भाषा आणि जीवन
आवाहन
१. टपालाने पाठविलेल्या अंकांतील काही अंक गहाळ होतात हा नेहमीचा अनुभव आहे. शक्यतो अंक पुन्हा पाठविला जातो. पण जेव्हा या तक्रारींची संख्या जास्त असते तेव्हा अंक पुन्हा पाठवणेही कठीण होते. पुण्याच्या काही भागांतून - विशेषत: बिबवेवाडी, सिंहगड मार्ग - या भागांतून तक्रारी खूप येतात. यामुळे अंकाची प्रत व टपालखर्च असे दुहेरी नुकसान होते. म्हणून जे सभासद/वर्गणीदार/कुरियर-सेवेचे वर्षाला रु० ४०/- पाठवतील त्यांना अंक कुरियर-सेवेने पाठविला जाईल. ही व्यवस्था हिवाळा २०११ (जानेवारी २०११) अंकापासून करण्यात येईल. कृपया याची नोंद घ्यावी.
२. वर्गणी मनिऑर्डरने पाठवू नये अशी मुद्रित सूचना देऊनही वर्गण्या मनिऑर्डरने येत राहतात आणि त्यामुळे बरीच गैरसोय व गैरसमज होतात. वर्गणी भरण्याचा सोपा मार्ग म्हणजे महाराष्ट्र बँकेच्या कुठल्याही शाखेत मराठी अभ्यास परिषदेच्या महाराष्ट्र बँकेतील (टिळक मार्ग शाखा, पुणे) बचत खाते क्र० २००५७१६४२६० या खात्यात वर्गणी भरणे व आमच्याकडे पैसे भरल्याचे चलन पाठवणे. चलनावर स्वत:चे नाव, पत्ता लिहिण्यास व चलनाची छायाप्रत स्वत:कडे ठेवण्यास विसरू नये.
आदरांजली
मराठी भाषेत व मराठी भाषेबद्दल महत्त्वपूर्ण लेखन करणारे पुढील नामवंत साहित्यिक अलीकडेच कालवश झाले.
गो०वि० ऊर्फ विंदा करंदीकर
संस्थेचे आजीव सभासद व हितचिंतक ग०प्र० प्रधान
तारा वनारसे
मं०वि० राजाध्यक्ष
बाळ गाडगीळ
वि०म० कुलकर्णी
(विश्वचरित्र-कोशकार) श्रीराम पांडुरंग कामत.
परिषदेचे अनेक वर्षे सभासद असलेले राजकीय व सामाजिक कार्यकर्ते रा०प० नेने आणि
परिषदेला ज्यांनी अडचणीच्या काळात मदत केली असे स०म० गोळवलकर हेही काही दिवसांपूर्वी कालवश झाले.
ह्या सर्वांना मराठी अभ्यास परिषद व ‘भाषा आणि जीवन’ ह्यांच्यातर्फे आदरांजली वाहण्यात येत आहे.
लेखक-परिचय
कोल्हटकर अरविंद : पुणे विद्यापीठातून गणित या विषयात एम्०ए० पदवी (१९६४). रशियन भाषेचे प्रमाणपत्र व पदविका प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण (१९६५). केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण (१९६५). आयकर विभागातून आयुक्त पदावरून स्वेच्छानिवृत्ती. बाँबे स्टॉक एक्स्चेंजचे चिटणीस म्हणून काही काळ काम. आता टोरांटो (कॅनडा)मध्ये स्थायिक. भारतीय भाषा व संस्कृती या विषयांवर विविध संकेतस्थळांवर प्रसंगोपात्त लेखन. Kolhatkar.org हे स्वतःचे संकेतस्थळ.
खैरे विश्वनाथ : केंद्रीय बांधकाम खात्यातून मुख्य अभियंता म्हणून निवृत्त. संस्कृत, मराठी व तमिळ ('संमत') या भाषांच्या परस्परसंबंधांचा विशेष अभ्यास. प्राचीन मिथ्यकथा, प्राचीन भारतीय संस्कृती व परंपरा या विषयांसंबधी लेखन. पुस्तकांना शासनाची पारितोषिके.
