भाषा आणि जीवन

चार अल्पपरिचित शब्द

अरविंद कोल्हटकर

ब्रिटिश आणि अन्य युरोपीय देशांशी घनिष्ट संबंध निर्माण झाल्यापासून भारतीय आणि युरोपीय भाषांमध्ये शब्दांची देवाणघेवाण चालू झाली आहे आणि तिची अनेक उदाहरणे आपण प्रत्यही पाहत असतो. अशाच देवाणघेवाणीतील त्यामानाने अल्पपरिचित अशा चार शब्दांच्या कथा पुढे मांडल्या आहेत.

गोंडवन अर्थात गोंड लोक राहतात तो प्रदेश हा शब्द आपल्या परिचयाचा आहे. ‘गोंडवनातील प्रियंवदा’ ह्या आपल्या कादंबरीच्या शीर्षकात ज्ञानकोशकार केतकरांनी ह्या शब्दाचा वापर केला आहे. ह्याच शब्दापासून उत्पन्न झालेला ‘गोंडवनलँड’ हा थोडासा पुनरुक्तिदोष असलेला शब्द आज भूगर्भशास्त्रात एक महत्त्वाचा पारिभाषिक शब्द बनलेला आहे. शब्दाचा हा प्रवास कसा घडला ह्या प्रश्नाचे उत्तर इंटरनेटवर थोडा शोध घेतल्यावर सापडते.

पृथ्वीवरील निरनिराळे भूभाग स्थिर नसून पृथ्वीच्या अंतर्भागातील घडामोडींमुळे ते एकमेकांपासून सतत दूर सरकत असतात अथवा एकमेकांवर आदळत असतात, हा सिद्धांत प्लेट टेक्टॉनिक्स ह्या नावाने भूगर्भशास्त्रात आज सर्वमान्य झालेला आहे. १५ ते २० कोटी वर्षांपूर्वी आजचे दक्षिण अमेरिका, आफ्रिका, अरबस्तान, भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अंटार्क्टिका हे सर्व भूभाग सलग जोडलेले आणि दक्षिण गोलार्धात होते आणि तेथून विलग होऊन ते एकमेकांपासून दूर झाले आणि आज दिसतात तेथे येऊन पोहोचले. एकेकाळी अस्तित्वात असलेल्या त्या महाखंडाला भूगर्भशास्त्रात गोंडवनलँड अशी संज्ञा देण्यात आली आहे. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासून ब्रिटिश राजवटीचा प्रभाव गोंड आणि अन्य जमाती राहत असलेल्या मध्यभारतातील अरण्यांपर्यंत जाऊन पोहोचला आणि गोंडांचा प्रदेश अशा अर्थाने गोंडवन हा शब्द ब्रिटिश सत्ताधारी वर्गाच्या सरकारी भाषेत समाविष्ट झाला. त्या भागात आढळणार्‍या आणि थराथरांनी बनलेल्या भूगर्भातील प्रस्तरांच्या रचनेचे वर्णन करण्यासाठी गोंडवन हा पारिभाषिक शब्द ब्रिटिश अभ्यासकांनी नवीनच उदयाला येऊ घातलेल्या भूगर्भशास्त्रात समाविष्ट केला. एडुआर्ड सुएस नावाच्या विएन्नास्थित जर्मन शास्त्रज्ञाने ‘पृथ्वीचा चेहरामोहरा’ अशा शीर्षकाचे एक महत्त्वाचे पुस्तक १८८५ साली लिहिले. त्या पुस्तकामध्ये भूगर्भशास्त्राला तोवर माहीत असलेल्या सर्व गोष्टींचा उल्लेख केला गेला होता. आणि तेथेच गोंडवनलँड हा शब्द पहिल्यांदा जागतिक पातळीवर जाऊन पोहोचला. कालांतराने प्लेट टेक्टॉनिक्स ही संकल्पना निर्माण झाली आणि तेथे उपरिनिर्दिष्ट महाखंडाला हीच संज्ञा प्राप्त झाली.

दुसरा शब्द म्हणजे इंग्रजीत, विशेषत: अमेरिकन इंग्रजीत, आढळणारा ‘बॉस्टन ब्रॅह्मिन’हा शब्दप्रचार. इंग्लंडातून स्थलांतर करून अमेरिकेच्या उत्तरपूर्व किनार्‍यावर प्रॉटेस्टंटांनी प्रथम वसाहती निर्माण केल्या. बॉस्टन शहराचा पाया ह्या मंडळींनीच घातला. सुरुवातीच्या काळामध्ये संस्कृती, कला, शिक्षण, लेखन, राजकारण अशा सर्व क्षेत्रांत ह्या कुटुंबांचा वरचष्मा होता. त्यामुळे समाजाच्या वरच्या थरातील ह्या काही डझन कुटुंबांना बॉस्टन ब्रॅह्मिन ही संज्ञा मिळाली. ह्या संज्ञेचे जनकत्व ऑलिवर वेंडेल होम्स सीनियर (१८०९-१८९४) ह्यांच्याकडे जाते. ते व्यवसायाने डॉक्टर होते आणि ‘अटलांटिक मंथली’ ह्या नव्यानेच स्थापन झालेल्या मासिकात ते लिखाणही करीत. हे भारदस्त मासिक अजूनही चालू आहे. त्याच्या जानेवारी १८६०च्या अंकामध्ये छापून आलेल्या ‘एका प्रोफेसरची गोष्ट’ अशा शीर्षकाच्या कथेत होम्सनी ह्या शब्दप्रचाराचा पहिला वापर केला.(जाताजाता दोन उल्लेख करावेसे वाटतात. उल्लेख करावेसे वाटतात. वैद्यकशास्त्रात नव्यानेच उत्पन्न होत असलेल्या भूल देण्याच्या प्रक्रियेला अ‍ॅनस्थीसिआ हे नाव ह्यांनीच दिले. ह्यांचेच पुत्र पुढे प्रसिद्धीस आलेले अमेरिकन सुप्रीम कोर्टाचे प्रख्यात न्यायाधीश ऑलिवर वेंडेल होम्स ज्युनियर (१८४१-१९३५). १९०२ ते १९३२ अशा प्रदीर्घ काळात ते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते. ‘क्लिअर अँड प्रेझेंट डेंजर’ ‘ड्यू प्रोसेस ऑफ लॉ’ अशा सर्वपरिचित संज्ञा त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. ह्यानंतरचा शब्द आहे ‘ब्राह्मन बुल’ किंवा नुसता ‘ब्राह्मन’. हा बैल युरोपीय बैलापासून थोडा निराळा आहे. मुळात हिंदुस्थानातील गीर आणि कांकरेज (गुजरात), नेल्लोर (आंध्र प्रदेश) येथून विसाव्या शतकाच्या प्रारंभी बैलांची ही जात अमेरिका खंडात निर्यात झाली आणि लवकरच उष्ण हवामानाला तोंड देण्याच्या तिच्या गुणामुळे तिचा प्रसार उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत, तसेच ऑस्ट्रेलियामध्ये वेगाने झाला. हिंदुस्थानाशी असलेल्या ह्या संबंधामुळे बैलांच्या ह्या जातीला ‘ब्राह्मण’ असे नाव पडले आणि ते अजूनही वापरात आहे७. ह्या जातीच्या प्राण्यांचे प्रजनन आज व्यापारी पद्धतीने मांसासाठी केले जाते.

चौथा शब्द ‘डूलाली टॅप’ अर्थात देवळाली ताप.हिंदुस्थानात सेवा केलेल्या ब्रिटिश सैनिकांच्या बोलीभाषेतील मूळचा हा शब्द आता सर्वसामान्य भाषेचा भाग बनला आहे. ब्रिटिश सैन्य अथवा हवाई दलात काम केलेल्या माझ्या काही मित्रांच्या सांगण्यानुसार साठ सालापर्यंत सर्व जुन्या सैनिकांना हा शब्द चांगला परिचयाचा होता. त्याची कहाणी अशी. देवळालीमध्ये ब्रिटिश सैनिकांचा जो तळ होता तेथेच युद्धामुळे मनावर परिणाम झालेल्या ब्रिटिश सैनिकांना उपचारार्थ पाठवीत असत आणि त्यांच्यापैकी अधिक वाईट स्थिती असलेल्यांना इंग्लंडला रवाना करीत असत. भ्रमिष्ट वर्तणूक करणार्‍याला देवळाली ताप अथवा ‘डूलाली टॅप’ झाला आहे असे म्हणण्याची पद्धत त्यामुळे पडली.

बंबैय्या हिंदीमध्ये ‘बिंदास’ हा शब्द ज्या अर्थाने वापरला जातो त्याच अर्थाने ‘डूलाली’चाही वापर इंग्रजीमध्ये आज होता दिसतो. इंटरनेटवर अशा कित्येक जागा पाहावयास मिळतात. पुण्याजवळ कोंढवा भागात सुरू झालेले एक बुटीक हॉटेल त्यांनीच तयार केलेली एक ‘बुटीक बियर’ डूलाली ह्या नावाने विकतात असे मला इंटरनेटवरच दिसले.

आंग्ल-भारतीय शब्दांचा विख्यात शब्दकोश हॉबसन जॉबसन येथे मात्र प्रस्तुत शब्द दिसत नाही.

टिपा :
१) http: / / www.thestudy.net.au / projects / gondwana-nराe.html
२) Das Antlitz der Erde.
३) Boston Brahmin.
४) ‘The Professor’s Story.’ Atlantic Monthly January १८६०.
http: / / digital.library.cornell.edu / a / atla / index.html ह्या संकेतस्थळावर ही गोष्ट मुळातून वाचावयास उपलब्ध आहे. तेथे पृ० ९३ पाहा.
५) http: / / en.wikipedia.org / wiki / Oliver Wendell_Holmes_Sr,
http: / / en.wikipedia.org / wiki / Oliver Wendell_Holmes_Jr.
६) प्राणिशास्त्रीय नाव ‘Bos primigenius indicus’
७) http: / / en.wikipedia.org / wiki / Brahman_(cattle),
http: / / www.cattle.com / articles / title / Brahman+Cattle.aspx.
८) Deolali / Doolaly Tap.
९) http: / / dsal.uchicago.edu / dictionaries / hobsonjobson / index.html.

मराठीकरण, भाषिक देवघेव, समृद्धी इ०

सुशान्त शंकर देवळेकर

‘भाषा आणि जीवन’च्या (व० २८, अं० ३) अंकात आलेला ‘संगणकव्यवहाराचे मराठीकरण’ हा लेख ‘उपक्रम’ ह्या संकेतस्थळावर घातला गेला व त्याला प्रतिसाद देताना माझ्या लेखातील काही मुद्दयांबाबत काही उपक्रमींनी मतभेद व्यक्त केले आहेत. त्या संदर्भातील काही मुद्दयांचे स्पष्टीकरण करण्याचा इथे प्रयत्न केला आहे.

उद्दिष्टांत जे मुद्दे आले आहेत ते शब्द कोणते घ्यायचे ह्याविषयी आलेले नसून मराठीकरण का करायचे ह्याविषयी आहेत. व्यावहारिक विचार करायचा तर मुळात मराठीकरण करण्यात जी शक्ती घालवायची ती कशासाठी असा प्रश्न निर्माण होतो. सध्याच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीचा विचार केला तर मराठीकरण न करणे हे अधिक सोयीचे आहे. तरीही जर मराठीकरण करायचेच असे ठरवले तर त्याची उद्दिष्टे लेखात दिलेल्या क्रमाने असतील. पहिले अस्मितेचा आविष्कार हे उद्दिष्ट असेल तर मराठीकरण केलेच पाहिजे. दुसरे भाषासमृद्धी हे उद्दिष्ट मानले तर मराठीकरण करणे बरे ठरेल. तिसरे आकलनसुलभता हेच उद्दिष्ट असेल तर ते साधण्यासाठी मराठीकरण केलेच पाहिजे असे नाही. त्यासाठी इतर मार्ग उपलब्ध आहेत.
भाषाभाषांतील देवघेव आणि भाषासमृद्धी ह्याबद्दल एक समज असा आहे की इतर भाषांतील शब्द स्वीकारल्याने भाषा समृद्ध होते. मला हा समज पूर्णपणे पटत नाही. भाषेची समृद्धी आपण कशी मोजतो हा खरा प्रश्न आहे.

त्यातला सर्वांत सोपा मार्ग म्हणजे भाषेतील (संकल्पनांचे वैविध्य दाखवणार्‍या) शब्दांची संख्या पाहणे (समान संकल्पना असणारे शब्द तात्पुरते वगळून). ह्या दृष्टीने विचार केला तर इतर भाषांतल्या शब्दांमुळे भाषा समृद्ध होते हे खरे आहे. पण त्यासाठी इतर भाषांतून शब्द घेणे अटळ नाही. कारण माझ्या भाषेत तितक्या संकल्पना व्यक्त करणारे शब्द मी घडवू शकलो तरी भाषा समृद्ध होणारच असते.

भाषेची समृद्धी दुसर्‍या प्रकारेही मोजता येईल. मला ही समृद्धी अधिक महत्त्वाची वाटते. एखादी भाषा मानवी जीवनातील किती प्रकारच्या व्यवहारांत वापरण्यात येते हे पाहता येईल. अशा व्यवहाराची परंपरा त्या भाषेत किती प्रमाणात रुजली आहे ह्यानुसार तिची समृद्धी जोखता येईल. अशा तर्‍हेच्या समृद्धीत इतर भाषांतून येणारे शब्द काही वाटा उचलू शकतील. पण तेही अनिवार्य नाही. इथेही मी त्या शब्दांऐवजी स्वत:च्या भाषेत नव्या संज्ञा घडवल्या तर समृद्धी उणावणार नसतेच. थोडक्यात भाषेची समृद्धी आणि शब्दांची देवघेव ह्यांचा तर्कदृष्ट्या अनिवार्य संबंध नाही. त्यामुळे भाषासमृद्धीसाठी इतर भाषांतून शब्द घ्यायलाच हवेत असे नाही.

इंग्रजी भाषेने इतर भाषांतून शब्द घेतले आहेत ह्याचा त्या भाषेच्या समृद्धीची संबंध जोडता येणार नाही. इंग्रजी भाषा समृद्ध आहे, कारण त्या भाषेला विविध जीवनक्षेत्रांतील व्यवहाराची मोठी परंपरा आहे. इंग्रजी भाषकांचे राजकीय वर्चस्व, त्यांची ज्ञानलालसा, ह्या दोहोंतून उभ्या राहिलेल्या ज्ञानव्यवहार आणि इतर व्यवहार ह्यांच्या व्यवस्था ही त्या परंपरेची कारणे आहेत. इंग्रजी ही केवळ इंग्रजांनी दुसर्‍या भाषांतून शब्द घेतले म्हणून समृद्ध झाली नाही. तसे म्हणणे हा काकतालीय न्याय झाला. त्यांनी जगभरातले ज्ञान आपल्या भाषेत आणले आणि नव्या ज्ञानाच्या परंपरा आपल्या भाषेतून आरंभल्या. ‘इतर भाषांतले शब्द घेतले म्हणून इंग्रजी समृद्ध झाली’ असा संबंध नसून ‘इंग्रजी भाषा समृद्ध झाली आणि तिने इतर भाषांतले शब्दही स्वीकारले’ असा संबंध आहे. विविध भाषकांचा संबंध आल्याने त्यांच्या भाषांतील शब्दांचीही देवघेव होत असते. ते साहजिक आहे. पण तिचा समृद्धीशी कारण म्हणून संबंध जोडणे हे योग्य नाही. तात्पर्य इतर भाषांतील शब्द घेतल्याने भाषा समृद्ध होते ही कारणमीमांसा मला मान्य नसल्याने इतर भाषांतून शब्द घेतल्याने इंग्रजी समृद्ध झाली हेही मला मान्य नाही. त्यामुळे तशा प्रकारची तथाकथित समृद्धी ही प्रशंसनीय वा निंद्य वाटण्याचे कारणच नाही.

इतर भाषांतले शब्द घेणे हे समृद्धीचे कारण नसले तरी तसे घेण्यात सोय आहे की नाही? सोय आहे हे मान्य करायला पाहिजे. विशेषत: आपण ज्या परिस्थितीत आहोत तिथे. नव्या ज्ञानाची निर्मिती, मांडणी आपल्याकडे आपल्या भाषांतून क्वचितच होते. त्यामुळे एखाद्या नव्या ज्ञानाची ओळख आपल्याला इंग्रजीद्वारे होते. त्यासंदर्भातील संकल्पना आपण इंग्रजी संज्ञा वापरूनच शिकतो. त्या संकल्पनासंबंधीचा व्यवहारही मुख्यत्वे इंग्रजी भाषेतून किंवा इंग्रजी भाषेतील संज्ञा वापरून होत असतो. मराठीत आपण जो व्यवहार करणार तो बर्‍याचदा फक्त उपयोजनात्मक असतो. अशा वेळी मराठीत वेगळी संज्ञा तयार करणे, तिचा संकेत रूढ करण्याचा प्रयत्न करणे ही कामे अधिक कष्टाची आहेत हे खरे आहे. त्यातून आपला उद्देश हा केवळ आकलन होणे इतकाच असेल तर नव्या संज्ञेपेक्षा परिचित अशी जुनीच संज्ञा अधिक सोयीची.

वरील युक्तिवाद नक्कीच प्रभावी आहे. पण तरीही मला तो स्वीकारावासा वाटत नाही. एक तर केवळ सोय हा मुद्दा नेहमीच विवेकी असेल असे नाही. सर्वांनीच आपापल्या भाषा सोडून इंग्रजीतच व्यवहार करणे हे अधिक सोयीचे आहे असेही कुणी पटवून देऊ शकेल. असे सांगणारे लोक मला भेटले आहेत. दुसरे म्हणजे मराठी संज्ञा घडवणे हेच मला अधिक सोयीचे वाटते. ह्याची कारणे दोन आहेत. १. राजकीय बलाबलाचा मुद्दा २. बौद्धिक आनंदाचा मुद्दा.

