भाषा आणि जीवन

कमरखुलाई

    भाषा आणि जीवन - एक प्रकारे अद्वैतच. जीवनात अनुभव नेमक्या शब्दात सांगण्याचे साधन म्हणजे भाषा. फार नाही पण साधारण दिडशे वर्षांपूर्वीचे हिशेबाचे कागद वाचत असताना एका ठिकाणी 'कमरखुलाई रु.१०/- दिले' असा उल्लेख होता. वाटले की कमरदुखीवर औषध असावे. पण अर्थ असा होतो की त्या कमरखुलाईला आता भारदस्त शब्द सुचत नाही. पण व्यवहार मात्र तसाच चालू आहे.

    शब्दकोशातील अर्थ असा -- अपराधी कुळाकडे -- गुन्हेगारी कारणाकरिता आलेल्या शिपायासकंबर सोडावयास द्यावे लागणारे द्रव्य सरकारी शिपाई हा त्रास देऊन उकळून घेतो. एरव्ही गुन्हेगाराला देहधर्म इ.ही करून देत नाही. म्हणजे खुल्लमखुल्ला व्यवहार होतो. आता गुन्हेगार प्रतिष्ठित असतात. तेव्हा त्यांना सोडविण्याचे मार्ग तितके प्रतिष्ठित असावे लागतात.त्याला कमरखुलाई कसे म्हणावे? पण लगेच पुढचा खर्च होता. 'अंत्यस्त' रु. ५/- आता अंत्यस्त शब्दही भारदस्त. अर्थ -- टेबलाखालून दिलेले पैसे. जीवनाचे प्रतिबिंब भाषेत पडते ते असे. भाष्याची आवश्यकता नाही.  
        --श्रीधर विश्वनाथ सहस्रबुद्धे, पुणे

संस्कृत आणि प्राकृतहिमालय पर्वताची कन्या पार्वती. तिने शंकर हा आपला पती व्हावा म्हणून तप केले. यथावकाश तप फळाला आले आणि लग्न झाले. त्यांना पुत्रप्राप्ती झाली. त्या पुत्राने तारकासुर नावाच्या राक्षसाला मारले. या सगळ्या कथेचे 'कुमारसंभवम्' हे संस्कृत महाकाव्य कालिदासाने लिहिले.

दैवी विवाहाचे वर्णन
    त्या काव्याच्या सहाव्या सर्गात पार्वतीला मागणी घालायला सप्तर्षी आकाशमार्गाने हिमालयाकडे आल्याचे वर्णन आहे. वेताच्या आसनावर त्यांना बसवून हिमालयाने त्यांची स्तुती केली. आंगिरस ऋषींनी हिमालयाला सांगितले की, "आमच्या मुखाने शिवच तुमच्या कन्येला मागणी घालतो आहे." त्या वेळी पार्वती पित्याच्या पाठीशी कमळाच्या पाकळ्या मोजीत होती. तिच्या आईकडे पाहून तिची संमती मिळाल्यावर हिमालयाने पार्वतीला पुढे घेऊन ऋषींना म्हटले, "ही शिववधू आपणांस नमस्कार करतेय." तिला अरुंधतीने मांडीवर बसवून घेतले. हिमालयाने विचारल्यावरून ऋषींनी चार दिवसांनंतरची तिथी पक्‍की केली.
    सातव्या सर्गात लग्नघरातले आणि विवाहसोहळ्याचे वर्णन आहे. शुक्लपक्षातल्या शुभतिथीला वधूला विवाहदीक्षा दिली. परिवारातल्या आणि बाहेरच्याही कितीकांनी मांडीवर घेऊन तिला आशीर्वाद दिले. चंद्र फाल्गुनी नक्षत्रात असताना लेकुरवाळ्या सुवासिनींनी तिचा शिणगार केला. तिला चौकात नेऊन सुवर्णकुंभांनी न्हाऊ घातले. धूपाने केस सुकवून दुर्वा, गोपीचंदन, मोहफुलांच्या माला यांनी तिला सजवले. तिची पावलं रंगवल्यावर सख्या म्हणाल्या, "पतीच्या माथ्यावरच्या चंद्रकलेला हे लाव बरं का." मग तिची आई मेना हिने तिला विवाहतिलक लावला, कुलदेवतांना आणि सुवासिनींना नमस्कार करायला लावले. तिकडे कैलासावर सप्त मातृकांनी शिवालाही अलंकारिले. नंदीवर बसून शंकर निघाले, त्यांच्यामागे मातृका आणि महाकाली होत्या. गंगायमुना मूर्तरूपाने चवर्‍या ढाळीत होत्या. सप्तर्षींना 'तुम्ही माझे पुरोहित' असे शिवाने सांगितले. औषधिप्रस्थ नगरापाशी पोचल्यावर भूमीवर उतरून शिवाने वंदन केले तेव्हा हिमालयच लाजल्यासारखा झाला. शिवाला पाहण्यासाठी स्त्रियांची एकच गडबड उडाली. लग्नघरात, रत्‍ने टाकलेले पाणि शिवाच्या पायांवर घातले आणि हिमालयाने रेशमी वस्त्रे दिली ती शिवाच्या अंगावर घालून त्याला वधूकडे नेले. वधूवरांनी हातात हात घेऊन अग्नीला प्रदक्षिणा घातल्या. पुरोहिताने वधूच्या हाताने लाजाहोम करविला आणि तिला म्हटले, "तुझ्या विवाहाला अग्नी साक्ष आहे. पती शिवासह धर्माने वाग." शिवाने तिला ध्रुवतारा दाखवला. मग त्यांनी ब्रह्मदेवाला जोडीने नमस्कार केला. त्याने 'वीरप्रसू हो' असा आशीर्वाद दिला. नंतर ती दोघे सोन्याच्या आसनावर बसली तेव्हा लोकरीतीने भाताची कोवळी रोपे त्यांच्यावर टाकली. नंतर त्या दोघांवर स्वतः लक्ष्मीने लांब दांड्याच्या कमळाचे छत्र धरले.

कविकालीन वास्तव
    कालिदासाने देवदेवतांच्या विवाहाचे वर्णन केले असले तरी विधींचे तपशील मात्र त्याच्या समकालीन समाजातल्या चालीरीतींचेच आहेत. भारतात सामाजिक विधी-उत्सव शेकडो वर्ष साजरे होत आले आहेत. त्यामुळे भाताची कोवळी रोपे अंगावर टाकण्याच्या विधीला चौथ्यापाचव्या शतकातला कालिदास 'लौकिक' म्हणतो आणि चौदा-पंधराव्या शतकातला मल्लिनाथ 'लौकिक आचार मनानेही डावलू नये' असा त्याला शास्त्राधार देतो. थोड्याफार पद्धतीने आजचेही विवाह असेच होतात. त्यामुळे शिवपार्वतीच्या विवाहाचे वर्णन आपल्याला फार ओळखीचे वाटण्यासारखे आहे. वधूवर, आप्तगोत आणि वर्‍हाडी भले दैवी अतिमानवी (पर्वत, नद्यासुद्धा) असोत, त्यांची चालचलणूक कवीच्या परिसरातल्या माणसांसारखीच वर्णिलेली असते. त्याचमुळे कथेतल्या पात्रांचे चरित्र जरी अद्भुतांनी भरलेले असले तरी ते (आजच्या अर्थाने) ऐतिहासिक नसते.
    पुराणकथेचा हा विशेष समजून घेतला तर तिच्या शब्दवर्णनांना आपण प्रमाण मानणार नाही किंवा पुराणकथांवरून इतिहास काढणार नाही. तरीसुद्धा त्या शब्दवर्णनांच्या मागे कविकालीन वास्तव दडलेले असते ते चिकित्सकपणे पाहिले तर सामाजिक-सांस्कृतिक इतिहासाची एखादी झलक आपल्याला मिळते.