गुंडी (डॉ०) नीलिमा - स०प० कनिष्ठ महाविद्यालयात उपप्राचार्य, कविता, ललित व वैचारिक लेख, समीक्षा, संपादन ह्या प्रकारांतील बारा पुस्तके प्रकाशित. लेखनाबद्दल दोन राज्यपुरस्कार. 'लाटांचे मनोगत' हे स्त्रीकाव्याचा चिकित्सक अभ्यास करणारे पुस्तक. 'कविता विसाव्या शतकाची' व 'भारतीय भाषांतील स्त्रीसाहित्याचा मागोवा (खंड १ व २)' ह्यांच्या संपादनात सहभाग. राज्यस्तरीय, राष्ट्रीय चर्चासत्रांमधून निबंध सादर. सुमारे पाचशे पुस्तकांचे परीक्षण.
जोगळेकर हेमंत गोविंद : मुंबई आयआयटीमधून रासायनिक अभियांत्रिकीमध्ये पदवी. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथून वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून निवृत्त. 'होड्या' (१९८५), 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा' (विडंबन कविता), 'मनातले घर' (१९९५), 'उघडे पुस्तक' (२००७), हे कवितासंग्रह प्रकाशित. केशवसुत व बालकवी पुरस्कार. इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, पंजाबी व असमिया इ० भाषांत कवितांची भाषांतरे. 'कविता दशकाची', कविता विसाव्या शतकाची', 'स्वातंत्र्योत्तर मराठी कविता - १९६० ते ८०' व 'अक्षर दिवाळी - १९८०, ८१, ८२, ८३, ८४, ८५' या प्रातिनिधिक संग्रहात कवितांचा समावेश.
देव (डॉ०) विजया : भाषाविज्ञानात एम०ए०,पीएच०डी०, मराठीमध्येही एम०ए०, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात अधिव्याख्याता. दोन अनुवादित व एक संपादित अशी तीन पुस्तके प्रकाशित. अंधांसाठी मराठी साहित्यकृतींचे ध्वनिमुद्रण. ललित व संशोधनपर लेखन.
देवळेकर, सुशान्त : एम०ए० (मराठी), सध्या राज्य मराठी विकास संस्था (मुंबई) येथे कनिष्ठ संशोधन-साहाय्यक ह्या पदावर कार्यरत. २००२-०८ ह्या काळात भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) (मुंबई) येथील भारतीय भाषा केंद्रात भाषातज्ज्ञ म्हणून सेवेत. मराठी शाब्दबंध हा शब्दार्थसंबंध दाखवणारा कोश, मराठी शब्दरूपांचे विश्लेषण करणारी रूपविश्लेषक ही संगणक प्रणाली विकसित करण्यात सहभाग. संगणकावर युनिकोड वापरून मराठीत काम कसे करता येईल हे समजावून देणार्या कार्यशाळांत मार्गदर्शन.
देशपांडे (डॉ०) ब्रह्मानंद : महामहोपाध्याय, विद्याभूषण, प्राचीन मराठी वाङ्मयाचे व्यासंगी संशोधक. 'देवगिरीचे यादव', 'शोधमुद्रा' इ० पुस्तके प्रकाशित.
परांजपे (प्रा०) प्र०ना० : एम०ए०,पी०जी०डी०टी०इ०,एम०लिट० रामनारायण रुइया महाविद्यालय, मुंबई येथे इंग्रजीचे १५ वर्षे आणि पुणे विद्यापीठात वृत्तपत्र-विद्येचे २० वर्षे अध्यापन. एक कथासंग्रह, तीन भाषांतरे, पाच संपादने, पाच सहसंपादने व एक सहलेखन अशी १५ पुस्तके प्रकाशित. याव्यतिरिक्त दहा पुस्तकांत लेख समाविष्ट. संगीत नाटक स्पर्धेत लेखनाबद्दल महाराष्ट्र शासनाचे प्रथम पारितोषिक.
पाध्ये विजय : पुण्यातील तीन उद्योगसमूहांमध्ये विविध उच्च पदांवर ३२ वर्षे नोकरी. १९९८पासून उद्योग समूहांच्या गृहपत्रिकांचे संपादन. अभियांत्रिकी, मानव संसाधन, औद्योगिक संबंध, विकृतिशास्त्र, दूरसंचार इ० क्षेत्रांतील इंग्रजीतील दस्तऐवजांचे मराठीत भाषांतर करण्याचा व्यवसाय.