मी इंग्रजीतील कोणतीही संज्ञा मराठीत वापरू नये अशा मताचा नाही. पण इंग्रजीतून कमीत कमी संज्ञा स्वीकाराव्या अशा मताचा नक्कीच आहे. ह्याचे कारण इंग्रजी आणि मराठी ह्या भाषांचे सामाजिक-राजकीय बलाबल. इंग्रजी आणि मराठी ह्यांचा संबंध आपापल्या स्थानी राहून समृद्ध होणे आणि देवघेव करीत राहणे इतकाच नाही, तर किती जीवनक्षेत्रांतील व्यवहारांत कुणी टिकून राहावे असा आहे. उद्या मराठी भाषकांची भाषा बदलली तर ती कोणती भाषा होण्याची शक्यता अधिक आहे? तर ती भाषा इंग्रजी असेल हे उघड आहे. मराठी भाषकांनी इंग्रजी शब्द वापरणे म्हणजे केवळ आपली सोय पाहणे इतकाच अर्थ नाही. तर ह्या व्यवहारात मराठी शब्द वापरणे शक्य नाही असे मान्य करणेही आहे. मराठीचे वापरक्षेत्र उणावून इंग्रजीचे वापरक्षेत्र वाढवणे असाही आहे.

पण इंग्रजी संज्ञा नाकारून नुसत्या मराठी संज्ञा वापरल्याने मराठीचे सामाजिक-राजकीय बल वाढेल असे थोडेच आहे? नुसत्या मराठी संज्ञा वापरल्याने मराठीचे सामाजिक-राजकीय बल वाढेल हे काही शक्य वाटत नाही. पण तसे करून मराठीचे वेगळेपण आणि स्पर्धेत असणे अधोरेखित होईल. एखादी गोष्ट टिकून राहण्यासाठी पहिल्यांदा तिचे वेगळे अस्तित्व टिकून राहावे लागते. मराठी जिंकेल की नाही हे शेवटी बलाबलानेच ठरेल.

दुसरा मुद्दा असा आहे की नवीन संज्ञा घडवणे आणि तिचा संकेत रूढ करणे हे कष्टाचे असले तरी आनंद देणारे काम आहे असे मला वाटते. नवीन संज्ञा घडवताना त्या संकल्पनेचा परिचय अधिक दृढ होतो. संलग्न संकल्पना अधिक नेमकेपणे उमगून येतात. आपण संकल्पनांच्या अधिक जवळ जातो. आपल्या भाषेचे सामर्थ्य तिच्या मर्यादा ह्यांची जाण प्रगल्भ होते. अर्थात घडवलेली प्रत्येकच संज्ञा अशी असते असे म्हणणे नाही. पण ह्या प्रक्रियेबद्दल आस्था असणारांचा असा अनुभव आहे. ह्या कारणांमुळे मला नव्या संज्ञा घडवण्याचा मार्ग अधिक योग्य वाटतो.
संज्ञा घडवणे आणि ती रूढ होणे / करणे ह्या दोन वेगळ्या प्रक्रिया आहेत. संज्ञेचा अर्थ कळण्यासाठी कोणत्या तरी मार्गाने संकेत उमजावा लागतो. नव्या संज्ञा घडवणे शक्य आहे कारण संकेत समजावून देणे शक्य आहे. संज्ञा रूढ करण्यासाठी मात्र कळणे पुरेसे नाही. पुरेशा वारंवारतेने ती संज्ञा त्या विशिष्ट संदर्भात वापरण्यात आली पाहिजे. भ्रमणध्वनी ही संज्ञा कशासाठी वापरतात हे मराठीशिक्षित व्यक्तींना आजकाल माहीत असते. त्याचा वापर कमी प्रमाणात का होईना होतो. पण जो रूढ होण्यासाठी अनिल थत्ते ह्यांची वृत्तपत्रांतून वांरवार येणारी जाहिरातही कारणीभूत ठरली आहे. ड्राइव्हला ‘खण’ म्हटल्याने पहिल्या वेळी त्यामागची संकल्पना कळणार नाही हे मला मान्य आहे. पण ती कधीच कळणार नाही असे नाही. किंबहुना मी प्रात्यक्षिक दाखवत ‘खण’ हा शब्द वापरला तर कळायला अडचणही येणार नाही. ड्राइव्ह ह्या शब्दाचा संगणकासंबंधीचा अर्थ मला तरी असाच कळला होता. तेच खण ह्या संज्ञेबाबतही घडेल.
भाषाशुद्धीच्या भूमिकेमुळे रुळलेल्या शब्दांची हकालपट्टी होते आणि त्यामुळे भाषा बोजड / दुर्बोध होते असा एक मुद्दा आहे. दुर्बोधपणा रुळलेले शब्द बदलल्यामुळे अवतरतो हा ध्वनी मात्र सर्वस्वी योग्य नाही. जर दिलेला पर्याय चांगला नसेल तर दुर्बोधपणा येऊ शकेल. पण असे नेहमीच होईल असे नाही. दुर्बोधपणा टळावा ह्यासाठी काही काळजी घ्यावी लागेल. ट्रॅक्टरला शासन-व्यवहार-कोशात कर्षित्र असा पर्याय सुचवला आहे. तो नक्कीच दुर्बोध आहे. पण त्याऐवजी नांगरगाडा म्हटले तर ते दुर्बोध वाटणार नाही.

भाषेतले शब्द हे केवळ भाषाशुद्धीच्या चळवळीमुळेच बदलतात असे नाही. वेगवेगळ्या प्रभावांमुळेही बदलतात. अलीकडे इंग्रजीच्या प्रतिष्ठेमुळे अनेक लोक रूढ मराठी शब्दांच्या जागी सर्रास इंग्रजी शब्द वापरतात. सोमवारला मण्डे, भाताला राईस, वाढण्याला सर्व्ह कर, नवर्‍याला मिष्टर, बायकोला मिसेस, चुलतभावाला / आतेभावाला / मामेभावाला कझीन असे म्हणतात. ते हेतुत: करत नसतील पण त्यामुळे रुळलेले शब्द हद्दपार होतच असतात. खरे तर भाषा बदलते हे एकदा मान्य केले की ती वेगवेगळ्या कारणांनी बदलू शकते हे आलेच.

परकीय शब्दांना मराठीची व्याकरणव्यवस्था लावून मराठी करून घेणे हा एक मार्ग आहे आणि तो मला मान्य आहे. पण तो मी सगळीकडे वापरणार नाही. मला चांगली मराठी संज्ञा सुचत असेल तर मी ती आधी वापरीन. ‘क्लिक्’करता मला ‘टिकटिकव’ हा धातू सुचला. त्यामुळे मी ‘अमुक अमुक ठिकाणी टिकटिकवा’ असे म्हणतो. संज्ञा सुचत नसेल तिथे मराठी व्याकरण लावून ते शब्द चालतील.

भाषेत खर्‍या अर्थी लोकशाही असते, लोक जे शब्द वापरतात तेच टिकून राहतात; हे मत बरोबर असेल तर मग कुणी रूढ शब्दांना वेगळ्या संज्ञा वापरल्या तर आपण त्याला बिचकायचे खरे तर कारणच नाही; पण आपण बिचकतो ह्याचे कारण लोकांनी कोणते शब्द वापरावे ह्याबद्दल आपल्या काही धारणा असतात आणि कोणत्या तरी प्रभावामुळे लोक कोणते शब्द वापरतात हे बदलू शकेल हे आपल्याला जाणवत असते. हा प्रभाव अनेक प्रकारचा असू शकतो. प्रतिष्ठितांच्या भाषेचा, कोणत्या तरी चळवळीचा, बदलत्या परिस्थितीचा इ० त्यामुळे नव्या संज्ञा घडवा इंग्रजीतल्या सरसकट वापरू नका हे म्हणणार्‍यांचाही काही प्रभाव पडणे शक्य आहे.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण ह्या सर्व संज्ञा घडवू पण संगणकाच्या पडद्यावर मला इंग्रजीच संज्ञा दिसणार असतील आणि व्यवहारात इतरांशी बोलताना त्याच वापराव्या लागणार असतील तर हा व्यापार व्यर्थ नव्हे का? मुद्दा अत्यंत योग्य आहे. त्याचे अंतिम उत्तर आज माझ्यापाशी नाही. पण परिस्थिती आहे तशीच राहत नाही. प्रयत्नांनी समाजात काही बदल घडवता येतात ह्यावर माझा विश्वास आहे. तोवर चांगल्या मराठी संज्ञा घडवता आल्या तर त्या घडवाव्या, रुळवता आल्या तर रुळवाव्या असा प्रयत्न नक्की करता येईल.

मराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना

दिवाकर मोहनी

मराठीची प्रमाणभाषा, बोलण्याची नव्हे तर लिहिण्याची, कशी असावी तर तीमध्ये कोणताही विषय मांडता यावा. शास्त्र किंवा विज्ञान यांची सतत वाढ होत असते म्हणजे त्यांचा परीघ वाढत जातो. त्याचप्रमाणे त्या विषयांची खोलीदेखील वाढत जाते. असे सतत वाढत जाणारे विषय आमच्या भाषेला पेलता यावेत आणि तीमध्ये केलेले लेखन नि:संदिग्ध आणि अल्पाक्षर असावे अशी गरज आहे. अलीकडे लेखननियमांच्या सुलभीकरणाची मागणी होत आहे. सुलभीकरणाची गरज आहे असे मानून मी लेखनाच्या विषयात प्रवेश केला. पण सुलभीकरणाची गरज नाही अशा निष्कर्षाला मी आलो आहे.

भाषण आणि वाचन ह्या दोन्ही क्रियांनी आपणाला काही कळते. भाषण कानांना ऐकू येते किंवा ते ऐकायचे असते. आणि लेखन डोळ्यांनी वाचायचे असते. दोन वेगवेगळ्या इंद्रियांचा उपयोग आपण करीत असतो.

आंधळे लोक कानांनी ऐकून आणि बोटांनी स्पर्श करून पुष्कळ गोष्टी शिकतात. डोळ्यांच्या वापराशिवाय त्यांना विषयाचे आकलन होऊ शकते. जन्मापासून बहिरे असलेले, कर्णेंद्रियाचा वापर अजिबात न करणारे लोक वाचायला शिकू शकतात आणि त्या वाचनातून ज्ञान मिळवू शकतात. याचा अर्थ असा की आपल्याला ज्ञान मिळविण्यासाठी कोणतेही एक इंद्रिय पुरेसे असते. आपण जसे ऐकतो तसेच लिहिले गेले पाहिजे असे काही नाही. कोणतीही परकी भाषा शिकायची झाली तर ती दोन प्रकारे शिकता येते. ऐकून किंवा वाचून. व्याकरणाची पुस्तके, शब्दकोश ह्यांच्या साह्याने तिचे उच्चार कसे होतात हे न समजता कोणतीही भाषा शिकणे सहज शक्य आहे, असे माझ्या लक्षात आले. असे जर आहे तर उच्चाराप्रमाणे लिहिण्याची गरज नाही.
एक काळ असा होता की आपल्या देशात सुशिक्षितांची परस्पर-संपर्काची भाषा संस्कृत होती. बंगालमधले संस्कृत पंडित, केरळमधले आणि पंजाबमधले पंडित संस्कृत ग्रंथांमध्ये लिहिलेल्या शब्दांचा उच्चार आपापल्या पद्धतीने, त्यांच्या मुखाला असलेल्या सवयीप्रमाणे करीत. पण ते उच्चार लेखनात आणण्याचा प्रयत्न त्यांनी कधीच केला नाही. संस्कृत भाषेचे लेखन कधीच उच्चारानुसार झालेले नाही. कारण प्रदेश जितका मोठा तितके उच्चारभेद असणारच.
लेखन उच्चार दाखविणारे कमी, तर अर्थ सांगणारे जास्त हवे हे केवळ संस्कृत भाषेतच नाही तर एका अत्यंत परक्या म्हणजे इंग्रजीसारख्या भाषेमध्येही आहे. एकाच उच्चाराच्या शब्दांचे स्पेलिंग निरनिराळे करून ते हे कार्य साधतात : SON, SUN; WRITE, RIGHT; BLUE, BLEW; NEW, KNEW वगैरे.

भाषण आतापर्यंत समोरासमोर होत असे म्हणजे एकाच प्रदेशात आणि काळात बोलणारा आणि ऐकणारा असे. त्यामुळे ऐकणार्‍याला आपले शंकानिरसन तेथल्या तेथे करून घेता येत असे. लेखन मात्र दूरदूरच्या प्रदेशात जाते. इतकेच नव्हे तर लिहिणारा आणि वाचणारा यांच्या काळात काही शतकांचेही अंतर असू शकते. असे लेखन समजून घेताना त्या लेखनाचा उच्चार त्या काळी आणि त्या प्रदेशात कसा होत असे यांच्याशी वाचकाला कसलेही कर्तव्य नसे. आपण वाचताना आपल्याला आलेल्या शंका लेखकाला विचारू शकूच असे नाही, कारण आपण ज्या वेळी ग्रंथ वाचत असू त्या वेळी त्याचा लेखक हयात असेलच असे नाही.

मग एखाद्या शब्दाची शंका फेडायची कशी? अशा वेळी शब्दकोशाचा आश्रय घ्यावा लागतो. क्वचित एखाद्या व्युत्पन्न पंडिताच्या लेखनात तो लेखनाच्या ओघात त्याच्या गरजेप्रमाणे घडवलेले नवीन शब्द वापरतो. त्यांचा अंतर्भाव शब्दकोशांत असेलच असे नाही. अशा ठिकाणी शब्दकोश उपयोगी पडत नाही. पण तो शब्द व्याकरणशुद्ध असेल आणि वाचकालाही तेवढे व्याकरण येत असेल, तर त्याला अशा नव्या शब्दापासूनसुद्धा अर्थबोध होतो. त्या नव्या शब्दाचा उच्चार कसा करायचा हे त्याला माहीत नसले तरी चालते.

लेखननियमांच्या सुलभीकरणाची मागणी करणार्‍यांना तशी गरज का वाटत असावी असा विचार करीत असता मला एक गोष्ट जाणवली. त्यांना आपली भाषा संस्कृतपासून निघालेली आहे आणि जे संस्कृत चांगल्या प्रकारे शिकले आहेत त्यांनी ती सामान्य जनांवर लादली असे वाटत असावे. भाषा पूर्वी जास्त कठीण होती आणि कालमानाप्रमाणे ती सोपी होत चालली आहे आणि ती आणखी सोपी केली पाहिजे असा त्यांचा समज आहे असेसुद्धा मला जाणवले.

येथे मी एक विवाद्य विधान करतो, ते असे की मराठी किंवा तिच्यासारख्या अन्य भारतीय भाषा संस्कृतपासून निघालेल्या नाहीत. संस्कृत त्यांची जननी नाही. आपल्या आजच्या भाषा संस्कृत-प्रभावित आहेत; संस्कृतोद्भव नाहीत असे माझे मत आहे. पण तो वेगळा विषय असल्याकारणाने त्याचा येथे विस्तार करीत नाही.

आपल्या भाषेच्या लेखननियमांचे सुलभीकरण करावे अशी मागणी करणार्‍यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अशी मागणी केल्यामुळे त्यांच्या ठिकाणी आकलनशक्ती किंवा बुद्धिमत्ता कमी आहे असा समज पसरतो. वास्तव तसे नसल्यामुळे सुलभीकरणाची मागणी त्यांनी टाकून द्यावी, अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे.

ज्याला शुद्धलेखनाचे जुने नियम म्हणतात त्या नियमांनुसार लिहिलेले वाचायला मला आवडते. याचे कारण असे की त्यातील प्रत्येक वाक्य मला एखाद्या गोफासारखे विणलेले दिसते. कोणत्याही नामाचे लिंग, वचन आणि विभक्ती सतत डोळ्यांसमोर असते. क्रियापदाच्या समोर असलेल्या रूपावरून काळ, कर्त्याचे लिंग, वचन आणि पुरुष ही सारी पुष्कळशा वेळी बरोबर समजतात. नाव (होडी) आणि नाव (नाम) ह्यांतला फरक डोळ्यांना दिसावा म्हणून नाम या अर्थाने जेव्हा तो शब्द लिहिला जातो तेव्हा त्यातल्या ‘ना’ वर अर्थभेददर्शक अनुच्चारित अनुस्वार पूर्वी देत असत तो आता काढून टाकला आहे आणि आपणांस संदर्भावर अवलंबून राहण्यास सांगितले आहे. येथे प्रश्न असा आहे की अर्थभेददर्शक अनुस्वार फक्त नाव किंवा तत्सम शब्दांवरच आहे काय? ‘मला खाऊ दे’ हे वाक्य पूर्वी दोन पद्धतीने लिहिले जात होते. ‘मला खाऊ दे’ आणि ‘मला खाऊं दे’ पहिल्या ‘खाऊ’ चा अर्थ ‘मला खाण्याचा पदार्थ दे’ असा आहे. आणि दुसर्‍या अनुच्चारित अनुस्वारयुक्त ‘खाऊं’चा ‘अर्थ मला खाण्याची क्रिया करू दे’ असा होतो. खाऊ हे एका ठिकाणी नाम आहे तर दुसर्‍या ठिकाणी साहाय्यक क्रियापद आहे. येथे जो बिंदुचिन्हाचा वापर झाला आहे त्यामुळे त्या शब्दाच्या नव्हे, वाक्याच्या ठिकाणी निश्चितार्थ आला आहे. तेवढ्या एका टिंबाने पुष्कळ मोठा संदर्भ मनात निर्माण करण्याचे कार्य केले आहे. हेच वाक्य आपण सुटे वाचले आणि त्यातला अनुच्चारित अनुस्वार नको म्हणून तो दिला नाही तर खाऊ हे नाम की क्रियापद हे कळायला मार्ग नाही. हे वाक्य ज्या वेळेला उच्चारले जाते आणि ते कानांनी ऐकले जाते त्या वेळी संदर्भ तेथे उपस्थित असतो. हे वाक्य डोळ्यांनी वाचत असताना तेथे आविर्भाव नसतात. उच्चारात हेल नसतात आणि त्या वाक्याचा अर्थ स्वतंत्रपणे समजून घेण्याची सोय नसते. जुन्या पद्धतीच्या लेखननियमांत ती सोय होती.

