...हिचे पांग फेडू

भाषा आणि जीवन अंक : दिवाळी २००७ 'भाषा आणि जीवन' या त्रैमासिकाची रौप्यमहोत्सवी वाटचाल म्हणजे मराठीच्या भाषिक-सांस्कृतिक पर्यावरणातील एक महत्त्वाची घटना आहे. १ जानेवारी १९८२ मध्ये पुण्यात स्थापन झालेल्या मराठी अभ्यास परिषदेचे हे नियतकालिक. भाषेचा विकास होण्यासाठी तिचा प्रसार होणे जसे महत्त्वाचे असते. तसेच भाषेला प्रतिष्ठा मिळण्यासाठी तिचा कस टिकवणेही गरजेचे असते. यासाठी कार्यरत राहिलेल्या 'भाषा आणि जीवन' ला महाराष्ट्र फाउंडेशनचा वैचारिक नियतकालिकाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे.
२००७ मध्ये 'भाषा आणि जीवन' या त्रैमासिकाच्या पंचविसाव्या वर्षातील अंक वाचकांपर्यंत पोहोचले आहेत. 'भाषा आणि जीवन'ची ही रौप्यमहोत्सवी वाटचाल म्हणजे मराठीच्या भाषिक-सांस्कृतिक पर्यावरणातील एक महत्त्वाची घटनाच आहे. १ जानेवारी १९८२ मध्ये पुण्यात स्थापन झालेल्या 'मराठी अभ्यास परिषदे'चा हा नियतकालिकाचा उपक्रम १९८३ पासून अखंड चालू आहे.
मराठी माणसांच्या भाषाविषयक गरजा पूर्ण करणे, हे परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे. माणसाला जश्या काही मूलभूत गरजा असतात, तशाच काही सांस्कृतिक गरजाही असतात. भाषा ही तर सुसंस्कृत मानवाची चौथी मूलभूत गरज मानायला हवी. मराठीच्या विकासासाठी पायाशुद्ध अशी सैद्धांतिक बैठक तयार करणे विशेष गरजेचे असते. भाषिक प्रश्नांचा केवळ भावनिक पातळीवरून पाठपुरावा करून चालत नाही, त्यामागे वस्तुनिष्ठ अशी वैज्ञानिक दृष्टी असावी लागते.


परिषदेने या भूमिकेतून आजवर काम केले. 'इंग्रजीची खिडकी, मराठीचे डोळे' असे घोषवाक्य समोर ठेवून अस्मितेचा प्रश्न संकुचित वर्तुळात अडकू दिला नाही. विविध चर्चासत्रे, व्याख्याने यांच्या माध्यमातून परिषदेने भाषाविषयक प्रश्नांबाबत मार्गदर्शन केले आहे. १ मे या महाराष्ट्रदिनी संस्थेने मराठी भाषेच्या विकासासाठी पूरक अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा परिपाठ चालू ठेवला आहे. 'भाषा आणि जीवन' हे परिषदेचे त्रैमासिक म्हणजे 'भाषा' या सूत्राला वाहिलेले एकमेव नियतकालिक आहे. 'भाषा' या संकल्पनेची यातून व्यापक दृष्टीने ओळख करून दिली जाते. भाषेत जडलेले जीवन आणि जीवनाच्या अनेक क्षेत्रांत व्यापून राहिलेली भाषा यांच्या नात्याचा यात विविध प्रकारे वेध घेतला जातो. मराठी भाषकांच्या भाषिक गरजा या केवळ 'मराठी एके मराठी' अशा असून चालणार नाहीत. वाचकांच्या बौद्धिक व सांस्कृतिक भरणपोषणासाठी तात्त्विक स्वरूपाचे लेखन, उत्तम अनुवाद यांचीही गरज असते. अनुवादित साहित्यातून इतर भाषाविश्वांशी ओळख होते. त्यातून वाचकांचे भाषाविषयक अपेक्षांचे क्षितिज विस्तारते. त्यांच्या अनुभवाचा आवाका वाढत जातो. भाषांतराची शास्त्रीय चिकित्सा करणारे 'भाषा आणि जीवन'चे विशेषांक तसेच लोकशिक्षणावरील विशेषांक यादृष्टीने उपयुक्त आहेत. भाषेची निर्मिती, तिचा प्रसार, लिपिविषयक प्रश्न, भाषेतील सामाजिक पेच, भाषा आणि साहित्य यांतील अनुबंध, भाषातज्ज्ञांच्या विचारांचे परीक्षण इत्यादीविषयीचे लेखन अंकामध्ये समाविष्ट असते. व्याकरण, भाषासंशोधन, भाषाविज्ञान अशा अनेक गंभीर विषयांवरील लेख जसे त्यात असतात, तसेच हलकीफुलकी भाषिक निरीक्षणे, मार्मिक पानपूरके असा गमतीदार भागही असतो. मराठीला केवळ राजभाषा म्हणून मान्यता मिळून पुरेसे नाही. तिच्या विकासासाठी लोकभाषा आणि ज्ञानभाषा या दोन्ही पातळ्यांवर तिचे महत्त्व प्रस्थापित होणे आवश्यक आहे. प्रशासन, प्रसारमाध्यमे, उद्योगधंदे, विज्ञान-तंत्रज्ञान, विविध व्यवसाय या लोकव्यवहाराच्या वाढत्या परिमाणांमुळे मराठीच्या विकासालाही चालना मिळायला हवी. त्या शक्यता अजमावण्याचे प्रयत्न 'भाषा आणि जीवन' मधील लेखांमधून होत असतात. मराठी ही एक सक्षम ज्ञानभाषा होण्याचा संबंध अनेक शैक्षणिक बाबींशी जोडलेला असतो. त्यामुळे शिक्षणाचे माध्यम, पाठ्यपुस्तकांचे मूल्यमापन, भाषाशिक्षकांसाठी मार्गदर्शन याही दिशेनं अंकात विचारमंथन चालू असते.