फडके रंजना :वाडिया महाविद्यालयात अध्यापन. कवयित्री. अनेक संस्थांमध्ये सहभाग.
बर्नसन (डॉ०) मॅक्सीन : अमेरिकेत जन्म, भारतीय नागरिकत्व. 'फलटणमधील मराठी' या विषयावर पेन्सिल्वानिया विद्यापीठाची भाषाविज्ञानातील पीएच०डी० (१९७३). जाई निंबकर यांच्या सहकार्याने विदेशी विद्यार्थ्यांसाठी मराठीची दहा पुस्तके. फलटण येथील 'प्रगत शिक्षण संस्थे'च्या संस्थापक व संचालक. साने गुरुजी, पाध्ये, पद्मजा, राणी बंग इ० पुरस्कारांच्या मानकरी.
भामरे प्रकाश अर्जुन : एम०ए०,बी०एड०,एम०फिल०, सेट व नेट परीक्षा उत्तीर्ण. मराठी विभागप्रमुख, ग०तु० पाटील महाविद्यालय, नंदुरबार. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सभासद. प्रथम व द्वितीय वर्ष, कला आणि प्रथम वर्ष, वाणिज्य यांसाठीच्या पाठयपुस्तक संपादन मंडळांचे सभासद.
मोहनी दिवाकर : मुद्रणतज्ज्ञ, लिपीतज्ज्ञ. विवेकवादाला वाहिलेल्या 'आजचा सुधारक' ह्या नियतकालिकाच्या संपादक-मंडळाचे सदस्य.
वाघ सलील : बंगळुरू व मुंबई येथील काही जाहिरात कंपन्यांमध्ये स्टूडियो मॅनेजर म्हणून व 'स्प्रिंगर' ह्या आंतरराष्ट्रीय प्रकाशनगृहात विभाग-प्रमुख म्हणून नोकरी केल्यानंतर आता संगणकीय मुद्रायोजन व तांत्रिक सेवा देण्याच्या स्वतंत्र व्यवसायात. 'रेसकोर्स आणि इतर कविता'सह एकूण चार कवितासंग्रह प्रकाशित. शमशेर बहादूर सिंह ह्यांच्या हिंदी कवितांचा मराठीत परिचय करून देणारे पुस्तक प्रकाशित. अनुष्टुभ, कवितारती, परिवर्तनाचा वाटसरू, नवाक्षरदर्शन, खेळ, कालनिर्णय ह्यांसह अनेक नियतकालिकांतून व वर्तमानपत्रांतून कविता प्रसिद्ध. २००६चा पहिला 'शब्दवेध' सन्मान प्राप्त. कवितांचे इंग्रजी, हिंदी व मणिपुरी भाषांत अनुवाद प्रसिद्ध. रॅडिकल ह्यूमनिस्ट चळवळीशी संबंधित.
सामंत मेघना : सर जे०जे० उपयोजित कलासंस्थेमधून पदवी. गेली पाच वर्षे ग्रामीण भागातील मुलांच्या आणि प्रौढांच्या अनौपचारिक शिक्षणासाठी विविध माध्यमांत शैक्षणिक साहित्याची निर्मिती. त्याआधी सात वर्षे प्रसार माध्यमांत पत्रकार.
