर करून लिहिण्यात आलेले आहे. संकेतस्थळांचा उल्लेख तळाशी क्रमवारीने दिला आहे. पुस्तकांच्या पृष्ठांचे संदर्भ १:१२, २:२० अशा प्रकारे दिलेले आहेत.)

१८३४ सालचा हिंदुस्थान. दुसर्‍या बाजीरावाला बिठूरास पेन्शनवर पाठवल्यानंतर ब्रिटिश सत्ता हिंदुस्थानात सुस्थापित झाल्यासारखी दिसत होती. पुष्कळ भागात प्रत्यक्ष सत्ता आणि उर्वरित भागात ताटाखालची मांजरे बनलेले राजे-महाराजे आणि नवाब ह्यांमुळे एक उद्धट आत्मविश्वास सत्ताधारी वर्गामध्ये निर्माण झाला होता. युरोपीय (विशेषेकरून ब्रिटिश) संस्कृती, ज्ञान, समाज आणि वंश (तेव्हाचा शब्द, आजचा नव्हे) हे हिंदुस्थानी संस्कृती, ज्ञान, समाज आणि वंश ह्यांपेक्षा गुणत: श्रेष्ठ आहेत अशी भावना सत्ताधारी वर्गामध्ये दृढमूल होऊ लागली होती. ह्या पार्श्वभूमीवर त्या काळात ब्रिटिश राजकर्त्या वर्गामध्ये झालेल्या भाषा आणि लिपीसंबंधातल्या दोन वादांना सौकर्यासाठी शीर्षकातील सुटसुटीत नावे दिली आहेत.
ह्या दोन वादांपैकी पहिला आजही चांगलाच स्मरणात आहे. त्या वादाच्या नावातील मेकॉले म्हणजे थॉमस बॅबिंग्टन मेकॉले (१८००-५९). १८३२ ते १८३३ अखेर लंडनमधून ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्यावर देखरेख करणार्‍या बोर्ड ऑफ कंट्रोलचा सेक्रेटरी, तदनंतर १८३४ ते १८३७ अखेर ह्या काळात कलकत्त्यात गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलमध्ये लॉ-मेंबर अशी साधारण ६ वर्षे त्याचा हिंदुस्थानच्या कारभाराशी प्रत्यक्ष संबंध होता. इंडियन पीनल कोड तयार करणे हे महत्त्वाचे काम त्याने ह्या काळातच पार पाडले. ह्याखेरीज कमिटी ऑफ पब्लिक एज्युकेशनचा अध्यक्ष म्हणून त्याने जे विस्तृत टिपण लिहिले त्याचा परिणाम म्हणजे हिंदुस्थानातली शिक्षणाची पद्धत मुळापासून बदलली आणि शिक्षणाला एक नवी दिशा प्राप्त झाली. आज आपणांला दिसतो तो भारत देश तिच्यातून निर्माण झाला आहे. कमिटीच्या दहा सदस्यांमध्ये ५-५ अशी विभागणी झाली होती. पाच सदस्यांच्या मते सरकारने तोवर चालत आलेले शैक्षणिक धोरणच पुढे चालवावे, ज्यायोगे सरकार जुन्या पद्धतीच्या संस्कृत, अरेबिक आणि पर्शियनच्या अभ्यासावर भर देणारे धोरणच चालू ठेवील. उर्वरित पाच सदस्य इंग्रजी भाषा आणि आधुनिक ज्ञान देणार्‍या नव्या पद्धतीचा आग्रह धरत होते. (ह्या दोन विचारांना पुढील लेखनात अनुक्रमे पौर्वात्य आणि पाश्चात्य असे संक्षेपाने संबोधले आहे.) कमिटीचा अध्यक्ष म्हणून मेकॉलेने जे भारदस्त टिपण (minute) लिहिले त्यामुळे पारडे पाश्चात्य पक्षाच्या बाजूस झुकले आणि तेव्हापासून इंग्रजी भाषेची चलती हिंदुस्थानात सुरू झाली. मेकॉलेचे मूळ पूर्ण टिपण केव्हाच गहाळ झाले आहे असे दिसते. पण त्याचा पुष्कळसा भाग तळटीप ५ मध्ये उपलब्ध आहे. टिपण संक्षेपाने पाहायचे असेल तर ३:४०९ वाचा. टिपणातील काही विधाने आज भारतीयांना रुचणारी नाहीत पण ती तत्कालीन पूर्वग्रह आणि समजुतींची द्योतक असल्याने मेकॉलेला आज त्यावरून झोडपण्यात काहीच तथ्य नाही.

ह्या वादातील पराभूत पौर्वात्य पक्षाचा प्रमुख म्हणजे हेन्री थॉबी प्रिन्सेप (१७९२-१८७८) आणि जेम्स प्रिन्सेपचा थोरला भाऊ. हाही कलकत्त्यातील उच्चपदस्थांपैकी एक होता. गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंकचा अंतिम निर्णय त्याच्या पौर्वात्य पक्षाच्या विरोधात गेल्यामुळे कमिटीच्या सदस्यत्वाचा त्याने राजीनामा दिला. ह्यावरून पहिल्या वादाला मेकॉले विरुद्ध प्रिन्सेप असे नाव दिले आहे.
दुसर्‍या वादातील प्रिन्सेप म्हणजे जेम्स प्रिन्सेप (१७९९-१८४०). ब्राह्मी लिपीची उलगड करून भारताच्या प्राचीन इतिहासाचे दालन उघडणारा. वर उल्लेखिलेल्या हेन्री थॉबीचा धाकटा भाऊ. ह्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेले स्मारक आजही कलकत्त्यात प्रिन्सेप घाट ह्या स्थानावर उभे आहे. वादातल्या विरोधी पक्षाचा मुख्य प्रतिनिधी चार्ल्स एडवर्ड ट्रेवेल्यन (१८०७-१८८६). अगदी तरुण वयात हा हिंदुस्थानात कंपनी सरकारच्या नोकरीत आला आणि भराभर वर चढत १८३४ सालापर्यंत वयाच्या २७व्या वर्षी गव्हर्नर जनरलच्या निकटवर्तीय वर्तुळात त्याची गणना होऊ लागली होती (३:३९१). भारतीय भाषा लिहिण्यासाठी त्यांच्या चालू लिपीच योग्य आहेत की सर्व भारतीय भाषांना रोमन लिपी लागू करावी ह्या मुद्यांवर हा दुसरा वाद खेळला गेला. प्रिन्सेपसारख्या पौर्वात्यांच्या मते रोमन लिपी भारतीय भाषा लिहिण्यासाठी पुरेशी पडली नसती आणि चालू पद्धतीत बदल करण्याचे काहीच कारण नव्हते. ट्रेवेल्यनसारख्या पाश्चात्त्यांच्या मते रोमन लिपीच्या मार्गाने युरोपीय ज्ञानाचा हिंदुस्थानात प्रवेश आणखी सुकर झाला असता. अमेरिकन आणि अन्य मिशनरी प्रयत्नांमध्ये धर्मप्रसारासाठीची पुस्तके एतद्देशीय भाषांमध्ये पण रोमन लिपीत छापण्याची सुरुवात झालीच होती. मिशनरी वर्गाचा कल साहजिकच रोमन लिपीकडे होता. पहिल्या वादाचा निर्णय सरकारी पातळीवरून करण्यात आला. दुसर्‍या वादात मात्र सरकारी पातळीवर काहीच स्वारस्य दाखविण्यात आले नाही. परिणामत: त्याचे स्वरूप दोन खाजगी पक्षांमधले मतान्तर एवढेच मर्यादित राहिले. कमी-अधिक जोराने हा वाद पुढची साठ-एक वर्षे चालू राहिला, पण तेवढ्या काळात देशी भाषांचीच बरीच प्रगती झाल्याने आणि त्यांच्यामध्येच बरीच ग्रंथसंपदा निर्माण झाल्याने ह्या वादातली हवाच निघून गेल्यासारखे झाले. १८५७च्या उठावानंतर प्रजेला उगीचच डिवचणेही राज्यकर्त्यांना शहाणपणाचे वाटले नसावे.

पहिल्या वादामध्ये निर्णय सरकारी पातळीवरून केला जाण्याचे कारण म्हणजे तो वाद १८१३ सालच्या चार्टर कायद्यामध्ये वापरण्यात आलेल्या 'लर्नेड नेटिव्ह्ज ऑफ इंडिया' (सुशिक्षित एतद्देशीय) ह्या शब्दांचा अर्थ कसा लावायचा ह्या कायद्याच्या मुद्याभोवती केन्द्रित होता. मेकॉलेच्या टिपणामधून हे स्पष्ट दिसून येते. तो म्हणतो : (५)
''... सार्वजनिक शिक्षण-कमिटीच्या काही सदस्यांच्या मते आजतागायत चालत आलेली पद्धती हीच काय ती ब्रिटिश संसदेने १८१३ मध्ये पुरस्कृत केलेली पद्धती आहे... मला नाही असे वाटत की संसदेने केलेल्या कायद्याचा कशाही मार्गाने अर्थ लावला तरी त्यामधून सध्या लावलेला अर्थ काढता येईल. अमुकच भाषा किंवा अमुकच शास्त्र असे काहीही कायद्यात उल्लेखिलेले नाही. वाङ्मयाचे पुनरुज्जीवन आणि विकास आणि सुशिक्षित एतद्देशीयांना उत्तेजन अशा हेतूने आणि ब्रिटिश सत्तेखालच्या भागातील रहिवाशांमध्ये शास्त्रीय ज्ञानाचा प्रवेश आणि विकास व्हावा अशा हेतूने काहीएक रक्कम बाजूस काढून ठेवण्यात आली आहे. ह्यावरून असे मांडण्यात येत आहे किंवा असे गृहित धरून चालण्यात येत आहे की संसदेच्या मते वाङ्मय म्हणजे केवळ अरेबिक वा संस्कृत वाङ्मय. मिल्टनची कविता, लॉकचे तत्त्वज्ञान वा न्यूटनचे पदार्थविज्ञान ह्यांच्याशी परिचय असणार्‍या एतद्देशीयाला जणू सुशिक्षित एतद्देशीय ही उपाधी संसदेने लावलीच नसती. कुश दर्भाचे उपयोग आणि परमेश्वरात विलीन होण्याचे रहस्य हिंदूंच्या पवित्र ग्रंथांतून शिकलेल्यांनाच जणू ही उपाधी लागावी, हा अर्थ समाधानकारक आहे असे मला वाटत नाही."

