संस्कृत आणि प्राकृतहिमालय पर्वताची कन्या पार्वती. तिने शंकर हा आपला पती व्हावा म्हणून तप केले. यथावकाश तप फळाला आले आणि लग्न झाले. त्यांना पुत्रप्राप्ती झाली. त्या पुत्राने तारकासुर नावाच्या राक्षसाला मारले. या सगळ्या कथेचे 'कुमारसंभवम्' हे संस्कृत महाकाव्य कालिदासाने लिहिले.

दैवी विवाहाचे वर्णन
    त्या काव्याच्या सहाव्या सर्गात पार्वतीला मागणी घालायला सप्तर्षी आकाशमार्गाने हिमालयाकडे आल्याचे वर्णन आहे. वेताच्या आसनावर त्यांना बसवून हिमालयाने त्यांची स्तुती केली. आंगिरस ऋषींनी हिमालयाला सांगितले की, "आमच्या मुखाने शिवच तुमच्या कन्येला मागणी घालतो आहे." त्या वेळी पार्वती पित्याच्या पाठीशी कमळाच्या पाकळ्या मोजीत होती. तिच्या आईकडे पाहून तिची संमती मिळाल्यावर हिमालयाने पार्वतीला पुढे घेऊन ऋषींना म्हटले, "ही शिववधू आपणांस नमस्कार करतेय." तिला अरुंधतीने मांडीवर बसवून घेतले. हिमालयाने विचारल्यावरून ऋषींनी चार दिवसांनंतरची तिथी पक्‍की केली.
    सातव्या सर्गात लग्नघरातले आणि विवाहसोहळ्याचे वर्णन आहे. शुक्लपक्षातल्या शुभतिथीला वधूला विवाहदीक्षा दिली. परिवारातल्या आणि बाहेरच्याही कितीकांनी मांडीवर घेऊन तिला आशीर्वाद दिले. चंद्र फाल्गुनी नक्षत्रात असताना लेकुरवाळ्या सुवासिनींनी तिचा शिणगार केला. तिला चौकात नेऊन सुवर्णकुंभांनी न्हाऊ घातले. धूपाने केस सुकवून दुर्वा, गोपीचंदन, मोहफुलांच्या माला यांनी तिला सजवले. तिची पावलं रंगवल्यावर सख्या म्हणाल्या, "पतीच्या माथ्यावरच्या चंद्रकलेला हे लाव बरं का." मग तिची आई मेना हिने तिला विवाहतिलक लावला, कुलदेवतांना आणि सुवासिनींना नमस्कार करायला लावले. तिकडे कैलासावर सप्त मातृकांनी शिवालाही अलंकारिले. नंदीवर बसून शंकर निघाले, त्यांच्यामागे मातृका आणि महाकाली होत्या. गंगायमुना मूर्तरूपाने चवर्‍या ढाळीत होत्या. सप्तर्षींना 'तुम्ही माझे पुरोहित' असे शिवाने सांगितले. औषधिप्रस्थ नगरापाशी पोचल्यावर भूमीवर उतरून शिवाने वंदन केले तेव्हा हिमालयच लाजल्यासारखा झाला. शिवाला पाहण्यासाठी स्त्रियांची एकच गडबड उडाली. लग्नघरात, रत्‍ने टाकलेले पाणि शिवाच्या पायांवर घातले आणि हिमालयाने रेशमी वस्त्रे दिली ती शिवाच्या अंगावर घालून त्याला वधूकडे नेले. वधूवरांनी हातात हात घेऊन अग्नीला प्रदक्षिणा घातल्या. पुरोहिताने वधूच्या हाताने लाजाहोम करविला आणि तिला म्हटले, "तुझ्या विवाहाला अग्नी साक्ष आहे. पती शिवासह धर्माने वाग." शिवाने तिला ध्रुवतारा दाखवला. मग त्यांनी ब्रह्मदेवाला जोडीने नमस्कार केला. त्याने 'वीरप्रसू हो' असा आशीर्वाद दिला. नंतर ती दोघे सोन्याच्या आसनावर बसली तेव्हा लोकरीतीने भाताची कोवळी रोपे त्यांच्यावर टाकली. नंतर त्या दोघांवर स्वतः लक्ष्मीने लांब दांड्याच्या कमळाचे छत्र धरले.

कविकालीन वास्तव
    कालिदासाने देवदेवतांच्या विवाहाचे वर्णन केले असले तरी विधींचे तपशील मात्र त्याच्या समकालीन समाजातल्या चालीरीतींचेच आहेत. भारतात सामाजिक विधी-उत्सव शेकडो वर्ष साजरे होत आले आहेत. त्यामुळे भाताची कोवळी रोपे अंगावर टाकण्याच्या विधीला चौथ्यापाचव्या शतकातला कालिदास 'लौकिक' म्हणतो आणि चौदा-पंधराव्या शतकातला मल्लिनाथ 'लौकिक आचार मनानेही डावलू नये' असा त्याला शास्त्राधार देतो. थोड्याफार पद्धतीने आजचेही विवाह असेच होतात. त्यामुळे शिवपार्वतीच्या विवाहाचे वर्णन आपल्याला फार ओळखीचे वाटण्यासारखे आहे. वधूवर, आप्तगोत आणि वर्‍हाडी भले दैवी अतिमानवी (पर्वत, नद्यासुद्धा) असोत, त्यांची चालचलणूक कवीच्या परिसरातल्या माणसांसारखीच वर्णिलेली असते. त्याचमुळे कथेतल्या पात्रांचे चरित्र जरी अद्भुतांनी भरलेले असले तरी ते (आजच्या अर्थाने) ऐतिहासिक नसते.
    पुराणकथेचा हा विशेष समजून घेतला तर तिच्या शब्दवर्णनांना आपण प्रमाण मानणार नाही किंवा पुराणकथांवरून इतिहास काढणार नाही. तरीसुद्धा त्या शब्दवर्णनांच्या मागे कविकालीन वास्तव दडलेले असते ते चिकित्सकपणे पाहिले तर सामाजिक-सांस्कृतिक इतिहासाची एखादी झलक आपल्याला मिळते.