डॉ० वि०बा० प्रभुदेसाई ह्यांच्याबरोबर अनौपचारिक गप्पा
विजय पाध्ये
ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व नागपूर विद्यापीठाचे भूतपूर्व मराठी विभाग प्रमुख डॉ० वि०बा० प्रभुदेसाई हे मूळचे गोव्याचे व सेवानिवृत्तीनंतर मडगाव येथे स्थायिक झालेले. त्यांच्या पुण्याच्या भेटीदरम्यान मराठी अभ्यास परिषदेने दि० २ जून २०१० रोजी अनौपचारिक गप्पांचा एक कार्यक्रम आयोजित केला. आपल्या प्रास्ताविकात परिषदेचे सहकार्यवाह श्री० विजय पाध्ये ह्यांनी, प्रस्तुत कार्यक्रम जरी अनौपचारिक गप्पा ह्या स्वरूपाचा असला तरी महाराष्ट्र शासनाने अलीकडेच जाहीर केलेल्या सांस्कृतिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर गोवा शासनातर्फे राबविले जाणारे सांस्कृतिक धोरण कशा स्वरूपाचे आहे हे जाणून घेण्याची उपस्थितांची इच्छा आहे आणि त्या अनुषंगाने माहिती मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
डॉ० प्रभुदेसाई ह्यांनी उपस्थितांसाठी प्रथम आपल्या आजवरच्या एकूण कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेतला. त्यानंतर, गोवा शासन सांस्कृतिक उपक्रमांबाबत अतिशय उदार धोरण ठेवून असल्याचे सांगितले व शासनातर्फे तसेच शासनेतर संस्थांद्वारेही दिल्या जाणार्या विविध पुरस्कारांची माहिती दिली. कला अकादमीतर्फे गोव्याच्या कीर्तीत बहुमोल भर घालणार्या गोमंतक साहित्यिकांना गोमंत शारदा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते; मराठीतील एक व कोंकणीतील एक (देवनागरी किंवा रोमन लिपीतील) उत्कृष्ट साहित्यकृतीबद्दल लेखकांना प्रत्येकी २५,००० रुपयांचा रोख पुरस्कार दिला जातो. गोमंतक मराठी अकादमीतर्फे मराठी भाषा, साहित्य, नाटक, संगीत, चित्रकला, समीक्षा, संशोधन, प्रकाशन इत्यादी क्षेत्रांतील विविधांगी उपक्रम राबविले जातात. गोवा कोंकणी अकादमीतर्फे कोंकणी साहित्य पुरस्कार, कोंकणी भाषा सेवा पुरस्कार अशा दोन प्रकारचे पुरस्कार दिले जातात. कोंकणी भाषा सेवा पुरस्कार विभागात कोंकणी साहित्यातील लक्षणीय कार्य केलेल्या ४० वर्षे वयापर्यंतच्या दोन व्यक्तींना प्रत्येकी १५,००० रुपयांचे, तर शणे गोंयबाब कोंकणी भाषा सेवा पुरस्कार व माधव मंजुनाथ शानभाग कोंकणी भाषा सेवा पुरस्कार हे कोंकणी भाषेच्या विविध क्षेत्रांतील बहुमोल योगदानासाठी ५० वर्षे वयापुढील व्यक्तींना प्रत्येकी २५,००० रुपयांचे रोख पुरस्कार दिले जातात. शिवाय, कोंकणी भाषेसाठी लक्षणीय काम करणार्या संस्थेस २५,००० रुपयांचा कोंकणी भाषा सेवा संस्था पुरस्कार दिला जातो. एकंदरीत, साहित्यसंशोधनाच्या कार्यास प्रोत्साहन देणे हाही गोवा शासनाच्या सांस्कृतिक धोरणाचा महत्त्वाचा भाग असल्याचे दिसून येते असे त्यांनी सांगितले.
गोवा शासनाच्या कला व संस्कृती संचालनालयाची कामगिरीही लक्षणीय असल्याचे सांगून डॉ० प्रभुदेसाई ह्यांनी काही तपशील पुरवले. भारतीय अभिजात संगीत, गायन, वादन, नृत्य, नाटयक्षेत्र, ‘तियात्र’ (ख्रिस्ती कलाकारांची रंगभूमी), चित्रकला, लोककला, छायाचित्रण, कोंकणी व मराठी साहित्य, कीर्तन, भजन, हस्तकला वगैरे क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी करणार्या गोमंतकीय नागरिकांना उत्तेजन देण्याच्या उद्देशाने संचालनालयातर्फे दरवर्षी १६ राज्य सांस्कृतिक पुरस्कार, ८ युवा सृजन पुरस्कार (नवसर्जन चेतना पुरस्कार), एक उत्कृष्ट सांस्कृतिक संस्था पुरस्कार, ६० कला गौरव पुरस्कार असे विविध पुरस्कार देण्यात येतात. शिवाय, राज्य पातळीवरील एक उत्कृष्ट वाचनालय पुरस्कार व एक उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. शासनातर्फे गोमंतकीय थोर सुपुत्र व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अणुशास्त्रज्ञ डॉ० अनिल काकोडकर ह्यांना गोमंत-विभूषण २०१० असा किताब देऊन अलीकडेच गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ० मृणालिनी शहा ह्यांनी सदर कार्यक्रमाद्वारे अतिशय उद्बोधक माहिती दिल्याबद्दल डॉ० प्रभुदेसाईंचे आभार मानले व डॉ० कल्याण काळे ह्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला.