संस्कृत-प्राकृतांचा उपयोग
    शिवपार्वतीच्या या विवाहात लक्ष्मी छत्र धरायला आली; पाठोपाठ सरस्वतीही स्तवन करायला आली. "सरस्वतीने दोन प्रकारच्या भाषेने त्या दोघांच्या जोडप्याची स्तुती केली. त्या सुयोग्य वराची संस्कारपूत भाषेत, तर वधूची समजायला सोप्या भाषेत!" (द्विधाप्रयुक्तेन च वाङ्मयेन सरस्वती तन्मिथुनं नुनाव । संस्कारपूतेन वरं वरेण्यं वधूं सुखग्राह्यनिबन्धेन ।।७.९०।।) या श्लोकातल्या पदांचा अर्थ टीकाकार मल्लिनाथने स्पष्ट केला आहे. "'द्विधाप्रयुक्तेन' म्हणजे संस्कृत-प्राकृत या दोन रूपांत म्हटलेल्या. 'संस्कारपूतेन' म्हणजे प्रकृतिप्रत्ययविभागशुद्ध संस्कृतात, वराची स्तुती. 'सुखग्राह्यनिबन्धेन' म्हणजे सुबोध रचनेत अर्थात प्राकृतात, वधूची स्तुती. शिव हा पुरुष म्हणून त्याच्यासाठी संस्कृत, पार्वती स्त्री म्हणून तिच्यासाठी प्राकृत!"
देवता असली, जगन्माता असली, तरी पार्वती स्त्री असल्यामुळे तिला संस्कृत समजणारे नव्हते. तिला सरस्वतीनेसुद्धा प्राकृतच ऐकविणे लोकरीतीला धरून होते.  हा सामाजिक नियम होता.  स्त्रियांना संस्कृत समजत नव्हते, त्यांचा व्यवहार प्राकृतातच होत होता. प्राचीन काळापासून चालत असलेली ही स्थिती पाचव्या ते पंधराव्या शतकात तशीच होती. प्राचीन काळापासून नाटकांमधल्या स्त्रीपात्रांचे बोलणे प्राकृतात असावे असा दंडकच होता. कालिदासाच्याच 'शाकुंतल' नाटकाच्या सातव्या अंकात मारीच ऋषी आणि त्यांची पत्‍नी अदिती (दाक्षायणी) यांचा संवाद आहे. ऋषी संस्कृतात सांगतात, "तुझ्या पुत्राच्या (इंद्राच्या) बाजूने आघाडीवर लढणार हा बघ दुष्यन्त नावाचा जगाचा राजा." त्यावर पत्‍नी अदिती प्राकृतात म्हणते, “त्याच्या आकृतीवरूनच तसं वाटतं." (संभावणीआणुभावा से आकिदी! - "संभावनीयानुभावा अस्य आकृतिः।") प्रत्यक्ष देवांचा राजा इंद्र याची आई संस्कृतात बोलत नाही. (नवर्‍याचे संस्कृत संदर्भाने तिला समजते असे मानले पाहिजे!)
भारतीय संस्कृतीने स्त्रियांना नेहमी पुरुषांच्या खालचे स्थान दिले. भारतात स्त्री-शूद्रांना संस्कृत ऐकण्याची मुभा नव्हती. काव्य-कथांमध्ये या स्थितीचे प्रतिबिंब साहजिकच पडले आहे. खुद्द संस्कृतचे रूप आणि स्थिती काय होती? "...स्थलकाल-लोक या बंधनांना बाजूस ठेवून आपल्या ज्ञानव्यवहारासाठी विद्वान एखादी प्रशिष्ट संभाषण कृती घडवीत राहतात. संस्कृत ही अशी प्रशिष्ट कृती - (अ‍ॅ-कल्चरेटेड) आर्टिफॅक्ट) होती; ती प्रत्यक्ष बोली नव्हती" (माहुलकर २००२, पृ० ४६) व्यवहारातली बोली नसलेल्या अशा प्रशिष्ट कृतीतून प्राकृतांसारख्या भाषा निघाल्या किंवा भारतार्य म्हटलेल्या भाषांचे मूळ तिच्यात आहे, अशा प्रणाली वास्तवाला किंवा इतिहासाला धरून नाहीत. विद्यापीठांमधले भाषाविज्ञानाचे अभ्यासक्रम मात्र याच गृहीतावर ठाम आहेत. भाषा-कथा-संस्कृतींचा समवायाने विचार करून भारतीय भाषाविज्ञानात जरूर ते फेरबदल केले पाहिजेत.

(संदर्भ: माहुलकर, दिनेश द० २००२. वृद्धि: राज्य मराठी विकास संस्था, मुंबई)

तेलुगु-मराठी शब्दयोजन

प्रत्येक भाषेची काही एक विशिष्ट प्रवृत्ती असते. काही विशिष्ट वाक्प्रयोग असतात. तत्सम शब्दांचे अर्थ व भावही त्यात अनेक वेळा बदललेले दिसतात. मराठीपेक्षा वेगळ्या वाटणाऱ्या तेलुगूतील शब्दांच्या अर्थच्छटांचा विचार करून पुढील उतारा सिद्ध केला आहे. उताऱ्यातील अधोरेखित शब्द हे तत्सम शब्द आहेत तर अन्य अधोरेखित शब्द हे त्या त्या ठिकाणी उपयोजिल्या जाणाऱ्या तेलुगु शब्दांचे अनुवाद होत. मराठी वर्तमानपत्रात त्या जागी प्रायः कोणते शब्द येतात, हे कंसांत दर्शविले आहे.

