तेलुगु-मराठी शब्दयोजन

प्रत्येक भाषेची काही एक विशिष्ट प्रवृत्ती असते. काही विशिष्ट वाक्प्रयोग असतात. तत्सम शब्दांचे अर्थ व भावही त्यात अनेक वेळा बदललेले दिसतात. मराठीपेक्षा वेगळ्या वाटणाऱ्या तेलुगूतील शब्दांच्या अर्थच्छटांचा विचार करून पुढील उतारा सिद्ध केला आहे. उताऱ्यातील अधोरेखित शब्द हे तत्सम शब्द आहेत तर अन्य अधोरेखित शब्द हे त्या त्या ठिकाणी उपयोजिल्या जाणाऱ्या तेलुगु शब्दांचे अनुवाद होत. मराठी वर्तमानपत्रात त्या जागी प्रायः कोणते शब्द येतात, हे कंसांत दर्शविले आहे.

काही दिवसांपासून असलेली कल्लोलित (अशांत) परिस्थिती आता बरीच शांत झाली. कर्फ्यू उचलून फेकून दिल्यावर  (उठवल्यावर) एकही अवांछनीय (अप्रिय) संघटना (घटना) घडली नाही. कर्फ्यूच्या काळात काही लोकांनी आवेशाने (रागाने) घरे व दुकाने जाळली. अशा दौर्जन्य (गुंडगिरी) करणाऱ्या लोकांना शासन कडक शिक्षा करील, असे मुख्यमंत्री एका बहिरंग सभेत (जाहीर सभेत) म्हणाले. दोन्ही जमातींच्या एका समावेशात (बैठकीत) प्रत्येक धर्मियास आपापल्या संप्रदायाप्रमाणे (परंपरेप्रमाणे) वागण्याचा हक्क आहे असे प्रतिपादले, व भद्रंगा (शांततेने) राहण्याचे आवाहन केले. जातीय (राष्ट्रीय) ऐक्याच्या गोष्टी आपण बोलतो पण कुलवाद (जातीयता) आपल्या समाजातून अजून गेला नाही. तिकडे तिकडे (कुठे कुठे) तेव्हा तेव्हा (कधी कधी) अशा घटना घडणे वेगळे, पण आता तो नित्याचाच भाग होऊन बसला आहे. भारताचे चरित्र (इतिहास) अशाच घटनांनी भरलेले आहे. एखाद्या प्रमादाने (अपघाताने) माणसे दगावणे वेगळे व आपणच आपणांस मारणे वेगळे. यावर उपाय म्हणजे निम्नस्तरीय लोकांची आर्थिक सुधारणा व्हायला हवी असे काही वक्त्यांनी एका संतापसभेत (शोकसभेत) सांगितले. काही वक्त्यांनी कारखान्यांचे जातीयीकरण (राष्ट्रीयीकरण) करावे असे सुचविले. मुख्य म्हणजे निरुद्योगी (बेकार) लोकांना काम मिळावे. शांतता निर्माण करणाऱ्या लोकांना बहुमति (बक्षीस) द्यावी, असेही एकाने सुचविले. कर्फ्यूमुळे कामकाज स्तंभित (ठप्प) होते, हे समाजाच्या दृष्टीने बरे नव्हे. परिस्थिती तृप्तिकारक (समाधानकारक) झाल्यास कर्फ्यू लावण्याचा अवसर (आवश्यकता) येणार नाही, हेही खरे. शासनाने दंगलपीडित लोकांना उचितरीतीने (विनामूल्य) धान्य देण्याची व्यवस्था मात्र केली पाहिजे, व अन्य सदुपायही (सोयीही) पुरवावेत, स्वच्छंद संस्था (स्वायत्तसंस्था) यांनीही याबाबतीत थोडा भार उचलला पाहिजे. आता अंकितभावाने  (समर्पित वृत्तीने) काम करणारी माणसेच दुर्मीळ झाली आहेत. दुरभिप्रायातून (गैरसमजातून) अनेकदा कलह निर्माण होतात, ते टाळले पाहिजे, म्हणजे प्रदेशाची सर्व रंगांत (क्षेत्रांत) प्रगती होण्यास वेळ लागणार नाही. या भूमिकेस कुणाचेही अभ्यंतर (आक्षेप) राहणार नाही.