अशा रीतीने चार्टर कायद्याचा अर्थ लावण्याचा प्रसंग पडल्याने आणि 'सुशिक्षित एतद्देशीय' ह्या शब्दांचा अर्थ 'युरोपीय ज्ञान घेतलेले' असा प्रस्थापित झाल्याने जुन्या पद्धतीचे शिक्षण थांबवून त्याच्या जागी नव्या पद्धतीचे शिक्षण देण्यात यावे हा निर्णय सरकारी पातळीवरून करण्यात आला. हा निर्णय जरी हिंदुस्थानी प्रजेच्या भविष्यावर कायमचा परिणाम करणारा होता तरी तो घेतला गेला कलकत्तेकर इंग्रजांच्या छोट्या उच्च वर्तुळात. आपल्या आणि आपल्या देशाच्या भवितव्यावर मूलभूत परिणाम करणारा असा काही निर्णय घेतला जात आहे ह्याची हिंदुस्थानी प्रजेला ना जाणीव होती ना काळजी. लिपिबदलाबाबत कोणताच कायदा वाटेत येत नसल्याने काहीच निर्णय झाला नाही आणि जैसे थे परिस्थितीच चालू राहिली. माझ्या मते हिंदुस्थानी प्रजेचे हे मोठेच सुदैव म्हणायचे. नपेक्षा राज्यकर्त्यांच्या ह्याच उच्च वर्तुळाने एका फटक्यात देवनागरीसहित सगळ्या लिपी निकालात काढल्या असत्या आणि त्या जागी रोमन लिपीची स्थापना केली असती. ह्या 'सुधारणेचे' परिणाम हिंदुस्थानी प्रजेने कायमचे भोगले असते. ह्या विषयीचे माझे वैयक्तिक मत ह्या लेखनाच्या अखेरीस विस्ताराने लिहिले आहे. येथे एवढेच लिहितो की सर्वविनाशाच्या गर्तेपासून आपण थोडक्यात वाचलो आणि त्यामुळे आज भारत एक सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून जगात मानाने उभा आहे.

(हा संपूर्ण वाद क्र०१ येथे दर्शविलेल्या जागी वाचावयास उपलब्ध आहे. तेथील पल्लेदार इंग्रजीतील लांबलचक टिपणे वाचायची नसतील तर त्यांचा उत्तम सारांश क्र०२मध्ये प्रोफेसर आणि शब्दकोशकार मोनियर विल्यम्स ह्यांनी लिहिला आहे. ह्या वेळेपर्यंत त्यांचे आडनाव विल्यम्स एवढेच होते. पुढे १८८६ साली त्यांना KCIE ही पदवी मिळाली तेव्हा त्यांनी आपल्या आडनावात 'मोनियर' हा शब्द जोडला आणि ते मोनियर मोनियर-विल्यम्स अशा double-barelled आडनावाने ओळखले जाऊ लागले. (७)
लिपीसंबंधीच्या वादाची सुरुवात एका छोट्या बाबीवरून झाली. थॉमसन नावाच्या दिल्लीस्थित इंग्रजाने ट्रेवेल्यनच्या सूचनेवरून रोमन लिपीत एक इंग्रजी-उर्दू शब्दकोश तयार केला. त्याच्या प्रती कलकत्त्यातील स्कूल बुक सोसायटीने विकत घ्याव्या काय असा प्रस्ताव सोसायटीपुढे आला. तिचे दोन सदस्य जेन्स प्रिन्सेप आणि टायटलर ह्यांनी हिंदुस्तानी भाषांसाठी रोमन लिपी वापरण्याचे काहीच कारण नाही असे त्रोटक शेरे मारून आपला विरोध नोंदवला. उत्तर म्हणून ट्रेवेल्यनने विस्तृण टिपण लिहिले. तद्नंतर मूळ मुद्दा दूर राहून रोमन लिपी हिंदुस्थानातील भाषांना लागू करणे योग्य की अयोग्य हा वाद सुरू झाला. मिशनरी लोकांना ह्या प्रश्नात रस असल्याने त्यांच्या सेरामपूर प्रेसने १८३४ सालीच ह्या संपूर्ण वादातील मतमतान्तरे एकत्र करणारे पुस्तक छापले. (ते पुस्तक क्र०१ येथे उपलब्ध आहे.) ह्या वादावर सरकारच्या बाजूने काहीच अधिकृत प्रतिक्रिया आलेली दिसत नाही. हे एक मोठेच आश्चर्य आहे. परिणामत: वादाचा काहीच निर्णय न होऊन परिस्थिती पूर्ववत चालू राहिली. मोठेच आश्चर्य असे मी म्हणतो ह्यामागे एक मनोरंजक कारण आहे आणि ते पाहण्यासाठी थोडे विषयांतर करावे लागेल.

मेकॉले हिंदुस्थानात आला तेव्हा तो अविवाहित होता. आपल्या दोन बहिणींवर त्याची फार माया होती आणि त्या दोघींपैकी धाकटी हॅना हीही अविवाहित असून भावाबरोबरच हिंदुस्थानात आली. (लग्नाच्या हेतूने, दुसरे काय? तेव्हाची ती पद्धत होती.) कलकत्त्यात आल्यावर चार्ल्स ट्रेवेल्यन हा उपवधू आणि उज्ज्वल भवितव्य असलेला तरुण तिच्या प्रेमात पडला आणि डिसेंबर १८३४मध्ये त्यांचा विवाह झाला. मेकॉलेला हा विवाह पूर्णपणे पसंत होता, कारण ट्रेवेल्यनबद्दल त्याचे फार चांगले मत होते. दोघांना जरी उत्तम पगार असले तरी दोघेही मूळचे मध्यमवर्गीय होते आणि बचत करून ती मायदेशी पाठवण्याची दोघांनाही आवश्यकता होती. ह्या कारणाने विवाहानंतर नवविवाहित दांपत्य आणि मेकॉले एकाच घरात राहिले (३:३९४). (ह्याच घराच्या जागेवर सध्याचा प्रतिष्ठित बेंगाल क्लब उभा आहे (३:३८९). पाश्चात्य विरुद्ध पौर्वात्य शिक्षण हा पहिला वाद ह्याच सुमारास चालू होता, कारण मेकॉलेचे टिपण २ फेब्रुवारी १८३५ ह्या दिवशी लिहिले गेले (क्र० ५). मेव्हणे मेव्हणे आणि एकाच घरात राहणारे असूनही ट्रेवेल्यनने लिपीच्या प्रकरणातही रस घ्यायला मेकॉलेला उद्युक्त केल्याचे दिसत नाही. रोजच्या रोज डिनर टेबलवर ते काय बोलत होते ह्याबाबत काहीच नोंद उपलब्ध नाही. जर मेकॉलेने भाषेबरोबर लिपीच्या कामातही लक्ष घातले असते तर अजून एक भारदस्त टिपण लिहून ह्याही प्रश्नाचा कायमचा निकाल त्याने लावला असता. (जाता जाता असाही उल्लेख करावासा वाटतो की क्र० ३चे मेकॉलेचे चरित्र त्याचा भाचा आणि हॅनाचा मुलगा जॉर्ज ओटो ट्रेवेल्यन ह्याने लिहिलेले आहे.)

कालान्तराने मेकॉले आणि ट्रेवेल्यन दोघेही इंग्लंडला परतले. चार्ल्स ट्रेवेल्यन १८५९मध्ये हिंदुस्थानात परत आला. मद्रासचा गव्हर्नर आणि व्हाइसरॉयच्या कौन्सिलात अर्थविभागाचा सदस्य म्हणून १८६५ पर्यंत तो पुन: हिंदुस्थानात होता. लिपीचा विषय तो विसरला नव्हता. इंग्लंड सोडण्यापूर्वी ह्या विषयाचा तेथे पाठपुरावा करण्याचे काम त्याने मोनियर विल्यम्सकडे सोपवले होते. १८३४मध्ये झालेला वाद आणि नंतर इंग्लंडातील वृत्तपत्रात छापलेले लिखाण एकत्रित करून मोनियर विल्यम्सने जे पुस्तक प्रसिद्ध केले ते क्र०२ येथे उपलब्ध आहे. ह्याही प्रयत्नातून काही निष्पन्न झाल्याचे दिसत नाही.

