पन्नासाव्या अंकाचे संपादकीय : पन्नासावा अंक

'भाषा आणि जीवन'चा हा अंक पन्नासावा आहे. 'भाषा आणि जीवन'ची मातृसंस्था, मराठी अभ्यास परिषद, १ जानेवारी, १९८२ रोजी अस्तित्वात आली. आता संस्थाही पंधराव्या वर्षात पदार्पण करीत आहे; आणि 'महाराष्ट्र फाउंडशेन'ने प्रत्येकी पन्नास हजार रुपयांच्या पारितोषिकासाठी निवडलेल्या तीन वैचारिक नियतकालिकांमध्ये 'भाषा आणि जीवन'ची नुकतीच निवड केली आहे. म्हणून या टप्प्यावर थोडे मागे वळून पाहावे, असे वाटणे साहजिकच आहे. या नियतकालिकाचे नाव दुपदरी आहे. 'मराठी अभ्यास परिषद पत्रिका' हा त्यातील एक पदर. नियतकालिकांच्या नोंदणी करणार्‍या कार्यालयाच्या दृष्टीने हे नाव अधिकृत आणि निरपदवाद. वर्णनात्मक आणि दुसर्‍या कुणी न वापरलेले. पण मातृसंस्थेच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने 'भाषा आणि जीवन' हा दुसरा पदर अधिक महत्त्वाचा, कारण त्यातून मातृसंस्थेचा दृष्टिकोन व्यक्त होतो. 'भाषेत जीवन काठोकाठ भरलेले असले, तर भाषाही जीवनात शिगोशीग भरून राहिलेली आहे.' (अंक १, पृष्ठ १)

'भाषा आणि जीवन' हे धंदेवाईक विचारवंतांनी धंदेवाईक विचारवंतांसाठी चालविलेले नियतकालिक नाही. भाषातज्ज्ञ आणि इतरेजन यांनी विचारांची आणि अनुभवांची देवाणघेवाण करावी, परस्परांपासून शिकण्यासारखे असेल, ते शिकावे, आणि त्याद्वारे आपल्या समाजाचे भाषिक आणि सामाजिक जीवन विकसित आणि समृद्ध व्हावे, या हेतूने निर्माण केलेले हे व्यासपीठ आहे. मराठीतून हे प्रकाशित होत असले, तरी ते मराठीपुरते मर्यादित नाही. मराठी भाषकांच्या सर्वच गरजा भागविण्याचा प्रयत्‍न करणे हे मराठी अभ्यास परिषदेचे उद्दिष्ट आहे आणि ते साध्य करण्याचे 'भाषा आणि जीवन' हे एक साधन आहे. भाषिक गरजा या केवळ शिक्षण, व्यवसाय, अर्थार्जन यांच्यापुरत्या सीमित नसतात. व्यक्तीचे व समाजाचे मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पोषण भाषेतून घडत असते. त्यासाठी कोणतीही एकच भाषा पुरी पडण्याचा संभव — जागतिकीकरणाच्या आधुनिक रेट्यात तर विशेषत्वाने— कठीण दिसते. इतर भाषांतील ज्ञान, साहित्य यांचा यथार्थ परिचय व संस्कार आपल्या भाषेच्या विकासाला हातभार लावू शकतो. जीवनाच्या बदलत्या रूपांना व आव्हानांना सामोरे जाण्याइतकी क्षमता व लवचिकता भाषेमध्ये असेल, तर ती तिचा वापर करणार्‍यांच्या गरजा भागवू शकते. केवळ प्रतिशब्द, परिभाषा, भाषांतरे करण्याने भाषा विकसित होऊ शकत नाही. त्यासाठी नवीन संकल्पना, नवे अनुभव भाषेत व जीवनात मुरवावे लागतात. या मुरण्याच्या प्रक्रियेला हातभार लावण्याच्या प्रयत्‍न 'भाषा आणि जीवन'ने आपल्या परीने गेल्या ४९ अंकांतील २५०० हून अधिक पृष्ठांमध्ये केला आहे. आमचे हे उद्दिष्ट वाचकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्‍न 'भाषा आणि जीवन'च्या सर्व अंगांतून वाचकांना जाणवला असेल. नियतकालिकाचे पहिले दर्शन असते, ते त्याच्या मुखपृष्ठाचे. 'भाषा आणि जीवन'च्या पहिल्या चार वर्षांतील अंकांवर अनिल अवचटांनी रेखांकित केलेले मोर वाचकांना भेटले. (मोर हे सरस्वतीचे वाहन आणि आपला राष्ट्रीय पक्षी आहे.) त्यानंतर पाच वर्षे भाषिक संज्ञापनाचे व्यंग्यचित्ररूप दर्शन शि०द० फडणिसांनी घडविले. बालम केतकरांची चित्र-कविता, शाम देशपांड्यांची लिपिचित्रे, संतकाव्यातली वेचक उद्धृते, आणि लोककला यांचे दर्शन नंतरच्या अंकांच्या मुखपृष्ठावर घडले. या मुखपृष्ठांची अर्थपूर्णता वाचकांच्या नक्‍कीच लक्षात आली असेल.