फक्त नाम आणि क्रियापद यांतला फरक दाखविण्यासाठीच टिंबाचा उपयोग होत होता काय? नाही. तो नामाची विभक्ती दाखविण्यासाठीही होत होता. ‘मी गावाला गेलो आणि मी पुस्तक वाचले’ ह्या दोन वाक्यांतील पहिल्या ‘मी’ ची विभक्ती प्रथमा आहे आणि दुसर्‍या ‘मीं’ची विभक्ती तृतीया आहे. ‘डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसतो कानी पदी चालतो’ या चरणाचा कर्ता ‘मी’ की ‘तो’ हे तेथे हा अनुच्चारित अनुस्वार काढून टाकल्यामुळे समजण्याचा मार्ग खुंटला आहे. बघतो, परिसतो, चालतो, चाखतो वगैरे क्रियापदे प्रथमपुरुषी आणि तृतीयपुरुषी कर्ता असताना त्यांचा उच्चार समान असला तरी प्रथमपुरुषी क्रियापदाच्या अंत्याक्षरावर टिंब असते. त्या एका टिंबामुळे वाक्याच्या कर्त्याचा पुरुष माहीत होतो. ‘घोडे पळाले’ येथे एक घोडे की पुष्कळ घोडे पळाले, हे सांगण्यासाठीसुद्धा अनुच्चारित अनुस्वाराचा उपयोग होत होता. ‘घोडें पळालें’ येथे कर्ता नपुंसकलिंगी आहे आणि एकवचनी आहे, हे त्या अनुस्वाराच्या योगाने स्पष्ट होते. दिवाळी-दिवाळीं, वांचाल-वाचाल, जिवाणूं-जीवाणू असे प्रत्येक शब्दाच्या ठिकाणी निश्चितार्थ येण्यासाठी जुने शुद्धलेखन जास्त उपयुक्त आहे, अशा निष्कर्षाला मी आलो आहे. पूर्वीच्या हस्तलेखनात दोन शब्दांमध्ये अंतर ठेवण्याचा प्रघात नव्हता. त्यामुळे दिनचर्या आणि दीन चर्या अशांसारखे शब्द जोडून लिहिले जात होते. ह्या दोन शब्दांतील अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी उच्चाराचे र्‍हस्व-दीर्घत्व सांभाळण्याची गरज आहे. भाषेमध्ये सतत नवनवीन शब्द येतात. त्यांपैकी काहींचे उच्चार पूर्वीच्या एखाद्या शब्दासारखे असू शकतात. अशा दोन शब्दांमधील अर्थभेद स्पष्ट व्हावा यासाठी त्यातील स्वरांचे र्‍हस्व-दीर्घत्व बदलून वा अनुच्चारित अनुस्वाराचा उपयोग करून अर्थभेद दाखविण्याचे कार्य होऊ शकते. पुढे तीन शब्द मी लिहीत आहे. कोणत्याही शब्दाचे अर्थनिश्चयन करण्यासाठी बिंदुचिन्हाचा उपयोग कसा होतो ते दाखविण्यासाठी आहेत. अंगकाठी, जरीकाठी आणि इंद्रायणीकाठी. पूर्वीच्या नियमानुसार ते अंगकाठी, जरीकांठी आणि इंद्रायणीकांठीं असे लिहिले जात असत. काठ हा शब्द किनारा या अर्थाने वापरला गेल्यास ‘कां’वर टिंब देण्याचा प्रघात होता. आणि नदीकांठींमध्ये काठ या शब्दाची सप्तमी विभक्ती आहे हे त्या टिंबाने स्पष्ट होत होते.

नामांपासून अव्यये डोळ्यांना वेगळी ओळखता यावीत ह्यासाठी अव्यये र्‍हस्वान्त ठेवली जात असत. किंवा र्‍हस्व करणे शक्य नसल्यास त्यांवर अनुच्चारित अनुस्वार दिला जात असे. ‘आणी’ हे क्रियापद आणि ‘आणि’ हे अव्यय डोळ्यांना वेगळे दिसावे ह्यासाठी तसे लिहिले जात होते. ‘यथाशक्ती’ सारखी अव्यये आजही र्‍हस्वान्त लिहिली जावीत, असा नियम आहे. पण अव्यये म्हणजे काय हे माहीत नसल्यामुळे आणि सगळेच शब्दांच्या अंती येणारे इकार उकार दीर्घान्त लिहावे एवढाच नियम माहीत असल्यामुळे ते दीर्घान्त लिहिले जाऊ लागले आहेत. मुळे हे नाम आणि मुळें अव्यय; साठी हे नाम व साठीं हे अव्यय. ‘तो जाता झाला’, ‘जातां जातां गाडीत त्याने पुस्तक वाचले.’ ह्या वाक्यांतील पहिला जाता आणि पुढचे जातां जातां ह्यांमधला अर्थभेद डोळ्यांना दाखविण्याची सोय आम्ही गमावली आहे आणि प्रत्येक ठिकाणी संदर्भ लक्षात ठेवण्याची गरज निर्माण केली आहे.

वाचताना संदर्भावर कमीतकमी अवलंबावे लागावे ह्यासाठी शब्दांच्या लेखनामध्ये फरक करण्याची पद्धत बहुतेक सगळ्याच भाषांमध्ये आहे. उर्दूमध्ये तीन भाषांचे मिश्रण आहे. अरबी, फारसी आणि हिंदी. तिचे लेखन पुष्कळसे फारसीप्रमाणे करण्याची पद्धत आहे. परंतु तीमध्ये अरबी शब्द अरबीसारखेच लिहिले जातात. एकच किंवा जवळचे उच्चार दाखविणारी तीन-तीन व्यंजने आहेत. परंतु कधीही एका व्यंजनाची जागा ते दुसर्‍या व्यंजनाला घेऊ देत नाहीत. इंग्लिशमध्येही अर्थभेद दाखविण्यासाठी शब्दाच्या लिखित रूपाने निश्चित अर्थ दाखवावा, अशी सोय असल्याचे पूर्वी सांगितले आहे.

मुद्रणपूर्व काळात पद्य बाळबोधीत (देवनागरीत) आणि गद्य मोडीत लिहिले जात होते. पद्य अल्पाक्षर आणि छंदोबद्ध असल्याकारणाने त्यामध्ये अर्थबोधासाठी त्याचा अन्वय करण्याची गरज असते. त्याचप्रमाणे त्यामध्ये छंदाच्या गरजेसाठी र्‍हस्व-दीर्घाचे बंधन पाळणेही गरजेचे असते. अन्वय करणे सोपे जावे ह्यासाठी लिंग-वचन-विभक्तीच्या, त्याचप्रमाणे काळाच्या आणि अर्थाच्या खुणा सगळ्या शब्दांना अंगावर वागवाव्या लागतात. इतकेच नव्हे तर काही शब्दांचे व प्रत्ययांचे अध्याहरण करावे लागते. पद्यलेखनाच्या वरील गरजांसाठी घडलेले लेखनाचे नियम आपण नंतर गद्यातही वापरू लागलो. हे गद्य मुख्यत: मुद्रणासाठी लिहिले गेले. (आपसातला पत्रव्यवहार मोडीमध्ये चालू होता. मोडीमध्ये एकच वेलांटी आणि एकच उकार आहे. आणि उच्चारित अनुस्वाराचादेखील वापर होत नाही.)

हे सारे घडले ते मुद्रणाच्या गरजेमुळे पण त्याच वेळी मराठीचा इंग्रजीशी संपर्क वाढत चालला होता. आणि आपल्या भाषेमध्ये तोवर कधीच न आलेल्या विषयांचा अंतर्भाव होऊ लागला होता. ह्या नवीन विषयांसाठी नवे पारिभाषिक शब्द घडविण्याची गरज होती आणि ते घडविण्यासाठी संस्कृत भाषेचा आश्रय करावा लागणे अपरिहार्य होते. हे पारिभाषिक शब्द पूर्णपणे नवीन असल्याकारणाने ते कोशगत झाले नव्हते. म्हणून त्या शब्दांचे आकलन होण्यासाठी संस्कृतच्या व्याकरणाच्या ज्ञानाची गरज होती. ते शब्द आपल्या भाषेत पुढे रुळल्यामुळे त्यांच्या ठिकाणी सातत्य हा गुण आला आणि त्या सातत्यामुळेसुद्धा त्यांच्यात निश्चितार्थता आली. भाषेला या शब्दांमुळे प्रौढत्व आणि सौष्ठव प्राप्त झाले. हे सारे शब्द संस्कृत भाषेच्या नियमांप्रमाणे घडविल्यामुळे ते कोणाच्याही उच्चाराप्रमाणे लिहिले गेले नाहीत. तर मुळाप्रमाणे (तत्सम) लिहिले गेले. ह्या नव्या, संस्कृतातून घेतलेल्या, शब्दांची संख्या जशी मराठीत वाढू लागली तशी मोडीलिपी त्यांच्या वापरासाठी अपुरी पडू लागली.

एखादा नवीन विषय भाषेमध्ये आणायचा हे मोठे अवघड काम आहे. त्या विषयाचे आकलन होण्यासाठी वाचकांच्या ठिकाणी कोणतेही संदर्भ असत नाहीत. कारण तो विषय त्यांच्यासाठी पूर्णतया नवीन असतो. तेवढ्याचसाठी प्रत्येक शब्दाने संदर्भावर अवलंबून न राहता नेमका अर्थ व्यक्त करावा अशी गरज असते. हे काम उच्चारानुसारी लेखनामुळे होऊ शकत नाही. कारण त्या शब्दांच्या योगे उच्चार व्यक्त करावयाचा नसतो तर वाचकाच्या मनामध्ये अर्थाचे संक्रमण करावयाचे असते. त्यासाठी ते व्याकरणशुद्ध असावे लागतात. एकदा हे शब्द भाषेत रूढ झाल्यानंतर ते वाचकांच्या डोळ्यांना परिचित झाले. इतकेच नव्हे तर त्या शब्दांपासून एकच अर्थ व्यक्त व्हावा ह्यासाठी त्यांच्या लेखनात सातत्य राखावे लागले. त्या शब्दांना कोशगत करावे लागले. त्यांच्या लेखनात सातत्य राखल्यामुळे एक आनुषंगिक गुण त्यांना प्राप्त झाला. ते ओझरते पाहूनदेखील त्यांचा अर्थ (नित्य परिचयामुळे) वाचकाला समजू लागला.
मराठीच्या बोलीभाषा ह्या घरांत, शेतात किंवा रणांगणावर वापरण्यासाठी घडलेल्या आहेत. रणांच्या गरजेसाठी घडवलेल्या भाषेत देश्य शब्दांच्या बरोबर काही परकीय म्हणजे फारसी, अरबी आणि पोर्तुगीज शब्दही आले. पण ज्या वेळी मराठी ही तीन क्षेत्रे सोडून विज्ञानाच्या वा तत्त्वज्ञानाच्या सभामंडपात शिरली त्या वेळी तिला संस्कृत भाषेचा आश्रय करावा लागला. आणि तत्सम शब्दांचा तिच्यात भरणा झाला. आमची मराठी बोली पारिभाषिक शब्दांच्या बाबतीत पूर्णपणे परावलंबी आहे. ह्या परावलंबनामुळे बोलीभाषांची स्वतंत्रपणे होऊ शकणारी वाढ खुंटून गेली. न्यायालयात वापरण्यासाठी संविधानासारखे ग्रंथ रचण्यासाठी वा विश्वकोशातील नोंदी लिहिण्यासाठी जी भाषा वापरावी लागते, ती पूर्णपणे संस्कृतनिष्ठ असल्याकारणाने आमच्या बोलीपासून फार दुरावलेली आहे. परंतु नाइलाजास्तव तीच वापरणे भाग आहे.

अंदाजे गेल्या साठ वर्षांपासून मराठी भाषेच्या शिक्षणाकडे आपले दुर्लक्ष आहे. मला येथे मुद्दा मांडावासा वाटतो तो असा की आम्ही जसे बोलतो तसे लिहितो किंवा तसे लिहावयास पाहिजे ह्या आपल्या समजामुळे ‘‘मातृभाषा काय शिकवायची?’’ असे आम्हांस वाटू लागले. भाषेच्या शिक्षणाच्या नावाने आम्ही थोडे साहित्य शिकविले; परंतु भाषेचे व्याकरण व शब्दांची घडण ह्या दोन गोष्टी शिकविण्याकडे आम्ही पूर्ण दुर्लक्ष केले. कोणतीही भाषा फक्त साहित्य व त्यातही ललित साहित्य लिहिण्यासाठी वापरली जात नाही. तर तिच्यात जीवनावश्यक सगळेच विषय लिहिले-बोलले जातात. भाषा जर चांगली नसेल तर त्या विषयांच्या संकल्पना स्पष्ट होत नाहीत. वाढ खुंटते. गेल्या अनेक वर्षांत, साहित्याचा प्रांत सोडल्यास आपल्या भाषेतून नवीन विचार मांडले गेले नाहीत ते यामुळेच.

भाषण कानांसाठी आहे व लेखन डोळ्यांसाठी हे आपण पूर्वी पाहिलेले आहे. येथे सांगायचे ते असे की, वाचन श्रवणापेक्षा कठीण आहे, त्रासदायक आहे. तोंडाने आवाज करणे व तो कानांनी ऐकणे हे बहुतेक सगळे चार पायांचे प्राणीसुद्धा करतात. ही त्यांची क्षमता माणसांत आली आहे इतकेच नव्हे तर अन्य प्राण्यांपेक्षा पुष्कळ निरनिराळ्या प्रकारचे आवाज काढणे त्याला शक्य झाले आहे. दृश्य संकेत हे अगदी अलीकडे म्हणजे पाचसहा हजार वर्षांपासून माणूस वापरू लागला आहे. हातांनी निरनिराळी चिन्हे काढून त्यांच्या योगाने अर्थबोध करून देणे हे मानवाच्या इतिहासात अगदी नवीन आहे. परंतु त्याचा वापर झपाट्याने वाढणार आहे. कानांनी ऐकताना अर्थबोध करून घेण्यासाठी पूर्ण वाक्य ऐकावे लागते. आणि डोळ्यांनी वाचताना अक्षरन्अक्षर वाचण्याची गरज नसते हे आपणांस ठाऊक आहे. कानांना सिक्वेन्शियल अ‍ॅक्सेस (क्रमेण) असतो आणि डोळ्यांना रँडम अ‍ॅक्सेस (यादृच्छिक) असतो. तेवढ्यामुळेच वाचन लवकर होते. मुद्रण सुरू झाल्यापासून माणसाला वाचनाची गती वाढविणे भाग पडले आहे, आणि शक्यही झाले आहे. सगळ्यांचीच वाचनाची गती दिवसेंदिवस वाढवावी लागणार आणि ते साध्य व्हावे म्हणून मुद्रणात एकसारखेपणा ठेवणे आवश्यक झाले आहे. मुद्रणात एकसारखेपणा असल्याशिवाय वाचनाची गती वाढू शकत नाही. एकसारखेपणा ठेवण्याच्या गरजेमुळेच शुद्धलेखनाचे नियम करावे लागतात आणि जुन्या-नव्या पुस्तकांमध्ये लेखनविषयक सातत्य राखावे लागते.
लेखननियम सुलभ करण्याचा हेतू, ते सर्वांच्या आटोक्यात यावेत हा असतो. पण सगळ्या लोकांची क्षमता सारखी नसते. जे सगळ्यांना सहजपणे अमलात आणता येतील असे नियम अमलात आणणे इष्ट आहे असा समज आहे. पण तो चुकीचा आहे. कारण सध्या सुलभ केलेले नियमही फारच थोड्यांना वापरता येतात व सोपे करण्याच्या भानगडीत त्यांत विसंगती आल्यामुळे ते कठीणही झाले आहेत.

येथे प्रश्न हा पडतो की, गणित हा विषयही सर्वांच्या आटोक्यातला नाही. पण म्हणून गणितातील नियम (सूत्रे) बदलायची का? की शिकविण्याच्या पद्धती बदलायच्या? बीजगणित आणि शून्यलब्धी हे विषय पुष्कळांना जड जातात म्हणून ते कायमचे काढून टाकायचे का?
आज आपल्या भाषेतल्या लेखननियमांच्या बदलत्या स्वरूपामुळे परभाषी लोक मराठी भाषा शिकायला धजत नाहीत. त्याचप्रमाणे जुन्या शुद्धलेखनाचे नियम गेली साठ वर्षे शाळांमधून न शिकविल्यामुळे प्राचीन मराठी वाङ्मयाचा आस्वाद आज कोणालाच घेता येत नाही. व आमची साहित्याची उज्ज्वल परंपराच नष्टप्राय झाल्यामुळे एक मोठी सांस्कृतिक पोकळी निर्माण झालेली मला जाणवते, ती आपल्याला का जाणवत नाही? ही कोण आणि कशी भरून काढणार? चिपळूणकरांच्या पूर्वीचे सर्व गद्य व केशवसुतांच्या पूर्वीचे सर्व पद्य यथामूल म्हणजे जुन्या लेखननियमांप्रमाणेच लिहावे हा नवा नियम करून तर अधिकच गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे काही ‘नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे’ ह्यासारख्या म्हणी कशा लिहायच्या असा प्रश्न पडतो. त्या म्हणी चिपळूणकरपूर्वकालीन की उत्तरकालीन, हे कसे ठरवायचे? सोनारें ही सोनार या शब्दाची तृतीया विभक्ती आहे. आणि व्याकरणाच्या नियमाप्रमाणे तृतीया विभक्तीच्या सर्व प्रत्ययांवर अनुच्चारित अनुस्वार देणे आवश्यक आहे. व्याकरण हे शास्त्र पॉझिटिव्ह सायन्स आहे, ते नॉर्मटिव्ह सायन्स नाही. आपली भाषा पूर्वी कशी लिहिली गेली एवढेच व्याकरणशास्त्र सांगते. पुढे ती कशी लिहावी हे सांगण्याचा अधिकार व्याकरणाला नाही. लिहिलेल्या भाषेचे व्याकरण आणि बोलीभाषेचे व्याकरण ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत. बोली प्रत्येक दहा कोसांवर बदलते. इतकेच नव्हे तर ती महाराष्ट्रात प्रत्येक जातीप्रमाणेही बदलते. त्यामुळे बोलीचे एकच एक व्याकरण अशक्यप्राय आहे. व्याकरणामध्ये लिंग, वचन आणि विभक्ती इत्यादींचे विकार नामांना कसे होत आले आहेत त्यांचे वर्णन असते. बोलींत ठिकठिकाणी ते विकार बदलतात. त्यामुळे मराठीच्या बोलीभाषांचे एक व्याकरण होऊ शकत नाही. बोलीभाषेतले शब्द प्रमाणभाषेत घेण्यात कसलीच आडकाठी नाही. फक्त ते घेताना त्या त्या शब्दाचे लिंग ठरवून त्याची अनेकवचनी रूपे कशी होतील आणि सामान्य रूप कसे होईल ह्याचा निर्णय करणे व ती कोशगत करणे आवश्यक असते. कोणत्याही भाषेमध्ये शब्दांची भर सतत पडावयासच पाहिजे आणि बोलीभाषेतून मोठ्या संख्येने ते घेतले जावेत.