मिशनरी लोकांनाही ह्या लिपीच्या प्रकरणात रस होता असे वर म्हटलेले आहेच. आपल्यापरीने धर्मप्रचाराची भाषान्तरित पुस्तके रोमन लिपीत छापून प्रसिद्ध करण्याचे त्यांचे कार्य चालूच होते. ह्या विषयाला खास वाहिलेले एक मासिक लाहोरमध्ये चार-पाच वर्षे तरी प्रकाशित होत होते. ह्या मासिकाच्या पहिल्या आणि पाचव्या वर्षांचे अंक क्र०४ येथे उपलब्ध आहेत. मासिकाच्या पृष्ठभागावरच त्याचा हेतू रोमन-उर्दू जर्नल - पौर्वात्य भाषांसाठी रोमन लिपीच्या पुरस्कारार्थ (Roman-Urdu Journal. To advocate the use of Roman Alphabet in Oriental Languages) असा नोंदवलेला आहे. हे अंक चाळले तर रोमन लिपीच्या चळवळीतली हवा निघून जायला लागल्याचे लक्षात येते. पंजाब विद्यापीठाशी संबंधित असलेल्या आणि अन्यही बर्‍याच प्रतिष्ठित हिंदू आणि मुस्लिम व्यक्तींची मते अंकात वेळोवेळी छापलेली आहेत आणि त्या सर्वांनी रोमन लिपीला विरोध केल्याचे दिसते. खुद्द सरकारलाही ह्या विषयात काहीच रस नसल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ खंड ५, अंक ४६, पृष्ठ २५ पाहा. डॉ० डब्ल्यू० सेंटर नावाच्या लेखकाने सरकारी पातळीवर हा प्रस्ताव उचलून धरायला विरोध केला आहे. लोकांना हा प्रस्ताव मान्य आहे का नाही ह्या चाचणीवरच त्याचे यशापयश ठरविले पाहिजे, सरकारी हस्तक्षेपाची आवश्यकता नाही असे त्याने नमूद केले आहे. पंडिता रमाबाई ह्यांचेही नाव विरोधक म्हणून एका ठिकाणी आलेले आढळते. खंड ५, अंक ५० पृष्ठ १७ येथे Lady-Pandit “Ramabai” and Roman character असा एक लेख आहे. त्यावरून कळते की रमाबाईंनी जणू संस्कृत भाषाच विलाप करत आहे अशी कल्पना करून एक काव्य करून ते काव्य पूर्वीच्या वर्षी म्हणजे १८८१ साली बर्लिनमधल्या प्राच्यविद्या तज्ज्ञांच्या काँग्रेसकडे पाठवले होते आणि मोनियर विल्यम्स ह्यांनी त्या काव्याचे भाषान्तर करून दिले होते. प्रस्तुत काव्यातील दोन भाग येथे वाचावयास मिळतात. एव्हांना देशी भाषांमध्ये त्या त्या लिपी वापरून बरीच ग्रंथनिर्मिती झालेली असल्याने आणि १८५७च्या घटनांच्या नंतर ही खाजवून खरूज काढण्यात सरकारला काही स्वारस्य वाटत नसावे.

१८३४ साली लिपीबदलाला सर्वांत अधिक अनुकूल वातावरण होते तरीही तो बदल होऊ शकला नाही. ह्यामुळे हिंदुस्थान आणि नंतरचा भारत देश मोठयाच आपत्तीतून वाचला असे पूर्वी म्हटले आहे ते का ह्यावर दोन शब्द लिहितो.

राजकीय पातळीवर सत्ता केंद्रित असलेला एकसंध देश इंग्रजांनी निर्माण केला. तरीही तत्पूर्वी दोन-अडीच हजार वर्षे हा देश सांस्कृतिक पातळीवर एकत्रच होता. मुस्लिम, शीख, पारसी, ज्यू असे अन्य प्रवाह आले तरी तेही ह्या सांस्कृतिक एकसंधतेचा भाग होऊन गेले. संस्कृत भाषा, त्यात निर्माण झालेले तत्त्वज्ञान आणि विचार, त्यातील वाङ्मय आणि त्याच गोष्टींचा पुढे देशी भाषांमध्ये झालेला विकास हे ह्या एकसंधतेला प्रामुख्याने पायाभूत आहेत असे मला वाटते. केरळमधल्या भारतीयाला बंगालमधला किंवा पंजाबमधला भारतीय फार दूरचा वाटत नाही ह्यामागे हे समान धागे आहेत. ह्याउलट १८३४मधला हिंदुस्थान अगदीच स्वत्व गमावलेला आणि पराभूत अवस्थेतला समाज होता. इंग्रज जे म्हणतील ते करायला तो तयार होता. इंग्रजांनी तेव्हा इथल्या लिपींना राजाश्रय काढून घेतला असता आणि रोमन लिपी राजकीय पातळीवरून प्रसारित केली असती तर केवळ रोमन लिपी शिकलेली हिंदी प्रजा दहा-पंधरा वर्षांतच इथल्या लिप्या विसरायला लागली असती. वापर नसला तर एखादी लिपी संपूर्ण विस्मरणात जायला फार वेळ लागत नाही. ब्राह्मी आणि खरोष्ठी ह्या प्राचीन लिप्यांचे हेच झाले. अगदी अलीकडचे आपल्या मोडीचेच उदाहरण घ्या. १९४०-५० पर्यंत बर्‍याच जणांना जुजबी का होईना, मोडी वाचता येत असे. शाळांमधून मोडी बंद झाल्यावर ३०-४० वर्षांतच अशी स्थिती निर्माण झाली की आत्मविश्वासपूर्वक मोडी वाचणार्‍यांची संख्या वीसपंचविसावर येऊन पोहोचली. महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करू इच्छिणारे काहीजण प्रयत्नपूर्वक मोडी वाचायला शिकतात कारण आजच्या काळात हेही कोणीतरी केले पाहिजे ही जाणीव आपल्यामध्ये आहे. १८३४ साली कोणीही असा प्रगल्भ विचार केला असता असे वाटत नाही. लवकरच सर्व भारतीय लिप्या पूर्ण विस्मरणात गेल्या असत्या आणि त्या त्या लिप्यांमध्ये लिहिलेली असंख्य पुस्तके आणि कागदपत्रे दुर्लक्षित अवस्थेत कोणाकोणाच्या माळ्यावर पडून राहिली असती. नशिबाने एखाददुसरे पुस्तक रोमन लिपीतून छापले गेलेही असते, पण बहुतेकांची वाटचाल वाळवी, ओलावा, धूळ ह्या परिचित मार्गाने होऊन ती नष्ट तरी झाली असती किंवा पूर्ण विस्मरणात गेली असती. आपल्या भूतकाळाचे ज्ञान आणि त्याच्या अस्तित्वाची जाण ह्या अनमोल ठेव्याला आपण पूर्णपणे मुकलो असतो. उरले असते ते केवळ जातीजमातीतील, भाषांभाषांतील आणि अन्य अनेक प्रकारचे भेद. त्यांची आपल्याकडे मुळीच टंचाई नाही. भूतकाळ विसरलेल्या समाजांचे भविष्य कसे असते हे आपण आफ्रिका किंवा दक्षिण अमेरिकेच्या उदाहरणांवरून पाहू शकतो. भारतीय समाजाला एकत्र बांधून ठेवणारे घट्ट सिमेंट नाहीसे झाल्यावर इथे पुढेमागे कायमचे अराजक माजले असते आणि आजचा सामर्थ्यवान भारत कदाचित निर्माणच झाला नसता. १८३४च्या काळातला दीनदलित हिंदुस्थान कदाचित पुन्हा डोके वर काढूच शकला नसता असे मला वाटते.

सर्व भारतीय भाषा रोमन लिपीमध्ये लिहिल्या जाव्यात अशी मागणी करणारे काही गट आजही आसपास आहेत. ह्या आजच्या चळवळींचे मूलस्रोत अगदी वेगळे आहेत आणि १८३४च्या मागणीशी त्यांचे काहीच साधर्म्य नाही. ते केवळ नावापुरतेच एकासारखे एक दिसतात. प्रस्तुत लेखनात ह्या आजच्या मागणीबद्दल काहीही मतप्रदर्शन केलेले नाही असे मुद्दाम नमूद करावेसे वाटते.

संदर्भ
१) The application of the roman alphabet to all the Oriental Languages ... सेरामपूर प्रेस. १८३४. http://tinyurl.com/yyt2x4q
२) Original papers illustrating the history of the application of the Roman Alphabet to the Languages of India. संपादक मोनियर विल्यम्स. १८५९. http://tinyurl.com/y2s5a6b
३) The Life and Letters of Lord Macaulay. Vol. १ जॉर्ज ओटो ट्रेवेल्यन १८८० http://tinyurl.com/y2zbqbq
४) Roman-Urdu Journal Vol. 1, Civil and Military Gazette Press लाहोर १८७८
http://tinyurl.com/2852g8n Roman-Urdu Journal Vol. 5, Civil and Military Gazette Press. लाहोर. १८८४.
http://tinyurl.com/y6cz3ov
५) http://www.languageinindia.com/april2003/macaulay.html
६) '... the opinion of some of the gentlemen who compose the Committee of Public Instruction, that the course which they have hitherto pursued was strictly prescribed by British Parliament in 1813,...
It does not appear to me that the Act of Parliament can, by any art of construction, be made to bear the meaning which has been assigned to it. It contains nothing about the particular languages or sciences which are to be studied. A sum is set apart 'for the revival and promotion of literature and the encouragement of the learned natives of India, and for the introduction and promotion of a knowledge of the sciences among the inhabitants of the British territories.' It is argued, or rather taken for granted, that by literature, the Parliament can have meant only Arabic and Sanscrit literature, that they never would have given the honorable appellation of 'a learned native' to a native who was familiar with the poetry of Milton, the Metaphysics of Locke, and the Physics of Newton; but that they meant to designate by that name only such persons as might have studied in the sacred books of the Hindoos all the uses of cusa-grass, and all the mysteries of absorption into the Deity. This does not appear to be a very satisfactory interpretation.'
७) http://www.shikshapatri.org.uk/~imagedb/content.php/monier
संदर्भ बघण्यासाठी tinyurl.com ने काम न केल्यास books.google.com येथील शोधपेटी (search-box) मध्ये पुस्तकाचे नाव घालूनही पुस्तक सापडेल.