वाचकांच्या भाषाविषयक शंकांना तज्ज्ञांकडून उत्तरे दिली जातात. 'संपादकीय' मधून विचारांची दिशा सुचवली जाते. पुस्तक परीक्षणे आणि वर्षभरातील भाषाविषयक लेखनसूची यांचा अभ्यासकांना उपयोग होतो. एखाद्या बोलीभाषेविषयीचा परिचयात्मक लेखव 'भाषा आणि जीवन' मधील अनेक सदरे भाषेतील स्थित्यंतरावर प्रकाश टाकतात. 'दखलपात्र' गोष्टींची त्यात नोंद घेतली जाते. 'ज्याची त्याची प्रचीती' त्यात सादर होते. दैनंदिन भाषाव्यवहाराची खेळकरपणाने दखल घेणारी पानपूरके हा तर या नियतकालिकाचा एक महत्त्वाचा घटकच आहे. 'शंका आणि समाधान' मधून वाचकांच्या भाषाविषयक प्रश्नांना तज्ज्ञांकडून उत्तरे दिली जातात. 'संपादकीय' मधून विचारांची दिशा सुचवली जाते. पुस्तक परीक्षणे आणि वर्षभरातील लेखनसूची यांचा अभ्यासकांना उपयोग होतो. एखाद्या बोलीभाषेविषयीचा परिचयात्मक लेख वाचकांना भाषेचा वेगळा लहेजा जाणवून देतो. एखाद्या परकीय भाषेतील अनुवादित कविता, एखाद्या भारतीय भाषेचा तुलनात्मक अभ्यास यांनाही अंकात स्थान असते. एक प्रकारे मराठीचा विकास होण्यासाठी उपयुक्त अशा गोष्टींबरोबरच विविध भाषांचे शांततापूर्ण सहजीवनही त्यात चालू असते. 'भाषा आणि जीवन'ची मुखपृष्ठेही वाचकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहेत. भाषाविषयक अशी कवितेतील अवतरणे, भाषातज्ज्ञांची छायाचित्रे, शि. द. फडणीस यांची मिश्किल व्यंगचित्रे, श्याम देशपांडे, अनिल अवचट यांची आकर्षक रेखाचित्रे, विनय सायनेकर व सुप्रिया खारकर यांनी संगणकीय मदतीने तयार केलेली चित्तवेधक मांडणीची मुखपृष्ठे यांचाही आवर्जून उल्लेख करायला हवा.