प्रमाणभाषेचे नियम फक्त छापील मजकुराला लागतात. छापील म्हणजे सार्वजनिक मजकुराला लागतात. खाजगी मजकूर त्यांपासून मुक्त असतो. कोणताही मजकूर छापण्यापूर्वी तो जाणकारांनी पाहून छापण्यास द्यावयाचा असतो. पूर्वीचे प्रकाशक आणि मुद्रकसुद्धा हे काम नियमितपणे करीत होते.

प्रमाणभाषा ही सगळ्यांनाच परकीय भाषेसारखी शिकवायला पाहिजे कारण ती बोलीभाषेपासून अगदी वेगळी असते. ती उच्चारबोधक असण्यापेक्षा जास्त प्रमाणात अर्थबोधक असते. ती इतिहासाकडे वळलेली असते आणि ती कानांसाठी नसून डोळ्यांसाठी असते.
येथे मराठी भाषेची इंग्रजीशी केलेली तुलना अप्रस्तुत होणार नाही. इंग्रजी आता ज्ञानभाषा म्हणून जगात प्रतिष्ठा पावली आहे. तिचा शब्दसंग्रह विशाल आहे. हा शब्दसंग्रह त्या भाषेने इतर भाषांमधून उचल केल्यामुळेच वाढला आहे. तांत्रिक, वैज्ञानिक त्याचप्रमाणे तत्त्वज्ञानाचे विषय जेव्हा इंग्रजीला नवीन होते तेव्हा तिने ग्रीक आणि लॅटिन भाषेतून शब्द घेऊन आपली निकड भागवली. त्यानंतर जसजसा इतर भाषांशी तिचा संपर्क वाढला तसतसे त्या भाषांतले शब्द तिने आत्मसात केले. ते तसे करताना त्या शब्दांचे स्पेलिंग कसे करावयाचे हे ठरविले म्हणजे त्यांना तत्सम शब्दांसारखे वागवून कोशामध्ये स्थान दिले. ते एकदा कोशगत झाल्यानंतर त्यांच्या स्पेलिंगमध्ये कधीही बदल घडू दिला नाही.

इंग्लंडमधल्या लोकांची मातृभाषा ‘प्रमाणभूत इंग्लिश’ आहे असे आपण समजतो. परंतु ते बरोबर नाही. तेथे पुष्कळ बोली आहेत आणि त्यांचा वापर त्या-त्या प्रदेशात अनौपचारिकपणे होत असतो. इंग्लंडमधील लोकांची मातृभाषा जरी इंग्लिश असली आणि त्यांना आयुष्यभरात दुसरी भाषा शिकण्याची गरज नसली तरी तेथल्या सर्व नागरिकांना प्रमाणइंग्लिश बिनचूक लिहिता येते असे नाही. औपचारिक प्रसंगी वापरावयाची भाषा सर्वांनाच वेगळी शिकावी लागते. आणि काही जणच तीमध्ये प्रवीण होतात. ते तिचे लेखनविषयक नियम काटेकोरपणे पाळतात. एकदा स्वीकारलेल्या प्रमाणभाषेत त्यांनी वेळोवेळी बदल केला आहे असे आढळत नाही. आमच्या देशात अर्थातच इंग्लंडमधील बोलीभाषा शिकवल्या जात नाहीत. प्रमाण इंग्रजी भाषाच शिकवली जाते. आणि त्या आमच्यासाठी नवख्या असलेल्या भाषेचे नियम आम्ही सगळेच निमूटपणे पाळतो.

आपली भाषा ज्ञानभाषा व्हावी असे जर आपल्याला वाटत असेल तर तिला शास्त्रशुद्ध बैठकीवरच बसवावे लागेल. आणि तिचे शिक्षण औपचारिकपणे सर्वांना घ्यावे लागेल. इंग्रजी भाषा जशी आपण तिच्या व्याकरणाविषयी कुरकुर न करता स्वीकारतो, तिच्यामधील शब्दांचे स्पेलिंग पाठ करतो, तसेच आपल्याही औपचारिक मराठी भाषेचे म्हणजेच प्रमाणभाषेचे नियम आपण स्वीकारले पाहिजेत. त्याचप्रमाणे जुन्या-नव्या नियमांमध्ये सातत्य राखले पाहिजे.

अक्कलकुवा तालुक्यातील पावरी बोलीतील उखाणे

प्रकाश श्रीराम साळुंके

म्हणी-वाक्प्रचारांप्रमाणेच उखाण्यांनाही प्राचीन मौखिक परंपरा लाभलेली आहे, महत्त्वाचे स्थान लाभलेले आहे. ‘उखाणा’ या शब्दाला प्रश्न, कूट, ब्रह्मोद्य, प्रवल्हिका किंवा प्रहेलिका असे संस्कृत प्रतिशब्द आहेत. ग्रामीण भागात उखाण्यांना ‘कोडी’ किंवा ‘आहणा’ असेही शब्द वापरले जातात. श्रीमती दुर्गा भागवत म्हणतात, ‘‘आह’’ ह्या धातूपासून उखाण्यांची निर्मिती झालेली आहे. ‘आह’ हा धातू अत्यंत प्राचीन अशा वेदकाळातील वेदवाङ्मयात व तद्नंतरच्या संस्कृत वाङ्मयात आढळतो. आज मराठीत ‘आह’ हा धातू वापरात नसला, तरी ‘आहणा’ या शब्दात तो बोलीभाषेत वापरलाच जातो.’’ आजही खानदेशातील मुख्य बोलीभाषेत म्हणजे अहिराणी बोलीत उखाण्याला ‘आहणा’ हाच शब्द प्रचलित आहे.

उखाण्यांना वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळी नावे प्रचलित आहेत. जसे गुजरातीत उखाणो, सिंधीत उखाणी, हिंदीत व बंगालीत पहेली, कानडीत ओगणू किंवा प्रहलिके, तेलुगुत विडीकथ, तामिळीत विडीकदाई इ० वरीलप्रमाणे उखाण्यांना वेगवेगळ्या भाषेत जशी वेगवेगळी नावे आहेत तशीच वेगवेगळ्या आदिवासी जमातीतही वेगवेगळी नावे रूढ आहेत. जसे छोटा नागपूरच्या मुंडा लोकात नुतम कहाणी, गोंड लोकात करसाळ, आदिवासी भिल्ल लोकात जिखण्यो, तसे अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासी पावरी बोलीत ‘सुडवेणन् काण्या’ हा शब्द रूढ आहे.
उखाण्याचे स्वरूप प्रश्नोत्तरासारखे असते. उखाण्यातील प्रश्नात गूढार्थ असतो. तर उत्तरातून गोपनीयतेचा स्फोट करून मूलार्थ व्यक्त केला जातो. उखाण्यांची रचना अगदी ठसकेबाज असते. गोपनीयता, कल्पनाचातुर्य आणि उत्कंठावर्धकता ही उखाण्यांची वैशिष्टये असतात. उखाण्यात खटकेबाज व मार्मिक विनोदही असतात. ऐकणार्‍याला संमोहात टाकून त्याचा गोंधळ उडवणे आणि त्याच्या मनात संभ्रम निर्माण करणे हे उखाण्याचे कौशल्य असते. डॉ० सुधीर कोठवदे म्हणतात,
‘‘उखाणे त्या समाजमानसाची उच्च आकलनक्षमता, सांस्कृतिक परिप्रेक्ष्य आणि जीवनार्थाचे आकलन करण्याचा शहाणपणा व्यक्त करतात.’’

उखाण्यात म्हणींप्रमाणे व्यापकता आहे. मनोरंजनाचे व ज्ञानवर्धनाचे ते महत्त्वाचे साधन आहे. मानवी कल्पनांची आणि अनुभवांची अभिव्यक्तीही उखाण्यांमधून होते. म्हणजेच उखाणे मानवाला विचार करण्यासही प्रवृत्त करतात. सामाजिक व्यवहारात, माणसांच्या दैनंदिन वापरात-खाण्यापिण्यात ज्या वस्तू येतात, माणूस नेहमी ज्या पशुपक्ष्यांमध्ये वावरतो त्या सगळ्यांमध्ये उखाण्यांचे स्वरूप पाहायला मिळते. आजही लग्नप्रसंगात किंवा करमणुकीत उखाणे सांगण्याच्या पद्धती आढळतात. म्हणींप्रमाणे व्यापक असलेले, बुद्धीला चालना देणारे व मनोरंजन करणारे उखाणे प्रत्येक जाती-जमातीच्या बोलीभाषेत प्राचीन काळापासून मौखिक परंपरेने पिढ्यानपिढ्या संक्रमित होत आलेले आहेत.

अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासी पावरा जमातीच्या पावरी बोलीतही पारंपरिक पद्धतीचे उखाणे प्रचलित आहेत. दिवसभर अंगमेहनतीचे काम करून रात्री एकत्र जमल्यावर मद्यपानासोबत उखाण्यांच्या साहाय्याने ते शारीरिक व मानसिक थकवा घालवतात व आपल्या ज्ञानाचे आदान-प्रदान करतात.

आदिवासी पावरांच्या बोलीतील काही उखाण्यांचे मराठी भाषेत रूपांतर करून त्याचे उत्तर सांगण्याचा प्रयत्न येथे मी केलेला आहे.
(पावरा बोलीतील उखाणा पहिल्या ओळीत, त्याचे प्रमाण मराठी भाषांतर दुसर्‍या ओळीत व त्याचे उत्तर तिसर्‍या ओळीत)
१) ची आवी ची गोयी?
ही आली आणि ही गेली?
नजर
२) मुठ भोरीन तोह नी गोनाय, मेह नी गोनाय?
मूठभर मोजणे देखील कठीण?
केस
३) आयतली सुरी राजाहा बोठ कोयतली?
लहानशी मुलगी राजालाही खाली बस म्हणते?
पायात रुतलेला काटा
४) आयतली सुरी राजाह खिजवतली?
लहानशी मुलगी राजाला चिडवते?
माशी
५) आयतली सुरी राजाहा रडावतली?
लहानशी मुलगी राजालाही रडवते?
कांदा
६) आयतली सुरीन दह पाय?
लहान मुलीला दहा पाय?
खेकडा
७) आथभर डेमणी तोहनी उमकाय मेहनी उमकाय?
हातभर तुकडा तुमच्या हातातही येणार नाही व आमच्या हातातही येणार नाही?
माणसाची सावली
८) देव-देवन पेल्लू टिलू कुणीही लागतलू?
देव-देवतांच्या आधी कुणाला टिळा लावत जातो?
बोटाला
९) काम कोन्ने ओगे ने खानेवेले फोसी?
आधी काम करणारी आणि नंतर खाणारी?
कोंबडी
१०) एक रंगाम खूप रंग?
एका रंगात अनेक रंग?
अंडे व अंड्यातील पिलू.
११) राती राती भल्ल दिहू दिहू टाल्ल?
रात्री-रात्री भरलेले, दिवसा दिवसा रिकामे?
गुरांचा गोठा
१२) राती राती टाल्ल दिहू दिहू भल्ल?
रात्री-रात्री रिकामे, दिवसा-दिवसा भरलेले?
अंथरूण ठेवण्याची घडवंची
१३) एक दादून डीलम खूप दात?
एका दादाच्या पोटात अनेक दात?
भोपळा
१४) उपर सुत्र, माय आड, माह अने पाईं?
वरती साल, मध्ये हाड, मास आणि पाणी?
नारळ
१५) एक दरम दुय आथे हुदवे?
एकाच खड्डयात दोन हाताने कुदते?
मुसळ
१६) पानहारखं पान बिनडेट्या पान?
पानासारखं पान बिनदेठाचे पान?
पापड
१७) एक पग हौ आथ?
एकच पाय आणि शंभर हात
साबर (काटेरी वनस्पती)
१८) एक बायरं गरमाय घुमती घुमती बारथे आवे?
एक बाई घरातून घुमत-घुमत बाहेर येते?
झाडू
१९) बांडय गदळं दुवाख मुतं?
बांडे गधडं दोन्ही बाजूला मुतते?
घरावरचे छप्पर
२०) दर्‍यू आट जाय वेवाणी मर जाय?
रॉकेल आटून जाते आणि वात जळून जाते?
चिमणी
२१) ताबान डेगडीम राय राय बिजा?
तांब्याच्या डेगडीत (हंड्यात) खूप खूप बिया?
उंबर
उखाण्यांची प्राप्ती
१) भरत पावरा, देवमोगरा पुनर्वसन
२) वसंत पावरा, देवमोगरा पुनर्वसन
३) उग्रावण्या पावरा, देवमोगरा पुनर्वसन
४) जांभा पावरा, देवमोगरा पुनर्वसन

संदर्भ :
१) भागवत, दुर्गा, ‘लोकसाहित्याची रूपरेखा’, वरदा बुक्स, पुणे. १९७७ (आवृत्ती २).
२) कोठावदे, सुधीर, ‘मावची बोली : समाज आणि संस्कृती’, आशापुरी प्रकाशन, साक्री. २०००.

खानदेशातील गुर्जर बोली : काही निरीक्षणे

फुला बागुल

महाराष्ट्रातल्या खानदेशात धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांत बोलल्या जाणार्‍या विविध बोलींपैकी ‘गुर्जर’ ही एक जातनिदर्शक बोली आहे. गुर्जर ही एक शेती करणारी अत्यंत कष्टकरी, अल्पसंख्य जमात (लोकसंख्या साधारण चाळीस हजार) असून सात्त्विक प्रवृत्तीचीही आहे. कृष्णभक्तीची परंपरा या जातीत असून काही बांधव महानुभाव पंथीय तर काही बांधव स्वाध्याय संप्रदायातील आहेत. रेवा (लेवा) गुजर, दोरे गुजर, डाले गुजर, कडवा गुजर, गरी गुजर, बडगुजर, खापरागुजर या त्यांच्यातील पोटजाती आहेत. पंजाब, राजस्थान, गुजरात येथून गुर्जर अकराव्या शतकात खानदेशात स्थलांतरित झाले. विविध अभ्यासकांनी या संदर्भात पुढील अभिप्राय नोंदविले आहेत.

१) ‘‘लेवा गुजर स्वत:ला लठू राजा व त्याचे पुत्र अमसिंगत, जमादीगंत, मेहरीगंत आणि सुरादिगंत यांचे वंशज मानतात. आपण रणथंबोर (राजस्थान) येथून आल्याचे ते सांगतात. रणथंबोर येथून त्यांना राजपूत टोळ्यांनी जुनागडला हाकलून लावले. जुनागडहून ते अहमदाबादला आल्यावर त्यांच्या पाच पिढ्या तेथे नांदल्या. तेथूनही त्यांना पावागड व चंपानेर भागात हुसकावून लावण्यात आले. तेथे त्यांनी छत्तीस उपनगरांचे शहर बसविले. या बालेकिल्ल्यातूनही छप्पी राजाने त्यांना स्थानभ्रष्ट केल्यामुळे ते नर्मदेच्या खोर्‍यातील निलगड भागात विखुरले. तेथून ते नेमाडच्या पूर्वेस आले आणि करगुंदच्या भोवताली ३२ ठिकाणी वस्ती करून राहू लागले. कालांतराने करगुंद येथून २००० बैलगाड्यांच्या तांड्याने निघून त्यांनी खानदेशात प्रवेश केला. त्यांतील काही थाळनेर डोंगराच्या अलीकडे व काही असीरगड जवळील तापीच्या खोर्‍यात आले. हे स्थलांतर अकराव्या शतकातील असावे. दोरे गुजर उत्तरेकडील दर्बगड (राजस्थान) येथून अबू येथे आले. तेथून भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वरला व तेथून मंडागड आणि बडोद्याच्या दाभोई किल्ल्याला आले. तेथून पावागडकडे व मुसलमानांनी पावागड जिंकून घेतल्यावर ते तोरणमाळ डोंगररांगेत आले. तोरणमाळहून सहा गट पडून एक सुलतानपूर, दुसरा कोथळी, तिसरा धानूर, चवथा शिरपूर, पाचवा शहादा व सहावा मुस्तफाबाद (चोपडा) येथे आला.’’ (देसाई, २००६, ४०-४१)

२) ‘‘गुजर या जातीच्या नावाच्या उत्पत्तीबद्दल विद्वानात फार मतभेद आहेत. कनिंगहॅम, क्यांबेल, स्मिथ हे पाश्चात्त्य त्यांना परकीय बाह्य, युएची, शक, गूर्ग, खजर, जुजू किंवा गोरे हूण म्हणतात व आपल्या इकडील चिंतामणराव वैद्यादी विद्वान त्यांना मूळचे आर्यच म्हणतात. गुजर म्हणजे गाई राखणारा (गोचिर किंवा गौचारण) अगर गाई चोरणारा (गोचार) अशीही या नावाची व्युत्पत्ती राजकीय इतिहासकार देतात. हे परकीय बाह्य लोक ख्रि०श०च्या पहिल्या पाच शतकात इकडे आले असावेत असे वरील तर्कवाद्यांचे म्हणणे आहे.’’
खानदेशातही हे लोक आहेत. त्यांना तिकडे कुणबी अगर मराठी यांच्याप्रमाणे मानतात. तेथे हे लोक बागाईत करून भाजीपाला विकतात. त्यामुळे कदाचित भाजीबाजारास गुजरी हे नाव मिळाले असावे. हे व्यापारीही आहेत. गुजरातेत गुर्जर ब्राह्मणही आहेत. हे पूर्वी कोठले रहिवासी होते, याच्याबद्दलही वाद आहेत. पाश्चात्त्यांच्या मते बाह्य हूणांनी (गुजरांनी) हे आपले उपाध्याय आपल्याच बरोबर आणले. हल्ली हे श्रावक व इतर गुजरांचे उपाध्याय व देवळांतील पुजारी म्हणून आहेत. बुंदी, अलवारकडील रजपूत ब्राह्मण, मारवाडकडील गौड ब्राह्मण व मेर ब्राह्मण यांचा या गुर्जर ब्राह्मणांशी थोडाफार संबंध येतो. तसेच पुष्कर ब्राह्मण व गुजरातेतील नागर ब्राह्मण यांचाही या गुजर ब्राह्मणांशी संबंध आहे. नागर हे बुद्धिवान व देखणे असून, गुजरातच्या राज्यकारभारात ते गेल्या हजार वर्षांत प्रसिद्धीस आले आहेत. गुजर लोक फार धर्मभोळे असून त्यांना चारण किंवा भाट यांचा फार धाक असतो व त्यांच्याविषयी पूज्यबुद्धीही असते.’’ (केतकर, १९२५; १३१-१३२) अशा रीतीने गुर्जरांचे स्थलांतर झाले.