313-38 एल्म स्ट्रीट
टोरांटो, ओन्टारिओ M5G 2K5, कॅनडा
दूरभाष : (+1) (416) 340 0881
ई-पत्ता : kolhatkar@hotmail.com

धुळे जिल्ह्यातील दलित स्त्रियांच्या ओवीगीतांतील बहीण-भाऊ

प्रकाश भामरे

भारतीय संस्कृतीत प्रत्येक नात्याचे विशिष्ट असे स्थान ठरलेले आहे. प्रत्येक नात्यामागे विशिष्ट भूमिका, पावित्र्य, कर्तव्य दडलेले आहे. नात्याप्रमाणे प्रत्येकाचे वर्तन संस्कृतीसंवर्धन ठरते. नातेसंबंधातील वितुष्ट संस्कृतीला लागलेले ग्रहण मानले जाते. धुळे जिल्ह्यातील दलित समाज, म्हणजेच पूर्वाश्रमीचा महार समाज लोकसंस्कृतीचा पूजक राहिलेला आहे. आधुनिक काळातसुद्धा प्रत्येक नात्यामधील संकेत हा समाज पाळताना दिसतो.

दलित समाजातही इतर समाजांप्रमाणे बहीण-भावाच्या नात्याला अतिशय पवित्र मानले जाते. रक्षाबंधन, भाऊबीज, अक्षयतृतीया म्हणजेच ‘आखाजी’ अशा प्रकारच्या सणांच्या वेळी बहिणींचे भावांच्या घरी येणे लोकसंस्कृतीला धरून आहे. यातून नात्यांमधील ओलावा, जिव्हाळा टिकून राहतो अशी या समाजाची धारणा आहे. ‘दिवाई-आखाजी’ हे दोन सण ग्रामीण दलित समाजात अतिप्रिय आहेत. याप्रसंगी भावा-बहिणींच्या नात्यामध्ये भावजय धोंडा ठरते. हा आशय व्यक्त करताना एक दलित स्त्री म्हणते -

"भाऊ आनी बहीन एक वेलनं वाईक
भवजाई कुत्सीत, तिनी तोडी करा लोक"
"बंधो कसा म्हने, मन्ही बहीनले वाढ दही
भवजाई कशी म्हने, दूधमा मुरन टाकं नही"
"बंधो कसा म्हने, मन्ही बहीनले वाढ दूध
कसं वाढू दूध, तठे मूरन टाकी दिधं"
"बंधो कसा म्हने, मन्ही बहीनले रांध रोट्या
कशा रांधू रोट्या, तुम्हे लयेल गहू पोट्या"

पत्नीचा स्वभाव कुत्सित असल्यामुळे भाऊ आपल्या बहिणीला मनाप्रमाणे पाहुणचार करू शकत नाही, ही वेदना प्रस्तुत ओव्यांमधून मुखर होते. भाऊ चांगला आहे. परंतु भावजय कुस्वभावाची असल्याकारणाने ती बहीण-भावाच्या नात्यामध्ये वितुष्ट आणण्याचा वारंवार प्रयत्न करीत असते. नवर्‍याचे सांगणे काही ना काही खोटी कारणे देऊन टाळत असते.
सख्ख्या भावाला तोडून तिने परके केले अशी बहिणीची वेदना आहे. भाऊ बहिणीला दही, दूध, पोळ्या वगैरे खाऊ घालण्यासाठी आपल्या पत्नीला सांगतो. परंतु पत्नी वेगवेगळी उत्तरे देऊन आपल्या नणंदेला अवमानित करत राहते. प्रस्तुत ओव्या नणंद-भावजयच्या नात्यांतील ताण-ताणवांवर प्रकाश टाकतात.

"धाकला मुराई, नको धाडीस वं मायबाई
आंबांनी आमराई, राघो-मयनाना जीव भ्याई"
"बहीन भाऊना झगडा, व्हयना आंबाना बनमा
बहीनना डोये पानी, भाऊ पस्ताये मनमा"
"मन्हा माहेरना वाटे, बाभूय बन बहू दाटे
बंधो येईन लेवाले, माले भ्याव मोठा वाटे"

सासुरवाशी मुलीला घेण्यासाठी जाणार्‍या भावाला ‘मुराई’ असे म्हणतात. ‘मूय’ घ्यायला जातो तो मुराई होय. हा मुराई शक्यतोवर सासुरवाशी मुलीचा लहान भाऊच असतो. ‘धाकला मुराई’ म्हणजे लहान भाऊ. मला घ्यायला माझ्या लहान भावाला पाठवू नकोस अशी विनंती ही सासुरवाशी मुलगी आपल्या मायबाईला म्हणजेच आईला करते. कारण रस्त्यात आंब्याच्या घनदाट आमराया आहेत. पायी प्रवास करायचा असल्याने, पुन्हा मुराई लहान असल्याने व मी बाई माणूस असल्याने आम्हां दोघां भावा-बहिणीला भीती वाटते. परतीच्या प्रवासात बहीणभावाची शाब्दिक बोलाचाल होते. तेव्हा बहीण ही मातृहृदयी असल्यामुळे तिच्या डोळयांत अश्रू येतात. हे डोळयांतले अश्रू बघून भाऊ मनात पश्चात्ताप करतो. उगीच आपण आपल्या बहिणीला बोललो असे त्याचे मन त्याला खाते.
बहीण-भावामध्ये वेळप्रसंगी छोटे-मोठे भांडण जरी झाले, तरी ते क्षणिक असते. रक्ताची नाती चिवट असतात. ती तुटता-तुटत नाहीत हेच खरे.

"घोडावर जिन बांध, बंधो निंघना रागे रागे
कशी येऊ तुना संगे, घर-जोजार मन्हा मांगे"

‘आखाजी-दिवाई’च्या निमित्ताने भाऊ-बहिणीला माहेरी नेण्यासाठी तिच्या गावी येतो. तिने माहेरी येण्याचे नाकारल्यामुळे त्याला राग येतो. तेव्हा ती आपल्या ‘बंधो’ला म्हणते, मला तुझ्यासोबत येण्यात आनंदच वाटला असता; परंतु माझ्यामागे ‘घर-जोजार’ म्हणजे कौटुंबिक जबाबदार्‍या इतक्या आहेत की, ते सर्व सोडून मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही. ही खंत ती आपल्या भावाजवळ बोलून दाखविते.

"गरीब दुब्या भाऊ, परतेक बहीनले राहो,
हलका-भारी खन, एक रातना उत्सव"

बहिणीच्या आयुष्यातील भावाचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे प्रस्तुत ओवीमधून अप्रतिमपणे व्यक्त झाले आहे. प्रत्येक बहिणीला भाऊ असलाच पाहिजे. भाऊ नसलेली बहीण किंवा बहिणी ‘आखाजी-दिवाई’च्या सणांना उपरेपणाचा अनुभव घेताना आढळतात. म्हणून भाऊ असलाच पाहिजे. तो गरीब असो, श्रीमंत असो, बहिणीला एक रात्रीसाठी उतरायला माहेरी एक हक्काची जागा मिळते. एका रात्रीच्या भावाच्या घरचा मुक्काम म्हणजे बहिणीच्या दृष्टीने मोठा उत्सवच ठरतो. आई-वडिलांच्या नंतर तिला माहेरपण अनुभवण्यासाठी हक्काचे घर भावाचेच असते. म्हणून प्रस्तुत ओवीगीतातील बहीण आपल्या आयुष्यातील भावाच्या अस्तित्वाची अपरिहार्यता बोलून दाखविते. सासरकडचे लोक कितीही श्रीमंत असले तरी गरीब दुबळ्या भावाचे घर किंवा त्याने केलेला
खण-चोळीचा पाहुणचार तिला स्वर्गसुखापेक्षा कमी वाटत नाही.

"मन्हा बंधोना घरले, सजे चुनगजी वट्टा,
बंधोनी कया न्याव, पाटील व्हयना खट्टा"

प्रस्तुत ओवीतील बहीण आपल्या भावाच्या न्यायप्रिय स्वभावाची स्तुती करताना दिसते. ‘चुनगजी वट्टा’ हे पूर्वीच्या काळी महार वस्तीत वैभवाचे लक्षण मानले जायचे. या ‘चुनगजी वट्टया’वर बसून माझा भाऊ न्यायनिवाड्याचे काम करतो. त्याच्या न्यायातील निरपेक्षता ऐकून गाव पाटलालाही शरमेने मान खाली घालावी लागते. ‘खट्टा’ होणे म्हणजे अपराधीपणाची जाणीव होणे. महार जातीत न्यायनिवाड्याचे काम ‘नाईक’ महार करायचा. हा नाईक इतरांपेक्षा बौद्धिक दृष्ट्या श्रेष्ठ समजला जायचा. ‘नाईक’ असणे त्याच्या कुटुंबियांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट मानली जायची. या ‘नाईक’ भावाची बहीण त्याची स्तुती करत आहे.

"बंधो मन्हा राजबिंदा, भवजाई चंदरकोर,
बंधोनी काढी गाडी, गावले पडना घोर"

एका प्रेमळ बहिणीचे हृद्गत प्रस्तुत ओवीतून व्यक्त होते. माझा भाऊ व भावजय इतके देखणे आहेत की, त्यांच्याकडे पाहून संपूर्ण गाव चकित होते. सगळयांना त्यांच्या सुरूपतेचा हेवा वाटतो. भाऊ-भावजयविषयीच्या आत्यंतिक अभिमानातून अशा अतिशयोक्तिपूर्ण ओव्यांची निर्मिती झालेली आहे.

