शंभराव्या अंकाचे संपादकीय: साहित्याचे सांस्कृतिक संदर्भ आणि भाषांतर

विल्यम गोल्डिंगच्या 'लॉर्ड ऑफ दी फ्लाईज' या कादंबरीच्या अखेरीस येणार्‍या ब्रिटिश नाविक अधिकार्‍याच्या तोंडी एक वाक्य आहे.: "I know Jolly good show, Like the Coral Island" ("आय नो, जॉली गुड शो, लाइक द कोरल आयलंड"). या कादंबरीचे जी०ए० कुलकर्णी यांनी मराठी भाषांतर केले आहे. त्यात या वाक्याचे भाषांतर म्हणून पुढील वाक्ये येतात : "आलं ध्यानात ! तुम्ही येथे सगळी मजाच केली म्हणायची ! प्रवाळ-द्वीपविषयीच्या पुस्तकात नेहमी असते तशी! निळे स्वच्छ पाणी, सोनेरी वाळू, पिकलेली रसरशीत, सहज हाताला येणारी फळे, निष्पाप गोड खेळ, नाटके, खोट्या खोट्या लढाया, गोड गोड गाणी! आणि मग सगळं विसरून एकमेकांच्या गळ्यात गळा घालून चांदण्याखाली गोड स्वप्न पाहात घेतलेली गुलाबी झोप - चांगली चैन केलीत तुम्ही!"

असं का व्हावं? एका 'कोरल आयलंड'च्या भाषांतरासाठी जी०एं०ना इतका विस्तार करण्याची आवश्यकता का भासली?

ललित साहित्याच्या भाषांतरामध्ये येणार्‍या एका महत्त्वाच्या समस्येचं दर्शन यातून घडते. आणि या समस्येच्या सोडवणुकीचा एक निश्चित, प्रमाण असा मार्ग नाही.

काय आहे ही समस्या? 'कोरल आयलंड' ही आर०एम० बॅलंटाइन या ब्रिटिश लेखकाची १८५७ मध्ये प्रसिद्ध झालेली रोमँटिक कादंबरी आहे. एका बेटावर अडकलेल्या तीन ब्रिटिश मुलांची साहसकथा आहे. त्या कादंबरीचा उल्लेख करून गोल्डिंगने आपल्या कादंबरीला एक संदर्भ चौकट दिली आहे. गोल्डिंगच्या कादंबरीतही एका बेटावर अडकलेली मुले आहेत; पण त्यांचे वर्तन 'कोरल आयलंड'मधील मुलांच्यापेक्षा फार भिन्न आहे. स्वार्थ, मत्सर, हेवेदावे, खोटेपणा, अंधश्रद्धा आणि हिंसा यांमुळे ती सुसंस्कृत, शिस्तबद्ध मुले हळूहळू रानटी 'आदिवासी' बनत जातात. 'लॉर्ड ऑफ दी फ्लाइज'मध्ये या बदलाचे धक्‍कादायक दर्शन होते. मुले निष्पाप असतात, ती 'देवाघरची फुले' असतात, या १९व्या शतकात लोकप्रिय असलेल्या समजुतीला छेद देणारी ही कादंबरी १९५४ मध्ये (म्हणजे 'कोरल आयलंड'नंतर ९७ वर्षांनी प्रसिद्ध झाली. आपल्या कादंबरीने वाचकांना 'कोरल आयलंड'ची आठवण व्हावी आणि त्यांच्यात व्यक्त होणार्‍या दृष्टिकोणांमधील विरोध वाचकांच्या लक्षात यावा म्हणून गोल्डिंगने नाविक अधिकार्‍याच्या तोंडी 'कोरल आयलंड'चा उल्लेख घातला आहे.

(ज्या वाचकांनी 'कोरल आयलंड' वाचली आहे त्यांना तिच्या उल्लेखामुळे 'लॉर्ड ऑफ दी फ्लाइज' सुन्न करील, अंतर्मुख करील यात शंका नाही. माणूस समजण्याच्या बाबतीत १९व्या शतकातील लोक भाबडे होते का?)

दोन महायुद्धांमुळे (लॉर्ड ऑफ दी फ्लाइज'मधील काळ तिसर्‍या महायुद्धाचा आहे.) माणसात मूलभूत फरक पडला आहे का? स्वार्थ-द्वेष-मत्सर-हेवा व हिंसा यांमुळे माणूस स्वतःचाच नाश ओढवून घेणार आहे का? असे अनेक प्रश्न त्याला पडतील. त्यामुळे ब्रिटिश वाचकांच्या दृष्टीने 'कोरल आयलंड'चा उल्लेख महत्त्वाचा आहे यात शंका नाही.

पण मराठी वाचकांचे काय? मराठी वाचकांनी 'कोरल आयलंड' वाचली असेल असे गृहीत धरता येत नाही. मग भाषांतरकाराने हा उल्लेख जशाच्या तसा ठेवायचा ? की तो पूर्णतः वगळायचा? की जी०एं०नी केला आहे त्याप्रकारे त्या उल्लेखाचा विस्तार करावयाचा ? की त्यावर एक पदटीप देऊन त्याचा अर्थ स्पष्ट करायचा ? या प्रश्नाला सर्वांना मान्य होईल असे एक 'प्रमाण' उत्तर नाही, हे उघड आहे.

'लॉर्ड ऑफ दी फ्लाइज' या कादंबरीचे शीर्षकच पाहा. त्याचे भाषांतर करायचे नाही असा निर्णय भाषांतरकार व प्रकाशकांनी घेतला. बायबलच्या 'सेकंड बुक ऑफ दी किंग्ज' च्यापहिल्या प्रकरणाच्या दुसर्‍या परिच्छेदात बाल्झेबब (Balwze-bub) चा उल्लेख आहे. हिब्रू भाषेत त्याचा अर्थ ' माश्यांचा स्वामी' असा आहे. खोट्या देवांच्या पैकी तो एक आहे. ग्रीक भाषेत त्याचा अर्थ 'सैतान' असा आहे. ('न्यू टेस्टामेंट'मधील मॅथ्यूच्या पुस्तकातील १२व्या प्रकरणात परिच्छेद २४ व २७ मध्येही बील्झेबबचा उल्लेख आहे.) कादंबरीत मृत वैमानिकाच्या प्रेतावर माश्या घोंघावत आहेत आणि पॅरॅशूटमध्ये अडकलेले ते प्रेत वार्‍यामुळे मागेपुढे हलताना दिसते. त्यालाच मुले 'लॉर्ड ऑफ दी फ्लाइज' समजतात. त्याला प्रसन्न करण्याचे बेत आखतात. अर्थात हा 'माश्यांचा स्वामी' म्हणजे मुलांच्या मनातील भीतीचेच प्रतीक आहे. (देवांचा जन्म अशा गूढ अनामिक भीतीतूनच होतो.) या शीर्षकाला असलेला बायबलचा संदर्भ लक्षात यावा म्हणून इंग्रजी शीर्षकात बदल करण्यात आला नसावा. (अर्थात याचे भाषांतर 'सैतान' असे होऊ शकते आणि मुलांच्या मनात जाग्या होऊ पाहणार्‍या दुरिताचा तो अन्वर्थक ठरू शकतो. शिवाय सैतान या शब्दाला ख्रिश्चन धर्माचा - पर्यायाने बायबलचा संदर्भ आहे. पण ते शीर्षक फार भडक ठरण्याचा धोका आहे.) साहित्यात मुरलेले सांस्कृतिक संदर्भ भाषांतरकारापुढे समस्या निर्माण करतात त्या अशा !

प्र०ना० परांजपे