काही दिवसांपासून असलेली कल्लोलित (अशांत) परिस्थिती आता बरीच शांत झाली. कर्फ्यू उचलून फेकून दिल्यावर  (उठवल्यावर) एकही अवांछनीय (अप्रिय) संघटना (घटना) घडली नाही. कर्फ्यूच्या काळात काही लोकांनी आवेशाने (रागाने) घरे व दुकाने जाळली. अशा दौर्जन्य (गुंडगिरी) करणाऱ्या लोकांना शासन कडक शिक्षा करील, असे मुख्यमंत्री एका बहिरंग सभेत (जाहीर सभेत) म्हणाले. दोन्ही जमातींच्या एका समावेशात (बैठकीत) प्रत्येक धर्मियास आपापल्या संप्रदायाप्रमाणे (परंपरेप्रमाणे) वागण्याचा हक्क आहे असे प्रतिपादले, व भद्रंगा (शांततेने) राहण्याचे आवाहन केले. जातीय (राष्ट्रीय) ऐक्याच्या गोष्टी आपण बोलतो पण कुलवाद (जातीयता) आपल्या समाजातून अजून गेला नाही. तिकडे तिकडे (कुठे कुठे) तेव्हा तेव्हा (कधी कधी) अशा घटना घडणे वेगळे, पण आता तो नित्याचाच भाग होऊन बसला आहे. भारताचे चरित्र (इतिहास) अशाच घटनांनी भरलेले आहे. एखाद्या प्रमादाने (अपघाताने) माणसे दगावणे वेगळे व आपणच आपणांस मारणे वेगळे. यावर उपाय म्हणजे निम्नस्तरीय लोकांची आर्थिक सुधारणा व्हायला हवी असे काही वक्त्यांनी एका संतापसभेत (शोकसभेत) सांगितले. काही वक्त्यांनी कारखान्यांचे जातीयीकरण (राष्ट्रीयीकरण) करावे असे सुचविले. मुख्य म्हणजे निरुद्योगी (बेकार) लोकांना काम मिळावे. शांतता निर्माण करणाऱ्या लोकांना बहुमति (बक्षीस) द्यावी, असेही एकाने सुचविले. कर्फ्यूमुळे कामकाज स्तंभित (ठप्प) होते, हे समाजाच्या दृष्टीने बरे नव्हे. परिस्थिती तृप्तिकारक (समाधानकारक) झाल्यास कर्फ्यू लावण्याचा अवसर (आवश्यकता) येणार नाही, हेही खरे. शासनाने दंगलपीडित लोकांना उचितरीतीने (विनामूल्य) धान्य देण्याची व्यवस्था मात्र केली पाहिजे, व अन्य सदुपायही (सोयीही) पुरवावेत, स्वच्छंद संस्था (स्वायत्तसंस्था) यांनीही याबाबतीत थोडा भार उचलला पाहिजे. आता अंकितभावाने  (समर्पित वृत्तीने) काम करणारी माणसेच दुर्मीळ झाली आहेत. दुरभिप्रायातून (गैरसमजातून) अनेकदा कलह निर्माण होतात, ते टाळले पाहिजे, म्हणजे प्रदेशाची सर्व रंगांत (क्षेत्रांत) प्रगती होण्यास वेळ लागणार नाही. या भूमिकेस कुणाचेही अभ्यंतर (आक्षेप) राहणार नाही.

अनुक्रमणिका 'उन्हाळा २००८'

संपादकीय साहित्याचे सांस्कृतिक संदर्भ आणि भाषांतर / प्र.ना. परांजपे
रकृ/विनय सायनेकर
सामाजिक संदर्भात भाषेचा अभ्यास (उत्तरार्ध) / मिलिंद मालशे-विवेक भट
शासनावरी ही फिर्याद / सत्त्वशीला सामंत
पूर्व खानदेशच्या बोलींचा परस्परांवर प्रभाव : एक अभ्यास / वासुदेव सोमाजी बले
अहिराणी-मराठी बडबडगीते / अरुण देवरे
स्थलांतरितांच्यामुळे मराठीला नवीन स्पर्धक! / रमेशचंद्र पाटकर
ज्याची त्याची प्रचीती
१. सीमेवरचा भाषासंसार /  देवानंद सोनटक्के
२. प्राण्यांच्या भाषेत माणसांनी ओतलेला 'प्राण' / केशव सखाराम देशमुख
३. चेकचा घोटाळा, मराठी दूरध्वनी निर्देशिका : भाषेची दुर्दशा / विजय पाध्ये
मिताक्षरी भाषा
दखलयोग्य
१. मराठी भाषा सौजन्यपूर्ण आहे का? / अच्युत ओक
२. मराठी शिक्षकांची... / नंदिनी अविनाश बर्वे
३. महाराष्ट्रात येणारे परप्रांतीय / सुनील माळी

प्रतिसाद
१. मिलिंद मालशे यांचे ज्ञानमूलक... / प्रशान्त बागड
२. अखेर दखल घेणारा भेटला! / कृ.श्री. अर्जुनवाडकर
३. दुर्बोध परिभाषा / विजय पाध्ये
४. बोलीभाषा आणि परिभाषा / द.भि. कुलकर्णी
५. भाषांतरातील बारकावे / जयप्रकाश सावंत
शंका...'कोलन(:)' साठी मराठी प्रतिशब्द / विजय पाध्ये
भाषा-वार्ता शुद्धलेखनासंबंधी नवविचार / विजया चौधरी
परिषद-वार्ता / रंजना फडके
भाषाविषयक लेखनसूची : २००७ / यशोधरा पवर
पानपूरक

शंभराव्या अंकाचे संपादकीय: साहित्याचे सांस्कृतिक संदर्भ आणि भाषांतर

विल्यम गोल्डिंगच्या 'लॉर्ड ऑफ दी फ्लाईज' या कादंबरीच्या अखेरीस येणार्‍या ब्रिटिश नाविक अधिकार्‍याच्या तोंडी एक वाक्य आहे.: "I know Jolly good show, Like the Coral Island" ("आय नो, जॉली गुड शो, लाइक द कोरल आयलंड"). या कादंबरीचे जी०ए० कुलकर्णी यांनी मराठी भाषांतर केले आहे. त्यात या वाक्याचे भाषांतर म्हणून पुढील वाक्ये येतात : "आलं ध्यानात ! तुम्ही येथे सगळी मजाच केली म्हणायची ! प्रवाळ-द्वीपविषयीच्या पुस्तकात नेहमी असते तशी! निळे स्वच्छ पाणी, सोनेरी वाळू, पिकलेली रसरशीत, सहज हाताला येणारी फळे, निष्पाप गोड खेळ, नाटके, खोट्या खोट्या लढाया, गोड गोड गाणी! आणि मग सगळं विसरून एकमेकांच्या गळ्यात गळा घालून चांदण्याखाली गोड स्वप्न पाहात घेतलेली गुलाबी झोप - चांगली चैन केलीत तुम्ही!"

असं का व्हावं? एका 'कोरल आयलंड'च्या भाषांतरासाठी जी०एं०ना इतका विस्तार करण्याची आवश्यकता का भासली?

ललित साहित्याच्या भाषांतरामध्ये येणार्‍या एका महत्त्वाच्या समस्येचं दर्शन यातून घडते. आणि या समस्येच्या सोडवणुकीचा एक निश्चित, प्रमाण असा मार्ग नाही.

काय आहे ही समस्या? 'कोरल आयलंड' ही आर०एम० बॅलंटाइन या ब्रिटिश लेखकाची १८५७ मध्ये प्रसिद्ध झालेली रोमँटिक कादंबरी आहे. एका बेटावर अडकलेल्या तीन ब्रिटिश मुलांची साहसकथा आहे. त्या कादंबरीचा उल्लेख करून गोल्डिंगने आपल्या कादंबरीला एक संदर्भ चौकट दिली आहे. गोल्डिंगच्या कादंबरीतही एका बेटावर अडकलेली मुले आहेत; पण त्यांचे वर्तन 'कोरल आयलंड'मधील मुलांच्यापेक्षा फार भिन्न आहे. स्वार्थ, मत्सर, हेवेदावे, खोटेपणा, अंधश्रद्धा आणि हिंसा यांमुळे ती सुसंस्कृत, शिस्तबद्ध मुले हळूहळू रानटी 'आदिवासी' बनत जातात. 'लॉर्ड ऑफ दी फ्लाइज'मध्ये या बदलाचे धक्‍कादायक दर्शन होते. मुले निष्पाप असतात, ती 'देवाघरची फुले' असतात, या १९व्या शतकात लोकप्रिय असलेल्या समजुतीला छेद देणारी ही कादंबरी १९५४ मध्ये (म्हणजे 'कोरल आयलंड'नंतर ९७ वर्षांनी प्रसिद्ध झाली. आपल्या कादंबरीने वाचकांना 'कोरल आयलंड'ची आठवण व्हावी आणि त्यांच्यात व्यक्त होणार्‍या दृष्टिकोणांमधील विरोध वाचकांच्या लक्षात यावा म्हणून गोल्डिंगने नाविक अधिकार्‍याच्या तोंडी 'कोरल आयलंड'चा उल्लेख घातला आहे.