"हाई जग-संसारमा, कितलं से गनगोत,
बहीण-भाऊनं नातं, मानिक-मोत्यानी पोत"

जगात अनेक प्रकारचे नातेसंबंध आहेत. परंतु त्या नातेसंबंधांना बहीण-भावाच्या नात्याची सर येणार नाही. बहीण-भाऊ एका माळेतील माणिक व मोती आहेत. अशी हृद्य भावना प्रस्तुत ओवीतून व्यक्त होते.

"भाऊ-बहिननं नातं, जग बये दखीसन
तुन्हा जीवना करता, ऊनू कंदील लायीसन"

प्रेमळ बहिणीचा तिच्या भावाविषयीचा आत्यंतिक जिव्हाळा प्रस्तुत ओवीतून व्यक्त झाला आहे. भाऊ आजारी पडल्यावर रात्र-पहाट न पाहता त्याला पाहण्यासाठी रात्रीचा कंदील लावून येते. पूर्वीचा काळ पायी प्रवासाचा व कंदील-दिव्यांचा काळ होता. अशा काळातही लोकांनी त्या-त्या नात्यातील प्रेम-जिव्हाळा जोपासलेला आढळतो. बहिणीला निसर्गत:च भावाविषयी भावनिक ओढ असते. सर्व नातेसंबंधात बहीण-भावाचे नाते पवित्र मानले जाते. विवाहानंतर या नात्यातला दुरावा वाढत असला तरी हे रक्ताचे नाते असल्यामुळे ते मरेपर्यंत तुटत नाही. बहिणीच्या अंत:करणातील भावाविषयीच्या ममतेला अंत नाही. वाहतुकीची साधने, मोबाईलचे युग आल्यामुळे प्रत्येक नात्यातले भावनिक अंतर वाढत चालल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर उपरोक्त ओवीचा आशय आपल्याला अंतर्मुख करतो. प्रचंड अभावग्रस्तेच्या काळातही तत्कालीन लोकांनी त्या त्या नात्यातले पावित्र्य, जिव्हाळा, प्रेम, माणुसकी जोपासलेली आढळते. हे लोकसंस्कृतीचे मौलिक संचित आहे हे आपल्याला मान्य करावे लागेल.

"वावर आडे वावर, कोनता वावरमा जाऊ,
भाऊना वावरमा, नाग डोले जसा गहू"
"आम्हे सात वं बहिनी, सात गावन्या चिड्या
एकुलता एक भाऊ, त्याना पिरीममा येड्या"

प्रस्तुत ओव्याही भावा-बहिणीचे प्रेम अधोरेखित करतात. त्यांच्या शेतातील समृद्धी, त्याच्याविषयीचे सातही बहिणींचे आत्यंतिक प्रेम या ओव्यांतून व्यक्त होते.

बहिणीच्या घरी मुलगी सून म्हणून पाठविणे ही प्रथा दलित म्हणजे पूर्वाश्रमीच्या महार जातीत आजही प्रचलित आहे. या सोयरीक संबंधामुळे काही कुटुंबामध्ये जवळीकता जर निर्माण झालेली असली तरी दुरावाही निर्माण झालेला आढळतो. भावाला व्याही म्हणून स्वीकारणे ही गोष्ट नातेसंबंध तुटण्यास कारणीभूत ठरते. बहीण आपल्या मुलीची सासू झाल्यानंतर तिला सासुरवास होणे परंपरेला धरून मानले जाते. त्यातून भावा-बहिणीच्या पूर्वीच्या नात्यामध्ये वितुष्ट निर्माण होताना आढळते. असा आशय खालील ओवीगीतांतून व्यक्त होतो:

"भाऊ कया याही, भासी कयी वहू,
र्‍हायनात काया खडा, उडी ग्यात गहू"
"भाऊ कया याही, माय चाव्व्याले बोलाले,
भासी कयी वहू, माय आत्याबाई म्हनाले"
"भाऊले कया याही, भवजाई याहीन व्हयेना,
लगीन लागाना येये, मांडोमझार येयेना"
"आंबानी कयरी, आंबाले व्हयनी जड
भाऊना करता, भवजाई लागे गोड"
"भाऊ भाऊ करू, भाऊले नही मया,
वाकडी वाट करी, पोरना गावले गया"

भावाची मुलगी सून म्हणून स्वीकारल्याने सासू-सुनांमधला संघर्ष कमी होतो, अशा अपेक्षेने असे विवाहसंबंध जोडले जातात. परंतु रक्तसंबंधातले विवाह असले तरी भावा-बहिणीच्या नात्यामध्ये वितुष्ट हे निर्माण होतेच. उपरोक्त ओव्यांमधून भाऊ-भावजय-नणंद यांच्या नातेसंबंधावर प्रकाश पडतो. भाऊ-बहीण अविवाहित असताना त्यांच्या नात्यातले पावित्र्य त्यांच्या विवाहानंतर मात्र टिकत नाही, असेच म्हणावे लागेल. बहिणीच्या घरी मुलगी सून म्हणून पाठविल्यानंतर ‘र्‍हायनात काया खडा, उडी ग्यात गहू’ असा अनुभव बहिणीला व भावालाही येतो. एकंदरीत दलित समाजातील स्त्रियांच्या ओवीगीतांतील भावा-बहिणीचे संबंध जवळीकतेचे असले तरी नात्यात परिवर्तन झाल्यानंतर दुरावा निर्माण होतो, हेही तेवढेच खरे! हे सत्य उपरोक्त ओव्यांमधून अगदी सहज प्रकट होते.

साधन व्यक्ती/ओव्यांची प्राप्ती
१) श्रीमती लक्ष्मीबाई अर्जुन भामरे, रा० कापडणे, ता० जि० धुळे
२) श्रीमती येसाबाई हिरचंद भामरे, रा० कापडणे, ता० जि० धुळे

28 अजिंठा, रघुवीरनगर, खोकाई माता रोड, नंदुरबार 425 412
भ्रमणभाष : 098222 94255

बोलींचा अभ्यास

विश्वनाथ खैरे

(परीक्षित पुस्तक : बोली : समाज, साहित्य आणि संस्कृती डॉ० कैलास सार्वेकर : प्रतिभास प्रकाशन, परभणी २०१०, पृष्ठे ७ + १६० किंमत : रु०१६०/-)

विविध विद्यापीठांतल्या मराठीच्या अभ्यासक्रमांमध्ये भाषा म्हणून भाषेच्या अभ्यासाला (साहित्य-समीक्षांच्या तुलनेने) खूपच कमी स्थान आहे. जे आहे त्याच्यावर एकोणिसाव्या शतकापासून चालत आलेल्या भारतयुरोपीय ऐतिहासिक प्रणालींचा पगडा आहे. विद्यापीठांमध्ये संशोधनाच्या अंगावर फारसा भर नाही. त्यामुळे भाषाविषयाचे दुपदवीधरसुद्धा नंतरच्या काळात भाषासंशोधनाकडे विशेष वळत नाहीत. जे वळतात ते त्यांच्या आवडीने किंवा त्यांच्या मायबोलीच्या प्रेमाने. त्यांच्या अभ्यासावर किंवा संशोधनावर साहजिकपणेच विद्यापीठातील अभ्यासक्रमाचे परिणाम दिसून येतात. बोलींच्या अभ्यासात सामाजिक आणि मानसिक घटकही काम करतात. असे असले तरी शिक्षणाच्या प्रसारामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातलेही काही अभ्यासक बोलींच्या अभ्यासाकडे वळत आहेत, त्यांच्या अभ्यासू लेखनाची बूज ठेवली पाहिजे आणि आधी सांगितलेल्या प्रभावांची वजावट करून निखळ शास्त्रीय अभ्यासाकडे त्यांना वळवण्यासाठी भाषाविषयक संस्थांनी आणि विद्यापीठांनीही खास प्रयत्न केले पाहिजेत. प्रस्तुत पुस्तकाकडे मुख्यत: या दृष्टीने या लेखात पाहायचे आहे.

पुस्तकाचे लेखक डॉ० कैलास सार्वेकर जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मराठीचे प्रपाठक आहेत. त्यांनी ग्रामीण कविता या विषयावर पीएचडी केली आहे. ते पंचवीस वर्षे नवापुरच्या आदिवासी शिक्षणसंस्थेच्या महाविद्यालयात मराठीचे अध्यापक होते. तेव्हा त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिक्षणाची गोडी लावण्यासाठी खास प्रयत्न आणि प्रयोग केले. गेल्या सुमारे वीस वर्षांत त्यांनी वेळोवेळी लिहिलेले लेख या पुस्तकात संग्रहित केले आहेत. त्यांत नामे, नातेसंबंधाचे शब्द इत्यादी तीनचार लेखरे (लहान लेख) आहेत. बहिणाईंच्या कवितेची बोली लेवा आहे या आशयाचा एक लेख आहे. एक लेख खानदेशातील लोकवाङ्मय आणि ग्रामीण कविता यांचे अनुबंध दाखवणारा आहे.
या सर्वांपेक्षा भाषाभ्यासाशी थेट आणि अधिक संबंध असलेले लेख बोलींवरचे आहेत. 'भाषा : इतिहास आणि भूगोल' (कालेलकर, १९८५) यातल्या विवेचनाचा आधार या लेखांमधल्या अभ्यासाला आहे. सार्वेकरांची मायबोली जामनेरी आहे. इतर बोलींचा अभ्यास त्यांनी मराठीचे अध्यापक असताना केला. खानदेशातील पावरा, कोंकणी आणि जामनेरी या बोलींची ओळख करून देणारे तीन लेख पुस्तकात आहेत. गुजराती आणि अहिराणी या 'भाषाभगिनी'ची तुलना करणारा एक लेख आहे. आदिवासी या नावात मावची, वसाव, कोंकणी, पावरा या चार बोलींचा समावेश आहे. या आदिवासी बोलींमधील म्हणी आणि गीते यांवर दोन लेख आहेत. 'आदिवासी विद्यार्थ्यांमधील भाषिक न्यूनगंड' घालवण्यासाठी केलेल्या उपायांची माहिती आणि विद्यार्थ्यांच्या त्यावरच्या प्रतिक्रिया यांचे दोन लेख आहेत. त्यांतल्या काही विद्यार्थ्यांनी शब्दजातींसह नोंदलेला आदिवासी बोलींमधला शब्दसंग्रह वर्गवारीने तक्त्यांमध्ये दिला आहे.

