शंका आणि समाधान

...समाधान

(संदर्भ: भाषा आणि जीवन : अंक २५.४ दिवाळी २००७)

१. स्वल्पविराम - 'की'च्या आधी की 'की'नंतर ?

स्वल्पविराम 'की' या अव्ययाच्या आधी यावा की नंतर याबद्दल "शुद्धलेखन शुद्धमुद्रण शब्दकोश' (दि पूना प्रेस ओनर्स अ‍ॅसोसिएशन १९६१:४४) असे म्हणतो की हे स्वरूपबोधक, व पक्षान्तरबोधक किंवा परिणामबोधक अव्यय आहे. स्वरूपबोधक असेल तर 'की'पुढे स्वल्पविराम द्यावा.

उदा० "तो म्हणाला की, मी येईन.'' पक्षान्तरबोधक किंवा परिणामबोधक असेल तर 'की'च्या मागे स्वल्पविराम द्यावा. उदा० "मी जाऊ, की तू जाशील?'', "वारा आला, की पाऊस पडतो.''

२. त्यानंतरच्या रावसाहेब काळे यांच्या शंकांची उत्तरे रावसाहेब काळे यांनाही माहीत असावीत. अनुस्वाराच्या ऐवजी परसवर्ण लिहिण्याचा पर्याय मराठीच्या प्रमाण-लेखनात उपलब्ध आहे. त्यामुळे 'डुंबरे' हे नाव 'डुम्बरे' असेही लिहिता येते.
३. पीएच०डी० इ० पदव्यांमध्ये शेवटचे अ-कारान्त अक्षर व्यंजनान्त लिहिणे मान्य लेखनानियमांनुसार चूक आहे.

- प्र०ना० परांजपे

शंका...

शंकर चाफाडकर

१.सृजन व सर्जन या शब्दांच्या अर्थामध्ये काही भेद आहे काय? लेखक सृजनशील असतो की सर्जनशील?
२. फिक्शन व नॉनफिक्शन यांच्यासाठी साहित्याच्या संदर्भात कोणते शब्द वापरावेत?

उदा० वाचनालयात विभागवार साहित्यासाठी निर्देशक पट्ट्या लावायच्या असल्यास 'फिक्शन' व 'नॉनफिक्शन'साठी योग्य मराठी शब्द कोणते?'ललित'मध्ये सर्व साहित्य येऊ शकते तसेच 'काल्पनिक'मध्ये मनोरंजक, रहस्यमय आदी पण येऊ शकते.

३. परफॉर्मिंग आर्ट्‌स व नॉन-परफॉर्मिंग आर्ट्‌ससाठी अर्थवाही मराठी शब्द कोणते?

'ललितकला' हा शब्द सर्वसमावेशकच वाटतो.

द्वारा - सौ० वैजयंती विश्वनाथ गर्गे, अ/१०३, श्री गणेश आर्केड, न्यू गुड्‌स-शेड रोड, बेळगाव ५९०००१, (कर्नाटक). दूरभाष : ०८३१-६५१६९४१

...समाधान

(१) सृजन - सर्जन यांपैकी कोणता शब्द बरोबर ?

निर्मिती (creation) या अर्थाने असलेला 'सर्जन' हा शब्द अलीकडे बरेचदा "सृजन' असा लिहिला-बोलला जातो. या दोन शब्दांपैकी कोणता शब्द बरोबर ही शंका कित्येकांच्या मनात असते. यांपैकी 'सर्जन' हा शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे. मूळ धातू सृज्‌ (सकर्मक क्रियापद, सहावा गण, परस्मैपद. अर्थ : उत्पन्न करणे, निर्माण करणे.) सृज्‌ पासून सिद्ध झालेल्या सर्ज्‌ या आख्याताला प्रत्यय लागून त्याची रूपे सिद्ध होतात. उत्सर्जन, विसर्जन ही अशीच आपल्याला नित्य परिचयाची असलेली रूपे होत. (इथे सृज्‌ > सर्ज्‌ ला अनुक्रमे उत्‌ आणि वि हे उपसर्ग लागले आहेत.) तर्पण, आकर्षण, सर्प हे असे आणखी काही शब्द. हे शब्दही तृप्‌, आ + कृष्‌, सृ या धातूंपासून सिद्ध झालेले आहेत.