(ज्या वाचकांनी 'कोरल आयलंड' वाचली आहे त्यांना तिच्या उल्लेखामुळे 'लॉर्ड ऑफ दी फ्लाइज' सुन्न करील, अंतर्मुख करील यात शंका नाही. माणूस समजण्याच्या बाबतीत १९व्या शतकातील लोक भाबडे होते का?)

दोन महायुद्धांमुळे (लॉर्ड ऑफ दी फ्लाइज'मधील काळ तिसर्‍या महायुद्धाचा आहे.) माणसात मूलभूत फरक पडला आहे का? स्वार्थ-द्वेष-मत्सर-हेवा व हिंसा यांमुळे माणूस स्वतःचाच नाश ओढवून घेणार आहे का? असे अनेक प्रश्न त्याला पडतील. त्यामुळे ब्रिटिश वाचकांच्या दृष्टीने 'कोरल आयलंड'चा उल्लेख महत्त्वाचा आहे यात शंका नाही.

पण मराठी वाचकांचे काय? मराठी वाचकांनी 'कोरल आयलंड' वाचली असेल असे गृहीत धरता येत नाही. मग भाषांतरकाराने हा उल्लेख जशाच्या तसा ठेवायचा ? की तो पूर्णतः वगळायचा? की जी०एं०नी केला आहे त्याप्रकारे त्या उल्लेखाचा विस्तार करावयाचा ? की त्यावर एक पदटीप देऊन त्याचा अर्थ स्पष्ट करायचा ? या प्रश्नाला सर्वांना मान्य होईल असे एक 'प्रमाण' उत्तर नाही, हे उघड आहे.

'लॉर्ड ऑफ दी फ्लाइज' या कादंबरीचे शीर्षकच पाहा. त्याचे भाषांतर करायचे नाही असा निर्णय भाषांतरकार व प्रकाशकांनी घेतला. बायबलच्या 'सेकंड बुक ऑफ दी किंग्ज' च्यापहिल्या प्रकरणाच्या दुसर्‍या परिच्छेदात बाल्झेबब (Balwze-bub) चा उल्लेख आहे. हिब्रू भाषेत त्याचा अर्थ ' माश्यांचा स्वामी' असा आहे. खोट्या देवांच्या पैकी तो एक आहे. ग्रीक भाषेत त्याचा अर्थ 'सैतान' असा आहे. ('न्यू टेस्टामेंट'मधील मॅथ्यूच्या पुस्तकातील १२व्या प्रकरणात परिच्छेद २४ व २७ मध्येही बील्झेबबचा उल्लेख आहे.) कादंबरीत मृत वैमानिकाच्या प्रेतावर माश्या घोंघावत आहेत आणि पॅरॅशूटमध्ये अडकलेले ते प्रेत वार्‍यामुळे मागेपुढे हलताना दिसते. त्यालाच मुले 'लॉर्ड ऑफ दी फ्लाइज' समजतात. त्याला प्रसन्न करण्याचे बेत आखतात. अर्थात हा 'माश्यांचा स्वामी' म्हणजे मुलांच्या मनातील भीतीचेच प्रतीक आहे. (देवांचा जन्म अशा गूढ अनामिक भीतीतूनच होतो.) या शीर्षकाला असलेला बायबलचा संदर्भ लक्षात यावा म्हणून इंग्रजी शीर्षकात बदल करण्यात आला नसावा. (अर्थात याचे भाषांतर 'सैतान' असे होऊ शकते आणि मुलांच्या मनात जाग्या होऊ पाहणार्‍या दुरिताचा तो अन्वर्थक ठरू शकतो. शिवाय सैतान या शब्दाला ख्रिश्चन धर्माचा - पर्यायाने बायबलचा संदर्भ आहे. पण ते शीर्षक फार भडक ठरण्याचा धोका आहे.) साहित्यात मुरलेले सांस्कृतिक संदर्भ भाषांतरकारापुढे समस्या निर्माण करतात त्या अशा !

प्र०ना० परांजपे

पन्नासाव्या अंकाचे संपादकीय : पन्नासावा अंक

'भाषा आणि जीवन'चा हा अंक पन्नासावा आहे. 'भाषा आणि जीवन'ची मातृसंस्था, मराठी अभ्यास परिषद, १ जानेवारी, १९८२ रोजी अस्तित्वात आली. आता संस्थाही पंधराव्या वर्षात पदार्पण करीत आहे; आणि 'महाराष्ट्र फाउंडशेन'ने प्रत्येकी पन्नास हजार रुपयांच्या पारितोषिकासाठी निवडलेल्या तीन वैचारिक नियतकालिकांमध्ये 'भाषा आणि जीवन'ची नुकतीच निवड केली आहे. म्हणून या टप्प्यावर थोडे मागे वळून पाहावे, असे वाटणे साहजिकच आहे. या नियतकालिकाचे नाव दुपदरी आहे. 'मराठी अभ्यास परिषद पत्रिका' हा त्यातील एक पदर. नियतकालिकांच्या नोंदणी करणार्‍या कार्यालयाच्या दृष्टीने हे नाव अधिकृत आणि निरपदवाद. वर्णनात्मक आणि दुसर्‍या कुणी न वापरलेले. पण मातृसंस्थेच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने 'भाषा आणि जीवन' हा दुसरा पदर अधिक महत्त्वाचा, कारण त्यातून मातृसंस्थेचा दृष्टिकोन व्यक्त होतो. 'भाषेत जीवन काठोकाठ भरलेले असले, तर भाषाही जीवनात शिगोशीग भरून राहिलेली आहे.' (अंक १, पृष्ठ १)