यांतील दोरे गुजर हे प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यात आढळतात. जवळजवळ सर्व पोटजाती या तापी किनार्‍यालगत काळ्या व सुपीक जमिनीवर वसती करीत आहेत.
नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील गुर्जरांची बोली ही गुजराती व अहिराणी यांच्याशी साधर्म्य असणारी आहे. काही प्रमाणात तिचे साम्य राजस्थानी भाषेशीही आहे. मध्ययुगात सत्ताकारणाने कराव्या लागलेल्या पंजाब-राजस्थान-गुजरात-खानदेश अशा स्थलांतरामुळे गुर्जरांच्या बोलीवर गुजराती व राजस्थानी या भाषांचा प्रभाव दिसून येतो. खानदेशातल्या प्रमुख बोलीचा म्हणजेच अहिराणीचा दाट संपर्क असल्याने अहिराणीचाही प्रभाव खानदेशातल्या गुर्जर बोलीवर पडला आहे.

प्रस्तुत निबंधात नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील गुर्जर बोलींच्या काही वैशिष्ट्यांची चर्चा करावयाची आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, नवापूर, तळोदा, नंदुरबार हे तालुके तर धुळे जिल्ह्यातील शिरपूर व शिंदखेडा या तालुका परिसरात बोलल्या जाणार्‍या गुर्जर बोलीची रूपे अभ्यासार्थ घेतली आहेत.

१) गुजराती भाषेशी गुर्जर बोलीचे निकटत्व आहे. डॉ० दिलीप पटेल यांनी आपल्या ‘गुर्जरी लोकसाहित्य’ या ग्रंथात विविध उदाहरणे देऊन या प्रभावाची चर्चा केली आहे.
‘हामना’, (आता) ‘आजे’, (आज) ‘काले’, (उद्या) ‘गई काले’, (काल) ‘आवती काले’, (परवा) ‘नाड्या’, (दोरा) ‘चाडु’, (तोंड) ‘मोशालु’, (वधूच्या मामाकडचा आहेर) ‘भंडामणु’, (नाव ठेवण्याजोगे) ‘मेंगरा’ (भाकरी) ‘ओबा’ (अरे, बापरे!) हे गुजराती शब्द जसेच्या तसे गुर्जर बोलीत प्रचलित आहेत. (पटेल १९९९; ४०)
शब्दांखेरीज वाक्यविन्यासातही हे साम्य आढळते. गुर्जर बोलीचे पुन्हा प्रांतपरत्वे पोटभेद आहेत. त्यातील पेलाडी प्रांतात बोलले जाणारे - ‘‘तूने शहादा जवुं पडशे’’ हे वाक्य गुजरातीत - ‘‘तमने शहादा जवु पडशे’’ (तुला शहादाला जावे लागले) असे होते. द्वितीयपुरुषी नामात होणार्‍या बदलाखेरीज अन्य बदल येथे दिसत नाही.
‘‘का हो भाई तमे केवा गामना?’’ हे पेलाडी प्रांतातील गुर्जर बोलीतील वाक्य गुजरातीत - ‘‘भाई तमे क्या गामना?’’ (भाऊ, तुम्ही कोणत्या गावचे?) असे उच्चारले जाते. संबोधन आणि प्रश्नार्थक सर्वनाम वगळता इतर शब्द जसेच्या तसे उच्चारले गेले आहेत.
‘‘एक राणी व्हती.’’ हे गुर्जर बोलीचे वाक्य गुजरातीत - ‘‘एक राणी हती’’ (एक राणी होती) असे होते. क्रियापदरूपातील बदल वगळता इतर शब्द समान आहेत.
गुर्जर-गुजराती भाषा निकटत्व अशा प्रकारच्या अनेक वाक्यांच्या उदाहरणांवरून दाखवता येईल.

२) हिंदी भाषिक प्रांतातील राजपुताना, मालवा, उज्जैन इ० ठिकाणी गुर्जर राजांनी आपली सत्ता स्थापन केली होती. यामुळे हिंदी भाषेचाही प्रभाव या बोलीवर पडला आहे.
धुळे, नंदुरबार प्रांतात बोलल्या जाणार्‍या गुर्जर बोलीवरील हा प्रभाव पुढीलप्रमाणे दर्शविता येतो :

गुर्जरी हिंदी गुर्जरी हिंदी

रुशी (ऋषी) रिशी बिगडु (बिघडणे) बिगडना
शहेर (शहर) शहर बठयो (बसला) बैठा
तमे (तुम्ही) तुम वऊ (सून) बहू
वात (गोष्ट) बात घबराववुं (घाबरवणे) घबराना

(पटेल, १९९९ : ३६, ३७)

हिंदीत ‘ऋ’ चा उच्चार ‘री’ असा तर गुर्जर बोलीत ‘रु’ असा होतो. अंत्य अवयव उकारांत उच्चारायची सवय गुर्जर बोलीत दिसते.
उदा० बिगडु, (बिघडणे) रखडु, (रखडणे) लिखनु (लिहिणे)
हिंदीतील ‘शहर’ गुर्जर बोलीत ‘शहरे’ असे उच्चारले जाते. येथे उपान्त्य अवयव एकारान्त होतो. ‘ब’ या वर्णाऐवजी ‘व’ हा वर्ण (उदा० बात - वात) योजण्याची गुर्जरांची भाषिक सवय येथे दिसते.

३) खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार या तीनही जिल्ह्यांत अहिराणी ही प्रमुख बोली बोलली जाते. खानदेशातल्या गुर्जरांचा विविध कारणांनी दैनंदिन संपर्क अहिराणी बोलीभाषकांशी येतो. यातून अहिराणीचा प्रभाव गुर्जर बोलीवर पडला आहे.
टोमं (वेताची मोठी टोपली), वांगा (वांगे), मक्की (मकई), पयकाठ्या (कापसाची काडी), सरा (पीक काढल्याची नंतरची वेचणी), खेत (शेत), मिरच्या (मिरची), माडी (आई), माटी (माती), वराडी (वर्‍हाड), देर (दीर), जेठ (नवर्‍याचा मोठा भाऊ), चीडी (चिमणी), डांगर (टरबूज), हजामत (डोई करणे), परतन (शेती मोजण्याचे एकक), खंगाळ (धुणे), नयडं (गळा), रंगत (रक्त), हाड्या (कावळा), हेला (रेडा), शिंगडा (शिंग), धांड्या (तरुण बैल), वऊ (सून), धयडा (म्हातारा), यांसारखे कितीतरी शब्द अहिराणीकडून गुर्जरांनी स्वीकारले आहेत. विशेषत: कृषिजीवनाशी संबंधित नांगर, वख्खर, दुसेर यांसारखे अहिराणीतील शब्द गुर्जरांनी स्वीकारले आहेत. तसेच गुर्जर बोलीतील डिकरा (पुतण्या), उपादी (ब्याद) यांसारखे शब्द अहिराणीने स्वीकारले आहेत.

४) गुर्जर बोलीवर गुजरातीचा प्रभाव असल्याने त्यांच्या बोलीत ‘ऑ’, ‘अ‍ॅ’ हे (इंग्रजीकडून घेतलेले) स्वर आढळत नाहीत. ‘ऑ’ ऐवजी ‘ओ’ आणि ‘अ‍ॅ’ ऐवजी ‘ए’ अशी स्वरांची उच्चारण रूपे ते योजतात.
उदा० ऑफिस - ओफिस
मॅडम - मेडम
बँक - बेंक
बॉलर - बोलर
गुजराथी भाषेतही ‘ऑ’, ‘अ‍ॅ’ हे स्वर नाहीत.

५) गुर्जर बोली भाषक ‘च’, ‘ज’ या तालव्य आणि दंतमूलीय अशा दोन्ही प्रकारे उच्चारल्या जाणार्‍या ध्वनींचे केवळ तालव्य उच्चारण करतात. दंतमूलीय ‘ज’ व ‘च’ चे उच्चारण त्यांच्यात आढळत नाहीत.
उदा० मराठी गुर्जर
जात (ज - दंतमूलीय) जात (ज-तालव्य)
चुगली (च-दंतमूलीय) चुगली (च-तालव्य)

६) गुर्जर बोलीत अंत्य अवयव ओकारान्त उच्चारले जातात.
उदा० नवरो (नवरा), धयडो (म्हातारा), दादरो (जिना), खराटो (खराटा), खाटलो (बाज).
७) धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील गुर्जर बोलीचे प्रांतनिहाय पुन्हा पोटप्रकार पडतात. डॉ० दिलीप पटेल यांनी ‘तापी थडी’, ‘गोमती थडी’, ‘भरवाडी’, ‘पेलाडी’ अशा चार प्रकारांत या बोलीचे वर्गीकरण केले आहे. या वर्गीकरणाचा आधार स्पष्ट करताना ते लिहितात - ‘‘इस प्रकार गुर्जरी बोली के तापी थडी, गोमती थडी, भरवाडी तथा पेलाडी चार भाषायी भेद स्पष्ट है। गुर्जरी बोली के भाषायी भेद स्पष्टत: देखने के लिए शब्दावली की विभाजक रेखा मानी गयी है। स्थूलरूप से वाक्यविन्यास तथा बोलने के लहजों को आधार मानकर हम विभाजन कर रहे हैं।’’

तापी थडी गोमती थडी भरवाडी पेलाडी

वांदरु (माकड) व्हांदरु वानरु वांधरु
भिवानु (घाबरणे) डरवानु डरवानु डरवानु
खाटलो (बाज) खट्यारु खाटलो खाटलु
हादणी (खराटा) खट्टो खराटो खट्टो
बुढ्ढो (म्हातारा) धयडो धयडो डोसो

(पटेल, १९९९ : ४२, ४३)

अशा रीतीने अगदी ६० मैलांच्या परिसरातही असे पोटभेद नजरेस पडतात. या पोटभेदांचे कारण प्रस्तुत अभ्यासकाच्या मते असे आहे की, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात बोलल्या जाणार्‍या गुर्जर बोलीचे शहादा (जि० नंदुरबार) हे केंद्र आहे. या केंद्राच्या आजूबाजूचा ६० मैलांचा परिसर हा या बोलीचे क्षेत्र मानता येते. या बोलीक्षेत्राला लागून दोन सीमाप्रदेश येतात. शहादा या केंद्रापासून खेतिया हे मध्यप्रदेशातील मोठे गाव अवघे १२ कि०मी०वर आहे तर नवापूर या गुर्जर बोली क्षेत्रापासून उच्छल हे गुजरातचे तालुक्याचे शहर अवघ्या ४ कि०मी०वर आहे. यामुळे ‘गोमती थडी’ या प्रांतातील गुर्जरी बोलीचे साम्य हिंदीशी तर ‘पेलाडी’ या प्रांतातील गुर्जरी बोलीचे साम्य गुजरातीची आहे.

‘भरवाडी’ या प्रांतातील गुर्जरी बोलीत ‘बारु’, ‘ज्युनो’, ‘बेनझु’, ‘इनभी’ ही उद्गारके योजिली जातात. (या उद्गारकांना तसा विशिष्ट अर्थ नाही.) ‘तापीथडी’ या प्रांतातील गुर्जर बोलीत ‘लेवा’ (घेणे), ‘देवा’ (देणे), ‘करवा’ (करणे), ‘जवा’ (जाणे), ‘खावा’ (खाणे), ‘फुलकाई’ (फुलवणे), ‘डामराई’ (दाखवेगिरी करणे) या विशेष शब्दांचा बहुलतेने वापर होतो. ‘गोमती थडी’ या प्रांतात ‘कुचालु’ (कुचाळक्या), ‘दांगडो’ (गोंधळ), ‘गाडची’ (गाडी), ‘टिपरा’ (गरबा नृत्यातील दांडिया) या विशेष शब्दांचा वापर होतो. तर पेलाडी प्रांतात - ‘राते’ (रात्री), ‘डायो’ (म्हातारा), ‘चोमासो’ (चतुर्मास), ‘डाचु’ (तोंड) या विशेष शब्दांचा वापर होतो, असे डॉ० पटेल यांनी म्हटले आहे.

८) या बोलीक्षेत्रात गुर्जर खर्दे ता० शिरपूर येथे तसेच तालुक्यातील भरवाडे, टेकवाडे, चांदपुरी, वरुळ, अर्थे या गावातील बहुसंख्य गुर्जर बांधव महानुभाव संप्रदायाशी निगडित आहेत. हा भरवाडी प्रांत होय. या प्रांतातील गुर्जर खुर्दे या गावात महानुभावियांचे मठ आजही आहेत. या प्रांतातील बोलीत येणारा ‘चाटे’ (मुले) हा शब्द लीळाचरित्रात विशेषत: स्वामींच्या ‘केलिक्रीडा’ या प्रकारच्या लीळांत पुन:पुन्हा येतो. या अंगाने महानुभाव संप्रदाय आणि गुर्जर बोलीचे क्षेत्र यांचा अनुबंध तपासता येऊ शकतो.
गुर्जरीचे व्याकरण
१) गुर्जरीत ‘ने’, ‘नो’, ‘नी’, ‘नु’ ही षष्ठी विभक्तीची प्रत्ययरूपे येतात.
उदा० रमेशने, पाणीनो, पटेलनी, मातानु
२) गुर्जरीत उकारान्त शब्दांचे प्राबल्य आढळते.
उदा० दऊ (देणे), जाडु (जाड), दळु (दळणे), आधु (अर्धे), सुन्नु (सोने), जमाडु (जेवण देणे).
३) क्रियापदांना ‘जो’ हा आदेशात्मक प्रत्यय लावण्याची रीत दिसते.
उदा० पाडजो, (पाड) वगाडजो, (वाजव) आवजो, (ये) जजो (जा)
४) जेवी-तेवी, जेवु-तेवु (जशी-तशी जसे-तसे) ही संकेतवाचक उभयान्वयी अव्यये योजली जातात.
५) प्रमाणमराठीतील ‘ला’, ‘त’ या द्वितीया व सप्तमीच्या प्रत्ययांऐवजी अंत्य प्रत्यय एकारान्त उच्चारले जातात. प्रत्यय लावण्याकडे गुर्जरीचा कल दिसत नाही.
उदा० हाते (हाताला), मळे (मळ्यात), आखे (डोळ्यात), गळे (गळ्यात), घेरे (घरात)
६) ‘स’ हा प्रत्यय लावून भविष्यकाळी क्रियापदे बनवली जातात.
उदा० लाईस (आणणार), खाईस (खाणार), देईस (देणार).
७) गुर्जरीत क्यारे (केव्हा), केवा (कसा), केम (का), क्या (कुठे), सु (काय) ही प्रश्नार्थक सर्वनामे येतात.
गुर्जरांचा राजकीय इतिहास हा पराक्रमाचा, राजसत्तेचा इतिहास आहे. स्थलांतर कराव्या लागलेल्या जमातीच्या अडचणी, व्यथा, सोसणारा हा समूह आहे. भाषिक अंगाने पाहू जाता या बोलीला स्थलकालपरत्वे भाषिक आक्रमणेही पचवावी लागली आहेत. या बोलीचा सविस्तर अभ्यास होण्याची गरज ही सांस्कृतिक गरज म्हटली पाहिजे. दुर्दैवाने अजूनही ही बोली उपेक्षित आहे. समूहाच्या विकासात भाषिकसत्ता निर्णायक ठरते. तशी ती न लाभल्याने या समूहाचा म्हणावा तसा विकास झाला नाही. डॉ० वरखेडे यांनी भाषिक सत्तेचे महत्त्व विशद करताना म्हटले आहे की, ‘‘अर्थात ज्या समाजात परिश्रमी कार्यकर्ते, साहित्यिक, विचारवंत, व्यापारी साहसी व्यक्ती, आणि संशोधक असतात त्याच समाजाची भाषा विस्तार पावते. एकूण विकासात भाषिक सत्तेचा वाटा फार मोठा असतो, हे निर्णायक सत्य समाजभाषाविज्ञानातून पुढे आले आहे. आपल्या राज्यघटनेनुसार भाषिक अल्पसंख्याकांची भाषा वाचवणे, तिच्या अभिव्यक्तीला वाव देणे आणि भाषिक अडथळ्यांमुळे भाषागटाच्या विकासाच्या संधी हिरावल्या जाऊ नयेत, याची दक्षता घेणे; हे लोकशाही राज्याचे वैधानिक कर्तव्य आहे. याचे कारण भाषा हे केवळ संपर्क-माध्यम नसून ते एक सांस्कृतिक मूल्य आहे, हा विचार.’’ (वरखेडे २००६; ३२९)
गुर्जरी बोलीची उपेक्षा थांबावी, अभ्यासकांचे समतोल व न्याय्य दृष्टिक्षेप या बोलीच्या सामर्थ्यावर पडावेत; ही अपेक्षा उचित ठरू शकेल.

संदर्भ :
केतकर, डॉ० श्री०व्यं० महाराष्ट्रीय ज्ञानकोश विभाग १२. महाराष्ट्रीय ज्ञानकोश मंडळ, नागपूर, १९२५.
देसाई, डॉ० बापूराव (संपा०), महाराष्ट्रातील समग्र बोलींचे लोकसाहित्य-शास्त्रीय अध्ययन. अनघा प्रकाशन, ठाणे, २००६.
देसाई, डॉ० बापूराव, ‘गुर्जरी बोली’ समाविष्ट - देसाई, डॉ० बापूराव (संपा०) २००६.
पटेल, डॉ० दिलीप, गुर्जरी लोकसाहित्य. गुर्जरी समाज साहित्य विद्यामंदिर, जयपूर, १९९९.
वरखेडे, डॉ० र०ना०, ‘भाषा आणि बोली’ परिसरलक्ष्यी व समाजलक्ष्यी दृष्टिकोन समाविष्ट - देसाई, डॉ० बापूराव (संपा०) २००६.