महाराष्ट्रात मराठी भाषा चालते आणि निरनिराळ्या बोलींचाही वापर लहानमोठया क्षेत्रांवर होत असतो. त्यांतल्या एखाद्या बोलीचा अभ्यास (१) मराठीची पोटभाषा म्हणून (२) मराठीला लागून असलेल्या भाषा आणि मराठी यांचा तिच्यावरील परिणाम शोधण्यासाठी (३) सध्याच्या प्रमाण-मराठीहून तिचे वेगळेपण दाखवण्यासाठी (४) त्या बोलीचे निव्वळ वर्णन करण्यासाठी - असा विविध प्रकारांनी होऊ शकतो.

पहिल्या प्रकारात ती बोली मराठी भाषेतून ध्वनिबदलाने काळाच्या ओघात सध्याच्या अवस्थेला आल्याचे धरले जाते. भाषाभ्यासातल्या भारतयुरोपीय प्रणालीचे हे गृहीतच होते. या प्रकारात लेखी मराठीतल्या लिपिबद्ध ध्वनींशी बोलीतल्या उच्चारणांची तुलना सार्वेकरांच्या बोलीविषयक लेखांमध्ये आली आहे. कालेलकरांनीच म्हटल्याप्रमाणे भाषा ही अनेक बोलींच्या संमीलनातून सिद्ध होते. भारतीय भाषासंभाराच्या बाबतीत ''लेखी ती भाषा आणि मुखी ती बोली'' अशी व्याख्या करता येईल. लेखी भाषेतून मुखी बोली निर्माण होत नाहीत हे मान्य केले तर प्रमाण मराठीतील अक्षरोच्चारणाला मानदंड मानण्याचे कारण नाही. बोलांचा अर्थ कळण्यासाठी लेखीतले शब्द अर्थातच वापरावे लागतील.

बोली-अभ्यासाचा दुसरा प्रकार म्हणता येईल अशी अहिराणी आणि दक्षिण-गुजराती या बोलींची एकाच कुळातल्या 'भाषाभगिनी' म्हणून तुलना केली आहे. कळत-नकळत अहिराणीला 'भाषा' पदवीला पोचवले आहे. यामागे प्रस्थापित भाषाकुलांच्या संकल्पनेचा प्रभाव आहे. सिंधुसंस्कृतीचे लोक इ०स० पूर्व १९व्या शतकापासून खानदेशात आले याचा आधार परस्परप्रभावासाठी दिला आहे. त्याने भारतीय भाषाकुलाच्या संकल्पनेला छेद मिळतो. सयाजीरावांच्या मराठीसंबंधातील कार्याचा उल्लेख केला आहे त्याचा अहिराणी-गुजराती यांच्या तुलनेत साक्षात संबंध नाही. बोलीविषयक लेखात इतिहास, संस्कृती इत्यादी अनेक बाबींना स्पर्श करणे टाळले पाहिजे. तसेच 'वरील विवेचनावरून अहिराणीने मराठीकडून जशा काही गोष्टी घेतल्या तशा गुजरातीकडूनही घेतल्या. किंबहुना गुजरातीकडून अधिक घेतल्या असे म्हणता येईल' (पृ०३५) यांसारखी अतिव्याप्त विधाने करणे इष्ट नाही.

जामनेरी बोलीवरील लेखाच्या प्रास्ताविकात ही बोली 'आपले काहीएक वेगळेपण आणि स्वतंत्र अस्तित्व' टिकवून आहे असे म्हटले आहे. मुखपृष्ठावरील तक्त्यात मात्र जामनेर लेवा बोलीचा एक मुलूख म्हणून दाखवला आहे. प्रमाण मराठीतील औतचा जामनेरी उच्चार आउत होतो याला 'संयुक्त स्वरांची संधी' म्हटले आहे. 'कृषिजीवनाशी संबंध सांगणार्‍या अनंत म्हणी या बोलीत आहेत' हे अतिशयोक्त विधान आहे. अशा गफलती लेखात आहेत. मायबोलीचा अभिमान हे एक त्याचे कारण संभवते. बोलींना भाषेहून अशुद्ध किंवा खालच्या पायरीवरच्या मानण्याची शिष्टजनांची प्रवृत्ती जशी कमी होत जाईल तशी बोली अभ्यासकांनाही बोलींच्या स्तुतिपर लिहिण्याची गरज वाटणार नाही.

बोलीचे निवळ वर्णन करण्याच्या चौथ्या प्रकारचे उदाहरण 'परिशिष्ट ब - खानदेशी बोलींमधील तुलनात्मक शब्दसंग्रह' या तक्त्यांमध्ये आहे. हे तक्ते सार्वेकरांच्या तेगा पावरा आणि भाईदास बागुल या तृ०व० कला वर्गातल्या विद्यार्थ्यांनी बनवले आहेत. वस्तू, शेती, धान्ये, भाज्या, फळे, नातेसंबंध इत्यादींचे सहा बोलींमधले शब्द त्यांत आहेत. घर - गूँ पोंगो, दरवाजा - बाणों बाणों जुपू, माठ - वेंडलो वेंडलो, मका - डोडा डोडा डुडा, भुईमुग - हिंडयो हिंग्या मुंग्या, आई - आयो याहकी, वडील - आबो बाहाको बाबा, भाऊ - बाहा पावुहू, लवकर - माहारी माहारी उतवाल, ही सहज टिपलेली या बोलीतली खास उदाहरणे. बोलींनी स्वतंत्रपणे निर्माण केलेल्या शब्दांची उदाहरणे यांत दिसतात. या याद्या मर्यादित शब्दसंख्येच्या आहेत. पण त्या बोलीच्या जाणकारांनी नोंदल्या आहेत, तशाच मोठया प्रमाणावर मायबोली-अभ्यासकांनी नोंदल्या तर त्या त्या बोलीची विश्वसनीय नोंद आपल्याला मिळू शकेल. बोलीचे मूळ रूप, तिचे प्राचीनत्व, तिच्यावर झालेले इतर भाषा-बोलींचे परिणाम इत्यादी अभ्यास ही पुढची पायरी असेल. त्यांचा खुटपुट समावेश वर्णनात्मक नोंदीमध्ये करण्याची गरज नाही.

बोलींच्या नोंदी हा पदवीधरांच्या कामाचा भाग झाला. बोलीच्या परिसरातून प्रमाणभाषेच्या पदवीपर्यंत पोचण्यात बोलीकांना न्यूनगंडासारखे मानसिक अडथळे पार करावे लागतात. सार्वेकरांनी त्या (महाविद्यालयीन) विद्यार्थ्यांचा न्यूनगंड घालवण्यासाठी प्रयत्न केले. दहा वर्षे मराठी शाळेत शिकूनही त्यांची क्षमता पुरेशी वाढली नव्हती यावरून माध्यमिक पातळीपर्यंतच्या त्यांच्या शिक्षणाची दशा लक्षात येते. त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियांवरून असे दिसते की भाषेच्या लेखीपणाचाच धसका बोलीकांना जास्त बसतो. पहिली-दुसरीत बोलीतून शिकवून बोलीतल्या शब्द-वाक्यांच्या लेखी रूपांनी लिपीची ओळख करून दिली तर हा धसका कमी होईल का याचा विचार आणि प्रयोगात्मक आचार झाला पाहिजे. या न्यूनगंडातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी बोलींचे शब्दसंग्रह करण्याचे कामही केले आहे. अशा विद्यार्थ्यांशी विद्यापीठातील शिक्षकांचा संपर्क राहावा आणि त्यांनी बोलींच्या अभ्यासात अधिक कामगिरी करावी यासाठी विशेष प्रयत्न व्हायला हवेत. एका लेखात आदिवासी बोलींतल्या म्हणी नोंदल्या आहेत. मार्गदर्शन लाभले तर बोलीक विद्यार्थी त्या म्हणींचा खोल अभ्यास करून बोलीकांचा इतिहास समजण्याला सामग्री देऊ शकतील.

भारतीय भाषा बोलींबाबतचे नोंदीचे किंवा अभ्यासाचे कार्य भारतीय भाषक-बोलीकांनी करणे उचित आणि गरजेचे आहे. विदेशी अभ्यासकांनी इंग्रजीत नोंदलेले अभ्यास प्रमाण मानून त्यांचे संदर्भ भारतीयांनी देण्याचा प्रकार थांबायला हवा. उच्चार नेमके टिपणे, संस्कृतिविषयक अनुबंध समजून घेणे भारतीयांनाच चांगल्या प्रकारे करता येईल. मराठी मुलखातल्या बोलींच्या नोंदी त्या मायबोलीच्या अभ्यासकांनी कराव्या यासाठी विद्यापीठे आणि संशोधनसंस्था यांनी पद्धतशीर प्रयत्न केले पाहिजेत. परिषदा आणि कार्यशाळा वगैरे घेऊन या अभ्यासकांना कामाच्या पद्धती समजावून दिल्या पाहिजेत आणि नोंदी संकलित करणारी यंत्रणा सिद्ध केली पाहिजे.