'भाषा आणि जीवन' हे धंदेवाईक विचारवंतांनी धंदेवाईक विचारवंतांसाठी चालविलेले नियतकालिक नाही. भाषातज्ज्ञ आणि इतरेजन यांनी विचारांची आणि अनुभवांची देवाणघेवाण करावी, परस्परांपासून शिकण्यासारखे असेल, ते शिकावे, आणि त्याद्वारे आपल्या समाजाचे भाषिक आणि सामाजिक जीवन विकसित आणि समृद्ध व्हावे, या हेतूने निर्माण केलेले हे व्यासपीठ आहे. मराठीतून हे प्रकाशित होत असले, तरी ते मराठीपुरते मर्यादित नाही. मराठी भाषकांच्या सर्वच गरजा भागविण्याचा प्रयत्‍न करणे हे मराठी अभ्यास परिषदेचे उद्दिष्ट आहे आणि ते साध्य करण्याचे 'भाषा आणि जीवन' हे एक साधन आहे. भाषिक गरजा या केवळ शिक्षण, व्यवसाय, अर्थार्जन यांच्यापुरत्या सीमित नसतात. व्यक्तीचे व समाजाचे मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पोषण भाषेतून घडत असते. त्यासाठी कोणतीही एकच भाषा पुरी पडण्याचा संभव — जागतिकीकरणाच्या आधुनिक रेट्यात तर विशेषत्वाने— कठीण दिसते. इतर भाषांतील ज्ञान, साहित्य यांचा यथार्थ परिचय व संस्कार आपल्या भाषेच्या विकासाला हातभार लावू शकतो. जीवनाच्या बदलत्या रूपांना व आव्हानांना सामोरे जाण्याइतकी क्षमता व लवचिकता भाषेमध्ये असेल, तर ती तिचा वापर करणार्‍यांच्या गरजा भागवू शकते. केवळ प्रतिशब्द, परिभाषा, भाषांतरे करण्याने भाषा विकसित होऊ शकत नाही. त्यासाठी नवीन संकल्पना, नवे अनुभव भाषेत व जीवनात मुरवावे लागतात. या मुरण्याच्या प्रक्रियेला हातभार लावण्याच्या प्रयत्‍न 'भाषा आणि जीवन'ने आपल्या परीने गेल्या ४९ अंकांतील २५०० हून अधिक पृष्ठांमध्ये केला आहे. आमचे हे उद्दिष्ट वाचकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्‍न 'भाषा आणि जीवन'च्या सर्व अंगांतून वाचकांना जाणवला असेल. नियतकालिकाचे पहिले दर्शन असते, ते त्याच्या मुखपृष्ठाचे. 'भाषा आणि जीवन'च्या पहिल्या चार वर्षांतील अंकांवर अनिल अवचटांनी रेखांकित केलेले मोर वाचकांना भेटले. (मोर हे सरस्वतीचे वाहन आणि आपला राष्ट्रीय पक्षी आहे.) त्यानंतर पाच वर्षे भाषिक संज्ञापनाचे व्यंग्यचित्ररूप दर्शन शि०द० फडणिसांनी घडविले. बालम केतकरांची चित्र-कविता, शाम देशपांड्यांची लिपिचित्रे, संतकाव्यातली वेचक उद्धृते, आणि लोककला यांचे दर्शन नंतरच्या अंकांच्या मुखपृष्ठावर घडले. या मुखपृष्ठांची अर्थपूर्णता वाचकांच्या नक्‍कीच लक्षात आली असेल.

'भाषा आणि जीवन'ची संपादकीये संपादन-समितीच्या सभासदांनी लिहिलेली असतात. मातृसंस्थेच्या उद्दिष्टांशी सुसंगत अशा विषयांवरील या संपादकीयांमध्ये त्यामुळे विषय, दृष्टिकोन, मांडणी व शैली या बाबतींत विविधता आली. 'भाषा आणि जीवन'मधील विविध सदरे, त्या सदरांची नावे, पानपूरके यांमधूनही आमच्या प्रयत्‍नांचा प्रत्यय वाचकांना यावा. 'दखलपात्र', 'ज्याची त्याची प्रचीती, 'पुनर्भेट', 'विचारसंकलन', 'भाषानिरीक्षण', 'शंका आणि समाधान', 'पुस्तक-परीक्षण', इत्यादी सदरांमध्ये तज्ज्ञ आणि इतरेजन यांना सारखाच वाव आहे. 'भाषा आणि जीवन'मध्ये कवितांना स्थान आहे, साहित्याला स्थान आहे, त्याचप्रमाणे प्रशासन, कायदा, वैद्यक यांनाही आवर्जून जागा देण्यात आली आहे. त्याच्यात मराठी भाषकांबरोबरच गुलाबदास ब्रोकर, श्यामविमल, इरिना ग्लुश्कोव्हा, मॅक्सीन बर्नसन अशा अन्य भाषकांनीही लेखन केले आहे. भाषाविज्ञान, भाषाध्यापन, सुलेखन, नाटक, चित्रपट, वृत्तपत्रे, मुलाखत, लोकशिक्षण, अनुवाद, अशा अनेक विषयांवरील लेख 'भाषा आणि जीवन'ने छापलेले आहेत. लेखसूची, संदर्भसूची, लेखनसूची, साहित्यसूची, शब्दसूची परिभाषासूची अशा विविध सूची उपलब्धतेनुसार छापण्यावरही आमचा कटाक्ष आहे. केवळ मराठीच नव्हे, तर अन्य भाषांबद्दलचे लेखन आणि अन्य भाषांमधील लेखनाचे अनुवादही आम्ही छापले.

भाषेच्या अभिमानाचे दुरभिमानात, हेकटपणात आणि इतर भाषांबद्दलच्या तुच्छतेत रूपांतर होऊ नये, असे मराठी अभ्यास परिषदेला वाटते. त्या भूमिकेचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्‍न आम्ही 'भाषा आणि जीवन'मध्ये केला आहे. भाषा आणि जीवन'चे अंक ठरवलेल्या वेळीच प्रकाशित होतात, असे नाही. याची आम्हाला जाणीव आहे. अलीकडच्या एक-दोन अंकांतील छपाईही समाधानकारक नव्हती. आम्हांला जाणवणार्‍या तीन अडचणींचे ते दृश्य रूप आहे. लेखनाचा तुटवडा, कबूल केलेले लेखन वेळेवर (कधी अजिबात) हाती न येणे ही पहिली अडचण. लेखकांशी प्रत्यक्ष व टपालाने संपर्क साधणे, नवीन लेखक शोधणे, विषयांची यादी देऊन त्यावरील लेख पाठविण्याचे जाहीर आवाहन करणे असे काही उपाय या पहिल्या अडचणीवर मात करण्यासाठी आम्ही वापरले. दुसरी अडचण आर्थिक क्षमतेच्या अभावाची. सभासदांची वर्गणी, साहित्य, आणि संस्कृती मंडळाचे अनुदान आणि आता महाराष्ट्र फाउंडेशनने दिलेले पारितोषिक यांमुळे आर्थिक अडचण काही प्रमाण काही प्रमाणात दूर होते. तरीही कागद व मुद्रणाच्या वाढत्या दरांमुळे आणि टपालखर्चामुळे आर्थिक अडचण आमची यापुढेही सोबत करीत राहील, अशी शक्यता आहे. मुद्रणतंत्रात होणारे बदल आणि त्यामुळे वेळोवेळी करावी लागलेली नवी मुद्रणव्यवस्था ही आमची तिसरी अडचण. तीही आम्ही प्रयत्‍नपूर्वक दूर करीत आहोत. आत्तापर्यंत आम्हांला वाचकांनी उत्साहवर्धक प्रतिसाद दिला आहे. आमच्या प्रयत्‍नांचे त्यांनी स्वागत केले, कौतुक केले, काही वेळा आमच्या चुकाही दाखवून दिल्या. पण त्यांच्या यापेक्षा अधिक सहभागाची आम्हाला अपेक्षा आहे. प्रसिद्ध झालेल्या लेखनाबद्दलच्या प्रतिक्रिया पाठवण्याबरोबरच त्यांनी लेखनसहकार्यही करायला हवे. ऐकू येणारे संवाद, इतरत्र वाचायला मिळणारे वैशिष्ट्यपूर्ण लेखन, भाषेच्या वापराबद्दलची आपली निरीक्षणे, इ० अनेक गोष्टींबद्दल त्यांना लिहिता येईल. विशेषतः पानपूरकांसाठी त्यांना मजकूर पाठवता येईल. पानपूरके हे 'भाषा आणि जीवन'चे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यांची संख्या रोडावल्यामुळे 'भाषा आणि जीवन'मधील पांढर्‍या जागेचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. वाचक जागरूक राहिले, तर पुन्हा एकदा पानपूरकांचे पीक चांगले येईल, अशी आम्हांला आशा आहे.