मराठी कविता : प्रमाणभाषेकडून बोलीभाषेकडे

हेमंत गोविंद जोगळेकर

एका भाषिक प्रदेशातील बोलीभाषा स्थलानुसार बदलत असली तरी लिखित भाषा मात्र बव्हंशी एकच प्रमाणभाषा असते. कवितेची भाषा लिखित गद्य भाषेपेक्षा वेगळी राहिलेली आहे. तिला केवळ सांगायचे नसते. ते सांगणे प्रतीतही करायचे असते. त्यासाठी ती प्रमाणभाषेकडून बोलीभाषेकडे वळत असते. काव्य संस्कृताधिष्ठित असताना केशवसुतांची कविता साध्या मराठीतून आली. त्यासाठी त्यांना त्या काळी शब्ददरिद्रीही म्हणवून घ्यावे लागले. त्यांचा नवा शिपाई

जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत
सर्वत्र खुणा माझ्या मजला घरच्या दिसताहेत
असे साध्यासुध्या मराठीतून सांगतो. पण या खुणा पटवताना तो म्हणतो,
कोठेही जा पायाखाली तृणावृता भू दिसते
कोठेही जा डोईवरती दिसते नीलांबर ते

आपल्याला जे जाणवते आहे ते मात्र साधेसुधे नाही. त्याचे असामान्यत्व दाखविण्यासाठीच की काय, केशवसुतांना 'तृणावृता भू' 'नीलांबर' असे संस्कृत शब्द वापरावेसे वाटले असावेत.

पुढे बोलीभाषेतूनही मराठी कविता येऊ लागल्या. रविकिरण मंडळातल्या किरणांनी ग्रामीण भाषेत कविता लिहिल्या, पण त्यांतली मानसिकता नागर वाटत राहिली. आता गावाकडच्या निवेदकाच्या भावभावना आणि प्रगल्भ जाणिवा व्यक्त करण्यासाठी ग्रामीण भाषा समर्थ आणि समर्पक असल्याची प्रचीती अनेक कवींनी आणून दिली आहे. ग्रामीण भाषेत लिहिलेल्या बर्यािच कविता, अभंग, ओवी, लोकगीतांच्या छंदातून आल्या. आजही येत आहेत. पण कवितेतली गावकडची - शेतकर्याकची भाषा कालानुसार हैब्रीड झाली आहे.

हैब्रीड
वाणीकिणीचा पाऊस
असा आला तसा गेला
शिवाराचा बांधेसूद
देह निम्माअर्धा ओला.
सोन्याहून महागले
हैब्रीडाचे बी बियाणे
गेले साल घटावले
गावरान पेरल्याने.
अशा निर्वाणीच्या वेळी
जरी हैब्रीड पेरले
पुढे पावसाचे कोणी
शब्दचित्र रेखाटले?
आज तरी पावसाचा
नाही मागमूस कोठे
हैब्रीडाच्या बियाण्याला
गावरान रडू फुटे.

शशिकांत शिंदे यांच्या या कवितेत 'वाणीकिणी'सारख्या गावरान शब्दाबरोबर 'हैब्रीड'सारखा हैब्रीड शब्द सहज आणि सार्थ होऊन येतो. पण अनेक छंदोबद्ध ग्रामीण कवितांची भाषा आणि भाव तसाच रोमँटिक राहिलेला आहे. शंकर सखारामांच्या कवितेत भेटणारी 'एकटी पोर' एकटी नाही. अनेक कवींच्या अनेक कवितांतून तसाच 'झिनझिनाट' उठवणार्याभ पोरी भेटतात.

गावाच्या पांदीत
झाडांच्या सांदीत
भेटलीस पोरी
एकटी गऽऽ
शेवटच फक्त थोडा वेगळा आहे
घातली सरी
दादल्या घरी
गेलीस पोरी
एकटी गऽऽ
हेच शंकर सखाराम मुक्तछंदातही समर्थ कविता लिहितात. समर्थ आणि वेगळीही.
तुझ्या-माझ्या खुणेचा डोंगर
तुझा रोज निरोप सांगतो
तुझ्या पुसू गेल्या कुंकवासाठी
मला गळ घालतो.
डोंगर नि मी
हवा खात बसतो
मुकाट मनात
काळोखात बुडतो.
रातच्याला आभाळ ठिबकू लागते
डोंगर हरवलेला असतो
झाडे तू झालेली असतात.
केशव सखाराम देशमुखांच्या कवितेत भाषा चरित्रक्रमानुसार नागर होताना दिसते.
भाकरीचा अभ्यासक्रम
मिरोग पोटभर बरसून गेला म्हणजे
संपूर्ण शिवारात औतांची यात्रा भरून
दिसे
कुणब्याची खरी आषाढी
औतांच्या दांडीत आणि नांगरांच्या
फाळात
असल्याचा प्रत्यय औतं पाहिले की होई.
त्याआधी
शेतभर औतपाळी चाले
वखरावर दगड बांधून
वखर भूमीत नीट घुसावा म्हणून
बाप औत जोमानं हाणी
पाळी करण्यासाठी
मी वखरावर बसे
बैल झपझप चालून
रान विंचरून काढीत
माझ्या,
बैलांच्या,
बापाच्या
अशा तिहेरी जीवांच्या दैना
आज आठवल्या की झोप कडू होते.
भाकर गोड लागत नाही.
बळ
देणारे
ते
दिवस
आज आयुष्याचाच च्यवनप्राश झाले आहेत.

तेव्हाच्या 'मिरोगा'ने सुरू होणारी कविता निवेदकाच्या आजच्या नागरभाषेत सहज शिरते.

देशावरच्या ग्रामीण भाषेव्यतिरिक्त मराठीच्या इतरही बोलीभाषांतून कविता अवतरल्या आहेत. विठ्ठल वाघ वर्हारडी बोलीत लिहितात. महेश केळुसकरांचा झिनझिनाट मालवणीतून प्रत्ययाला येतो. वाहरू सोनवणे आदिवासी मुलाच्या सूक्ष्म जाणिवा अहिराणी भाषेतून व्यक्त करतात. पण मराठी वाचकांसाठी तिचा मराठी तर्जुमा द्यावा लागतो. निवेदकाची अस्सल भाषा म्हणून बंबैय्या हिंदीतून आपली मराठी कविता लिहायला आजचे कवी कचरत नाहीत आणि आपणही या कविता वाचायला! वर्जेश सोलंकींच्या 'शब्बाखैर' कवितेची निवेदिका बारबाला आहे. ही कविता संपूर्णपणे बंबैय्या हिंदीतून आहे. इंग्रजी ही आज ज्ञानभाषा आणि संपर्कभाषाही झालेली आहे. अनेक इंग्रजी शब्द मराठी कवितेत अगदी घरच्यासारखे वावरतात. सलील वाघांच्या 'चॅट'सारख्या कवितेत रोमन लिपीतून चॅट केलेले आहे. त्यांच्या 'भूर्जपत्र'सारख्या कवितेत संस्कृत, इंग्रजीबरोबर कानडीही येते, तेव्हा आपण हसण्याखेरीज काहीच करू शकत नाही!

मात्रा कुण्डलिनी ज्ञेया ध्यानमस्य प्रवक्षते॥
(नारदस्मृती ५६ पं०ग०हे०-भा०लि०मौ०ए०)
चॅरिटेबल ट्रस्टच्या तोर्यायत फणकाऱ्याने सांगायचे
झाल्यास; औदु निर्दिष्ट अक्षरवन्नु वैयक्तिक अभिरुचिगे
तक्कन्ते अळवडिसिकोंडु मूलत:बदलावणेगळन्नु
माडदे बरेयबहुदु बल्लेबल्ले

नागर बोलीभाषाही कवींना वापरावीशी वाटते. तथाकथित काव्यात्म शब्दांऐवजी साधे बोलण्यातले शब्द असलेली बोलगाणी पाडगावकर लिहितात. आपण लिहिताना व्याकरणशुद्ध भाषा लिहितो. पण बोलताना ती उच्चारसुलभ करून बोलतो. अशा भाषेचा वापर नितिन कुलकर्णी आपल्या कवितांतून खुबीने करतात. त्यांची ही 'केसाच्या अंतरावर' :

केसाच्या अंतरावर कटिंगवाला
पावलाच्या अंतरावर चप्पलवाला
पिशवीच्या अंतरावर भाजीवाला
अंडीलोणीदूधगिर्णी अगदी लागुन लागुन
शाळाकॉलेजं ऑफिसंफिफिसं अगदी लागुन लागुन
पूर्व-घराचा प्रवेश, ईशान्य-देवघर
उत्तरेकडे उत्तमांग करून कधीच झोपत नाए
उघड्या दारातून उभी चूल कधीच दिसत नाए
दक्षिण भिंतीवरती एक छिद्रसुद्धा ठेवलेलं नाए
म्हणजे आता, सगळं कसं अगदी सेफैनाए?

उच्चारानुसारी भाषेतून लिहिताना येथे नितिन कुलकर्णी आजच्या शहरवासियांची जीवनदृष्टीही व्यक्त करतात. उच्चारानुसारी भाषा ते इतकी ताणतात की आपल्याला हसू येते. पण आपण या भाषेला हसताना या जीवनदृष्टीलाही नकळत हसतो. या जीवनदृष्टीवर कोणतेही भाष्य न करता केवळ या भाषेच्या वापरातून कवी या जीवनदृष्टीची योग्यायोग्यता प्रश्नांकित करतो.

प्रमाणभाषेत नसलेले व्याकरण-अशुद्ध वाक्प्रयोगही काही कवी वापरत असतात. हे वाक्प्रयोग त्या कवितेच्या निवेदकाच्या व्यक्तिमत्त्वाचे रंगच स्पष्ट करीत असतात. मंगेश नारायण काळे यांच्या निवेदकाचे हे दृष्टान्त.

नि माणूस हा बिनशेपटीचा वानरच आहे
हे तर लिहिल्याच गेलेलं नाहीये अजून
फार्फार वर्षापूर्वी शेपूट गळून पडल्यावरही

भाषेशी खेळण्याचा आणखी एक प्रकार आहे जुने शब्द मोडण्याचा, त्यातून नवे घडवण्याचा आणि त्यायोगे वेगळेच काही सुचवण्याचा. मर्ढेकर, पु०शि० रेगे, अरुण कोलटकर अशा अनेक मातब्बर कवींनी तो खेळलेला आहे. मर्ढेकरांच्या कवितेत अरुणोदयाऐवजी गिरिणोदय होतो. पु०शि० रेग्यांनी जे 'पाहिले न पाहिले' ते झनन-झांजरे, ठिवक-ठाकडे, बहर-बावरे असते. अरुण कोलटकरांच्या बेहद्द नाममात्र घोड्याची दौड 'खोडदौड' असते. नितिन कुलकर्णी, सलील वाघ यांच्यासारखे अलीकडचे कवी हा खेळ अधिक मिष्किलपणे खेळतात. नितीन कुलकर्णींच्या या
'टिव्हीसांजेच्या कविता' :

टिव्हीतल्या टिव्हीतल्या टिव्हीतुन
टिव्हीतल्या टिव्हीत हरवणे
टिव्हीतल्या टिव्हीत हसणे
दुभंग की तिभंग
आईची कटकट
टिव्हीत लपून टिव्हीत सापडणे
डोकं स्तब्ध तिरकी मान तोंड उघडं
सताड टिव्हेलागण
रिमोटपणे निमूट दाबणे
मनातल्या मनात विस्फारणे
खोलीतल्या अंधारात / टिव्हीच्या उजेडात पसारा
गादी उशी पांघरूण / माझा शहारा
टैवाहिक जीवन / सुखात आणि समाधानात

टीव्हीने आपले जीवन व्यापून टाकलेले आहे. ते दाखवायला नितिन कुलकर्णी टीव्ही या शब्दापासून नवे अर्थ नव्या जाणिवा सुचविणारे शब्द घडवतात. टिव्हीसांज म्हटले की आपल्याला तिन्ही सांजा आठवतात, आणि तिन्ही सांजांशी निगडित असलेली हुरहूर टिव्हीसांजेत हरपल्याची जाणीव होते. आता दिवेलागणीऐवजी टिव्हेलागण होते आणि वैवाहिक सुखाची जागा टैवाहिक सुख बळकावते! नादसाधर्म्य असलेले असे शब्द कवितेत आणखी काही सुचवतात. सलील वाघांची ही 'बैठकीची लावणी':

अवं राया / लॉगीन करताय न्हवं...

लॉगीनचे 'लगीन'शी असलेले साधर्म्य वाचकांना गुदगुल्या करते. तिने इंटरनेटवर कनेक्ट होण्यासाठी दिलेल्या ह्या निमंत्रणात शृंगार गर्भित आहे. पण हा शृंगार (दूर) बसून करायचा आहे, म्हणून ही 'बैठकीची' लावणी!

'लॉग इन' हा इंग्रजी शब्द संगणक-इंटरनेटच्या वापरामुळे मराठीत रुळला आहे. एसेमेसची, संगणकाची, मॉल संस्कृतीची, इंग्रजी शब्दांनी भरलेली एक नवीच भाषा आज मराठी कवितेत मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे. अशा कवितांची एक लाटच किंवा लाटाच येऊन राहिल्या आहेत.

उद्धृत कविता / कवितांश
१. नवा शिपाई - केशवसुत
२. हैब्रीड - शशिकांत शिंदे, शरणागताचे स्तोत्र
३. गावच्या पांदीत ... वादळ वार्याऊत - शंकर सखाराम, झाडातल्या कविता
४. तुझ्या माझ्या खुणेचा डोंगर.... शंकर सखाराम, झाडातल्या कविता
५. भाकरीचा अभ्यासक्रम - केशव सखाराम देशमुख, अनवाणी चालणारे पाय
६. मात्रा कुण्डलिनी - भूर्जपत्र, सलील वाघ, रेसकोर्स आणि इतर कविता
७. केसाच्या अंतरावर - नितिन कुलकर्णी, सगळं कसं अगदी सेफैनाए
८. माणूस हा शब्द कसाही लिहिता येतो - मंगेश नारायण काळे, नाळ तुटल्या पुरुषाचे दृष्टान्त
९. टिव्हीसांजेच्या कविता - नितिन कुलकर्णी
१०. बैठकीची लावणी - सलील वाघ, रेसकोर्स आणि इतर कविता

यमलार्जुन

मा०ना० आचार्य

प्राचीन मराठी काव्यांतील श्रीकृष्णाच्या बाललीलांचे वर्णन मूळ संस्कृत ग्रंथातील आधारांसह वाचीत असताना 'यमलार्जुन' या शब्दाविषयी आलेला एक मजेदार अनुभव येथे थोडक्यात देत आहे.

या बाललीलांपैकी एक प्रसंग असा - एकदा यशोदेने खोड्या काढणार्या कृष्णाला उखळाला बांधून ठेवले (उलूखलबंधन). ते उखळ ओढीत ओढीत तो अंगणात गेला. तेथे दोन अर्जुन नावाचे वृक्ष उभे होते. त्यांमधून उखळ ओढीत नेताना ते अडकले, तरी कृष्णाने ते तसेच जोरात ओढले. त्यामुळे ते दोन अर्जुन वृक्ष उन्मळून पडले. (यमलार्जुनोत्पाटन). कृष्णाला उखळाशी बांधले होते ते एका दाव्याने. त्यावरूनच त्याला 'दामोदर' (दाव्याने बांधले आहे उदर ज्याचे) म्हणतात. हा प्रसंग तसा बहुतेकांच्या माहितीचाच आहे.

या प्रसंगाच्या वर्णनासाठी पाहिलेले मूळ संस्कृत ग्रंथ असे -
हरिवंश (सुमारे इ०स० पूर्व पहिले शतक)
(चित्रशाळा प्रत - विष्णुपर्व अ० ७, किंवा भांडारकर प्रत - अ० ५१)
विष्णुपुराण - (सुमारे इ०स० पहिले ते तिसरे शतक)
(पंचम अंश - अ० ६) गीताप्रेस प्रत
श्रीमद्भागवत - (र०स० ६ व्या शतकानंतर) यंदे प्रत.
(स्कंध १० अ० ९ ते ११)
भासाचे 'बालचरित' हे नाटक (विवाद्य काळ इ०स० चौथे शतक)
(यातील तिसर्याा अंकाच्या आरंभीचा प्रवेशक)
- जे मराठी ग्रंथ पाहिले ते असे -
श्रीचक्रधरनिरूपित श्रीकृष्ण चरित्र व नामदेवांचे अभंग (तेरावे शतक)
तुकारामांचे अभंग (सतरावे शतक)
श्रीधर कवीचा हरिविजय (अठरावे शतक)
(दशम स्कंधावर आधारित अन्य ग्रंथांमध्ये चर्चास्पद भाग नाही.)

मूळ संस्कृत ग्रंथातील महत्त्वाच्या घटना वर नोंदल्याच आहेत. हरिवंश व विष्णुपुराण यांमध्ये या त्रोटक स्वरूपात येतात. भागवतामध्ये त्या घटनांना आणखी एका उपकथेची जोड आहे ती अशी -
त्या उन्मळून पडलेल्या दोन अर्जुनवृक्षांमधून दोन तेजस्वी पुरुष बाहेर पडले, ते दोघे म्हणजे पूर्वी नारदांनी शाप दिलेले नलकूबर व मणिग्रीव या नावांचे कुबेरपुत्र होते. यांना नारदांनी शाप देण्याचे कारण असे - एकदा हे कुबेरपुत्र मद्यप्राशनाने धुंद होऊन स्त्रियांसह वस्त्रहीन अवस्थेत जलक्रीडा करत होते. तेवढ्यात तेथे नारद आले. त्यांना पाहून त्या स्त्रिया लाजल्या व त्यांनी वस्त्रे परिधान केली. ते कुबेरपुत्र मात्र तसेच हसतखिदळत राहिले. आपली अशा प्रकारे केलेली अमर्यादा सहन न झाल्यामुळे नारदांनी त्यांना वृक्ष होण्याचा शाप दिला. परंतु त्याच अवस्थेत ते दीर्घकाळ राहू नयेत म्हणून, 'श्रीकृष्ण तुमचा उद्धार करील', असा उ:शापही दिला. तद्नुसार कृष्णाने आता वृक्षयोनीतून त्यांची मुक्तता केली.