4 चित्रा 'बी', विद्यासागर सोसायटी, बिबवेवाडी, पुणे 411 037
दूरभाष : (020)2441 1951
भ्रमणभाष : 098220 31963
ई-पत्ता : v.wordsmith@gmail.com
परिषदेचा वर्धापन-दिन
रंजना फडके
१ मे हा महाराष्ट्रदिन आणि मराठी अभ्यास परिषदेचा वर्धापनदिन. ह्या दोन्हीचे औचित्य साधून मराठी अभ्यास परिषदेने 'मराठी कवितेची बदलती भाषा' ह्या विषयावर एक परिसंवाद आयोजित केला होता.
महाराष्ट्रातील ख्यातनाम कादंबरीकार, समीक्षक, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी प्रा० वसंत आबाजी डहाके ह्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ह्या परिसंवादामध्ये शास्त्रज्ञ व कवी श्री० हेमंत जोगळेकर, भाषा-अभ्यासक व कवी श्री० सलील वाघ, ज्येष्ठ कवयित्री व पुण्याच्या स०प० कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ० नीलिमा गुंडी, पुणे विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख, समीक्षक व कवी डॉ० मनोहर जाधव हे मान्यवर सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी अभ्यास परिषदेच्या वतीने ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कविवर्य विंदा करंदीकर आणि भाषाविवेक शिकविणारे ज्येष्ठ समीक्षक डॉ० मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष ह्या अलीकडेच दिवंगत झालेल्या दोघा आदरणीय व्यक्तींना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर मराठी अभ्यास परिषदेचे अध्यक्ष प्रा० प्र०ना० परांजपे ह्यांनी परिसंवादात सहभागी होणार्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्याचप्रमाणे आपल्या प्रास्ताविकात परिषदेच्या उपक्रमांची माहिती देऊन प्रस्तुत परिसंवादाचा हेतू विशद केला.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या कविवर्य हेमंत जोगळेकर, सलील वाघ, डॉ० मनोहर जाधव व डॉ० नीलिमा गुंडी ह्यांनी कवितेच्या बदलत्या भाषेसंबंधी असलेल्या आपापल्या भूमिका मांडल्या. कवितेची एकच ठाम भाषा नसते. समाजात होणारे बदल त्यातून व्यक्त होतात, त्यामुळे समाजाच्या स्थितिगतीचा आलेख कवितेतून रेखाटला जातो. भाषा समजून घेताना त्यातील शब्दांमागील अर्थ लक्षात घ्यायला हवा. विद्यार्थीविश्व, कॉर्पोरेट विश्व, तसेच स्त्रीचे बदलते विश्व आणि त्या अनुषंगाने बदलणारी भाषा ह्याची अनेक उदाहरणे देऊन कवितेतील भाषा चाकोरीबाहेर पडते आहे असे प्रतिपादन प्रामुख्याने ह्या प्रसंगी व्यक्त करण्यात आले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्रा० डहाके ह्यांनी, बदलत्या काळानुसार कवितेमध्येही भाषांचे वेगवेगळे स्वरूप दिसते आहे. ही कवितेतील भाषासमृद्धी म्हणायची की अतिरेक, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि कवींनी सारासार विवेक बाळगला पाहिजे असेही मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा० रंजना फडके ह्यांनी केले, तर परिसंवादात सहभागी झालेल्या मान्यवरांचा परिचय श्रीमती विजया चौधरी ह्यांनी करून दिला.