'मराठी अभ्यास परिषदे'ची स्थापना १ जानेवारी, १९८२ ला झाली आणि १९८३ च्या तिसर्‍या तिमाहीत 'भाषा आणि जीवन'चा पहिला अंक बाहेर पडला. त्यानंतर 'का०स० वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था', 'महाराष्ट्र प्रतिष्ठान' या अशासकीय संस्थांची आणि शासनपुरस्कृत 'राज्य मराठी विकास संस्थे'ची स्थापना झाली. त्यामुळे मराठी अभ्यास परिषदेने आपल्यासाठी आखून घेतलेले कार्यक्षेत्र किती महत्त्वाचे व तातडीचे आहे, हे सिद्ध झाले. एखाद्या कार्याला जेवढे जास्त हात लागतील, तितके ते अधिक हलके होते आणि आटोक्यातही येते. शासकीय पातळीवरील संस्थेकडे जशा अनेक सुविधा असतात, तशा तिच्यावर अनेक मर्यादाही असतात. सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या विविध कामांमध्ये शासनाला अशासकीय संस्थांचे भरघोस व महत्त्वाचे साहाय्य होऊ शकते ही वस्तुस्थिती आता केंद्र व राज्य शासनांनीही मान्य केली आहे. म्हणून शासकीय पातळीवरील संस्थेने उद्या एखादे नियतकालिक सुरू केले, तर 'भाषा आणि जीवन'ची गरज संपणार नाही. नुकत्याच जाहीर केलेल्या पारितोषिकामुळे 'भाषा आणि जीवन'बद्दलच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि त्यामुळे आमची जबाबदारीही वाढली आहे, याची आम्हांला जाणीव आहे. वाचकांच्या प्रेमाबरोबरच त्यांचा सक्रिय सहभाग वाढत्या प्रमाणात मिळाला, तर आमचे काम सोपे होईल, असा आम्हांला विश्वास वाटतो.

प्रभाकर नारायण परांजपे

'भाषा आणि जीवन' चे रौप्यमहोत्सवी वर्षाचे अंक


'भाषा आणि जीवनच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील अंकांच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील (व नंतरच्याही) अंकांच्या मुखपृष्ठांवर महत्त्वाच्या भाषाअभ्यासकांना सादर ...

 भाषा आणि जीवन अंक : हिवाळा २००७

भाषा आणि जीवन अंक : हिवाळा २००७

 भाषा आणि जीवन अंक : उन्हाळा २००७
भाषा आणि जीवन अंक : उन्हाळा २००७

भाषा आणि जीवन अंक : पावसाळा २००७
भाषा आणि जीवन अंक : पावसाळा २००७

भाषा आणि जीवन अंक : दिवाळी २००७
भाषा आणि जीवन अंक : दिवाळी २००७


(छोट्या प्रतिमेवर क्लिक करून मोठी प्रतिमा पाहा.)


भाषा आणि जीवन: हिवाळा २००७
मुखपृष्ठाविषयी :
'भाषा आणि जीवनच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील अंकांच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील (व नंतरच्याही) अंकांच्या मुखपृष्ठांवर महत्त्वाच्या भाषाअभ्यासकांना सादर करीत आहोत. सुरुवात मराठीपासून -- मोरो केशव दामल्यांपासून.
मोरो केशव दामले (१८६८ - १९१३) हे कवी केशवसुतांचे धाकटे बंधून. बी. ए. (तर्कशास्त्र) व एम.ए. (तत्त्वज्ञान व इतिहास). ते उज्जयिनीच्या माधव महाविद्यालयात प्रोफेसर व नागपूरच्या नील सिटी हायस्कूलचे प्राचार्य होते. सुटीत पुण्याला जात असताना अपघातात मृत्यू.
'न्यायशास्त्र-निगमन' व 'न्यायशास्त्र-विगमन' हे दोन ग्रंथ. एडमंड बर्कच्या भाषणांचा मराठी अनुवाद. सुमारे १००० पृष्ठांचा 'शास्त्रीय मराठी व्याकरण' (१९११) हा ग्रंध. मराठी व्याकरणावर असे काम दामल्यांपूर्वी कुणी केले नाही. त्यांच्यानंतरही नाही.

अनुक्रमणिका
संपादकीय/संक्षिप्त रूपे : भाषिक काटकसर आणि सर्जकता/ मृणालिनी शहा/प्र.ना. परांजपे
भाषा, कथा, संस्कृती/तुका बैसला विमानीं/ विश्वनाथ खैरे
विभक्तिविचार : शास्त्राची कार्यपद्धती/ कृष्ण श्री. अर्जुनवाडकर
व्याकरण आणि अर्थ : आधुनिक भाषावैज्ञानिक दृष्टिकोन/ मिलिंद मालशे
ब्राह्मणी भाषा / ब्रह्मानंद देशपांडे
वऱ्हाडी आणि अहिराणी बोलींतील समानार्थी म्हणी/ वासुदेव सोमाजी वले
ज्याची त्याची प्रचीती/ तेलुगु-मराठी शब्दयोजन/ माणिक धनपलवार
दखलपात्र : तुम्हीच सांगा/ मंगला गोडबोले
दखलपात्र : माझा वन बीएचके फ्लॅट/ वि.आ. बुवा
दखलपात्र : भाषेची श्रृंगापत्ती/मंजिरी धोडपकर/ अनु. सुप्रिया सहस्रबुद्धे
दखलपात्र : विषमतेच्या समस्येचे खरे मूळ/ क्लॅरेन्स मलोनी/ अनु. सुप्रिया सहस्रबुद्धे
पुस्तक-परीक्षणे :
१. 'मराठीची कैफियत'/ सुभाष भेंडे
२. भाषाशिक्षणाचा व्यापक विचार/ उमाकांत रा. कामत
३. अमराठी विद्यार्थ्यांसाठी 'पाठ्यपुस्तक'!/ यास्मिन शेख
४. सिंधी कथांचा रोचक अनुवाद/ न.म. जोशी
५. संशोधकांचा वाटाड्या/ विजया चौधरीभाषा आणि जीवन अंक : उन्हाळा २००७
मुखपृष्ठाविषयी
या अंकाच्या मुखपृष्ठासाठी पाणिनीची निवड केली आहे. तो संस्कृतचा आज्ञ व्याकरणकार. 'अष्टाध्यायी'च्या रचनेतील प्रगल्भता, परिपूर्णता, अल्पाक्षरता इ. वैशिष्ट्यांमुळे आधुनिक भाषा-वैज्ञानिकही चकित होतात. त्याच्या काळाबद्दल एकमत नसले तरी तो इसवी सन पूर्व पाचव्या शतकात होऊन गेला असे बहुसंख्य अभ्यासक मानतात. पाकिस्तानातील शलातुर (आताचे लाहुर) ह्या अटकेजवळील गावात त्याचा जन्म झाला. उच्चारशास्त्र, वर्णमाला, शब्दघटना यांच्या संबंधीचे शास्त्रीय सिद्धांत त्याने मांडले.
त्याच्या व्याकरणाचे चार भाग आहेत :
(१) शिवसूत्रे (स्वनिम विचार)
(२) अष्टाध्यायी (रूपिम विचार)
(३) धातुपाठ (धातू व त्यांचे वर्ग)
(४) गणपाठ (नामांची मूळ रूपे व त्यांचे वर्ग)
यांपैकी 'अष्टाध्यायी' हे व्याकरणाचे केंद्र आहे. धातू व नामांचे मूळ रूपे यांपासून शब्द तयार करण्याचे नियम (सूत्रे) त्यात दिली आहेत. पाणिनी व त्याचे भाष्यकार पतंजली, कात्यायन व भर्तृहरी यांचा २०व्या शतकातील फेर्दिनांद द सोस्यूरपासून नोअम चॉम्स्कीपर्यंतच्या अनेक भाषावैज्ञानिकांवर प्रभाव दिसून येतो.