संस्कृत-प्राकृतांचा उपयोग
    शिवपार्वतीच्या या विवाहात लक्ष्मी छत्र धरायला आली; पाठोपाठ सरस्वतीही स्तवन करायला आली. "सरस्वतीने दोन प्रकारच्या भाषेने त्या दोघांच्या जोडप्याची स्तुती केली. त्या सुयोग्य वराची संस्कारपूत भाषेत, तर वधूची समजायला सोप्या भाषेत!" (द्विधाप्रयुक्तेन च वाङ्मयेन सरस्वती तन्मिथुनं नुनाव । संस्कारपूतेन वरं वरेण्यं वधूं सुखग्राह्यनिबन्धेन ।।७.९०।।) या श्लोकातल्या पदांचा अर्थ टीकाकार मल्लिनाथने स्पष्ट केला आहे. "'द्विधाप्रयुक्तेन' म्हणजे संस्कृत-प्राकृत या दोन रूपांत म्हटलेल्या. 'संस्कारपूतेन' म्हणजे प्रकृतिप्रत्ययविभागशुद्ध संस्कृतात, वराची स्तुती. 'सुखग्राह्यनिबन्धेन' म्हणजे सुबोध रचनेत अर्थात प्राकृतात, वधूची स्तुती. शिव हा पुरुष म्हणून त्याच्यासाठी संस्कृत, पार्वती स्त्री म्हणून तिच्यासाठी प्राकृत!"
देवता असली, जगन्माता असली, तरी पार्वती स्त्री असल्यामुळे तिला संस्कृत समजणारे नव्हते. तिला सरस्वतीनेसुद्धा प्राकृतच ऐकविणे लोकरीतीला धरून होते.  हा सामाजिक नियम होता.  स्त्रियांना संस्कृत समजत नव्हते, त्यांचा व्यवहार प्राकृतातच होत होता. प्राचीन काळापासून चालत असलेली ही स्थिती पाचव्या ते पंधराव्या शतकात तशीच होती. प्राचीन काळापासून नाटकांमधल्या स्त्रीपात्रांचे बोलणे प्राकृतात असावे असा दंडकच होता. कालिदासाच्याच 'शाकुंतल' नाटकाच्या सातव्या अंकात मारीच ऋषी आणि त्यांची पत्‍नी अदिती (दाक्षायणी) यांचा संवाद आहे. ऋषी संस्कृतात सांगतात, "तुझ्या पुत्राच्या (इंद्राच्या) बाजूने आघाडीवर लढणार हा बघ दुष्यन्त नावाचा जगाचा राजा." त्यावर पत्‍नी अदिती प्राकृतात म्हणते, “त्याच्या आकृतीवरूनच तसं वाटतं." (संभावणीआणुभावा से आकिदी! - "संभावनीयानुभावा अस्य आकृतिः।") प्रत्यक्ष देवांचा राजा इंद्र याची आई संस्कृतात बोलत नाही. (नवर्‍याचे संस्कृत संदर्भाने तिला समजते असे मानले पाहिजे!)
भारतीय संस्कृतीने स्त्रियांना नेहमी पुरुषांच्या खालचे स्थान दिले. भारतात स्त्री-शूद्रांना संस्कृत ऐकण्याची मुभा नव्हती. काव्य-कथांमध्ये या स्थितीचे प्रतिबिंब साहजिकच पडले आहे. खुद्द संस्कृतचे रूप आणि स्थिती काय होती? "...स्थलकाल-लोक या बंधनांना बाजूस ठेवून आपल्या ज्ञानव्यवहारासाठी विद्वान एखादी प्रशिष्ट संभाषण कृती घडवीत राहतात. संस्कृत ही अशी प्रशिष्ट कृती - (अ‍ॅ-कल्चरेटेड) आर्टिफॅक्ट) होती; ती प्रत्यक्ष बोली नव्हती" (माहुलकर २००२, पृ० ४६) व्यवहारातली बोली नसलेल्या अशा प्रशिष्ट कृतीतून प्राकृतांसारख्या भाषा निघाल्या किंवा भारतार्य म्हटलेल्या भाषांचे मूळ तिच्यात आहे, अशा प्रणाली वास्तवाला किंवा इतिहासाला धरून नाहीत. विद्यापीठांमधले भाषाविज्ञानाचे अभ्यासक्रम मात्र याच गृहीतावर ठाम आहेत. भाषा-कथा-संस्कृतींचा समवायाने विचार करून भारतीय भाषाविज्ञानात जरूर ते फेरबदल केले पाहिजेत.

(संदर्भ: माहुलकर, दिनेश द० २००२. वृद्धि: राज्य मराठी विकास संस्था, मुंबई)