५ सायली अपार्टमेंट्स, श्रीरंग सोसायटी, बिबवेवाडी, पुणे 411 037
दूरभाष : (020)2421 0985
भ्रमणभाष : 093710 91442
ई-पत्ता : ranjanaphadke2010@gmail.com
अठरा विश्वे
(१)
शं० दे० पसारकर
'अठरा विश्वे' या शब्दप्रयोगाविषयी डॉ० ब्रह्मानंद देशपांडे यांचा लेख (भाषा आणि जीवन, पावसाळा २००९), आणि त्यावरील श्री०न० गुत्तीकर (हिवाळा २०१०) व विजय पाध्ये (उन्हाळा २०१०) यांच्या प्रतिक्रिया वाचल्या. याविषयीची जुनीच माहिती या ठिकाणी जिज्ञासू वाचकांसाठी नव्याने देत आहे.
'इसा' म्हणजे वीस वीस या संख्येचे गट (जोशी प्र०न० १९८२ : आदर्श मराठी शब्दकोश. विदर्भ मराठवाडा बुक कंपनी, पुणे ६७). या शब्दाचे कृत्रिम संस्कृतीकरण म्हणजे 'विश्व'. 'गुंडम राउळ' यांना 'गोविंदप्रभू' किंवा 'अक्कलकोट' या गावाला 'प्रज्ञापूर' संबोधणे, अशापैकीच हा प्रकार. 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
डॉ० नरेंद्र जाधव आपल्या आईविषयी सांगतात,"मातोसरींचा पैशांचा हिशोब हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. खरे म्हणजे तिला विसाच्या पुढे मोजता येत नाही. शंभर म्हणजे पाच 'इसा' असे तिचे गणित असते" (जाधव नरेंद्र २००७ : आमचा बाप आन् आम्ही, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई ४६).
मी माझ्या बालपणी विदर्भातील माझ्या खेडेगावात 'एक इसा, दोन इसा, तीन इसा' अशा पद्धतीने नाण्यांचे ढीग करून पैसे मोजणारी माणसे पाहिली आहेत.
'उषास्वप्न'
126 ब, मार्कंडेय नगर, सोलापूर 413 003
दूरभाष : (0217)260 2301
भ्रमणभाष : 094207 80570
(२)
शकुन्तला फडणीस
अठरा विश्वे याबद्दल श्री० विजय पाध्ये यांचे टिपण वाचले. ('भाषा आणि जीवन' - उन्हाळा, पृ० ७४) मी भाषाशास्त्राची अभ्यासक नाही. तरीही अठरा विश्वेचा आणखी एक अर्थ सांगावासा वाटतो.
श्री० शं०ना० नवरे यांना 'गदिमा पुरस्कार' मिळाला त्यावेळच्या भाषणात शं०ना० म्हणाले होते -"शब्द वापरताना नेमका अर्थ माहीत असला पाहिजे. 'अठरा विश्वे दारिद्रय' हे शब्द वापरताना अठरा विश्वे कोणती याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून अठरा विसावे म्हणजे १८ गुणिले २० म्हणजे वर्षातील ३६० दिवस असलेले दारिद्रय हा अर्थ सापडला. प्रत्येक शब्दाची ओळख व्हावी असे मला वाटते. शब्दकोश पाहतो."
शं०नां०चे वरील विवरण 'मेहता मराठी ग्रंथजगत', जाने० २००९ या अंकात पृ०८९ वर प्रकाशित झाले आहे. अठरा विश्वे हे दोन शब्द नेहमी दारिद्रय या शब्दाला चिकटून येतात इतकेच मला माहीत आहे.
1233, शुक्रवार पेठ, सुभाषनगर, रस्ता क्र० 4, पुणे 411 002
दूरभाष : (020)2447 2232
तिन्ही सांजा
सुशान्त शंकर देवळेकर
शंका
कविवर्य भा०रा० तांबे ह्यांच्या एका कवितेत 'तिन्ही सांजा’ असा शब्दप्रयोग आढळतो : "तिन्ही सांजा सखे मिळाल्या/देई वचन तुला..." ह्यात 'तिन्ही सांजा’ म्हणजे काय? एरवी आपण 'सांज झाली’ असे म्हणतो; 'सांजा झाल्या’ असे म्हणत नाही. 'तिन्हीसांजेची वेळ झाली’ असे म्हणतो; 'तिन्ही सांजांची वेळ झाली’ असे महणत नाही. तरी 'तिन्ही सांजा’ या प्रयोगाला काही संदर्भ आहे का?