भासाच्या 'बालचरित्रातील' या प्रसंगाच्या एका गोपालकृत वर्णनाचा अनुवाद असा – 'त्या कृष्णाने ओढीत नेलेले उखळ यमल व अर्जुन या दोन (वृक्षरूपी) राक्षसांवर फेकले..... नंतर त्या नंदपुत्राने ते उखळ त्यांच्यामधून ओढले व त्या वृक्षांचे चूर्ण केले. तेव्हा त्या वृक्षांनी राक्षसरूप घेतले व ते मरण पावले.'
- संस्कृत पुराणांमध्ये 'यमलार्जुनौ' असा शब्द आहे. 'यमल' म्हणजे 'जुळे'.
भासाच्या नाटकात हे जुळे वृक्ष 'यमल' व 'अर्जुन' नावांचे दोन राक्षस झाले आहेत. ('यमलार्जुनयो: नाम दानवयो: निक्षिप्तम्।') या परिवर्तनाची चिकित्सा पुढे यथास्थळ करू.

आता मराठी ग्रंथकारांची भेट घेऊ. श्रीचक्रधरनिरूपित 'श्रीकृष्णचरित्र' या महानुभाव, गद्य ग्रंथामध्ये या प्रसंगवर्णनातील महत्त्वाचा भाग असा -
'एक दी महादाइसीं विनविलें' : बाबा श्रीकृष्ण चक्रवर्ति यमलार्जुन कैसे उन्मूलीले: सर्वज्ञें भणतले : ... धनदाचे पुत्र दोघे यक्ष आपुलिआं स्त्रियांसहितु विवस्त्र होऊनि सरोवरीं जळकेली खेळुत होते : तंवं तेथ नारदु स्नालागीं गेला : सरोवराचीं तीरीं अंजनवृक्षातळीं बैसला : ... (इत्यादी, बाकी तपशील भागवती कथेप्रमाणे) परंतु आणखी एक प्रश्नोत्तर असे- 'महदाइसीं पुसिलें : बाबा : अर्जुनवृक्षु तो कवणु : सर्वज्ञें भणतलें : अर्जुन भणजे अंजनाचा वृक्ष :' (प्रसंग ९)
म्हणजे येथे नारद अंजनवृक्षाखाली बसला आहे. यक्षांना शाप आहे (मुळाप्रमाणेच) अर्जुनवृक्ष होण्याचा. परंतु अर्जुनवृक्ष म्हणजे अंजनवृक्ष अशी येथील नवीन भर आहे. याचीही चिकित्सा यथास्थळ येईलच.
दुसरे नामदेव. त्यांच्या अभंगांमध्ये दोन तीन ठिकाणी या घटनेचा उल्लेख आलेला आहे (त्यांतील फक्त प्रस्तुत असलेलाच भाग पाहू.)
१. कुबेराचे पुत्र मदोन्मत्त झाले । म्हणूनि शापिले नारदानें॥१॥
...... विमलार्जुन वृक्ष व्हाल गोकुळांत । उ:शाप वदत कृपाळुवा ॥३॥
...... मोडितसे तेव्हा वृक्ष लक्ष्मीचा पती। दोघे निघताती दिव्य पुरुष ॥५॥
(शासकीय गाथा क्र० ७०)
२. ..... कंसचाणूर मर्दिले । विमलार्जुन उन्मळिले ॥१७॥
(शा०गा०क्र० ४४३)
येथे यमलार्जुनांचे 'विमलार्जुन' झाले आहेत. (असाच उल्लेख अ०क्र० १५ मध्येही आहे.)
तिसरे तुकाराम. त्यांच्या अभंगांमध्येही दोन ठिकाणी या घटनेचा उल्लेख येतो. त्यांतील संबद्ध भाग असा-
१. (यशोदेने गोपींसह श्रीकृष्णाला दाव्याने उखळाला बांधले. नंतर एकमेकींकडे पाहत हसत हसत त्या निघून गेल्या...)
'फांकल्या सकळ उपडूनियां उखळा
मोडी वृक्ष विमलार्जुन दोन्ही॥' (३८८.५) शा०गा०
२. 'बाळपणीं रिठा रगडिला दाढे । मारियेले गाढे कागबग ॥
गळां बांधऊनि उखळासी दावें । उन्मळी त्या भावें विमळार्जुन॥' (४५१९.७)
शा०गा०
येथे विमलार्जुनाऐवजी 'विमळार्जुन' असा अक्षराचा फरक येतो. बाकी जी नवीन भर आहे, तिचा विचार नंतर करू.

आता श्रीधरस्वामी काय म्हणतात ते पाहू.
त्यांच्या 'हरिविजया'मध्ये नवव्या अध्यायात या प्रसंगाचे वर्णन येते. त्यातील संबद्ध भाग असा-
चंडवृक्ष नंदांगणीं यमलार्जुन नामें दोन्ही।
ते नारदें पूर्वी शापोनी ।
वृक्षजन्मा घातले ।
हे पूर्वी कुबेरपुत्र। नांवें यांची नलकूबर ।
परम उन्मत्त अविचार ।
सारासार कळेना ॥ ... (९. ८४-८५)
- येथे कुबेरपुत्रांची नावे नल व कूबर अशी झाली आहेत. मणिग्रीवाचा पत्ताच नाही.
आता काही अनुवादकांची व कोशकर्त्यांची भेट घेऊ. डॉ० मु०श्री० कानडे व श्री० रा०शं० नगरकर यांच्या 'श्रीनामदेव गाथा - शब्दार्थ संदर्भ कोश' (इ०स० २००२) या कोशात नामदेवांच्या शा०गा०मधील उपरोक्त अभंगांचा संदर्भ देऊन, 'विमलार्जुन' या शब्दाचा 'अर्जुन नावाचा वृक्ष' असा अर्थ दिला आहे. (एक मुद्रणदोष - ७० ऐवजी ७१ असा क्रमांक पडला आहे. क्र०१५८चा उल्लेख राहून गेला आहे. याच संपादकद्वयांनी नंतर (इ०स० २००५ मध्ये) 'नामदेवांचा सार्थ चिकित्सक गाथा' प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये उपरोक्त शा०गा० क्र० ७० हा अभंग क्र० ६२ वर आहे. त्यातील पूर्वोक्त ओळींचा त्यांनी केलेला अर्थ असा आहे-
'कुबेराचे दोन पुत्र (नल आणि कुबेर) मदोन्मत्त झाले होते. म्हणून नारदाने त्यांना शाप दिला (की तुम्ही वृक्ष व्हाल.) (१) नारदाने उ:शाप देऊन म्हटले, 'तुम्ही दोघे जण गोकुळात अर्जुनवृक्ष व्हाल....' (३) ... कृष्णाने ते दोन्ही वृक्ष मोडून टाकले. त्याबरोबर त्यांतून दोन दिव्य पुरुष (नल व कुबेर) निघाले (५)
आता येथे 'नलकूबर' या एका नावाची (श्रीधराच्या हरिविजयातील उल्लेखाप्रमाणेच) फाळणी होऊन दोन पुत्र जन्मले आहेत. आणखी एक मौज म्हणजे कुबेराचा पुत्र पुन्हा कुबेरच! (असो.)

आता तुकाराम कानडे-नगरकरांच्या 'श्री तुकाराम गाथा-शब्दार्थ संदर्भकोशात' (इ०स० १९९९) उपरोक्त दोन्ही अभंगांचा संदर्भ देऊन 'विमळार्जुन' या शब्दाचा 'पांढर्याल रंगाचा अर्जुनवृक्ष' असा अर्थ केला आहे. विष्णुबुवा जोगांच्या गाथ्यात (येथे उपरोक्त शा०गा० क्र० ३८८ हा अभंग ३८०९ या क्रमांकावर आहे) 'नल व कुबर' असे दोन वृक्ष झाल्याचा उल्लेख आहे. तर त्यांच्याच गाथ्यात (उपरोक्त शा०गा० क्र० ४५१९ हा अभंग येथे ३८४६ या क्रमांकावर आहे.) 'नारदाने शाप दिल्यामुळे 'विमळ व अर्जुन' या नावांचे दोन वृक्ष...' असा उल्लेख आहे.
म्हणजे एकदा 'नल व कुबर' (कूबर नव्हे) अशी दोन, तर नंतर 'विमळ व अर्जुन' अशी दोन वृक्षनामे झालेली आहेत.
- खंदारकरांच्या गाथ्यात - (येथे अनुक्रमे क्र० ३७७७ व ३८११) 'विमळ व अर्जुन' ही एके ठिकाणी वृक्षनामे आहेत, तर दुसर्याग ठिकाणी 'विमलार्जुन' असा उल्लेख करून ते 'कुबेरपुत्र की वृक्ष' हे संदिग्ध ठेवले आहेत. दाते-कर्वे यांच्या 'महाराष्ट्र शब्दकोशात' तुकारामांच्या 'उन्मळी त्या भावें विमळार्जुन' या ओळीचा संदर्भ देऊन 'विमलार्जुन' = एक दैत्य, असा अर्थ दिलेला आहे.
- असे हे अनुवाद व अर्थ पाहिले की, नारदांनी शापलेले ते कुबेरपुत्र खरोखरच किती मद्यधुंद होते, याची खात्री पटते.
- पण 'घोटाळस्य उपरि गोंधळ: संवृत्त:' अशा या प्रकारांची आपण थोडी चिकित्सा करू. कदाचित त्यातून काहींचा उलगडाही होईल.
- मूळचे 'यमलार्जुन' विमल (ळा) र्जुन झाले आहेत, यात काहीच आश्चर्य नाही. मात्र 'विमलार्जुनाशी' ध्वनिसाम्य असलेला हरिवंशातील एक उल्लेख पाहू, तो असा आहे-
उन्मळून पडलेले ते दोन अर्जुनवृक्ष पाहून, गोपजनांना फार आश्चर्य वाटले. ते म्हणाले, 'अहो बत न शोभेतां विमूलौ अर्जुनौ उभौ।' (श्लोक क्र० ३०) तेव्हा 'विमूल अर्जुन' व 'विमलार्जुन' यांतील ध्वनिसाम्य लक्षणीय आहे. अर्थात त्यावरून निष्कर्ष काढण्याची घाई नको.

पण अशा ध्वनिसाम्यामुळेच 'अणोरणीयान्' (अणो: अणीयान्) या औपनिषदिक (श्वेताश्वेतरोपनिषद् ३:२०, गीता ८.९) वर्णनाचे तुकारामांच्या अभंगात 'अणुरणीया थोकडा' असे रूपांतर झालेले सहज आठवते. (तुकाराम - शा०गा० क्र० ९९३)
भागवतामध्ये कुबेरपुत्रांची नावे 'नलकूबर आणि मणिग्रीव' अशी स्पष्टपणे दिलेली आहेत (१०.१०.९४). पण त्याजबरोबर एके ठिकाणी 'नलकूबर' हे एकच नाव लक्षणेने दोन्ही पुत्रांना उद्देशूनही योजले आहे (१०.१०.४२). (मात्र या श्लोकात 'नलकूबर' हे संबोधन एकवचनी व अन्यपदे द्विवचनी असल्यामुळे अन्वय लावण्याचे काम फार दुर्घट झाले आहे.)
- कुबेर (पितृनाम) व नलकूबर (पुत्रनाम) यांतील ध्वनिसाम्य असणार्याय घटकांमुळे मराठीतले अन्य घोटाळे संभवलेले दिसतात.
- आता थोडी वृक्षनामांची चर्चा करू. कारण चक्रधरनिरूपित श्रीकृष्णचरित्रात, 'अर्जुन म्हणजे अंजनवृक्ष' असे म्हटले आहे; तर कानडे-नगरकरांनी विमलार्जुन म्हणजे 'पांढर्या् रंगाचा अर्जुनवृक्ष' असा अर्थ दिला आहे.
वनस्पतिशास्त्रामध्ये 'अर्जुन' व 'अंजन' या दोन्ही वृक्षांची स्वतंत्र माहिती मिळते. अर्जुन म्हणजे 'अर्जुनसादडा' या नावाने ओळखला जाणारा एक उंच वृक्ष. सुमारे २४ मीटरपर्यंत उंच वाढणार्याक या वृक्षाची साल जाड, गुळगुळीत, हिरवट पांढरी वा क्वचित लालसर असते. ती औषधी आहे. लाकूड इमारतीसाठी उपयोगी असते. अंजन (अंजनी) याची उंची ३५ मीटरपर्यंत वाढते. याचे लाकूड टणक व टिकाऊ असल्यामुळे रेल्वेच्या रुळांखालील स्लीपर्ससाठी ते वापरतात. अन्यही उपयोग आहेतच. असे हे दोन वृक्ष वनस्पतिशास्त्रदृष्ट्याही वेगवेगळ्या वृक्षकुळातील आहेत. अर्जुनवृक्ष 'काँब्रेटेसी' या वृक्षकुलातील असून 'अंजनवृक्ष' 'लेग्युमिनोजी' या कुलातील आहे. (मराठी विश्वकोश खंड १, संबद्ध नोंदी)

आता येथे अर्जुनवृक्षाच्या सालीचे जे दोन वेगवेगळे रंग सांगितले आहेत त्यावरून 'पांढर्या रंगाचा अर्जुन' वृक्ष असा विमळार्जुनाचा अर्थ केला असावा काय? या अर्थाला उद्बोधक असा एक कोशगत अर्थ देतो. दाते-कर्वे यांच्या महाराष्ट्र शब्दकोशात अर्जुन (वृक्ष) म्हणजे, 'अर्जुनसादडा-साताडा; पांढरा ऐन' याचा पांढरा डिंक औषधी आहे. हे झाड कोकणात होते.... अशी माहिती येते. 'अर्जुन' हे विशेषण 'पांढरा' अशा अर्थीही येते. तेव्हा या माहितीच्या संशयाचा फायदा कोशकर्त्यांना द्यायला हरकत नाही.
पण तरीही एक रुखरुख राहतेच. कानडे-नगरकरांनी नामदेवाच्या सार्थ गाथ्यात 'विमलार्जुन' या शब्दाचा 'यमलार्जुन' हा पाठभेद नोंदला आहेच. मग या दोहोंमधील ध्वनिसाम्य सोडून हे जंगलात कशाला गेले?

- अर्जुन व अंजन हे वेगवेगळे वृक्ष. स्वाभाविकच 'अर्जुन भणजे अंजनवृक्ष' ही चक्रोधरोक्त माहिती शास्त्रीय दृष्ट्या प्रामादिक ठरते. कदाचित अंजनवृक्षाचे सापेक्ष वैपुल्य लक्षात घेता हा उल्लेख आलाही असेल. म्हणून तर चक्रधरांनी नारदाला बसविले आहे ते अंजनवृक्षाखालीच.
(या संदर्भात गोविंदाग्रजांच्या श्रीमहाराष्ट्र गीतामधील 'अंजनकांचनकरवंदीच्या काटेरी देशा' ही गौरवपंक्ती आठवावी.)
आणखी एक मुद्दा जसा की, झाडांबद्दलची शास्त्रीय माहिती वेगळी व लोकसमजूत वेगळी- असाही प्रकार संभवतो.
या लोकसमजुतीमुळे 'यमलार्जुन' हाही एक राक्षस झाला नाही का? त्याच उल्लेखांचा आता परामर्श घेऊ.
भासाच्या बालचरितातील गोपकृत वर्णनात याचे चांगले प्रतिबिंब उमटले आहे. या वृक्षोन्मूलन प्रसंगापूर्वी कृष्णावर अनेक संकटे येऊन गेली होती. (उदा० पूतना, तृणावर्त, गाडा उलटणे.) त्यांतून तो दैवयोगानेच सुटला अशी गोकुळातील सामान्य गोपजनांची श्रद्धा होती. त्यांच्या दृष्टीने ही संकटे म्हणजे राक्षसच होते. म्हणून तर भासाच्या नाटकातील गोप यमलार्जुनांना राक्षस म्हणतो.
याच भूमिकेतून तुकारामांच्या पूर्वोक्त (अ०क्र० ४५१९) या अभंगाकडे वळू या. तेथे 'रिठा रगडिला, कागबग भारले व त्याच 'भावें' विमलार्जुन उन्मळीले' - असा उल्लेख येतो. तुकारामांच्या दृष्टीनेही जसा रिठासुर, कागासुर, बकासुर तसाच हा विमलार्जुनही एक असुरच आहे.

हा रिठासुर कोण? हा नामदेवांच्या अभंगातही भेटतो. (शा०गा० क्र० १७७) भागवती कथेत अरिष्टासुर आहे व तो वृषभरूपाने आलेला आहे. (भागवत १० क्र० ३६). नामदेवांच्या उपरोक्त अभंगातही असेच वर्णन आहे. चक्रधरोक्त श्रीकृष्णचरित्रात रिठासुर (प्रसंग ५) व अरिष्टासुर (प्रसंग १९) हे दोघेही स्वतंत्रपणे आले आहेत. बकासुर भागवती कथेत आहे. (स्कंध १०, अ० ११), कागासुर हा मात्र लोकसमजुतीतला. हा चक्रधरोक्त श्रीकृष्णचरित्रातही भेटतो (प्रसंग ११).
रिठासुर हाही लोककथांतीलच आहे. 'रिठा' हा शब्द सं० अरिष्ट या शब्दावरून आला. खेडेगावात अजूनही या रिठ्याच्या फळांचा उपयोग साबणाऐवजी कपडे धुण्यासाठी करतात. (मनुस्मृतीमध्ये कोणती वस्त्रे कोणत्या फळांनी स्वच्छ करावीत हे सांगताना 'कुतपानां अरिष्टकै:।' असा उल्लेख आला आहे. (मनु० ५.१२०) 'कुतप' म्हणजे लोकरीचे वस्त्र.) या रिठ्याच्या फळांमध्ये कठीण व काळ्या बिया असतात. लहान मुलाला दृष्ट लागू नये म्हणून या बियांची माळ त्याच्या गळ्यात घालतात. कृष्णाच्या गळ्यात अशीच एक माळ घातलेली होती. तीमधील एका बीमध्ये एक असुर दडून बसला होता. कृष्णाने त्या रिठ्यामधील बी) दाढेखाली रगडली व त्या असुराला ठार मारले. (पाहा - श्रीचक्रधरोक्त श्रीकृष्ण चरित्र-सं० रा०चिं० ढेरे, प्रस्तावना पृ० २६)
अशा या लोकसमजुतींवर आधारित कथा. भागवतात त्यांना आधार नाही, हे सरळच आहे. परंतु ज्याप्रमाणे शास्त्रीय सत्य वेगळे व लोकसत्य वेगळे, त्याचप्रमाणे भक्तीचे परिणत सात्त्विकक रूप वेगळे व लोकसंस्कृतीमधील श्रध्देय रूप वेगळे.
प्राचीन मराठी काव्यातील शब्दांचा विचार करताना, अशी अनेक व्यवधाने सांभाळावी लागतात; एवढाच या उचापतीचा निष्कर्ष.