'भाषा आणि जीवन'ची संपादकीये संपादन-समितीच्या सभासदांनी लिहिलेली असतात. मातृसंस्थेच्या उद्दिष्टांशी सुसंगत अशा विषयांवरील या संपादकीयांमध्ये त्यामुळे विषय, दृष्टिकोन, मांडणी व शैली या बाबतींत विविधता आली. 'भाषा आणि जीवन'मधील विविध सदरे, त्या सदरांची नावे, पानपूरके यांमधूनही आमच्या प्रयत्‍नांचा प्रत्यय वाचकांना यावा. 'दखलपात्र', 'ज्याची त्याची प्रचीती, 'पुनर्भेट', 'विचारसंकलन', 'भाषानिरीक्षण', 'शंका आणि समाधान', 'पुस्तक-परीक्षण', इत्यादी सदरांमध्ये तज्ज्ञ आणि इतरेजन यांना सारखाच वाव आहे. 'भाषा आणि जीवन'मध्ये कवितांना स्थान आहे, साहित्याला स्थान आहे, त्याचप्रमाणे प्रशासन, कायदा, वैद्यक यांनाही आवर्जून जागा देण्यात आली आहे. त्याच्यात मराठी भाषकांबरोबरच गुलाबदास ब्रोकर, श्यामविमल, इरिना ग्लुश्कोव्हा, मॅक्सीन बर्नसन अशा अन्य भाषकांनीही लेखन केले आहे. भाषाविज्ञान, भाषाध्यापन, सुलेखन, नाटक, चित्रपट, वृत्तपत्रे, मुलाखत, लोकशिक्षण, अनुवाद, अशा अनेक विषयांवरील लेख 'भाषा आणि जीवन'ने छापलेले आहेत. लेखसूची, संदर्भसूची, लेखनसूची, साहित्यसूची, शब्दसूची परिभाषासूची अशा विविध सूची उपलब्धतेनुसार छापण्यावरही आमचा कटाक्ष आहे. केवळ मराठीच नव्हे, तर अन्य भाषांबद्दलचे लेखन आणि अन्य भाषांमधील लेखनाचे अनुवादही आम्ही छापले.