हे सर्व शब्द आपल्या भाषेत सुखाने रुळलेले असताना एकट्या "सर्जन' बद्दलच 'सृजन' की 'सर्जन' अशी शंका का यावी ? तर, मला वाटतं - (हे मात्र गमतीनं) इंग्रजीत शल्यविशारदासाठी "सर्जन' हा शब्द आहे. मराठीत आपण 'शल्यविशारद' न म्हणता सर्रास 'सर्जन'च म्हणतो. मग गल्लत नको म्हणून तर मूळ सर्जन (निर्मिती) शब्द 'सृजन' झाला नसेल ना - 'कृपण', 'पृथक'च्या धर्तीवर ?

माझ्या एका परिचितांच्या मुलाचं नाव त्यांनी ठेवलंय 'सृजन'. पण वास्तविक 'सर्जन' हा शब्द व्याकरणदृष्ट्या अचूक हे कळल्यावर ते म्हणाले, "अरे! आता काय करायचं?'' मी म्हणाले, "काही नाही. त्याला वैद्यकीय शाखेला जाऊ द्या. तो शल्यविशारद झाला की झालाच सर्जन.''

- विजया देव

(२) 'परफॉर्मिंग आर्ट'साठी कोणता शब्द?

ज्या कलांना प्रयोगाशिवाय (म्हणजे मंचावरील सादरीकरणाशिवाय) पूर्णता येत नाही अशा कला म्हणजे परफॉर्मिंग आर्ट्‌स. नाटक, नृत्य, संगीत या अशा कला आहेत. १९७० व ८० या दशकांत त्यांच्यासाठी 'प्रयोगशरण कला' असा शब्द वापरला जाऊ लागला. काही वेळा 'प्रयोगक्षम' या शब्दाचा वापर करण्यात येतो. पण आता या दोन्ही शब्दांऐवजी 'प्रयोगजीवी' हा शब्द मान्यता प्राप्त करू लागला आहे. 'प्रयोगजीवी' म्हणजे प्रयोगातच किंवा प्रयोगामुळेच जीवित होणार्‍या कला.

(३) फिक्शन-नॉन्‌फिक्शन

'फिक्शन'साठी 'ललित लेखन' आणि 'नॉनफिक्शन'साठी 'ललितेतर लेखन' असे प्रतिशब्द मराठीत सर्वसाधारणपणे वापरले जातात. पण ते अनेक संदर्भांत समाधानकारक वाटत नाहीत. ललित गद्याच्या विविध प्रकारांचे (उदाहरणार्थ, लघुनिबंध, गुजगोष्ट, ललित निबंध, चरित्र, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, आठवणी, व्यक्तिचित्र, ललित लेख या सार्‍यांचे) 'ललितेतर' असे वर्गीकरण करणे अनेकांना मान्य होणार नाही. याचा अर्थ असा की इंग्रजी 'फिक्शन'पेक्षा मराठीतील 'ललितलेखन' ही संज्ञा अधिक व्यापक आहे. म्हणून मराठीमध्ये 'ललित लेखन' या संज्ञेचे अधिक सूक्ष्म वर्गीकरण आवश्यक ठरते. 'कल्पनाधिष्ठित ललित लेखन' व 'वास्तवाधिष्ठित (किंवा अनुभवाधिष्ठित) ललित लेखन असे वर्ग कल्पिल्यास कथा, कादंबरी इत्यादींना पहिल्या वर्गात (कल्पनाधिष्ठित ललित लेखन) ठेवून इरावती कर्वे, दुर्गा भागवत, गो०वि० करंदीकर इत्यादींचे ललित निबंध; अनंत काणेकर, रा०भि० जोशी, गंगाधर गाडगीळ इत्यादींची प्रवासवर्णने अशा ललित गद्य लेखनाला 'वास्तवाधिष्ठित ललित लेखन' असे म्हणता येईल. ('कल्पनाधारित' व 'वास्तवाधारित' किंवा 'कल्पनानिष्ठ' व 'वास्तवनिष्ठ' असेही शब्द वापरणे शक्य आहे.)

- प्र०ना० परांजपे