अनुक्रमणिका
संपादकीय/भाषेचे भवितव्य : /प्र.ना. परांजपे
आदरांजली/ विद्याव्रती डॉ. वा.के. लेले/ कल्याण काळे
भाषा,कथा, संस्कृती/ नवी भारतविद्या : एक प्रात्यक्षिक/ विश्वनाथ खैरे
भाषा-शिक्षणाचा मूलगामी विचार/ रमेश पानसे
'आरे भाषा निघंटुवु' : एक परिचय/ माणिक धनपलवार
माध्यमे भाषा(ही) घडवू शकतात/ उज्ज्वला बर्वे
ज्याची त्याची प्रचीती
१. बांधू शब्दार्थांच्या गाठी/ विद्यागौरी टिळक
२. आर्याचा भाषाविकास/ जयश्री काटीकर
दखलपात्र
१. भाषावार प्रांतरचना आणि राष्ट्रीय एकात्मता/ रामचंद्र गुहा/अनु. २. सुप्रिया सहस्रबुद्धे
३. मराठीचा पुळका आणि विळखा/ जयदेव डोळे
४. मागचं-पुढचं/ प्रशांत परदेशी
प्रतिकाराचे सौंदर्यशास्त्र / आनंद जोशी
पुस्तक परीक्षणे
१. 'शब्दानुबंध/ सुमन बेलवलकर
२. भाषाशिक्षणातील मर्मदृष्टी/ नीलिमा गुंडी
३. सांस्कृतिक इतिहासाची प्राथमिक सामग्री/ आशा मुंडले
४. 'संस्कृत साहित्य परिचय'/ सरोजा भाटे
५. रसरशीत अनुभव देणाऱ्या कविता/ विजया चौधरी


भाषा आणि जीवन: पावसाळा २००७
मुखपृष्टाविषयी
या अंकाच्या मुखपृष्टासाठी फेर्दिना द सोस्यूर (१८५७-१९१३) या प्रज्ञावान भाषावैज्ञानिकाची निवड केली आहे. जिनिव्हा विज्ञापीठात त्यांनी दिलेल्या व्याख्यानाची टिपणे एकत्र करून त्यांच्या विज्ञार्थी-सहकाऱ्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर 'कोर्स द लिंग्विस्टिक जनराल' हे पुस्तक १९१६ मध्ये प्रसिद्ध केले. त्यामुळे ऐतिहासिक व तुलनात्मक भाषाशास्त्रात सीमित झालेला भाषाभ्यास आधुनिक भाषाविज्ञानात उत्क्रांत झाला. त्या पुस्तकातील मर्मदृष्टीमुळे चिन्ह मीमांसेला चालना मिळाली आणि मानव्यविज्ञा व सामाजिक शास्त्रांतील संरचनावादाची पायाभरणी झाली.
सोस्यूर यांचा जन्म जिनिव्हा येथील एका बुद्धिमंतांच्या घराण्यात झाला. त्यांचे वडील निसर्गशास्त्रज्ञ होते. लॅटिन, ग्रीक, संस्कृत, जर्मन, फ्रेंच इ. भाषांचा जिनिव्हा येथे अभ्यास केल्यावर वयाच्या १९व्या वर्षी त्यांनी लाइप्झिग विद्यापीठात पदवी-अभ्यासक्रमासाठी प्रवेश केला. एकविसाव्या वर्षी बर्लिन विद्यापीठात एक वर्ष अभ्यास करून त्यांनी 'इंडो-युरोपीय' भाषांतील काही आदिम स्वरप्रणालीवरील प्रबंध' हे पुस्तक लिहिले. १८८०मध्ये ते लाइप्झिगला परतले व तेथे त्यांना डॉक्टरेट मिळाली. १८८० ते ९१ ही अकरा वर्षे त्यांनी पॅरिसमध्ये अध्यापन केले. पुढची बावीस वर्षे त्यांनी जिनिव्हात अध्यापन केले. भाषाविज्ञानाचे अध्यापन त्यांनी १९०६ ते १३ अशी एकूण सात वर्षे केले.

संपादकीय/ वाचन : एक भाषिक कौशल्य / नीलिमा गुंडी
भाषा-कथा-संस्कृती/ भाषा वेगळ्या झाल्या कशा ?/ विश्वनाथ खैरे
व्यूहभाषा/ द. भि कुलकर्णी
दीनानाथ : शब्द, रूप, अर्थ/ दा. ल. अडोणी
ज्याची त्याची प्रचीती
१. रुचेची ना, पटेची ना !/ प्र.ना. परांजपे
२. विद्वत्ता इवल्यांची/ शरदिनी मोहिते
पुस्तकपरीक्षणे
१. कॉलिंगवुडवर लादलेला मराठी अवतार/ प्रशांत बागड
२. अनुवादही नाही, रूपान्तरही नाही !/ मृणालिनी गडकरी
३. परिघाचा विस्तार करणारा काव्यानुवाद/जया परांजपे
४. कथनाच्या सीमारेषांवरील साहस/ हरिश्चंद्र थोरात
५. तंजावर-महाराष्ट्र अनुबंधाचा पांडित्यपूर्ण मागोवा
६. वृत्तिगांभीर्याचा अभाव/ विद्यागौरी टिळक
७. यंत्रालय ज्ञानकोशाची निर्मिती/ सदाशिव देव
पारितोषिक विजेते नियतकालिक/ विजया चौधरी
दखलयोग्य/ विंदा दीडदा/ अशोक बालगुडे
चर्चावृत्त/ विज्ञानांची मराठी : किती पुढे? किती मागे? /विजया चौधरी
शंका.../ मराठी उच्चारण आणि देवनागरी लिपी/ राजीव नाईक