...आणि समाधान
'तिन्ही सांजा(ज)’ हा शब्दप्रयोग 'त्रिसंध्या’ ह्या संस्कृत शब्दावरून आला असावा असे डॉ० अशोक केळकर ह्यांनी सुचविले. 'त्रिसंध्या’ हा शब्द आपटयांच्या तीन खंडांच्या संस्कृत-इंग्रजी कोशात (सुधारित आवृत्ती संपा० प्रा० गोडे, प्रसाद प्रकाशन, पुणे, १९७९) आढळतो. पहाट, सायंकाळ ह्या दिवस व रात्रीच्या सीमारेषेवरील दोन संध्या व माध्याह्न ही सकाळ व दुपार ह्यांच्या सीमारेषेवरील संध्या अशा ह्या तीन संध्या. पूर्वी ह्या तीन संध्यासमयी संध्या केली जाई. 'तिन्हीसांज’प्रमाणे 'त्रिकाल’ (तिन्ही त्रिकाळ) हाही शब्द रूढ आहे. 'किरकिरती रातकिडे, झाल्या तिन्हीसांजा’ ही यशवंतांच्या कवितेतील ओळही एका शब्दकोशात उध्दृत केलेली आढळते.
-- संपादक
वर्ण आणि अक्षर
दिवाकर मोहनी
संदर्भ : 'शासनसंमत मराठी वर्णमाला', 'भाषा आणि जीवन' : वर्ष २८ अंक १ व २
प्रा० अर्जुनवाडकर ह्यांचा मुद्दा विचारणीय आहे. आपण उच्चार करताना बुङ्ढा, विट्ठल, सक्खा असाच करीत असतो. पण... आणि हा पण फार महत्त्वाचा आहे; आपण नेहमी जसा उच्चार करतो तसे लिहीत नाही आणि आपण पूर्वीपासून जसे लिहीत आलो तसेच पुढेही लिहीत राहिल्याने आपले वाचन सुकर होत असते.
दुसरा मुद्दा असा की, आपल्या बोलीभाषा आणि संस्कृत ह्यांचे उच्चारच वेगवेगळे आहेत. आपल्या बोलीमध्ये म्हणजे देशज शब्दांमध्ये एकाच व्यंजनाचे द्वित्व करण्याचा प्रघात आहे. गप्पा, अप्पा, अण्णा, घट्ट, हट्ट, कच्चा, पक्का, हल्ला, किल्ला, पत्ता, गुत्ता, बत्ता असे उच्चार आम्हांला सहजपणे करता येतात. स्वास्थ्य, नि:स्पृहत्व, धृष्टद्युम्न असे शब्द आम्हांला प्रयत्नाने उच्चारावे लागतात.
एकाच व्यंजनाचे द्वित्व करावयाचे हे आमच्या मनात अगदी पक्के ठसले असल्यामुळे आम्ही महाप्राण व्यंजनांचेसुद्धा लेखनात द्वित्व करतो. तसा उच्चार करणे प्राय: अशक्य असले तरी! वाचनसौकर्यासाठी हा लेखनदोष स्वीकारणे आवश्यक आहे असे मला वाटते.