संपादकीय: सार्वजनिक कार्यक्रमांतील भाषेचा वापर

नीलिमा गुंडी

अलीकडे महाराष्ट्रात तऱ्हेतऱ्‍हेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे पेव फुटले आहे. सन्माननीय अपवाद वगळता या कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या भाषेच्या वापराविषयी नाराजी व्यक्त करणे गरजेचे वाटते.

या कार्यक्रमांची सुरुवात बहुधा शारदास्तवनाने होते. सुरुवातीला जर 'या कुन्देन्दुतुषारहारधवला' या संस्कृत श्लोकाचे गायन असेल, तर त्यातील 'या शुभ्रवस्त्रावृता'चे अनेकदा 'या शुभ्रवस्त्रामृता' असे उच्चारण होते. आणि 'जय शारदे वागीश्वरी' हे शांता शेळके यांचे गीत असेल, तर त्याचे उच्चारण बऱ्याचदा 'जय शारदे वागेश्वरी' असे कानी पडते. अशा वेळी श्रोत्यांची सहनशीलता हीच त्यांच्या रसिकतेची कवचकुंडले ठरतात.

जाहीर कार्यक्रमात अनौपचारिक संवाद साधण्याची रीत हल्ली लोकप्रिय होत आहे. मात्र अनौपचारिक कशाला म्हणायचे, हा प्रश्नच आहे. अनौपचारिक संवादात खरे तर भाषाविवेक न गमावलेली सहजता अपेक्षित असते. तशा सहज प्रसन्न भाषेचा वावर हल्ली दुर्मिळ होऊ लागला आहे. भाषेचा नेटका, नेमका वापर करण्यातून सांस्कृतिक श्रीमंती व्यक्त होत असते. मात्र जाहीर कार्यक्रमात प्रत्यक्षात घडते ते असे : प्रत्येक वक्ता आपल्या भाषणापूर्वी व्यासपीठावरील सर्वांची लांबचलांब विशेषणे वापरून नामावली घेण्याची औपचारिक परंपरा अजिबात सोडत नाही. प्रत्येक निमंत्रितामागे श्री०/श्रीमती/प्रा०/डॉ० अशा उपाधी हव्यातच, अशी सर्वसाधारण समजूत दिसते. त्यामुळे कार्यक्रमात अनेकदा काहींना 'डॉक्टरेट' ही पदवी बहाल होत असते. 'पद्मश्री', 'पद्मभूषण' हे किताब उपाधीसारखे वापरायचे नसतात, या संकेताचेही सहज उल्लंघन होत असते.

अनौपचारिक शैलीत पाहुण्यांचा परिचय करून देणारा वक्ता पाहुण्यांशी आपले फोनवरून कधी नि कोणते संभाषण झाले, पाहुण्यांशी आपली पहिली गाठभेट कशी झाली, त्या वेळी त्यांनी आपले आदरातिथ्य कसे केले, अशी साग्रसंगीत ओळख जाहीरपणे करून देतो. मनात येणारा प्रत्येक विचार कसलाही आडपडदा न बाळगता श्रोत्यांना तत्काळ सांगून टाकणे म्हणजे अनौपचारिक बोलणे, अशी काहींची समजूत असते. यामध्ये काही वेळा पाहुण्यांचे महत्त्वाचे कार्यकर्तृत्व सांगायचेच राहून जाते! याउलट औपचारिकपणे ओळख करून देणाऱ्याचा मार्ग दुसऱ्या टोकाचा असतो. तो म्हणजे पाहुण्यांनी दिलेला 'बायोडेटा' यांत्रिकपणे वाचून दाखवण्याचा! त्यामुळे पाहुण्यांचा जन्म कोठे झाला, त्यांना प्राथमिक शाळेत कोणती बक्षिसे मिळाली... इथपासून आजपर्यंतचे त्यांचे सारेच कर्तृत्व जाहीर केले जाते. अशा वेळी शहाणा पाहुणा संकोचून जातो. या परिचयप्रसंगी पाहुण्यांचे नावच न आठवणे, ते चुकीचे उच्चारले जाणे इत्यादी विविध प्रसंगनिष्ठ विनोद कधी कधी घडत असतातच. व्यासपीठावर उभे राहून बोलताना पूर्वतयारीशिवाय बोलल्यावर ते भाषण आपोआप उत्स्फूर्त आणि सहज ठरते, अशी (गैर)समजूत त्यामागे असते.
या कार्यक्रमांमध्ये सर्वांत अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे त्यातील काही सूत्रसंचालकांनी भाषेचा मुक्तपणे केलेला वापर ही होय. सूत्रसंचालक हे जणू शब्दजीवी पात्र असते. या 'सुसूत्र' पात्राचा व्यासपीठावरील संचार गेली काही वर्षे अनिर्बंधपणे सुरू आहे. पूर्वी संगीताच्या कार्यक्रमांना निवेदक असत. गायकांना कार्यक्रमात मध्येमध्ये विश्रांती मिळावी आणि गीतकार, संगीतकार, इत्यादींची माहिती श्रोत्यांना व्हावी म्हणून निवेदकाने भाष्य करणे योग्य असते. पण आता कोठल्याही कार्यक्रमांना-चर्चासत्रांनाही-सूत्रसंचालक असतोच. एकेकाळी निवेदक व्यासपीठावरील जागा न अडवता कार्यक्रमाची सूत्रे सांभाळण्याचे काम अदबीने करीत असे. आता मात्र सूत्रसंचालक ही सर्वांत मोठी असामी असते. सूत्रसंचालकाचा भूतलावरचा वावर आता त्रिखंड हिंडणाऱ्या नारदाशीच तुलना करण्याजोगा ठरावा! (हल्ली लग्नसमारंभातही सूत्रसंचालक संचार करू लागला आहे!)

सतत बोलत राहणे (तेही लाडिकपणे!) आणि ऊठसूट श्रोत्यांकडून टाळ्यांची मागणी करणे, हे आपले काम असल्याची सूत्रसंचालकाची प्रामाणिक समजूत असते. अशा वेळी वाटते, एखाद्या उत्तम कलाविष्कारानंतर सभागृह क्षणभर अवाक् होते, हीदेखील कार्यक्रमाविषयी अनुकूल प्रतिक्रिया देण्याची प्रगल्भ रीत असू शकते, यावर आता आपला विश्वासच उरला नाही का? सूत्रसंचालकामुळे काव्यवाचनाच्या कार्यक्रमात काही वेळा एकाच वेळी दुहेरी मैफल चालू राहते. एक मैफल असते प्रत्यक्ष उपस्थित असणार्या कवींच्या कवितांची आणि दुसरी असते प्रत्येक कवीनंतर सूत्रसंचालक वाचून दाखवत असलेल्या कवितांची! पूर्वी रविकिरण मंडळाच्या काळी जेव्हा काव्यगायनाच्या जाहीर कार्यक्रमांना मागणी होती, तेव्हा आवाज नसलेल्या गायक कवींची श्रोत्यांनी व्यासपीठावरून सदेह उचलबांगडी केल्याच्या वार्ता वाचायला मिळत. त्यामानाने सूत्रसंचालकांच्या लीलांविषयी आजचा रसिकवर्ग फारच सोशिक व उदार दिसतो आहे!

कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानण्याचा उपचार असतो. आपण कार्यक्रमपत्रिकेत 'आभारप्रदर्शन' असे म्हणून मुळातच 'प्रदर्शना'ला वाव ठेवलेला असतो. त्यामुळे निरर्थक शब्दांचे बुडबुडे कानी पडतातच! हल्ली बोली भाषेतील एकारान्त शब्दाऐवजी अनुस्वारान्त शब्द वापरण्याची लकब आभारप्रदर्शनातही दिसू लागली आहे. त्यामुळे कधी कधी 'यांचे आभार' याऐवजी 'यांचं आभार' असा शब्दप्रयोग कानी पडतो. [आणि कार्यक्रमाच्या अखेरीस पसायदान असले तर त्यामध्ये 'दुरिताचे तिमिर जावो' (पापकृत्याचा, पापाचा अंधार दूर होवो) याऐवजी हटकून 'दुरितांचे तिमिर जावो' असे ऐकू येते!] अशा वेळी वाटते, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कसे बोलावे (खरे तर कसे बोलू नये!) हे शिकविणारे अल्प मुदतीचे अभ्यासक्रम चालू करण्याची नितांत गरज आहे. शब्दांचे अवमूल्यन ही सांस्कृतिकदृष्ट्या चिंताजनक बाब असते. त्या बाबीकडे वेळीच गंभीरपणे पाहायला हवे. नाहीतर 'औचित्याची ऐशीतैशी' अशी परिस्थिती सार्वजनिक भाषावापराबाबत सार्वत्रिकच होईल.

अभिनंदन, भाषावार्ता, आदरांजली

अभिनंदन
या वर्षीचा मराठी ग्रंथासाठी असलेला साहित्य अकादमी पुरस्कार डॉ० अशोक रा० केळकर यांच्या 'रुजुवात' (लोकवाङ्मय गृह प्रकाशन, मुंबई) या ग्रंथास मिळाला आहे. पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये व प्रमाणपत्र असे आहे. पुरस्कारवितरणाचा कार्यक्रम फेब्रुवारी २०११ मध्ये होईल. डॉ० केळकरांचे मन:पूर्वक अभिनंदन! [या ग्रंथाचे डॉ० सीताराम रायकर यांनी लिहिलेले परीक्षण 'भाषा आणि जीवन'च्या दिवाळी २००९ (वर्ष २७, अंक ४) या अंकात प्रसिद्ध झाले आहे.]

महाबँक भाषाविषयक लेखन पुरस्कार
मराठी अभ्यास परिषदेच्या वतीने व महाराष्ट्र बँकेच्या सहयोगाने मराठीतील सर्वोत्कृष्ट भाषाविषयक लेखनासाठी दिल्या जाणार्यात महाबँक पुरस्कारासाठी (२०१० या वर्षासाठी) एल०के० कुलकर्णी यांनी तयार केलेल्या 'भूगोल कोश' या पुस्तकाची (राजहंस प्रकाशन, पुणे) निवड करण्यात आली आहे. (पुरस्कार-वितरणाचा कार्यक्रम जानेवारी २०११ मध्ये होईल.) श्री० एल०के० कुलकर्णी व राजहंस प्रकाशन यांचे अभिनंदन!
या पुरस्कारासाठी डॉ० सोनाली कुलकर्णी, डॉ० कलिका मेहता आणि डॉ० मृणालिनी शहा (निमंत्रक) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

आदरांजली
 डॉ० सुभाष भेंडे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, कादंबरीकार, विनोदकार, कीर्ती महाविद्यालयातील निवृत्त अर्थशास्त्र-विभाग प्रमुख आणि विश्वकोशाचे अतिथी संपादक होते. मराठी अभ्यास परिषदेचे ते सभासद होते आणि 'भाषा आणि जीवन'साठीही त्यांनी लेखन केले होते.
 ज्ञानेश्वर नाडकर्णी नाटयसमीक्षक, कलासमीक्षक, इंग्रजी व मराठी ह्या दोन्ही भाषांत लेखन करणारे पत्रकार होते. त्यांचा 'चिद्धोष' हा कथासंग्रह त्यांच्या संवेदनाक्षम लेखनाचा प्रत्यय देतो.
'भाषा आणि जीवन'च्या परिवारातर्फे या दोन्ही मान्यवरांना आदरांजली.

पानपूरके



इंग्रजीचे गुलाम!

काही वर्षांपूर्वी सोव्हियट यूनियनचे कॉन्सुलेट जनरल इगोर बोनी नागपूरला आले होते. तेव्हा येथील काही लोकांनी त्यांचे धनवटे रंगमंदिरात भव्य स्वागत केले. त्या सभेचे अध्यक्ष न्या० अभ्यंकर आणि स्वागताध्यक्ष होते कॉ० बर्धन! सत्कारमूर्तींच्या आधी ह्या दोघांची भाषणे इंग्रजीत झाली. पण त्यांचा अनुवाद करण्यात आला नाही. नंतर इगोर बोनी यांनी भाषणाला सुरुवात करताना म्हटले, ''मी इंग्रजी बोलू शकतो. पण ती विदेशी भाषा आहे. मी जर रशियन भाषेत बोललो, तर ते आपणांस समजणार नाही. आणि म्हणून मी हिंदीत बोलणार आहे.'' असे म्हणून त्यांनी हिंदुस्थानवासीयांच्या श्रीमुखात एक मखमली मारली. ते एक तास वीस मिनिटे धारावाहिक बोलले. त्यानंतर मी त्यांना माउंट हॉस्पिटलमध्ये भेटलो. तेव्हा ते मला म्हणाले, ''हिंदुस्थानी लोक तनाने स्वतंत्र झालेत, पण मनाने अजूनही इंग्रजीचे गुलाम आहेत. तुमच्या देशाला स्वत:ची राष्ट्रभाषा नाही.''
- वा०रा० गाणार
(दै० सामना, उत्सव पुरवणी, दि० २७ डिसेंबर २००९)
प्रेषक : मनोहर राईलकर




अरबी 'फी'

अरबीत 'फी' म्हणजे 'आहे'. हा फी शब्द घातला की त्या परीसस्पर्शाने बाकीच्या कसल्याही सावळ्या गोंधळाची व्याकरणशुद्ध अरबी होते अशी बहुतेक भारतीयांची समजूत असते.
सहा वर्षं उम्म खद्रामध्ये काम केल्यावर आमची लेबर वॉर्डातली नर्स, शकू, एखाद्या पहिलटकरणीला नीट कळा द्यायला सांगताना म्हणे,
'अना फी कलाम फी अन्ता फी अहसन.' (शब्दश: = मी आहे बोलते आहे तू आहेस अधिक चांगला) (अभिप्रेत = मी सांगते आहे ते तुझ्या भल्यासाठीच)
पहिलटकरीण ही अरबीची फे फे जाणतेपणाने समजून घेई!
डॉ० उज्ज्वला रेगे, 'सोन्याच्या धुराचे ठसके', पृ० ११०



काशी विश्व हिंदू विश्वविद्यालयात मराठी

काशी हिंदू विश्वविद्यालयात मराठीबरोबरच तमीळ, तेलगू, कन्नड, नेपाळी याही भाषा शिकविल्या जातात. या भाषांच्या विकासासाठी सुमारे दहा वर्षांपूर्वी तामिळनाडू, आंध्र व कर्नाटक सरकारांनी पाच-पाच लाख रुपयांची अनुदाने या विद्यापीठांना देऊन त्या रकमांच्या व्याजातून अध्यासन निर्माण करून प्रोफेसरचे पद व पीएच०डी० करण्यासाठी दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची सोय केली आहे. नेपाळी सरकार स्वखर्चाने एका लेक्चररची नियुक्ती करीत असते... साठ वर्षांपासून जेथे मराठीचे अध्यापन अव्याहतपणे होत आहे अशा काशी हिंदू विश्वविद्यालयामधील दृढमूल मराठी विभागाला आर्थिक आधार देण्याचे औचित्य व औदार्य महाराष्ट्र शासनाने का दाखवू नये?
डॉ० सुरेश भृगुवार, 'नवभारत', फेब्रुवारी २०१०. पृ० ३०-३१




लीळाचरित्राची भाषा

(लीळाचरित्र) ग्रंथाचे पुनर्लेखन, मुसलमान महाराष्ट्रात स्थिरावल्यावर तीस-बत्तीस वर्षांनी होऊनही त्यात अपवाद म्हणून एक देखील पर्शोअरेबिक वंशाचा शब्द येत नाही. हे या भाषेचे सर्वात महत्त्वाचे ऐतिहासिक सत्य आहे. कथन साहित्याला आवश्यक अशा या गद्यात समाजातून आलेली भाषा आहे. तिच्यात निरनिराळ्या व्यावसायिकांच्या व्यवसायांमधून पडलेली शब्दसंपत्तीची भर आहे, बोलींचा सढळ, पात्रानुरूप वापर आहे. समाजाच्या निरनिराळ्या स्तरांवर वावरणार्‍या व्यक्तींच्या औपचारिक, अनौपचारिक संभाषणांचे स्वाभाविक नमुने आहेत. केवळ संबोधनवाचक शब्द घेतले तरी या भाषेच्या सामाजिक अंगाचे वैशिष्टय लक्षात येते. कन्नडसारख्या शेजारी भाषेतून मिसळलेला शब्दसंग्रह, आज सामाजिक संदर्भ लुप्त झाल्यामुळे भाषेतून निघून गेलेले, काही पूर्णपणे दुर्बोध वाटणारे असे अनेक शब्द या ग्रंथात आढळतात. वाक्संप्रदाय, म्हणी, लोकोक्ती आणि चक्रधरांच्या वाणीतून सहज बाहेर पडलेली 'अनावर मर्‍हाठी' वचने यांनी समृद्ध (अशी ही भाषा आहे.)
- सुमन बेलवलकर, 'लीळाचरित्रातील समाजदर्शन' पॉप्युलर प्रकाशन, मुंबई. पृ० ३३-३४




साहित्यकला

अहो, जगात अशी एकच कला आहे की, जी इंद्रियाने आस्वादायची नसते, मनाने आस्वादायची असते. संगीत, नृत्य, शिल्प, चित्र या इंद्रियगोचर कला आहेत. साहित्यकला ही अशी एकुलती एक कला आहे की जी मानसगोचर कला आहे... साहित्याचा रसिक केवळ आस्वादक नसतो, तर कवीची कविता आपल्या मनात मुरवून तो तिची नवनिर्मिती करीत असतो .... आस्वादासाठी हवे असते आर्ष, म्हणजे अनघड मन.... नवनिर्मितीसाठी हवे असते सुघड मन.
- डॉ० द०भि० कुलकर्णी
अध्यक्षीय भाषण, ८३ वे अ०भा०म० साहित्यसंमेलन

Pages