भाषा आणि जीवन अंक : दिवाळी २००७
मुखपृष्ठाविषयी : ऍव्हरम नोअम चॉम्स्की (जन्म : ७, डिसेंबर, १९२८)
या अंकाच्या मुखपृष्ठासाठी नोअम चॉम्स्की या नामवंत भाषावैज्ञानिक विचारवंताची निवड केली आहे. संरचनावादी भाषाविज्ञान व वर्तनवादी मनोविज्ञान यांचे त्यांनी प्रभावी खंडन केले. निर्देशनात्मक (जनरेटिव्ह) व्याकरणाच्या सिद्धांताची सांगोपांग मांडणी केली. भाषा, मानवी मन व मानवी ज्ञान यांच्यातील परस्परसंबंधाविषयीचे एक वेगळे तत्त्वज्ञानात्मक आकलन त्यांनी सादर केले. अमेरिकेचे साम्राज्यवादी परराष्ट्रविषयके धोरण व रशियातील कम्युनिस्ट हुकूमशाही यांचे ते कडवे टीकाकार असून व्यक्तिस्वातंत्र्य व लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते आहेत. भाषाविज्ञान, मनोविज्ञान, तत्त्वज्ञान, राजकारण-समीक्षा व ज्ञानप्रक्रियांचा अभ्यास करणारी -- कॉग्निटिव्ह -- विज्ञाने अशा अनेक क्षेत्रांत त्यांची बुद्धी, वाणी व लेखणी संचार करते. चॉम्स्कींनी पेन्सिल्वेनिया विद्यापीठाची पीएच.डी मिळवून १९५५मध्ये एम.आय.टी.मध्ये अध्यापन व संशोधनास सुरवात केली. अजूनही ते तेथेच काम करतात. आतापर्यंत त्यांची ७५हून अधिक पुस्तके व एक हजाराहून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत.

आदरांजली/श्री.पु. भागवत /सरोजिनी वैद्य/ गं.ना. जोगळेकर/ वासू देशपांडे/ माधवी आपटे
भाषा-कथा-संस्कृती/ संस्कृत आणि प्राकृत/ विश्वनाथ खैरे
भाषिक प्रतिभा/ द. भि. कुलकर्णी
गुजरातीमधील भाषाविज्ञानाची सद्यस्थिती/ अरविंद भांडारी
पं. कवीश्वरांचे मराठीतील छंदचिन्हांबद्दलचे आक्षेप/ शुभांगी पातुरकर
'करत' आणि 'करताना'/ सुमन बेलवलकर
वैद्यकीय ज्ञान आणि समाजाचे प्रबोधन/ ह.वि. सरदेसाई
हस्ताक्षराच्या गमतीजमती/ कविता भालेराव
ऊंझा-जोडणी/ बळवंत पटेल
दखलयोग्य : राज्यात घडताहेत
ज्याची त्याची प्रचीती : भाषाशिक्षकांसाठी कार्यशाळा--एक अनुभव/ नीलिमा गुंडी
पुस्तक परीक्षणे
१. भाषाविज्ञानाचे स्वाध्यायपुस्तक/ श्रीधर बा. गोखले
२. सदोष तरीही उपयुक्त/ सोनल कुलकर्णी-जोशी


पहिल्या अंकाचे संपादकीय : भाषा आणि जीवन


ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात वाणीला उद्देशून एक ऋचा आहे (१० : ७१ : ४)

उत त्वः पश्चन्न ददर्श वाचम् उत त्वः शृण्वन्न शृणोत्येनाम्
उतो त्वस्मै तन्वं विसस्त्रे जायेव पत्य उशती सुवासाः

(अर्थ : तो वाणीला पाहतो पण पाहतच नाही, तो तिला ऐकतो पण ऐकतच नाही, पण त्याच्यापुढे वाणी आपल्याला संपूर्ण प्रकट करते, जशी उत्तम वस्त्र ल्यालेली पत्नी पतीच्यापुढे.) मूळ कवीला वाणीच्या गूढ स्वरूपाविषयी काही सूचित करायचे असावे. पण मला मात्र तुमच्याआमच्या प्रकट वाणीच्या अभ्यासकाला सुद्धा यातून काही सूचित होते असे वाटते. भाषेचा अभ्यासक तिच्या व्याकरणाचे नियम शोधून काढायचे म्हणतो, तिच्या उच्चाराचे बारकावे जाणून घ्यावे म्हणतो, अर्थांगाचा कीस पाडायला बघतो, पण जोपर्यंत तो तिच्यावर प्रेम करीत नाही तोपर्यंत ती त्याच्या अधीन होत नाही, आपले सगळे गुपित त्याला सांगत नाही. आणि भाषेवर प्रेम करायचे तर तिला ती ज्या व्यवहारात परिणत होते आणि ज्या भाषाव्यवहारातून जन्म घेते त्या भाषाव्यवहारात, संपूर्ण जीवनाच्या संदर्भातच पाहता आले पाहिजे. भाषेत जीवन ओतप्रोत भरलेले आहेत. किती ते परभाषीयाच्या चष्म्यातून आपल्या भाषेकडे पाहू लागले की तेव्हाच जाणवते.

    पण भाषा आणि जीवन यांचे हे अतूट नाते इथेच संपत नाही.भाषेत जीवन काठोकाठ भरलेले असले तर भाषाही जीवनात शिगोशीग भरून राहिलेली आहे. कसे ते पाहा. पांढरपेशा मुलाची पाण्याशी ओळख होते आणि दलित मुलाची पाण्याशी काही निराळी ओळख होते-- 'पाणी' हा एकच शब्द त्यांना काहीशा वेगळ्या जीवनभरल्या अर्थांची ओळख त्यामुळे पटवतो. जीवन भाषेला व्यापते ते असे. ओतप्रोत, काठोकाठ, शिगोशीग हे तीन काहीशा समान अर्थांचे पण वेगळ्या प्रतिमा घेऊन येणारे शब्द पाहा. (प्रतिमा अनुक्रमे उभेआडवे विणलेले धागे, पाण्याने भरलेले भांडे, धान्याने भरलेले माप). या प्रतिमाही इंग्रजीलाही ठाऊक आहेत : warp aud woof, full to the brim, पण या इंग्रजी शब्दांनी आपले समाधान होत नाही, अधिकपणा सुचवण्यासाठी रूपाची पुनरुक्ती साधण्याची खास भारतीय लकब त्या शब्दांत नाही. (उगीच नाही इंग्रजी बोलताना भारतीय माणसाला same to same, little little knowledge असे इंग्रजीला ठाऊक नसणारे प्रयोग करावे लागत!) जीवनाचा अनुभव घेण्याची ज्याची त्याची लकबच अखेर एक भाषिक लकब असते. भाषा जीवनाला व्यापते ती अशी.

    कधीकधी या लकबीचा वैताग येतो हे मात्र खरे, 'भाषेत जीवन काठोकाठ भरलेले असले तर भाषाही जीवनात शिगोशीग भरून राहिलेली आहे' हे माझे वाक्य ऐकल्यावर तुम्ही मनात तडफडला असाल (वैताग ! लागला हा माणूस भाषिक कोलांट्या मारायला ). एव्हाना तो वैताग निमाला असेल असे वाटावे.
                
                                                                अशोक रा. केळकर
                            Pages