या पुस्तकावर लिहावे म्हणून संपादकांनी ते माझ्याकडे पाठवले. ते वाचून झाल्यावर पुस्तकात दिलेल्या चलफोनवर मी सार्वेकरांशी सविस्तर बोललो. (संपर्काच्या आधुनिक सोयी!) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मराठीच्या अभ्यासक्रमात बोलींच्या अभ्यासाला महत्त्वाचे स्थान देण्यासाठी त्यांच्या पदावरून ते प्रयत्न करू शकतात असे त्यांच्याकडून कळले. तो त्यांनी करावा, मायबोलींच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाला अधिकाधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि उत्तेजन द्यावे आणि लेखनाच्या बाबतीतही या पुस्तकावर थांबू नये.

374 सिंध सोसायटी, औंध, पुणे 411 007
दूरभाष : (020) 2585 1187

बदलणारी मराठी भाषा

अ०पां० देशपांडे

भाषा दर १० कोसांवर बदलते असे मानतात; तशी ती दर दहा वर्षांनीही बदलते हे का बरे मांडले जात नाही? काळ जसा प्रवाही आहे तशी भाषाही प्रवाही आहे. त्यामुळे जुने रीतीरिवाज, संस्कृती, शिक्षणपद्धती, परिमाणे इ० बदलतात तसतशी जुनी भाषा कालबाह्य होते आणि त्यात आता बदलत्या तंत्रज्ञानाचा झपाटा आला आहे. त्यामुळे ही भाषा बदलते आहे.

दर दहा कोसांवर भाषा बदलते हे वाक्य आजच्या तरुणांना समजतेच असे नाही. कारण कोस म्हणजे काय? दोन मैलांचा एक कोस होतो. पण आता अमेरिका सोडता इतरत्र मैलांचे किलोमीटर झाले. त्यामुळे कोस फारच दूर राहिला. मग आता १० कोसांचे रूपांतर करून भाषा दर ३२ कि०मी० वर बदलते असे म्हणायचे का? शिवाय मैल या एका संज्ञेवरून आपण त्याचा विविध प्रकारे वापर करत आलो त्याचे काय करणार? त्यास अजून तरी पर्याय आले नाहीत. उदा० मोटारगाडीत, आगगाडीत, विमानात वेग मोजण्यासाठी जे मीटर वापरतात त्याला मायलोमीटर म्हणतात. दर ताशी किती मैलांचे काहीही होवो हा मीटर मायलोमीटरच राहील? उदा० एकेकाळी मुंबई-पुणे डाक घोड्यावरून जाई. मुंबईहून सुटलेला घोडा बदलून दुसरा घोडा वापरला जाई. अशा जागेला त्या वेळी बदलापूर (कल्याण-कर्जत दरम्यान असलेले गाव, रेल्वेस्थानक इ०) म्हणत. आज डाक पाठवण्याचे मार्ग बदलले तरी गावाचे नाव बदलापूरच राहिले. तसे मैल गेले तरी मायलोमीटर हे नाव तसेच चालू ठेवावे का? मैलावरून वापरला जाणारा वाक्प्रचार म्हणजे माईलस्टोन हा आहे. अंतर दर्शविण्यासाठी रस्त्यावर मैलांचे दगड उर्फ माईलस्टोन असतात. आता मैल गेल्यावर ते मैलाचेच दगड राहणार का? शिवाय संस्थेच्या आयुष्यात, माणसाच्या आयुष्यात, विज्ञानाच्या इतिहासात काही महत्त्वाच्या घटना घडतात त्याला आपण मैलांचे दगड म्हणतो. उदा० चाकाचा शोध हा वैज्ञानिक क्रांतीतील मैलाचा दगड आहे असे मानतात. मी मैलो न मैल चालत गेलो (म्हणजे खूप लांबवर चालत गेलो) किंवा इंग्रजीत माइलेज असा शब्द व त्यावरून रुळलेला शब्दप्रयोगही आहे. उदा० एखाद्याला एसएससीच्या यशामुळे खूप माइलेज मिळाले असे आपण म्हणतो.

फूट, इंच, यार्ड ही परिमाणे आपण मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटरमध्ये बदलल्याने यांवरून पडलेली भाषा गेली. अगदी वसंत बापटांची इंच इंच लढवू छातीही गेली. इंग्रजीतील एक छान उध्दृत आठवले, 'दोज हू स्पीक इन यार्ड्स अँड मूव्ह इन इंचेस, बी टिन्टेड विथ फूट', 'ए, तू आता इथून फूट' हेही गेले.

दुसरी गोष्ट - फार पूर्वी छोट्या वजनांसाठी गुंजा, मासा वापरीत आणि तोळाही. (१६ गुंज = १ तोळा, ९६ तोळे = १ शेर (अंदाजे १ किलो). वैद्यलोक पूर्वी ही मापे औषधे देताना वापरत. त्यामुळे ती भाषा त्यांच्या तोंडात होती. त्यावरून एखाद्या रुग्णाची तब्येत खूप नाजूक झाली असेल तर त्याचे वर्णन अमूक एखाद्या रुग्णाची तब्येत तोळा-मासा झाली आहे, असे म्हणत. आता गुंज फक्त पाहायला मिळत असल्याने दारू प्यायलेल्या माणसाचे डोळे गुंजेसारखे लाल झाले असे म्हटले तर म्हणणार्‍यालाच दारूबाज म्हणेल, तू काय म्हणतोस ते मला समजत नाही. तू काही गांजा-भांग घेतली आहेस का? पावशेर किंवा पाव किलो वा पाव लिटर, पाव म्हणजे एक चतुर्थांश राहिले पण पावावरून अदपाव (अर्धा पाव) आणि छटाक (पावचा पाव अथवा पावाचा एक चतुर्थांश) ही मापे गेली. पण पूर्वी दारू पिऊन आलेल्याला काय रे पावशेर मारून आला का म्हणत, तेही गेले.

१६ आणे = एक रुपया होता. त्यावरून डॉक्टर, वैद्य एखाद्याची तब्येत ५० टक्के बरी झाली म्हणायच्या ऐवजी आठ आणे सुधारली म्हणत. एखाद्याचे काम १०० टक्के झाले की १६ आणे काम फत्ते म्हणत. दुष्काळामुळे ७५ टक्के पीक गेले तर ४ आणे पीक वाचले म्हणत.
तंत्रज्ञानामुळे जुन्या गोष्टी संपून नव्या आल्या. जसे कार्बन पेपर जाऊन आता झेरॉक्स आले तेव्हा अमूक एक माणूस दुसर्‍यासारखाच आहे असे म्हणताना तो त्याची कार्बन कॉपी आहे असे आपण म्हणत असू. कॉपिंग पेन्सिल गेली. सायक्लोस्टाइलिंग गेले. टाइपरायटर कॉम्प्युटरवर चढला पण टाइपरायटरची ओळ संपत येताना घंटा वाजे ती घंटाही गेली.

न०चिं० केळकरांची एकसष्टी साजरी झाली तेव्हा 'मी आता म्हातारा झालो' म्हणायच्याऐवजी 'मला आता टाईपरायटरची घंटा ऐकू येऊ लागली', असे ते म्हणाले होते.

तसेच ५०-१०० वर्षांपूर्वीचे साहित्य आणि त्यांचे लेखकही कालबाह्य झाले. एका मुलाच्या घरी त्याला पाहायला माणसे आली. मुलाचे वडील बाहेर गेले होते. दरम्यान काकांनी कारभार सांभाळला. मुलाचे वडील आल्यावर ते पाहुण्यांना म्हणाले, 'हाच मुलाचा बाप!' सर्व हसले. पण छोटयांना मामा वरेरकरांचे या नावाचे नाटक होते हे काय माहीत?

अशी जुनी भाषा कालबाह्य होताना पोकळी राहत नाही. नवी भाषा, नवे तंत्रज्ञान, नवे रीतिरिवाज त्यात डोकावतात. उदा० आजची मुले तुझा फंडा क्लिअर नाही म्हणतात. उशिरा लक्षात येणार्‍याला, त्याची टयुबलाईट आता फकफकली म्हणतात.

प्रसिद्ध विचारवंत आणि लेखक डॉ० स०ह० देशपांडे यांच्या लिखाणात काही जुने शब्द आवर्जून येतात. एकदा मी त्यांना विचारलेसुद्धा की हे सध्या लोकांना न समजणारे शब्द तुम्ही का वापरता? तर ते म्हणाले, असे शब्द कुणीच वापरले नाहीत तर ते चलनातून निघून जातील.

याचा अर्थ भाषेसारखा मोठा विषय पण तो अगदी त्या-त्या भागापुरता, त्या-त्या काळापुरता, त्या-त्या जातीपुरता, त्या-त्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक पातळीपुरता राहतो की शेवटी तो सांकेतिक ठरतो अशी शंका यावी.

भाषेची मुळं लोकजीवनात!