'भाषा आणि जीवन'च्या प्रमुख संपादकपदाची धुरा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषावैज्ञानिक डॉ. अशोक रा. केळकर यांनी सुरुवातीला अनेक वर्षे वाहिली. त्यांनी संस्थेला आणि अंकालाही भक्कम तात्त्विक बैठक दिली आणि विकासाच्या दिशाही लक्षात आणून दिल्या. पुढच्या काळात डॉ. कल्याण काळे, डॉ. विजया देव, डॉ. मृणालिनी शहा यांनीही या परंपरेचे पालन केले. सध्या संस्थेचे अध्यक्ष व संस्थापक प्रा. प्र. ना. परांजपे हे प्रमुख संपादक असून डॉ. विजया देव, डॉ. मृणालिनी शहा, डॉ. नीलिमा गुंडी संपादक मंडळात कार्यरत आहेत. या सर्वांबरोबरच डॉ. मॅक्सिन बर्नसन, डॉ. द. दि. पुंडे, डॉ. गं. ना. जोगळेकर, डॉ. अंजली सोमण, आशा मुंडले, यशवंत कानिटकर, डॉ. नीती बडवे यांचाही 'भाषा आणि जीवन'च्या आजवरच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण सहभाग आहे. भाषेचा विकास टिकवण्यासाठी तिचा प्रसार होणे जसे महत्त्वाचे असते तसेच भाषेला प्रतिष्ठा मिळण्यासाठी तिचा कस टिकवणेही गरजेचे असते. यासाठी कार्यरत राहिलेल्या 'भाषा आणि जीवन'ला महाराष्ट्र फाउंडेशनचा वैचारिक नियतकालिकाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे, हे येथे नोंदवायला हवे. भाषेचा विकास ही एक गतिमान प्रकिया असते. त्यासाठी सनदशीर मार्गाने लोकजागृती करण्याबरोबरच उत्तमाची बूजही राखावी लागते. परिषदेने यासाठी 'बॅंक ऑफ महाराष्ट्र'च्या सहकार्याने १९८३ पासून भाषाविषयक उत्कृष्ट लेखनासाठी महाबॅंक लेखन पुरस्कार (रु. ५०००) सुरू केला आहे. आजवर हा पुरस्कार प्रा. मिलिंद मालशे, डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. दिलीप धोंडगे, प्रा. कृ. श्री. अर्जुनवाडकर, प्रा. वसंत आबाजी डहाके आदी मान्यवरांना मिळाला आहे. हा पुरस्कार मिळालेल्या ग्रंथांमध्ये 'पाणिनीय व्याकरण आणि भाषा तत्त्वज्ञान' (पं. वामनशास्त्री भागवत), 'केशवसुतांच्या कवितेचा शैलीवैज्ञानिक अभ्यास' (डॉ. शकुंतला क्षीरसागरांचा अप्रकाशित प्रबंध), डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांचे 'झाडी बोली' विषयीचे पुस्तक, 'अ डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी' (ऍन फेल्डहाऊस आणि शं. गो. तुळपुळे), 'शब्दानुबंध' (शंकर सखाराम) अशा विविध प्रकारच्या भाषाविषयक ग्रंथांचा समावेश आहे. मराठीचा भाषाविषयक अभ्यासाचा प्रदेश अलीकडे विस्तृत होत आहे. पूर्वी पुरस्कारासाठी एखादा लेखही विचारात घेतला जात असे, कारण पुस्तकांची संख्या कमी असे. आता ती उणीव राहिलेली नाही. यंदा हा पुरस्कार 'भाषाव्यवहार आणि भाषाशिक्षण' (प्रकाशक - कासेगाव एज्युकेशन सोसायटी) या सुरेंद्र गावस्कर यांनी संपादित केलेल्या पुस्तकाला मिळाला आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने संस्थेचाभोवतालच्या भाषिक व्यवहारांशी दृढ असा संबंध राहतो, हे महत्त्वाचे!'


अलीकडे अनेक नियतकालिकांमध्ये भाषाविषयक सदरांना स्थान मिळू लागले आहे. भाषाविषयक भान जागे ठेवण्याच्या परिषदेच्या प्रयत्नांची ही फलश्रुती तर नव्हे? अर्थात एवढेच पुरेसे नाही. आजच्या कालात भाषाविषयक प्रश्नांचा पोत बदलत आहे. या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी तरुण व उत्साही कार्यकर्ते आणि विचक्षण वाचक यांचे वाढते पाठबळ संस्थेला हवे आहे. म्हणजे 'हिचे पुत्र आम्ही, हिचे पांग फेडू' हे कविवर्य माधव जूलियन यांनी मराठीला समस्त मराठी भाषकांच्या वतीने दिलेले आश्वासन पाळणे शक्य होईल. परिषद याबाबतीत आशावादी आहे. सरकारी अनुदानाबरोबरच अनेक समविचारी संस्था आणि भाषाप्रेमी व्यक्ती यांच्या मदतीने 'भाषा आणि जीवन' आज रौप्यमहोत्सवाचा टप्पा साजरा करू शकले आहे. पुढच्या कालखंडातही 'भाषा आणि जीवन' आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान टिकवून ठेवेल आणि भाषाविकासाच्या प्रश्नांना चालना देण्यात ठोस भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे.

डॉ. नीलिमा गुंडी
(कार्यवाह, मराठी अभ्यास परिषद)