भाषेच्या अभिमानाचे दुरभिमानात, हेकटपणात आणि इतर भाषांबद्दलच्या तुच्छतेत रूपांतर होऊ नये, असे मराठी अभ्यास परिषदेला वाटते. त्या भूमिकेचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्‍न आम्ही 'भाषा आणि जीवन'मध्ये केला आहे. भाषा आणि जीवन'चे अंक ठरवलेल्या वेळीच प्रकाशित होतात, असे नाही. याची आम्हाला जाणीव आहे. अलीकडच्या एक-दोन अंकांतील छपाईही समाधानकारक नव्हती. आम्हांला जाणवणार्‍या तीन अडचणींचे ते दृश्य रूप आहे. लेखनाचा तुटवडा, कबूल केलेले लेखन वेळेवर (कधी अजिबात) हाती न येणे ही पहिली अडचण. लेखकांशी प्रत्यक्ष व टपालाने संपर्क साधणे, नवीन लेखक शोधणे, विषयांची यादी देऊन त्यावरील लेख पाठविण्याचे जाहीर आवाहन करणे असे काही उपाय या पहिल्या अडचणीवर मात करण्यासाठी आम्ही वापरले. दुसरी अडचण आर्थिक क्षमतेच्या अभावाची. सभासदांची वर्गणी, साहित्य, आणि संस्कृती मंडळाचे अनुदान आणि आता महाराष्ट्र फाउंडेशनने दिलेले पारितोषिक यांमुळे आर्थिक अडचण काही प्रमाण काही प्रमाणात दूर होते. तरीही कागद व मुद्रणाच्या वाढत्या दरांमुळे आणि टपालखर्चामुळे आर्थिक अडचण आमची यापुढेही सोबत करीत राहील, अशी शक्यता आहे. मुद्रणतंत्रात होणारे बदल आणि त्यामुळे वेळोवेळी करावी लागलेली नवी मुद्रणव्यवस्था ही आमची तिसरी अडचण. तीही आम्ही प्रयत्‍नपूर्वक दूर करीत आहोत. आत्तापर्यंत आम्हांला वाचकांनी उत्साहवर्धक प्रतिसाद दिला आहे. आमच्या प्रयत्‍नांचे त्यांनी स्वागत केले, कौतुक केले, काही वेळा आमच्या चुकाही दाखवून दिल्या. पण त्यांच्या यापेक्षा अधिक सहभागाची आम्हाला अपेक्षा आहे. प्रसिद्ध झालेल्या लेखनाबद्दलच्या प्रतिक्रिया पाठवण्याबरोबरच त्यांनी लेखनसहकार्यही करायला हवे. ऐकू येणारे संवाद, इतरत्र वाचायला मिळणारे वैशिष्ट्यपूर्ण लेखन, भाषेच्या वापराबद्दलची आपली निरीक्षणे, इ० अनेक गोष्टींबद्दल त्यांना लिहिता येईल. विशेषतः पानपूरकांसाठी त्यांना मजकूर पाठवता येईल. पानपूरके हे 'भाषा आणि जीवन'चे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यांची संख्या रोडावल्यामुळे 'भाषा आणि जीवन'मधील पांढर्‍या जागेचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. वाचक जागरूक राहिले, तर पुन्हा एकदा पानपूरकांचे पीक चांगले येईल, अशी आम्हांला आशा आहे.

'मराठी अभ्यास परिषदे'ची स्थापना १ जानेवारी, १९८२ ला झाली आणि १९८३ च्या तिसर्‍या तिमाहीत 'भाषा आणि जीवन'चा पहिला अंक बाहेर पडला. त्यानंतर 'का०स० वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था', 'महाराष्ट्र प्रतिष्ठान' या अशासकीय संस्थांची आणि शासनपुरस्कृत 'राज्य मराठी विकास संस्थे'ची स्थापना झाली. त्यामुळे मराठी अभ्यास परिषदेने आपल्यासाठी आखून घेतलेले कार्यक्षेत्र किती महत्त्वाचे व तातडीचे आहे, हे सिद्ध झाले. एखाद्या कार्याला जेवढे जास्त हात लागतील, तितके ते अधिक हलके होते आणि आटोक्यातही येते. शासकीय पातळीवरील संस्थेकडे जशा अनेक सुविधा असतात, तशा तिच्यावर अनेक मर्यादाही असतात. सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या विविध कामांमध्ये शासनाला अशासकीय संस्थांचे भरघोस व महत्त्वाचे साहाय्य होऊ शकते ही वस्तुस्थिती आता केंद्र व राज्य शासनांनीही मान्य केली आहे. म्हणून शासकीय पातळीवरील संस्थेने उद्या एखादे नियतकालिक सुरू केले, तर 'भाषा आणि जीवन'ची गरज संपणार नाही. नुकत्याच जाहीर केलेल्या पारितोषिकामुळे 'भाषा आणि जीवन'बद्दलच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि त्यामुळे आमची जबाबदारीही वाढली आहे, याची आम्हांला जाणीव आहे. वाचकांच्या प्रेमाबरोबरच त्यांचा सक्रिय सहभाग वाढत्या प्रमाणात मिळाला, तर आमचे काम सोपे होईल, असा आम्हांला विश्वास वाटतो.

प्रभाकर नारायण परांजपे