प्रा० अशोक केळकर ह्यांनी सुचविलेल्या रु, रू लाही तेवढ्याचसाठी माझा आक्षेप आहे. ज्या अक्षरांची आपल्या डोळयांना सवय झाली आहे ती मोडू नये ही एक गोष्ट आणि जुनी पुस्तकेही लोकांच्या वाचनात येत राहणार असल्यामुळे ह्या दोन प्रकारच्या अक्षरांचा डोळयांना त्रास होईल ही दुसरी. म्हणून लेखनात फरक करण्याऐवजी अक्षरांतील ऱ्हस्वत्वाच्या खुणा डावीकडे वळतात आणि दीर्घत्वाच्या उजवीकडे (रु, रू) हे वाचकाला एकदा नीट समाजवून देणे इष्ट असे माझे मत आहे. (बघा : मि मी, मु मू)
डॉ० केळकर ह्यांच्या पत्रात अर्धचन्द्र हा शब्द एकदा आला आहे; अर्धचन्द्र ह्या शब्दाला निराळा संदर्भ आहे. त्यांना तेथे 'चन्द्र' अपेक्षित आहे हे उघड आहे. कारण चन्द्र ह्या शब्दाने पौर्णिमेचा पूर्ण चन्द्र सूचित होत नाही. चन्द्राची चतुर्थीची किंवा पंचमीची कलाच सूचित होते. ( ॅ)
केवल-व्यंजनांच्या मालेला वर्णमाला म्हणणे आणि सस्वर-व्यंजनांच्या मालेला अक्षर-माला म्हणणेही चुकीचे आहे. आपल्या नागरी लिपीत ज्याचा उच्चार होऊ शकत नाही असे काहीही लिहिता येत नाही. केवल व्यंजनांचा उच्चार कोणालाही करता येत नाही. उत्, ऋक्, धिक्, वत्, विद् ह्या शब्दांतील व्यंजने मागच्या स्वराच्या आधाराने उच्चारली गेली आहेत. त्यांच्यापुढे स्वर आल्याबरोबर ती व्यंजने पुढच्या स्वराला जाऊन चिकटतात. उन्नयन, ऋक्साम, विद्वान्, सदसद्विवेक अशी त्यांची शेकडो उदाहरणे आहेत. एवढ्याचसाठी वर्णमाला क् ख् ग् घ् ङ् अशी कधीही लिहू नये. ती क ख ग घ ङ अशीच लिहावी. वाटल्यास उच्चारसौकर्यासाठी ती तशी लिहिली आहे असे सांगावे.
वर्ण हा अर्थशून्य असतो तर अक्षर हे अर्थपूर्ण असते. त्याचप्रमाणे 'वर्ण' हा समूहाचा एक घटक असतो. ख, भू ही वाक्यात वापरली तर 'अक्षरे' - क ख ग घ, भ भा भि भी भु भू हे वर्ण - हे जाणून जुन्या संज्ञा बदलू नयेत. मंत्र, वृत्ते ही सारी अक्षरसंख्येने ओळखली जातात, वर्णसंख्येने नाही!
गौरीवंदन, 123, शिवाजीनगर, नागपूर 440 010
भ्रमणभाष : 098819 00608
‘म्हणून’ची चूक
शकुंतला क्षीरसागर
उज्ज्वला जोगळेकर यांनी ‘उच्चारणातून व्यक्त होणारे संयुक्त तर्कसूचक अव्ययांचे ‘अर्थ’कारण’ (भाषा आणि जीवन वर्ष २८ अंक १ हिवाळा २०१०) या लेखात ‘म्हणून’, ‘म्हणून तर’, ‘म्हणून तरी’, ‘काही’ या उभयान्वयी अव्ययांच्या उपयोगाची अनेक उदाहरणे दिली आहेत. हा लेख त्यांच्या व्यासंगाची साक्ष पटवतो.
श्री०के० क्षीरसागर यांनी ‘म्हणून’च्या चुकीच्या उपयोगाचे एक उदाहरण दिले आहे. ते वाक्य असे आहे, ‘‘त्या काळी विद्यालये नव्हती; ते म्हणून पदवी घेऊ शकले नाहीत.’’ या वाक्यातील चूक दाखवताना त्यांनी म्हटले आहे की, ‘विद्यालय’ ऐवजी ‘विद्यापीठ’ हवे; ‘ते म्हणून’ या ऐवजी ‘म्हणून ते’ असे हवे. ‘ते म्हणून’चा अर्थ, त्यांच्याऐवजी दुसरा कोणी असता तर अन्य प्रकार घडला असता, असा होतो. हल्ली हा चुकीचा प्रयोग मुंबईच्या काही गटांनी जोराने चालू केला आहे. यात फक्त ‘ही देअरफर’ (He therefore) या इंग्रजी वळणाचे अनुकरण आहे.’’
संदर्भ : क्षीरसागर, श्री०के० २००० मराठी भाषा : वाढ आणि बिघाड, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई. (मूळ लेख ‘आजची मराठी भाषा : वाढ आणि बिघाड’ या नावाने मनोरा, सप्टेंबर १९७४, पृ० १५-१६ मध्ये प्रकाशित)
21/418 लोकमान्यनगर, पुणे 411 030