विजया देव

आपली भाषा ही काही आपल्यापेक्षा कुणी वेगळी वस्तू नसते किंवा ती व्यवहाराचं निर्जीव साधन नसते. आपणच आपल्या जीवनातून तिला घडवत असतो. अनुभवाच्या बारीकसारीक अर्थछटा सुचवायला आपल्याला वेगवेगळे शब्द लागतात, आपल्या भोवतालची सर्व वस्तुजात त्यातल्या बारकाव्यांनिशी टिपण्यासाठी आपण नेमके शब्द शोधत असतो. उदाहरणार्थ, 'रवाळ', 'कणीदार', 'भरड', 'जाडसर' असे शब्द काही नुसत्या शब्द घडवणार्‍या सोसातून निर्माण झालेले नसतात. त्या पदार्थांचा नेमका गुणधर्म, पोत, स्पर्श, दृश्यरूप असं सगळं विचारात घेऊन ते भाषेत येतात आणि तो अर्थ समजून ते वापरले तर कृतीचं सार्थक होतं. नाहीतर 'आणि अमुक मिक्सीवर बारीक करून घ्यावं.' या सूचनेतून काय बोध होणार?

पण काळाच्या रेट्याची आणि माहितीप्रपाताची सबब सांगून आपणच नेमकेपणाला, योग्य पर्याय शोधण्याला तिलांजली देऊन काम भागवत असतो. मग सुरू होतं भाषेचं सपाटीकरण. प्रसारमाध्यमांच्या भाषेत, वृत्तपत्रीय लेखनात तर असे सरधोपट, मोघमपणाने वापरलेले शब्द जागोजाग भेटत राहतात. शब्दांचा असा अनादर करणारा ढिसाळ वापर वाचकांच्या लक्षात येत नाही असं नाही, पण वाचकच समजूतदारपणाने 'म्हणजे लेखकाला असं म्हणायचं असावं' अशी सूट देऊन टाकतो. कारण वाचकालाही बरंच काही वाचायचा रेटा असतोच.

अलीकडेच एका वृत्तपत्रीय पुरवणीत असाच एक शब्द निरागसपणे चुकीच्या अर्थाने वापरलेला आढळला आणि भाषाअभ्यासक म्हणून या निमित्ताने मी लिहिती झाले.
लेख आहे पिस्त्यांची शिफारस करणारा (सेहत के वास्ते, खाओ पिस्ते, शुभदा रानडे, लोकसत्ता पुरवणी, गुरुवार १९ नोव्हेंबर २००९). लेख मराठीतला, त्याविषयीची माहिती इंग्रजीतून घेतलेली असावी आणि शीर्षक हिंदी! पण ते असो!

वजन घटवण्यासाठी आणि पोषक आहारमूल्यं मिळवण्यासाठी पिस्त्यांची बरीच शिफारस या लेखात केलेली आहे. त्यात पिस्त्यांची वर्गवारी 'सालं काढलेले' आणि 'सालीसकट' अशी केलेली आहे. डॉ० पेंटर यांनी सालं काढलेल्या आणि सालींसकट अशा दोन्ही प्रकारच्या पिस्त्यांचा अभ्यास केला. 'सालींसकट पिस्ते खायला दिले की पिस्ते ४५% कमी खाल्ले जातात कारण सालं काढण्यात वेळ जातो. तेच सालांशिवाय पिस्ते दिले तर जास्त प्रमाणात पिस्ते खाल्ले जातात.' वगैरे वगैरे.

हे वाचून लक्षात आलं की लेखिकेला इथे 'साल' नसून 'टरफल' अभिप्रेत आहे. साल आणि टरफल ही दोन्ही आवरणं असली तरी त्या दोन्हींमध्ये खूप फरक आहे. हा फरक समजून न घेता लेखिकेनं 'टरफल' हा शब्द गावीही नसल्यासारखा सर्रास 'साल' या शब्दाचा उपयोग केला आहे. टरफल हा शब्द आणि त्याचा अर्थ उपयोग माहीत नसेल असे नाही, पण इंग्रजीतून घेतलेल्या माहितीचं मराठीकरण करताना शब्दांच्या निवडीबद्दल आळस केला गेला असावा. वास्तविक या लेखासोबत टरफलासहित पिस्त्यांचं ठळक चित्र आहे. साल म्हटलं काय, टरफल म्हटलं काय, लक्षात येतंय ना, असा दृष्टिकोन असला तरी पिस्त्याला अंगची सालही असतेच, आणि वर कठीण टरफल असतं. आपण टरफल काढून पिस्ते खातो, साल काढून नव्हे. वेगळे शब्द हे पदार्थाच्या भिन्न गुणधर्मासाठीच योजलेले असतात. साल हे फळांचं अंगचं आवरण असतं. उदा० चिकूची साल, केळ्याची साल. ती फळाच्या गरालगत मऊ, नरम असते. ती सोलून किंवा साल काढण्याच्या यंत्रानं काढता येते. कच्च्या बटाट्याची साल आपण यंत्रानं सोलतो, उकडलेल्या बटाट्याची साल सहज सुटते, बदामाला अंगची साल असते, बदाम भिजवले की ती सोलता येते. तशीच पिस्त्यालाही असते, पण त्यावर जे कठीण आवरण असतं ते त्याचं टरफल; साल नव्हे. भुईमुगाच्या शेंगांच्या टरफलांबद्दलची लोकमान्य टिळकांच्या विद्यार्थिदशेतील गोष्ट प्रसिद्धच आहे. शेंगांमधले दाणे काढून मुलांनी टरफलं वर्गात टाकली होती, ती काही भाजलेल्या दाण्यांची सालं नव्हती.

टरफलापेक्षा कठीण असेल ते कवच. बदामाचं कवच, ते फोडून निघते ती बदाम बी. पूजेत लागतात ते अख्खे बदाम, म्हणजे कवचासहित बदाम. नारळ, कवठ ही आणखी कठीण कवचांची फळं. साल आपण सोलतो, टरफल आपण काढतो आणि कवच फोडावंच लागतं. नारळाला बिचार्‍याला साल नसते. करवंटीपासून सुटलेली वाटी (ओल्या नारळाची किंवा सुक्या खोबर्‍याची) किसणीवर धरून किसली तर खाली पांढराशुभ्र कीस पडतो, आणि किसणीवर हातात राहते ती 'पाठ', साल नव्हे. या नारळाच्या नावांची गंमतही बघा. मानानं द्यायचं ते श्रीफल, पूजेसाठी असोला नारळ, पाणीवालं शहाळं, ओल्या खोबर्‍याचा तो नारळ आणि करवंटीपासून सुटून गोटा झाला की सुकं खोबरं (आणि 'सुकं'च, 'वाळलेलं' नव्हे.)
आपल्या प्रदेशातलं हवामान, निसर्ग जे आपल्याला देतो, ज्या वनस्पती तिथे वाढतात त्या आपल्या आहाराचा भाग बनतात. ऋतुमान आणि पदार्थांचा गुणधर्म पाहून आपण त्यांचा आहारात वापर करतो, मग त्या गोष्टींना स्वतंत्र नाव देणं आलंच. नारळ हा एक प्रमुख घटक, म्हणून त्याच्या वेगवेगळ्या अवस्थांना वेगवेगळी नावं. पण ज्या हवामानात वाढणारं हे झाड नव्हे, तिथे त्या प्रदेशात तो आहाराचा भागही नव्हे. म्हणून त्या प्रदेशातल्या भाषेत नारळाला एवढी नावंही नाहीत. उदाहरणार्थ, उत्तरेत, हिंदीत ओल्या नारळाला, शहाळ्याला, सुक्या खोबर्‍याला वेगवेगळे शब्द नाहीतच. 'नारियल' या शब्दातच सगळं सामावतं. यापेक्षा वेगळी गंमत मल्याळी भाषेत दिसते. मल्याळममध्ये नारळाला 'नालिगेरम्' आणि शहाळ्याला 'एळनीर' म्हणतात. पण सुके खोबरे हा आहाराचा भाग नसल्यामुळे त्याला शब्द नाही. गरजच पडली तर 'कोपरा' म्हणून काम भागवलं जातं. पण तो मल्याळममधला शब्द नव्हे. या एकाच वस्तूची कालमानानुसार पक्व झालेली तीन वेगवेगळी रूपं आणि त्यासाठी वेगवेगळे शब्द, मला वाटतं, फक्त मराठीतच दिसतात.
फळ म्हटलं की त्यात बी आलीच. (बिनबियांची द्राक्षं आणि बिनबियांची पपई सोडून देऊ.) त्यांना सरसकट बिया म्हटलं जात असलं तरी काही फळं मात्र आपलं स्वत्व आणि सत्त्व वेगळं राखतात. चिकू, जांभूळ, पेरू यांच्या त्या बिया, पण आंब्याची मात्र बाठ किंवा कोय; फणसाची आठळी आणि चिंचेचा चिंचोका.

उसाला बिचार्‍याला बीच नाही, त्याच्या पेराशी असतात 'डोळे'. तिथूनच तो रुजतो आणि उसाला खालीवर असतात शेंडे-बुडखे. एखाद्या गोष्टीला शेंडा बुडखा नसणं हा वाक्प्रचार त्या उसावरूनच आलेला आहे. उसाच्या तळाचा भाग तो बुडखा आणि वरचा तो शेंडा. हा आगापिछा ज्या गोष्टीला नाही तिच्यावर विश्वास कसा ठेवणार?

भाषेचा बुडखा, भाषेची मुळं तर परंपरेत, लोकजीवनात, संस्कृतीत खोलवर रुजलेली असतात. त्यांच्यातून सत्त्व घेऊनच मोकळ्या वातावरणात तिला नव्या आविष्काराचे नवे शेंडे, धुमारे, फुटत असतात, विस्तारत असतात. एवढ्यासाठीच भाषेकडे 'डोळस' दृष्टीनं पाहायला हवं. तरच भाषेची गोडी चाखता येईल.

सुप्रिया, 61/14 एरंडवणे, प्रभात रोड, 14वी गल्ली
इन्कमटॅक्स ऑफिसजवळ, पुणे 411 004
भ्रमणभाष : 094230 09522

Pages